स्टोव्ह : अन्न शिजविण्यासाठी, परिसर ( उदा., इमारत ) उबदार करण्यासाठी अथवा तापनासाठी ( उदा., प्रक्रियेतील द्रव किंवा वायू, पोलादाची झोतभट्टी ) वापरण्यात येणार्‍या प्रयुक्तीला वा साधनाला स्टोव्ह म्हणतात. स्टोव्ह सहज वाहून नेता येण्यासारखा किंवा पक्का बसविलेला असतो. एका प्रकारच्या स्टोव्हमध्ये मातीचे, चिनी मातीचे किंवा सामान्य-पणे धातूचे बंदिस्त पात्र ( टाकी ) असून त्यात इंधन व हवा यांचे मिश्रण जाळून उष्णता निर्माण होते. ही उष्णता या टाकीतून बाहेरच्या दिशेत प्रारित होते ( पसरते ) व ती वरील कामांसाठी वापरतात. वातीचा स्टोव्ह, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा साधा आणि डाखकामासाठीचा सरळ झोतासारखी ज्योत असलेला दाबयुक्त हवा असलेला स्टोव्ह हे भारतात प्रचलित वा परिचित असलेले स्टोव्हचे प्रमुख प्रकार आहेत. पाश्चात्त्य देशांत स्टोव्ह ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली जात असून या नोंदीत प्रथम पाश्चात्त्य स्टोव्हचा थोडक्यात ऐतिहासिक आढावा घेतला असून नंतर भारतात वापरल्या जाणार्‍या स्टोव्हच्या प्रकारांची माहिती थोडक्यात दिली आहे.

  ज्ञात असा पहिला स्टोव्ह अल्सेस (  फ्रान्स ) येथे १४९० मध्ये तयार करण्यात आला तो पूर्णपणे विटा व फरश्या (टाइल्स ) यांचा होता व त्याला धूममार्ग ( धुराडे ) होता. नंतरच्या स्कँडिनेव्हियन स्टोव्हला उंच लोखंडी धुराडे होते. त्या धुराड्यात लोखंडी आडव्या पट्ट्या होत्या. त्या पट्ट्यांची मांडणी अशा रीतीने केली होती, की त्यामुळे बाहेर निघून जाणार्‍या वायूचा प्रवासमार्ग अधिक लांब झाला व यामुळे कमाल उष्णता मिळविणे शक्य झाले. रशियन स्टोव्हमध्ये जाड भिंतीची बांधलेली सहा धुराडी होती. उत्तरेकडील यूरोपीय देशांत हा स्टोव्ह अजून वापरात आहे. असा स्टोव्ह पुष्कळदा आतल्या खोल्यांचे विभाजन करणार्‍या भिंतींच्या छेदनबिंदूनजिक उभारतात. तो अशा रीतीने बांधतात की, या स्टोव्हचा व धुराड्याचा एकेक भाग चार खोल्यांत असतो. स्टोव्ह व धुराडी तप्त होईपर्यंत यात जाळ ठेवतात आणि नंतर जाळ विझवून धुराडी बंद करून उष्णता साठविली जाते.

  अमेरिकेच्या मॅसॅचूसेट्स राज्यातील लिन या गावी पहिला बिडाचा स्टोव्ह १६४२ मध्ये तयार करण्यात आला. या स्टोव्हमध्ये जाळ्या नव्हत्या व स्टोव्ह म्हणजे बिडाची पेटी होती. १७४० मध्ये बेंजामिन फ्रँक्लिन यांनी ‘ पेनसिल्व्हेनिया फायरप्लेस ’ ( भिंतीमधील चुलाण ) शोधून काढला. तापविण्याच्या स्टोव्हची मूलभूत तत्त्वे त्यात वापरली होती. या स्टोव्हमध्ये जाळीवर लाकूड जाळीत व त्याला सरकणारी दारे होती. या दारांमुळे त्यातून जाणार्‍या हवेच्या प्रवाहाचे नियंत्रण करता येत असे. हा स्टोव्ह सापेक्षतः लहान असल्याने तो भिंतीमधील मोठ्या चुलाण्यात बसवीत किंवा खोलीच्या मध्यभागी मोकळा ठेवून तो धुराड्याला जोडीत असत. या स्टोव्हने उत्तर अमेरिकेत सर्वत्र शेतातील घरे, शहरातील निवासस्थाने, सरहद्दीवरील तंबू व राहुट्या उबदार ठेवल्या जात. १७९२ मध्ये इंग्लंडमधील विल्यम स्ट्रट यांनी स्टोव्हमध्ये आणखी सुधारणा केल्या. फ्रँक्लिन स्टोव्हच्या अभिकल्पाचा ( आराखड्याचा ) प्रभाव डेर्‍यासारख्या ( पॉटबेलीड ) स्टोव्हवर पडला. असे डेर्‍यासारखे स्टोव्ह हे विसाव्या शतकातही काही घरांचे परिचित असे वैशिष्ट्य होते. १८०० मध्ये फिलाडेल्फिया ( पेनसिल्व्हेनिया ) येथे आयझॅक ऑर यांनी जाळ्या बस-विलेला बिडाचा पहिला गोलाकार स्टोव्ह तयार केला. १८३३ मध्ये जॉर्डन ए. मॉट यांनी अँथ्रॅसाइट ( दगडी कोळशाचा प्रकार ) जाळणारा विशिष्ट प्रकारचा ( बेस-बर्निंग ) स्टोव्ह शोधून काढला.

 आ. १. स्टोव्ह : (१) टाकी, (२) स्पिरिट वाटी, (३) वरील चकती,(४) ज्वालक, (५) उद्वाहक नलिका, (६) पंप.इमारतीचे मध्यवर्ती तापन हा विकसित देशांमध्ये सामान्य नियम ( प्रघात ) झाल्याने विसाव्या शतकात स्टोव्ह मुख्यत्वे स्वयंपाकासाठी वापरले जाऊ लागले. तथापि लाकूड, लोणारी व दगडी कोळसा  वापरणार्‍या स्वयंपाकाच्या लोखंडी स्टोव्हमुळे मोठ्या प्रमाणात उष्णता प्रारित होत असल्याने उन्हाळ्यात स्वयंपाकघर जास्त तापून तेथील परिसर असुखद होतो. विसाव्या शतकात अशा स्टोव्हऐवजी नैसर्गिक वायूद्वारे किंवा विजेने तापविण्यात येणार्‍या पोलादी शेगड्या, चुलासंच वा भट्ट्या ( गरम पेट्या ) वापरण्यात येऊ लागल्या.

स्टोव्हसाठी लाकूड, लोणारी व दगडी कोळसा किंवा तेल ( केरोसीन ) हे इंधन वापरता येते. मात्र आधुनिक संकल्पनेनुसार स्टोव्हसाठी तेल हे इंधन वापरतात. तेल वापरणार्‍या स्टोव्हचे स्थूलपणे दाबयुक्त व दाबहीन असे दोन प्रमुख प्रकार आहेत. दाबहीन प्रकारात वाती वापराव्या लागतात व म्हणून त्याला वातीचा स्टोव्ह म्हणतात.

 दाबयुक्त स्टोव्हचे कार्य केरोसीन व दाबयुक्त हवा यांच्या मिश्रणाच्या ज्वलनावर चालते. आधीच तापविलेल्या ज्वालकामधील ( बर्नरमधील ) अभिसरण होताना केरोसिनाचे वायूत रूपांतर होते. नंतर ते बोंडातून ( निपलमधून ) जाऊन हवेत मिसळते. हवा-वायूचे मिश्रण बाहेरच्या टोपीतील लहान छिद्रांतून जाते व ज्वालक पेटून अतितप्त व निळसर ज्योत निर्माण होते.

  दाबयुक्त स्टोव्हच्या टाकीत केरोसीन गाळून भरतात व त्याच्यावर हवेच्या दाबासाठी पुरेशी मोकळी जागा ठेवतात. तेलासाठी असलेले बूच पिळून घट्ट करतात व दाब मुक्त करणारी झडप उघडतात. मिथिल अल्कोहॉलयुक्त निष्प्रकृतिकृत स्पिरिट स्टोव्हच्या वाटीत टाकून पेटवितात. ज्वालक तापल्यावर दाब मुक्त करणारी झडप घट्ट करतात. नंतर पंपाने स्टोव्हमध्ये हवा भरतात. पंपाने हवा भरून ज्योत मोठी करता येते व दाब मुक्त करणारी झडप उघडून ज्योत लहान करता येते. ही झडप पूर्ण उघडून ज्योत विझविता येते. वापरात नसताना हवेसाठीची झडप नेहमी उघडी ठेवावी लागते. दाबयुक्त स्टोव्ह घडीचेही असतात. त्यांना एक वा दोन ज्वालक असू शकतात आणि ते ज्वालक फर्ररऽऽ आवाज करणारे किंवा बिनआवाजी प्रकारचे असतात.

  डाखकामासाठी वापरण्यात येणारा स्टोव्ह दाबयुक्त असून त्याची ज्योत सरळ झोतासारखी असते आणि त्याच्या ज्वालकाची रचना मुख्यतः वरील स्टोव्हमधील ज्वालकासारखी असते. मात्र त्यात ज्योत पसरट न होता अरुंद व लांब होईल अशी रचना केलेली असते. 

  दाबहीन स्टोव्हचे दोन प्रकार आहेत. एका प्रकारातील ज्योत केरोसिनाने, तर दुसर्‍यातील ज्योत वातींनी नियंत्रित करतात. पहिल्या प्रकारची स्टोव्हची रचना आडवी असते. म्हणजे इंधनाची टाकी व ज्वालक एकमेकांच्या शेजारी एकाच क्षितिजसमांतर पातळीत असतात. तळातून जाणार्‍या नळीने टाकी व ज्वालक यंत्रणा जोडलेली असून या नळीने केरोसिनाचा प्रवाह टिकविला जातो. तेलाच्या प्रवाहाचे गुरुत्वाने नियमन होत असल्याने अशा स्टोव्हला गुरुत्व संभरित स्टोव्ह म्हणतात. या प्रकारच्या दाबहीन गुरुत्व संभरित स्टोव्हमध्ये दंडगोलाकार ॲस्बेस्टस वात वापरतात.

  दुसर्‍या प्रकारच्या वातीचा स्टोव्ह सामान्यपणे वापरला जातो. त्यात इंधनाची टाकी ज्वालक यंत्रणेखाली असते. वातींद्वारे केशाकर्षणाने इंधन वर ज्वालकापर्यंत ओढले जाते. यात एकच दंडगोलाकार सुती वात असते किंवा अनेक सुती वाती असतात. वाती खाली किंवा वर करण्यासाठी यात चावीसारखी यंत्रणा असते.

आ. २. उष्ण-झोत स्टोव्ह : (१) साठवण नळ, (२) वायू उत्कूपक, (३) संयोजनक्षम द्वार, (४) आगवीट, (५) अंतःसूत्रक छिद्र, (६) कार्बन वीट, (७) हवा, (८) वायू , (९) ज्वालक, (१०) चवडीकडे, (११) फुंकनळी यंत्राकडून, (१२) विटा, (१३) परिभ्रमी पन्हळी, (१४) ज्वलन-कोठी, (१५) वायू जाण्याचा मार्ग, (१६) पिंप, (१७) अतितप्त चूल.उष्ण-झोत स्टोव्ह : ( हॉट ब्लास्ट स्टोव्ह ). झोतभट्टीत पूर्वतापन केलेली हवा भरण्यासाठी या स्टोव्हचा वापर करतात. लोखंड प्रक्रियेतील परिणामकारकता वाढविण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची पायरी असते. पूर्वतापन केलेल्या वायूचा वापर १८२८ मध्ये सर्वप्रथम जेम्स बीमॉन्ट नील्सन यांनी ग्लासगो ( स्कॉटलंड ) येथे केला. मात्र १८६० मध्ये एडवर्ड आल्फ्रेड काऊपर या ब्रिटिश शोधकर्त्याने यशस्वी रीत्या उष्ण-झोत स्टोव्ह शोधून काढला. हा स्टोव्ह उदग्र दंडगोलीय असतो. पोलादी आवरणाला आगविटांचे अस्तर लावलेले असते, अंतर्भाग पुढील दोन कप्प्यांमध्ये विभागलेला असतो : (१) ज्वलन कप्पा : ज्यात झोतभट्टीतील वायू आणि इतर स्रोतांचे इंधन जळते. (२) पुनर्जनकीय कप्पा : वायूमुळे उच्चतापीय विटा उष्ण होऊन निर्माण झालेल्या तापाने हा कप्पा भरलेला असतो.

अनेक झोतभट्ट्यांत तीन स्टोव्ह वापरतात. दोन स्टोव्ह तापविले जात असताना तिसर्‍या स्टोव्हमधून उष्ण वायूचा झोत पुनर्जनकीय कप्प्यांत शिरत असतो. झोतभट्ट्यांमध्ये पूर्वतापन केलेली हवा (९००° — १,२५०° से.ला तापविलेली ) भरली जाते आणि त्यामुळे प्रदावणकर तापमान (१,६५०° से.) निर्माण होऊन पोलाद निर्मितीसाठी लागणार्‍या कोळशाच्या वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होते. 

 पहा : गृहोपयोगी उपकरणे ज्वालक पंप.

 संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part VIII, New Delhi, १९७३.                      

ठाकूर, अ. ना.