धुलाई : साबण, प्रक्षालके (डिटर्जंट), सोडा इ. साहित्याचा उपयोग करून पाणी वा विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) यांच्या मदतीने कपड्यातील मळ, तेल, विविध प्रकारचे डाग इ. नाहीसे करून कपडे स्वच्छ करण्याची क्रिया. कपड्याच्या प्रकारानुसार व त्यावरील डाग, मळ इत्यादींनुसार धुलाईची पद्धत व तीत वापरावयाची द्रव्ये यांत बदल करावा लागतो. धुलाई करताना कापडाला इजा पोहोचू नये याची काळजी घ्यावी लागते. सर्वसामान्यतः कपडे परंपरागत पद्धत, यांत्रिक पद्धत व निर्जल धुलाई (ड्राय क्लीनिंग) या तीन पद्धतींनी धुतले जातात.

इतिहास : धुलाईची शोध कधी लागला याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. तथापि ३,०००–४,००० वर्षांपूर्वी इटलीतील पाँपेई येथील गुलाम मोठमोठ्या मातीच्या भांड्यात अनवाणी पायांनी तुडवून कपडे धूत असत असा उल्लेख आढळतो. रोमन काळात कपडे धुण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर चालत असे. त्यांनी खराब झालेल्या व हरवलेल्या कपड्यांबद्दलची भरपाई कशी असावी याविषयी इ. स. पू. २०० च्या सुमारास एक कायदा केलेला होता. रोमन लोक कपडे धुण्यासाठी मुलतानी माती, पोटॅश क्षार (अल्कली) इत्यादींचा उपयोग करीत असत. गॉल लोकांनी साबणाचा शोध लावलेला होता, तरी इ .स. पहिल्या शतकापर्यंत रोमन लोक कपडे धुण्यासाठी त्याचा वापर करीत नव्हते. ब्रिटीश लोकही परंपरागत पद्धतीने कपडे धूत असत. साबण महाग पडतो म्हणून ते मूलतानी माती, अमोनिया, पोटॅश व सोडाक्षार यांच्या मिश्रणाचा उपयोग करीत असत.

भारतात फेस होणारे वनस्पतिजन्य (उदा. बेलफळाचा गर) पदार्थाचे जलीय अर्क, वनस्पतींच्या राखेपासून मिळणारे पदार्थ, उदासीन व क्षारीय माती तसेच निसर्गतः मिळणारे टाकणखार, ट्रोना (सोडियम सेस्किकार्बोनेट, नेट्रॉन) व पोटॅशियम कार्बोनेट या पदार्थांचा कपडे धुण्यासाठी वापर करीत असत. सुश्रुत व चरक यांनी राखेपासून दाहकीकरणाने दाहक (कॉस्टिक) सोडा तयार करण्याची पद्धत वर्णिलेली आढळते.

सतराव्या व अठराव्या शतकांत धुलाईकरिता वापरण्यात येणाऱ्या दाबयंत्रात व इस्त्रीत इंग्रजांनी सुधारणा केल्या. रुळाच्या साहाय्याने कपडे वाळविण्याची मूळ कल्पना फ्रान्समधील ह्युगनॉट या प्रॉटेस्टंट पंथी लोकांची होती. तेथून पुढे ती इतरत्र पसरली. वाफेने कपडे धुण्याचा व्यवसाय १७८९ पासून फ्रान्समध्ये चालू आहे.

इ. स. १८२४ मध्ये सुटी आणि कडक गळपट्टी (कॉलर) वापरात आली. त्यामुळे त्या धुण्याची व त्यांना इस्त्री करण्याच्या गरजेतूनच आधुनिक धुलाईची वाढ झाली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून धुलाईच्या तंत्रात भर पडत गेली. १८३२ च्या सुमारास अमेरिकेत या व्यवसायाची सुरुवात झाली. तथापि व्यावसायिक दृष्ट्या योग्य असे व शक्तीवर चालणारे धुलाई यंत्र १८६३ च्या सुमारास हॅमिल्टन इ. स्मिथ यांनी शोधून काढले. यातील पात्राची गती उलट-सुलट करता येईल अशी व्यवस्था होती. यानंतर त्यांनीच इस्त्री यंत्राचा शोध लावला. पुढे दुसऱ्या महायुध्दाच्या काळात व त्यानंतर स्वयंचलित धुलाई यंत्राचा शोध लागला. यातूनच पैसे टाकून कपडे धुवून देणारी स्वयंचलित यंत्रे प्रचारात आली.

धुलाईची क्रिया व पद्धती : कपड्यांची धुलाई तीन प्रकारे करण्यात येते : (१) परंपरागत पद्धतीने म्हणजे हातधुलाईने, (२) यांत्रिक पद्धतीने व (३) काही विशिष्ट प्रकारच्या कपड्यांसाठी वापरण्यात येणारी निर्जल धुलाई. या पद्धतींबरोबर पुढील दोन क्रियांचा उल्लेख धुलाईबरोबर करणे आवश्यक आहे : (१) डाग घालविणे, (२) रफू करणे व दुरुस्ती करणे इत्यादी.

परंपरागत धुलाई (हातधुलाई) : ही क्रिया कष्टदायक असून फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. या पद्धतीत प्रथम कपडा पाण्यात भिजवून तो एखाद्या खरबरीत दगडावर वा लाकडी फळीवर आपटतात किंवा चुबकतात. लाकडी दांडक्याने कपडे धोपटण्याचीही पद्धत प्रचलित आहे. यामुळे कपड्यावरील वरवरची घाण, मळ इ. कपड्यापासून अलग होतात व असा कपडा परत पाण्यात खळबळला म्हणजे मळ पाण्याबरोबर बाहेर पडतो, या सामान्य क्रियेला धुलाई असे म्हणता येईल. एवढे करूनही जी घाण, मळ निघत नाही त्यासाठी त्यावर साबण लावून ब्रशाने वा तत्सम वस्तूने घासतात, चुबकतात व पाण्यात खळबळतात. यामुळे साबणाबरोबर मळ पाण्यात निघून जातो. यानंतर असा कपडा आणखी दोन-तीन वेळा नुसत्या पाण्यात खळबळून राहिलेला मळ व साबण काढून टाकतात. कपडे पिळून ते उन्हात वाळवितात व आवश्यकतेनुसार त्यांच्या घड्या घालतात वा त्यांना इस्त्री करण्यात येते. अद्यापीही भारतात घरगुती स्वरूपात व लहान प्रमाणावरील व्यवसायात याच पद्धतीने कपडे धुतले जातात.

कपडे हातधुलाईने धुण्याची आणखी एक पद्धत आहे. ही पद्धत शुभ्र कपडे धुण्यासाठी जास्त सोईची आहे. रंगाच्या पक्केपणाची खात्री करून रंगीत कपडेही या पद्धतीने धुता येतात. या पद्धतीत धुवावयाचे कपडे प्रथम भिजवून चुबकून खळबळून घेतात. एका पातेल्यात अर्ध्यापर्यंत थंड पाणी घेऊन त्यात ८–१० कपड्यांसाठी सु. ६०–७० ग्रॅम. धुण्याचा सोडा विरघळवितात. नंतर त्यात सु. ६०–१०० ग्रॅ. साबणचुरा विरघळवितात. नंतर पातेल्यात एकेक कपडा बुडवून कपड्यावर पाणी राहील अशा तऱ्हेने त्यात पाणी घालतात व हे पातेले विस्तवावर किंवा गॅसवर उकळतात. कपडे शिजताना लाकडी काठीने ढवळतात. उकळ्यावर पाणी आटू न देता थोड्या वेळाने पातेले उतरून झाकतात व मग कपडे धुतात. पातेल्यात जर फेस तयार झाला नसेल, तर धुताना साबण लावावा लागतो. कपडे धुवून खळबळून, नीळ वा शुभ्रकारी पदार्थाच्या विद्रावात बुडवून, पिळून वाळवितात व इस्त्री करतात.

वर उल्लेख केलेल्या पद्धतींशिवाय परीट लोक पुढीलप्रमाणे कपडे धुतात. प्रथमतः शेगडीच्या पद्धतीचे चुलवण बांधतात. त्यात ज्याच्या कडा सु. ८ सेंमी. रुंद आहेत असे तांब्याचे विशिष्ट आकाराचे पातेले ठेवतात. याला सतेल असे म्हणतात. सतेलात निम्म्यापर्यंत पाणी भरतात. मात्र सोडा-साबण घालत नाहीत. शुभ्र कपडे प्रथम थोडे धुवून, पिळून घेऊन सोडा-साबणाच्या विद्रावातून बुडवून घेऊन पिळतात. सतेलावर ५-६ बांबू ठेवून त्यावर शुभ्र कपड्यांचे पिळे विशिष्ट पद्धतीने गोलाकार लावतात. सतेलामधील वाफ वरपर्यंत येऊन ती सर्व कपड्यांत शिरेल अशी पोकळी कपडे रचताना ठेवतात, याला ‘परीट नाळ’ असे म्हणतात. विशिष्ट वासावरून अशी भट्टी पूर्ण झाली असे समजतात. हे वाफेवर शिजलेले कपडे दुसऱ्या दिवशी धुतात. धुणे, खळबळणे, विरंजन करणे (रंगहीन करणे), नीळ घालणे इ. क्रिया करून वाळवितात व इस्त्री करतात. या पद्धतीत भट्टी उघडी असते. जर भट्टी ‘किर’ (बंद होणाऱ्या किटलीसारख्या) पात्रात केली, तर कमी खर्चात व वेळात कपडे चांगले शिजून निघतात. अशी पात्रे हवाबंद झाकणाची असल्याने कमी वाफेने थोड्या दाबाखाली कपडे चांगले उकडून निघून कपड्यांमधील मळ झटकन निघतो.

रेशमी, लोकरी व कृत्रिम तंतूंपासून तयार केलेले कपडे धुण्यासाठी फेनद (ज्यात साबणाचा फेस होतो असे) पाणी वापरतात. हे कपडे धुण्यासाठी गरम पाणी वापरणे चांगले. प्रक्षालके चूर्ण वा वडीच्या स्वरूपात वापरून कपडे हळूवारपणे चुबकून खळबळतात व झटकून पाणी काढून सावलीत वाळवितात. अशा कपड्यावर सुती पातळ कापड ठेऊन इस्त्री करतात. या प्रत्येक प्रकारच्या कापडाला इस्त्रीसाठी वेगवेगळे तापमान ठेवावे लागते.


यांत्रिक धुलाई :प्रगत देशांमध्ये परंपरागत पद्धतीतील कपडे धुण्याच्या क्रिया यंत्राच्या साहाय्याने करून कपडे धुतले जातात. यासाठी बरीच यंत्रे वापरली जातात. सर्वसाधारणतः कपड्यावर खुणा करावयाचे (मार्किंग) यंत्र, कपडे धुण्याचे यंत्र, कपड्यातील पाणी काढण्याचे यंत्र (हायड्रो-एक्स्ट्रॅक्टर), कपडे वाळविण्याचे यंत्र, कॅलेंडर यंत्रे, विविध प्रकारच्या इस्त्र्या, वाफक (बॉयलर), पाणी फेनद करणारे यंत्र इ. यंत्रांचा वापर यांत्रिक धुलाईसाठी करण्यात येतो. ही यंत्रे विविध क्षमतांची असतात. घरगुती कपडे धुण्याच्या यंत्राची क्षमता ३–७ किग्रॅँ. इतकी असून ती स्वयंचलित असतात. प्रगत देशांत ती मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. तसेच घरगुती धुलाई यंत्रे व इतर यंत्रे यांच्या साहाय्याने कपड्यांची धुलाई करणारी दुकानेही प्रगत देशांत आहेत. ही यंत्रे पैसे टाकून चालविता येतात किंवा स्वयंचलित असतात, यांना ‘लाँन्ड्रेटी’ असे म्हणतात. मोठ्या धुलाई केंद्रामध्ये (लाँन्ड्रींमध्ये) वर वर्णन केलेली यंत्रे असून धुलाई केंद्राच्या मालकीची दुकाने असतात किंवा त्याच्या आसपासच्या भागातील इतरांच्या दुकानांतील कपडे त्यामध्ये धुतले जातात. व्यावसायिक वा मोठ्या धुलाई केंद्रात वापरण्यात येणाऱ्या यंत्रांचे व क्रियांचे वर्णन खाली दिले आहे.

(अ) कपड्यावर खुणा करण्याचे यंत्र : धुण्यासाठी आलेल्या कपड्यांवर ओळखीकरिता खुणा वा नावे या यंत्राने घातली जातात. यासाठी विशिष्ट प्रकारची शाई वापरण्यात येते. काही वेळा अदृश्य शाईने वा रसायनांनी नावे घालण्यात येतात. ही नावे पुढील क्रियांमुळे स्पष्ट होतात वा विशिष्ट दिव्याच्या साहाय्याने वाचता येतात. याच वेळी कपड्यांचे तंतू प्रकारानुसार, रंगानुसार वर्गीकरण करण्यात येते व त्यानुसार पुढील क्रिया करण्यात येतात.

(आ) धुलाई यंत्र : बहुतेक धुलाई यंत्रे आडवी असून त्यांमध्ये एक कवच असून त्यात पाणी घालता येते. या कवचाच्या आत एक दंडगोलाकृती सच्छिद्र पात्र असून त्यात कपडे ठेवता येतात. कपडे आत टाकण्यासाठी कवचाला व सच्छिद्र पात्रालाही दारे असतात. ही यंत्रे अगंज (स्टेनलेस) पोलादाची व मोनेल धातूची तशीच जाळीदार लाकडी दंडगोल पात्र असलेली असतात. दंडगोलाचा व्यास सु. ६०–१५० सेंमी. व लांबी सु. ९०–३१५ सेंमी. असते. धुलाई यंत्रांची पुढीलप्रमाणे वर्गवारी करण्यात येते. (१) उभ्या कप्प्यांचे : हा सर्वसामान्य प्रकार होय. यातील उभ्या पडद्यांमुळे दंडगोलाचे उभे कप्पे होतात. दंडगोलाच्या आतल्या बाजूने आडव्या आधारपट्ट्या (रिब्ज) असतात. (२) फुलमन पद्धतीचे : यात उभ्या कप्प्यांखेरीज बरोबर मध्यभागी एक आडवा पडदा असल्याने पहिल्या प्रकारामध्ये असलेल्या कप्प्याच्या दुप्पट कप्पे यात होतात. (३) Y (वाय) आकाराचे कप्पे असलेले यंत्र  यात आडवे व अरीय असे तीन कप्पे असतात. (४) उघड्या दारांचे यंत्र : यात दंडगोलाला दार नसते. मात्र त्याचे एक टोक उघडे असते व त्याच्या विरुद्ध बाजूचे कवचाचे टोक उघडे असते. वरील सर्व प्रकारच्या यंत्रांमध्ये फिरण्याची दिशा बदलण्याची व्यवस्था असते व त्यामुळे कपडे खळबळले जातात. यंत्राचा फिरण्याचा सर्वसाधारण परिघीय वेग ६६–९९ मी. प्रती मिनिट असतो. हा वेग दंडगोलाला असणाऱ्या आधारपट्टीच्या उंचीवर अवलंबून असतो. आधारपट्टीची उंची जितकी जास्त तितका वेग कमी असतो. यामुळे तितक्याच आकारमानाच्या पहिल्या प्रकारच्या यंत्रापेक्षा दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारची यंत्रे जास्त वेगाने फिरू शकतात. काही यंत्रांतून दंडगोल कवचाबाहेर काढून घेऊन त्यातील कपडे पुढील प्रक्रियेसाठी नेले जातात. घरात वापरावयाच्या यंत्रामध्ये पाण्याच्या वापराचे प्रमाण कमी असते. बहुतेक सर्व धुलाई केंद्रातून साबण वाचविण्यासाठी आणि कपड्यांवर कॅल्शियम व मॅग्नेशियम साबणाचा थर बसू नये म्हणून स्वच्छ केलेले व फेनद केलेले पाणी वापरण्यात येते. वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे तापमान शुभ्र कपड्यासाठी सु. ३२°–८२° से. या दरम्यान असते,  रंगीत कपड्यांसाठी सु. ३२° से. इतके असते. यंत्रात कपडे भरताना ते एका वेळी एकाच प्रकारचे (रंगीत, शुभ्र इ.) भरण्यात येतात. विविध प्रकारच्या कपड्यासांठी विविध प्रकारच्या प्रक्रिया ठरविण्यात आलेल्या आहेत. प्रगत देशांत स्वयंचलित वा अर्धस्वयंचलित स्वरूपाची धुलाई यंत्रे वापरली जातात.

(इ) कपड्यातील पाणी काढून टाकणारे यंत्र : धुलाई यंत्राने धुतलेले कपडे हातांनी न पिळता त्यांतील जास्तीत जास्त पाणी काढून टाकण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. हे कमी गतीवर चालणारे केंद्रोत्सारी (प्ररिभ्रमी गतीमुळे निर्माण होणाऱ्या आणि केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या प्रेरणेचा उपयोग करणारे) यंत्र असून त्याचा व्यास १·२० – १·८० मी. आहे आणि त्यात घालता काढता येणारी धातूची करंडी असून सर्व यंत्र ७००–७५० फेरे / मि. या गतीने फिरते. काही यंत्रे १,५००–१,८०० फेरे / मि. या गतीची असतात. या यंत्रामुळे कपड्यांतील ७०% पाणी कमी होते.

(ई) कपडे वाळविण्याचे यंत्र : वरील यंत्रातून काढलेले कपडे पूर्णपणे वाळविण्यासाठी या यंत्राचा उपयोग करतात. हे यंत्र जवळ जवळ धुलाई यंत्रासारखेच असते पण कपडे वाळविण्यासाठी गरम हवेच्या झोताचा किंवा वाफेच्या नळ्यांचा उपयोग करण्यात येतो. साधारणपणे अर्ध्या तासात कपडे पूर्णपणे वाळून निघतात. याच वेळी त्यावरील सुरकुत्याही नाहीशा होतात. यंत्राच्या मागेपुढे होणाऱ्या हालचालींमुळे कपड्यांचे एकमेकांशी घर्षण होते. असे घर्षण काही प्रकारच्या कपड्यांच्या बाबतीत अनिष्ट ठरते. त्यांच्यासाठी अखंडीत शुष्क कोठीचा वापर करतात. कपडे अडकवलेली क्लिप या कोठीत एका बाजूने आत जाते व दुसऱ्या बाजूने कपडे वाळून बाहेर येतात. यातही गरम हवेच्या झोताने कपडे वाळविले जातात. मात्र या कोठीस जागा जास्त लागते.


(उ) इस्त्री : शर्ट, कोट, पँट इ. कपड्यांना इस्त्री करण्यासाठी दाबयंत्रे (प्रेस) वापरतात. काही दाबयंत्रे स्वयंचलित असून त्यांवर कपड्यांना इस्त्री होऊन आपोआप घड्या घातल्या जातात. विविध प्रकारच्या कपड्यांना इस्त्री करण्यासाठी वेगवेगळी दाबयंत्रे वापरली जातात. एका यंत्राने विशिष्ट भागाची इस्त्री होते. टेबलक्लॉथ, पलंगपोस, चादरी, साड्या, धोतरे, उशीचे अभ्रे, पायजमे इ. प्रकारच्या कपड्यांनां इस्त्री करण्यासाठी कॅलेंडर यंत्राचा वापर करण्यात येतो. या यंत्रावर शेवटी त्यांना घड्या घातल्या जाण्याचीही सोय असते.

(ऊ) इतर यंत्रे : वर वर्णन केलेल्या यंत्रांशिवाय पाणी फेनद करणारे यंत्र, वाफक इ. यंत्रांचा व साधनांचा वापर यांत्रिक धुलाई करताना करण्यात येतो.

निर्जल धुलाई : पाण्याशिवाय इतर द्रव पदार्थांच्या साहाय्याने कपडे धुण्याच्या वा स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला ‘निर्जल धुलाई’ असे म्हणतात. कपड्याच्या प्रकारानुसार वा कापडानुसार या पद्धतीत थोडाफार फरक आढळून येतो पण कार्बनी विद्रावक व प्रक्षालके यांच्या साहाय्याने कपडा त्यांमध्ये बुडवून व खळबळून कापडातून मळ काढून टाकणे व डाग काढणे ह्या प्रक्रिया निर्जल धुलाईच्या विविध पद्धतींत सारख्याच असतात. निर्जल धुलाईमुळे धुतलेला कपडा मुळच्यासारखा होतो. ही प्रक्रिया प्रथम जॉली बेलीन या फ्रेंच शिंप्यांनी १८४९ मध्ये शोधून काढली. प्रथम ही प्रक्रिया हातांनी करीत असत. पुढे त्यासाठी यंत्रे वापरण्यात येऊ लागली.

अगदी सुरुवातीच्या काळात निर्जल धुलाईसाठी गॅसोलीन, नॅप्थ्यासारखे ज्वालाग्राही विद्रावक वापरले जात होते. अशा विद्रावकांची किंमत जरी कमी असली, तरी त्यांच्या ज्वालाग्राही गुणधर्मामुळे इतर निर्जल धुलाई करणारे पदार्थ शोधण्याकडे लक्ष गेले. १९२५ मध्ये स्टोडार्ड विद्रावक हा खनिज तेलाच्या ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून घटक अलग करणाऱ्या क्रियेने) तयार केलेला गंधहीन व शुद्ध विद्रावक आणि उच्च उकळबिंदू व ज्वलनबिंदू असलेला ‘१४०° एफ.’ हा विद्रावक शोधून काढण्यात आला. याच सुमारास क्लोरिनीकृत (क्लोरिनाचा समावेश असलेल्या) हायड्रोकार्बन विद्रावकाचाही (उदा., कार्बन टेट्राक्लोराइड, ट्रायक्लोरोएथिलीन, परक्लोरोएथिलीन इ.) निर्जल धुलाईसाठी यशस्वीरीत्या वापर करण्यात आला. अमेरिकेत खनिज तेलापासून मिळणाऱ्या विद्रावकांचा, तर जगात इतरत्र ट्रायक्लोरोएथिलीनसारख्या कार्बनी विद्रावकाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कार्बन टेट्राक्लोराइडाच्या विषारीपणामुळे त्याचा निर्जल धुलाईसाठी आता उपयोग केला जात नाही. प्रगत देशांत निर्जल धुलाई स्वयंचलित यंत्रांनी व विद्रावक वापरून करण्यात येते.

सर्वसाधारणपणे निर्जल धुलाईच्या प्रक्रिया पुढीलप्रमाणे असतात. धुलाईसाठी आलेले कपडे प्रथम तपासतात व त्यावरील पट्टे, गुंड्या इ. वस्तू वेगळ्या करून कपड्यांवर ओळख खूण करतात. नंतर रंग, कपड्याचा प्रकार यांनुसार त्यांचे वर्गीकरण करून विशिष्ट सूचनांची यादी कपड्याला जोडतात. त्या यादीनुसार पुढील प्रक्रिया करण्यात येतात. मळकट कपडे यंत्रात विद्रावकात बुडवितात. त्यामुळे कपड्यातील तेल व तेलकट मळ बाहेर पडतात. कपडे विद्रावकात ढवळून इतर प्रकारची घाण बाहेर काढतात. ही सर्व घाण विद्रावकाच्या सतत सान्निध्यामुळे त्यात उतरते व बाहेर फेकली जाते. यानंतर केंद्रोत्सारण क्रियेने कपड्यातील विद्रावक बाहेर काढतात. यांतूनही उरलेला विद्रावक कपडे गरम भांड्यात ठेवून काढून टाकतात. नंतर इस्त्री करतात व पूर्वी काढण्यात आलेल्या गुंड्या, पट्टे इ. वस्तू परत जोडतात.

निर्जल धुलाईसाठी विशिष्ट प्रकारची यंत्रे व उपकरणे (उदा., पंप, खुणा करावयाची यंत्रे, विविध प्रकारच्या इस्त्र्या इ.) आणि उच्च दाबाची वाफ यांची गरज असते. यांशिवाय विविध विद्रावकांचीही आवश्यकता असते.

खळ देणे : यंत्राच्या साहाय्याने कपड्यांची धुलाई केल्यानंतर आवश्यकतेनुसार कपड्यांची दुरुस्ती (रफू इ.) करण्याचा वेगळा विभाग प्रगत देशांत असतो. त्याचप्रमाणे काही विशिष्ट प्रकारांच्या कपड्यांना खळ देण्यात येते.  तांदूळ, गहू, मका, साबुदाणा इत्यादींपासून तयार करण्यात आलेला स्टार्च यासाठी वापरला जातो.  प्रथम स्टार्च गार पाण्यात मिसळतात. नंतर त्यात आणखी पाणी घालून एकजीव व पातळ मिश्रण तयार करतात व शिजवितात. ही शिजविलेली खळ पातळ कापडातून गाळून घेतात. यापैकी  थोडी खळ बादलीत घेऊन त्यात पाणी मिसळतात व खळ द्यावयाचा कपडा त्यात बुडवितात, पिळतात व झटकून वाळवितात. कपडा वाळल्यावर त्यावर पाणी शिंपडून गुंडाळून ठेवतात आणि थोडा ओलसर असतानाच इस्त्री करतात. यामुळे कपड्यांना ताठपणा, गुळगुळीतपणा व चकाकीही येते. अशा कपड्यांना इस्त्रीही जास्त दिवस टिकते व ते लवकर मळत नाहीत.

कपड्यावरील डाग व ते काढण्याच्या पद्धती : वर उल्लेखिलेल्या धुलाईच्या क्रियेनंतरही काही डाग कपड्यावर राहतात. हे डाग घालविण्यासाठी डागाच्या प्रकारानुसार विशिष्ट रसायने वापरून काही क्रिया कराव्या लागतात. काही महत्त्वाच्या डागांसाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीचे वर्णन कोष्टकात दिलेले आहे.

कपड्यावर पडणारे काही महत्त्वाचे डाग व ते घालविण्याच्या पद्धती 

डागाचा पदार्थ 

घालविण्याची पद्धत 

कॉफी 

ग्लिसरीन, अमोनिया विद्राव व पाणी यांच्या मिश्रणात डागाचा कपडा रात्रभर बुडवून ठेवतात व सकाळी कोमट पाण्यान धुतात डाग थोडासा राहिल्यास व कपडा पांढरा व सुती असल्यास त्यावर अम्लयुक्त विरंजक विद्रावाचे थेंब टाकून अर्ध्या मिनिटाने पाण्याने धुतात रेशमी वा लोकरी असल्यास हायड्रोजन पेरॉक्साइड लावून उन्हात ठेवतात आणि धुतात. साबण लावण्यापूर्वी डाग काढणे उत्तम.

चहा 

ताजा डाग असल्यास टाकणखारयुक्त (बोरॅक्सयुक्त) कोमट पाण्याने धुतात. साबण तात्काळ लावीत नाहीत. कोमट ग्लिसरीन बोटाने डागावर चोळून थोड्या वेळाने धुतात कपडा सुती असल्यास व डाग अल्पसा असल्यास विरंजक विद्राव लावून उन्हात ठेवतात वा सोडियम हायड्रोसल्फाइट डागावर पसरून त्यावर गरम पाणी सोडतात व धुतात कपडा पाण्याने धुण्यासारखा नसल्यास निर्जल धुलाईचा साबण बोटाने चोळतात व कपडा गुंडाळतात. थोड्या वेळाने बोळ्याने पेट्रोल लावून स्वच्छ कापडाने चोळतात व टिपतात.

डांबर 

रॉकेलसारखा विद्रावक लावल्यास डाग कमी होतो, पण पसरतो. म्हणून डागाभोवती पाणी वा प्रक्षालक लावतात. डागावर ग्रीज वा ओलेइक अम्ल बोटाने चोळतात. ट्रिक्लोन (ट्रायक्लोरोएथिलिनाचे व्यापारी नाव) वा ट्रिक्लोन व ॲनिलीन यांचा बोळा लावून पुसतात. नंतर प्रक्षालक लावून धुतात. शेवटी अल्पसा पिवळा डाग राहतो तो अम्लविरंजक विद्रावाने वा हायड्रोजन पेरॉक्साइड लावून कपड्याच्या प्रकारानुसार धुतात.

ग्रीज 

रॉकेल वा टर्पेंटाइन लावल्यास बराच डाग जातो, डागाची बाजू खाली करून त्याखाली टिपकागद वा कापड ठेवून वरून गरम इस्त्री फिरवतात म्हणजे कागदात डाग शोषला जातो. सुती कपड्यासाठी डागावर ओलेइक अम्ल लावून १५–२० मिनिटांनी ट्रिक्लोन लावतात. ट्रिक्लोन उडून गेल्यावर अमोनियायुक्त गरम पाणी त्यावर सोडून चोळून धुतात व नंतर नेहमीप्रमाणे धुतात. 

तेल 

पेट्रोल वा ट्रिक्लोन लावल्यास हे डाग जातात. धुता येतील अशा कपड्यांना साबण वा प्रक्षालक लावून चोळून धुतात.

यंत्राचे तेल 

ट्रिक्लोन बोळ्याने लावून डाग पुसतात व टिपतात. खाली टिपकागद ठेवून वरून टर्पेंटाइन लावून कपड्याच्या घडीने टिपतात. साबण वा प्रक्षालक लावून चोळतात व धुतात. अल्प पिवळसर डाग राहिल्यास सोडियम हायड्रोसल्फाइट लावून त्यावर गरम पाणी सोडतात व धुतात.

मोटार तेल 

डागावर निलगिरी तेल लावतात, खाली टिपकागद ठेवून बोळ्याने टिपतात व पुसतात. शेवटी ट्रिक्लोन लावून बोळ्याने पुसतात व धुतात.

जवस तेल 

ईथर लावून बोळ्याने टिपून पुसतात.

शिजविलेल्या पदार्थातील तेल

रंगलेप (तैलरंग)

प्रथम ट्रिक्लोन लावून बोळ्याने पुसून तेलकटपणा घालवतात. पिवळट डाग राहिल्यास कोमट पाणी लावून क्रीम ऑफ टार्टार व सायट्रिक अम्ल समभाग घेऊन डागावर हळूवार चोळतात व धुतात. आवश्यकतेनुसार आणि कपड्याच्या प्रकारानुसार विरंजक विद्रावाने धुतात व नंतर पाण्याने धुतात.

डागावर स्पिरिट साबण लावून कपडा गुंडाळून ठेवतात. बऱ्याच वेळाने कपडा उलगडून डाग खरडतात. ट्रिक्लोन लावून पुसतात व धुतात मिथिलीन क्लोराइडामध्ये बराच वेळ बुडवून झाकून ठेवतात आणि मग खरडतात व धुतात.

नेलपेंट (नखाचा रंग) 

ॲसिटेटरेयॉन कापड सोडून इतरांवरील डागावर ॲसिटोन लावतात. अम्ल-विरंजक विद्राव लावून त्यावर गरम पाणी सोडतात व धुतात स्पिरिट साबण लावून चोळतात, धुतात व नंतर विरंजक विद्राव लावून धुतात.

लिपस्टिक 

ट्रिक्लोन लावतात, नंतर स्पिरिट साबण चोळून मुरवतात आणि बोळ्याने पुसतात, पुन्हा ट्रिक्लोन लावतात व धुतात.

व्हार्निश 

गरम मिथिलेटेड स्पिरिट लावतात सुती कपड्यातील जुना व भिनलेला डाग असल्यास १% दाहक सोड्याच्या विद्रावात उकळतात ट्रिक्लोन लावल्यास डाग जातो.

बूट पॉलीश 

ट्रिक्लोन किंवा क्लोरोफॉर्म लावतात किंवा डाग ओला करून त्यावर साबण वा प्रक्षालक लावतात, द्रव अमोनियाचे थेंब त्यावर टाकतात, ब्रशाने हळुवार घासतात व पाण्याने धुतात. अल्प डाग राहिल्यास सोडियम हायड्रोसल्फाइट पसरून गरम पाणी टाकतात व धुतात.

रक्त 

ताजा डाग असल्यास मीठ व द्रव अमोनिया यांच्या थंड पाण्यातील विद्रावात कपडा २-३ तास भिजत ठेवतात. नंतर साबण, प्रक्षालक वा विद्रावक साबण लावून धुतात. डाग जुना असल्यास डागाची जागा ओली करून त्यावर विरल हायड्रोफ्ल्युओरिक अम्लाचे थेंब टाकतात आणि लगेच तो भाग पाण्यात बुडवितात व साबणाने धुतात. सुती कपडा असल्यास विरंजक विद्रावात ॲसिटिक अम्ल घालून ते मिश्रण एकदोन वेळा डागावर टाकतात व धुतात. रेशमी वा लोकरी असल्यास पहिली वा दुसरी क्रिया झाल्यावर हायड्रोजन पेरॉक्साइड व द्रव अमोनिया यांचे कोमट मिश्रण डागावर सोडतात व धुतात. जुन्या डागावर मिथिलेटेड स्पिरिट लावतात, पण एकदम गरम पाणी व साबण वा पेट्रोल लावीत नाहीत.

लोखंडाचा गंज 

डाग ओला करून त्यावर विरल हायड्रोक्लोरिक अम्लाचे थेंब टाकतात. मिनिटभर थांबून पाण्याने धुतात. ही क्रिया २-३ वेळा करतात. डाग न गेल्यास विरल हायड्रोक्लोरिक अम्लाचे थेंब सोडून लगेच पाण्यात बुडवितात व धुतात. ही क्रिया २-३ वेळा करतात कपड्याचा रंग जात नसेल, तर डागावर ऑक्झॅलिक अम्लाचे चूर्ण पसरतात व त्यावर गरम पाणी सोडतात. आवश्यक असल्यास ही क्रिया परत करतात. ही क्रिया उन्हात केल्यास फारच चांगले. डाग निघाल्यावर कपडा चांगला धुतात. 

लाल शाई 

उकळत्या पाण्याची धार डागावर धरतात अगर सोडियम हायड्रोसल्फाइड डागावर पसरतात व मग गरम पाणी सोडतात किंवा गरम मिथिलेटेड स्पिरिटमध्ये बुडवितात. पांढऱ्याआणि सुती कपड्यावरील डाग अम्ल-विरंजक विद्रावाने जातात. कपड्याचा रंग आणि प्रकार यांनुसार वरीलपैकी एक उपाय करतात.

निळी शाई 

डागावर थोडे मीठ पसरून त्यावर लिंबू पिळतात आणि मीठ बोटाने चोळून मग धुतात, मिथिलेटेड स्पिरिटमध्येॲसिटिक अम्ल घालून त्यात डाग युक्त भाग बुडवितात व धुतात. ॲसिटिक अम्लात विरघळेल एवढे ऑक्झॅलिक आम्ल घालून होणारे मिश्रण डागावर लावतात. निळसरपणा राहिल्यास सोडियम हायड्रोसल्फाइट पसरून गरम पाणी सोडतात. रंगीत कपड्यांसाठी ही क्रिया वापरीत नाहीत.

निळी व लाल शाई 

डागावर ग्लिसरीन लावून चोळतात व पाण्याने धुतात. त्यावर ऑक्झॅलिक अम्ल पसरतात आणि गरम पाणी सोडतात. ही क्रिया उन्हात करणे चांगले. नंतर धुतात. फिकट डाग राहिल्यास सोडियम हायड्रोसल्फाइट पसरून गरम पाणी त्यावर टाकतात व धुतात.

बॉलपेन शाई 

डागावर मिथिलेटेड स्पिरिट आणि ट्रिक्लोन सोडल्यास डाग पसरतो म्हणून डागाभोवती मिथिलेटेड स्पिरिट किंवा ट्रिक्लोन वा प्रक्षालक लावतात. नंतर स्पिरिट वा ट्रिक्लोन लावतात. डागाखाली पातळ कापडाची घडी घालून डागावर बोळ्याने ट्रिक्लोन लावतात व पुसतात. त्यामुळे खालील कापडात व बोळ्यात शाई शोषली जाते. थोडा रंग राहील्यास अम्ल-विरंजक विद्रावाने धुतात. रेशमी वा लोकरी कपडा असल्यास हायड्रोजन पेरॉक्साइड लावून थोडा वेळ उन्हात धरतात व धुतात. साबण लावून धुण्यापूर्वी डाग काढणे चांगले.


धुलाईसाठी लागणारे साहित्य : धुलाईसाठी अत्यावश्यक असे साहित्य म्हणजे पाणी. पाणी फेनद असल्यास साबण, प्रक्षालके इ. पदार्थ कमी लागतात. धुण्याचा सोडा अत्यावश्यक आहे. विविध प्रकारचे कपडे धुण्याचे ब्रश, विरंजक चूर्ण, नीळ, शुभ्रकारी पदार्थ (टिनोपॉल इ.) इ. पदार्थ सुती व शुभ्र कपड्यांसाठी वापरावे लागतात. रेशमी, लोकरी व कृत्रिम तंतूंपासून बनविलेल्या कापडांसाठी विविध कार्बनी विद्रावकांचा (उदा., ट्रायक्लोरोएथिलिन इ.) उपयोग करण्यात येतो. कपड्यांवरील विविध प्रकारचे डाग घालविण्यासाठी विविध रसायने लागतात. निरनिराळ्या प्रकारच्या कपड्यांना इस्त्री करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इस्त्र्या लागतात. या इस्त्र्या पूर्वी कोळशावर चालत, आता त्यासाठी विजेचा वापर करतात. यांत्रिक पद्धतीने धुलाई करण्यासाठी वाफक, कपडे धुण्याचे व वाळविण्याचे यंत्र, सुरकुत्या काढून टाकणारे (कॅलेंडरिंग) यंत्र, मार्किंग यंत्र इ. विविध प्रकारची यंत्रे लागतात.

संशोधन व शिक्षण : प्रगत देशांमध्ये धुलाईचे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या तसेच त्याविषयी संशोधन करणाऱ्या संस्था आहेत. या देशांमध्ये धुलाईचे ३-४ वर्षांचे शिक्षणक्रम आहेत. तसेच खाजगी स्वरूपाच्या संशोधन संस्थाही आहेत. ब्रिटन अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इझ्रायल, ईजिप्त इ. देशांत संशोधन संस्था असून त्यांमधून धुलाईचे तांत्रिक शिक्षणही देण्यात येते. या संस्थांमार्फत धुलाईसंबंधीची नियमकालिकेही प्रसिद्ध होतात. भारतात अशा संस्था नाहीत.

भारतीय उद्योग : हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्याप्रमाणे ‘कपडे धुणाऱ्या व्यक्तीला’ परीट असे म्हणतात. तसेच अशा प्रकारचे काम करणाऱ्या जातीलाही परीट असे म्हटले जाते. धोबी, वरठी, बरेठा, चकला, रजक, धोबा इ. नावांनीही परीट ओळखले जातात. तैत्तिरीय ब्राह्मण (३, ४, ७), रामायण इ. प्राचीन ग्रंथांतून त्या काळी हे लोक कपडे धुण्याचा धंदा करीत होते, असे उल्लेख आढळून येतात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतात केवळ या परंपरागत पद्धतीने हा धंदा करण्यात येत होता. १९२० च्या सुमारास भारतात यंत्राने धुलाई करण्याच्या व्यवसायास सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात यासाठी लागणाऱ्या यंत्रांची आयात करण्यात येई. सध्या आयातबंदीमुळे व यंत्रांच्या वाढत्या मागणीमुळे दिल्ली, अहमदाबाद, मद्रास, मुंबई, पुणे, सांगली, कऱ्हाड इ. ठिकाणी धुलाई यंत्रांचे उत्पादन होत आहे. धुलाई व्यवसायाच्या अडचणींविषयीची एकत्रित चर्चा करण्यासाठी  विविध राज्यांत राज्यपातळीवर संस्था आहेत पण तांत्रिक व संशोधनात्मक संस्था तसेच धुलाई धंद्यासाठी लागणारे तंत्रज्ञ निर्माण करणाऱ्या शिक्षण संस्था भारतात नाहीत.

पहा : पृष्ठक्रियाकारके प्रक्षालके साबण.

संदर्भ : 1. Baker, F. R. Anderson, A. P. The Dry-Cleaner’s Handbook, London, 1935.

            2. Harvey, A. Laundry Chemisitry, London, 1935.

            3. Holden, J. T. Vowler, J. N. The Technology of Washing, Hendon, 1942.

           4. Jackman, A. Rogers, B. The Principles of Domestic and Institutional Laundry Work, London.

           5. Morsop, J. M. A General Laundry Work Book, London.

           6. Strauss, M. Home Dry-Cleaning and Laundry Work, London, 1933.

शाळिग्राम, द. म.

नदीकाठावरील घरगुती धुलाईकपड्याच्या भट्टीचे चुलाणकपडे टांगून वाळविण्याची पद्धतपरटांसाठी बांधलेले धोबी घाटलोकरी कपडे धुण्याचे विद्युत् यंत्रघरगुती विद्युत् धुलाई यंत्रधुलाई यंत्रात कपडे भरण्याची क्रियाधुतलेल्या कपड्यातील पाणी काढून टाकणारे यंत्र.धुलाई यंत्रात कपडे धुण्याची क्रिया चालू असतानातलम साड्यांना कांजी देण्याची क्रिया