बांगडी : अती प्राचीन काळापासून वापरात असलेला आणि विशेषतः भारतीय स्त्रियांचा एक अलंकार. हा मनगटावर धारण करावयाचा अलंकार असून जुन्या संस्कृत ग्रंथात वलय, कंकण, चुडा, कटक, आवापक, परिहार्य अशी नावे त्याला दिलेली आढळतात. (प्रस्तुत नोंदीत बांगडी हा शब्द ‘ब्रेसलीट’ या इंग्रजी शब्दाच्या समानार्थी म्हणूनही वापरला आहे). बांगड्यांना ‘चुडे’ असे सौभाग्यार्थी म्हणतात. लग्नाच्या आधी वधूला ज्या बांगड्या भरतात त्याला महाराष्ट्रात लग्नचुडा असे म्हणतात. भारताच्या प्रत्येक प्रांताच्या लोकगीतांतून स्त्रियांनी चुड्याविषयीची आसक्ती दिसून येते. स्त्रिया आपले सौभाग्य अभंग रहावे म्हणून व्रत करतात. तसेच चुडेदान (म्हणजे सौभाग्य राखणे) करण्याची प्रथा आहे. सामान्यतः कुमारी व सुवासिनी स्त्रियांच बांगड्या वापरतात. विधवा स्त्रिया सहसा बांगड्या वापरीत नाहीत. सर्व वयाच्या स्त्रिया सर्व प्रसंगी बांगड्या वापरतात. लहान मुलांच्या हातात घालण्यात येणारी ‘मनगटी’ ही बांगडी सदृश असून ती मण्यांची करण्यात येते. भारतातील कित्येक आदिवासी स्त्रिया कोपरापर्यंत बांगड्या घालतात. बंगालमध्ये शंखाच्या बांगड्या सौभाग्यालंकार मानल्या जातात, तर पंजाबमध्ये मंगल प्रसंगी हस्तिदंती बांगड्या वापरण्याची प्रथा आहे. पुरुषांच्या नामर्दपणाचा सूचक वाकप्रचार ‘बांगड्या भर’ असा आहे. काशाची बांगडी करणाऱ्याला, तसेच बांगड्या विकण्याचा व्यवसाय करणाऱ्याला ‘कासार’ असे म्हणतात. कंगण, काकण, कंकण, चुडा, पाटली, हातातील बिलवर, धातूचे कडे, गोट इ. नावेही बांगडीच्या विविध प्रकारांना आहेत. हल्ली पाश्चात्त्य देशांतही काही स्त्रिया हातांमध्ये कंकणाकार अलंकार घालतात.

बांगड्या बहुधा वर्तुळाकार. निरनिराळ्या गाळ्याच्या (व्यासाच्या) व कमी रुंदीच्या असतात. क्वचित त्या दोरखंडाइतक्या रुंदही असतात. बांगडीचे अंतरपृष्ठ गुळगुळीत असते, तर बाह्य पृष्ठावर नक्षीकाम केलेले असते. बांगडी सामान्यतः काचेची करतात. तथापि प्लॅस्टिक, विविध धातु-मिक्षधातू (सोने, चांदी, अंगज पोलाद, तांबे, पितळ इ.), शंख, हस्तिदंत कण्यासाठी लाख, कृत्रिम व खरे हिरे-मोती-रत्‍ने इत्यादींचा उपयोग करतात.

इतिहास : अती प्राचीन काळापासून ईजिप्त, इराण, मीड (मीडिया) या देशांतील स्त्रिया बांगड्या वापरीत असत, असे आढळून आले आहे. यहुदी लोकांमध्ये पुरुष व स्त्रिया दोघेही बांगड्या वापरीत असत. ग्रीक लोकांत फक्त स्त्रियाच बांगड्या वापरीत. ह्या बांगड्या सर्पाकृती असून त्यांचे हातावर एकदोन वळसे असत. रोमन लोकांत युद्धात शौर्य दाखविणाऱ्या वीरास कडी बहाल करण्याचा प्रघात होता. रोमन उच्च घराण्यातील स्त्रिया मनगटावर बांगड्या वापरीत. जर्मन लोकांतही पूर्वी बांगड्या हेच भूषण मानत असत. या सर्व बांगड्या धातूंच्या असत. क्वचित त्या मृत्तिकेच्या वा काचेच्या असत.

इ. स. पू. ३१०० पासून ईजिप्तमध्ये कंकणे वापरात होती. जेर नावाच्या राजांच्या थडग्यात त्या वेळची सोन्याच्या तारेत मणी गुंफून केलेली बांगडी सापडली आहे. तसेच इ.स.पू. २६२२ मधील सेखेम्खेत यांच्या थडग्यात सोने ठोकून तयार केलेली बांगडी आढळली आहे. मध्य साम्राज्य काळातील (इ.स.पू.सु. २०८० ते १६४०) कंकणे मण्यांची बनविलेली होती. त्यांच्या दोन माळा सिंहाच्या आकाराच्या सोन्याच्या दोन मण्यांच्या मधून गुंफलेली वा मण्यांच्या अनेक रांगा गुंफून रुंद व सुशोभित फासा असलेली कंकणे बनवीत. अशी कंकणे एल-लाहेन खजिन्यात सापडली आहेत. नवसाम्राज्य काळातील (इ.स.पू.सु. १५७० ते १०७५) कंकणे ही दोन भरीव व अर्धवर्तुळाकार सोन्याचे तुकडे बिजागरीसारखे जोडून व त्यावर काचेचे मीनाकाम केलेली व मौल्यवान खडे बसविलेली अशी असून ती तूतांखामेन आदींच्या थडग्यांत सापडली आहेत.

दक्षिण इराकमधील अर येथील थडग्यांत इ. स. पू. ३००० च्या सुमाराची सुमेरियन काळातील कंकणे सापडली आहेत. अशीच कंकणे क्रीट येथेही सापडली आहेत. इ.स.पू. आठव्या-सातव्या शतकातील एक सुंदर सोन्याचे कंकण प. इराणमधील झीवी येथे मिळाले आहे. ॲकिमेनिळ काळातील (इ.स.पू. ५४६–३३०) कंकणेही उत्खननात सापडली आहेत. इ.स.पू. पहिल्या शतकातील काशाची कंकणे प. इराणमधील लुरिस्तान भागात सापडली आहेत.

ईजिप्त, इराक, इराण इ. देशांतून क्रीटमध्ये धातूंची कंकणे (विशेषतः सोन्याची) वापरात आली. त्यांवर प्राण्यांची चित्रे असत. तेथून पुढे त्यांचा प्रसार यूरोपमध्ये झाला. बाराव्या शतकात ग्रीकांनी कंकणावर भौमितिक आकृत्या वापरल्या. अशा कंकणावर मोती, रत्‍ने इत्यादींचे जडावकामही केलेले असे.

चीनमध्ये धातूंची कंकणे क्वचित वापरीत असत. यूरोपातील बहुतेक देशांत जी कंकणे वापरात होती, त्यांवरील नक्षीकाम ग्रीक व रोमन पद्धतीने असे. पुढे जडजवाहिरांच्या निर्मितीत जसजसे बदल होत गेले तसतसे कंकणातील नक्षीत व जडावाच्या कामात बदल होत गेले. विसाव्या शतकातील दोन महायुद्धांच्या काळात तर हिऱ्‍याची कंकणे वापरात आली.


उत्तर अमेरिकेन सोने, चांदी, तांबे व त्यांच्या मिश्रधातू कंकणांसाठी वापरीत. सध्या त्याऐवजी विशेषतः खडे, रत्‍ने वगैरे बसविण्यासाठी प्लॅटिनम व पॅलॅडियम यांचा वापर करतात. त्याचप्रमाणे कृत्रिम रत्‍ने व खडे जडावांसाठी वापरतात. दक्षिण अमेरिकेत सोने व प्लॅटिनम यांची कंकणे, तसेच पट्टे वापरीत. दुसऱ्या महायुद्धानंतर साखळीचे पट्टे प्रचारात आले.

भारतात फार पूर्वीपासून बांगडी वापरात आहे. मोहें-जो-दडो येथील उत्खननात मिळालेल्या एका स्त्रीमूर्तीच्या हातभर बांगड्या घातलेल्या आढळून आल्या आहेत. तसेच मातीच्या रंगीत बांगड्याही उत्खननात सापडल्या आहेत. ताम्र-पाषाण कालीन (इ.स.पू. २८००–१०००) लोक काचेच्या बांगड्या वापरीत होते, असे बलुचिस्तानमधील तुर्वात, शाही थुप, पेरिआनो धुंडाई, डाबरकोट येथील त्या काळातील प्रेते पुरण्याच्या ठिकाणी मिळालेल्या काचेच्या बांगड्यांवरून दिसून येते. अलमगीरपूर, रूपार, श्रावस्ती येथे इ. स. पू. १०००–४०० या काळातील काचेच्या बांगड्या मिळाल्या आहेत. तक्षशिला येथील मीर टेकडीच्या उत्खननात इ.स.पू. ७००–५०० या काळातील विविध रंगांच्या काचेच्या बांगड्या सापडल्या आहेत. पैठण, तेर, नेवासे, कौडिंण्यपूर, कोल्हापूर, कृष्णा-गोदावरी भाग, तसेच मस्की, अरिकामेडु, चांद्रवल्ली, शिशुपालगड (ओरिसा) इ. ठिकाणच्या उत्खननांत इ.स.पू. २०० ते इ.स. ३०० या काळातील बांगड्या इतर काचवस्तूंबरोबर सापडल्या आहेत. काही विद्वानांच्या मते काचेच्या बांगड्या करण्याची कला हूण लोकांकडून इ. स. ८००–९०० च्या सुमारास भारतात आणली गेली परंतु या आधीच्या काळात भारतात बांगड्या तयार होत होत्या असे दिसते. निरनिराळे रंग असलेल्या काचा चिकटवून तयार केलेली बांगडी शिरपूर (जि.धुळे) येथे मिळालेली आहे ही बांगडी इ. स. ११००–१४०० च्या सुमाराची असावी. कोल्हापूर येथे चौदाव्या शतकातील सापडलेली काचेची पंचरंगी बांगडी ही काचनिर्मितीचा एक उत्कृष्ट नमुना मानण्यात येते. इ. स. ११००–१४०० या काळातील निळ्या-पिवळ्या रंगाच्या बांगडीचा तुकडा दक्षिण भारतातील मस्की येथे सापडला आहे.

भारतात सिंधू संस्कृतीतील (इ.स.पू. २५००–१५००) सोने, चांदी व काशाच्या पोकळ बांगड्या सापडल्या आहेत. आर्य काळात (इ.स.पू. १५०० नंतर) सोन्याच्या बांगड्या वापरात होत्या. यजुर्वेदात सोन्याच्या बांगड्या व दागिने विवाह प्रसंगी वापरावेत असे नमूद केलेले आहे. इ.स.पू. १००–इ.स. १०० या काळातील बांगड्या सोन्याच्या असून त्या पोकळ असत. त्या इंडोग्रीक पद्धतीच्या होत्या व त्यांच्या टोकांजवळ उठावाचे नक्षीकाम केलेले असे, तर काहींवर कोरीवकाम केलेले असे. कुशाण काळात सोने काशाच्या बांगड्या वापरात होत्या. गुप्त काळात हलक्या पण धातूच्या बांगड्या वापरीत. मध्य युगात सोन्याचांदीच्या सुशोभित बांगड्या वापरीत असत.

इ.स. १२०० च्या नंतर मुस्लिम काळातील स्त्रियांच्या बांगड्यांच्या टोकांवर मगर व हत्ती यांची तोंडे असत. मुस्लिम काळाच्या अखेरीस सर्व धर्माच्या स्त्रिया बांगड्या वापरीत होत्या. यूरोपियन लोकांशी संबंध आल्यावर भारतातील बांगड्यांवरील नक्षी पाश्चात्त्य पद्धतीची होऊ लागली. तसेच साध्या व हलक्या बांगड्या वापरात आल्या.

प्रकार : बांगड्या विविध पदार्थापासून विविध आकारांत व प्रकारांत तयार करण्यात येतात. कडे, पाटली व बांगडी हे आकारानुसार स्थूल प्रकार आहेत. कधीकधी बांगडीची रुंदी ही पाटलीएवढी वा तिच्यापेक्षाही जास्त असते.

कडे सामान्यतः धातूचे, अखंड वा तुटलेले असते. अखंड कडे घालण्या-काढण्यास, त्रासाचे, तर तुटलेले कडे सोयीचे व सोपे असते. तुटलेल्या ठिकाणाच्या टोकांवर मासा, हत्ती, कासव, पोपट इ. आकारांचे आकर्षक नक्षीकाम केलेले असते. टोके एकमेकांवर अशा प्रकारे येतील अशी केलेली असतात की, त्यामुळे त्यांची जाडी कमी होत नाही. तसेच टोके एकमेकांसमोर येतील अशीही असतात. ही टोके फासटून कडी घालता-काढता येतात. कडी मनगटावर घट्ट बसतात व ती गोलसर पण बांगडीपेक्षा जाड असतात. ती सामान्यतः सोने, चांदी, तांबे, पितळ इत्यादींपासून तयार करतात.

पाटली ही बांगडीपेक्षा जाड, रुंद व चपटी अशी असते. ती अखंड तसेच तुटलेली असते. हिची तुटलेली टोके एकमेकांसमोर वा एकावर एक येतील अशी असतात. टोकांवर नक्षीकाम नसते. पाटलीच्या वरच्या पृष्ठावर नक्षीकाम असते. कड्याप्रमाणे ती घालता-काढता येते. ती प्लॅस्टिक, काच, लाख, सोने, चांदी, हस्तिदंत इत्यादींपासून बनवितात. सोन्याची पाटली वापरणे वैभवाचे मानले जाते. पाटलीच्या पुढे सोन्याच्या तारेचे वेष्टन असलेली फुगीर बांगडी वापरल्यास पाटली अधिक खुलून दिसते. सामान्यतः ही काही विशेष समारंभप्रसंगी वापरली जाते.

बांगड्या ज्या पदार्थापासून बनविल्या जातात, त्यानुसार बांगड्यांचे वर्गीकरण करण्यात येते. उदा., लाखेच्या, हस्तिदंताच्या, शंखाच्या, धातूच्या, काचेच्या इत्यादी.


शंखाच्या : शंखाच्या बांगड्या बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येतात व वापरल्या जातात. शंखाचे टोक व खालचा तोंडाचा भाग हातोडीने फोडून काढतात व आतील कंगोरे हातोडी-छिन्नीच्या साहाय्याने तासतात व शंख आतून साफ करतात. नंतर करवतीने शंख कापून गोलाकार तुकडे करतात. हळूहळू या सर्व क्रिया आता यंत्राने करण्यात येऊ लागल्या आहेत. शंखाला असलेली छिद्रे मेणाने भरतात व जेथे जोड येतो तेथे पंचरंगी रंगकाम करतात. यानंतर बांगड्यांचे नायट्रिक अम्लाने विरंजन (रंग काढून टाकण्याची क्रिया) करतात आणि कोरड्या कापडाने त्यांना चकाकी आणतात. शंखाचे मोडके तुकडे जोडूनही रंगीत बांगड्या तयार करतात. अशा बांगड्यांचे जोड लाख, लाखेपासून मिळणारा गोंद, रेझीन व शिंपल्यांची पूड यांच्या साहाय्याने जोडण्यात येतात. तसेच अत्यंत पातळ कथिलाच्या तारेने तुकडे एकमेकांना बांधले जातात आणि रंगविण्यात येतात. कुशल कलाकार असे जोड दिसणार नाहीत इतके उत्तम काम करतो.

पांढऱ्या व सपाट बांगड्या जास्त करून तयार करण्यात येतात. रंगीत बांगड्या स्त्रिया बनवितात. स्त्रियांकडून बनविण्यात येणाऱ्या बांगड्यांचे तीन प्रमुख प्रकार आहेत : (१) सोनामुखी, (२) माया व (३) लहान मुलींच्या गिनी बाला. सोनामुखी बांगडीचा पृष्ठभाग सोनेरी असून ती पिवळ्या, हिरव्या व लाल रंगाने रंगवितात. पांढऱ्या बांगडीप्रमाणे परिधीवर (तोंडावर) पाच लाल ठिपके देतात. माया प्रकारात बांगडीचा सपाट पृष्ठभागावर जलतरंग, मटारदाणा, मोतीदाणा, भाटिया, माने ना माने इ. विविध प्रकारची नक्षी बांबूच्या लेखणीने काढण्यात येते.

‘कैकाटा’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या बांगडीत बारीक सुवर्ण फुलांमध्ये एकाआड एक प्रवाळाचे छोटे तुकडे गुंफतात.

हस्तिदंती : या बांगड्या विशेष प्रसिद्ध आहेत. आदिवासी स्त्रिया, तसेच भटक्या जमातीतील स्त्रिया ह्या बांगड्या जास्तकरून वापरतात. बांगड्या करण्यासाठी लागणारे हस्तिदंत बहुशः आफ्रिकेतून भारतात आणण्यात येते. घन स्वरूपातील हस्तिदंत ‘गुल्ला’ व ‘गबला’ या नावांची ओळखले जाते. हाडात असलेला हस्तिदंताचा भाग पोकळ असतो.

हस्तिदंतापासून बांगडी बनविणे तसे सोपे आहे. ज्या भागापासून बांगडी तयार करतात तो हस्तिदंताचा भाग सोलून स्वच्छ करतात. बांगड्या लाकडी चौकटीच्या अथवा लेथच्या साहाय्याने बनविल्या जातात. प्रथम हस्तिदंताला योग्य तो गोलाकार दिला जातो व त्याचे तुकडे पाडले जातात. तुकडा लेथला वा चौकटीला घट्ट बसविला जातो व कर्तन हत्यार तुकड्याच्या सपाट भागाकडून लावले जाते व योग्य जाडीचे तुकडे कापून काढतात. कारण हस्तिदंताचे बाह्यकवच कठीण असते व त्याच्याच बांगड्या करतात आणि आतील भाग कोरीवकामासाठी वापरतात. या पद्धतीने एकाच हस्तिदंतापासून विविध गाळ्याच्या बांगड्या तयार केल्या जातात. बांगडी करण्यासाठी हातलेथ, धनुकली, चिरणे, शिंगण, धुतली इ. हत्यारे वापरली जातात. तयार बांगड्यांवर सामान्यतः अंतिम संस्करण करावे लागत नाही. बांगडीवर चित्रे काढणे व लाखकाम करणे वा बाह्यपृष्ठावर कोरीवकाम करणे या क्रिया बांगडी कापण्याआधीच करण्यात येतात. रंगीत बांगडी पाहिजे असल्यास ती रंगाच्या विद्रावात बुडवून तो विद्राव उकळतात. बांगडीवर रंजनक्रिया होण्यास उकळण्याची क्रिया आठ-दहा दिवस करावी लागते.

भारतात अमृतसर, पतियाळा, लुधियाना, होशियारपूर (पंजाब) बेहरामपूर (प. बंगाल) जयपूर, पाली, बारमेर, मेरट (राजस्थान) कटक, पुरी (ओरिसा) लखनौ, आग्रा, वाराणशी (उत्तर प्रदेश) विशाखापट्टनम, सिकंदराबाद (आंध्र प्रदेश) अहमदाबाद, पाटण, सुरत (गुजरात) इ. ठिकाणी तसेच केरळ, कर्नाटक ह्या राज्यांत हस्तिदंती बांगड्या तयार करण्यात येतात.[⟶ हस्तिदंत].

लाखेच्या : लाखेच्या निरुपयोगी भागापासून बनविण्यात येणाऱ्या बांगडीस ‘रुली’ म्हणतात. ही बांगडी सपाट माथ्याची असून जास्त प्रमाणात वापरण्यात येते. या बांगडीला धार्मिक महत्त्व असून ती विवाहदर्शक चिन्ह म्हणून वापरली जाते. बांगडीवरील नक्षीकामानुसार तिचे मंचकाटा, धेनू, कुआजाल, थापा दे ओआ, जालबंध, सिक्रीजाल, मयूरपंख इ. प्रकार असून त्या बहुधा रंगीत असतात. इतर वस्तू तयार करताना वाया जाणाऱ्या लाखेपासून बनविण्यात येणारी ‘बाला’ ही गोलसर बाह्यपृष्ठांची बांगडी शोभेसाठीच वापरण्यात येते.

प. बंगालमध्ये बरद्वान, छोटा नागपूर, मानभूम इ. भागांत लाखेच्या बांगड्या तयार करण्यात येतात. राजस्थानात जयपूर येथे लाखेच्या बांगड्या तयार करण्यात येतात. सर्व समारंभांत त्या शुभचिन्ह म्हणून वापरतात. तेथे वापरण्यात येणाऱ्या काही बांगड्या सपाट बाह्यपृष्ठाच्या, तर काहींवर काचेचे तुकडे, चमकदार खडे, मणी इ. बसविलेले असतात. साध्या बांगड्यांवर नागमोडी नक्षी असते, तर शोभादायक बांगड्यांवर फुलांची, पाटला इ. प्रकारची नक्षी असते. एके काळी अशा बांगड्यांवर मौल्यवान रत्‍ने बसविण्यात येत असत. आसाममध्ये चिनी माती व लॅकर यांच्यापासून बांगडीचा सांगाडा तयार करतात आणि त्यावर शुद्ध लाखेची नक्षी काढतात व विविध रंगांनी रंगवितात. दिल्ली येथे चांदी, कथिल यांच्या चूर्णाचे लेपन देऊन लाखेच्या बांगड्या तयार करतात. या बांगड्यांवर क्वचित काचेचे खडे बसविले जातात. गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात देहाड येथे लाखेच्या बांगड्या मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येतात. बांगडीनिर्मितीची तेथील प्रक्रिया मोठी आकर्षक व बघण्यासारखी असते. प्रथम लाखेच्या सुटया बांगड्या तयार करतात व मुसळावर त्या चढवून व तापवून एक मोठी बांगडी तयार करतात. नंतर त्या बांगडीला विटकरीच्या पुडीने चोळतात व नंतर रंगीत व्हार्निशने चकाकी आणतात. त्यानंतर तीवर नक्षी काढतात. नक्षी काढण्यासाठी बांगडीवर बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतात.


हैदराबाद येथे काचेच्या (अगर धातूच्या) बांगडीवर लाखेचे लेपन करून त्यावर काचेचे खडे बसवून विविध रंगाच्या व नक्षीच्या जडावाऱ्या बांगड्या तयार करतात. विशेष प्रकारच्या लाकडी चौकटीवर साध्या काचेची बांगडी बसवून ती विस्तवावर धरतात व तिच्यावर लाखेचा थर देतात. काचेचे खडे तयार करण्यासाठी वितळलेली काच कथिलाच्या छोटया पात्रात ओतून गरम ठेवली जाते. गवताच्या ओलसर काडीने खडे उचलून ते बांगडीवरील लाखेत जडवितात. या प्रकारच्या बांगड्यांना विविध रंग व आकृतिबंध यांनुसार सात्रास, सातपुती (अगर कबूतर आँख), कांजार, कुलास्थपली, सिमिती सडक इ. विशेष नावे पडली आहेत. काचेचे खडे प्रचारात येण्यापूर्वी फक्त मसाला (ॲल्युमिनियम वर्ख, जर, काचेचे तुकडे इ.) सुशोभनासाठी वापरीत असत. या प्रकारच्याही बांगड्या अद्याप प्रचारात असून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंधासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्या पन्नास, झल्म-ई-चानकी, झुल्प-झाम-झारी इ. नावांनी ओळखण्यात येतात.

धातूंच्या : सर्वसामान्यतः धातूंच्या बांगड्या ह्या सोने, चांदी, तांबे, पोलाद, प्लॅटिनम, पितळ, कासे इ. धातू व मिश्रधातू यांपासून तयार करतात. सोन्याच्या विशिष्ट जाडीच्या तारेपासून साच्याच्या साहाय्याने बांगडी बनविली जाते. अशा बांगड्यांवर क्वचित मौल्यवान खडे, मोती, हिरे इ. बसविण्यात येतात. सोन्याच्या बांगडीस सामान्यतः ‘बिलवर’ असे म्हटले जाते. रुंद अशा बांगडीस ‘पाटली’ म्हणतात. चांदीपासून बांगड्या बनविताना त्यात तांबे वा शिसे वा दोन्ही मिसळतात. तांबे वा शिशाचे प्रमाण ४–१०% पर्यंत असते. तांबे, जस्त व त्यांच्या कासे, पितळ इ. मिश्रधातू यांच्यापासूनही बांगड्या बनवितात. अमेरिकेत प्लॅटिनम व पॅसॅडियम यांचा कंकणासाठी वापर करतात.

भारतात सोन्याच्या बांगड्या व सोन्यावर हिरे, मोती, मौल्यवान खडे जडविलेल्या बांगड्या श्रीमंत लोक वापरतात तर सामान्य लोक चांदी, पितळ, तांबे इत्यादींच्या बांगड्या वापरतात. सोन्याचांदीच्या बांगड्या करण्याचे काम कुटिरोद्योगाच्या स्वरूपाचे आहे व भारतात ते सर्वत्र करण्यात येते. पितळेच्या बांगड्या ‘इमिटेशन’ (नकली) बांगड्या म्हणून ओळखल्या जातात. त्या बांगडी, पाटली इ. प्रकारांत बनविल्या जातात. त्या साध्या तसेच सुशोभितही करण्यात येतात. सुशोभनासाठी कृत्रिम खडे, प्लॅस्टिकचे खडे, मणी इ. वापरतात. अशा बांगड्या हैदराबाद इ. ठिकाणी बनविण्यात येतात.

शीख धर्मात पुरुषाने कडे(धातूचे) घालणे आवश्यक समजले जाते.

काचेच्या : बांगड्यांच्या विश्वात काचेचे स्थान उच्चतम आहे. उत्तर प्रदेशातील फिरोझाबाद हे काचेच्या बांगड्यांचे सर्वात महत्त्वाचे व मोठे केंद्र आहे. तेथे कुटिरोद्योग व कारखानदारी अशा दोन्ही स्वरूपांत हा व्यवसाय चालतो. कुटिरोद्योगात पारंपारिक पद्धतीच अद्याप वापरल्या जातात. काचेचे ठोकळे तयार करणाऱ्या कारखान्यांतून काच खरेदी केली जाते. छोट्या भांड्यात ती वितळवितात व पोलादी दांड्याने ती थोडी थोडी बाहेर काढतात किंवा एखादा काचेचा तुकडा तापवून सरळ पोलादी दांड्याला चिकटवितात. त्यानंतर काच पुन्हा तापविली जाते व तिला शंक्वाकारा देऊन तिच्यापासून १ ते २ मी. लांबीचे बारीक व्यासाचे दांडे तयार करतात. बहुरंगी बांगड्या करण्यासाठी विविध रंगांच्या काचांनी युक्त असा संयुक्त शंक्वाकारा तयार करतात. मग दांडे कापून त्यांचे बांगड्या तयार करण्यासाठी योग्य अशा लांबीचे तुकडे करण्यात येतात. हे तुकडे परत तापवितात, त्यांची टोके चिमट्याने जोडतात आणि त्यांना वर्तुळाकार देण्यासाठी ते तापसह (उच्च तापमान सहन करू शकणाऱ्या) मातीच्या शंकूवर सरकवितात. जोडरहित बांगड्या तयार करण्यासाठी उभ्या धरलेल्या एका दांड्याच्या टोकावर थोडी काच घेतात. दांड्याचे टोक काचेत घुसलेले असले व तयार होणारे वलय रुंदावण्याकरिता दांडा योग्य प्रकारे फिरविला जातो. हे वलय तापसह मातीच्या ठोकळ्याने दाबून त्याला इष्ट ते आकारमान देतात. काही वेळा आकृतिबंध कोरलेला ठोकळा वापरून बांगडीवर तो आकृतिबंध उमटवितात.

कारखान्यात बांगड्या तयार करण्याची साधनेही साधीच असतात. फुंकनळीच्या टोकाला वितळलेली काच घेऊन तिला गोल गोळ्याचा आकार देतात. हा गोळा गुळगुळीत पत्र्यावर (वा दगडावर) फिरवून त्याला शंक्वाकार देतात व मग या शंकूला सर्पिलाकार (मळसूत्राकार) देण्यासाठी तो भट्टीत ठेवलेल्या एका फिरत्या आडव्या रुळावर (‘बेलन’वर) चढवितात. याकरिता काचेच्या गोळ्याच्या टोकाकडून एक धागा काढतात व एका दांड्याच्या साहाय्याने त्याला वलयाकार देऊन ते रुळावरील एका आकड्याला अडकवितात. रूळ फिरत असताना धागा त्यावर गुंडाळला जाऊन कित्येक मीटर लांबीचे सर्पिल तयार होते. मग रूळ भट्टीतून बाहेर काढून सर्पिल काढून घेतात आणि ते निवल्यावर त्यावर लांबीच्या दिशेने टोकदार कार्बोरंडमाच्या साहाय्याने रेघ मारून काचेची वलये तयार केली जातात.

बहुरंगी बांगड्या तयार करण्यासाठी रंगीत काचेच्या लहान लहान पट्ट्या ठरविलेल्या नक्षीनुसार रंगहीन काचेच्या गोळ्यावर बसविण्यात येतात. नंतर या गोळ्यावर रंगहीन काचेचा थर देण्यात येतो व त्याचे शंकूत रूपांतर केले जाते. त्यापुढील क्रिया साध्या बांगड्यांप्रमाणेच करण्यात येतात. पोकळ बांगड्या तयार करण्याकरिता फुंकनळीवर काच घेऊन तिचा फुगा तयार करतात आणि नंतर त्यापासून पोकळ नलिका तयार करून तिला सर्पिलाकार देतात. पोकळ बांगड्या विशेष प्रकारच्या अलंकरणासाठी वापरतात. उदा., रुपेरीकरणासाठी अशा बांगड्यांसाठी सर्पिलातून बांगड्या कापून घेण्यापूर्वी नलिकेत रुपेरीकरण विद्राव सोडतात.

बांगड्यांची टोके जोडण्यासाठी केरोसीन ज्योतीचा झोत वापरतात. नंतर बांगड्यांवर अंत्यरूपण करतात. उदा., भट्टीत तापवून पॉलिश करणे, एनॅमल चढविणे, द्रवरूप सोने लावणे व शेवटी विशेष प्रकारच्या भट्टीत तापविणे. कारखान्यात तयार होणाऱ्या बांगड्या झगझमगीत रंग व मुलायम सफाई या बाबतींत सरस असतात.


काचेच्या बांगड्यांचे वर्गीकरण पुढील सात प्रकारांत करतात : (१) ‘छाल’ बांगड्या (जोडरहित), (२) ‘कारा’ बांगड्या (टोके जोडलेल्या, ओबडधोबड), (३) ‘गोला’ बांगड्या (कारखान्यात बनविलेल्या, सजावटीसाठी उपयुक्त), (४) ‘रेशमी’ बांगड्या (कारखान्यात बनविलेल्या, रेशमासारख्या मुलायम दिसणाऱ्या व अधिक सजावटीची आवश्यकता नसलेल्या), (५) प्रवाळ बांगड्या (अखंड, टिकाऊ), (६) पोकळ सपाट बांगड्या (कारखान्यात बनविलेल्या, आतून रुपेरी केलेल्या), (७) कापीव बांगड्या (जाड, उत्तम काचेच्या, कारखान्यात बनविलेल्या).

प्लॅस्टिकच्या : ह्या बांगड्या पॉलिस्टायरीन (स्टायरॉन ६६६), सेल्युलोज ॲसिटेट इ. प्रकारच्या प्लॅस्टिकांपासून बनविल्या जातात. ह्या बांगड्या विविध नक्षीच्या, रुंदीच्या, जाडीच्या तसेच अनेक रंगांच्या तयार करतात.

भारतीय उद्योग : भारतात काच, हस्तिदंत, शंख, धातू (सोने, चांदी, पितळ इ.), प्लॅस्टिक इत्यादींपासून बांगड्या बनविण्यात येतात. विशेषेकरून काच व प्लॅस्टिक यांच्या बांगड्या मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येतात. फिरोझाबाद येथे काचेच्या बांगड्यांच्या कारखान्यांचे मोठे जाळे आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास तेथे सु. ४५ कारखाने होते. १९५० मध्ये तेथे मध्यम उत्पादनक्षमतेचे ८६ कारखाने होते. तेथील कारखाने त्यांना लागणारी काच स्वतःच तयार करतात व तिच्यापासून धागे, सर्पिले व शेवटी बांगड्यांची वलये तयार करतात. बांगड्यांची टोके जोडण्याचे काम तसेच रंगकाम, एनमॅल लावणे, पैलू पाडणे, आरसे जडविणे इ. शोभावर्धक कामे दुकानांत वा गृहोद्योग म्हणून केली जातात. फिरोझाबादखेरीज तळेगाव व तारापूर (महाराष्ट्र), मारहेरा व सहारनपूर (उत्तर प्रदेश), मद्रास, कांग्रा इ. ठिकाणी काचेच्या बांगड्यांची लहान प्रमाणावर निर्मिती होते.काचेच्या बांगड्यांची एडन, मलेशिया, अफगाणिस्तान, अमेरिका, आग्नेय आशिया इ. ठिकाणी निर्यात होते.

धातूंच्या बांगड्यांपैकी सोन्याचांदीच्या बांगड्यांचा भारतातील उद्योग बहुतेक लहान-मोठ्या शहरांतून कुटिरोद्योग स्वरूपात चालतो. पितळी बांगड्यांची निर्मिती हैदराबाद, मद्रास, मुंबई, कलकत्ता इ. ठिकाणी होते. सोन्याचांदीच्या बांगड्या सामान्यतः ग्राहकाच्या मागणीनुसार तयार करण्यात येतात.

प्लॅस्टिकच्या बांगड्या महाराष्ट्र (विशेषतः मुंबई), गुजरात, दिल्ली, मद्रास, इ. ठिकाणी बनविण्यात येतात. हा उद्योग मुख्यत्वे कुटिरोद्योग या स्वरूपातच आहे. भारतातून बांगला देश, पाकिस्तान, दुबई, नायजेरिया, कुवेत, मस्कत, सौदी अरेबिया, श्रीलंका इ. देशांना प्लॅस्टिकच्या बांगड्या निर्यात करण्यात येतात. भारतातून १९६५-६६ मध्ये सु. १४ लक्ष रु., १९६८-६९ मध्ये १७ लक्ष रु. १९७४-७५ मध्ये सु. ५७.२१ लक्ष रु., १९७८-७९ मध्ये सु. ७७.६५ लक्ष रु. आणि १९७९-८० मध्ये सु. ४६.५४ लक्ष रु. किंमतीच्या प्लॅस्टिकच्या बांगड्यांची निर्यात झाली.

भारताच्या काही भागांत मातीच्या रंगीत व टिकाऊ बांगड्या बनविण्यात येतात पण त्या केवळ दिखाऊच असतात.

संदर्भ :

1. Chattopadhyay, Kamaladevi, Handicrafts of India, New Delhi, 1975.

2. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part IV. New Delhi, 1957.

3. Dar, S. N. Costumes of India and Pakistan, Bombay, 1969.

4. Dhanija, Jasleen, Indian Folk Arts and Crafts, New Delhi, 1970.

कुलकर्णी, सतीश वि. मिठारी, भू. चिं.


जयपूरच्या महाराणीसाहिबांच्या रत्नजडित बांगड्या प्लॅस्टिकच्या पाटल्या
मणी, मोती व मीनाकाम केलेला सोन्याचा मोर असलेल्या राजस्थानी पाटल्या. चांदी, लाख व प्लॅस्टिक यांवर चांदीकाम केलेल्या बांगड्या.
चांदतारा पिछोडी तोडे. काचेच्या बांगड्या

डॉपल बांगडी व साध्या फॅन्सी बांगड्या     बांगड्या घातलेली आदिवासी स्त्री
वाग्मोड, मयुरी व चांदतारा पाटल्या ब्रिच तोडे
सफेद खड्यांच्या बांगड्या.      

सोन्याच्या बांगड्या.