कोल गॅस : (कोळसा वायू). दगडी कोळशाचे काही प्रकार हवेशिवाय तापविल्यास जो बाष्पनशील (उडून जाणारा) भाग निर्माण होतो त्यातून डांबर, अमोनिया इ. वेगळे केल्यावर जो वायू मिळतो त्यास कोल गॅस असे म्हणतात. ह्या पद्धतीत कोक उप-उत्पादन म्हणून मिळतो. कोळशापासून मिळणाऱ्या वायूत कोल गॅस, ⇨ पाणवायू, ⇨ प्रोड्यूसर वायू, निळसर पाणवायू इ. वायू असतात. कोल गॅस हे नळातून इच्छित स्थळी पुरविता येण्यासारखे स्वस्त वायुरूप इंधन आहे. कोल गॅसच्या निर्मितीत मुख्यतःनीच तापमानातील कार्बनीकरण पद्धत वापरतात. उच्च तापमानातील कार्बनीकरणात उप-उत्पादन म्हणून कोल गॅस मिळतो [→कोक]. कोल गॅसपेक्षा नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू) वापरण्यास अधिक सुलभ असल्यामुळे कोल गॅसचा वापर कमी होत चालला आहे.

इतिहास : हवाबंद भांड्यात कोळसा तापविल्यास ज्वालाग्राही वायू उत्पन्न होतो ही गोष्ट सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून माहीत होती, तरी हा वायू प्रकाशनिर्मितीकरिता वापरता येईल हे विल्यम मर्डॉक या ब्रिटिश अभियंत्यांनी १८०२ मध्ये प्रथमच सप्रयोग सिद्ध केले व त्यांनी पहिले गॅस-धारकपात्र बांधले. १८१० मध्ये पहिली गॅस कंपनी लंडन येथे स्थापन झाली. सुरुवातीस सु. ७० वर्षे कोल गॅसचा उपयोग फक्त प्रकाशनिर्मितीसाठीच करण्यात येत असे. एकट्यालंडन शहरातच १९ निरनिराळ्या गॅस कंपन्या निघाल्या व ग्रेट ब्रिटनमधील कंपन्यांची एकूण संख्या १,०००वर गेली. १८४० मध्ये पहिले गॅसपाकपात्र (गॅस कुकर) तयार करण्यात आले व १८५३ पासून गॅस शेगड्याविक्रीस येऊ लागल्या. १८५५ मध्ये बन्सन यांनी शोधून काढलेल्या ज्वालकाच्या (बर्नराच्या) तत्त्वाचा उपयोग करून टॉमस फ्लेचर यांनी बरीच उपकरणे व भट्ट्या बनविल्या. बन्सन ज्वालकामुळेच गॅस उद्योगाला सध्याचे महत्त्व प्राप्त झाले.

गॅस उत्पादनाच्या पद्धतीतही अनेक सुधारणा झाल्या. मर्‌डॉक यांच्यावेळी दोन मी. लांबीची बिडाची बकपात्र भट्टी वापरत. तीमध्ये कार्बनीकरणाचे कमाल तापमान ८00° से.पर्यंत ठेवणे शक्य होई. १८५० पासून उच्चतापसह (उच्च तापमानातही टिकणाऱ्या) विटांची बकपात्र भट्टी वापरात आली. त्यामुळे तापमान १,०००° से. पर्यंत वाढवून गॅसचे उत्पादन दर टनी १७५ घ.मी. वरून २९० घ.मी. पर्यंत नेता आले. १८८८ मध्ये कोकपासून पाणवायू बनविण्याची कृती उपलब्ध झाली. हा वायू कोल गॅसमध्ये मिसळल्याने उत्पादन खर्च कमी झाला.

विजेच्या दिव्यांचा १८८२ मध्ये शोध लागल्यामुळे गॅस उद्योगापुढे मोठीच समस्या निर्माण झाली. पण १८९५ मध्ये कार्ल औअर फोन वेल्सबाक यांनी थोरियम नायट्रेट व सिरियम नायट्रेट यांपासून उद्दीप्त वायुजाळी बनविली आणि त्यापासून तयार केलेल्या गॅसबत्तीने विद्यूत् दिव्याबरोबर यशस्वी चढाओढ केली. त्यामुळे साधारण प्रतीचा कोळसा वापरून व उच्च तापमानाचा वापर करून बकपात्र भट्टीत तयार केलेला कमी कॅलरीमूल्याचा कोल गॅस जास्त प्रकाशासाठी वापरणे शक्य झाले.

बकपात्र भट्टी बांधणीतही बऱ्याच सुधारणा होत गेल्या. १८८५ मध्ये भट्टीत कोळसा सुलभतेने आत घालता यावा व तयार झालेला कोक भट्टीतून बाहेर काढता यावा यांसाठी कलत्या बकपात्र भट्टीचा वापर करण्यात आला. १९०४ मध्ये ब्यूएब यांनी खंडित उदग्र (उभी) भट्टी वापरली, तर सेटल व पॅडफिल्ड यांनी अखंड उदग्र भट्टी वापरात आणली. ह्या भट्टीत वुडॉल व डकहॅम यांनी १९०३–१९०८ व ग्लोव्हर व वेस्ट यांनी १९०५–१९०९ या काळात बऱ्याच सुधारणा केल्या. ह्या सुधारणांमुळे गॅसचे उत्पादन दर टनास ५४० घ. मी. पर्यंत वाढले. तयार होणाऱ्या गॅसचे कॅलरीमूल्य आवश्यक तेवढे असले, तरी त्याची प्रकाश देण्याची शक्ती त्याकाळच्या कायद्यानुसार पुरेशी नव्हती. पण वायुजाळीच्या शोधामुळे पहिल्या महायुद्धानंतर कॅलरीमूल्य हेच प्रमाण निश्चित करण्यात आले.

कार्बनीकरण : कोळशाचा प्रकार व ऊर्ध्वपातन (बाष्प करून व ते थंड करून पदार्थ अलग करण्याची) पद्धत ह्यांवर कोल गॅस व डांबर, कोक, अमोनिया इ. उपफलांच्या उत्पत्तीचे प्रमाण व गुणधर्म अवलंबून असतात. ऊर्ध्वपातनीय घटकांचे प्रमाण मध्यम व उच्च असलेला व राखेचे प्रमाण कमी असलेला कोळसा कोल गॅसच्या निर्मितीसाठी योग्य असतो. गॅसपासून प्रकाश जास्त मिळावा म्हणून पूर्वी नीच तापमानावरील कार्बनीकरण पद्धत वापरत. पण आता ह्या पद्धतीने धूम्ररहित सेमीकोक हे इंधन मिळविणे हा प्रधान हेतू असतो. या पद्धतीत वायुमार्ग तापमान ६५०°–७५०° से. इतके असते व कोळशाचे कार्बनीकरण ५००°–५५०° से. ला करतात. एक टन बिट्युमेन कोळशापासून साधारणत: ७·५ क्विंटल सेमीकोक, ६०–९० लि. डांबर व ४-५ किग्रॅ. सल्फेट मिळेल इतका अमोनिया व २०५–२३५ घ.मी. कोल गॅस मिळतो. यापैकी निम्मा वायू प्रक्रियेतच ज्वलनासाठी वापरतात. त्यामुळे प्रत्यक्षात ११६ घ.मी. इतका वायू मिळतो. त्याचे कॅलरीमूल्य ५,००० कि.कॅ./ घ.मी. असून त्यात ॲलिफॅटिक (कार्बन अणू साखळी स्वरूपात असलेली) हायड्रोकार्बने जास्त आढळतात. ॲरोमॅटिक (कार्बन अणूंचे वलय असणारी) संयुगे आणि हायड्रोजन कमी असतो. ह्या पद्धतीने मिळालेल्या कोल गॅसचा उपयोग टाऊन गॅसचे (प्रोड्यूसर वायू, पाणवायू इ. वायू आणि कोल गॅस यांच्या मिश्रणाचे) कॅलरीमूल्य वाढविण्यासाठी करतात.

उच्चतापसह विटा १,४००° से. पर्यंतच टिकाव धरू शकतात म्हणून अशा विटांच्या भट्टीत उच्च तापमानावरील कार्बनीकरण जास्तीत जास्त १,०००° से. ला घडवितात. या तापमानापर्यंत कोळशातील सर्व बाष्पनशील घटक निघून जात असल्याने यापेक्षा जास्त तापमानाची गरज नसते. हे तापमान पोहोचेपर्यंत भट्टीतील कोळशात बरेच रासायनिक फेरफार घडतात. ३००°–४००° से. ला प्राथमिक अपघटन (मोठ्या रेणूचे लहान रेणूंत अथवा अणूंत तुकडे होणे) होते. नंतर उच्च रेणूभाराची अवायुरूप हायड्रोकार्बने तयार होऊन कोळसा लवचिक होतो. तापमान अधिक होताच हायड्रोकार्बनांचे अपघटन, हायड्रोजनीभवन (हायड्रोजनाचा समावेश) व पुनर्संघटन (रेणूमधील अणूंची पुनर्रचना) होऊन मिळालेल्या वायूमध्ये हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डाय-ऑक्साइड, तृप्त (ज्यांतील कार्बन अणूंचे बंध वेगवेगळ्या अणूंना जोडलेले आहेत अशी) व अतृप्त (ज्यांतील कार्बन अणूंचे काही बंध मोकळे आहेत अशी) हायड्रोकार्बने, वाफ, हायड्रोजन सल्फाइड, गंधकयुक्त कार्बनी संयुगे, अमोनिया आणि नायट्रोजन संयुगे आढळतात. भट्टीमधील तापमान जास्त वाढल्यास किंवा भट्टीमधील कोळशावर जास्त खुली जागा असल्यास वायूला भरपूर प्रारणजन्य (तरंगरूपी) उष्णता मिळते. हायड्रोकार्बनांचे अपघटन आणि पुनर्संयोग होऊन नॅप्थिनांसारखी उच्च रेणुभाराची संयुगे मिळतात. त्याशिवाय भट्टीच्या भिंतीवर कार्बनाचा जास्त थर बसतो व उष्णतावाहकता कमी होते. तसेच डांबरामध्ये मुक्त कार्बनाचे प्रमाण वाढते.

कार्बनीकरणात कोळशाच्या आकारमानात प्रथम वाढ होते. पण तापमान आणखी वाढल्यावर तो आकुंचन पावतो. म्हणून कोळसा ठासून भरल्यास अथवा आकुंचनापूर्वी कोक बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यास निर्माण होणाऱ्या दाबामुळे भट्टी भंग पावण्याची शक्यता असते.

भट्ट्यांचे प्रकार : कोल गॅस निर्मितीसाठी चार प्रकारच्या भट्ट्या वापरतात : (१) क्षैतिज (क्षितिज समांतर) बकपात्र भट्टी, (२)अखंड उदग्र बकपात्र भट्टी (३) खंडित उदग्र बकपात्र भट्टी व (४) कोक भट्टी. या प्रकारांनुसार ब्रिटनसारख्या कोल गॅस निर्मितीतील अग्रेसर देशात एकूण गॅस निर्मितीच्या अनुक्रमे ३०, ४६, ६ आणि ३ टक्के उत्पादन होते. उरलेले १७% उत्पादन पाणवायू, संपूर्ण वायवीकरण (वायूत रूपांतर करणे) इ. पद्धतींनी होते.


क्षैतिज बकपात्र  भट्टी अजूनही जुन्या कारखान्यांतून वापरली जाते. तथापि ती आता मागे पडत चालली आहे. ही भट्टी पसरट घुमटाच्या आकाराची किंवा लंबगोलाकार असून ती ६·५ मी. लांब., ०·५५–०·६० मी. रुंद आणि ०·३६–०·४५ मी. उंच असते. अशा ६–१२ भट्ट्या एका गटात असून त्या एकाच अंतर्गत प्रोड्यूसर वायू-उत्पादकाने तापविल्या जातात. असे कित्येक गट एका सरळ रांगेत उभारलेले असतात. तापमानाच्या आत्यंतिक चढउताराला भट्टी टिकावी म्हणून त्या सिलिकेच्या बनवितात व दोन्ही टोकांच्या बाजू उच्चतापसह मातीच्या बनवितात. भट्टीची दोन्ही भोके नरम पोलादाची असून त्यांवर बिडाची झाकणे घट्ट बसविलेली असतात. प्रत्येक भट्टीच्या दोन्ही टोकांस असलेल्या ऊर्ध्वगामी नळ्यांतून वायू जमा होतो. यामध्ये कोळसा आत टाकण्याचे व कोक बाहेर काढण्याचे कार्य यांत्रिक रीत्या होते. बाहेर काढलेल्या कोकचा काही भाग अंतर्गत प्रोड्यूसर वायू-उत्पादकामध्ये इंधन म्हणून वापरतात. बकपात्रात एकावेळी ६–७ क्विंटल कोळसा भरतात. १०–१२ तासांत त्याचे कार्बनीकरण पूर्ण होते. वाया जाणाऱ्या वायूचा उपयोग हवा तापविण्यासाठी करतात. एक टन कोळशापासून ५,००० किकॅ./ घ.मी. कॅलरीमूल्याचा ३७८–३८० घ.मी. इतका कोल गॅस मिळतो.

अखंड उदग्र बमपात्र भट्टी सु. ७·५ मी. उंच असून तिचा आडवा छेद लंबवर्तुळाकार किंवा चारही कोपऱ्यांस आतून गोलाई असलेल्या आयताप्रमाणे असतो. सामान्यत: माथ्याची रुंदी २५ सेंमी. तर तळाची ४५ सेंमी. असते. प्रतिदिनी भट्टीची गॅस उत्पादनक्षमता २,१८०–४,६५० घ.मी. या मर्यादेत इच्छित असेल, तर त्याप्रमाणे तळाची रुंदी १-२.५ मी. इतकी ठेवतात. या भट्टीत कोळसा आत टाकल्यावर तो हळूहळू खाली सरकून त्याचे संपूर्णपणे कार्बनीकरण होऊन तयार होणाऱ्या कोकचे विसर्जन होईल अशी स्वयंचलित यंत्रणा असते. काही वेळा विसर्जनास योग्य अशा कोकमधील उष्णता कोळशाच्या वरच्या थरापर्यंत पोहोचविण्यासाठी पाणवायू, प्रोड्यूसर वायू किंवा कोल गॅसही आत सोडतात. यावेळी प्रोड्यूसर वायू वापरल्यास २५–५० टक्क्यांनी व पाणवायू वापरल्यास १० ०टक्क्यांहून अधिक वाढ कोल गॅस निर्मितीत होते. तसेच वायूचे कॅलरीमूल्यही वाढते. काही आधुनिक भट्ट्यांमध्ये अशुद्ध वायू संपीडित करून (दाब देऊन) ज्वलन कोठीत सोडतात. तसेच भट्टीच्या वरच्या भागाच्या सभोवती उष्ण व वाया जाणारा वायू खेळवून कोळशाचे पूर्वतापन करतात. परंतु बहुधा अधिक उष्णतेचा उपयोग बाष्पित्रामध्ये (बॉयलरमध्ये) बाष्पनिर्मितीसाठी करतात. भट्टीमधील कोळशाची खाली सरकण्याची गती आणि जरूरीप्रमाणे कमीजास्त उत्पादन करण्याची क्षमता ही ह्या भट्टीची वैशिष्ट्ये होत.

खंडित उदग्र भट्टी ६·५ मी. उंच, ३ मी. लांब, वर २० सेंमी. आणि खाली ३० सेंमी. रुंद असून अंतर्गत प्रोड्यूसर वायु-उत्पादकाने तिचे तापन होते. या भट्टीत एका वेळेस ३–४ टन कोळसा आत टाकतात व त्याचे १०–१२ तासांत कार्बनीकरण पूर्ण करतात. यांपैकी शेवटच्या दोन तासांत वाफ आत सोडून कोल गॅसचे उत्पादन वाढवितात. वाफेची निर्मिती बाष्पित्राद्वारे करतात. या भट्टीपासून गॅस निर्मिती ठराविक प्रमाणात होते पण हे प्रमाण कमी जास्त करता येत नाही.

ब्रिटनमधील गॅस उत्पादक १९५२–१९५३ पर्यंत दरसाल २०,००० लक्ष घ.मी. एवढा गॅस कोक-भट्ट्यांकडून खरेदी करीत असत. पण त्यानंतर बहुतेक मोठ्या गॅस कंपन्यांनी स्वत:च्या कोक भट्ट्या वापरण्यास सुरुवात केली. या भट्टीमध्ये कोल गॅस आणि प्रोड्यूसर वायू या दोहोंचाही उपयोग करता येईल अशा तऱ्हेची तिची रचना असते. तिच्यापासून कोल गॅस उप-उत्पादन म्हणून मिळतो. मात्र कोकची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केल्यासच ही भट्टी फायदेशीर होते. गॅस उद्योगात तिचा वापर करावयाचा झाल्यास जास्त मागणीच्या वेळी अधिकांश गॅसनिर्मितीसाठी तिचा वापर करतात व काही वेळा इतर प्रकारच्या बकपात्र भट्ट्यांचा वापर करतात [→ कोक].

क्षैतिज भट्टी व कोक भट्टी यांमध्ये कोळशाचा थर दाट कार्बनीकरणासाठी वापरतात. त्यामुळे कोकची क्रियाशीलता काही प्रमाणात क्षीण होते. अखंड भट्टीमध्ये त्यामानाने कोळशाचा थर विरळ असल्याने कोकची क्रियाशीलता वाढते. अखंडित भट्टीपासून मिळणारा कोक या दोहोंच्या दरम्यानच असतो. कोल गॅसचे संघटन वरीलप्रमाणे असते.

कोल गॅसमधील घटक

उच्च तापमान कार्बनीकरण

नीच् तापमान कार्बनीकरण %

क्षैतिज भट्टी %

उदग्र भट्टी

बाष्पविरहित %

बाष्पसहित %

कार्बन डाय-ऑक्साइड

२·२

३·४

४·५

अतृप्त हायड्रोकार्बने

३·१

२·३

१·८

३·८

ऑक्सिजन

०·५

०·४

०·७

०·२

कार्बन मोनॅाक्साइड

८·०

१०·३

१५·१

८·३

हायड्रोजन

५०·३

४९·५

४९·३

२९·१

मिथेन

२८·९

२८·५

२१·२

४९·१

नायट्रोजन 

७·७

६·८

८·५

५·०

शहरी पुरवठ्यात, गॅसचा वापर सर्व काळ एकाच वेगाने होत नसल्याने, जास्त वापराच्या वेळी वायवीकरणासाठी प्रोड्यूसर वायू, पाणवायू, निळसर व कार्ब्युरेटेड पाणवायू इ. प्रकारांपैकी एका प्रकाराने गॅस निर्मितीस जोड देण्यात येते. हे वायू व बकपात्र भट्टीत तयार होणारा कोल गॅस यांचे मिश्रण करून ते शहरात वापरासाठी पुरवितात. यासच ‘टाऊन गॅस’ म्हणतात.

संपूर्ण वायवीकरण पद्धती : कोळशाचे उदग्र बकपात्र भट्टीत कार्बनीकरण करून तयार झालेला कोक गरम असतानाच कार्ब्युरेटेड पाणवायू उत्पादकात नेतात. त्यामुळे सर्व कोळशाचे गॅसमध्ये रूपांतर होते. लुर्गी पद्धतीत संपीडित ऑक्सिजन व वाफ यांचा वापर करून संपूर्ण वायवीकरण होते. या पद्धतीने ३०% राख असलेला, ३ मिमी. इतका चूर्णमय व कोक होण्यास अपात्र अशा कोळशाचा वापर करूनही उच्च कॅलरीमूल्ययुक्त गॅस मिळविता येतो. इतकेच नव्हे, तर तो २० वातावरणीय दाबाइतका (वा.दा.इतका) संपीडित असल्याने त्याचा पुरवठा दूरवर करता येतो.

कोल गॅसच्या शुद्धीकरणाचा आराखडा : (१) बकपात्र, (२) निर्वात चोषक, (३) शीतक, (४)लिव्हिसी शुद्धीकारक, (५) स्थिर विद्युत् पद्धतीने डांबर अलग करणारे उपकरण, (६) घूर्णक शुद्धीकारक, (७) डांबर, (८) अमोनिया, (९) पाणी, (१०) बेंझॉईल व गंधक शुद्धीकारक, (११) गॅसमापक, (१२) गॅस-धारकपात्र, (१३) गॅस शुद्धीकरण संयंत्र, (१४) नियंत्रक, (१५) पंप, (१६) वितरणासाठी गॅस.

शुद्धीकरण : भट्टीत तयार होणारा कोल गॅस वापरण्यापूर्वी शुद्ध करावा लागतो. भट्टीतील गॅसचे निर्वात चोषकावाटे चोषण करण्यात येते. भट्टीतील नियंत्रकामुळे भट्टीतील दाब १ वा.दा. व पुढे चोषकापर्यंत १२–१८ सेंमी. (पाणी) दाब राखला जातो. चोषकाच्यापुढे सर्व शुद्धीकरण संयंत्रातून गॅस फिरून धारपात्रकात तो शिरेल इतका दाब म्हणजे ९० सेंमी. (पाणी) ठेवण्यात येतो. गॅसचे शीतलीकरण विविध शीतकांद्वारे करून त्याचे तापमान बरेच कमी करतात. यावेळी बहुतांश डांबर व अमोनिया वेगळे होतात व डांबर हौदात जमा करतात. एकूण डांबरांपैकी ८०–८५% डांबर भट्टीत व ७–१४% शीतलीकरणात व उरलेले डांबर लिव्हिसी या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या शुद्धीकारक, विद्युत् इ. पद्धतींनी वेगळे करतात. गॅसमधील अमोनिया वेगळा करण्यासाठी सल्फ्यूरिक अम्लाचा उपयोग गॅसनिर्मितीच्या वेळी करत नाहीत. यासाठी वेगळी यंत्रणाच वापरावी लागते. कोल गॅसमधून हायड्रोजन सल्फाइड काढून टाकणे हे कायद्याने बंधनकारक आहे. यासाठी हॉलंड, डेन्मार्क इ. देशांत दलदली लोह धातुकाचा (दलदलीच्या प्रदेशात आढळणाऱ्या ऑक्साइडाच्या स्वरूपांतील लोहांचा, बॉग आयर्न ओअरचा) वापर करतात. काही वेळा ऑक्साइड पद्धतीचा वापर करतात. अशा पद्धतीने शुद्ध केलेल्या वायूमध्ये नॅप्थॅलीन असल्यास व त्याचे नियंत्रण न केल्यास गॅस वितरण व वापर यांत अडचणी येतात. तसेच वायूतील बेंझॉइल व गंधकयुक्त कार्बनी संयुगांचे निष्कर्षण करणे (अलग करणे) आवश्यक असते. काही वेळा अतृप्त हायड्रोकार्बनांवर नायट्रोजन पेरॉक्साइडाची विक्रिया होऊन डिंकसदृश पदार्थ तयार होतात. अशा पदार्थाचे कण जागोजागी निक्षेपित झाल्यास (साचल्यास) गॅस वितरण अवघड होते. हे कण गॅस-धारकपात्रात एकत्र येऊन त्यांवर पाण्याचे संघनन (वाफ जलकणांच्या रूपात जमा होणे) होऊन ते गॅसमधून अलग होतात. भट्टीच्या भिंती व द्वारे शक्यतो हवाबंद राखल्यास त्यांच्या उत्पपत्तीला आळा बसतो. स्थिर विद्युत् पद्धतीने डांबर अलग करणाऱ्या उपकरणाच्या मध्यभागातून अगंज (स्टेनलेस) पोलादाच्या तारा गेलेल्या असतात व त्यातून ३० किवॉ. दाबाचा एकदिश विद्युत्‍ प्रवाह सोडतात त्यामुळे गॅसमधील डांबराचे कण परिघाकडे लोटले जाऊन एकत्रित होतात व नंतर काढून टाकण्यात येतात.

निर्द्रवीकरण : शुद्ध केलेला गॅस बाष्पतृप्त असल्याने थंड हवेत संघननाने नळ्यांत पाणी जमते व मापके, दशके इ. उपकरणे गंजतात. म्हणून शीत हवामानाखाली दवबिंदू येईल अशा रीतीने गॅसचे निर्द्रवीकरण (द्रव काढून टाकण्याची क्रिया) करणे इष्ट असते. यासाठी कॅल्शियम क्लोराइड विद्राव वापरतात. वापरलेल्या विद्रावाची संहती (कॅल्शियम क्लोराइडाचे प्रमाण) वाढवून तो पुन्हा कार्यक्षम बनवितात.


गॅस-धारकपात्र : गॅसचा संग्रह व नियमित पुरवठा, त्याचे गुणधर्म कायम ठेवणे व निर्मितीत तात्पुरता खंड पडल्यास काही काळ पुरवठा चालू ठेवणे हे गॅस-धारकपात्राचे उपयोग होत. गॅस-धारकपात्रे विविध प्रकारांची व आकारांची असतात. सर्वत्र वापरात असलेल्या धारकपात्रात एक घंटेसारखा भाग ठेवलेला असतो. धारकपात्राची खोली जरूरीप्रमाणे कमीजास्त करण्यासाठी त्यातील हा भाग दुर्बिणीतील नळ्यांप्रमाणे एकात एक बसतील अशा भागांचा म्हणजे उत्थापकांचा (लिफ्टचा) बनविलेला असतो. सरळ किंवा सर्पिल ऊर्ध्वगामी धारकपात्रात रुळांमुळे उत्थापक सरळ किंवा सर्पिल गतीने वरखाली होतात. उत्थापक एक किंवा अनेक असून ते जलरोधित असतात. निर्द्रव धारकपात्र नलिकाकार असून त्यात एक दट्ट्या गॅसच्या हालचालीने खालीवर होतो. गॅस बाहेर जाऊ नये म्हणून रबरी आवेष्टन कडे किंवा विशिष्ट पातळ डांबर वापरतात. गोलाकार धारकपात्रात थोड्या जागेत पुष्कळ गॅस संपीडित करून साठविता येतो. धारकपात्रासाठी येणारा खर्च आणि इतर धोके (हवाई हल्ले, अपघात इ.) यांमुळे गॅस संपिडित करून साठविण्याकडेच कल दिसून येतो.

गॅसमापक : धारकपात्रामध्ये गॅस साठविण्यापूर्वी तयार झालेल्या गॅसचे मापन करतात. यासाठी व्हेंचुरी, विस्थापित, दंडगोल किंवा छिद्रयुक्त अशा चार प्रकारचे मापक वापरतात [→ वायुमापक].

गॅस वितरण : निर्मितिस्थानापासून गॅस मुख्य नळीतून प्रमुख पुरवठा केंद्राकडे जातो. मोठ्या प्रमाणात वितरण करावयाचे असल्यास अनेक गॅस-धारकपात्रे असतात. मुख्य नळीला अनेक फाटे काढून लहानलहान नळ्यांतून ग्राहकांना गॅसचा पुरवठा करतात. फाटे फार असल्यास कारखान्यातील प्रमुख नियंत्रकाशिवाय जागोजागी उपनियंत्रक बसविलेले असतात.

गॅस उद्योग : काही प्रमुख देशांतील कोल गॅस उद्योगासंबधीची माहिती खाली दिली आहे.

ब्रिटन : गॅस निर्मितीतील आद्य व अग्रेसर असलेल्या या देशात, १९४८ च्या गॅस अधिनियमापूर्वी १,०४६ गॅस उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणारी इन्कॉर्पोरेटेड ब्रिटिश गॅस कौन्सिल ही संस्था होती. या उत्पादकांतर्फे १२,००० दशलक्ष. घ.मी. गॅसचे उत्पादन हात असे. याशिवाय कोक भट्टी उद्योगाकडून १,४८५ दशलक्ष घ.मी. एवढा गॅस विकत घेतला जाई. अडीच लाख कामगार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीत्या या उद्योगधंद्यात होते. संस्थेच्या प्रखर विरोधास न जुमानता या उद्योगाचे १९४८ मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ग्रेट ब्रिटनचे बारा भाग पाडून विभागीय मंडळाकडे सर्व कंपन्या सुपूर्त करण्यात आल्या. राष्ट्रीयीकरणानंतर दैनिक गॅस उत्पादन २०% वाढले, जुन्या कारखान्यांचे पुनरुज्जीवन, जालक पद्धतीने गॅस-वितरण, २०० हून जास्त अकार्यक्षम कारखाने बंद करणे, मोठ्या लाभादायक संघटनांची स्थापना इ. सुधारणा जलद झाल्या. तसेच कोळशाशिवाय इतर साधनांनीही गॅस उत्पादन करण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले. सध्या ब्रिटनमध्ये १ कोटी ३०लाख ग्राहक असून एकूण गॅस उत्त्पादनापैकी निम्मा घरगुती वापरासाठी व निम्मा उद्योगात वापरला जातो. घरगुती वापरापैकी  ३/४ स्वयंपाकासाठी तर १/४ उष्णतानिर्मितीसाठी वापरला जातो.

फ्रान्स : दुसऱ्या महायुद्धात फ्रान्समध्ये असलेल्या ७४९ गॅस कारखान्यांपैकी निम्म्याहून अधिक (४००) कारखाने उद्ध्वस्त झाले. नैसर्गिक वायूच्या शोधानंतर गॅस वापर कमी झाला. पण तेथील नैसर्गिक वायूत हायड्रोजन सल्फाइडाचे प्रमाण जास्त असल्याने त्याच्या वितरणात अडचणी येतात. फ्रान्समधील कोल गॅसचे उत्पादन १९३९, १९५४ व १९५९ मध्ये अनुक्रमे १,६५७, ३,०५९ आणि २,८८१ दशलक्ष घ.मी. होते.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने : १७९६ मध्ये फिलाडेल्फिया येथे गॅस तयार करण्याचा प्रयत्न झाला. पण प्रत्यक्ष गॅसनिर्मिती प्रथम १८१६ मध्ये बॉल्टिमोर येथे झाली. नंतर मात्र त्याच्यात बरीच वाढ झाली. प्रकाशासाठी विजेचा वापर सुरू झाल्यावर गॅसचा उपयोग उष्णतेसाठी करण्यात आला. नैसर्गिक वायूच्या सुलभ पुरवठ्यामुळे गॅस निर्मितीवर बराच परिणाम झाला. १९६५ मध्ये अमेरिकेत ३७ दशलक्ष ग्राहक होते त्यांपैकी ३६ दशलक्ष ग्राहक नैसर्गिक वायूचा वापर करीत, ६१८ हजार ग्राहक कोल गॅस व नैसर्गिक वायू यांचा वापर करीत, तर १२८ हजार ग्राहक फक्त कोल गॅस वापरत.

भारत : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबई आणि कलकत्ता येथे गॅस निर्मितीचे कारखाने ब्रिटिशांनी काढले. १९६४ पर्यंत भारतात मुंबई व कलकत्ता येथेच गॅस निर्मिती होत होती. १९६४ पासून कलकत्ता येथील निर्मिती थांबली असून शहरास दुर्गापूरच्या कोक भट्टीमधील गॅसचा पुरवठा केला जातो. मुंबई येथील कारखान्यात क्षैतिज बकपात्र भट्टी वापरलेली असून तीत वर्षात १ लाख टन कोळशाचे कार्बनीकरण केले जाते. शिवाय कार्ब्युरेटेड पाणवायूची निर्मिती करण्यात येते. वर्षाकाठी ५३ दशलक्ष घ.मी. गॅस, ५० हजार टन कोक व ४,८०० टन डांबर तयार होते. यांशिवाय जमशेटपूर, भद्रावती, बर्नपूर, भिलाई, दुर्गापूर, राउरकेला इ. ठिकाणी कोक भट्ट्या आहेत. कार्बनीकरण उद्योग व उप-उत्पादने ह्यांची निर्मिती इतर देशांच्या मानाने फारच कमी आहे.

पहा : कोक डांबर पाणवायू प्रोड्यूसर वायू.

संदर्भ : 1. Griffith, M. Manufacture of Gas, 3 Vols., London, 1932.

           2. Meade, A.The New Modern Gas Works Practice, London, 1934.

           3. Walter King Ltd., Manual of Gas Manufacture, London, 1961.

कोटनीस, म. शां.