शिंगी (हेटेरोन्युस्टिस फॉसिलिस)

शिंगी : या माशाचा समावेश हेटेरोन्युस्टिडी-सॅकोब्रँकिडी कुलात होतो. शास्त्रीय नाव हेटेरोन्युस्टिस फॉसिलिस (सॅकोब्रँकस फॉसिलिस). बच्चूका मच्छी नावानेही तो ओळखला जातो. ह्याचा प्रसार नदीमुखांत व गोड्या पाण्यात पाकिस्तान, भारत, श्रीलंका, म्यानमार व चीन या देशांत आहे. लांबी सु. २५ ते ३७ सेंमी., रंग शिशासारखा असून कधीकधी त्यावर दोन लांब पिवळसर पट्टे असतात. पिलांचा रंग लालसर असतो. डोके चपटे, विशाल असते. वरच्या ओठावरील मिशा अंसपक्षाच्या (छातीवरील पराच्या) मध्यापर्यंत पोहोचतात. कधीकधी त्या अधरपक्षाच्या सुरुवातीपर्यंत जातात. हलास्थीवरील दात दोन्ही बाजूंना नासपतीच्या आकाराच्या ठिगळासारख़े असतात. पृष्ठपक्ष शरीराच्या पुढच्या एकतृतीयांश भागाच्या थोडा आधीच सुरू होतो. अधरपक्ष गुदपक्षाच्या जवळजवळ सुरुवातीपर्यंत पोहोचलेला असतो. अंसपक्षाचे काटे आतून दंतूर असतात, तसेच टोकाकडे बाहेरून काही खाचा असतात. गुदपक्ष व पुच्छपक्ष हे एका स्पष्ट खाचेने स्वतंत्र झालेले असतात. या माशात श्वसनासाठी फुप्फुसासारख्या अवयवाची एक अतिरिक्त जोडी असते, त्यामुळे तो हवेतही श्वसन करू शकतो. या माशाच्या अंसपक्षाच्या काट्याने जखमा होऊ शकतात. या माशांचे मांस रुचकर व पौष्टिक असते.

जमदाडे, ज. वि.