रेझिने : कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थांत) विरघळविणाऱ्याव विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या कार्बनी पदार्थांचा एक वर्ग यांचे दोन प्रकार आहेत: (१) नैसर्गिक व (२) संश्लेषित (कृत्रिम रीत्या बनविलेले). 

       नैसर्गिक रेझिने मुख्यतः वनस्पतींपासून मिळतात. लाख हे रेझीन याला अपवाद आहे. ते एका कीटकापासून मिळते. [⟶ लाख–१]. काही रेझिने निक्षेपांपासूनही (नैसर्गिक रीत्या साचलेल्या साठ्यांतूनही) मिळतात हे खरे पण निक्षेप प्राचीन काळी अस्तीत्वात असलेल्या वनस्पतींपासून बनलेली रेझिने जमिनीत गाडली गेल्यामुळे बनलेले असतात. संश्लेषित रेझिने साध्या पदार्थांपासून रासायनिक विक्रियांनी बनविली जातात. 

इतिहास : प्राचीन काळापासून मनुष्य नैसर्गिक रेझिनांचा उपयोग वस्तूंना संरक्षक व सुशोभित लेप देण्यासाठी करीत आला आहे. इ.स. अकराव्या शतकातील एका लेखात रेझिने तेलात मिसळून व्हर्निश कशी बनवावी याची माहिती आढळते. एकोणिसाव्या शतकात व्हार्निश बनविण्याचा धंदा सुस्थिर पायावर उभा राहिला. या काळी आदिवासी लोकांनी जंगलातील झाडांपासून मिळविलेली रेझिने वेगवेगळ्या ठिकाणांहून रवाना केली जात. या ठिकाणांवरून त्यांना नावे पडली आहेत व ती अजूनही वापरली जातात. संश्लेषित रेझिने विसाव्या शतकात अस्तित्वात आली. 

नैसर्गिक रेझिने : उष्ण कटिबंध व उपोष्ण कटिंबध यांतील कित्येक झाडांना असणाऱ्या नैसर्गिक भेगांतून किंवा मुद्दाम पाडलेल्या खाचांतून निःस्त्राव (बाहेर पडणारे द्रवरूप पदार्थ) बाहेर पडतात. बाष्पीभवन होऊन ते वाळतात तसेच त्यांमध्ये काही नैसर्गिक रासायनिक विक्रियाही घडून येतात आणि त्यांना कमी -अधिक घनरूपप्राप्त होते. या पदार्थांपैकी जे पदार्थ पाण्याच्या संपर्काने फुगतात अथवा पाण्यात अंशतः किंवा पूर्णपणे विरघळतात त्यांना डिंक ही संज्ञा लावतात [⟶ डिंक]. जे निःस्त्राव पाण्यात विरघळत नाहीत पण अल्कोहॉल, हायड्रोकार्बने इ. कार्बनी विद्रावकांत विरघळतात त्यांना रेझिने म्हणतात. ज्या निःस्त्रावाचे रेझीन बनते त्याला ओलिओरेझीन ही संज्ञा लावतात. ओलिओरेझिनात काही प्रमाणात बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल असते. हवेशी संपर्क आला म्हणजे बाष्पीभवन होऊन ते उडून जाते आणि उरलेल्या पदार्थांवर ⇨ऑक्सिडीभवन तसेच ⇨बहुषारिकीकरण (दोन वा अधिक साध्या रेणूंच्या संयोगाने प्रचंड रेणूचे संयुग बनणे) याक्रिया घडून येतात व रेझीन बनते. काही ओलिओरेझिनांत बाष्पनशील तेलाचे प्रमाण मोठे असते. किंवा त्यांची बाष्पनशीलतामर्यादित असते. त्यामुळे ते पूर्णपणे उडून जात नाही आणि त्यामुळे असा निःस्त्राव दीर्घकाळ द्रवरूपात राहतो.त्याला ‘बाल्सम’ किंवा ‘एलेमी‘म्हणतात.  

रेझिने व प्लॅस्टिके यांमधील फरक स्पष्ट करणे अवघड आहे. मुख्यतः पृष्ठलेपनासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांना रेझिने आणि साच्यांच्या योगाने ज्यांच्यापासून वस्तू बनवितात त्यांना प्लॅस्टिके ही संज्ञा सामान्यत: लावतात पण हा नियम नेहमी पाळला जातो असे नाही.  

सामान्य गुणधर्म : काही रेझिनांना विशिष्ट वास असतात. बोटांनी चुरगळल्यास किंवा पेटविल्यास तो कळून येतो. रेझिनांना विविध रंग असतात. रेझिने कार्बनी विद्रावकात विरघळतात किंवा त्यांच्या संपर्कात फुगतात. त्यांचे विद्राव ⇨कलिल असतात. बाष्पीभवन केल्याने ते दाट बनतात व अखेरीस त्यांचा पापुद्रा बनतो. त्यामध्ये विद्रावकाचा काही अंश शिल्लक राहू शकतो. 

क्रमाक्रमाने तापवीत गेल्यास रेझिने प्रथम मऊ होतात व नंतर वितळतात पण त्यांचे वितळबिंदू काटेकोर नसतात. जास्त तापविल्यास त्यांचे अपघटन (घटक द्रव्ये अगल होण्याची क्रिया) होऊन कमी जटिल पदार्थ निर्माण होतात आणि रेझिने तेलात विद्राव्य बनतात. या प्रक्रियेला रनिंग किंवा स्वेटिंग म्हणतात. व्हार्निशे बनविण्याच्या कृतीत तिला महत्व आहे. 

अम्ले व क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारा पदार्थ अल्कली) यांचा रेझिनांवर सुलभतेने परिणाम होत नाही. 

घटक : रेझिनांमध्ये जटिल अम्ले (रेझिन अम्ले) या अम्लांची रेझीन अल्कोहॉलाशी (रेझिनॉलांशी) विक्रीया होऊन तयार झालेली एस्टरे आणि अल्प प्रमाणात बाष्पनशील तेले असतात. याशिवाय नैसर्गिक रासायनिक विक्रियांना दाद न देणारी हायड्रोकार्बन वर्गांची संयुगेही त्यांत असतात. त्यांचे रेणुभार उच्च असून त्यांच्या संरचना पूर्णपणे ज्ञात नाहीत. यामुळेच रेझिने निक्षेपात टिकून राहतात. 

रेझीन अम्लांच्या संरचना जटिल असून त्यांचे टर्पिन वर्गाशी साम्य आहे. त्यांचा सांगाडा फेनँथ्रीन (C14H10) या त्रिवलयी संयुगावर आधारलेला असून त्यांमध्ये मिथिल गट (CH3–) व द्विबंध यांची स्थाने वेगवेगळी आहेत. या अम्लांची उपयुक्त धातवीय लवणे व एस्टरे बनतात. ‘रनिंग’ या प्रक्रियेमध्ये कोपल रेझिनातील एक कार्बॉक्सी गट (–COOH) अपघटन पावतो. ही क्रिया झाल्याखेरीज कोपल रेझिनाचे तेलाशी सुस्थिर मिश्रण बनत नाही, म्हणून या प्रक्रियेला महत्व आहे. 

पॉलिहायड्रॉक्सी अल्कोहॉलांबरोबर ⇨एस्टरीकरण करण्यापूर्वी द्विक्षारकीय अम्लांचे अपघटन घडवावे लागते अन्यथा बहुवारिकीकरणाने निरूपयोगी पदार्थ बनण्याची शक्यता असते. 

रेझिनात असणाऱ्या द्विबंधांची स्थाने उष्णतेने बदलू शकतात. त्यामुळे अम्लांची विक्रियाशीलता व मॅलेइक अँनहायड्राइडाबरोबरसंयोग पावून ॲडक्ट (दोन जातींच्या संयुगांच्या रासायनिक समावेशनाने तयार होणारे संयुग). बनविण्याच्या क्रियेवरही परिणाम होतो. ऑक्सिडीकरण ⇨हायड्रोजनीकरण इ. क्रियांनी रेझिनांपासून उपयुक्त पदार्थ मिळू शकतात. त्यांची निर्मिती रेझिनातील द्विबंधांच्या स्थानावर अवलंबून असते. या कारणामुळेच रेझिनांवर उष्णता संस्कार करताना काळजी घ्यावी लागते. 

रासायनिक परीक्षण : वनस्पतिज व प्राणिज तेलांच्या परीक्षणासाठी उपयोगी पडतात तीच मूल्यमापने [ अम्ल अंक, साबणीकरण मूल्य व आयोडीन मूल्य ⟶ तेले व वसा] रेझिनांच्या परीक्षणासाठी उपयोगी पडतात. तथापि रेझिन अम्ले अतिजटिल असून त्यांच्या संरचनांमध्ये उष्णतेने फरक पडतात, हे परीक्षण करताना लक्षात घ्यावे लागते.

प्रमुख नैसर्गिक रेझिने : राळ (रोझीन), कोपल, डामर, सँडरॅक, ॲकरॉइड, मॅस्टिक, अंबर व लाख ही प्रमुख नैसर्गिक रेझिने होत. अंबर व लाख यांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी असल्याने येथे त्यांच्याखेरीज इतर रेझिनासंबंधी माहिती दिलेली आहे. 

राळ : (रोझीन,कोलोफोनी). पाइन वृक्षाच्या ओलिओरेझिनाचे ऊर्ध्वपातन उष्णता देऊन व तयार झालेले बाष्प थंड करून मिश्रणातील घटक वेगळे करण्याची क्रिया) केले म्हणजे टर्पेंटाइन ऊर्ध्वपातित होते व राळ शिल्लक राहते. राळ अंबर रंगांची व ठिसूळ असून बोटांमध्ये चुरडल्यास तिचा भुगा होतो. हाताच्या उष्णतेने ती चिकटही होते. तिला विशिष्ट वास असतो. कार्बनी विद्रावकात ती पूर्णपणे विरघळते. राळेचा विद्राव वाळल्यावर सर्वत्र सारखा असा पापुद्रा निर्माण होतो. राळ ८० से. तापमानास काहीशा काटेकोरपणे वितळते. राळे मध्ये ९०% किंवा अधिक इतके ॲबिएटिक अम्ल व त्याचे समघटक (तेच घटक असलेली पण भिन्न संरचना असलेली संयुगे) असतात. राहिलेला भाग रेझेन्स व ॲबिएटिक अम्लाची जटिल एस्टरे यांचा असतो. 


राळेपासून सोडियम रोझिनेट, लेड रोझिनेट, मँगॅनीज रोझिनेट, कॅल्शियम रोझिनेट इ. लवणे बनतात. त्यांचा उपयोग पायसीकारके [स्थिर पायस बनविणारे पदार्थ ⟶पायस] लेपके व शुष्कके म्हणून केला जातो. राळेपासून एस्टरेही बनतात. मिथिल व एथिल ॲबिएट यांचा उपयोग ⇨प्लॅस्टिकीकारके म्हणून होतो. एथिलीन ग्लायकॉलपासून मिळणारे एस्टर ही प्लॅस्टिकीकारक तसेच आसंजक (चिकटविणारा पदार्थ) म्हणून उपयोगी पडते. ग्लिसरिनापासून मिळणारे एस्टर (एस्टर गम) व्हार्निशांमध्ये वापरले जाते.

मॅलेइक ॲनहायड्राइडाबरोबर राळेची विक्रिया होते. फॉर्माल्डिहाइड व फिनॉल किंवा प्रतिष्ठापित फिनॉले [⟶ फिनॉले] यांच्या विक्रियांनी बनणाऱ्या कमी रेणूभाराच्या रेसॉलांचा वितळलेल्या राळेशी संयोग होतो आणि राळेने रूपांतरित झालेली रेझिने मिळतात. टुंग तेलाच्या व्हार्निशात त्यांचा उपयोग होतो. 

राळ सर्व कार्बनी विद्रावकांत पूर्णपणे विरघळते. तिचे अम्लमूल्य व आयोडीन मूल्य ही उच्च आहेत. ॲसिटिक ॲनहायड्राइडात विरघळलेल्या राळेच्या विद्रावात सल्फ्युरिक अम्लाचा थेंब टाकल्यास जांभळा रंग येतो. 

राळ हे सर्वांत स्वस्त रेझीन असल्यामुळे ते इतर रेझिनांबरोबर भेसळ करण्यास वापरले जाते. 

कोपल रेझिने: ही उष्ण कटिबंधातील तसेच उपोष्ण कटिबंधातील वनस्पतींपासून त्याचप्रमाणे निक्षेपांपासून मिळतात. वाळूचा फवारा उडवून ती स्वस्छ करतात आणि आकार व रंग यांना अनुसरून त्याची प्रतवारी लावतात. व्हार्निश बनविण्यासाठी वापरले जाणारे हे एक प्रमुख रेझीन आहे. अंगोला कोपल हे तांबड्या वपांढऱ्या रंगाचे असते.झांझिबार कोपल हे रेझीन अंबर रेझिनांच्या खालोखाल सर्वांत कठीण आहे.

चूर्ण केलेले रेझीन सु. १४० से. तापमानास तापविलेल्या रूळातून जाऊन दिले म्हणजे मऊ बनते व त्याचे तक्ते बनविता येतात. असे रेझिन ब्युटेनॉल इ.अल्कोहॉलात विरघळते. धातवीय ऑक्साइडांबरोबर संयोग पावून त्याचे साबण बनतात. वितळेपर्यंत तापवून वितळलेल्या स्थितीत काही काळ राहू दिल्यास ते शुष्कन तेलात विद्राव्य बनते. (विरघळते). ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर व नियंत्रण ठेवून केली जाते. या रेझिनाने एस्टरीकरणही केले जाते. 

डामर रेझिने: ही रेझिने मृदू असून ती डांबरापासून मिळणारी हायड्रोकार्बने, टर्पेटाइन व पेट्रोलियम हायड्रोकार्बने यांत विद्राव्य पण अल्कोहॉलात अविद्राव्य असतात. हे स्वच्छ फिकट पिवळ्या रंगाच्या मण्यांसारखे असून १४० से. तापमानाला वितळते. इतर रंगांचे प्रकार मलेशिया व ईस्ट इंडीज येथील अँगॅथीस आल्बा या झाडापासून मिळतात. यांचा उपयोग मुख्यतः स्पिरिट व्हार्निश करण्यासाठी होतो.  

पूर्वी वापरण्यात असलेल्या अनेक रेझिनांपैकी ॲकरॉइडे ,सँडरॅक व मॅस्टिक हीच आधुनिक काळात महत्वाची ठरली आहेत. 

ॲकरॉइड रेझिने : ही ऑस्ट्रेलियातील अनेक जातीच्या झाडांपासून मिळतात. यांचा उपयोग अनेक पिवळ्या व तांबड्या स्पिरिट व्हार्निशियांत व धातुपृष्ठांसाठी वापरण्याच्या लॅकरांमध्ये, त्याचप्रमाणे लाखेबरोबर वारण्यासाठीही केला जातो. 

सँडरॅक : ऑस्ट्रेलिया, उत्तर आफ्रिका व उत्तर अमेरिका या प्रदेशांतील सायप्रस पाइन (कॅलिट्रिस) या वृक्षापासून हे रेझीन मिळते. हे १५० से. तापमानाला वितळते.  

अल्कोहॉले, टर्पेटाइन व काही एस्टरे यांत हे विऱघळते. वस्तुसंग्रहालयातील वस्तूंसाठी तसेच चामड्याच्या वस्तूंना चकाकी येण्यासाठी हे वापरले जाते. कागदावर थर देण्यासाठीही ते वापरतात. 

मॅस्टिक : (रूमा मस्तकी). भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याजवळील प्रदेशातील पिस्टाशिया लेंटिस्कस या लहान वृक्षापासून हे मिळते. हे १०५ से. तापमानाला वितळते . ते फिकट पिवळ्या रंगाचे व किंचीत हिरवट छटा असलेल्या सु. १.२ सेंमी लांबीच्या तुकड्यांच्या रूपात आढळते. ते अल्कोहॉल, ॲसिटोन, टर्पेटाइन, व ॲरोमॅटिक हायड्रोकार्बने यांत विरघळते. याचा विद्राव उडून गेल्यावर बनलेला पातळ पापुद्रा जलाभेद्य असतो म्हणून चित्रांच्या पृष्ठभागावर याचे व्हार्निश लावता येते [⟶ रूमा मस्तकी]. 

ड्रॅगन्स ब्लड : डिमोनॉरॉप्स ड्रॅको या झाडाच्या फळांतून हे स्त्रावरूपाने बाहेर पडते. वरून ते काळसर पिंगट रंगाचे दिसते पण याचे पातळ तुकडे पारदर्शक व तपकिरी रंगाचे असतात. ते सु. १२० से. तापमानास वितळते. व जास्त तापविल्यास त्यातून बेंझॉइक अम्ल बाहेर पडते. स्पिरिट व्हार्निशांना गडद लाल रंग येण्यासाठी ते वापरीत असत पण अलीकडे याच्या जागी संश्लेषित रंग वापरतात. 

एलेमी : कॅनॅरियम कॉम्यून या फिलिपीन्स बेटांतील झाडापासून मिळणारे हे ओलिओरेझीन आहे. ते काळसर पांढऱ्या रंगाचे व अर्धघन असून त्याला विशिष्ट वास असतो. तापविल्यास ते ७५ ते ८० से. तापमानास मऊ होते व १२० से. तापमानास द्रवरूप होते. ते अल्कोहॉल आणि इतर कार्बनी विद्रावकांत विरघळते. स्पिरिट व्हार्निशांमध्ये ते प्लॅस्टिकीकारक किंवा मृदूकारक म्हणून वापरतात. 

कॅनडा बाल्सम : कॅनडामधील ⇨बाल्सम फर (ॲबीस वाल्समिया) या वृक्षाचे हे ओलिओरेझीन आहे. याचा प्रणमनांक (निर्वातातील प्रकाशाचा वेग आणि दिलेल्या माध्यामातील प्रकाशाचा वेग यांचे गुणोत्तर) काचेच्या प्रगमनांइतकाच असल्यामुळे भिंगे एकमेकांस चिकटविण्यासाठी ते उपयोगी पडते. [⟶ बाल्सम].  

 

कृत्रिम किंवा संश्लेषित रेझिने : या संज्ञेचा अर्थ नैसर्गिक रेझिनांची मानवनिर्मित प्रतिकृती असा नसून, गुणधर्मात नैसर्गिक रेझिनांशी साम्य असलेले रासायनिक विक्रियांनी बनविलेले पदार्थ असा आहे त्यांच्या संरचनात व नैसर्गिक रेझिनांच्या संरचनात साम्य असो अथवा नसो.

उष्णतेने होणाऱ्या अंतिम परिणामानुसार संश्लेषित रेझिनांचे उष्णामृदू व उष्णादृढ असे दोन प्रकार होतात. संश्लेषित रेझिनांच्या विविध प्रकारांचे वर्णन प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके या नोंदीत दिलेले आहे. 

उपयोग : संश्लेषित रेझिनांचा उपयोग अनेक प्रकारे होतेा. फिनॉल फॉर्माल्डिहाइड, यूरिया फॉर्माल्डिहाइड, अल्किड, पॉलिएस्टर, पॉलियूरेधेन इ. रेझिनांचा उपयोग वस्तूंना संरक्षक आणि सुशोभित लेपन करण्यासाठी केला जातो. 


लाकडाचे पातळ तक्ते एकमेकांना चिकटवून प्लायवूड हा लाकूड- प्रकार बनविला जातो. त्यासाठी नैसर्गिक आसंजक वापरून तयार केलेले प्लायवूड पाण्याच्या संपर्कात टिकत नाही परंतु यूरीया फॉर्माल्डिहाइड, फिनॉल फॉर्माल्डिहाइड इ. संश्लेषित रेझिने वापरलेले प्लायवूड पाणी, कवके (हरितद्रव्यरहित बुरशीसारख्या वनस्पती), बुरशी इत्यादींना रोधक असते. या रेझिनांच्या विद्रावात बुडवून काढलेले लाकूडही कठीण, बळकट व जलरोधी बनते. 

धातू, प्लॅस्टिके, काच, रबर, कागद, कापड, विटा, लाकूड यांसाठीही संश्लेषित रेझिने आसंजके म्हणून उपयोगी पडतात. 

सुती, तसेच रेयॉनाचे कापड धुतल्यावर आटते तसेच त्याला लवकर सुरकुत्या पडतात. काही संश्लेषिक रेझिनांचे संस्कार केल्याने हे दोष दूर होतात. रंग कापडास चांगला बसावा म्हणून त्याचप्रमाणे कापड जलरोधी व अग्निरोधी व्हावे यासाठीही काही संश्लेषित रेझिने वापरली जातात. [⟶ कापडावरील अंतिम संस्करण]. 

विद्युत् संवाहक तारांपासून धोका उद्भवू नये म्हणून त्या प्रवाहनिरोधक बनविण्यासाठी त्यांवर सुती किंवा रेशमी फीत गुंडाळलेली असते. आर्द्र हवेत ती पाणी शोषून घेऊ शकते व त्यामुळे तिची विद्युत् निरोधकता नाहीशी होण्याचा संभव असतो. तो टळावा म्हणून तीवर संश्लेषित रेझिनाचा पातळ थर देतात. 

कार्बॉक्सी व सल्फॉनिक [–S(:O)2OH] गटांचा अंतर्भाव त्रिमितीय बहुवारिकात केला, तर आयनी रेझिने तयार होतात. अशा रेझिनांची सोडियम लवणे अफेनद (ज्यात साबणाचा फेस सुलभपणे होत नाही असे) पाणी फेनद करण्यासाठी वापरतात. याचे कारण अशा पाण्यात असलेल्या कॅल्शियम अणूंची जागा रेझिनातील सोडियम अणू घेतात व त्यामुळे पाण्याची अफेनदता जाते. ही रेझिने ऋणायनी आयन -विनिमयक रेझिने ओळखली जातात. त्यांचे कार्य नैसर्गिक झिओलाइटासारखे असते. [⟶ झिओलाइट गट]. 

रेझिनाच्या रेणूमध्ये ॲप्रिनो (–NH2) व ग्वानिडो [H2NC (:NH) NH–] गट अंतर्भूत असले म्हणजे धनायनी रेझिने तयार होतात. धनायनी व ऋणायनी रेझिनांमुळे प्रथम पाण्यातील लवणे अम्लीय बनतात व नंतर क्षारकीय लवणांबरोबर त्यांची विक्रिया होऊन ती लवणे नाहीशी होतात. रेझिने लवणसंपृक्त (लवणाचे जास्तीतजास्त प्रमाण असलेली) झाली, तर ती सक्रियित करून (क्रियाशील करवून) रेझीन स्वरूपात परत आणता येतात व वापरता येतात. 

ही रेझिने पाण्यातील अशुद्ध द्रव्ये वेगळी करण्यासाठी व औषधे, रंजकद्रव्ये, एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारी प्रथिने), पायसे, ग्यायकॉले इत्यादींच्या निर्मितीत वापरली जातात. मूल्यवान धातू व रसायने परत मिळविण्यासाठीही त्यांचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे बिअर निर्मिती, छिद्रणक्रिया इ. क्रियांमध्ये आणि कागदाला घड्या पडू नयेत म्हणूनही त्यांचा वापर करण्यात येतो. [⟶ आयन -विनिमय] . 

विद्युत् संवाहक रेझिने : ⇨अर्धसंवाहक (निरोधक व संवाहक यांच्या दरम्यान ज्यांची विद्युत् संवाहकता आहे अशा) कार्बनी घन पदार्थांचे दोन गट आहेत. (१) रेणवीय स्फटिक व (२) बहुवारीक. ⇨अँथ्रॅसीन हे पहिल्या गटाचे एक उत्तम उदाहरण आहे. याचा अर्धसंवाहक या दृष्टीने अभ्यास करण्यात येत आहे.दुसऱ्या प्रकाराचा विस्तारपूर्वक अभ्यास अद्याप करण्यात आलेला नाही.  

पहा : अंबर–२ प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके बहुवारिकीकरण, लाख –१ व्हर्निश. 

संदर्भ : 1. American Gum Importers Associations, Natural Resins Handbook, New York, 1939.

           2. Couzens E. G., Yarsley V. E. Plastics in Modern World, 1968.

          3. Ellis C. The Chemistry of Syntheic Resins, New York, 1985.

        4. Fjeser L. P. Fieser M, Oragnic Chemistry, New York, 1962. 5. Flory P. I. Principles of Polymer Chemistry, Oxford, 1953.

        6. Golding B. Polymers and Resins : Their Chemistry and Chemical Engineering, Princeton, 1959.

      7. Kaufman, M. Glant Molecules, 1969. 8. Whister R. L. Ed. Industrial Gums, New York, 1959.

दांडेगावकर, सा. ह. (इं.) मिठारी, भू. चिं. (म) केळकर, गो. रा.