प्रतिरूप मुद्रण : या मुद्रण तंत्राचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ज्या पत्र्याच्या साह्याने हे मुद्रण केले जाते त्यावरील मुद्रणप्रतिमा व बिन प्रतिमा यांच्या सपाटीमध्ये किंवा पातळीमध्ये दृश्य फरक जवळजवळ नसतो. असा दृश्य फरक अक्षरदाब मुद्रण किंवा उत्कीर्ण मुद्रण यांमध्ये असतो. मात्र मुद्रणप्रतिमेवर शाई आकृष्ट होते आणि बिनप्रतिमेवर प्रथम पाणी आणि तेलकट शाई एकमेकांपासून दूर रहातात या तत्त्वाचा उपयोग शिलामुद्रणाच्या वेळी दगडावर केला जातो. त्याच तत्त्वाचा उपयोग प्रतिरूप मुद्रणाच्या पत्र्याच्या बाबतीतही होतो पत्र्यावर जेव्हा मुद्रणप्रतिमा तयार केली जाते त्या वेळी मुद्रणप्रतिमेने शाई व बिनप्रतिमेने पाणी आकृष्ट करावे अशा प्रकारे पत्रा तयार केला जातो.

दुसरे वैशिष्ट्य म्हणजे मुद्रणप्रतिमेवरून कागदावर सरळ शाई छापली जात नाही. पत्र्यावरून ही शाई प्रथम एका रबराच्या थरावर स्थानांतरित होते आणि त्यावर कागद दाबला जातो व छपाई होते. त्यासाठी ही मुद्रणप्रतिमा पत्र्यावर सरळ वाचता येईल अशी असते. नंतर ती रबरी थरावर कागद दाबल्यावर मुद्रणप्रतिमा पुन्हा सुलट छापली जाऊन वाचता येत. प्रत्येक कागद छापताना याच पद्धतीने छापला जातो. शाईचे् स्थानांतर अशा पद्धतीने दोन वेळा होते.

प्रतिरूप मुद्रण यंत्रामध्ये मुख्यत : तीन दंडगोलाचा उपयोग केला जातो. कागद यंत्रात सोडणे किंवा नंतर तो जमा करणे, शाई लावणे, पाणी लावणे वगैरे सर्व क्रिया आनुषंगिक आहेत. पत्रा बसविण्यासाठी एक दंडगोल, रबरी थर बसविण्यासाठी दुसरा दंडगोल व कागद रबरावर दाबण्यासाठी तिसरा दंडगोल असे तीन दंडगोल व कागद रबरावर दाबवण्यासाठी तिसरा दंडगोल असे तीन दंडगोल छपाई करण्यासाठी लागतात. या यंत्रावर सुटे कागद किंवा कागदाची रिळे या दोन्हींचा उपयोग करता येतो. मात्र यंत्राची रचना कुठल्याही एका प्रकारासाठी केलेली असते.

पहिल्या दंडगोलावर पत्रा पक्का बसवून दोन्ही बाजूंना ताणून धरण्याची सोय असते. हा पत्रा दंडगोलाच्या पृष्ठावर एका खोलगट खाचेत बसला जातो. याच दंडगोलाला लागून पत्र्यावर पाणी लागण्यासाठी रूळ बसवलेले असतात. या रूळांना यांत्रिक रीतीने पाणी पुरवले जाते व ते पत्र्यावर पसरले जाते. त्याचप्रमाणे पत्र्यावर शाई पसरण्यासाठीही बऱ्याच रूळांची योजना असते. प्रत्यक्षात तीन किंवा चार रूळ पत्र्यावर शाई लावतात. काही रूळ धातूचे असतात व काही रूळ रबर किंवा गंधकाची क्रिया केलेल्या तेलाचे केलेले असतात. हे रूळ शाई रगडून ती सर्व ठिकाणी सारखी पसरतात व नंतर ती शाई पत्र्यावर एकसारखी लागते.


त्याआधी पत्र्यावर पाणी लावण्याची यंत्रणा काम करते. याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. एका पद्धतीमध्ये कापडी आवरण असलेले रूळ पत्र्यावर पाण्याची ठरावीक राशी नियमितपणे पसरतात. दुसऱ्या पद्धतीमध्ये पाण्याचा सूक्ष्म फवारा पत्र्यावर मारून नंतर त्यावर हवेचा नियंत्रित झोत सोडून पाण्याचा अंश हवा असेल तेवढा ठेवला जातो.

दुसऱ्या दंडगोलावर एक रबरी आवरण ताणून बसवलेले असते. त्यावरील ताणही नियंत्रित केला जातो. हे रबरी आवरण कापड व रबर यांचे चार किंवा सहा थर एकाआड एक असे ठेवून तयार केलेले असते. अलीकडे प्लॅस्टिक किंवा तत्सम पदार्थ वापरून तीन-चार थर दाबून आवरण तयार केले जाते. या आवरणाचे बरेच प्रकार आता उपलब्ध झाले आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे पत्र्यावरून या थरावर जी शाई स्थानांतरित होते ती कागदावर पूर्णपणे छापली जातो. साधारणपणे अशी ९५% शाई कागदावर छापली जाते. या आवरणावर कागद किती प्रमाणात दाबावयाचा ते कागदच्या जाडीवरही अवलंबून असते. शिवाय या कागदाचा प्रकार कोणचा असेल त्यावरही दाब अवलंबून असतो. मुद्रणाची क्रिया चालू असताना हा रबरी दंडगोल यांवरील खाचा प्रत्येक फेरीमध्ये तंतोतंत जुळतील अशी व्यवस्था केलेली असते.

सुटे कागद ज्या यंत्रावर लावता येतात त्या यंत्रावर कागद यांत्रिकरीत्या पकडला जातो व तो कागद रबरी थरावर दाबला जातो. प्रत्येक कागद छापताना ही क्रिया अतिशय अचूकपणे केली जाते व जेथे बहुरंगी मुद्रण असेल तेथे प्रत्येक रंग एकमेकांवर बरोबर छापणे फार आवश्यक असल्याने ही सर्व क्रिया यांत्रिक रीतीनेच करावी लागते. मात्र कागदाचे रीळ ज्या यंत्रावर छारले जाते तेथे याबाबतीत फारशी अडचण येत नाही व रिळांवर एका मागोमाग चार रंग छापणे आवश्यक असल्याने कागदाच्या आकारमानात फरक न पडता हे मुद्रण जास्त अचूक होते. जर एका वेळी एक रंग छापणारे यंत्र असेल, तर पहिला रंग छापल्यानंतर कागदामध्ये जो पाण्याचा अंश शोषला जातो त्यामुळे कागद किंचित वाढतो, कागद वाढल्यामुळे पहिल्या रंगावर दुसरा रंग अचूकपणे छापला जात नाही व रंग पसल्यासारखे दिसतात. जर सुटे कागद छापणारे यंत्र चार रंग एकामागोमाग छापू शकत असेल, तर एका कागदावर चारही रंग एक मिनिटाच्या आत छापले जात असल्याने कागद वाढायला वेळ नसतो व त्याच्या आत चारही रंग छापून पूर्ण होतात. कागद वाढण्याची अडचण फक्त या प्रतिरूप मुद्रणाच्या संदर्भातच येते कारण मुद्रणप्रतिमेच्या पत्र्यावर पाण्याचा वापर अपरिहार्य असतो (शुल्क प्रतिरूप मुद्रणामध्ये पाणी वापरावे लागत नाही).

सुटे कागद छापताना यंत्रामधील तीनही दंडगोल अशा त-हेने फिरतात की, प्रथम पत्र्यावरील प्रतिमा रबरी आवरणावर स्थानांतरित होते त्यानंतर त्या आवरणावर कागद दाबला जातो. हे सर्व दंडगोल एकाच वेगाने अचूकपणे फिरत असल्याने या सर्व क्रिया यांत्रिकपणे आपोआप व एका क्रमाने घडत जातात. हे दंडगोल सामान्यतः एकमेकांना लागून बसविलेले असतात व त्यांचे व्यास समान असतात. पुष्कळ मोठ्या आकारमानाचे कागद (९० सेंमी. X ११५ सेंमी. किंवा आणखी मोठ्या आकारमानाचे) प्रतिरूप मुद्रण यंत्रावर छापता येतात व जास्तीतजास्त ताशी १०,००० कागद छापण्याची क्षमता अशा यंत्रामध्ये असते.

काही प्रतिरूप मुद्रण यंत्रे एका वेळी दोन रंग छापू शकतात. अशा काही यंत्रांवर कागद रबरी आवरणावर दाबणारा जो दंडगोल असतो तो एकच असतो व तो दंडगोल दोन्ही रबरी आवरणांवर एकामागोमाग एकच दाबून दोन रंगांची छपाई करतो. सुटे कागद छापणाऱ्या बहुरंगी यंत्रामध्ये प्रत्येक रंग छापण्यासाठी तीन दंडगोलांचा एक घटक अशा पद्धतीने चार घटक ओळीने जोडलेले असतात किंवा दोन रंग प्रथम छापून नंतर कागद पुढे जाऊन पुढील दोन रंग छापले जातात. असे दोन रंगांचे दोन घटक एकापुढे एक असतात. ही सर्व योजना यांत्रिक रीतीने केलेली असते व सर्व घटक एकमेकांशी अचूकपणे जोडलेले असतात म्हणून सर्व रंग एकमेकांवर छापणे शक्य होते.

काही यंत्रे कागदाच्या दोन्ही बाजूंवर एकाच वेळी छपाई करण्यासाठी तयार केलेली असतात. अशा यंत्रांचा उपयोग वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके किंवा साप्ताहिके छापण्यासाठी चांगला होतो. दोन पत्र्यांवरन प्रथम मुद्रणप्रतिमा दोन दंडगोलांवरील रबरी आवरणांवर स्थानांतरीत होते. रबरी आवरणांचे हे दोन्ही दंडगोल एकमेकांशेजारी असे बसलेले असतात की, त्या दोन्ही आवरणांमधून कागद गेला की, दोन्ही आवरणांमध्ये तो जोरात दाबला जाऊन दोन्ही बाजू छपल्या जातात. असे चार घटक जर एकामागोमाग बसवले, तर कागदाच्या दोन्ही बाजूंवर प्रत्येकी चार रंग छापले जातात. या यंत्रामध्ये कागद दाबणारा दंडगोल लागत नाही कारण दोन रबरी आवरणाचे दंडगोलच एकमेकांवर कागद दाबतात. काही यंत्रे वेगवेगळ्या पद्धतीनी तयार केली जातात. उदा., कागदाच्या एका बाजूवर तीन रंग व दोन्ही बाजूंवर फक्त काळा रंग छापूनही छपाई पूर्ण करता येते.

कागदाचे रीळ छापणारी प्रतिरूप मुद्रण यंत्रे साधारणपणे सुटे कागद छापणाऱ्या यंत्रणाप्रमाणेच असतात पण त्यांमध्ये दोन फरक असतात. पहिला म्हणजे ज्या दंडगोलावर पत्रा बसवला जातो त्यावरील पत्रा पकडण्यासाठी जी योजना असते ती अगदी लहान जागेत सामावलेली असते. दुसरा म्हणजे दाब देण्याच्या दंडगोलावर सर्व सपाट पृष्टभाग असतो कारण या ठिकाणी कागद पकडण्याची आवश्यकता नसते व फक्त कागद आववरणावर दाबण्याची गरज असते.

प्रतिरूप मुद्रणाची अखंड किंवा चक्रीय गती यंत्रे बहुधा बहुरंगी छपाई करण्यासाठी तयार केलेली असतात. कागगाच्या एका किंवा दोन्ही बाजूंना छपाई करता येते. दोन्ही बाजूंवर छपाई होते तेथे रबराच्या आवरणाचे दंडगोल एकमेकांवर दाब देऊन दोन्ही बाजूंवर छपाई करतात. अशा चक्रीय गती यंत्रावर दोन्ही बाजू एकाच वेळी छापल्याने यंत्र कमी खर्चात तयार करता येते.

काही यंत्रे एका मोठ्या दंडगोलाच्या आधारावर सर्व रंग (चार, पाच किंवा सहा) छापतात. हा दंडगोल मध्यभागी व त्याला टेकून सर्व रंगांचे रबरी आवरणाचे दंडगोल असतात. प्रत्येक रंगासाठी पत्रा बसवलेला दंडगोल स्वतंत्र व त्याला सागून रबराचे आवरण असलेला दंडगोल असतो. मात्र मोठ्या आकारमानाचा मधील दंडगोल एक कागद सर्व रंगांच्या मुद्रणासाठी प्रत्येक रबरी आवरणाच्या दंडगोलावर दाबून रंगांची छपाई करतो. मात्र ही छपाई कागदाच्या एकाच बाजूवर होते. अशा यंत्राला उपग्रही चक्रीय गती (सॅटेलाइट रोटरी) यंत्र म्हणतात. यावर रंग एकामागून एक छापले जात असल्याने ते लवकर वाळणे आवश्यक असते. त्यासाठी कागदाचे रीळ गरम हवेमधून पुढे नेण्याची व्यवस्था केलेली असते. त्यानंतर पुन्हा कागद थंड करण्यासाठी थंड केलेल्या दंडगोलावरून किंवा लहान रूळांवरून पुढे कागद नेऊन ठराविक आकारमानात ते कापण्याची यांत्रिक व्यवस्था असते.

चक्रीय गती साधारणपणे तासाला १५ ते २० हजार प्रतींची छपाई करू शकतात आणि कागद कापून व घड्या घालून पुढील क्रिया करण्याची व्यवस्थाही या यंत्रामध्ये असते.


प्रतिरूप मुद्रणासाठी पत्रे तयार करण्याच्या पद्धती : प्रतिरूप मुद्रण तंत्रामध्ये मुद्रणासाठी जो पत्रा तयार करावा लागतो त्यावर मुद्रणप्रतिमा व विमप्रतिमा असे दोन्ही भाग एकाच पत्र्याच्या पृष्ठावर तयार केले जातात आणि त्यावर शाई व पाणी ही दोन्ही एकमेकांपासून दूर राहतील अशी व्यवस्था केलेली असते. अक्षरदाब मुद्रणाच्या पद्धतीत चित्रे छापताना प्रतिमा जशी बिंदूच्या सहाय्याने तयार होते. तशीच प्रतिमा प्रतिरूप मुद्रणामध्येही बिंदूंची बनलेली असते. चित्राचा ठसा करताना मधाल जागा (बिनप्रतिमा) रसायनाने कोरली जाते पण येथे तशी आवश्यकता नसते.

प्रतिरूप मुद्रणासाठी पत्रे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अस्तित्त्वाची आहेत. मुद्रण किती करावयाचे हे ठरल्यानंतर त्यासाठी कोणती पद्धत वापरावयाची हे ठरविले जाते. या मुद्रण तंत्राच्या सुरूवातीच्या काळात जस्ताचे पत्रे वापरले जातात. या दोन्ही धातूंमध्ये जलस्नेहता (पाणी आकर्षून घेण्याचा गुणधर्म) असल्याने मुद्रणाच्या वेळी पाणी आकर्षून घेण्याला अडचण येत नाही. या धातूंचे पत्रे जास्त सच्छिद्र करून घेतले जतात कारण त्यामुळे त्यांवर पाणी पसरणे सोपे जाते. त्यासाठी पत्र्यावर रासायनिक क्रिया केलेली असते. अशा पत्र्याच्या पृष्ठावर प्रकाशसंवेदी रसायनाचा थर पसरला जातो व तो वाळल्यावर त्या पृष्ठावर मुद्रणप्रतिमेची व्यस्त प्रत ठेवून त्यावर प्रकाशक्रिया केली जाते. व्यस्त प्रतीमध्ये अक्षरे किंवा बिंदूंच्या साहाय्याने तयार केलेली चित्रे या दोन्हींचा सामावेश असू शकतो. या प्रकाशक्रियेमुळे खालील थराचा मुद्रणप्रतिमेचा भाग कडक होतो. नंतर पत्र्याच्या विकाशनाच्या वेळी बिनप्रतिमेचा भाग धुऊन विरघळून जातो आणि खालील पत्रा दिसू लागतो. या बिनप्रतिमेच्या भागाचे असंवेदीकरण रसायनांच्या साहाय्याने केले जाते व त्यामुळे त्या भागावर शाई लागत नाही.

उत्कीर्ण पद्धतीचे पत्रे सम प्रतीच्या साहाय्याने केले जातात. त्यासाठीही जस्त अथवा अँल्युमिनियमचे पत्रे वापरले जातात. त्यामध्ये प्रकाशसंवेदी थर तयार करण्यासाठी डिंकाच्या विद्रावाचा किंवा पॉलिव्हिनिल अल्कोहोलाचा उपयोग कलिल म्हणून केला जातो. प्रकाशसंवेदी थरावर सम प्रत ठेवून त्यातून प्रकाशक्रिया केली म्हणजे बिनप्रतिमेचा थराचा भाग कडक होतो व उरलेला प्रतिमेचा भाग विकाशनाच्या वेळी विरघळून जातो. नंतर पत्र्यावर अम्लकोरण केले जाते. त्यामुळे मुद्रणप्रतिमेचा भाग किंचित किंचित खोलगट जातो. त्यावर शाई आकर्षित करणाऱ्या रोगणाचा (लॅकराचा) पातळ थर लावला जातो व नंतर त्यावर शाई लावली जाते. सर्वांत शेवटी कडक झालेले बिनप्रतिमेचे निकृंत (स्टेन्सील) रासायनिक क्रियेने विरघळून व थोडेसे घासून काढून टाकले जाते. हा पत्रा त्याच्या खोलगट मुद्रणप्रतिमेमुळे अडीच लाख प्रतींचे मुद्रण करू शकतो.

काही पत्रे पूर्वसंवेदीकरण पद्धतीचे असतात. त्यासाठी अँल्युमिनीयमचा उपयोग केला जातो. या पत्र्यांवरील प्रकाशसंवेदी थराचे आयुष्य (त्यावर प्रकाश न पडल्यास) सु. सहा महिने असते.

असे पत्रे विकत घेतानाच प्रकाशसंवेदी केलेले असतात व त्यामुळे पत्रा पेटीतून काढून त्यावर सम प्रत किंवा व्यस्त प्रत ठेवून त्यावर प्रकाशक्रिया केल्यावर रासायनिक क्रियेनंतर पत्रा तयार होतो. अशा पद्धतीचे काही पत्रे जाड कागद किंवा प्लॅस्टिकवरही तयार करता येतात. मात्र त्यांचा उपयोग कमी प्रती छापण्यासाठी मुख्यतः होतो.

दोन धातूंचे किंवा तीन धातूंचे पत्रेही वापरले जातात. त्यांमध्ये एक धातू जलस्नेही असते व दुसरी शाई आकर्षित करणारी असते (जलस्नेही-अँल्युमिनियम, अगंज पोलाद, क्रोमियम किंवा निकेल. शाई आकर्षित करणाऱ्या-तांबे, कासे). एका धातूवर दुसऱ्या धातूचा अगदी पातळ थर दिलेला असतो. वर दिलेला थर जर जलस्नेही असला, तर मजकुर व चित्रे यांच्या सम प्रतीचा उपयोग करून मुद्रणप्रतिमा कोरली जाते व त्या भागावर शाई लागते. वरचा थर जर जलस्नेही नसेल, तर व्यस्त प्रतीचा उपयोग करून मुद्रणप्रतिमाकोरली जाते. वेगवेगळ्या दोन धातूंचा उपयोग करताना तांब्यावर क्रोमियमाचा किंवा काशावर निकेलाचा उपयोग केला जातो व सम प्रतीचा उपयोग पत्रा करताना केला जातो. दुसऱ्या प्रकारात अगंज पोलादावर किंवा अँल्युमिनियमावर तांब्याचा थर देऊन त्यावर व्यस्त प्रतीचा उपयोग करून पत्रा करताना केला जातो. आणखी एका प्रकारात अगंज पोलाद किंवा जस्त या धातूंच्या पत्र्यावर आणखी दोन धातूंचा थर दिला जातो व वर वर्णन केल्याप्रमाणे पत्रा तयार करून वापरला जातो. दोन व तीन धातूंचे पत्रे चांगले टिकतात व सु. पाच लाख प्रतींपर्यंत मुद्रण करू शकतात.

वर वर्णन केलेल्या पत्रे करण्याच्या पद्धतींव्यतिरिक्त अलीकडे आणखी काही नवीन पद्धती प्रचारात आल्या आहेत. त्यामुळे पत्रा करण्यामध्ये जास्त सोपेपणा आला आहे व पत्रा करण्याचा वेळही पुष्कळ कमी झाला आहे. स्थिर विद्युत प्रकारच्या किंवा झेरोग्राफीच्या पद्धतीने पत्रा तयार करताना, अंधारात विद्युत निरोधक असलेल्या सिलिनियम धातूसारख्या विशिष्ट द्रव्यांवर प्रकाश टाकला असता ती विद्युत संवाहक बनतात या तत्त्वाचा उपयोग केला जातो. अंधारात सिलिनियमाच्या पत्र्याला धन विद्युत भार दिला जातो आणि मजकूर व चित्रे यांच्या सम प्रतीच्या साह्याने प्रकाशक्रिया केली जाते. पत्र्यावर जेथे प्रकाश पडतो तो भाग विद्युत संवाहक बनतो व तेथील धन भाराचे अपस्करण (विखुरणे) होते. या पत्र्यावर ऋण भारित झिंक ऑक्साइडाची बारीक पुड पसरली जाते व ती पत्र्यावरील उरलेल्या धन भारित भागाकडे आकर्षित होते. त्यामुळे प्रतिमा दिसू लागते व ती एका अँल्युमिनियमच्या पत्र्यावर स्थानांतरित केली जाते. हा अँल्युमिनियमचा पत्रा सिलिनियमच्या पृष्ठावरच एका विशिष्ट जागी बसवलेला असतो. त्या पत्र्यावर पुन्हा धन भार दिला जातो. त्यामुळे वर उल्लेखिलेली पूड या भागाकडे आकृष्ट होऊन त्या प्रतिमेकडे शाई आकृष्ट होऊ शकते. त्यामुळे प्रतिरूप मुद्रण पद्धतीने या पत्र्यावरून मुद्रण करता येते. या सर्व क्रिया एका लहानशा यंत्रामध्ये स्वयंचलित रीत्या होतात व त्यांना फक्त ३ मिनिटे वेळ लागतो. नंतर प्रतिरूप मुद्रण यंत्रावर या पत्र्याने छपाई होते. झेरोग्राफीचे पत्रे फक्त लहान यंत्रावर मुद्रण करण्यासाठी वापरातात.

आणखी एका प्रकारच्या पत्र्यावर बहुवारिकाचा थर दिलेला असतो. या थरावर प्रकाशाचा परिणाम होत नाही पण उष्णतेचा होतो. उष्णतेमुळे या थारचा भाग जलस्नेही होतो. ज्या भागावर उष्णता लागत नाही तो भाग शाई आकृष्ट करतो. त्यामुळे त्या भागावर छपाई होऊ शकते. हा पत्रा प्रतिरूप मुद्रणासाठी वापरता येतो व त्यावर इतर कुठल्याही रासायनिक क्रियेची गरज लागत नाही.

प्रतिरूप मुद्रणामध्ये अक्षरांचे मुद्रण अक्षरदाब मुद्रण पद्धतीच्या अक्षरांपेक्षा कमी रेखीव व कमी तीव्र होते. मात्र काही खास प्रतीच्या कागदावर दोन्ही प्रकारचे मुद्रण सारख्याच रेखीवपणाने होते. रंगीत किंवा काळ्या रंगातील चित्रांचे मुद्रण कागदाच्या गुणवत्तेवरच अवलंबून असते.


मुद्रणाचे इतर काही प्रकार : अक्षर-साचा : या मुद्रणाच्या प्रकाराला अप्रत्यक्ष अक्षरदाब किंवा शुष्क प्रतिरूप मुद्रण व प्रतिरूप मुद्रण यांचे संयोगीकरण करण्यात आलेले आहे. जर नायलॉनच्या पृष्ठावर पार्श्विक प्रत्यावर्तनी (बाजूंची आदलाबदल केलेली) मुद्रणप्रतिमा तयार केली, तर अक्षरदाब मुद्रणाच्या पद्धतीने हा पत्रा वापरता येतो आणि जर ही प्रतिमा प्रतिरूप मुद्रण पद्धतीची सरळ असली, तरी प्रतिरूप मुद्रणाच्या यंत्रावर त्याने मुद्रण करता येते. शुष्क मुद्रणाच्या प्रकारात पाण्याचा उपयोग करावा लागत नाही कारण मुद्रणप्रतिमा उठावाची असल्याने फक्त मुद्रणप्रतिमेवरच शाई लागते व इरत ठिकाणी लागत नाही. त्याला पुन्हा सपाट पत्र्याचे रूप देऊन पुन्हा नवीन मुद्रणप्रतिमा त्यावर तयार करावी लागते. असा पत्रा दंडगोलावर आवेष्टक पद्धतीने बसवला जातो. शाई लावण्यासाठी मोठ्या व्यासाचे रूळ लावले जातात म्हणजे शाई फक्त मुद्रणपृष्ठावरच लागते. मुद्रणप्रतिमा प्रथम स्थानांतरित होऊन एका रबराच्या पृष्ठावर उलटी होऊन नंतर पुन्हा कागदावर दाबून छापली जाते. यातील प्रतिमेचे स्थानांतर अतिशय हलक्या दाबाने करणे आवश्यक असते. कागदाचे आकारमान व मुद्रणाचा दर्जा प्रतिरूप व अक्षर-साचा या दोन्ही पद्धतींमध्ये सारखाच असतो.

जाळीमुद्रण : या प्रकारच्या मुद्रणामध्ये एका जाळीच्या कापडामधून शाई दाबून वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठांवर मुद्रण करता येते. जाळीचा मुद्रणप्रतिमा नसलेला भाग निकृंत तयार करून बंद केला जातो. फक्त मुद्रणप्रतिमेचा जाळीचा भाग मोकळा असतो त्यातून शाई दाबून खाली छापली जाते. मात्र शाईचा थर थोडा जाड असल्याने ती वाळवायला वेळ लागतो.

या मुद्रणासाठी पूर्वी रेशमाच्या कापडाची जाळी वापरली जात असे, अलीकडे कृत्रिम धाग्याची (नायलॉन किंवा टर्गल) जाळी वापरली जाते किंवा धातूच्या तारेची जाळीही वापरता येते. धातूच्या जाळीसाठी फॉस्फर कासे, अगंज पोलाद, निकेल इत्यादींचा उपयोग केला जातो. काही वेळा नायलॉन-तांबे, नायलॉन-कासे अशा संयोगांचा उपयोग करून जाळी तयार केली जाते. निरनिराळ्या जाळ्यांच्या बाबतीत सूक्ष्म छिद्रांची दर चौ. सेंमी. ला असणारी संख्या वेगवेगळी असते. जितकी छिद्रे सूक्ष्म असतात तेवढी छपाई जास्त चांगल्या कागदावर व चांगल्या दर्जाची होते.

जाळीमुद्रणासाठी जाळीच्या कापडावर किंवा नायलॉनसारख्या जाळीवर प्रथम मुद्रणप्रतिमा तयार करावी लागते व ती हाताने तयार करता येते. जे चित्र (किंवा मजकूर) छापावयाचे असेल ते जाळीवर बेंझीनामध्ये विरघळणाऱ्या एका खास शाईने काढले जाते. चित्र काढल्यानंतर संपूर्ण जाळीवर पातळ सरस पसरला जातो. हा सरस वाळून कडक होतो. नंतर बेंझीन वापरून चित्राची शाई विरघळवून काढून टाकली जाते. सरसच्या पृष्ठावर बेंझिनचा परिणाम होत नाही, त्याचे निकृंत तसेच कडक होऊन बिनप्रतिमेचा भाग होऊन राहते. मात्र मुद्रणप्रतिमेच्या भागावर निकृंत नसल्याने तेथे फक्त सूक्ष्म जाळी असते. या जाळीतून शाई खालील कागदावर किंवा तत्सम पृष्ठावर मुद्रित होते. याला एक सोपा मार्ग आहे. एखाद्या पारदर्शक फिल्ममधून किंवा एखाद्या सरस लावलेल्या टणक व जाड कागदातूनही मुद्रणप्रतिमा कापून काढता येते. उरलेली फिल्म किंवा कागद जाळीवर उष्णतेने वा विद्रावकाने (विरघळणाऱ्या पदार्थाने) पक्का चिकटवता येतो व त्याचे निकृंत तयार होते आणि कापलेल्या भागावरती शाई खाली दाबून छपाई होते.

जाळीमुद्रणासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकारच्या प्रकाशऱ्यांत्रिक पद्धती सध्या अस्तित्त्वात आहेत व त्यांचा वापर सध्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्यक्ष पद्धतीच्या प्रकारात जाळीवर एक प्रकाशसंवेदी थर सारखा वाळवला जातो व त्यावर सम प्रत ठेवून तिच्यातून प्रकाशक्रिया केली जाते. छायाचित्रांचा भाग मात्र जालकपटलाच्या साह्याने तयार केला जातो. अप्रत्यक्ष प्रकारच्या प्रकाशयांत्रिक प्रक्रियेत एक खास प्रकाशसंवेदी फिल्मच्या (प्रकाशसंवेदी कार्बन कागदाच्या किंवा पूर्वसंवेदित फिल्मच्या) सम प्रतीतून प्रकाशक्रिया करून मुद्रणप्रतिमा व बिनप्रतिमा यांची क्षेत्रे तयार करतात. ही फिल्म नंतर जाळीवर पक्की जोडतात.

जाळीमुद्रण अजूनही मोठ्या प्रमाणावर हातानेच केले जाते. दरवेळी जाळीची चौकट हाताने उटलून कागद खाली ठेवला जातो व चौकट खाली करून नंतर त्यावर शाई दाबली जाते. अर्धस्वयंचलित किंवा पूर्ण स्वयंचलित यंत्रे आता जाळीमुद्रणासाठी उपलब्ध झाली आहेत. या मुद्रणातील क्रिया ओळीने यांत्रिक रीतीने किंवा संपीडीत हवेच्या साह्याने केल्या जातात. मुद्रणानंतर छापलेला कागद किंवा वस्तू हवेच्या झोताने किंवा उष्णतेने वाळवण्याची सोय करावी लागते.

जाळीमुद्रणाचा उपयोग पुष्कळ प्रकारच्या पृष्ठांवर करता येतो. काच, पुठ्ठा, लाकूड, प्लॅस्टिक, बाटल्या, कागद अशा अनेक पृष्ठांवर (सरळ किंवा वक्र) या पद्धतीने मुद्रण करता येते. विशेषतः वक्र पृष्ठावर सहज मुद्रण करणारा हा प्रकार जास्त सोईस्कर आहे. स्वयंचलित मुद्रणयंत्रे एक ते सहा हजार प्रती एका तासात काढू शकतात.

कोलोटाइप : या पद्धतीत काचेच्या पृष्ठवर जिलेटीन व अमोनियम बायक्रोमेट यांच्या मिश्रणाचा प्रकाशसंवेदी थर पसरून तो वाळवला जाते व त्यावर व्यस्त प्रतीत जलकपटलाचा उपयोग न करता साधी व्यस्त प्रत वापरली जाते, त्यामुळे प्रतिमा बिंदूची बनलेली नसते. ज्या प्रमाणात व्यस्त प्रतीमधून प्रकाश खाली जातो त्या प्रमाणात थर घट्ट होतो आणि मुद्रणाच्या वेळी शाई व पाणी त्या प्रमाणात आकर्षित करून घेतो. जेथे प्रतिमा जास्त कडक होते तेथे शाई जास्त आकर्षित होते व कमी कडक होते तेथे पाणील जास्त आकर्षित होते. जे तत्त्व शिलामुद्रणासाठी वापरले जाते तेच तत्त्व थोडा फरक करून या मुद्रणामध्ये वापरले गेले आहे. मात्र उत्कीर्ण मुद्रणासाठी उपयोग केलेल्या एका बाबीचा उपयोगही या मुद्रणामध्ये केलेला आहे. ते तत्त्व म्हणजे शाईचे प्रमाण प्रतिमेच्या कडकपणाच्या कमीअधिक प्रमाणावर अवलंबून असते. या मुद्रण पद्धतीमध्ये छायाचित्राची छपाई ही जालकपटलाच्या मदतीशिवाय केली जाते, कारण यातील प्रतिमा बिंदूविरहीत व सलग असते आणि मुळ चित्रात व मुद्रित प्रतिमेमध्ये सर्वात जास्त सामर्थ्य या एकमेव पद्धतीत मिळते.

या पद्धतीच्या मुद्रण यंत्रामध्ये काचेवर तयार केलेली मुद्रणप्रतिमा ठेवलेले एक सपाट पृष्ठ, मुद्रणप्रतिमेवर कागद दाबणारा दंडगोल व मुद्रणप्रचिमेवर शाई लावणारे रूळ एवढे मुख्य भाग असतात. बिनप्रतिमेमध्ये आवश्यक तो पाण्याचा अंश राखला जात असल्याने मुद्रणप्रतिमेवर पाणी पसरण्याची यंत्रणा यात आवश्यक नसते.

या पद्धतीच्या मुद्रणाचा वेग फारच सावकाश आहे. तासाला २०० प्रती जास्तीत जास्त मुद्रित होतात. मुद्रणप्रतिमेचे आयुष्य फारच मर्यादित असून ती फक्त दोन ते पाच हजार प्रती छापू शकते. आतापर्यंत यातील मुद्रणप्रतिमा काचेच्या पृष्ठावर तयार केली जात होती. आता सेलोफोनच्या फिल्मवर प्रकाशसंवेदी थर लावून त्यावर मुद्रणप्रतिमा तयार केली जाते. अक्षरदाब मुद्रणाच्या वेळी जे खिळे वापरले जातात त्याबरोबर त्या खिळ्यांच्याच उंचीइतकी मुद्रणप्रतिमा कोलेटाइपाच्या पद्धतीने करून थोड्याशा प्रतींची छपाई करता येते. एखाद्या पुस्तकात अथवा जाहिरातीसाठी वा इतर कलात्मक उपयोगासाठी दस्तऐवज वा चित्रे, भित्तिपत्रके आणि पारदर्शक चित्रे इत्यादींच्या पुनरूत्पादनासाठी जर एकरंगी किंवा बहुरंगी छायाचित्रांचा उपयोग करायचा असेल व आवृत्ती कमी प्रतींची असेल (साधारण एक ते तीन हजार), तर कोलोटाइपाच्या पद्धतीने छायाचित्रे छापून त्यांचा दर्जा उत्त्म ठेवता येतो.


नम्य मुद्रण : ही मुद्रणपद्धत अक्षरदाब मुद्रणाच्या तत्त्वाप्रमाणे उपयोगात आणली जाते व त्यामुळे उठाव मुद्रणाचाच हा एक प्रकार समजला जातो. या पद्धतीच्या यंत्रांमध्ये मुद्रणप्रतिमा एका रबरी पट्टीवर तयार करून एका दंडगोलावर ही पट्टी ताणून बसविली जाते. या मुद्रणप्रतिमेवर रुळांच्या साह्याने अगदी पातळ शाई लावली जाते व कागदाचे रीळ त्यावर दाबले म्हणजे त्यावर अखंड छपाई होते. कागदाच्या रिळाचा कागद दुसऱ्या एका मोठ्या रबरी रुळाने मुद्रणप्रतिमेवर दाबला जातो. शाई पातळ असल्याने ती चटकन वाळत नाही म्हणून प्रखर दिव्यांच्या साहाय्याने उष्णता निर्माण करून ती वाळवली जाते. सुटे कागद छापण्याची नम्य मुद्रण यंत्रेही अस्तित्वात आहेत, पण जास्त वेगाने छपाई करण्यासाठी मुखत्वे कागदाच्या रिळांचा उपयोग केला जातो व त्या पद्धतीची यंत्रे जास्त वापरली जातात. वर्तमानपत्री छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या चक्रीय गती यंत्रासारखीच ही यंत्रे असतात. या यंत्रांचे आकारमान फक्त लहान आकारमानाच्या रिळांना योग्य असे असते. अनेकरंगी मुद्रणाची सोयही या यंत्रामध्ये असते व जास्तीत जास्त सहा रंग छापता येतात. मुद्रणाचा दर्जा मात्र फारसा चांगला नसतो. गुळगुळीत नसलेला कागद, प्लॅस्टिकची फिल्म, वस्तू गुंडाळण्यासाठी लागणारा कागद, कार्डबोर्ड कागद वगैरे कमी दर्जाच्या पृष्ठांवर छापण्यासाठी या मुद्रण पद्धतीचा उपयोग केला जातो. या पद्धतीने रेखाचित्रे किंवा इतर प्रकारचे आकृतिबंध मुख्यतः छापले जातात. या कागदाचा (उदा., पाव गुंडाळावयाचा कागद) उपयोग फार थोड्या काळासाठी केला जातो. त्यामुळे त्याच्या मुद्रणाचा दर्जा फारसा चांगला नसला तरी चालतो.

स्थिर विद्युत् पद्धतीचे मुद्रण : या पद्धतीमध्ये मुद्रणप्रतिमा, शाई, मुद्रणप्रतिमेवर कागद दाबणे वगैरे काहीही नसते. छपाईच्या कागदावर प्रथम जस्ताच्या ऑक्साइडाचा पातळ थर पसरला थर पसरला जातो. या थरामुळे अंधारात त्याचा उपयोग निरोधक म्हणून होतो व त्यामुळे त्यावर जेव्हा प्रकाशक्रिया केली जाते तेव्हा विद्युत् संवाहक म्हणून त्याचा उपयोग होतो.

प्रथम अंधारात या कागदावर विद्युत् ऋण भार दिला जातो आणि नंतर मजकुराच्या सम प्रतीमधून त्यावर विजेच्या साह्याने मुद्रणप्रतिमेचे प्रकाशन केले जाते. जस्ताच्या ऑक्साइडाच्या थरावर तेथे प्रकाश पडतो तो भाग विद्युत् संवाहक होतो व ऋण भार ज्या बिनप्रतिमेच्या भागावर शिल्लक रहातो त्याचा -हास होऊन तो नाहीसा होतो. त्यानंतर हा कागद एका रंगीत कण असलेल्या विद्रावाच्या कंडातून पुढे जातो व कागदावर जो ऋण भार शिल्लक असतो तो या कणांना आकर्षित करतो व तो भाग पक्का होऊन त्यावर शाई लागत नाही. फक्त धन भारावरच मुद्रणप्रतिमा तयार होते.

स्थिर विद्युत् पद्धतीची मुद्रण यंत्रे आता भौगोलिक नकाशे छापण्यासाठी सुद्धा तयार केली आहेत. एकामागोमाग एक पाच रंगांत नकाशा छापता यावा अशी यंत्रे सध्या उपलब्ध आहेत. या यंत्राचा वेग ताशी दोन हजार कागद इतका असतो. या मुद्रण पद्धतीत झालेल्या तांत्रिक सुधारणांमुळे अलीकडे पुस्तकांच्या पानांची छपाई करण्यासाठी सुद्धा या पद्धतीचा वापर करणे शक्य झाले आहे.

मुद्रणासाठी शाई : मुद्रणाच्या विविध पद्धतींमध्ये वेगवेगळे गुणधर्म असलेली शाई वापरावी लागते. त्याशिवाय मुद्रण चांगले होत नाही [→ शाई].

मुद्रणासाठी कागद : मुद्रणासाठी जे विविध प्रकारचे कागद तयार केले जातात ते मुख्यतः काळ्या शाईने किंवा रंगीत शाईने एका वा दोन्ही बाजूंना मुद्रण करता यावे, अशा पद्धतीने केले जातात. उठावाचे, समपृष्ठ, उत्कीर्ण किंवा जाळीमुद्रण यांपैकी कुठल्याही एका वा अधिक मुद्रण पद्धतींनी कागदावर मुद्रण करता यावे, अशी प्रकारे तो तयार केला जातो. मुद्रणानंतर कागदाच्या घड्या घालणे किंवा पुस्तकाची बांधणी करणे, कागदाला वेगवेगळे आकार देऊन त्याच्या निरनिराळ्या उपयोगांसाठी वस्तू तयार करणे, हा कागदाचा दुय्यम उपयोग अपेक्षित असतो. अलीकडील काळात कागदाचा उपयोग विविध कारणांसाठी केला जात असल्याने त्यानुसार कागदाचे पुष्कळ वेगवेगळे प्रकार तयार केले जातात. कागद निरनिराळ्या जाडीचा, वजनाचा किंवा पांढरेपणात फरक असेलेला, रंगीत, गुळगुळीत किंवा किंचित खरखरीत वा मध्यम अशा अनेक प्रकारांचा तयार केला जातो.

मुद्रणाच्या एखाद्या विशिष्ट पद्धतीसाठी, मुद्रण यंत्राच्या एखाद्या विशिष्ट गरजेसाठी अथवा मुद्रणाच्या एखाद्या खास बाबीसाठी कागद उपयोगी पडावा म्हणूनही विशिष्ट प्रकारचा कागद खास तयार केला जातो. साधारणपणे कागदाच्या खास वा मूळ गरजा आणि त्याच्या या गरजांनुसार आवश्यक असणाऱ्या दुय्यम गरजा लक्षात घेऊन कागद तयार केला जातो. बहुरंगी मुद्रणासाठी कागदाच्या आकारात हवेप्रमाणे किंवा सापेक्ष आर्द्रतेप्रमाणे बदल न होणे, यांत्रिक दाबाचा त्यावर परिणाम न होणे, एका बाजूला छापलेला मजकूर न दिसण्यासाठी कागद पुरेसा अपारदर्शक असणे, मुद्रणाच्या पद्धतीनुसार कागदाचा पृष्ठभाग आवश्यक तितका गुळगुळीत असणे, कागदाच्या मूळ गरजा असतात. कागदाचा टिकाऊपणा, घडया घेण्याची क्षमता, बांधणी करण्याची क्षमता वगैरे दुय्यम गरजांचाही विचार मूळ गरजांप्रमाणे केला जातो. मुद्रणासाठी खास न लागणाऱ्या कागदामध्ये त्याचा कडकपणा, त्याची शक्ती, जास्त वेळा हाताळण्याने अनिष्ट परिणाम न होणे वगैरे खास गोष्टींचा विचार केला जातो पण मुद्रणासाठी त्यांचा उपयोग होतोच असे नाही. मुख्यतः मुद्रण पद्धती व कागदाचा शेवटी होणारा उपयोग या गोष्टी लक्षात घेऊनच कागदाचे अनेक प्रकार केले जातात.

अक्षरदाब (उठाव) मुद्रणासाठी कागद : अक्षरदाब मुद्रणासाठी कागद जितका गुळगुळीत असेल तितका जास्त चांगला ठरतो. त्यामुळे मुद्रणप्रतिमेवरील शाई कागदावर पूर्णपमे व सर्व ठि्काणी सारखी उतरते. चित्राची छपाई करताना चित्रातील बिंदूंवरील शाई कागदावर पूर्णपणे उतरली, तरच छपाई आवश्यकतेप्रमाणे होते. कागदाचा पृष्ठभाग पूर्णपणे सपाट व मुद्रणप्रतिमेवरील शाई शोषून घेणारा असावा लागतो. त्याचप्रमाणे शाईचा रंग, त्याची चकाकी व मुद्रणाचा सारखेपणा यांच्यावरूनच कागदाचा दर्जा ओळखला जातो. कागदावर पडणारा दाब त्याला योग्य रीतीने सहन करता आला, तरच मुद्रणप्रतिमा व कागद एकमेकांना बरोबर चिकटून प्रतिमेचे स्थानांतर योग्य प्रकारे होते. अक्षरदाब मुद्रणासाठी कागद जलरोधी असला, तर चांगालाच असतो पण या मुद्रणाच्या सोयीसाठी जलरोधी कागद आवश्यक नाही.


कागद तयार करताना सुपर कॅलेंडरिंग प्रक्रियेचा (कागद रूळांमधून जाऊ देऊन आणि वाफ व उच्च दाब यांचा उपयोग करून कागदाला गुळगुळीत पृष्ठभाग, एकसारखी जाडी व उच्च घनता असलेले अंतिम रूप देणाऱ्या प्रक्रियेचा) काही ठिकाणी उपयोग करतात. त्यामुळे कागद जास्त कडक व गुळगुळीत होतो. शिवाय त्यावर एनॅमलाचा थर दोन्ही बाजूंवर देऊन तो आणखी जास्त गुळगुळीत व पांढराही करता येतो. असे कागद चित्रांच्या छपाईकरिता जास्त चांगले असतात कारण चित्रांच्या बिंदूंवरील शाई अशा पृष्ठावर जशीच्या तशी (बिंदूंचे आकारमान न बदलता) उतरते. कागदाच्या रिळावर जेव्हा अक्षरदाब मुद्रण पद्धतीने छपाई करावयची असते तेव्हा शाई वाळविण्यासाठी बहुधा उष्णतेचा उपयोग केला जातो. अशा वेळी उष्णतेने कागद तडकू नये वा त्याच्या पृष्ठभागावर कोणतीही इतर वाईट परिणाम होऊ नये असा प्रकारे कागद तयार करावा लागतो. कागदावर उष्णतेचा उपयोग केल्याने त्यातील मुळ आर्द्रता निघून गेल्यास कागदाचे स्वरूप बदलते व मुद्रण चांगले होत नाही म्हणून कागद तयार करतानाच ही काळजी घ्यावी लागते.

मुद्रण यंत्रावर कागद छापण्यायोग्य असावा लागतो म्हणजे यांत्रिक दृष्ट्या यंत्रावर कागद सहज लावता येईल व यंत्रावर त्याचा अडथळा होणार नाही असा कागद लागतो. यासाठी कागद एकदम सपाट पृष्ठाचा असावा लागतो. व त्याची कड वाकडी होऊन चालत नाही. कागदाची कड एका सरळ रेषेत कापली जाणे आवश्यक असते (काही कागद एका सरळ रेषेत कापले जात नसल्याने ते यंत्रावर छापण्यासाठी सरळ सरकवता येत नाहीत). जेथे कागदाच्या रिळावर छपाई करावयाची असते, तेथे रीळ उलगडण्याची क्रिया व कागदावर द्यावा लागणारा यांत्रिक ताण सोसण्याची क्षमता अशा दोन्ही दृष्टींनी कागद असावा लागतो.

नम्य मुद्रणाकरिता कागद : या पद्धतीच्या मुद्रणासाठी लागणारा कागद अक्षरदाब मुद्रणासाठी वा प्रतिरूप मुद्रणासाठी लागणाऱ्या कागदापेक्षा कमी प्रतीचा असला तरी चालतो. या मुद्रण पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या शाईला चिकटपणा कमी असतो व ती थोड्याशा गरम हवेने वाळविली जाते. अथवा कागदाने शोषून घेतल्याने वाळते. या मुद्रण पद्धतीत यंत्रावर कागद चावणे व कागदाचा सर्व साधारण दोष नसणे या मूळ गरजा असतात आणि त्या दृष्टीने कागद तयार केला जातो.

प्रतिरूप मुद्रणासाठी कागद : या मुद्रण पद्धतीसाठी लागणारी कागद इतर पद्धतींपेक्षा जास्त चांगला व उच्च प्रतीचा लागतो.

प्रतिरूप मुद्रणासाठी सुटे कागद यंत्रावर लावले जातात. हे कागद घट्ट प्रकारे तयार करावे लागतात व त्यांच्यावर पाण्याचा फारसा परिणाम होऊन चालत नाही, कारण कागद मऊ पडण्याची शक्यता असते. यासाठी कागद शक्यतितका जलरोध असावा लागतो. प्रतिरूप मुद्रणात कागद रबराच्या थरावर दाबला जाऊन मुद्रण होते व दर वेळी तो रबराच्या थरावर ओढून काढावा लागतो. छापताना कागदावर पडणारा दाब व नंतर ओढून काढताना पडणारा ताण या दोहोंचा प्रतिकार कागदाला यशस्वीपणे करावा लागतो. बहुरंगी मुद्रणाच्या वेळी कमीत कमी चार वेळा हे सर्व ताण कागदाला सहन करावे लागतात. प्रतिरूप मुद्रणासाठी अजूनही पाण्याचा उपयोग करावा लागत असल्याने कागदाने जास्त पाणी शोषून चालत नाही, कारण त्यामुळे कागदातील तंतू फुगणे व नंतर कागदाचे आकारमान वाढणे व परिणामतः रंग एकमेकांवर बरोबर छापले न जाणे वगैरे मुद्रणाच्या दृष्टीने अनिष्ट अशा गोष्टी उद्भवतात. कागदाचा पृष्ठभाग पूर्णपणे स्वच्छ असावा लागतो व त्यावर कोणतेही सुटे तंतू चालत नाहीत कारण असे तंतू कागदावरून रबरी पृष्ठावर जाऊन त्यावर चिकटून राहण्याची शक्यता असते व त्यामुळे मुद्रण दोष निर्माण होतात. याशिवाय कागदाच्या पृष्ठावरून त्याच्या गुळगुळीत थराचा भाग किंवा कागदातील रसायने विलग होऊ नयेत अशा पद्धतीने कागद तयार करावा लागतो. कागदातील रसायने जर मुद्रणासाठी लागणाऱ्या पाण्यात मिसळली, तर पाणी व शाई यांचे प्रमाण बिघडण्याची शक्यता असते आणि त्या रसायनांचा पत्रयावर परिणाम होऊन एकंदर सर्वच मुद्रणक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. मुद्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या रबरी थरावरही रसायनांचा परिणाम होऊन त्यावरून मुद्रणप्रतिमेचे स्थानांतर होण्यात अडचण येण्याची शक्यता असते.

अक्षरदाब मुद्रणाच्या बाबतीत कागदाच्या ज्या इतर गरजा असतात त्याच प्रतिरूप मुद्रणाच्या कागदाच्या बाबतीत असतात. उदा., सपाट कागद, सरळ कडा, ९०° चे चारही कोपरे वगैरेशिवाय कागदाच्या तंतूंची दिशा त्याच्या लांबीप्रमाणे असावी लागते. त्याची सापेक्ष आर्द्रता मुद्रण यंत्र ज्या खोलीत ठेवले आहे तिच्या सापेक्ष आर्द्रतेशी जुळणारी असावी लागते म्हणजे बहुरंगी मुद्रणाच्या वेळी कागदाचे आकारमान आर्द्रतेप्रमाणे जास्त बदवत नाही व रंग एकमेकांवर बरोबर छापले जातात.

कागदाच्या रिळावर प्रतिरूप मुद्रण करावे लागते त्या वेळीही त्या कागदाचे गुणधर्म वर दिल्याप्रमाणेच आवश्यक असतात. फक्त सुटे कागद व रीळ छापण्यामध्ये जो फरक पडतो तेवढा फरक कागदामध्ये असला तरी चालतो. रिळामधील कागदामध्ये पाण्याचा अंश कमी प्रमाणात असला आणि खालीतील आर्द्रतेशी जुळणारा नसला तरी चालतो. मात्र गुळगुळीत आवरणयुक्त कागद व त्याची सापेक्ष आर्द्रता इतर कागदांप्रमाणे असावी लागते कारण असा कागद उष्ण हवेने वाळवावयाचा असल्यास त्यावर फोड येऊन त्याचे स्वरूप बदलून चालणार नाही. गुळगुळीत कागदाचे रीळ वापरावयाचे असेल, तर त्याचा गुळगुळीत थर जास्त सच्छिद्र असावा लागतो कारण त्याच्या पृष्ठावरील सूक्ष्म छिद्रांतून कागदामधील आर्द्रता वाफेच्या रूपाने चटकन निघून जाणे आवश्यक असते.

बहुरंगी मुद्रणामध्ये रंग एकमेकांवर बरोबर छापले जावेत व कागद यंत्रातून सुरळीतपणे पुढे जावा लागतो म्हणून रीळ उलगडतात त्यावर जो ताण पडतो तो सर्व ठिकाणी सारखा असावा लागतो व हा कागद सपाट राहून सुरकुत्या न पडता पुढे जावा लागतो. कागद उलगडून पुढे जाताना त्यावर द्यावा लागणारा ताण शक्य तितका कमी असल्यास कागद फाटण्याची शक्यता कमी होते.

उत्कीर्ण मुद्रणासाठी कागद : या मुद्रण पद्धतीत तांब्याच्या दंडगोलावर मुद्रणप्रतिमा किंचित खोलगट असते व तिच्यातील शाई कागदावर दाब पडल्याने त्यावर उतरते. यासाठी कागद पूर्णपणे गुळगुळीत असला व त्यावर कुठेही खरबरीतपणा नसला म्हणजे मुद्रणाची शाई चांगली उतरते. अशा कागदाच्या पृष्ठभागाची ताकद प्रतिरूप किंवा अक्षरदाब मुद्रणाला लागणाऱ्या कागदाइतकी नसली तरी चालते आणि आर्द्रतारोधी कागदाचीही आवश्यकता नसते. फक्त रिळाचा कागद उलगडताना सर्वसाधारण ताणाने तो उलगडेल व त्यावर सुरकुत्या न पडता तो सपाट राहील, असा कागद असावा लागतो.


अवरणहित कागद : अशा प्रकारचे कागद लाकडाच्या विरंजित (रंग काढून टाकण्याची क्रिया केलेल्या) रासायनिक लगद्यापासून किंवा रासायनिक व यांत्रिक मिश्र लगद्यापासून किंवा जुना कागद, चिंध्या व इतर योग्य वस्तूंच्या पुनरुपयोगाने मिळणाऱ्या लगद्यापासून अथवा वरील सर्वाच्या मिश्रणाच्या लगद्यापासून तयार केले जातात. कठीण व मऊ प्रकारच्या लाकडांच्या अनुक्रमे आखुड व लांबट तंतूंचे रासायनिक लगदे निरनिराळ्या प्रमाणांत घेऊन तयार केलेल्या कागदांमध्ये इष्ट ते गुणधर्म आणता येतात आणि मुद्रण पद्धतीनुसार वेगळ्या प्रकारचे कागद तयार करता येतात. कागद तायर करताना त्यामध्ये मिसळण्यात येणारी भरणद्रव्ये, सच्छिद्रता कमी करणारी द्रव्ये, रंग व इतर द्रव्ये यांच्यानुसारही कागदची वैशिष्ट्ये निश्चित होतात. लाकूड दळून व भिजून अथवा उष्णता व यांत्रिक पद्धतीची उपयोग करून तयार केलेल्या लगद्यापासून मिळणारे यांत्रिक तंतू रासायनिक लगद्याच्या तंतूपेक्षा कमी चकचकीत असतात आणि त्यांपासून तयार होणारा कागद कमी करण्याची क्षमता व कागदाची अपारदर्शकता उच्च प्रकारची मिळत असल्यामुळे त्याचा उपयोग करण्यात येतो.

यांत्रिक लगद्यापासून बनविलेले : या प्रकारचे कागद यांत्रिक व रासायनिक लगदे निरनिराळ्या प्रमाणांत मिसळून वेगवेगळ्या दर्जांचे बनवितात. असे कागद वर्तमानपत्राच्या कागदासारखे दिसतात पण ते अधिक पांढरे असून त्यांची मुद्रण गुणवत्ता जास्त चांगली असते. कागदी बांधणीची स्वस्त पुस्तके, नियतकालिके, दूरध्वनी निर्देशिका इत्यादींच्या मुद्रणासाठी या कागदांचा उपयोग केला जातो.

रासायनिक लगद्यापासून बनविलेले : या प्रकारचे कागद अक्षरदाब मुद्रण, प्रतिरूप मुद्रण, चित्ररहित मजकुराचे मुद्रण इत्यादींसाठी वापरले जातात. अलीकडे प्रतिरूप मुद्रणाच्या वाढत्या उपयोगामुळे अक्षरदाब मुद्रणासाठी अशा कागदांचा वापर खूपच कमी प्रमाणात होत आहे.

प्रतिरूप मुद्रणासाठी कागद: या पद्धतीच्या मुद्रणासाठी विविध प्रकारच्या पृष्ठरचनेचे कागद चालतात. अँटिक (कॅलेंडरिंग न केलेली खरबरीत), एगशेल (थोडीशी खरबरीत), व्हेलम (कातड्यासारखी), वोव्ह (सूक्ष्म जाळीदार), गुळगुळीत मळकट रंगाची) वगैरे विविध पृष्ठरचना असलेले कागद या मुद्रण पद्धतीसाठी वापरतात. उठावलेखनाने विभिन्न आकृतिबंध तयार केलेल्या पृष्ठरचनेचे कागदही प्रतिरूप मुद्रणासाठी वापरतात. प्रतिरूप मुद्रण कागद मुद्रणव्यवसाय़ाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या रंगछटांमध्ये व कमीजास्त अपारदर्शक बिनविले जातात.

आवारणरहित कागद ग्रंथछपाईसाठी निरनिराळ्या जाडींचेही बनविले जाताता. एक सेंमी. जाडीत कागदांची ठराविक संख्या बसेल अशा त-हने कागदाची जाडी ठरविली जाते. सौंदर्यशास्त्रदृष्ट्या कागदाच्या पांढरेपणाच्या विविध छटा व त्याची पृष्ठरचना आणि बांधणीच्या पद्धतीनुसार कागदाचा प्रकार याही पुस्तकाच्या कागदाच्या इतर गरजा आहेत.

टेक्स्ट कागद : हे कागद उच्च दर्जाच्या मुद्रणासाठी वापरतात. ते पूर्णतः रासायनिक लगद्याच्या तंतूपासून अथवा रासायनिक लगद्याच्या व कापसाच्या तंतूपासून अथवा रासायनिक लगद्याच्या व कापसाच्या तंतूच्या संयोगापासन तयार करतात. ते विविध पृष्ठरचनांचे आणि पांढरे व रंगीत बनवितात. काही कागदांवर ‘जलचिन्ह’ असते आणि शोभेसाठी त्यांच्या कडा अनियमित व न कापलेल्या ठेवतात. मुख्यतः सुटे कागद यंत्रावर लावूनच या प्रकारच्या कागदांवर प्रतिरूप मुद्रण केले जाते. अशा कागदांच्या एका रीमचे वजन ३० ते ३५ किग्रॅ. असते.

हलक्या वजनाचे कागद : या प्रकारचे कागद प्रथम बायबलच्या मुद्रणासाठी वापरले गेले व वजनाच्या मानाने यांची उच्च असलेली अपारदर्शकता लक्षणीय असते. यांच्या एका रीमचे वजन ८ ते १८ किग्रॅ. असते. असे कागद रासयनिक लाकूड, कापूस, लिनन वा पुनरुपयोजित तंतूंपासून किंवा त्यांच्या मिश्रणापासून बनवितात. असे कागद सुटे किंवा रीळ वापरून प्रामुख्याने प्रतिरूप मुद्रणाने छापले जातात. असे कागद बायबल, विश्वकोश, निर्देशिका, संदर्भग्रंथ वगैरे दीर्घकाल वापरावयाच्या ग्रंथांसाठी व आर्थिक अहवालासारखा छापील मजकूर टपालाने पाठविण्याचा खर्च कमी करण्यासाठी वापरतात.

आवरणयुक्त कागद : हे कागद निरनिराळ्या प्रकाराचे व दर्जांचे आणि मुद्रण पद्धतीनुसार तयार केले जातात. या कागदांवर अतिशय शुद्ध मृत्तिका, कॅ्ल्शियम कार्बोनेट किंवा इतर रंगद्रव्ये आणि स्टार्च, केसीन व इतर संश्लेषित (कृत्रिम रीतीने बनविलेली) बंधक द्रव्ये यांनी बनलेले खनिज आवरण दिले जाते. हे आवरण कागद यंत्रावर तयार करताना किंवा नंतर त्याच्या दोन्ही बाजूंवर (क्वचित एका बाजूवर) दिले जाते. मुद्र्णाची पद्धत, दर्जा व अंतिम उपयोग या सर्वांवर मूळ कागदाचा प्रकार व आवरणात समाविष्ट करावयाचे पदा्र्थ अवलंबून असतात.

आवरणयुक्त कागादांच्या दर्जाची उच्च ते नीच गुणवत्तेनुसार ६ प्रकारांमध्ये विभागणी केलेली असते. यांतील ५ प्रकार आकड्यांनी निर्देशित केले जातात. पहिला प्रकार सर्वोत्तम (प्रिमियम) कागद आणि त्यानंतर १, २, ३, ४, व ५ या आकड्यांनी दर्जा दर्शविला जातो. सर्वोत्तम, १, २ व ३ या दर्जांच्या कागदांमध्ये मूळ कागद रासायनिक लगद्यापासून केलेला असतो. ४ क्रमांकाचा कागद यांत्रिक लगद्यापासूव अथवा असे तंतू नसलेला असू शकतो. ५ क्रमांकाच्या कागदात यांत्रिक लगद्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केलेला असतो. उच्चस्तर दर्जाच्या पातळ्या कागदाचा जास्त गुळगुळीतपणा, पांढरे व उत्तम मुद्रण गुणवत्ता दर्शवितात. सर्वोत्तम, १, २, ३ व ४ या दर्जाचे कागद अक्षरदाब व प्रतिरूप मुद्रणांसाठी वापरले जातात. ३, ४, व ५ या दर्जाचे कागद रिळाच्या प्रतिरूप मुद्रणासाठी मुख्यत्त्वे वापरतात. या कागदांच्या १ रीमचे सर्वसाधारण वजन ३० ते ५० कि्ग्रॅ. असते. यांत्रिक लगद्यापासून बनविलेले ४ ते ५ क्रमांकाच्या आवरणयुक्त कागदांचा उपयोग मुख्यतः मोठ्या प्रमाणात छापली जाणारी साप्ताहिके, मासिके व तत्सम मुद्रण यांच्यासाठी रिळाच्या कागदावरील अक्षरदाब, प्रतिरूप व उत्की्र्ण मुद्रण पद्धतींमध्ये केला जातो. या कागदांच्या १ रीमचे सर्वसाधारण वजन १४ ते २३ किग्रॅ. असते. माहितीपत्रके व इतर लहान प्रमाणावर छापल्या जाणाऱ्या मजकुराचे मुद्रणही अशा हलक्या वजनाच्या आवरणयुक्त कागदावर केले जाते.

फिकट पृष्ठाचा एनॅमलयुक्त : या प्रकारच्या कागदाचे चकाकीमध्ये इतर प्रकारच्या जास्त चकाकीच्या कागदांच्या मानाने कमी असते. ज्या मुद्रणासाठी कागदाच्या एनॅमल पृष्ठाची चकाकी कमी असण्याची गरज असते त्यासाठी हा कागद वापरण्यात येतो.


विलेपिस आवरणयुक्त कागद : या प्रकारच्या कागदाच्या पृष्ठावर आरशासारखी चकाकी असते आणि पृष्ठभाग अतिशय गुळगुळीत, समपातळीत व शाई सर्वत्र एकसारखी शोषणारा असतो. या कागदाचे आवरण मऊसर असतानाच तो अतिशय चकचकीत व तापविलेल्या दंडगोलावर कोरडा होईपर्यंत दाबून धरण्यात येतो.

चकाकीरहित आवरणयुक्त कागद : या कागदावर आवरणरहित कागदापेक्षा प्रतिरूप मुद्रण चांगल्या प्रकारे होते व त्याच वेळी मुद्रणासाठी चकाकीरहित हा कागद चांगला असतो.

रंगीत व उठावरेखित आवरणयुक्त कागद : या प्रकारचे कागद किंचित रंगछटेचे असतात व त्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या मुद्रणासाठी (जेथे कागदाची एखादी रंगछटा पार्श्वभूमिकरिता आवश्यक असते तेथे) या कागदाचा उपयोग करण्यात येतो.

एकच बाजू आवरणयुक्त असलेले कागद : या कागदांचा उपयोग लवचिक आवेष्टने, लेबले व ग्रंथवेष्टने यांच्यासाठी करण्यात येतो. हा कागद प्रतिरूप, नम्य वा उत्कीर्ण मुद्रणासाठी उपयोगी पडतो. शिवाय मुद्रणानंतर या कागदावर रोगणाचा थर देणे, उठावरेखन, शाईवर चकाकी येण्यासाठी धातुचूर्ण लावणे वगैरै प्रक्रिया करता येतात.

भवितव्य : मुद्रणाच्या सध्याच्या प्रगतीची दिशा मुख्यतः प्रतिरूप मुद्रणच्या बाजूला दिसून येते. त्यामागे आर्थिक कारणे मुख्यतः आहेत. अक्षरांच्या खिळ्यासाठी शिशाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करावा लागतो पण सध्या छायाक्षरजुळणी नव्याने सुरु झाली आहे व तिचा उपयोग अक्षरदाब मुद्रण सोडून इतर सर्व

मुद्रणपद्धतींमध्ये केला जातो. त्यामुळे शिशाचा उपयोग सध्या फार कमी झाला आहे. अक्षरदाब मुद्रण कमी होऊन मुद्रणाचा ओघ वाढत्या प्रमाणात प्रतिरूप मुद्रणाकडे वळलेला आहे. अक्षरदाब मुद्रणाच्या पूर्वतयारीत वेळ कमी लावतो, स्टीरिओ साचे तयार करणे तुलनात्मक दृष्ट्या सोपे असते व बातमी हातात आल्यापासून ती प्रसिद्ध करण्यापर्यंत वेळ फार कमी लागतो वगैरे फायदे या पद्धतीमध्ये असले, तरी सध्या रोजची वर्तमानपत्रे प्रतिरूप मुद्रणाने छापण्याकडे जास्त प्रवृत्ती दिसून येते याचे कारण ही पद्धत जास्त सोईस्कर आहे. छायाक्षरजुळणीच्या वाढत्या सुविधा, त्यातील संगणकाची मोठी कार्यक्षमता आणि शब्द व अक्षरे स्मरणात साठवून ठेवण्याची त्याची क्षमता यांमुळे या पद्धतीने अक्षरजुळणीचे काम पूर्वीच्या कोणत्याही पद्धतीपेक्षा फार वेगाने होते. प्रतिरूप मुद्रणासाठी तयार कराव्या लागणाऱ्या पत्र्यांना कमी वेळ लागत असल्याने अक्षरदाब मुद्रणाचे फायदे खूप कमी झाले आहेत. शिवाय शिशाची किंमतही फार वाढल्याने त्याची अक्षरे जुळवणे फार खर्चाचे झाले आहे, तथापि अक्षरदाब मुद्रणात प्रतिरूप मुद्रणातील काही फायद्यांचा उपयोग आता करण्यात आला आहे. यांत धातूच्या अथवा प्लॅस्टिकच्या आवेष्टक पत्र्यांचा उपयोग व अप्रत्यक्ष अक्षरदाब मुद्रण पद्धतीचा विकास यांचा समावेश आहे. मजकुराच्या पुनारुत्पादनातील सरस रेखीवपणा हे अक्षरदाब मुद्रणाचे अद्यापही एक वैशिष्ट्य मानले जाते आणि यावरून या दोन मुद्रण पद्धतींतील स्पर्धा अजूनही चालू आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

प्रतिरूप मुद्रणाचे पत्रे करण्यासाठी व ते बदलण्यासाठी वेळ कमी लागतो आणि उत्कीर्ण मुद्रणासाठी लागणारे दंडगोल तयार करण्यासाठी जास्त वेळ लागतो. यामुळेही चक्रीय गती उत्कीर्ण मुद्रणापेक्षा प्रतिरूप मुद्रण सोईचे झाले आहे. शिवाय प्रतिरूप मुद्रणाचा दर्जा तुलनात्मक दृष्ट्या जास्त चांगला वाटतो. म्हणून या मुद्रण प्रकाराकडे जास्त मुद्रक वळले आहेत व ही प्रक्रीया यापुढेही चालू राहील. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उत्कीर्ण मुद्रणासाठी दंदगोल तयार केले, तरीही प्रतिरूप मुद्रणाकडे मुद्रक आकृष्ट होण्याचे कारण त्याच्या पूर्वतयारीला लागणारा कमी वेळ व खर्च हे होय.

छायाक्षरजुळणीच्या तंत्रात अलीकडे फार वेगाने क्रांती झाली आहे. सध्या चौथ्या पिढीतील यंत्रे छायाक्षरजुळणीसाठी उपलब्ध आहेत व त्यांचा अक्षरजुळणीचा वेग फार प्रचंड आहे. साधारणपणे तासाला दीड ते दोन लक्ष अक्षरे जुळवण्याची या यंत्रांत क्षमता आहे. मात्र या यंत्रांसाठी मूळ गुंतवणूक फार मोठी लागत असल्याने व सध्याच्या तंत्रात फार वेघानं प्रगती होत असल्याने मूळ गुंतवणुकीची परतफेड योग्य वेळात होईल की नाही याबद्दल मुद्रक साशंक राहतो व छायाक्षरजुळणी यंत्र घेण्याचा निर्णय लवकर घेत नाही. १९७० सालानंतर छायाक्षरजुळणीच्या यंत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊन त्याच्यामध्ये पुष्कळ वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यामध्ये मानवी पातळीवरच प्रथम अडथळा येण्याचा अनुभव आला. छायाक्षरजुळणीसाठी पूर्वी जी कागदी फीत वापरली जात होती तिच्यामुळे मानवी बुद्धीचे व श्रमाचे यांत्रिकीकरण झाल्याची भावना निर्माण झाली व मुद्रणाकडे कला म्हणून पाहीले जात होते त्यात विक्षेप आल्यामुळे त्याच्या उपयोगाकडे साशंक नजरेने पाहण्याला सुरुवात झाली. छायाक्षरजुळणी यंत्राची अक्षरे जुळवण्याची प्रचंड क्षमता लक्षात घेता त्याचा पुरेसा वापर करण्यासाठी खूप मोठे काम त्याला सर्व मुद्रणालयांकडे उपलब्ध नसते. मध्यम आकारमानाच्या मुद्रणालयांमध्ये यामुळे जीवघेणी स्पर्धा सुरु होऊन वेगळ्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र प्रतिरूप मुद्रण यंत्रांची उपलब्धता व त्यामध्ये निरनिराळ्या आकारमानांची यंत्रे आणि त्यांच्या सोयी-सुविधा यांमुळे मध्यम आकारमानाच्या मुद्रणालयांना स्पर्धा चालू ठेवणे शक्य झाले आहे. शिवय याच मुद्रणालयांना अक्षरजुळणीच्या तंत्राला छायाक्षरजुळणी प्रतिरूप मुद्रणासाठी पूरक म्हणून वापरण्याची सोय झाल्याने मुद्रणालयाच्या एकंदर क्षमतेमध्ये पुरेशी भर पडली आहे.

भारतामध्ये १४-१५ भाषांचा व लिप्यांचा उपयोग केला जातो. प्रत्येक भाषेमध्ये वर्तमानपत्रे व मासिके-पुस्तके आणि इतर सर्व प्रकारचे मुद्रण करण्यात येते. त्यांत देवनागरी लिपी व हिंदी भाषा यांचा उपयोग सर्वात जास्त आहे. त्यांतील काही लिप्यांचा उपयोग छायाक्षरजुळणी यंत्रावर सुरु झाला आहे व अक्षरांची रेखीव वळणे उपलब्ध आहेत. पण देवनागरी लिपी सोडली, तर इतर लिप्यांचा उपयोग पुरेसा करता येत नाही व छायाक्षरजुळणी यंत्राची कामाची क्षमता फार मोठी आहे. त्यामुळे यंत्रासाठी जी भांडवली गुंतवणूक करावी लागते तिची सोडवणूक लवकर होत नाही. या कारणाने भारतामध्ये या तंत्राची वाढ सावकाश होत नाही.

दूरच्या भविष्यकाळाचा विचार केला, तर मुद्रणाच्या व्यवसायाला एक वेगळेच वळण मिळण्याचा संभव आहे. घरातच मुद्रण करणे यापुढे शक्य होणार आहे. इलेक्ट्रॉनीक तंत्राच्या मदतीने चालणारे लहान मुद्रण यंत्र विकत किंवा भाड्याने घेऊन एखादे सचित्र मासिक किंवा पुस्तक छापणे शक्य झाले आहे व हळूहळू त्यात वाढ होईल. अशा मुद्रणासाठी तंत्रज्ञानाची फार मोठी आवश्यकताही राहणार नाही कारण बऱ्याच गोष्टी स्वयंचलित राहतील ज्या पत्र्यांच्या साह्याने मुद्रण करावे लागते ते पत्रे दुसऱ्याकडून करून घेणे सहज शक्य होईल.


मुद्रणप्रतिमा तयार करण्यासाठी हल्ली दूरचित्रवाणी संचाचा उपयोग शक्य झाला आहे. इलेक्ट्रॉनीय तंत्राचा उपयोग करून अशा संचाचा उपयोग थोडीशी सुधारणा करून करता येतो. स्थिर विद्युत तंत्राचा उपयोग करून दूरचित्रवाणी संचावरून मुद्रणप्रतिमा पत्र्यावर तयार करता येतो व तिचा उपयोग प्रतिरूप मुद्रणासाठी करता येतो. १९६४ साली जपानमध्ये मैनिशी शिंबून या वृत्तपत्राने असा एक प्रयोग करून दाखवून दिले आहे की, ध्वनितरंग, रेडिओ तरंग किंवा दूरचित्रवाणीसाठी हल्ली ज्या जादा सुविधा (उदा, बंद-मंडल किंवा केबल दूरचित्रवाणी) उपलब्ध आहेत, त्यांचा उपयोग करून घरातच मुद्रणप्रतिमा करणे शक्य आहे. त्यामुळे या पद्धतीने एखादे वृत्तपत्र घरात लहान प्रमाणावर छापणे शक्य झाले आहे. शिवाय इतर प्रकारचे मुद्रणही या पद्धतीने घरात होऊ शकेल.

दूरचित्रवाणीवर वेगवेगळ्या परिवाहांद्वारे एखाद्या वर्गणीदाराला त्याला हवी असेल ती माहिती आधी तारीख व वेळ ठरवून पाठविता येते व तिचा उपयोग करून व्यक्तिगत रीत्या कादंबरी, मासिक, पाक्षिक, दैनिक वगैरे सर्व गोष्टी मिळवता येतात. त्यांचा मुद्रणासाठीही उपयोग होऊ शकतो. हे सर्व साहित्य तयार होऊन कमी वेळात एकदम वाचकापर्यंत पोचवणे शक्य झाले आहे.

घरातच लहान प्रमाणावर मुद्रण करणे तांत्रिक दृष्ट्या फारसे अडचणीचे राहिले नाही. मूळ भांडवली गुंतवणूक हीच एक अडचण म्हणता येईल पण तीही अडचण हळूहळू नाहीशी होईल. कारण मुद्रणासाठी लागणारी अशा पद्धतीची यंत्रे जेव्हा मोठ्या प्रमाणात निर्माण होतील तेव्हा त्यांची किंमतही कमी होईल. त्यामुळे अक्षरांचा मजकूर व चित्रे वगैरे सर्व प्रकारचे मुद्रण कमी खर्चात व वेळात करता येईल. अशा त-हेची परिस्थिती निर्माण होणे कालसापेक्ष आहे व ती निर्माण होत आहे. त्यात फक्त वेळेचा प्रश्न आहे. काही देशांमध्ये आर्थिक समृद्धीमुळे हे लवकर शक्य होईल. विकसनशील देशांमध्ये वरील परिस्थिती नि्र्माण व्हावयाला थोडा जास्त काळ लागेल.

मुद्रण तंत्र शिक्षण : भारतात मुद्रण तंत्राचे शिक्षण देणारी ४ विभागीय शासकीय विद्यालये आहेत. पश्चिम भारतासाठी मुंबई, दक्षिण भारतासाठी अड्यार (मद्रास), पूर्व भारतासाठी कलकत्ता व उत्तर भारतासाठी अलाहाबाद येथे ही विद्यालये आहेत. या सर्व विद्यालयांतून पूर्ण वेळेचा ३ वर्षे मुदतीचा पदविका अभ्यासक्रम शिकविला जातो. मुंबई येथील विद्यालयात ४ वर्षांचा अर्ध वेळेचा पदविका अभ्यासक्रम असून अड्यार येथील विद्यालयात ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रमही शिकविला जातो. अड्यार येथील विद्यालय मद्रास विद्यापीठाला संलग्न आहे. याखेरीज महाराष्ट्र मुद्रण तंत्र विद्यालय या संस्थेत मुद्रण तंत्राचे शिक्षण दिले जाते. जबलपूर (मध्य प्रदेश), बंगलोर (कर्नाटक), शोरनूर (केरळ) व भुवनेश्वर (ओरिसा) येथील शासकीय कला निकेतनांत आणि दिल्ली येथील पुसा पॉलिटेक्निकमध्ये व अहमदाबाद येथील आर. सी. टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये मुद्रण तंत्राच्या शिक्षणाची सोय आहे.

परदेशातील मुद्रण तंत्र शिक्षणाची काही प्रसिद्ध ठिकाणे पुढील प्रमाणे आहेत: ब्रिटनमध्ये लंडन कॉलेज ऑफ प्रिंटिंग, लंडन लीड्स कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, लीड्स म्युनिसिपल कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, मँचेस्टर हॅरियट वॉट कॉलेज एडिंबरो स्टो कॉलेज ऑफ प्रिटिंग, ग्लासगो स्कूल ऑफ आर्ट, वॉटफर्ड. अमेरिकेतील रॉचेस्टर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत पदवी अभ्यासक्रम असून ३२ राज्यांत मुद्रण तंत्राची पदविका वा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत. पश्चिम जर्मनीत म्यूनिक येथे ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून इतर १७ शहरांमध्ये मुद्रण तंत्राचे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. स्वित्झर्लंडमधील झुरिक, बर्न, बाझेल व लोझॅन येथे मुद्रण तंत्राच्या शिक्षणाची सोय आहे.

मुद्रण विषयक काही महत्त्वाची नियतकालिके :भारतातील नियतकालिके : इंडियन प्रिंट अँड पेपर (कलकत्ता), प्रिंटिंग टाइम्स (नवी दिल्ली) व प्रिंट इंडिया (मद्रास). 

परदेशातील नियतकालिके : अमेरिकन प्रिंटिंग अँड लिथोआफर (शिकागो), ग्राफिक आर्टस मंथली अँड द प्रिंटिंग इंडस्ट्री (न्यूयॉर्क) , फोटोटाइपसेटिंग (ओशनसाइड), प्रिंट इक्विप न्यूज (ग्लेंडेल), स्क्रिन प्रिंटिंग (सिनसिनॅटी), ग्राफिक आर्टस अँबस्ट्रॅक्टस (पिटसबर्ग), वर्ल्ड वाइड प्रिंटर (फिलाडेल्फिया), ब्रिटिश प्रिंटर (लंडन), लिथोप्रिंटर (लंडन), ऑफसेट प्रिंटर (लंडन), फोटोटाइपसेटिंग अँड काँप्यूटर एडेड टाइपसेटिंग (लंडन), प्रिटिंग वर्ल्ड (लंडन), पी आय आर ए न्यूज ब्रिफ (लेदरहेड, ब्रिटन).

महाराष्ट्रातील मुद्रण व्यवसाय व संशोधन: १९८० साली महारा्ष्ट्रात ३,१२५ मद्रणालये होती. त्यांपैकी १,३२५ मुद्रणालये मुंबई शहरात होती. कामगारांची संख्या ५० वर असलेल्या मुद्रणालयांची संख्या ९३ होती. सर्व मुद्रणालयांतील एकूण कामगारांची संख्या ४२,६५० होती आणि त्यांपैकी मुंबई शहरातील कामगारांची संख्या २५,२८० होती. १९८० साली मुद्रण विषयक यंत्रसामग्री तयार करणारे ६५ उत्पादक महाराष्ट्रात होते.

महाराष्ट्रात विषयक संशोधन करणाऱ्या दोन खाजगी संस्था आहेत. यांपैकी पुणे येथील इन्स्टिट्यूट ऑफ टायपोग्राफिकल रिसर्च या संस्थेत मोनोटाइप, छायाक्षरजुळणी इ. अक्षरजुळणीच्या पद्धतींकरिता योग्य व कार्यक्षम अक्षरफलक, सर्व प्रादेशिक लिप्यांसाठी बिंदू आव्यूह अभिकल्प (बिंदूंच्या मांडणीने अक्षरांना आकार देण्याचे आराखडे). दृक संदर्शनासाठी अक्षरे वगैरे विकसित करण्यासंबधी संशोधन करण्यात येत आहे.

पहा : अक्षरण पुस्तक बांधणी मुद्रा निर्मिति शाई.

संदर्भ : 1. Bernham, W. R. Hanes, R. M. Bartleson. J. Color: A Guide to Basic Facts and Concepts, New York.

2. Brewer, R. An Approach to Print A Basic Guide to the Printing press, London, 1971.

3. Cogoli, J. E. Photo-Offset Fundamentals, Bloomington, 1967.

4. Coupe, R. R. Science of Printing Technology, London, 1966.

5. Duarte, W. R. and others, Machine Printing, 1973.

6. Hartsuch, P. J. Chemistry for the Graphic Arts, Pittsburgh, Pa., 1979.

8. Hutchings, E. A. D. A. Survey of Printing Processes, London, 1970.

9. Hutchings, E. A. D. Printing by Letter Press, London, 1964.

10. Jackson, H. E. Printing: A Practical Introduction to the Graphic Arts, New York, 1957.

11. Jaffe, E. Halftone  Photography for Offset Lithography, New York, 1960.

12. Jennet, S. Pioneers in Printing, London, 1958.

13. Karsch, R. R. Graphic Arts Procedures, Chicago, 1957.

14. Kinsey, E. introducing Screen Printing, London, 1967.

15. Latham, C. W. Advanced Pressmanship: Sheetfed Presses, New York, 1963.

16. Mecs, C. E. K. James, T. H., Ed., The Theory of the Photographic Process, New York, 1966.

17. Phillips, A. H. Computer Peripherals and Typesetting, 1968.

18. Polk, R. W. Gage, H. L. A Composition Manual, Washington.

19. Polk, R. W.: Polk, E. W. The Practice of printing: Letterpress and Offset, St. Peoria, 1971. 20. Priolkar, A. K. The Printing Press in India : Its Beginnings And Early Development,      Bombay, 1958.

21. Reed, R. F. Offset plate making-Deepetch, New York, 1959.

22. Steinberg. S. H. Five Hundred Years of Printing, Harmondsworth, 1962.

23. Strauss. V. The Printing Industry : An Introduction to It’s Many Branches, Processes and Products, Washington, 1967.

24. Whetton, H.. Ed., Practical Printing and Binding, Hollywood-by-the-Sea, Fla., 1964.

जोग, अ. रा. दाते, शं. रा.


वर्तमानपत्रासाठई लायनोटाईप यंत्रावर अक्षकजुळवणीचे काम करण्यात येत आहे.लायनोटाईप यंत्राचा एक प्रकार.मोनोटाईप यंत्राच्या अक्षरफलकावर अक्षरजुळणीचे काम चालू आहे.इंग्रजी छायाक्षरजुळणीसाठी अक्षरफलकावर काम करणारा कर्मचारी.मुद्रितशोधनाकरिता वापरण्यात येणारे लाइन प्रिंट यंत्र. &quotइंडियन एक्स्प्रेस&quot प्रेसच्या सौजन्याने.वर्तमानपत्राच्या पानाची मांडणी करणारा कारागीरअखंड गतीच्या उत्कीर्ण मुद्रणासाठी पत्रा तयार करण्याकरिता करावयाची पूर्वतयारी.ठसे तयार करण्याकरिता वापरण्यात येणारे दोन प्रकारचे कॅमेरेे.हाताने कागद लावण्याचे अक्षरदाब मुद्रण यंत्र.वर्तमानपत्राच्या मुद्रणासाठी १८४६ मध्ये तयार केलेले चक्रीय मुद्रण यंत्र.एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील दंडगोल मुद्रण यंत्र.चक्रीय जाळीमुद्रण यंत्र.चक्रीय मुद्रण यंत्रातील वाहक पट्ट्यावरून वर्तमानपत्राच्या प्रती बाहेर येत आहेत.रंगीत मुद्रणासाठी तयार करावयाच्या चार रंगांच्या व्यस्त प्रतींसाठी विकाशन करण्याकरिता वापरण्यात येणारे उपकरण.रंगीत मुद्रणासाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रॉनीय रंग क्रमवीक्षक.दंडगोल अक्षरदाब मुद्रण यंत्राचा एक प्रकार.कागद व मुद्रणप्रतिमा सपाट असलेले स्वयंचलित मुद्रण यंत्र.हिंदुस्थान मशिन टूल्स या कंपनीने तयार केलेल्या मुद्रण यंत्राचा एक नमुना.रंग क्रमवीक्षकावर रंग विलगीकरणासाठी चित्र लावलेले आहे.रंग क्रमवीक्षकावर पुनरुत्पादक भागात फिल्म बसविलेली आहे. (&quotइंडियन एक्स्प्रेस&quot प्रेसच्या सौजन्याने)मूळ रंगीत चित्रातील रंगांचे घटक रंगांत विलगीकरण करून तयार केलेल्या (१) पिवळा, (२) सियान, (३) मॅजेन्टा व (४) काळा या रंगांच्या पत्र्यांच्या साहाय्याने मिळणाऱ्या मुद्रित प्रतिमा, पिवळ्या प्रतिमेवर सियान मुद्रित करून मिळणारी प्रतिमा (५), या दोहोंवर मॅजेन्टा मुद्रित करून मिळणारी प्रतिमा (६) आणि यावर काळी प्रतिमा मुद्रित करून मिळणारी अंतिम प्रतिमा (७).