बर्फ : स्फटिकी किंवा अस्फटिकी रूपात असलेल्या गोठलेल्या पाण्याला बर्फ म्हणतात. जमिनीवरील पाणी नैसर्गिक क्रियेने गोठल्यामुळे किंवा यांत्रिक रीतीने पाणी गोठविले म्हणजे बर्फ बनते. मेघातून पडणाऱ्या विरल, स्फटिकमय आणि अपारदर्शक रूपातील गोठलेल्या पाण्याला हिम ही संज्ञा लावतात. या व्याख्येनुसार गोठलेल्या नदीला ‘बर्फनदी’ व पाणी गोठून बनलेल्या लहान-मोठ्या टेकाडांना ‘बर्फशैल’ म्हटले पाहिजे परंतु त्याच्यासाठी अनुक्रमे ‘हिमनदी’ आणि ‘हिमशैल’ हे शब्द अगोदरच रूढ झालेले असल्यामुळे विश्वकोशात त्या संज्ञा तशाच वापरल्या आहेत. [⟶हिम हिमनदी व हिमस्तर हिमशैल].

गुणधर्म : बर्फ वर्णहीन आहे. परंतु त्याच्या जाड थरावर प्रकाश पडला म्हणजे त्याचे पारगमन होऊन ते लकलकीत निळे दिसते. गोठलेल्या पाण्याचे कण एकमेकांस घट्ट चिकटलेले असले म्हणजे बर्फ पारदर्शक बनते ते विरल असतील, तर बर्फ अर्धपार्य किंवा अपार्य दिसते. बर्फ गंधहीन व रुचिहीन आहे.

बर्फाचा वितळबिंदू 00 से. (३२0 फॅ.) आहे. पाण्याचे तापमान नेहमीच्या तापमानाच्या खाली येऊ लागले म्हणजे त्याचे घनफळ कमी होऊ लागते. ४0 से. तापमानास ते सर्वांत कमी होते व तापमान त्याखाली जाऊ लागले म्हणजे घनफळ वाढू लागते. याला पाण्याचे असंगत प्रसरण म्हणतात [⟶ पाणी]. या गुणामुळेच थंड प्रदेशातील पाण्याचे नळ त्यातील पाणी थिजले म्हणजे फुटतात. गोठविण्यासाठी पाणी थंड करताना त्यामध्ये धुळीचे कण किंवा पूर्वी बनविलेल्या बर्फाचे कण बनण्यास केंद्रे म्हणून असणे आवश्यक असते. त्यांच्या अभावी गोठणबिंदूच्या खाली तापमान गेले, तरी पाणी घनरूप होत नाही. अशा प्रकारे -७२0 से. तापमानमर्यंत पाणी द्रवरूपात राहू शकते, असे दिसून आले आहे.

बर्फाचा वितळबिंदू दाब दिल्याने कमी होतो. वातावरणीय दाबाच्या सु. १३४ पट दाब दिला, तर वितळबिंदू-१0 से. होतो. या गुणधर्मामुळेच बर्फावरून घसरण्याचे खेळ (स्केटिंग, आइस हॉकी इ.) खेळता येतात. कारण खेळाडूंनी पायाला बांधलेल्या धातुपट्ट्यांचा जेथे बर्फाशी संपर्क येतो तेथील बर्फाचा वितळबिंदू खेळाडूच्या वजनामुळे खाली जातो. त्यामुळे त्या ठिकाणच्या बर्फाचे पाणी होऊन घर्षण कमी होते व खेळाडूला हव्या तशा हालचाली करणे सोपे पडते. बर्फाच्या तुकड्यावर एखादी तार वजने लावून आडवी ठेवली,तर काही वेळाने ती तुकड्याच्या आतील भागात गेली आहे असे दिसून येते, ते या गुणधर्मामुळेच. उच्च दाब वापरून प्रयोग केले असता नेहमीच्या बर्फाशिवाय भिन्न गुणधर्माचे सहा बर्फ प्रकार बनविता येतात, असे दिसून आले आहे [⟶प्रावस्था नियम]. नेहमीचे बर्फ हलके आहे (घनता ०.९१७ ग्रॅ./घ. सेंमी.) परंतु हे प्रकार पाण्यापेक्षा जड आहेत. दाब नाहीसा केला म्हणजे त्यांचे रूपांतर साध्या बर्फात होते.

स्फटिकरचना : पाण्याचे तापमान गोठणबिंदूच्या जवळपास येऊ लागले म्हणजे जलरेणू स्फटिक जालकात पकडले जातात. बर्फाच्या क्ष-किरण विवर्तन अभ्यासावरून [⟶क्ष-किरण] असे दिसून आले आहे की, नैसर्गिक बर्फ-स्फटिकातील जलरेणूंची संरचना षट्‌कोनाकृती आहे. या षट्‌कोनाकृती रचनेमुळेच हिमशकलांना सहा बाजू असलेला आकार येतो. बर्फ-स्फटिकातील प्रत्येक कोशात (संरचनात्मक एककात) चार जलरेणू असतात आणि प्रत्येक रेणूच्या सभोवार दुसरे चार जलरेणू असतात.

पाण्याचे स्फटिकरूप हायड्रोजन बंधांमुळे स्थिर झालेले आहे. यामध्ये एका रेणूमधील हायड्रोजन अणू व शेजारच्या रेणूमधील ऑक्सिजन अणू यांमध्ये हायड्रोजन बंध असतो. या बंधामुळे शेजारच्या रेणूमधील हायड्रोजन-ऑक्सिजन-हायड्रोजन यांमध्ये असलेला कोन १०९०.५ इतका विशाल होतो. जालक संरचना बरीच रिकामी असते म्हणजे पाण्याच्या रेणूंमध्ये रिक्त अवकाश असतात. जालक संरचनेच्या अशा विरलपणामुळे बर्फाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे.

विद्युत् संवाहकता : बर्फाची विद्युत् संवाहकता त्यातील हायड्रोजन बंधांशी संबंधित आहे. बाह्य विद्युत् क्षेत्र लावले असता बर्फातील ऑक्सिजन अणू जागचे हालत नाहीत परंतु घन विद्युत् भारित हायड्रोजन आयन (विद्युत् भारित अणू) किंवा प्रोटॉन एका बर्फ रेणूपासून दुसऱ्या बर्फ रेणूकडे व त्यातील प्रोटॉन तिसऱ्या रेणूकडे याप्रमाणे टप्प्याटप्प्यानी प्रवास करतात. हा प्रवास ऋण विद्युत् भारित हायड्रॉक्साइड (OH) आयनाप्रमाणेच फार जलद असतो आणि त्यामुळे ही यंत्रणा नसती, तर बर्फाच्या विद्युत् संवाहकतेचे प्रत्यक्ष मूल्य जितके आले असते त्यापेक्षा बरेच जास्त असते.

कोरड्या स्थितीत बर्फ विद्युत् प्रवाहास दुर्वाहक आहे. एकदिशप्रवाह आणि कमी कंप्रतेचा प्रत्यावर्ती प्रवाह (मूल्य व दिशा उलट-सुलट होणाऱ्या आणि एका सेकंदात कमी आवर्तने होणारा प्रवाह) याकरिता त्याची रोधकता १० ओहम आणि ६० किलोहार्ट्‍‌झ कंप्रतेला (दर सेकंदास होणाऱ्या आवर्तनांच्या संख्येला) ३ ×१० ओहम इतकी आहे. तापमान कमी केले असता, कमी कंप्रतेला बर्फाच्या विद्युत् अपार्यता स्थिरांकाचे [⟶विद्युत अपारक पदार्थ] मूल्य कमी होते.

बर्फ द्विप्रणमनी आहे म्हणजे यावर प्रकाशकिरण आपाती झाला असता त्याच्यापासून सामान्य व असामान्य असे दोन किरण मिळतात [⟶प्रकाशकी]. सोडियमच्या D रेषेसापेक्ष (५,८९० A तरंग-लांबीच्या प्रकाशाच्या सापेक्ष, म्हणजे A अँगस्ट्रॉम एकक = १०-१०मी.) व ० से.तापमानास त्याचे प्रणमनांक (सामान्य किरणाच्या बाबतीत) १.३०८९ व (असामान्य किरणाच्या बाबतीत)१.३१०३ असे आहे. एक ग्रॅम बर्फाचे ० से. तापमानाच्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी ७९.८ कॅलरी द्यावी लागते.

केळकर, गो. रा. 


बर्फनिर्मिती : खाद्यपदार्थ (उदा., दूध, मासे इ.) टिकविण्यासाठी, थंड पेये व लहान प्रमाणावर आइस्क्रिम तयार करण्यासाठी कृत्रिम रीत्या बनविलेले बर्फ वापरण्यात येते. पूर्वी घरगुती व लहान प्रमाणावरील व्यापारी प्रशीतकांमध्ये (रेफ्रिजरेटरांमध्ये) शीतक माध्यम म्हणून बर्फच वापरीत असत. सुमारे १८७६ सालापासून मोठ्या प्रमाणात यांत्रिक पद्धतीने पाण्यापासून बर्फनिर्मिती करण्यात येत आहे. त्यानंतरच्या काळात बर्फनिर्मितीमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांत फारसा बदल झालेला नाही परंतु आधुनिक काळात लहान प्रमाणात बर्फ तयार करण्याची यंत्रे उपलब्ध झाली आहेत. तसेच बर्फा च्या मोठ्या लाद्यांच्या उत्पादनाऐवजी लहान आकारमानाचे घनाकार तुकडे किंवा बर्फाचा चुरा तयार करण्याची पद्धत रूढ होत आहे.

पूर्वी बर्फनिर्मितीत वाफेवर चालणाऱ्या यंत्रांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करीत असत. त्या वेळी यंत्रामध्ये वापरलेली वाफ संघनित (द्रवात रूपांतरित) करून व शुद्ध करून मिळणारे पाणी बर्फनिर्मितीसाठी वापरत असत परंतु आता नदी, विहिरी, तलाव यांमधून उपलब्ध होणारे पाणी बर्फनिर्मितीसाठी वापरतात. पाणी शुद्ध करून घेणे जरूर असल्यास आधुनिक उपलब्ध असलेल्या पद्धतींनी ते शुद्ध केले जाते. मासेमारीच्या धंद्यात समुद्राचे खारे पाणी वापरून तयार केलेले बर्फ चालते.

बर्फनिर्मितीमध्ये पुढील घटक असतात : (१) प्रशीतन यंत्रणा, (२) बर्फ तयार करण्याची भांडी (बर्फाची भांडी) व तदनुषंगिक यंत्रणा आणि (३) तयार बर्फ काढ्ण्याची यंत्रण.

प्रशीतन यंत्रणा : पाण्याचा बर्फ तयार करण्याकरिता बाष्प-संपीडन ही यांत्रिक पद्धती वापरतात [⟶प्रशीतन]. या प्रशीतन पद्धतीमध्ये अमोनिया हा मुख्य प्रशीतनक व मिठवणी (मिठाचा विद्राव) हा दुय्यम प्रशीतनक म्हणून वापरतात. बर्फनिर्मितीमध्ये प्रशीतनक मोठ्या प्रमाणावर लागत असल्यामुळे अमोनिया वापरणे कमी खर्चाचे असते. मिठवणी एका मोठ्या टाकीत असते व त्या टाकीत बर्फाची भांडी ठेवलेली असतात. म्हणून मिठवणीचे तापमान पाण्याच्या गोठणबिंदू पेक्षा कमी करून भांड्यातील पाण्याचे बर्फ बनवितात. मिठवणीचे तापमान कमी करण्याकरिता अमोनिया प्रशीतनक वापरतात. बाष्परूप अमोनियावरील दाब वाढवण्याकरिता संपीडक आणि उच्च दाबाच्या बाष्परूप अमोनियाचे द्रवात रूपांतर करण्याकरिता शीतक व नियंत्रक झडप नेहमीसारखेच असतात.

मिठवणी टाकी लोखंडी पत्रा, लाकूड किंवा सिमेंट वापरून तयार करतात. टाकीचे आकारमान बर्फ उत्पादनाच्या प्रमणावर अवलंबून असते. जास्तीत जास्त आकारमान ३० मी. लांब व १० मी रूंद इतके असू शकते. टाकीची खोली १.२५ ते १.५ मी. असते. टाकीची वरची बाजू उघडी असते व चारी बाजू व तळ यांच्या बाहेरील बाजूने १५ ते २० सेंमी. जाडीचा उष्णता निरोधक पदार्थांचा थर असतो. तळाच्या खाली २ मी खोलीपर्यंत जमीन गोठते म्हणून तितक्या खोलीपर्यंत पायामध्ये पाणी असता कामा नये. बर्फाच्या भांड्यांना आधार म्हणून टाकीवरती आडव्या तुळ्या असतात. तसेच मधूनमधून आडवे पत्र्याचे पडदे असतात. त्यामुळे मिठवणीचा प्रवाह नागमोडी होतो.

सोडियम क्लोराइड किंवा कॅल्शियम क्लोराइड पाण्यामध्ये विरघळून मिठवणी बनवितात. मिठवणीचा गोठणबिंदू पाण्याच्या गोठणबिंदूपेक्षा कमी असतो. सोडियम क्लोराइडाची मिठवणी -१० से. व कॅल्शियम क्लोराइडची मिठवणी -४० से. पेक्षा कमी तापमानाकरिता वापरता येत नाही. मिठवणी व लोखंडाचे भाग (टाकीचे पत्रे, भांड्याचे पत्रे) यांचा एकमेकांशी सारखा संपर्क येतो व त्यामुळे लोखंडी भाग गंजतात. म्हणून मिठवणीमध्ये गंज-निरोधक म्हणून पोटॅशियम डायक्रोमेट घालतात. तसेच मिठवणी क्षारधर्मी (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारी) असावी. मिठवणीच्या टाकीतीलद्रवाची पातळी बर्फाच्या भांड्यांतील पाण्याच्या पातळीपेक्षा साधारणतः ३ ते ५ सेंमी. जास्त असते. मिठवणीचे तापमान -१० ते -१२ से. असते. मिठवणीचे प्रशीतन करण्याकरिता विविध पद्धतींचा अवलंब करतात. एका पद्धतीत टाकीच्या लांब बाजूंना समांतर अशा ३ ते ५ सेंमी व्यासाच्या नळ्या बसवितात. त्यांतून कमी दाबाचा द्रव अमोनिया असतो. अमोनियाचे बाष्पीभवन होत असताना बाष्पीभवनाला लागणारी उष्णता मिठवणीमधून काढून घेतली जाते. कमी दाबाचा बाष्परूप अमोनिया संपीडक शोषून घेतो. मिठवणी प्रवाहित ठेवण्याकरिता प्रचालक (मळसूत्री पंखा) किंवा क्षोभक (ढवळणारी यंत्रणा) वापरतात. त्यामुळे मिठवणीमध्ये सर्व ठिकाणी सारखे तापमान राहते व भांड्याच्या सभोवती मिठवणी फिरत राहून बर्फ लवकर तयार होते.

बर्फ तयार करण्याची  भांडी व तदनुषंगिक यंत्रणा : बर्फ तयार करण्याकरिता लोखंडी पत्र्याची भांडी वापरतात. भांडी गंजू नयेत म्हणून त्यांवर जस्तलेपन केलेले असते. भांड्याचे आकारमान १० किग्रॅ पासून १५० किग्रॅ. पाणी मावेल इतके असते परंतु बहुध १४५ किग्रॅ. आकारमानाची भांडी वापरतात. ह्या भांड्याचे आकारमान २८ × ५६ सेंमी. व खोली १२०-१२५ सेंमी. असते. भांडी निमुळती असून खालच्या बाजूचे आकारमान वरच्या तोंडाच्यापेक्षा १ ते १.५ सेंमी. कमी असते. बर्फ काढताना सोपे जावे म्हणून ४ ते ६ भांड्याचे लोखंडी चौकटीच्या साहाय्याने गट बनविलेले असतात. चौकट यारीच्या साहाय्याने उचलल्यास ४ ते ६ भांडी एकदम उचलली जातात. काही ठिकाणी प्रत्येक भांडे स्वतंत्रपणे उचलतात परंतु गट केल्यामे वेळ वाचतो. प्रत्येक भांडे किंवा भांड्याचे गट मिठवणीच्या टाकीच्या तुळ्यांचा आधार घेऊन लोंबत ठेवतात. वरचे तोंड सोडल्यास भांडी सर्व बाजूंनी मिठवणीने वेढलेली असतात. बर्फ तयार होत असताना प्रथम भांड्यांच्या बाजूला सुरूवात होते व थराची जाडी जसजशी वाढत जाते तसतसे गाभ्यातील पाणी गोठते. या प्रक्रियेमध्ये जसजसे बर्फ बनत जाते तसतसे गाभ्यातील पाण्यातील विरघळलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढत जाते. म्हणून बर्फाची लादी तयार होत आल्यावर गाभ्यातील शेवटले १०-१२ लि. पाणी काढून घेतात व नवे पाणी भरतात. याकरिता निराळे पंप व नळ्या यांची व्यवस्था केलेली असते. बर्फाची लादी पारदर्शक होण्यकरिता भांड्यातील पाणी हवेच्या साहाय्याने ढवळत ठेवतात. त्याकरिता संपीडित हवा निर्जल व थंड करून वापरतात. हवेकरिता संपीडक, निर्जलीकारक, शीतक व प्रत्येक भांड्यापर्यंत नळ्या यांची स्वतंत्र व्यवस्था असते. गाभ्यातील पाणी काढून घ्यावयाच्या वेळेला हवेची यंत्रणा भांड्यातून काढून घेतात नाहीतर ती लादीत गोठून राहील. भांड्यातील १४५ किग्रॅ. पाण्यापैकी १३५ किग्रॅ. पाणी पहिल्या २४ तासांत गोठते परंतु राहिलेल्या १० किग्रॅ. करिता १२-१४ तास लागतात.

तयार बर्फ काढण्याची यंत्रणा : भांड्यामध्ये बर्फ तयार झाल्यावर ४-६ भांड्यांचा गट किंवा प्रत्येक भांडे यारीच्या साहाय्याने मिठवणी टाकीतून काढून घेतले जाते. भांड्यातून बर्फ अलग करण्याकरिता साधारणपणे १६ ०-२० से. तापमान असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये भांडे बुडवितात. टाकीच्या बाजूचा बर्फ वितळतो व लादी भांड्यापासून सुटते. बर्फाची लाजी सुटल्यावर भांडी यारीच्या साहाय्याने किंवा मनुष्यबळाने उपडी केली जातात व बर्फाची लादी बाहेर जमिनीवर पडते. भांडी स्वच्छ करून नव्या पाण्याने भरतात. त्यकरिता थंड पाण्याच्या टाक्या उंचावर ठेवलेल्या असतात. पाण्याने भरलेली भांडी परत मिठवणी टाकीत यारीने नेऊन ठेवली जातात. बर्फाच्या १४५ किग्रॅ. वजनाच्या लाद्या यंत्राच्या साहाय्याने कापून लहान आकारमानाचे तुकडे करून पुठ्ठ्याच्या किंवा लाकडाच्या खोक्यांमध्ये भरतात आणि प्रशीतन केलेल्या मोटारवाहनांनी किंवा रेल्वेने विविध ग्राहकांना पुरवितात.


वरील पद्धतीमध्ये बर्फाच्या कारखान्यास फार मोठी जागा लागते म्हणून थोडक्या जागेत मावणारी अशी बर्फनिर्मिती यंत्रे विशेषतः यूरोपमध्ये उपयोगात येत आहेत. यास मिठवणी टाकीचा उपयोग करावा लागत नाही. या यंत्रामध्ये वरच्या पध्दतीप्रमाणे भांडी असतात पणभांड्याच्या भोवती अमोनियाकरिता नळीचे वेष्टन असते. भांडी उंच फलाटावर उपडी ठेवतात. त्यांची तोंडे खाली असतात व त्यांवर झाकणे बसवितात. भांडी स्थिर असतात. अमोनियाचे वाष्पीभवन होताना पाण्यातील उष्णता काढून घेतली जाते व बर्फ तयार होते. या पद्धीत पाणी ढवळण्याकरिता हवेचा उपयोग करीत नाहीत म्हणून बर्फ पारदर्शक होत नाही. १४५ किग्रॅ. बर्फाची लादी तयार होण्यास दोन तास लागतात. दर दिवशी तयार करावयाच्या बर्फाच्या वजनावर भांड्यांची संख्या अवलंबून असते परंतु पहिल्या पद्धतीपेक्षा ती पुष्कळच कमी असते. दर दोन तासांनी बर्फ तयार झाल्यावर भांड्याच्या भोवती असलेल्या नळ्यांतून गरम बाष्परूप अमोनिया वापरून लादी भांड्यापासून अलग करतात. भांड्यांची झाकणे काढल्यास बर्फाच्या लाद्या आपोआप खाली पाळण्यासारख्या चौकटीत पडतात. नंतर यारीच्या साहाय्याने त्या भांडारात किंवा तुकडे कापण्याच्या यंत्राकडे नेल्या जातात. अशी यंत्रे स्वयंचलित  करण्यास सोपी असतात व त्यांतील पूर्ण प्रक्रिया स्वयंचलित करता येते.

खाद्यपदार्थांच्या परिरक्षणासाठी बर्फाच्या लाद्या उपयोगी पडत नाहीत. एक तर लहान तुकडे करताना बराच बर्फ वाया जातो व तुकडे सारख्या आकारमानाचे होत नाहीत. तसेच पेयांकरिता लहान आकारमानाचे बर्फाचे तुकडे किंवा बर्फाचा चुरा लागतो म्हणून अलीकडच्या काळात लहान घनाकार बर्फ, लहान दंडगोल आकाराचा बर्फ, तसेच बर्फाचा चुरा बनविण्याची लहान आकारमानाची यंत्रे उपलब्ध झाली आहेत. दर तासाला २५ किग्रॅ. पासून ५०० किग्रॅ. पर्यंत कार्यक्षमता असलेली यंत्रे उपहारगृहांना सोयीची असतात. अशा यंत्रातील बर्फ अपारदर्शक असते. घरगुती उपयोगाकरिता घरगुती प्रशीतकामध्ये बर्फ तयार करतात.

भारतातील बर्फ उद्योग : कलकत्ता, मुंबई, दिल्ली, मद्रास, कानपूर इ. मोठ्या शहरांत बर्फ तयार करण्याचे मोठे कारखाने असून त्यांत बर्फाच्या लाद्या वर्षभर तयार करण्यात येतात. हिवाळ्यात उत्पादन थोडे कमी असते.

बर्फनिर्मितीसाठी लागणारी पुष्कळशी यंत्रसामग्री, तसेच पत्रीच्या रूपात बर्फ बनविणारी यंत्रे मोठ्या प्रमाणावर भारतात तयार होऊ लागली आहेत. १९६० पूर्वी बहुतेक सर्व यंत्रसामग्री अयात करावी लागे पण आता काही विशिष्ट साहित्य तेवढेच बाहेरून आणावे लागते. मुंबई, पुणे, किर्लोस्करवाडी, नवी दिल्ली, कलकत्ता इ. ठिकाणी बर्फनिर्मितीची यंत्रसामग्री तयार करण्यात येते.

माशांच्या परिवहनात परिरक्षणासाठी बर्फाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. माशांच्या वजनाच्या बरोबरीने बर्फ त्यासाठी वापरावे लागते. हे बर्फ सामान्यतः मच्छीमारीच्या ठिकाणीच तयार करण्यात येते. दुग्धव्यवसायात दुधावर करण्यात येणाऱ्या विविध संस्कारांसाठी बर्फ लागते. राज्य शासनाने चालविलेल्या दूध योजनांना लागणारे बर्फ वापरण्याच्या ठिकाणीच स्वतंत्रपणे करण्यासाठीही कित्येक संयंत्रे उभारली गेली आहेत.

मुंबईत १९५० च्या सुमारास बर्फाचे भारतात सर्वाधिक म्हणजे २९ कारखाने होते. त्यांत आणखी काहींची भरही आता पडली आहे. त्यांपैकी लाइटफूट आइस अँड कोल्ड स्टोरेज कं. लि हा कारखाना दररोज ६० टन बर्फाचे उत्पादन करतो. मुंबईतील सर्व कारखान्यांत मिळून दररोज  ९००-१,००० टन बर्फ तयार होते, उन्हाळ्यात ते १,२०० टनांपेक्षाही जास्त होते. दिल्ली प्रदेशात सु. २२ बर्फ कारखाने होते व उत्पादनक्षमता १,००० टन होती.

केरळातील मलबार जिल्ह्यातील टानूर येथे १९५२ मध्ये पत्रीरूप बर्फ तयार करण्याचा एक कारखाना निघाला. येथे तयार होणारे बर्फ वहातुकीपूर्वीच्या माशांच्या परिरक्षणासाठी वापरले जाते. 

पहा : प्रशीतन 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part V, New Delhi, 1960.

            2. Dossat, R. J. Principles of Refrigeration, New York, 1961.

टोळे, मा. ग. सप्रे, गो. वि.