मत्स्योद्योग : या विषयात सागरी, गोड्या पाण्यातील व मचूळ पाण्यातील मासेमारीचा समावेश आहे. तसेच छंद म्हणून निरनिराळ्या जलाशयांत गळाने केलेल्या मत्स्यपारधेचाही यातच समावेश होतो [⟶ मत्स्यपारध]. मतस्योद्योगाचा व्यवसाय अनादिकालापासून जगात सर्वत्र अस्तित्वात आहे व यावर कोट्यवधी लोक आपली उपजीविका करत आहेत. निरनिराळ्या भौगोलिक प्रदेशांत निरनिराळ्या जातींचे मासे आढळतात. मासे पकडण्याच्या तऱ्हाही विविध आहेत. मासेमारीच्या व्यवसायात कोळंबी (झिंगे वा चिंगाट्या), खेकडे (चिंबोऱ्या), शेवंडे, कालवे ह्यांना पकडणे तसेच शैवले, सागरी काकडी पकडणे वगैरेही अंतर्भूत आहे. या व्यवसायातील काही थोडे लोक सधन असले, तर बहुसंख्य लोक मध्यम स्थितीतील व आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत. यूरोप, अमेरिका व जपान या भागांत सधन मच्छीमारांचे प्रमाण आशिया व आफ्रिका या भागांपेक्षा जास्त आहे. गळाने मासे पकडणे हा छंद आहे. हौसेखातर या छंदात रमणारे लोक साधारणपणे सुस्थितीतील असतात.

इतिहास : मासेमारी हा मानवाचा फार पुरातन काळापासून चालत आलेला एक व्यवसाय व छंद आहे. आदिमानव अन्न मिळविण्यासाठी इतर प्राण्यांच्या शिकारीबरोबरच जलाशयातील माशांची शिकार करीत असावा. ही शिकार करण्याचे निरनिराळे प्रकार त्याच्या अनुभवावर आधारित असावेत. जाळे टाकून मासे पकडणे, भाल्याने मासे मारणे  किंवा गळ टाकून मासे पकडणे याची माहिती मानवास पुरातन काळापासून असावी. इ. स. दहाव्या शतकापूर्वीपासून चिनी लोक मत्स्यसंवर्धन करीत असावेत असे दिसते. ईजिप्तमध्येही पुरातन काळापासून मासेमारी होत असावी, असे काही प्राचीन शिलाचित्रांवरून दिसून येते. या चित्रात ‘टिलापिया’ नावाचे मासे जाळ्यात पकडले जात असतानाचा देखावा आहे. भारतात सु. चार हजार वर्षांपूर्वीच्या काळातही मासेमारी अस्तित्वात होती, असे सिंधू खोऱ्यातील मोहें-जो-दडो येथील उत्खननात आढळले आहे. मासेमारीचे मचवे, बंदरातील मासे उतरविण्याच्या जागा वगैरेंचे अवशेष प्रामुख्याने दिसतात. तसेच भाजलेल्या तांबड्या मातीच्या भांड्यावर महसीरसारख्या माशांची व ते पकडण्यासाठी वापरलेल्या गळांची चित्रे आढळतात. यावरून त्या काळात मासेमारीचा व्यवसाय अस्तित्वात होता, असे मानण्यास हरकत नाही. नंतरच्या म्हणजे चाणक्य (कौटिल्य) यांच्या काळात (इ.स.पू.सु. चौथे शतक) तर मत्स्यसंवर्धन हा एक प्रस्थापित व्यवसाय असावा असे दिसते. चाणक्य यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथात असे नमूद केले आहे की, मासळीच्या उत्पन्नाच्या १/६ भाग सरकारने तळ्याची भाडेपट्टी म्हणून घ्यावा व मासळीवरच्या जकातीचा दर माफक असावा. सुक्या मासळीचा उपयोग सैन्यातील जवानांसाठी कसा करावा, हेदेखील त्यात विशद केले आहे. दुष्काळी परिस्थितीत राजेरजवाड्यांनी व त्यांच्या मित्रांनी नदी, तलाव व समुद्रकिनारी जाऊन गळाने किंवा इतर रीतीने मासेमारी करून वा करवून प्रजाजनांना अन्न पुरविण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यात नमूद केले आहे. भारतात फार प्राचीन काळापासून मत्स्योत्पादन, त्यावर करावयाच्या प्रक्रिया व त्यांची विक्री या गोष्टी एक ग्रामीण व्यवसाय म्हणून केल्या जात असत. बंगालमध्ये मत्स्यसंवर्धन गेल्या दोन हजार वर्षांपूर्वीपासून चालू आहे, असे दिसते; पण याविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही.

पोर्तुगीजांनी १५५४ साली एका पत्रात, समुद्रात खोलवर पुरलेल्या व पृष्ठभागावर दिसणाऱ्या अजस्र खांवाचा उल्लेख केला आहे. हे खांब कराची व मुंबईच्या समुद्रात आढळत असत व या खांबांना ‘डोळ’ या नावाची जाळी बांधली जात असत. या खांबाची उंची ४० मी. असून त्यास जाळ्याच्या दोऱ्या बांधत असत, हे पाहून पोर्तुगीज लोकांना खूप आश्चर्य वाटले. यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १६८४ साली मुंबई प्रांतातील मच्छीमारांकडून काही कर वसूल करून सरकारचे उत्पन्न वाढविता येईल किंवा कसे हे पाहण्यासाठी एक समिती नेमली. या समितीने मत्स्यव्यवसायाची पाहणी करून मच्छीमारांपासून दर मचव्यावर एक रूपया कर वसूल करावा, असे सुचविले. पुढे १७६६ साली दुसरी समिती नेमली गेली व तिच्या शिफारसीत असा कर घेऊ नये, असे सुचविण्यात आले. उलट मच्छीमारांना काही सवलती द्याव्यात, असे नमूद केले. १८८४ सालच्या समितीने मासे खारविण्यासाठी जास्त मीठ वापरावे व हे मीठ करमुक्त असावे अशीही एक प्रमुख शिफारस केली. या कामासाठी आवारे काढावी असेही ठरले. भारत व ब्रह्मदेश यांतील मत्स्योद्योगाचे महानिरीक्षक फ्रान्सिस डे यांचा द फिशेस ऑफ इंडिया हा भारत, ब्रह्मदेश व श्रीलंका या देशांमधील सागरी व गोड्या पाण्यातील माशांसंबंधी माहिती देणारा प्रख्यात ग्रंथ १८७८ साली प्रसिद्ध झाला. यापूर्वींही या विषयावर त्यांनी काही लेखन (उदा., द फिशेस ऑफ मलबार) केले होते. नदीवर बंधारे बांघल्यामुळे गोड्या पाण्यातल्या माशांच्या स्थलांतरात अडथळे येतात व ते दूर करण्यासाठी घरणाच्या बांधकामात ‘मत्स्यसोपान’ किंवा ‘मत्स्यशिड्या’ बांधण्यात याव्यात, असे सर हेन्रीं कॉटन यांनी सुचविले. या सर्व लेखनामुळे या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले गेले व १८९७ साली भारतीय मत्स्योद्योग कायदा संमत झाला. के.सी. गुप्ता यांचा बंगालच्या मासेमारीवरील अहवाल १९०४ साली प्रसिद्ध झाला व याच सुमारास पंजाबच्या मासेमारीविषयी चौकशीही झाली. मद्रासमध्ये १९०७ साली एक स्वतंत्र मत्स्योद्योग खाते सुरू झाले. मुंबई इलाख्यात १९१० साली ल्यूकस अहवाल व १९२२ साली सोर्ले अहवाल प्रसिद्ध झाला आणि याची परिणती १९३४ साली एक मत्स्योद्योग अधिकारी व १९४५ साली मत्स्योद्योगाच्या सर्वकष सुधारणेसाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील निरनिराळ्या राज्यांत या कामासाठी स्वतंत्र विभाग सुरू झाले. पंचवार्षिक योजनांत केंद्रशासन व राज्यशासन या दोहोंकडून मत्स्योद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी बरेच आर्थिक सहाय्य मिळू लागले.

भारताच्या सागरी किनाऱ्याची लांबी सु. ५,६४० किमी. असून विविध प्रकारच्या मासळीचे साठे असलेले २०.५३ लक्ष चौं. किमी. जलक्षेत्र आहे. देशांतर्गत मत्स्योद्योगासाठी १५ लक्ष हेक्टर जलक्षेत्र उपलब्ध आहे. यांशिवाय मचूळ पाण्यातील मत्स्योद्योगासाठी २६ लक्ष हेक्टर जलक्षेत्र वापरता येणे शक्य आहे. जगामध्ये भारताचा मत्स्योत्पादनाच्या बाबतीत आठवा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण मत्स्योत्पादनापैकी ६४% सागरी व ३६% देशांतर्गत मत्स्योत्पादन होते. भारतात माशांचा वार्षिक दरडोई वापर केवळ ४ किग्रॅ. आहे. तथापि मानवी पोषण सल्लागार समितीने शिफारस केलेले वार्षिक दरडोई प्रमाण ३१ किग्रॅ. आहे.

कोष्टक क्र. १ मध्ये भारतातील सागरी व देशांतर्गत असे राज्यवार १९८०-८१ चे मत्स्योत्पादन दिले आहे. १९८१-८२ मध्ये एकूण मत्स्योत्पादन २६.४ लक्ष टन अपेक्षित होते. त्यापैकी सागरी १६.७ लक्ष टन व देशांतर्गत ९.७ लक्ष टन अपेक्षित होते.

जगातील प्रगत देशांत व त्यातल्या त्यात नॉर्वे, बिर्टन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांत एकोणिसाव्या शतकातच मत्स्योद्योगाच्या विकासासाठी निरनिराळे विभाग सुरू झाले. विसाव्या शतकात सामन व हॅलिबट यांच्या मासेमारीसाठी आंतरराष्ट्रीय आयोगही स्थापले गेले. सागरी संशोधनासाठी इंटरनॅशनल कौन्सिल फॉर एक्स्प्लोरेशन ऑफ द सी ही आंतरराष्ट्रीय संस्था कोपनहेगन येथे १९०२ मध्ये अस्तित्वात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेतर्फे जगातील सर्व राष्ट्रांच्या व त्यातल्या त्यात विकसनशील देशांच्या मत्स्योद्योगाच्या सुधारणेसाठी निरनिराळ्या योजना आखल्या जात आहेत आणि आर्थिक मदत व मार्गदर्शनही केले जात आहे.

कोष्टक क्र. १. भारतातील व सागरी व देशांतर्गत राज्यावार १९८०-८१ मधील मत्सोत्पादन (आकडे टनांत).

राज्य सागरी देशांतर्गत एकूण
आंध्र प्रदेश १,१५,०३९ १,२१,८९३ २,३६,९३२
आसाम ३९,०४७ ३९,०४७
उत्तर प्रदेश ३३,२०० ३३,२००
ओरिसा ३८,७०० ३२,५३० ७१,२३०
कर्नाटक १,६४,५१३ ४०,००० २,०४,५१३
केरळ २,७९,०२१ २५,४६० ३,०४,४८१
गुजरात २,०७,३१७ १६,५१८ २,२३,८३५
जम्मू व काश्मीर ८,२१२ ८,२१२
तमिळनाडू २,२७,००० १,६५,००० ३,९२,०००
त्रिपुरा ६,२५४ ६,२५४
नागालँड ५८६ ५८६
पंजाब २,८०० २,८००
पश्चिम बंगाल ६५,००० २,३५,००० ३,००,०००
बिहार ७८,३५९ ७८,३५९
मध्य प्रदेश १३,००० १३,०००
मणिपूर ३,२५० ३,२५०
महाराष्ट्र ४,००,९५९ २३,९७५ ४,२४,९३१
मेघालय ८३८ ८३८
राजस्थान १३,००० १३,०००
सिक्किम २२ २२
हरयाणा ९,७३५ ९,७३५
हिमाचल प्रदेश १,२४२ १,२४२
राज्यवार एकूण १४,९७,५४६ ८,६९,९२१ २३,६७,४६७
केंद्रशासित प्रदेश 
अंदमान व निकोबार १,८०३ १,८०३
अरुणाचल प्रदेश ४६० ४६०
गोवा, दमण व दीव ३२,८९१ १,२२५ ३४,११६
चंडीगढ १० १०
दिल्ली १,२०० १,२००
पाँडिचेरी १२,९५६ १,६११ १४,५६७
मिझोराम ९०० ९००
लक्षद्वीप २,९०९ २,९०९
केंद्रशासित एकूण ५०,५५९ ५,४०६ ५५,९६५
भारत एकूण १५,४८,१०५ ८,७५,३२७ २४,२३,४३२

जगातील मत्स्योद्योगाची वार्षिक आकडेवारी व इतर माहिती या संघनटेतर्फे प्रसिद्ध होते. या माहितीवरून असे आढळते की, संबंध जगातील मासळीचे उत्पादन १९४८ पासून १९७८ पर्यंतच्या तीस वर्षांत १७.७ दशलक्ष टनांवरून ७२.३७९ दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे. पहिल्या दहा देशांचे १९७५−७८ या चार वर्षाचे उत्पादन कोष्टक क्र. २ मध्ये दिले आहे. या उत्पादनात मासळी या सदरात मत्स्य वर्ग, देवमासे, कोळंबी, खेकडे, शेवंडे, चिमोरे, कालवे, तिसऱ्या, मोत्याची कालवे, शैबले इ. सर्व जलचर प्राण्यांचा व वनस्पतींचा समावेश आहे.

कोष्टक क्र. २. मासळीचे एकूण उत्पादन

देश                         उत्पादन (हजार टनांत)
१९७५ १९७६ १९७७ १९७८
जपान १०,५२४ १०,६६२ १०,७६४ १०,७५२
रशिया ९,९७४ १०,१३४ ९,३५२ ८,९२९
चीन ४,५०० ४,६०० ४,१०० ४,६६०
अमेरिकेची संयुक्त संस्थाने २,९२० ३,१६० ३,०८५ ३,५१८
नॉर्वे २,५४१ ३,४१७ ३,४६० २,६४७
पेरू ३,४४७ ४,३४७ २,५४० ३,३६५
भारत २,२६६ २,१७४ २,३११ २,३६८
कोरिया २,१३४ २,४०५ २,४१९ २,३५१
थायलंड १,५५३ १,६६० २,१९० २,२६४
डेन्मार्क १,७६७ १९११ १,८०७ १,७४५
एकूण जागतिक उत्पादन ६८,६०८ ७२,११३ ७१,२१३ ७२,३७९

शहरी सांडपाणी, औद्योगिक कारखान्यांतील टाकाऊ पदार्थ, शेतीमध्ये वापरण्यात येणआरी विविध कीटकनाशके व तत्सम रासायनिक द्रव्ये इत्यादींमुळे निरनिराळ्या जलाशयांचे पाणी प्रदूषित होत असून त्यामुळे मत्स्योत्पादनावर अनिष्ट परिणाम होत आहे तसेच असे दूषित मासे माणसांच्या खाण्यात आल्यास त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता अलीकडच्या काळात उद्‌भवली आहे. [⟶ प्रदूषण].

मत्स्योद्योगाच्या दृष्टीने पृथ्वीवरील जलाशयांचे (१) सागरी व (२) देशांतर्गत (जमिनीवरील) असे दोन विभाग पडतात. सागरी विभागात महासागर व समुद्र हे खाऱ्या पाण्याचे जलाशय येतात. देशांतर्गत विभागात गोड्या पाण्याचे (नद्या, गोड्या पाण्याची सरोवरे व तळी) आणि गोड्या व खाऱ्या पाण्याचा संयोग होतो असे मचूळ पाण्याचे जलाशय (नदीमुख) यांचा समावेश होतो. प्रस्तुत नोंदीच्या उर्वरित भागात सागरी मत्स्योद्योग, देशांतर्गत मत्स्योद्योग, मत्स्यसंवर्धन, विशिष्ट प्राण्यांची (उदा., खेकडे, कासवे, देवमासे इ.) मासेमारी, मत्स्योद्योगासंबंधीचे संशोधन व शिक्षण, आंतरराष्ट्रीय संस्था वगैरे माहिती दिलेली आहे.

सागरी मत्स्योद्योग 

पृथ्वीचा ७०.२ टक्के भाग समुद्राने म्हणजे खार्याक पाण्याने व्यापिला आहे. या भागात पॅसिफिक, अटलांटिक व हिंदी महासागर, तसेच या महासागरांचे उपसागर (समुद्र) आणि दक्षिण व उत्तर ध्रुवांभोवतालचे सागर या सर्व जलाशयांचा समावेश होतो. यांत कॉड, हॅलिबट, हेरिंग, मॅकेरेल (बांगडा), सामन, तांबुसा, ट्यूना, गेदर, बोंबील, सरंगा (पापलेट), सावरी, बोय, सुरमई, मुशी (शार्क), देवमासे, कोळंबी, कालवे इ. मत्स्य वर्गातील व इतर जलचर प्राण्यांची मासेमारी केली जाते. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेने जगातील सर्व मासेमारी करणाऱ्या प्रदेशांचे २७ भाग केले आहेत. त्यांतील सागरी मासेमारीचे १८ भाग आहेत. या भागांचे १९७४-७८ या पाच वर्षांतले वार्षिक उत्पादन कोष्टक क्र. ३ मध्ये दिले आहे.

प्राथमिक उत्पादकता : कोष्टक क्र. ३ मध्ये दिलेल्या आकड्यांवरून असे दिसते की, महासागरांच्या निरनिराळ्या भागांत माशांचे उत्पादन निरनिराळे आहे. यास निरनिराळी कारणे आहेत. सर्वप्रथम माशांची वाढ त्यांना मिळणाऱ्या अन्नावर अवलंबून असते. बरेच

कोष्टक क्र. ३. सागरी मासेमारीचे वार्षिक उत्पादन

भाग          उत्पादन (हजार टनांत)
१९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८
अटलांटिक-वायव्य भाग ४,०१९ ३,८०७ ३,४५६ ३,०१७ २,८१५
अटलांटिक-ईशान्य भाग ११,८१४ १२,११४ १३,२७८ २२,६८४ १२,०३५
अटलांटिक-मध्य पश्चिम भाग १,५३९ १,५४८ १.५७२ १,४२१ १,४५३
अटलांटिक-मध्य पूर्व भाग ३,५४९ ३,५५६ ३,६५६ ३,७४९ ३,०४६
अटलांटिक-नैर्ऋत्य भाग ८९३ ८५८ ८४३ १,०६१ १,३९४
अटलांटिक-आग्नेय भाग २,८५२ २,५६७ २,७६८ २,७७१ ३,२९२
अटलांटिक-उत्तर ध्रुव भाग २६ ३९ ४० २६५ २९५
भूमध्य समुद्र व काळा समुद्र १,३७२ १,५९६ १.३१२ १,१४६ १,२३९
हिंदी महासागर पश्चिम भाग २,११४ २,१०५ २,०७० २,३१२ २,३१६
हिंदी महासागर पूर्व भाग १,०४७ १,०७० १,१३० १,३४० १,३४०
हिंदी महासागर ध्रुव समुद्र १०२ २६ २६ १२३ ९४
पॅसिफिक महासागर वायव्य भाग १८,२१५ १८,६५६ १९,०९५ १९,६७० १९,८२८
पॅसिफिक महासागर ईशान्य भाग २,३३३ २,२४६ २,४०९ १,७६५ १,८४०
पॅसिफिक महासागर मध्य पश्चिम भाग ५,१२५ ५,१२९ ५,२८२ ५,९२० ६,१६४
पॅसिफिक महासागर मध्य पूर्व भाग १,२१९ १,५०२ १,७११ १,९७३ १,८५०
पॅसिफिक महासागर नैर्ऋत्य भाग ३४० २७२ ३५५ ५३० ३३८
पॅसिफिक महासागर आग्नेय भाग ५,३३२ ४,४११ ५,८१० ३,९६७ ५,२४६
पॅसिफिक महासागर दक्षिण ध्रुव समुद्र

मासे बहुतांशी पाण्यात असणाऱ्या ⇨ प्लवकांवर उदरनिर्वाह करतात. प्लवकांचे उत्पादन पाण्यात असलेल्या उपयुक्त लवणांवर,तापमानावर व सूर्याच्या प्रकाशकिरणांवर अवलंबून असते. प्रकाशकिरण व विवक्षित लवणे यांपासून हरितद्रव्य निर्माण होते व त्यापासून प्रथम हरितद्रव्य असेलेल सूक्ष्म हरितप्लवक निर्माण होतात. लहान पिले आणि मासे सुरुवातीस या प्लवकांवरच जगतात व वाढतात म्हणून पाण्यात असणार्याम प्लवकांवरच पाण्याची प्राथमिक उत्पादकता अवलंबून असते. लहान माशांवर मोठे मासे जगतात. पाण्यात आढळणाऱ्या प्लवकांचा व माशांचा सापेक्षतेने विचार केला, तर १०० ग्रॅ. हरितप्लवकांपासून, १० ग्रॅ. जीवप्लवक (सूक्ष्मजीव) या जीवप्लवकांपासून १ ग्रॅ. लहान मासे व यांपासून ०.१ ग्रॅ. मोठे मासे तयार होतात, असे स्थूल मानाने मानले जाते. हरितप्लवकांची उत्पत्ती माशांच्या उत्पादनास मूलभूत आहे म्हणून या हरितप्लवकांच्या उत्पादनाला प्राथमिक उत्पादकता म्हणतात. ही उत्पादकता मोजण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. अशा रीतीने प्लवकांचे उत्पादन हा आद्य मत्स्यसंपदेचा व त्यापरत्वे मत्स्योद्योगाचा मूळभूत पाया असल्यामुळे त्याची तपशीलवार माहिती पुढे दिलेली आहे.

सागरातील प्रवाह, पाण्यात मिसळलेला ऑक्सिजन वायू, माशांची जननक्षमता व मरणाधीनता यांचाही माशांच्या उत्पादनावर परिणाम होतो. याबरोबरच मच्छीमाराचे तांत्रिक कौशल्य, त्याची अवजारे (जाळी व नौका), मासेमारी क्षेत्राचे जवळील बंदरापासूनचे अंतर, माशांच्या स्थलांतराचे ज्ञान, पकडलेले मासे बाजारात नेईपर्यंत खरा न होऊ देण्याची काळजी हे सर्व घटकही मत्स्योत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. समुद्र जरी कितीही विस्तीर्ण असला, तरी त्याच्या क्षेत्रफळावर मत्स्योत्पादन अवलंबून नसते. किनाऱ्याजवळील पाण्यातील मासेमारी ही कमी खर्चाची व जास्त लाभदायक असते. खोल पाण्यात माशांची संख्या कमी असते व ते पकडण्यासाठी तुलनेने जास्त मेहनत व खर्च करावा लागतो.

मुख्य सागरी मत्स्य जातींची मराठी, इंग्रजी व शास्त्रीय नावे कोष्टक क्र. ४ मध्ये दिली आहेत.

कोष्टक क्र. ४. मुख्य सागरी मत्स्य जाती

मराठी नाव इंग्रजी नाव शास्त्रीय नाव
हॅलिबट हॅलिबट हिपोग्लॉसस वंशातील जाती
फ्लाउंडर फ्लाउंडर ऱ्हॉम्बोसोलिया जाती
भाकस इंडियन फ्लाउंडर सट्टेटोडीस इरूमी
कॉड कॉड गॅडस मोऱ्हुआ
हेक हेक मेर्लुसीयस जाती
हेडॉक हॅडॉक मेलॅनोग्रामस जाती
तांबुसा स्नॅपर लुटियानस रेझियस जाती
करकरा ग्रंटर पोमाडॅसीस जाती
काट बांगडा हॉर्स मॅकेरेल कॅरँक्स जाती
बोय (भादवी, मांगण) मुलेट म्युजिल, ऱ्हायनोम्युजिल जाती
सौरी जपानी सौरी कोलोलेपीस सैरा
हेरिंग हेरिंग हेरिंग्युला जाती
तरळी (तारली) ऑइल सार्डीन सार्डिनेला लाँगिसेप्स
मांदेली (दिंडस) गोल्डन अँकोव्ही कोइलिया व अँकोव्हीला
कुप्पा (गेदर) टर्नी, ट्यूना यूथिनस, ऑक्सिस, निओथिअस जाती
ताडमासा स्वोर्ड फिश, मार्लिन इस्टिओफोरस, टेट्राप्टुरस जाती
बांगडा इंडियन मॅकेरेल रास्ट्रेलिजर कानागुर्टा
सुरमई सीयर फिश स्काँबरोमोरस जाती
करली सिल्व्हर बार कायरोसेंट्रस दोराब
मुशी शार्क कॅरकॅरिअस जाती
लांज गिटारफिश ऱ्हिनोबॅटस जाती
पाकट स्टिंग रे ट्रायगॉन जाती
वाम ईल म्युरीना, म्युरिनीसॉक्स
मांजरी मासे (मार्जारमीन) कॅटफिश एरीयस, टॅचिसुरस व इतर जाती
पाला हिल्सा, इंडियन शॅड हिल्सा इलिशा
भिंग जायंट हेरिंग हिल्सा टोली
पेडवे लेसर सार्डीन सार्डिनेला फिंब्रीएटा, सा. गिबोसा वगैरे
काटी व्हाईट अँकोव्ही थ्रीसॉक्लीस वगैरे जाती
क्लुपिड क्लुपिड क्लुपिड
बोंबील बाँबे डक हार्पोडॉन नेहेरियस
चोर बोंबील लिझार्ड फिश सॉरिडा टुंबिल
टोकी गारफिश हेमीरँफस झीनेटोडॉन
उडणारे मासे फ्लाईंगफिश एक्झॉसीटस व इतर जाती
हेकरू ग्राउपर एपिनीफेलस जाती
दडदडा (चिडी) गोटफिश म्युलायडीक्थीस जाती
रावस इंडियन सामन पॉलिनीमस टेट्राडॅक्टीलस
दाढा दारा, जायंट थ्रेडफिन पॉलिनीमस इंडिकस
घोळ ज्यूफिश प्रोटोनिबिया व वाक जाती
ढोमा ढोमा ढोमा ऑक्झीलॅरीस व जॉनीपस जाती
बला रिबन फिश ट्रायकियुरस लेप्ट्‍यूरस
वाकटी रिबन फिश लेपुराकेन्यस सवाला
बादवी (तनवार) बॅराकुडा स्फिरीना जाती

उत्पादन : जागतिक : मागे दिलेल्या जगातील सागरी भागांच्या मत्स्योत्पादनात माशांच्या पुष्कळ जाती आहेत. तसेच त्यात देवमासे, कोळंबी, खेकडे, शेवंडे, कालवे, तिसऱ्या यांचाही समावेश आहे. यांतील काही मुख्य गट व त्यांचे जागतिक उत्पादन कोष्टक क्र.५ मध्ये दिले आहे. यात क्रील नावाचा लहान, २ सेंमी. लांबीचा, तुडतुड्या कोळंबीसारखा प्राणीदेखील समाविष्ट आहे. हा प्राणी दक्षिण व उत्तर ध्रुवांजवळच्या समुद्रांत आढळतो. समुद्रात याचे मोठाले थवे सापडतात. उन्हाळ्यात देवमासे या प्राण्यावर आपली उपजीविका करतात. १९७४-७५ सालापासून क्रीलचा उपयोग पशुखाद्य म्हणून होऊ लागला आहे व आता याच्या उत्पादनावर विशेष लक्ष दिले जाते. देवमाशांच्या शिकारीवर आता कायद्याने बंदी घालण्यात आली असली, तरीही गाधेमासे (देवमाशांची लहान जात) अजूनही पकडले जातात. यांचे व बेडकांचेही उत्पादन कोष्टक क्र. ५ मध्ये दिले आहे.

कोष्टक क्र. ५. जागतिक सागरी मत्स्योत्पादन

मत्स्यप्रकार                    उत्पादन (हजार टनांत)
१९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८
हॅलिबट, फ्लाउंडर, भाकस इ. १,१८८ १,१५७ १,१३४ १,०८३ १,२१३
कॉड, हेक, हॅडॉक इ. १२,६७९ ११,८६० १२,१३० १०,५९६ १०,४५०
तांबुसे, हेकरू, करकरे इ. ४,९१७ ५,०६४ ५,०२२ ५,३६७ ५,२१५
काट बांगडे, बोय, सौरी इ. ५,३८१ ५,८९२ ७,२७९ ८,७१८ ८,१७५
हेरिंग, तारली, मांदेली इ. १४,०३० ११,७३९ १५,१४६ १२,८९० १३,९१७
कुप्पा, ताडमास २,२३४ २,०७० २,२९९ २,३५६ २,५२२
बांगडे, सुरमई, करली इ. ३,६१० ३,५९८ ३,३२९ ३,५५५ ४,०५७
मुशी, लांज, पाकट इ. ५५५ ५९५ ५५५ ५६० ६०६
इतर सागरी मासे ९,६४३ ९,३८२ ९,७८१ ९,९८९ १०,०५०
खाऱ्या चिंबोऱ्या ४०५ ३७९ ३९९ ४४३ ४९४
शेवंड, पफेशेवंड इ. १५८ १७२ २०३ १८४ १९२
कोळंबी (समुद्री) १,३२३ १,३२२ १,३९६ १,४७४ १,४७४
क्रील २२ ४० १२२ १२९
इतर कवचधारी प्राणी (समुद्री) ६५ ६० ५३ ६१ ५१
कालवे ७३९ ८४८ ९०४ ८७ ९००
तिसऱ्या, शिवळ्या ३८१ ४६७ ४८१ ५१७ ५०२
गाधेमासे ३,४०८ ३.३५५ ३,६०८ ३,७०२ ३,७०२
बेडूक १.५ १.१ १.२ ०.८ ०.९

भारत : भारत सरकारच्या मत्स्यसांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीवरून भारतातील १९७६ ते १९८० या पाच वर्षांतील सागरी मत्स्योत्पादन कोष्टक क्र. ६ मध्ये दिले आहे.

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील सागरी मत्स्योत्पादन कोष्टक क्र. ७ मध्ये दिले आहे.

मच्छीमारांची संख्या : मत्स्योद्योगातील बरीच कामे आता यंत्रांच्या साहाय्याने केली जातात, तरीही ही यंत्रे चालविण्यात व या व्यवसायाच्या इतर क्षेत्रांत बरेच लोक गुंतले आहेत. मच्छीमार कोणास म्हणावे याबद्दलही एकमत नाही. निरनिराळ्या देशांत मच्छीमारांची व्याख्या  निरनिराळी आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे मासेमारी मचव्यावर काम करणारे सर्व लोक मच्छीमार म्हणून धरले जातात मग ते कप्तान असोत, खलाशी असोत, डॉक्टर असोत वा  मचव्यावरची इतर कामे करणारे असोत. मच्छीमारी करणारे, जाळी दुरुस्त करणारे, पकडलेले मासे बाजारात नेणारे हे सर्व स्त्रीपुरुष व त्यांचे कुटुंबीय मच्छीमारच होत. काही ठिकाणी काही कुटुंबे काही काळ मच्छीमारी, तर काही काळ शेतीही करतात. आइसलँड या देशात कुटुंबाचे मच्छीमारीपासून उत्पन्न पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आहे ते कुटुंब मच्छीमार म्हणून गणले जाते. जपानमध्येही अशीच पद्धत आहे; परंतु शिवाय त्यात अशी अट आहे की, मच्छीमाराने निदान ३० दिवस तरी समुद्रावर मच्छीमारी केली पाहिजे. मच्छीमाराच्या निरनिराळ्या देशांतल्या निरनिराळ्या व्याख्यांमुळे जगात मच्छीमारांची संख्या निश्चित किती आहे ते सांगणे कठीण आहे; तरीही यूरोपमध्ये ही संख्या ५ लक्षापेक्षा जास्त, उत्तर अमेरिकेत अंदाजे २ लक्ष, दक्षिण व मध्य अमेरिकेत ५ लक्ष, आशियात ४८ लक्ष व सर्व जगात अंदाजे ६५ लक्ष असावी. हे मात्र खरे की, या क्षेत्रात होणाऱ्या यांत्रिकीकरणामुळे व इतर क्षेत्रांतील आकर्षक व्यवसायांमुळे ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. भारतात सागरी व गोड्या पाण्याच्या भागांतील मच्छीमारांची एकंदर संख्या ५.६ लक्ष असावी, असा अंदाज आहे. त्यांपैकी  ३.२ लक्ष नदी-तलावांच्या काठी राहतात. ही गणती परंपरागत मच्छीमारांचीच आहे.

कोष्टक क्र. ६. भारतीय सागरी मत्स्योत्पादन 

                             उत्पादन (टनांत)
मत्स्यप्रकार १९७६ १९७७ १९७८ १९७९ १९८०
मुशी, पाकट वगैरे ५४,६०६ ६२,२१६ ६१,६२१ ५२,८४३ ५७,७६३
वाम ८,२९६ १२,९९० ८,७८१ ७,१५५ १२,०९९
मांजरी मासे ४३,५४० ५३,५०४ ३९,२३१ ४८,८१७ ४५,६२४
करली, दताळी १०,३६८ ११,५०० १०,९९० १०,२७४ १६,८२९
तारली १,६९,२६२ १,५०,१३० १,६८,०७८ १,५३,९७१ १,०७,९४६
पेडवे वगैरे १,००,००० ६५,२२४ ५२,८३८ ६८,३५१ ६६,७४८
पाला ७,८४२ ४,१८६ ९,८९४ १२,०६८ ६,९९७
भिंग ४,८८२ १४,६५१ १२,८०० ८,६७२ ९,१२८
मादेली, नेतली ३०,०६९ ३४,०३३ ३९,०५४ २६,५८८ १३,१६२
काटी व इतर क्लुपिडी ८४,८२४ ५१,३८७ ५१,३२४ ५०,५९३ ५६,५५७
बोंबील ८७,०७५ ८५,२३६ १,२५,४८१ १,२६,०४४ ९४,४२६
चोर बोंबील ५,२९२ ८,५२५ १०,८०८ ११,१५४ ११,३१२
टोकी वगैरे १,१६९ २,३११ १,४७८ १,५७७ १,६५३
उडणारे मासे १,४३९ ६४३ १,६८१ २,५४६ १,२५५
हेकरू, तांबुसे वगैरे १८,१६२ ३१,७३९ ४९,३१२ ३५,६५७ ३८,५४१
दडदडा ५,२१६ २,४२२ २,९८४ ३,१३० २,४१६
घोळ, ढोमा वगैरे ८७,५८१ ९९,८८७ ९६,३७९ ९३,०१८ ८९,३७७
रावस, दाढा वगैरे १४,५७२ ३,९२९ ५,४६९ ५,८०९ ६,०५६
बाकटी, बले ६४,५४२ ४२,४०७ ७७,७८५ ७१,३४९ ६२,७७८
शितप, काट बांगडे इ. ३१,३१८ ३५,७३९ २१,४७५ ३३,७८९ २९,४९३
काप, चरवट इ. ४३,४११ ३४,५६५ ४१,८८१ ५५,४६३ ५४,५९०
सौंदाला १२,०४५ १०,९६१ ७,९०६ ४,४७४ ७,४०८
सरंगा व हलवा ३७,७०१ ३५,१२७ ४१,४३४ ४०,४२७ ३८,०१९
बांगडा ६५,४९७ ६२,१३६ ८२,२३३ ७१,५१४ ५४,३३०
सुरमई, तोवर २०,१५९ २१,११९ २०,७७९ २९,५४७ २५,९८५
कुप्पा, गेदर इ. १९,५२२ १३,००५ १३,८९३ २६,५९५ २०,२६२
बादवी, तनवार २,३८८ २,४२३ ३,७०९ २,२६५ १,७८३
बोय, मांगण इ. २,६१३ २,२६९ २,६२६ १,४०० २,०३०
खाडे ३८० ३० १८४ ६३८ ९१६
लेपटी, भाकस इ. १०,०८८ १०,८१० १३,६२० १२,२०३ १३,६३२
मोठी कोळंबी (पीनीड) १,१४,६४० ९६,४७२ १,२९,२०४ १,१३,६६५ १,१२,०५१
करंदी वगैरे (नॉनपीनीड) ७६,७८७ ७३,९९२ ५०,६५२ ६३,९१७ ५७,३२५
शेवंडे २,५३२ १,२१७ १,३०७ १,१३५ ५६९
खेकडे वगैरे १९,९९९ २०,०६८ १४,२०२ २०,३०४ २५,४९६
माकुल १०,८२६ १०.००५ १५,९३१ १५,०३२ ११,३३६
इतर जाती ९०,८१२ ९१,९४५ १,१३,५८२ १,०६,२५० ६४,५३६

मासेमारी साधनांचा विकास : प्रथमावस्थेत आदिमानवआपल्या हाताने शिकार करत असावेत. याबरोबरच खोल पाण्यात बुडी मारूनही मासे पकडत असावेत. या दोन्ही प्रकारांत टोकदार काठ्या, तिरकमठे, त्रिशूळ वगैरे आयुधे वापरण्यात येऊ लागली. गुंगी आणणारे रसायन पाण्यात टाकून गुंगलेले मासे पकडणे हाही प्रकार अस्तित्वात होता. पुढे मऊ वेलींचे फास करून मासे पकडे जाऊ लागले. या प्रकारातून मासे पकडण्याचे जाळे निर्माण झाले व जाळे टाकून मोठ्या संख्येने मासे पकडण्याची पद्धत प्रचारात आली. याच सुमारास गळाची कल्पना मानवाला सुचली व गळाला आमिष लावून मासे पकडणे सुरू झाले. नंतर काठीस एका वेळी एक गळाऐवजी अनेक गळ लावून मासे पकडण्याची पद्धत प्रचारात आली. वेलीच्या फासात मासे पकडण्याच्या कल्पनेतूनच निरनिराळी सुताची किंवा तागाची जाळी अस्तित्वात आली. फास जाळी, ओढ जाळी, ट्रॉल जाळी, खिरजाळी, बोकसी, डोळ वगैरे प्रकारची जाळी प्रचारात आहेत. तरंगणाऱ्या लाकडाच्या ओंडक्यावर बसून व गळ टाकून मासे पकडणे हाही एक नवीन प्रकार रूढ झाला. यातूनच पुढे तरंगणाऱ्या ओंडक्याऐवजी नौका वापरण्याची कल्पना पुढे आली. नौकेच्या वापरामुळे मासेमारीचे क्षेत्रही वाढले नुसते किनाऱ्यावर बसून मासे पकडण्याऐवजी नौकेने समुद्रात दूरवर जाऊन मासे पकडणे शक्य झाले. याबरोबरच जाळ्यांचे आकारमान व प्रकारही वाढले. आता मोठमोठ्या नौकांचा मच्छीमारीसाठी उपयोग केला जातो. मोठी लांबलचक जाळी पाण्यात फेकली जातात. माशांचे थवे हाकलून व जेथे लांब जाळी टाकली आहेत अशा विवक्षितक्षेत्रात आणले जातात. वरून जसे जाळे फेकले जाते तसेच तळाजवळ जाळे पसरवून त्यावर आलेले मासे अलगद जाळे वर उचलून पकडले जातात. या मच्छीमारीत चांगल्या मोठ्या आकारमानाच्या नौकेस फार महत्त्व आहे. निरनिराळ्या देशांत मच्छीमारीच्या साधनांत वेळोवेळी सुधारणा होत आहेत.

कोष्टक क्र. ७. महाराष्ट्रातील सागरी मत्स्योत्पादन

मत्स्यप्रकार                                                     उत्पादन (टनांत)
१९७६-७७ १९७७-७८ १९७८-७९ १९७९-८० १९८०-८१
मुशी, पाकट इ.

वाम

मांजरी मासे

करली, दताळी

तारली

पाला (भिंग)

मांदेली

काटी

इतर क्लुपिड

बोंबील

हेकरू, तांबुसे इ.

रावस, दाढा इ.

घोळ

वाकटी, बले

ढोम

शितप, काट बांगडा इ.

सरंगा (पापलेट)

हलवा

बांगडा

सुरमई

कुप्पा, गेदर

खाडे

लेपटी, भाकस

काप, कटाटी

चिडी, दडदडा

सौंदाला

कोळंबी

करंदी

शेवंडे

माकुल

इतर जाती

८,२०१

८,४८३

९,०८८

३,९२९

४,७०१

१,३६६

२३,२५१

६,४००

१,०६६

८८,५०४

५२९

३५१

३,२४३

२३,१२०

२०,००५

१,८०७

१६,५१४

३,०५६

३२५

३,१९२

१,२६७

६७३

१,९७५

४०६

४,४०८

१,४६६

२९,४७४

१,२२,९३५

२५५

१,६९५

९,४३२

१०,०४४

५,८६०

१०,८११

३,४५१

५,८१५

१,८६१

१८,६२१

५,००९

९७४

४९,९५०

५९५

३५२

३,२८३

१५,४७३

१७,८७२

१,९९७

९,३२०

९१९

६१७

२,८४५

२,२६५

२४६

१५९७

५६५

४,९५८

२,२४६

३०,२०७

७४,५५२

२४९

२,३३४

९,५२५

८,००१

११,१९०

९,६८७

४,८२२

३,४७४

१,६८४

२१,१५६

६,१०१

२,१२०

७५,००९

७४८

४५०

५,२९८

१८,५७९

१८,६२१

२,६३१

१२,५८१

१,६२१

१,७१३

६,९९०

३,६२९

३०७

१,५९८

२८९

३,९३१

१,९७५

३७,०७८

१,०३,०३५

४५२

२,७८०

१७,०४३

८,५००

६,४२१

१०,३८६

३,९०१

२,८६०

४,९२९

१६,६०४

४,९८६

२,३९६

७७,३१०

३३९

५४२

३,०९२

१८,७३४

२०,१८२

४,०२९

१३,४९०

१,९०३

२३७

४,१७०

१,१८१

८०९

२,७६८

४७०

४,४९७

१,८१९

२६,४६०

९९,२०४

३७१

२,०२३

१३,६३८

११,१६९

८,९४०

१३,०२४

५,९५३

२१,१८२

२,४८८

१७,७७२

६,४९२

२,२९४

६०,७४७

९१७

३०२

१,७५१

२०,१७४

१९,५९२

२,१०२

२०,५४०

२,२९९

२,७४९

९,३२५

५,३७०

१,०८५

२,१५१

६९६

५,०९३

१,६५३

३०,५४२

७९,५५६

४३९

१,३३८

१४,४९८

यूरोपातील उत्तर समुद्रात हेरिंगची मासेमारी मध्ययुगापासून होत आहे. या मासेमारीत फास जाळी वापरतात. १४९७ साली जॉन कॅबट या इटालियन समन्वेषकांनी उत्तर अमेरिकेतील न्यू फाऊंडलंड बेटाचा शोध लावला पण यापूर्वींच स्पॅनिश लोक या भागात कॉडची मासेमारी करीत होते. देवमाशांची मासेमारी सतराव्या शतकापासून सुरू झाली. भारतातील मासेमारीही पुरातन आहे पण ती लहान प्रमाणावर व लहान मचव्यांच्या साहाय्याने होत असे. या मचव्यांचे यांत्रिकीकरण यूरोपमध्ये एकोणिसाव्या शतकातच झाले. प्रथम वाफेवर चालणारी एंजिने मचव्यावर बसविली गेली. या एंजिनांच्या शक्तीवरच ट्रॉल जाळी ओढण्यासाठी लागणाऱ्या कप्प्याही चालविल्या जात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच लहान मचवेदेखील तेल एंजिनावर चालू लागले. भारतात हा बदल १९४६ पासून दिसू लागला.

या विषयातील यांत्रिक ज्ञान जसजसे वाढू लागले तसतसे जाळी, त्यांचे आकार व लांबी-रुंदी, त्याचप्रमाणे या व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या नौका (मचवे) व जहाजे, त्यांवरील एंजिनांची रचना व अश्वशक्ती, इतर अवजारे व यंत्रे यांतही सुधारणा होऊ लागली. ही मासेमारी जहाजे यंत्रसज्ज होऊन आता रशिया, अमेरिका यांसारख्या प्रगत देशांत आकारमानाने १५,००० टनांपर्यंत गेली आहेत. अशा मोठ्या मूळ जहाजावर प्रत्यक्ष मासेमारी करणाऱ्या लहान नौका ठेवलेल्या असतात. समुद्रावर मासेमारीच्या क्षेत्रात हे मूळ जहाज गेल्यावर तेथे या लहान नौका पाण्यावर उतरविल्या जातात. पकडलेले मासे लहान नौकांनी मूळ जहाजावर आणले जातात व तेथे सुसज्ज यंत्रसामग्रीच्या साह्याने त्यांच्यावर निरनिराळ्या प्रक्रिया केल्या जातात. काही मासे बर्फात ठेवून टिकविले जातात, तर काही मासे हवाबंद डब्यांत भरले जातात. काही माशांची कोरडी भुकटी केली जाते. दोन-तीन महिने समुद्राच्या खोल भागावर मासेमारी केल्यानंतर हे मूळ जहाज बंदरात येते व तेथे पकडलेले बर्फाच्छादित सर्व मासे व त्यांच्यापासून बनविलेले इतर पदार्थ उतरविले जातात.

पूर्वी मासेमारी किनाऱ्याजवळ होत असे. एंजिनावर चालणाऱ्या लहान नौका उपलब्ध झाल्यावर मासेमारीचे क्षेत्रही जास्त विस्तृत झाले. यंत्रसज्ज मासेमारी जहाजे अस्तित्वात आल्यावर समुद्रावर दूर अंतरावर कोठेही मासेमारी करणे शक्य झाले. यामुळे निरनिराळ्या देशांतील मच्छीमारांच्या समुद्रावर गाठी पडू लागल्या. कधीकधी त्यांच्यात झगडेही निर्माण झाले. या सर्व अडचणींचा विचार करून मच्छीमारीसंबंधी सर्व राष्ट्रांच्या संमतीने एक आंतरराष्ट्रीय करार अस्तित्वात आला. समुद्रसंपत्तीवर प्रत्येक राष्ट्राचा किती हक्क आहे, याचाही विचार करण्यात आला.

समुद्रावर दूरवर जाऊन मासेमारी करता करता खोल पाण्यातील मासेमारी अस्तित्वात आली व याच्या अनुषंगाने मच्छीमारी करणाऱ्या मोठ्या जहाजांत व त्यांच्या एंजिनांत तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या. मादीरा (स्पेन) भागातील मच्छीमार १,००० मी. खोलपर्यंत जाळे टाकून एस्पडो (अपरनस कार्बो) या प्राण्यांची शिकार करीत असत. काही भागांत ट्रॉल जाळेही इतक्या खोलीवर टाकतात. याला लागणारा पोलादाचा दोर खूप मजबूत असतो व हा दोर खेचण्यास बऱ्याच शक्तिमान यंत्राचा उपयोग करावा लागतो. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी हे पोलादाचे दोर खेचण्यास यांत्रिक रहाट व बाष्पशक्तीवर, तेलावर किंवा विजेवर चालणाऱ्या एंजिनांचा उपयोग करण्यात येऊ लागला. १९५० च्या सुमारास जाळे खेचण्यास यांत्रिक कप्पी वापरण्यात येऊ लागली. खांद्याच्या मासेमारीसाठी (यासंबंधीचे वर्णन पुढे आले आहे) जपानी लोक यांत्रिक शक्तीवर चालणारा ड्रम वापरू लागले. ट्रॉल जाळे ओढण्यासाठी यांत्रिक रहाटाचा उपयोग हीही एक महत्त्वाची सुधारणा होय. ह्यामुळे मोठे जाळे सुलभतेने हाताळता येते. मिडवॉटर ट्रॉल हे अलीकडचे सुधारित जाळे आहे. साधे ट्रॉल जाळे पाण्याच्या तळावरून ओढले जाते, तर हे मिडवॉटर ट्रॉल पाण्यात हव्या त्या खोलीवर किंवा मध्यभागातून ओढता येते. तांत्रिक दृष्ट्या मच्छीमारीच्या विकासात हा एक फार महत्त्वाचा टप्पा गणला जातो. मच्छीमार जहाजावर पाण्याची खोली व माशांचे अस्तित्व जाणण्यासाठी प्रतिध्वनिमापक उपकरणे [⟶ प्रतिध्वनि], सोनार [⟶ सोनार व सोफार], माशांची गती व जाळ्यांची गती विचारात घेऊन जहाजाची गती कोणती असावी हे सांगणारे संगणक (गणक यंत्रे) वगैरे आधुनिक साधनांची योजना केलेली असल्यामुळे मासेमारीत खूपच स्वयंचलितपणा आला आहे व या क्षेत्रात खूप सुधारणा झाली आहे. याशिवाय मासेमारीचा एक आधुनिक प्रकार म्हणजे पाण्याखालील दिवे व विद्युत् प्रवाह वापरून त्यांच्या आकर्षणाने मासे पाण्यातच गोळा करून थोड्या पाण्यासहित पंपाच्या व लवचिक नळाच्या साहाय्याने जहाजात खेचून घेणे. या पद्धतीतही नित्य सुधारणा होत आहेत.

मासेमारीच्या पद्धती : बहुतेक देशांत प्राचीन काळी मासेमारीच्या पद्धती स्वतंत्र रीत्या अस्तित्वात आल्या असाव्यात व त्यांत गरजेनुसार सुधारणा झाल्या असाव्यात. मध्ययुगीन काळात काही देशांतील विशेषतः स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच व डच या लोकांनी घाडसी सागरी सफरी केल्या व यामुळे दूरदूरच्या देशांचे परस्परांशी संबंध आले आणि ज्ञानाची व अनुभवाची देवघेव झाली. यामुळे मासेमारीच्या पद्धतींतही सुधारणा घडून आल्या. व्हान ब्रॅन्ट यांच्या योजनेप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतींचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल : (१) कोणत्याही साहित्याशिवाय (नुसत्या हाताने), (२) माशास जखमी करून, (३) गुंगी आणून, (४) गळ वापरून (आमिष लावून), (५) सापळे वापरून, (६) नसराळ्यासारखी स्थिर जाळी वापरून, (७) खोळीसारख्या ओढ जाळ्याने (ट्रॉल), (८) दोन्ही टोकांनी खेचण्याच्या जाळ्याने (पेरा, राणप, घोळवा), (९) वेष्टन पद्धतीने, (१०) उडणारे मासे अडवून, (११) जाळ्यात उचलून, (१२) जाळे फेकून, (१३) जाळ्यात गुंतवून, (१४) अडथळेवजा जाळे वापरून, (१५) इतर साधनांचा उपयोग करून.

आ. १. मासेमारीची हातशस्त्रे : (१) कावर किंवा हार्पून, (२) पाच टोकांचे त्रिशूळासारखे हत्यार, (३) भाला, (४) बरची, (५) तलवार.

कोणत्याही साहित्याशिवाय : केवळ हाताच्या कुशल हालचालींनी मासे पकडण्याची रीत फार पुरातन असली, तरी ती आजही प्रचलित आहे. ओहोटीच्या वेळी पाणी आटल्यानंतर खोलगट खडकात किंवा लहान डबक्यात किंवा दोन खडकांमध्ये कित्येक लोक हातानेचमासे पकडतात.केरळात आणि अन्य काही ठिकाणी कुरकुऱ्या (क्रोकर) माशांचा आवाज ओळखून कुशल मच्छीमार बुडी मारून हाताने मासेपकडतो. मोत्यांची कालवे, साधी खाद्य कालवे, स्पंज, पोवळी, तिसऱ्या इ. प्राणीदेखील हातानेच पकडले जातात. शिकविलेले ऊद मांजर किंवा करढोक पक्षी यांच्याकडून करविलेली मत्स्यपारघही याच वर्गात मोडते.

जखमी करून : या प्रकारात मच्छीमाराच्या हातात तीक्ष्ण शस्त्र असते. ही हातशस्त्रे म्हणजे टोकदार काठी, भाला, बरची, तिरकमठा या प्रकारची असतात (आ. १) किंवा बंदूकही असू शकते. यांपैकी  कोणत्याही आयुधाने प्रथम माशास जखमी केले जाते व मग पकडले जाते. या प्रकारात आणखीही काही पद्धतींचा समावेश आहे.  अणकुचीदार टोकापाठीमागे वळलेला काटा अगर कानपा असलेली वरची व त्याला लांबलचकदोरीअसणारा हार्पून किंवा कावर हे शस्त्रही वापरतात. यानेच मोठ्या देवमाशांची शिकार करतात किंवा कधीकधी या शस्त्राने मोठे शिंग पाकटही मारण्यात येतात.

आ. २. गळाची दावण (खांदा) : (१) बोवरा (स्थानदर्शक पिंप) व निशाण,(२) भेंड (तरंगे), (३) पऱ्या, (४) दावे, (५) गळ, (६) बुडके (दगड).

गुंगी आणून : या प्रकारात मुख्यत्वेकरून पाण्यात योग्य असे विषारी रसायन टाकले जाते. यामुळे मासे मंद (सुस्त) होतात व पर्यायाने पकडले जातात. पश्चिम भारतात यासाठी रामेठ्याची (लॅसिओसायफन एरिओसेफॅलस) साल, नांग्या शेराचा (यूफोर्बिया तिरुकाली) चीक, निवराची (बॅरीगटोनिया रॅसिमोझा) साल इ. वस्तू वापरल्या जातात. सुरुंगाच्या दारूचा पाण्यात स्फोट केला, तर मासे स्तंभित होतात आणि या अवस्थेत त्यांना पकडणे सोपे जाते. पाण्यात विजेचा प्रवाह सोडूनही माशांना निश्चेष्ट करता येते आणि पकडता येते. या प्रकारास विद्युत् मत्स्यपारध असे म्हणतात.

आ. ३. धावते गळ : (१) यांत्रिक मचवा, (२) लाकडी वासा, (३) गळदोरी, (४) गळ.

गळ वापरून : गळाने मासे मारण्याच्या पद्धतीत तारेचा वाकवलेला गळ असतो व याच्या आतील बाजूस मागे वळविलेले टोक असते. त्याला कानपा असे म्हणतात (विविध प्रकारच्या गळांच्या चित्रांसाठी ‘मत्स्यपारध’ ही नोंद पहावी). यामुळे मासा गळास लागला की, त्यास स्वतःची सुटका करून घेता येत नाही. गळास नेहमी आमिष लावावे लागते. आमिषाचे निरनिराळे प्रकार ‘मत्स्यपारध’ या नोंदीत दिलेले आहेत. व्यावसायिक मासेमारीत जास्तीत जास्त मासे कसे पकडता येतील, हे पहावे लागते. याकरिता गळाने करण्याच्या मासेमारीत एका वेळी एकापेक्षा अधिक गळ दांडीस बांधले जातात. मरळ किंवा मुश्यांची मासेमारी करताना एक काठीन वापरता, एका लांब दोरीला (दावणीला) दोरीच्या छोट्याछोट्या तुकड्यांनी (दाव्यांनी) पुष्कळसे गळ बांधतात (आ. २). या प्रकारास सागरी मासेमारीत ‘स्वांदा’ (लॉग लाइन) म्हणतात. यात तरता खांदा म्हणजे पाण्याच्या खोलीच्या मध्यभागी राहणारी दावण व दुसरी तळाशी जाणारी दावण.मुश्या मारताना हा खांदा समुद्राच्या पाण्यात नौकेपासून तिरका लोंबता असतो. कॉड, हॅडॉक, हॅलिबट हे मासे पकडण्याकरिता खांदा तळावर पसरलेला असतो. ट्यूना पकडण्याच्या दोन तऱ्हा आहेत. एक वर वर्णन केलेली ‘खांदा’ व दुसरी ‘पोलबंड लाइन’. या दुसऱ्या तऱ्हेत जाड बांबूला तोकडी दोरी व तिच्या टोकाला कानपा नसलेला एकाच टोकाचा गळ असतो. या प्रकाराने ट्यूना भराभर पकडले जातात कारण जेथे मासेमारी करावयाची त्या क्षेत्रात छोटे मासे फेकले की, त्यांना खाण्याकरिता ट्यूना आकर्षित होतात व साध्या गळाने पटापट पकडले जातात. काही ठिकाणी स्टर्जन मासेही या प्रकारेच पकडले जातात. यांशिवाय ‘धावते गळ(ट्रॉलिंग) हीही एक पद्धत आहे (आ. ३). यात यांत्रिक मचव्यावर  दोन्ही बाजूंस लांबीशी काटकोन असणारे दोन वासे बांधतात आणि त्यांना निरनिराळ्या लांबीच्या दोऱ्या (पऱ्या) बांधून, दोऱ्यांच्या शेवटी गळ व गळावर आमिष लावतात. अशी व्यवस्था असलेला मचवा एंजिनाने हाकारला की, दोरीला बांधलेले गळही मचव्याबरोबर ओढले जातात म्हणून त्यास ‘धावते गळ पद्धत’ म्हणतात. पृष्ठभागावर वावरणारे मासे या गळावर असेलेले आमिष खाण्यासाठी चावा घेतात आणि गळास अडकतात. या प्रकाराने सुरमई, ट्यूना यांसारखे मासेही पकडले जातात.

आ. ४. निरनिराळ्या आकारांचे बुरडी सापळे

सापळे वापरून : यात मासे पकडण्याच्या बाबतीत खूपच कल्पकता असावी लागते. मच्छीमारास  माशांचा स्वभावधर्म, त्यांच्या हालचालींची तऱ्हा यांविषयीचे ज्ञान असणे आवश्यक असते. प्रत्येक प्रकारचा सापळा बनविताना तो माशांना आत शिरताना सोईस्कर व सोपापण  बाहेर  पडण्यास मात्र अशक्य होईल याची काळजी ध्यावी लागते. ह्या मूलतत्त्वावर आधारित माशांच्या सापळ्यांचे आकार व स्वरूप निरनिराळे असते. हे बहुधा सुक्या वेलींचे किंवा बांबूच्या चिपांचे केलेले असतात म्हणून त्यांना बुरडी सापळे म्हणतात (आ. ४). इटतील साधे सापळे म्हणजे विशिष्ट आकाराची मडकी असतात. रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी लहान तोंडाच्या मडक्यात शिळा भात ठेवून ते मडके तळ्यातील पाण्यात ठेवतात व दुसऱ्या दिवशी त्यात आलेलेमासे पकडतात. नुसत्या काटक्या किंवा सुकलेली झुडपे पाण्यात टाकून माशांना लपण्यासाठी जागा तयार करण्यात येते. या जागेजवळचे पाणी हलविले की, मासे, झिंगे वगैरे प्राणी या जागेत येऊन लपून बसतात. या झुडपावर फेकजाळे टाकून त्यांना पकडणे सोपे जाते. शिंगी, मागूर व खरबी पकडण्यासाठई आंध्र प्रदेशात उभट आकाराचे करंडे वापरतात. शेवंडे व खेकडे पकडण्याचे सापळे तर प्रख्यात आहेत. गोल पिंजरा (फाइकनेट आ. ५) व कोंडवाडी पिंजरा (पाउंडनेट आ. ६) हे खूप मोठ्या आकारमानाचे सापळे असतात. ते तारेच्या जाळ्यांनी किंवा विणलेल्या जाळ्यांनी आच्छादलेले असतात व कोठी या भागात त्यांचे आवडते खाद्य ठेवलेले असते. अशी जाळी भूमध्यसमुद्रात ट्यूना पकडण्यासाठी तर बाल्टिक समुद्रात वाम पकडण्यासाठई सुद्धा वापरतात. काही ठिकाणी सामन मासेही या जाळ्यांनी पकडतात. बंगालच्या नद्यांतून वापरले जाणारे सांगला जाळे (आ. ७) हा देखील एक टांगता सापळाच आहे. पाला मासे जाळ्याच्या तोंडातून आत शिरले की, मच्छीमार तिथला दोर ओढून जाळ्याचे तोंड बंद करतो व जाळे वर खेचतो. भारतात, विशेषतः वायव्य किनाऱ्यावर जेथे भरती मोठी असते तेथे सुटे दगड रचून चंद्राकार किंवा त्यापेक्षाही जास्त असे गडगे बांधतात. भरतीच्या वेळी हा सर्व  भाग पाण्याखाली जातो व याबरोबरच या भागात मासेही येतात. ओहोटी झाली की, गडग्यातील पाणी निघून जाते व मासे पाण्याच्या डबक्यात अडकून पडतात. हे मासे हातजाळ्याने पकडणे सोपे जाते. या प्रकारास मुंबई व उपनगरात कालेव म्हणतात (आ. ८). ही रीत बऱ्याच काळापासून वापरात आहे. या प्रकारासही एक तऱ्हेचा सापळा असे म्हणता येईल.

आ. ६. कोंडवाडी पिंजरा : (१) अडसर जाळे (मार्गदर्शक), (२) द्वार, (३) उभे जाळे, (४) शेपूट, (५) माजघर, (६) कोठी.
आ. ५. पिंजरे : (अ) गोल पिंजरा : (१) द्वार, (२) जाळे, (३) बांबचा गाडा (वर्तुळाकार कडे), (४) शेपूट, (५) माजघर, (६) कोठी, (७) निमुळता मार्ग; (आ) शेवंड्याचा पिंजरा : (१) द्वार, (२) लोखंडी जाळी, (३) लोखंडी गाडा, (४) कोठी, (५) निमुळता मार्ग.

नसराळ्यासारखी स्थिर जाळी : ही जाळी नसराळ्यासारखी निमुळती असून पाण्याच्या प्रवाहात स्थिर अशी बसविलेली असतात. यावरून  समुद्राचे किंवा नदीचे पाणी वाहत असते. या प्रवाहाबरोबर मासेही जाळ्यात शिरतात आणि तेथे अडकून पडतात व पकडले जातात. स्कॉटलंडमधील ‘स्टोव जाळी’ यासारखीच रुंद वाटोळ्या तोंडाची पण मागे निमुळती असतात व ती मासेमारी बोटीच्या मागे नांगर टाकून नांगराच्या दोरास बांधलेली असतात. या जाळ्यांची तोंडे चांगली उघडी रहावी म्हणून अलीकडे धावते फळेदेखील वापरण्यात येऊ लागले आहेत. भारतात खाडीच्या तोंडाजवळ खांब किंवा खुंट पुरून त्यांना नसराळ्यासारखी निमुळत्या आकाराची जाळी बांधण्याची पद्धती रूढ आहे. महाराष्ट्रात या जाळ्यांना बोकसी व गुजरातेत घोळ किंवा गोलवा असे म्हणतात. ही जाळी ‘डोळ’ या जाळ्यासारखीच (आ.१०) पण आकाराने लहान असतात. नदीच्या पात्रात वापरावयाची बोकसी थोडी निराळ्या आकाराची असते (आ.९). भरतीचे पाणी जेव्हा खाडीत येते तेव्हा जाळ्याचे तोंड भरतीच्या दिशेकडे केलेले असते, त्यामुळे पाण्याबरोबर येणारे मासे जाळ्यात शिरतात. जाळ्याच्या तोंडाचा व्यास सु. २५ ते ३२ मी. असतो व तो लहान होत होत शेवटी ०.५ मी. होतो. या शेवटच्या भागास ‘खोला’ म्हणतात. पाण्याच्या ओघाबरोबर जाळ्यात शिरलेले मासे त्यातून परत फिरू शकत नाहीत. भरतीचा जोर कमी झाला की, खोला वर ओढतात व त्यातले मासे बाहेर काढून घेतात. काही ठिकाणी ओहोटीच्या वेळीही हे जाळे लावतात पण या वेळी जाळ्याचे तोंड विरुद्ध दिशेला म्हणजे ओहोटीचे पाणी येण्याच्या दिशेने ठेवतात व ओहोटी पूर्ण होताच जाळ्याचे टोक (खोला) वर घेऊन मासे बाहेर काढून घेतात.

आ. ७. सांगला जाळे : (१) बुडके (दगड), (२) ओढण्याचा दोर, (३) जाळे, (४) जाळे टांगण्याचा दोर.
आ. ८. कालेव : (१) दगडांचा गडगा (छोटी भिंत), (२) बोक्सी (नसराळ्यासारखे जाळे), (३) खुंट.

समुद्रातही अशाच प्रकारचे पण आकाराने खूप मोठे असे जाळे वापरले जाते. त्याला ‘डोळ’ म्हणतात (आ. १०). ज्या ठिकाणी भरतीचा जोर सरळ असतो म्हणजे पाणी भोवऱ्यासारखे फिरत नाही तेथे समुद्रात १२ ते ३० मी. खोलीवर १५ ते ४० मी. लांबीचे व सु. ०.७ मी. व्यासाचे भले मोठे खांब पुरले जातात. या खांबांस ‘मेढे’ म्हणतात. हे तीनचार वासे एकमेकां स जोडून केलेले असतात. पुरावयाचा भागटोकदारअसतो. मेढे पुरण्याची (मारण्याची) पद्धत जी महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर व विशेषतः मुंबईच्या परिसरात प्रचलित आहे, ती अत्यंत मनोरंजक व कल्पनाप्रचुर अशी आहे. अगोदर मेढे पुण्याची जागा निश्चित करावी लागते. तयार केलेला मेढा घेऊन दोन मचवे या निश्चित केलेल्या जागेवर जातात. दोन आडवे वासे या दोन्ही मचव्यांच्या मधोमध बांधतात (आ. ११). मचव्यांच्या चारी टोकांपासून चार नांगर टाकले जातात. यामुळे हे दोन जोडलेले मचवे एका ठिकाणी स्थिर राहतात. त्यांची हालचाल पाण्याच्या लाटा किंवा लहान लाटांबरहुकूम फक्त वरखाली अशीच होऊ शकते. जो मेढा पुरावयाचा असता तो अगदी ओळंब्याप्रमाणे सरळ उभा असा ठेवून त्याच्या वरच्या टोकावर एक दोर बांधतात व त्याचे एकएक टोक एकेका मचव्यात आडव्या वाश्याला वेढे घेऊन काही मच्छीमार तो हातात ताठ ओढून धरतात. ज्या वेळी पाण्याच्या लाटेमुळे दोन्ही मचवे वर उचलले जातात तेव्हादोर सैल होतात. सैल झालेले दोर मच्छीमार एकसमयावच्छेदेकरून जोराने खेचतात. परिणामी दोन्ही मचव्यांचे वजन त्या उभ्या मेढ्यावर पडते व तो चिखलात रोवला जातो. प्रत्येक लाटेच्या वेळी ही क्रिया केली जाते व त्यामुळे मेढा हळूहळू चिखलात पुरला जातो. अशा रीतीने सु. चार तासांत एक मेढा अंदाजे चार ते सहा मीटर रोवला जातो. वाऱ्यांमुळे उद्भवणाऱ्या लाटांचा व मचव्याच्या वजनाचा उपयोग करून अशा रीतीने अनेक मेढे खोल समुद्राच्या तळावर पुरले जातात. या प्रकारात मच्छीमारांनी स्वतःची कल्पकता अत्यंत कुशलतेने उपयोगात आणली आहे.

आ. ९. नदीतील बोकसी : (१) खुंट, (२) बोयरा, (३) खोला.

दोन मेढ्यांमध्ये निमुळते, नसराळ्याचा आकाराचे पण खूप मोठे, सरासरी ११० मी. परिध असलेले व ३० मी. लांबीचे डोळ जाळे विवक्षित पद्धतीने, लहान-मोठ्या दोराने बांधतात. या जाळ्याच्या मोठ्या तोंडातून मासे आत येतात व ते शेवटच्या निमुळत्या भागात गेल्यावर त्यांना बाहेर पडता येत नाही. या शेवटच्या भागाला खोला म्हणतात. या भागास एक दोर बांधलेला असतो. या दोराच्या साह्याने हा भाग वर खेचला जातो व त्यातील मासे काढून घेता येतात. पुष्कळ मेढे एका ओळीत पुरलेले असतात. दोन मेढ्यांत एक याप्रमाणे अनेक डोळ जाळी रांगेने बांधलेली असतात. काही ठिकाणी भरती-ओहोटी या दोनही वेळी असली जाळी बांधतात व जाळ्यात अडकलेले मासे पकडले जातात, तर काही ठिकाणी भरतीच्या वेळीच फक्त मासेमारी केली जाते.

आ. १०. डोळ जाळ्याचे प्रकार : (अ) कवीची डोळ : (१) मेढा (खांब), (२) डोळ जाळे, (३) खोला; (आ) सजाची डोळ : (१) बोयरा (पिंप), (२) डोळ जाळे, (३) सजाचे दोर, (४) खुंट (मोक), (५) खोला; (इ) नांगरी डोळ : (१) नांगर, (२) मुख्य दोर (खुराम), (३) डोळ, (४) डोळीची चौकट, (५) लाकडी बोयरे, (६) खोला.

परिस्थितीनुरूप या प्रकारात सुधारणा करण्यात आली आहे. लाकडी मेढे फार महाग झाल्यामुळे त्यांऐवजी जाड दोर समुद्राच्या तळाशी पुरलेल्या खुंटास बांधला जातो किंवा दगडांच्या राशीत अडकवून तळावर बसविला जातो. हा दोर ताठ रहावा म्हणून पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारे बोयरे किंवा तरती पिंपे या दोरास बांधली जातात. या ताठ दोरांना डोळ जाळी अडकविली जातात. या प्रकाराला सस किंवा सज म्हणतात [आ. १० (आ)]. तळाशी दोर बांधण्यासाठी ३ मी. लांबीचा एक खुंट चिखलात पुरला जातो. हा खुंट पुरण्याची रीतही मेढे पुरण्यासारखी आहे. खुंट लांबीने कमी असल्यामुळे दुसरा एक मेढा त्या खुंटावर बसवतात. या दुसऱ्या मेढ्यास खालील बाजूस एक शेंबी (कॉलर) असते. त्यामुळे तो टोपीसारखा खुंटावर बसतो व सलग खांबासारखा होतो. नंतर वर वर्णन केल्याप्रमाणे दोन मचव्यांच्या साह्याने हा खुंटदेखील चिखलात खोल पुरला जातो. खुंट पुरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मेढ्यांना ‘पायली मेढा’ म्हणतात. खुंट पुरण्याच्या अगोदरच त्याला जाड दोर बांधलेला असतो. शेंबीमध्ये बसविलेला खुंट पुरून झाला की, विशिष्ट तऱ्हेचा हिसका देऊन शेंबीसहित वरचा भाग म्हणजे पायली मेढा काढून घेतला जातो. दोन खुंटांच्या दोरांना एक डोळ जाळे बांधले जाते. जेथे लाकडी मेढे वापरतात त्या पद्धतीस‘कव’ म्हणतात. मेढे किंवा सज मासेमारी हंगामाच्या सुरुवातीस म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत पुरावे लागतात व हंगामाच्या शेवटी म्हणजे मे महिन्यात उपटून परत आणावे लागतात. हा खटाटोप दरवर्षी करावा लागतो.

आ. ११. मेढे मारण्याची पद्धत : (अ) वरून दिसणारा देखावा : (१) मचवा, (२) आडवे बांधलेले वासे, (३) उभा केलेला मेढा, (४) नांगर; (आ) बाजूने दिसणारा देखावा : (१) मचवा, (२) आडवा वासा, (३) उभा मेढा, (४) दोर, (५) दोर ओढणारे मच्छीमार.

डोळ जाळे गुजरातेतील जाफराबाद, सुतरापाडा या गावांपासून महाराष्ट्रातील हर्णेपर्यंत वापरले जाते. कोरियातही अशी जाळी वापरली जातात असे समजते. ठाणे, मुंबई व रायगड या तिन्ही जिल्ह्यांत डोळ जाळ्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो व यापासून सरंगे, मांदेली, जवळा, बोंबील, वाकड व मुशी यांची मासेमारी फार मोठ्या प्रमाणात होते. हर्णे, दाभोळ या भागांत नांगरी डोळ [आ. १० (इ)] या प्रकाराचा उपयोग करतात.

खोळीसारखे ओढ जाळे : या प्रकारात ट्रॉलसारख्या जगद्‌विख्यात जाळ्याचा समावेश होतो. सध्या सबंध जगभर त्याचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मुंबई इलाख्यात १९२२ साली प्रयोगादाखल त्याचा उपयोग केला गेला. १९६२ सालापासून कोळंबी पकडण्यासाठी हे जाळे सर्व भारतभर मोठ्या प्रमाणांत वापरात येऊ लागले. ट्रॉल हे जाळे लांब त्रिकोणी खोळी सारखे असते (आ. १२). याच्या दोन टोकांना दोर बांधलेले असतात व यांच्या साहाय्याने यांत्रिकी मचव्याच्या जोरावर हे जाळे समुद्राच्या तळावरून ओढता येते. त्रिकोणी भागाच्या टोकाकडच्या आकाराला ‘कॉडएंड’ (खोला) म्हणतात. हा खूप लांबट व निरनिराळ्या आकारांचा असतो. याच्या व खोळीच्या तोंडाच्या आकारावर या जाळ्याची कार्यक्षमता अवलंबून असते. जाळे ओढताना त्याचे तोंड चांगले उघडे रहावे यासाठी जाळ्याच्या वरच्या पदराला वाटोळे भेंड किंवा तरंगे व खालच्या पदराला शिशाच्या गोळ्या बांधलेल्या असतात. दोन्ही बाजूंच्या अरुंद जाळ्याच्या शेवटी एक उभा दंडुकाही असतो. यांशिवाय दोन्ही टोकांच्या दोन्ही दोरांना विवक्षित आकाराचे घावते फळे बांधलेले असतात. जाळे खेचणारा मचवा चालू लागला की, पाण्याच्या दाबामुळे व धावत्या फळ्यांच्या विवक्षित बांधणीमुळे ते जाळ्यांचे तोंड बाहेरच्या बाजूला खेचू लागतात व पूर्ण उघडे ठेवतात. या फळ्यांचे आकार, रुंदी व वजन या सर्वांवर जाळ्याची मासे पकडण्याची क्षमता अवलंबून असते. कोणते मासे पकडावयाचे आहेत हे विचारात घेऊन जाळ्याचा प्रकार, त्याची लांबी-रुंदी हे ठरवावे लागते. उदा., कोळंबी पकडण्यासाठी विशिष्ट आकृतिबंधाचे जाळे असावे लागते. ट्रॉल जाळ्याचे तीन प्रकार माहीत आहेत. बीम-ट्रॉल या प्रकारात तोंडावर वासा असतो ऑटर-ट्रॉलला धावते फळे असतात, तर बुल-ट्रॉल हा दोन नौकांनी ओढला जातो.

आ. १२. खोळीसारखे ओढ (ट्रॉल) जाळे : (१) मुख्य जाळे, (२) खोला, (३) उभा दंडुका, (४) धावता फळा, (५) यांत्रिक मचवा.

मासेमारी नौकेवरून दोरांच्या साहाय्याने हे जाळे ओढले जाते. दोन फळ्यांचे दोन्ही दोर एकाच बाजूला किंवा दोन बाजूंना अगर पाठीमागच्या बाजूला बांधलेले असतात. पूर्वी हे ओढण्याचे काम मच्छीमार स्वतःच करीत असत परंतु आता हे काम यंत्राच्या साहाय्याने केले जाते. यामुळे खोल पाण्यातली मासेमारी करणेही शक्य होते. दोरांची लांबी पाण्याच्या खोरीच्या चार-पाचपट तरी असते. हे दोर लोखंडी असल्यामुळे ते यंत्राच्या साहाय्याने ओढणे आवश्यक असते.

आ. १३. घोलवा (दोन्ही टोकांनी खेचण्याचे जाळे).

दोन्ही टोकांनी खेचण्याची जाळी : (सीन-नेट). हा प्रकार सर्वांत सोपा आहे व तो सर्वत्र आढळतो. त्यांपैकी घोळवा हे सर्वांत साधे, लांब चादरीसारखे जाळे वरच्या व खालच्या दोरीला बांधताना (तिंबताना) मध्ये थोडा घोळ करून पाण्यातून दोन्ही टोकांना बांबू बांधून हळूहळू ओढले जाते. नंतर जाळे किनाऱ्यापर्यंत आणून किंवा झटकन वर करून आत आलेले मासे पकडले जातात (आ. १३).असली खेचण्याची जाळी ३ मी. पासून २,०००मी. लांब असू शकतात. या जाळ्यांची लांबी व वापरण्याची रीत लक्षात घेऊन त्यांना निरनिराळी नावे दिली आहेत. ७ ते १० मी. लांब व ३ मी. रुंद पडद्यासारखे घोळ असलेले साधे जाळे व त्याच्या दोन्ही बाजूंनाजाळे ओढण्यासाठी बांधलेले दोन बांबू किंवा इतर जातीच्या लाकडाचे फाटे हे ‘घोळ’ या जाळ्यांचे वैशिष्ट्य होय. दोन माणसे पाण्याच्या प्रवाहात विरुद्ध दिशेने हे जाळे ओढू शकतात. जाळ्याच्या घोळात असलेले मासे जाळे वर करून पकडता येतात. समुद्रकिनाऱ्याजवळ थोडे पाणी असलेल्या क्षेत्रात हे जाळे वापरले जाते. यात कोळंबी, बोय, रेणवी, जिताडा, नाव्हेरी वगैरे मासळी पकडली जाते.

आ. १४. नदीत वापरावयाचे महाजाल किंवा पट्टेजाल

वरील जाळ्यापेक्षा लांब म्हणजे सु. ६० ते ७० मी. लांबीच्या जाळ्याला ‘पेरा’ म्हणतात. हे जाळे किनाऱ्यापासून समुद्रात आत जाऊन पसरतात. याची दोन्ही टोके किनाऱ्यावर ओढून आणण्यास चार-पाच माणसे लागतात. जाळे किनाऱ्यावर आणल्यावर त्यातील मासे गोळा केले जातात. काही वेळा हे जाळे किनाऱ्यावर न आणता पाण्यात असतानाच त्याच्या तळाकडच्या दोऱ्या (कडा) जवळ आणून आत   सापडलेले मासे पकडले जातात. या जाळ्यांना काही ठिकाणी ‘वायोधा’ असेही म्हणतात. अशाच प्रकारच्या नदीत वापरल्या जाणाऱ्या ओढ जाळ्याला महाजाल किंवा पट्टेजाल म्हणतात (आ. १४). त्यांच्या मध्यभागी थोडी निमुळती अशी खोळ असते. जाळे दोन्ही बाजूंनी ओढले की, मासे खोळीत अडकतात. शेवटी जाळे एका तीरावर आणून सर्व मासे पकडले जातात.

आ. १५ रापण : (१) भेंड. (२) बुडके, (३) दोर, (४) दोर ओढणारे मच्छीमार.

वरील जाळ्यापेक्षा खूपच लांब म्हणजे ३,००० मी. लांबीच्या चादरीसारख्या जाळ्याला ‘रापण’ किंवा ‘रापणी’ असे म्हणतात. त्याचा मधला पट्टा जास्त उंच किंवा रुंद (सु. ६ मी.) असतो व दोन्ही बाजूंचे पट्टे थोडेथोडे अरुंद होत जातात. दोन्ही टोकांना जाड वासा असतो व त्याला भक्कम दोरखंड बांधलेले असते (आ. १५). असे जाळे रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात व मलबार किनाऱ्यावर वापरात आहे. बांगडे, तारली किंवा इतरांचे थवे दिसू लागताच नौकेतून हे भले मोठे रापणीचे जाळे समुद्रात नेले जाते. जाळ्याच्या एका बाजूचा दोर किनाऱ्यावर असतो. जसजशी नौका समुद्रात जाते तसतसे जाळे झरझर समुद्रात सोडून माशांच्या थव्यास घेरले जाते. असे केल्यानंतर जाळ्याचे दुसरे टोकही किनाऱ्यावर ओढून आणले जाते. ही दोन्ही टोके ओढण्याचे काम किनाऱ्यावर असलेले मच्छीमार करतात. या कामासाठी प्रत्येक टोकावर २० ते ३० मच्छीमारांची आवश्यकता भासते. जाळे ओढण्याचे काम हळूहळू चालते व या कामास चार-पाच तास लागतात. रापण संपली की, किनाऱ्यावर माशांचा ढीग पडतो. अलीकडे सर्वच मासे जाळ्यातून बाहेर न काढता जाळ्यातच १-२ दिवस अडकवून ठेवले जातात व गरज लागेल त्याप्रमाणे किंवा गिऱ्हाईक मिळेल तसे ते किनाऱ्यावर काढून किंवा लाँचमध्ये बर्फात ठेवून व्यापारी केंद्राकडे पाठविले जातात.

आ. १६. आंकसां जाळे: (१) बांबूची काठी, (२) बुडके, (३) तळदोरी (हेटी).

याच प्रकारात मोडणारा पण अत्यंत साधा प्रकार आदिवासी जमातीत आढळतो. या प्रकारात एखादी साडी, धोतर अगर लांब कापड, बायका-पुरुष दोन्ही टोके हातात धरून व घोळ करून नदी-नाल्यात किंवा तलावात किनाऱ्याजवळ पाण्यात ओढतात. यात लहान मासे, झिंग वगैरे पकडले जातात. याशिवाय २ मी. लांबीच्या जाळ्याच्या लहान तुकड्यास दोन बाजूंस दोन बांबूच्या काठ्या बांधून व मध्ये घोळ करून जाळे करण्याचाही एक प्रकार आहे. या जाळ्याच्या खालच्या बाजूच्या पदराच्या कडेला शिशाच्या गोळ्याही बांधल्या जातात. याला आंकसां म्हणतात (आ. १६). हे जाळे एका माणसास किनाऱ्यावरील किंवा खाडीमधील खडकात वापरता येते आणि या जाळ्यात लहान मासे पकडणे शक्य होते.

आ. १७. बटवा जाळे (पर्स सीन) : (१) भेंड, (२) कड्या, (३) बटव्याचा दोर, (४) मुख्य जाळे, (५) जहाज.

वेष्टन पद्धती : मासे पकडण्याची ही एक फार महत्त्वाची पद्धत आहे. हीत माशांच्या थव्याला सभोवावर वेढतात व नंतर त्यांना पकडतात. या पद्धतीतील एका आधुनिक प्रकारास ‘पर्स सीन’ असे म्हणतात. या प्रकारात पडद्यासारख्या खूप लांबलचक जाळ्याच्या खालच्या कडा जवळ आणून उघड्या तोंडाच्या पिशवीसारखे किंवा बटव्यासारखे एक भरपूर रुंद असे जाळे तयार होते. या जाळ्याची लांबी सरासरी ८०० मी. व रुंदी किंवा उंची सर्वत्र सरासरी ८० मी. असते. या जाळ्याच्या खालील दोराला वाटोळ्या कड्याबांधलेल्या असतात व या कड्यांमधून एक मजबूत दोरी ओवलेली असते. या दोरीला ‘पिशवीची दोरी’ किंवा बटव्याची दोरी असे म्हणतात. जाळ्याच्या वरील बाजूस बुचाचे किंवा प्लॅस्टिकचे गोल भेंड असतात यामुळे जाळे पाण्यावर तरंगते (आ. १७). यांत्रिक जहाजावर हे भले मोठे जाळे नीट रचून ठेवलेले असते. या जाळ्याजवळच एक लहान होडीही (स्कीफ) असते. मोठे मासेमारी यांत्रिक जहाज माशांच्या टेहळणीवर निघते. चांगला मोठा माशांच्या थवा दृष्टिपथात आला की, लहान होडी पाण्यात सोडली जाते. पर्स सीन जाळ्याचे एक टोक व त्याची दोरी लहान होडीत धरून ठेवतात. होडी तेथेच राहते पण जहाज माशाच्या थव्याभोवती जाते व जाताना पर्स सीन जाळे भराभर सोडते. थव्यास वेढा घालून जहाज लहान होडीजवळ येते व त्यात पहिले दिलेले जाळ्याचे टोक वर घेते. नंतर पिशवीच्या दोरीची दोन्ही टोके यारीच्या साहाय्याने खेचली जातात व यामुळे जाळ्याच्या खालच्या किनारी एकमेकींजवळ येऊन जाळ्याचा खालचा भाग बंद होतो व जाळ्याचा आकार खालून बंद अशा भल्या मोठ्या पिशवीसारखा होतो. जाळे खालून बंद झाल्यामुळे व बाजूच्या उभ्या पदरातील दोरी खेचून तोही मार्ग बंद केल्यामुळे मासे जाळ्यात अडकून पडतात. भेंडांची किनार ओढून जाळ्याचे आकारमान संकुचित केले जाते. यामुळे लहान जागेत पुष्कळ मासे एकत्र येतात. या जागेतून त्यांना पळीसारख्या आकाराच्या व लांब दांडा असलेल्या जाळ्यांनी उचलून जहाजात आणले जाते. हे जाळे अमेरिकेच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवरील समुद्रांवर तसेच नोर्वे, डेन्मार्क, फ्रान्स, पेरू, चिली या देशांच्या किनाऱ्यांवरील समुद्रांवर वापरले जाते. या मासेमारीत मुख्यत्वेकरून सामन, हेरिंग, मॅकेरेल, अँकोव्ही या माशांचा समावेश होतो. कुप्या किंवा गेदर यांच्या मासेमारीतही याच तऱ्हेच्या खूप मोठ्या जाळ्याचा उपयोग केला जातो. भारतातील काही भागांत आणि विशेषतः गोवा, कर्नाटक व केरल या राज्यांत व काही प्रमाणात रत्नागिरी येथेही बांगडे व तारली यांची मासेमारी अशा जाळ्यानेहोते. अशा जाळ्यात कधीकधी एका दिवसात किंवा एका खेपेस ८ ते १० टन मासळी मिळणे  शक्य असते. या सर्व कामास जहाजावर कमीत कमी ८ ते १० माणसे तरी आवश्यक असतात. जहाजावर स्वयंचलित कप्प्या व याऱ्या  असल्या, तर हे काम थोड्या माणसांच्या मदतीने व सुलभ रीतीने करता येते.

वेष्टन पद्धतींचा दुसरा प्रकारही प्रचारात आहे. या प्रकारात उथळ पाण्यात आढळणाऱ्या बांगडे किंवा तारली या माशांच्या थव्यास फास जाळ्यांनी संपूर्णपणे घेरतात व मग जाळ्याच्या घेराच्या मध्यावर होडीने जाऊन पाण्यावर वल्हे आपटून आवाज करतात. या आवाजाने मासे घाबरून पळतात व फास जाळ्यात अडकतात. माशासहित जाळे ओढून होडीत घेतले जाते आणि आत अडकलेले मासे हळूहळू बाहेर काढले जातात.या पद्धतीत अडकलेले मासे एकएक बाहेर काढण्यात कालाचा अपव्यय बराच होत असल्याने सध्या तरी ही पद्धत विशेष प्रचलित नाही.

आणखी एका प्रकारात ७५ ते १०० मी. लांबीचे लहान जाळे वापरले जाते. या जाळ्याचे आसेही (छिद्रेही) लहान असतात. मासे अडकून हे जाळे फास जाळ्याप्रमाणे होत नाही पण हे लहान असल्यामुळे बुडी मारून त्याची तळ किनार एकत्र आणता येते व मग ते हळूहळू वर ओढून त्यात सापडलेले मासे पकडता येतात. अशा प्रकारे २ ते ३ मी. खोल पाण्यात मासे पकडणे शक्य होते. मुबईच्या परिसरात अशा मासेमारीच्या प्रकारास ‘गोल पेरा’ म्हणतात.

आ. १८. दोन नौकांनी ओढण्यात येणारे लंपारा जाळे : (१) भेंड, (२) बुडके, (३) कोठी, (४) दोर, (५) लाकडी वासा, (६) जाळे ओढणाऱ्या नौका.

वेष्टन पद्धतीतील आणखी एका प्रकारास यूरोपमध्ये ‘लंपारा’ म्हणतात. हे एक किंवा दोन नौकांनी ओढता येते (आ. १८). याच तऱ्हेच्या परंतु थोड्या निराळ्या प्रकारास भारतात गोवा-वेंगुर्ले भागात ‘जीत’, कर्नाटकात ‘मारीबले’ व केरळात ‘कोलीवाला पैथुवले’ असे म्हणतात. या प्रकारात मुख्य जाळे उथळ, खोळीसारखे व सरासरी ३ सेंमी. इतक्या लहान आसाचे असते. या जाळ्याच्या दोन्ही बाजूंस बारीक सुंभाने विणलेले लांब पण निमुळते होत जाणारे जाळ्याचे पाटे (खांदे) जोडलेले असतात (आ. १९). या पाट्यांचे आसे खूप रुंद म्हणजे सु. २० सेंमी. असतात व शेवटी ते ओढण्यासाठी २० मी. लांबीचे दोर बांधलेले असतात. या सुंभाच्या पाट्यांना दावण किंवा जाळ्याचे खांदे असेही म्हणतात व त्यांची लांबी १०० मी. असू शकते. या दावणीचा उपयोग जाळे ओढण्याठी व त्या भागातील माशांना मधल्या खोलीत हुसकवण्यासाठी होतो. जाळ्याच्या मधल्या खोळीच्या खालच्या भागात आणखी एक पडद्यासारखा उभा पाटा असतो. तो खोळीच्या खालच्या किनारीला जोडलेला असतो व त्याच्या खालच्या किनारीला वजन म्हणून लहान दगड बांधलेले असतात. खोळ तरंगावी म्हणून तिच्या वरच्या किनारीला भेंडे बांधलेले असतात. हे जाळे वापरण्यासाठी दोन नौका लागतात. प्रत्येक नौकेत सामान्यतः पाच मच्छीमार असतात. जाळे घेऊन दोन्ही नौका बरोबरच माशांच्या टेहळणीस निघतात. समुद्रात माशांचा थवा दिसला किंवा तसा अंदाज करता आला की, जाळ्याचे एक टोक एका नौकेत ठेवून दुसरी नौका जाळे पाण्यात सोडीत थव्याला घेरते. नंतर दोन्ही नौकांतील मच्छीमार ते जाळे प्रथम दोरखंडांनी व पुढे दावणीच्या साहाय्याने खेचू लागतात. परिणामी मासे मधल्या खोळीत पकडले जातात.

आ. १९. जोत (मारीवले) जाळे : (अ) जाळ्याचा मुख्य भाग : (१) वरचा दोर व भेड, (२) जाळ्याची खोळ, (३) उभा पडदा, (४) बुडके, (५) जाळ्याचे पाटे (खांदे); (आ) दोराच्या पदरासहित व नौकांसहित पूर्ण जाळे.

भारतात निरनिराळ्या किनाऱ्यावर वापरल्या जाणाऱ्या या प्रकारच्या जाळ्यात थोडेफार फरक आढळतात. काही ठिकाणी दावणीच्या खालच्या किनारीला माशांना भिवविण्यासाठी शिंदीच्या पानांचे झुबके बांधले जातात. बहुतेक सर्व ठिकाणी हे जाळे वापरण्याची रीत सारखीच आहे. ज्या भागांत यांत्रिक मचवे व ट्रॉल जाळ्यांचा उपयोग करण्यात येतो, तेथे या वेष्टन पद्धतीच्या जाळ्यांचा वापर कमी झाला आहे. मालवण-वेंगुर्ले या भागात तर हे जाळे आता कोणीही वापरीत नाही.

उडणारे मासे पकडण्याची पद्धती : उडणारे किंवा दूर उड्या मारणारे मासे पकडण्यासाठी मासेमारी नौकेवर उभा पडदा बांधतात. यामुळे उडणारे मासे या पडद्यावर आदळतात व अनायासेच होडीत पडतात. अशा नौका ओळीने चालविल्या जातात. उडणारा थवा मोठा असला, तर या ओळीतील कोणत्या तरी नौकेत मोठ्या प्रमाणात ते पडतात. केरळजवळील समुद्रभागात या पद्धतीने हे उडणारे मासे पकडण्याची प्रथा आहे.

आ. २०. बोयी पकडण्याचा वाणा : (अ) वाण्याचा एक भाग : (१) तळावर उभे रोवलेले बांबू, (२) आडवी दोरी, (३) मुख्य जाळे, (४) झोल; (आ) उभारलेले संपूर्ण वाणा जाळे; (इ) रचून ठेवलेले जाळे व बांबू.

बोय जातीचा मासा जाळे आडवे आले, तर निसटून जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला पकडण्यासाठी ‘वाणा’ जाळ्याची योजना करतात (आ. २०). या जाळ्यास एक आडवी दोरी बांधून व जाळ्याचा पदर ओढून घेऊन एक ओच्यासारख्या लांबट कप्पा तयार केला जातो. उडी मारणारा मासा जाळ्याच्या वरच्या भागावर आदळून अलगद या कप्प्यात पडतो. ‘बीरांडा’ नावाची जाळीही अशाच प्रकारची असतात.

द्रुतगती प्रवाहातील मासे पकडण्याकरिता त्या प्रवाहात बांबूचा किंवा जाळीचा उपयोग करून अडथळा निर्माण करावा लागतो. हा अडथळा पार करण्यासाठी माशांनी उडी मारली की, ते नेमके दुसर्याड बाजूस असलेल्या जाळ्यात किंवा लहान होडीत पकडले जातात.

आ. २१. उचल जाळे : (अ) उचल जाळ्याचा एक प्रकार : (१) बोयरा, (२) बुडके, (३) झाडाच्या डहाळ्या, (४) उचल दोर, (५) झोल; (आ) जपानी जाळे : (१) नौकेला बांधलेले बांबू, (२) झोल, (३) नौका.

उचल जाळी : (जाळे उचलून मासे पकडणे). या पद्धतीत प्रथम जाळे पाण्यात खोलवर पसरून ठेवावयाचे व काही वेळाने ते वर उचलावयाचे म्हणजे त्यावर आलेली मासळी पकडता येते. याचे निरनिराळे प्रकार असून त्या सर्वांना इंग्रजीत ‘डिप-नेट’ म्हणतात. जपानमध्ये किंवा फ्रान्समध्येही मासेमारी नौकेवर एका बाजूला दोन मोठे बांबू बांधून त्यांना मध्ये घोळ असलेले जाळे बांधतात व ते जाळे खोलवर बुडविले जाते. या जाळ्यावर थोडे मत्स्यखाद्यही टाकतात. थोड्या वेळाने मासे जमले की, जाळे उचलले जाते व मासे पकडले जातात (आ. २१). चिनी डिप-नेट (चिनई) प्रख्यात आहेत. ही केरळाच्या खाड्यांमध्ये रांगेने उभी केलेली दिसतात (आ. २२). या जाळ्यांचा चौकटीसारखा ओटा किंवा फलाट खाडीच्या किनाऱ्यावर असतो. याच्या मध्यभागी जाडा उभा खांब असतो. या खांबाच्या टोकाला लोखंडी सळईच्या साहाय्याने बसविलेला ओक्तीप्रमाणे मोठा आडवा वासा (बांबू) असतो. याला चार बाजूंना चार बांबू असलेले व खाली भले मोठे चौकोनी पण घोळ असलेले जाळे बांधलेले असते. ओक्तीच्या आडव्या वाशाच्या दुसर्याप टोकाला दोरी असते व ती वरखाली करून जाळेही त्याचप्रमाणे वरखाली करता येते.जाळ्यात काही मत्स्यखाद्य टाकून व ते पाण्यात बुडवून ठेवल्यावर त्यात मासे,कोळंबी, खेकडे वगैरे प्राणी येतात व जाळे वर उचलले की, त्यात ते पकडता येतात. रात्रीच्या वेळी जाळ्याच्या वरच्या भागात जर दिवा टांगून ठेवला, तर जास्त मासे आत येतात.

आ. २२. चिनई जाळे : (१) झोल, (२) बांबू, (३) कप्पी, (४) मुख्य खांब, (५) ओढ दोरी, (६) आडवा वासा, (७) आधार दोरी, (८) ओटा किंवा फलाट.

यांशिवाय लहान आकारमानाचे व एक किंवा दोन माणसांस वापरता येतील असे जाळ्याचे कितीतरी प्रकार आहेत (आ. २३). खेकडे पकडण्याचे गाडे समुद्रकिनाऱ्यावर सर्वत्र आढळतात.‘झिले ’ नावाचे जाळे लहान खाडीत मासेमारी करताना वापरले जाते [आ. २३ (अ)]. हे जाळे पुष्कळसा झोळ असलेले व लंबाकृती असते. हे हातात घेऊन मच्छीमार कंबरभर पाण्यात जातो व तेथील झाडाझुडपांच्या सान्निध्यात ते पसरतो. झाडे हलविली की, त्यांच्या आश्रयास आलेल मासे या जाळ्यात येतात व जाळे उचलले की, हे मासे पकडले जातात. हे जाळे हातात धरून किनाऱ्यालगतच्या पाण्यातही मासेमारी करता येते.

आ. २३. हात जाळ्यांचे दोन प्रकार : (अ) झिले : (१) बांबूचा गाडा, (२) झोल; (आ) दांडीवाले जाळे : (१) दांडी, (२) झोल.

जाळे फेकून : या प्रकारात सर्वत्र प्रचारात असलेले फेकजाळे किंवा पाग (पागीर) याचा उपयोग केला जातो. हे जाळे वर्तुळाकार असून त्याच्या मध्यभागी एक दोरी बांधलेली असते व परिधाच्या किनारीला शिशाचे लहान मणी किंवा तुकडे बांधलेले असतात. या मण्यांचा वजन म्हणून उपयोग होतो. जाळ्याची मण्यांची किनार परत वर ओच्यासारखी वळवून जाळ्यालाच आतल्या बाजूने बांधतात. यामुळे जाळ्याचा कप्पा तयार होतो. हे जाळे मधल्या दोरीला धरून उचललेले, तर नसराळ्यासारखे दिसते पण तेच जर जमिनीवर पसरले, तर वर्तुळाकार होते (आ. २४). हे जाळे वापरण्यास कौशल्य लागते. मधल्या दोरीचे सुटे टोक मनगटास गुंतवून व जाळे कोपरावर ठेवून दोन्ही हातांनी विवक्षित रीतीने झटका देऊन फेकले, तर वर्तुळाकार रीतीने पाण्यावर पडते व परिधावरील शिशाच्या जड गोळ्यांमुळे उथळ पाण्यात झटकन तळापर्यंत पोहोचते. असे होत असताना मासे आत पकडले जातात. मधल्या दोरीने हळूहळू जाळे वर खेचले की, सर्व पकडलेले मासे ओच्यासारख्या कप्प्यात किंवा मधल्या भागात एकत्र येतात. हे एका माणसाने, थोड्या उथळ पाण्यात वापरावयाचे जाळे असल्यामुळे सर्वांत जास्त प्रमाणात वापरले जाते. याचा उपयोग प्रामुख्याने दक्षिण आशिया व आफ्रिका खंडात गोड्या व खाऱ्या उथळ पाण्याच्या मासेमारीत केला जातो. या जाळ्याच्या दुसऱ्या प्रकारात मण्यांची किनार ओच्यासारखी वर न वळविता त्या किनारीला आठ बारीक दोऱ्या बांधतात व ते जाळे हातात धरावयाची मध्यभागातली दोरी असते, तेथपर्यंत आणून तेथे एका कड्यातून बाहेर काढतात. हे जाळे पाण्यात फेकल्यावर दुसऱ्या जाळ्याप्रमाणेच याची मण्यांची किनार तळावर बसते. नंतर मधल्या कड्यातून आतल्या दोऱ्यांनी मण्यांची किनार एके ठिकाणी आणून वर खेचली जाते. त्यामुळे पकडलेल मासे मधल्या भागात राहतात व जाळे वर आणता येते. हे जाळे मुख्यतः गोवा-कर्नाटक या किनाऱ्यावर तारली व कोळंवी यांची मासेमारी करण्यास वापरले जाते. त्याला ‘शेंडी पाग’ म्हणतात [आ. २४ (इ)].

आ. २४. फेकजाळे : (अ) साधा पाग (पागीर) : (१) हातात धरावयाची दोरी, (२) जाळ्याचा पसरणारा भाग, (३) शिशाचे बुडके (मणी), (४) आत वळलेला घोळ; (आ) आत वळलेल्या घोळाचा उभा छेद : (१) जाळ्याचा पसरणारा भाग, (२) बुडके, (३) आत वळलेला घोळ; (इ) शेंडी पाग : (१) बुडके, (२) दोऱ्या खेचण्यासाठी कडे, (३) ओढणीच्या दोऱ्या, (४) तळदोरी.

जाळ्यात गुंतवून : या प्रकारात पडद्यासारखे लांबलचक जाळे दूरवर समुद्रात किंवा तलावात पसरले जाते. पाण्यातून व जाळ्याच्या आसामधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात मासे जाळ्यात गळ्याजवळ अडकतात. त्यांना पुढे किंवा मागे जाता येत नाही. त्यांना जणू गळफास बसतो म्हणून या जाळ्यास ‘फास जाळे’ म्हणतात (आ. २५). इंग्रजीत यास ‘गिल-नेट ’ म्हणतात. गिल म्हणजे क्लोमपंक्ती (कल्ल्यांच्या ओळी) व या गळ्याजवळच असतात. फासही गळ्यासच लागतो म्हणून फास जाळे हे नाव प्रचारात आले असावे.

या प्रकारची जाळी जगभर सर्व तऱ्हेच्या पाण्यात वापरली जातात. इंग्लिश खाडीत किंवा नॉर्वेच्या किनाऱ्यावर वापरली जाणारी ‘हेरिंग नेट्स’ याच प्रकारची आहेत. ती कैक किमी. लांब असतात. महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या या प्रकारच्या जाळ्यास ‘वावरी ’ किंवा ‘वागूर ’ असे म्हणतात (आ. २५). ही जाळी पाण्याच्या पृष्ठभागापासून थोड्या खोलवर असतात. या जाळ्यांचा दोरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. हा दोरा बारीक असून टणक असावा लागतो. ज्या आकारमानाचे मासे पकडावयाचे असतात त्याच आकारमानाचे जाळ्याचे आस असावे लागतात. तारली पकडावयाची जाळी ४ सेंमी. आसाची, तर मोठा कटला अगर घोळ पकडण्यासाठी ४० सेंमी. आसाची जाळी वापरतात. जाळे ताठ रहावे म्हणून वरच्या किनारीला भेंड व खालच्या किनारीला वजनासाठी शिशाचे मणी,मातीच्या भाजलेल्या नळ्या किंवा लहान दगड बांधतात. ही जाळी १० ते १५ मी. रुंद असतात पण यांची लांबी खूप म्हणजे १ ते २ किमी. ही असू शकते. जाळ्याच्या दोन्ही टोकांना पृष्ठभागावर बोयरे असतात. यांना खुणेसाठी लहान झेंडे लावलेले असतात. ही जाळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहातही जातात. कधीकधी झेंड्यांना जोडलेली दोरी मासेमारी नौकेत मच्छीमारांच्या हातातही असते. या जाळ्यांचा दुसरा प्रकार म्हणजे ‘बुडीची जाळी ’. तळाजवळ लावलेली असल्यामुळे ही जाळीदेखील प्रवाहाबरोबर वाहत जातात. दाडा, घोळ यांसारखे तळाजवळ राहणारे मासे या जाळ्यांनी पकडतात.

आ. २५. फास जाळी : (अ) बुडीची वागूर : (१) बोयरा व निशाण, (२)भेंड, (३) बुडके, (४) नांगर, (५) जोडणीचा दोर; (आ) तरती वागूर : (१) बोयरा व निशाण, (२) भेंड, (३) बुडके; (इ) फास जाळ्यात अडकलेला मासा.

गोड्या पाण्याच्या मोठ्या तलावात जी फास जाळी वापरतात, त्यांना ‘रंगून जाळी’ म्हणतात. या जाळ्यांच्या खालच्या किनारीला वजने नसतात. यामुळे मासे तत्काळ अडकतात. काही जाळ्यांत थोड्या थोड्या अंतरावर उभी दोरी बांधून चौकटी करतात, त्यांना ‘चौकटी जाळी’ (फ्रेम-नेट) असे म्हणतात.

फास जाळ्याच्या आणखी एका प्रकारास ‘ट्रॅमेल-नेट’ असे म्हणतात. यातील जाळे खूप रुंद आसाचे असते व जाळ्याच्या दोन्ही बाजूंना बारीक आसाची दोन पडद्यासारखी पण मधूनमधून मोठे आस असलेली जाळी असतात. कोणत्याही बाजूने मासा जाताना त्याने बारीक आसाच्या जाळ्याला धडक दिली की, ते पुढे जाते व मधल्या मोठ्या आसामधून पलीकडे जाते. असे झाले की, एक तऱ्हेचा झेला तयार होतो आणि त्यामध्ये मासा अडकतो व त्याला बाहेर पडता येत नाही. किनाऱ्याजवळील खडकाळ किंवा अडचणीच्या जागी या जाळ्यांचा विशेष उपयोग होतो. जाळे लावल्यानंतर आतल्या बाजूने आवाज करून मासे घाबरविले की, जे जाळ्यामधून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात व पकडले जातात. यात पुष्कळ मासे हटकून मिळतात. हे जाळे फार विनाशक आहे म्हणून काही देशांत ते वापरण्यास बंदी आहे. भारतात हे जाळे विशेष प्रचलित नाही.

नदीकिनाऱ्याच्या किंवा सरोवराच्या उथळ पाण्यात अगदी बारीक धाग्याची फास जाळी वापरतात. या जाळ्याच्या वरच्या किनारीला भेंडे म्हणून झाडाच्या हलक्या काड्या व खाली बुडके म्हणून मातीच्या पक्या भाजलेल्या नळ्या बांधतात. या जाळ्यांना ‘कांडल’ म्हणतात. हे जाळे समुद्रकिनाऱ्यावरही वापरले जाते. याची उंची १.५ किंवा २ मी. व लांबी १०० मी. असते. हे जाळे वापरण्यास सोपे असते. अशी पुष्कळ जाळी एका वेळी एका पाठोपाठ लावता येतात.

अडथळेवजा जाळे वापरून : या प्रकारात समुद्रकिनारी ज्या खोची असतात व जेथे भरतीच्या वेळी पाणी भरते व ओहोटीच्या वेळी उतरते, तेथे सोईस्कर भागात एक लांबलचक जाळे, सरळ किंवा चंद्राकृती रेषेत तळाशी रचून ठेवतात. या जवळच योग्य अशा लांबीचे बांबूही उभे रोवून ठेवलेले असतात. भरती आली की, हा सर्व भाग पाण्याने भरतो व या पाण्याबरोबरच मासे, खेकडे,कोळंवी वगैरे प्राणी किनाऱ्यालगत येतात. अशा वेळी मच्छीमार आपल्या लहान होडीतून रचून ठेवलेल्या जाळ्याजवळ जातात व जाळ्याची शीरदोरी उचलून जाळ्याची माथेकिनार वर उचलतात. जाळ्याची तळकिनार थोडीशी चिखलात पुरतात. जाळ्याजवळ रोवून ठेवलेल्या बांबूना माथेकिनार बांधून जाळे उभे केले जाते. नंतर ओहोटीच्या वेळी सर्व पाणी निधून गेले की, जाळ्याच्या आतल्या भागात अडकलेले मासे सुलभ रीतीने पकडता येतात [आ. २१ (आ)]. या जाळ्यास मुंबई उपनगर भागात ‘वाणा’ म्हणतात. गुजरातेतही ही पद्धत प्रचलित आहे. ही पद्धत कोणत्याही ऋतूत मोठी भरती असेल तेव्हा वापरली जाते. मात्र अलीकडे किनारपट्टीत होत असलेल्या पाण्याच्या प्रदूषणामुळे शहराजवळ मासे किनाऱ्याला येत नाहीत व त्यामुळे ही पद्धत विशेष वापरात नाही. या तऱ्हेच्या किनारपट्टीत सुट्या दगडांचे बांध रचून एक जलाशय तयार करतात. या बांधास एक अरुंद तोंड ठेवलेले असते. या तोंडास ‘बोकसी’ जाळे बांधतात. भरती आली की, हा जलाशय तुडुंब भरतो आणि पाण्याबरोबर समुद्रातले मासेही येतात. ओहोटी झाली की, पाणी दगडी बांधातून निघून जाते व आत आलेली मासळी अडकते. बाहेर जाण्याच्या प्रयत्नात ते मासे बांधाच्या अरुंद तोंडाशी लावलेल्या बोकसी जाळ्यात पकडले जातात. या प्रकारच्या मासेमारीस कालेव पद्धती म्हणतात (आ. ८). ही पद्धती किनाऱ्यावर व खाड्यांत, तसेच खडकाळ उथळ नद्यांतही पुष्कळ ठिकाणी पहावयास मिळते. काही ठिकाणी कालेव वांधण्याचे हक्कही काही कुटुंबांस वडिलोपार्जित वारसा कायद्याने प्राप्त झाले आहेत.

आ. २६.धावता फळा : (अ) दोन कड्यांचा फळा : (१) फळा, (२) दोर, (३) कडी; (आ) चार कड्यांचा फळा : (१) फळा, (२) कडी, (३) दोर.

इतर साधनांचा उपयोग : विजेचा उपयोग करून माशांस स्तंभित केले जाते व त्यांना पाण्यात सोडलेल्या नळाजवळ खेचले जाते. नौकेवर असलेल्या पंपांच्या साहाय्याने या नळातून पाणी आणि त्याबरोबरच जवळ असलेले मासे वर खेचले जातात. जर्मन जहाजावर व इतरत्रही काही ठिकाणी असे प्रयोग यशस्वी झाले आहेत. निरनिराळ्या रंगांचे दिवे वापरून मासे आकर्षित करणे व नंतर जाळे टाकून ते पकडणे हा प्रकार जपानमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. माशांचे, त्यातल्या त्यात देवमाशांचे, आवाज ध्वनिमुद्रित करून या आवाजाच्या साहाय्याने इतर मासे कसे आकर्षित करता येतील, ह्यावरही प्रयोग चालू आहेत. पंपाच्या साहाय्याने बुडबुड्यांचा पडदा निर्माण करून माशांना धाबरावयाचे व विशिष्ट दिशेकडे हाकलून नंतर पकडावयाचे या पद्धतीवरही संशोधन चालू आहे.

मासेमारी साधनांची मूलतत्त्वे : मासे हे जलचर प्राणी असल्यामुळे ते सहजासहजी पकडता येत नाहीत. ते चपळ आहेत. ते पकडण्याकरिता विविध साधनांचा कल्पकतेने उपयोग करावा लागतो. मासे पकडण्यात प्रामुख्याने दोन हेतू असतात. उपजीविकेसाठी मासे पकडणे हा पहिला हेतू होय. आदिमानवाने मासे पकडून त्यांचा अन्न म्हणून उपयोग केला. पुढे हे काम समाजाच्या एका विशिष्ट गटाकडे गेले व यातूनच मच्छीमारांचा उगम झाला. दुसरा हेतू मनोरंजनासाठी मासे पकडणे हा होय. या क्रियेस ‘मत्स्यपारध’ [⟶ मत्स्यपारध] असेही म्हणता येईल. कोणत्याही हेतूने मासे पकडावयाचे असले, तरी हे करण्यासाठी कल्पकता, साहित्य निर्माण करण्याची व जमविण्याची क्षमता, मासेमाराची शारीरिक ताकद, या कामासाठी लागणाऱ्या नौका, त्या नौकांचे आकार,आकारमान व गतिशीलता या सर्वांची आवश्यकता असते. माशांचे इतर गुणधर्म, जसे त्यांच्या राहण्याच्या जागा, त्यांचे आकारमान, त्यांची संवेदनक्षमता, प्रकाशाचे आकर्षण, प्रजोत्पादन,स्थलांतरण इत्यादींचे ज्ञानही असावे लागते. या माहितीच्या आधारावरच निरनिराळ्या प्रकारांची जाळी, मासेमारी नोका वगैरे निर्माण झाल्या व त्यांची उत्क्रांती झाली. उदा., ट्रॉल जाळे, त्याचा धावता फळा, त्यावरच्या लोखंडी कड्या वगैरेंमुळे किती तरी गोष्टी साध्य झाल्या आहेत (आकृती २६). महाराष्ट्रातील मच्छीमारांची ‘डोळ’ हे जाळे बांधण्यासाठी लागणारे खांब अगर मेढे पुरण्याची अगर बसविण्याची मागे वर्णन केलेली पद्धत ही अत्यंत कल्पकतापूर्ण आहे. यात पाण्याच्या लाटेमुळे होडी वरखाली होणे, या परिस्थितीचा उपयोग करून २५ ते ३० मी. खोल पाण्यातही मच्छीमारांनी तळावर मेढे रोवले आहेत. पाण्याच्या लाटांच्या ऊर्जेचा असा उपयोग केलेला जगात फारच थोड्या ठिकाणी पहावयास सापडेल. हे सर्व काम निरक्षर मच्छीमार सामान्य माणसाच्या नजरेआड राहून समुद्रात दूरवर करत असतात, ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे.

आ. २७. जाळ्याचे प्राथमिक भाग : (१) भेंड, (२) वरची दोरी (वरी, शीरदोरी), (३) आस, (४) आसाची लांबी, (५) आसाची रुंदी, (६) तळाची दोरी (हेटी), (७) बुडके, (८) जाळ्याची गाठ, (९) विस्तारित करून दाखविलेली गाठ.

जाळ्यांचे मूलस्वरूप : मासेमारीतील साहित्यात जाळे हे फार महत्त्वाचे आहे. जाळे हे दोऱ्याला गाठी मारून विणलेले छिद्रमय वस्त्र असे मानावयास हरकत नाही. मत्स्यव्यवसायात या छिद्रांना आस असे म्हणतात. आस साधारणपणे चौकोनी असते. एका गाठीपासून दुसऱ्या गाठीपर्यंतच्या अंतरास आसाची रुंदी व आस ताणले असता होणाऱ्या जास्तीस जास्त अंतरास आसाची लांबी असे म्हणतात. लांबी साधारणपणे रुंदीच्या दुप्पट असते. अशा पुष्कळशा आसांचे जाळे तयार होते (आ. २७). जाळ्याच्या वरच्या किनारीला शीरदोरी (वरी) बांधलेली असते, तर खालच्या किनारीला तळदोरी असते. या तळदोरीला ‘हेटी’ असेही म्हणतात. अशा जाळ्याच्या बांधणीला तिंबणे असे म्हणतात. तिंबताना आसे जवळजवळ बांधले की, जाळ्याला घोळ आणता येतो. जाळ्याची वरची किनार तरंगती रहावी म्हणून तिला वाटोळे अगर लंबगोल असे तरंगे बांधतात या तरंग्यांना भेंड म्हणतात. ते आतून पोकळ असतात. लहान भोपळे, डबे, हलक्या जातीचे लाकूड किंवा हलके पोकळ प्लॅस्टिक यांचा या कामाकरिता उपयोग करतात. तळकिनार वर उचलली जाऊन मासे निसटून जाऊ नयेत म्हणून तिला शिशाचे अगर लोखंडाचे वाटोळे अगर लांबट लहान गोळे बांधतात. यांऐवजी कधीकधी मातीच्या भाजलेल्या नळ्या किंवा लहान दगडांचाही उपयोग केला जातो. त्यांना बुडके म्हणतात. या मूलस्वरूपापासून गरजेप्रमाणे फेरफार करून निरनिराळ्या प्रकारांची जाळी अस्तित्वात आली आहेत.

जाळ्यांचे धागे नैसर्गिक व कृत्रिम या दोन प्रकारांचे असतात. नैसर्गिक धागे वनस्पतींपासून तयार करतात. प्राचीन काळी जाळी तयार करण्याकरिता लहान झाडांच्या फांद्यांचा किंवा वेलींच्या लांब सालीचा उपयोग केला जात असे. ही जाळी ओबडधोबड आणि तात्पुरत्या उपयोगाची असत. पुढे ताग, अंबाडी अशा वनस्पतींच्या बारीक तंतूंपासून सुतळी व दोर तयार होऊ लागले आणि यांपासून बनविलेली निरनिराळ्या विणींची व आकारंची जाळी अस्तित्वात आली. पुढे नारळाच्या काथ्याचाही उपयोग दोरी व दोर करण्यास होऊ लागला. हे दोर मच्छीमारीच्या व्यवसायात अत्यंत उपयुक्त ठरले. यानंतर कापसाचे सूत व त्यापासून तयार केलेली निरनिराळी जाळी वापरता आली. या जाळ्याच्या सुताला ‘शेव’ असे म्हणतात. या सुताच्या गुंड्यावर त्याची जाडी, पीळ व लांबी निर्देशक असे क्रमांक दिलेले असतात. या शेवाची जाळी पाण्यात फार दिवस टिकत नाहीत. ती जास्त दिवस टिकावीत म्हणून पेन, शेंबी, शिलार यांसारख्या झाडांच्या सालीचा उकळून रंग (वगळ) तयार करतात व त्यात जाळी बुडवून ती सुकवितात. या सालींच्या रंगाऐवजी आता काही रसायनांचाही उपयोग होऊ लागला आहे. लिनन व रॅमी हे धागे विशिष्ट झाडांच्या तंतूपासून तयार होतात; परंतु यांचा उपयोग आता मासेमारीच्या जाळ्यात फारसा केला जात नाही. मॅनिला हे अबाका (म्यूझा टेक्स्टीलीस) नावाच्या झाडाच्या पानांपासून व रिसाल हे घायपात (ॲगेव्ह सिसालाना) या झुडपाच्या पानांपासून होणारे धागे आहेत. या धाग्यांपासून मासेमारीस उपयुक्त असे मोठे दोर तयार करतात.

आ. २८. प्राथमिक तरण साधने : (अ) तराफा : (१) काटक्यांचे भारे, (२) बांबूच्या चिपांची साटी; (आ) कॅटमरान : (१) लाकडाचे जाड लांब ओंडके, (२) बांधणीची दोरी.

कृत्रिम धाग्याचा शोध लागल्यानंतर मासेमारी उद्योगात खूप क्रांती झाली. या धाग्यांपासून केलेली जाळी पाण्यामध्ये कित्येक दिवस राहिली, तरी कुजत नाहीत किंवा खराब होत नाहीत. त्यामुळे त्यांना वगळ लावावा लागत नाही व प्रत्येक वेळी ती सुकवावीही लागत नाहीत. हा धागा फार मजबूत व टिकाऊ असतो. या धाग्यापासून केलेल्या फास जाळ्यात मासे जास्त प्रमाणात मिळतात. या धाग्यापासून केलेले दोरही कुजत नाहीत आणि ते मजबूत व टिकाऊ असतात. यामुळे आता या दोरांचा वापर सर्रास होऊ लागला आहे व नैसर्गिक धाग्यांच्या दोरांचा वापर कमी झाला आहे. या कृत्रिम धाग्यांसाठी (१) पॉलिअमाइड, (२) पॉलिॲक्रिलोनायट्राइल, (३) पॉलिएस्टर, (४) पॉलिएथिलीन, (५) पॉलिव्हिनिल क्लोराइड, (६) पॉलिव्हिनिल अल्कोहॉल, (७) कोपॉलिमर, (८) पॉलिप्रोपिलीन इ. रसायनांचा उपयोग करण्यात येतो. औद्योगिक क्षेत्रात यांची नावे निरनिराळी आहेत. पॉलिअमाइड हे बहुधा नायलॉन या नावाने ओळखले जाते परंतु यापासून तयार केलेल्या धाग्यांची नावे निरनिराळ्या देशांत निरनिराळी आहेत. जपानमध्ये या धाग्यांन ॲमिलॉन म्हणतात, तर इंग्लंडमध्ये केनलॉन, रशियात कॅप्रॉन, जर्मनीत पेरलॉन व अमेरिकेत नायलॉन-६६ असे म्हणतात. नायलॉनाच्या प्राथमिक तंतूला किंवा शेवाला निरनिराळ्या तऱ्हेचे पीळ देऊन धागा तयार होतो व त्यापासून जाळी किंवा दोरही करतात. नायलॉनाच्या खालोखाल पॉलिव्हिनिल क्लोराइडाच्या धाग्याचा उपयोग होतो. यालाच प्लॅस्टिक असे म्हणतात व यापासून मोनोफिलामेंट म्हणजे बिनपिळाचा धागा तयार होतो. या धाग्यांची जाळी व दोरही बनवितात. ही जाळी थोडी कडक असतात. ट्रॉल जाळ्याच्या शेपटाच्या भागाला हा धागा वापरतात, तसेच डोळ जाळ्यालाही हा धागा आता मोठ्या प्रमाणात वापरला जातो कारण तो पाण्यात कुजत नाही व मजबूत असतो. कोपॉलिमर व पॉलिअमाइड यांच्या मिश्रणाने सरान किंवा क्युरेलॉन नावाचा धागा करता येतो. तोही थोडा कडक असतो. याचाही प्लॅस्टिक धाग्यासारखा उपयोग होतो. पॉलिएस्टर व पॉलिॲ क्रिलोनायट्राइल हे पदार्थ फार महाग असल्यामुळे त्यांचा जाळी तयार करण्यास फारसा उपयोग केला जात नाही [⟶ तंतु, कृत्रिम; तंतु, नैसर्गिक].

आ. २९. नर्मदा नदीत सुक्या भोपळ्याच्या घोडीच्या साराय्याने पाला मासे पकडण्याची रीत.

मासेमारी मचवे : मचवा हे मासेमारीतील अत्यंत उपयुक्त असे साधन होय. या शब्दाची व्युत्पत्ती ‘मत्स्य + वाह’ किंवा ‘मच्छ+ वाह’ या शब्दापासून झाली असावी. वाह या शब्दाचा अर्थ‘आणणारी’, ‘पडकणारी’ म्हणजेच मासेमारीत वापरली जाणारी होडी किंवा मचवा असा असावा. मासेमारीच्या होड्यांचे प्रकार भारतात बरेच आहेत. लाकडी ओंडके पाण्यावर तरंगतात आणि त्यांचा आधार माणसाला घेता येतो हे समजल्यावर आदिमानवाने ओंडके कोरून पोकळ करून त्याची होडी तयार केली असावी. तसेच चार-पाच ओंडके किंवा सुके भारे एकमेकांस बांधून त्यांवर बांबूच्या चिपांची साटी बसवून त्यांचा तराफा करण्याची कल्पनाही त्याला सुचली असावी [आ. २८ (अ) ]. ती रीत आजतागायत तलावांत वापरतात.

आ. ३०. होड्यांचे प्रकार : (अ) पगार; (आ) उलांडी : (१) उलांडी ओंडका, (२) आडवा वासा, (३) होडी.

विशिष्ट जातीच्या चांगल्या तरंगू शकणाऱ्या लाकडांचे ५-६ ओंडके एकत्र बांधून त्यांचा तराफा करून समुद्रावर वापरण्याची पद्धत दक्षिण भारतात पुष्कळ ठिकाणी आढळते. याला ‘कॅटमरान’म्हणतात [आ. २८(आ)]. अशा कॅटमरानवर बसून मच्छीमार समुद्रात दूरवर जातात व निरनिराळ्या प्रकारची जाळी वापरून मासेमारी करतात. समुद्रात मोठी लाट आलीच, तर ती त्या तराफ्यावरून जाते. ओंडके किंचित काळ पाण्याखाली जातात व परत पृष्ठभागावर येऊन तरंगतात. मच्छीमार या तराफ्यावर उभे राहून जाळी टाकतात व ओढतात. त्याचे अन्नपाणी मोठ्या झाकलेल्या मडक्यात सुरक्षित रीतीने तराफ्यावर ठेवलेले असते. हे तराफे किंवा कॅटमरान वल्ही वापरून किंवा लहान डोलकाठीस शीड बांधून चालविता येतात. किनाऱ्यावर आल्यानंतर ते सहज वर ओढून जमिनीवर आणता येतात. काही ठिकाणी सुके भोपळे किंवा बंद डबे एकमेकांस दोरीने बांधून त्यांवर मच्छीमार बसतात (त्याला घोडी म्हणतात) व त्यावरून जाळे ओढतात. आ. २९ मध्ये नर्मदा नदीतील असाच एक प्रकार दाखविला आहे. दुसऱ्या एका प्रकारात बांबूच्या चिपांच्या २ मी. व्यासाच्या परातीसारख्या आकारावर घट्ट असे चामडे बसवितात त्यामुळे ती एक वाटोळी होडी होते. दक्षिण भारतात त्याला कोरॅकल म्हणतात. त्यात बसून दोन माणसांना तलावातील मासेमारी करता येते.

आ. ३१. शिपिल (भडोचची नावडी) : (१) लाकडी आसाव (आडवी फळी), (२) होडीच्या फळ्या.

एका लाकडात खोदलेल्या होड्या भारतात सर्व किनाऱ्यांवर आढळतात. अशा होडीला महाराष्ट्रात ‘पगार’ म्हणतात [आ. ३० (अ)], तर गुजरातेत ‘एकलकडी होडी’ म्हणतात. चांगल्या लाकडाचा मोठा ओंडका घेऊन तो आतून पोखरून दोन्ही टोकांना निमुळता केला जातो. या होडीत दोन ते चार मच्छीमार बसतात व फेक जाळे, वायली जाळे अगर गळ वापरून मासेमारी करतात,काही ठिकाणी खोदलेल्या होडीच्या बाजूच्या फळीवर एकावर एक अशा दुसऱ्या उभ्या फळ्या जोडून मूळ होडी मोठी करतात. तिला डोणी म्हणतात. ही रापण जाळे नेप्यासाठी किंवा माशाचा थवा घेरण्यासाठी वापरतात. ही होडी उलटू नये म्हणून तिला एका बाजूला काटकोनात दोन समांतर बाकदार वासे बांधतात व त्यांच्या बाहेरच्या टोकांमध्ये पांगार्यामसारख्या हलक्या लाकडाचा जाड ओंडका बांधतात [आ. ३० (आ)]. याला ‘उलांडी’ असे म्हणतात.अशा होड्यांनी किनाऱ्याच्या जवळपास निरनिराळ्या तऱ्हेची जाळी वापरून मासेमारी करता येते. मुंबई उपनगरांत पगारापेक्षा थोड्या मोठ्या होड्या सागवानी फळ्यांच्या बांधतात. त्यांना शिपिल म्हणतात. तशीच परंतु थोड्या मोठ्या अशा शिपिलला भडोचमध्ये ‘नावडी’ म्हणतात व ती नदीमध्ये वापरतात (आ. ३१).

आ. ३२. मुंबई परिसरातील मचवे : (अ) बल्याव; (आ) नाव : (१) सुकाणू, (२) फळी, (३) डोलकाठी, (४) नाळ.

मासेमारीचे मोठे मचवे चांगल्या इमारती लाकडाचे बनविलेले असतात. या मचव्यांच्या बांधणीच्या कामात महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीवरील सुतार त्यांच्या कौशल्याबद्दल प्रसिद्ध आहेत. या मचव्यांच्या निरनिराळ्या प्रकारच्या बांधणीवर आधारित अशी त्यांची नावे आहेत (आ. ३२). नाव, बल्याच, गलबत, फत्तेमार,कोथा, मचुआ (गुजराती) अशी ही नावे आहेत. यांतील मोठे मचवे सु.१७ मी. लांब, ३.५ मी. रुंद व १.५ मी. खोल असतात. त्यांचे वजन १०-१२ टनांपर्यंत असते. या मचव्यांना वेळच्या वेळी चंद्रस, तेल यांचे चोपण केले किंवा चांगला रंग लावला आणि योग्य देखभाल केली, तर ते २५ ते ३० वर्षांपर्यंत टिकू शकतात.

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा व प. बंगाल या राज्यांतील किनारपट्टीवरही निरनिराळ्या तऱ्हेचे मचवे वापरले जातात व त्यांचे आकारही निरनिराळे असतात. आंध्र प्रदेशामधील काही मचव्यांच्या फळ्या खिळ्यांऐवजी सुंभाने जखडून बांधलेल्या असतात (आ. ३३). केरळातील डोणीसारख्या लांबलचक होडीला ‘वल्लभ’ म्हणतात. हे सर्व मचवे कापडी शिडाच्या आधाराने वाऱ्याच्या जोरावर चालतात परंतु आता यांवर शिडांऐवजी एंजिने बसविण्यात येऊ लागली आहेत. मालवाहू गलबतांना तीन-चार शिडे असतात पण मासेमारी मचव्यांना साधारणपणे एकच शीड असते कारण मासेमारी मचव्यांना जाळ्यासाठी व मासे पकडण्याची धावपळ करण्यासाठी जास्त मोकळी जागा लागते.

कुलकर्णी, चं. वि.

आ. ३३. आंध्र प्रदेशातील मासुला मचवा : (१) नाळ, (२) सुंभाची जोडणी, (३) आडाथ.

आधुनिक मच्छीमारी नौका : या अगोदर वर्णन केलेले मासेमारी मचवे मुख्यतः किनाऱ्या लगतच्या व थोड्या दूरच्याही म्हणजे सु. ४० वाव (१ वाव = सु. १.८ मी.) खोल पाण्यात जाणारे व इमारती लाकडाचे केलेले परंतु किनाऱ्यापासून दूर अंतरावर असलेल्या खोल पाण्यातील मासे धरण्यासाठी पाश्चात्य देशांत अनेक प्रकारच्या लहान मोठ्या नौका वापरतात. त्या बहुधा यंत्रसज्ज व लोखंडी पत्र्यांच्या वनविलेल्या असतात. एंजिनाने चालणाऱ्या मोठ्या मच्छीमारी नौकेचा एक सामान्य प्रकार आ. ३४ मध्ये दाखविला आहे.

वरील तऱ्हेच्या नौकेवरून निरनिराळ्या प्रकारांची जाळी वापरता येतात परंतु विशेषतः खोल पाण्यामध्ये तळाजवळ राहणारे मोठे मासे पकडण्यासाठी ट्रॉल जाळे वापरतात आणि ज्या नौकेवरून ते वापरतात तिला ट्रॉलर म्हणतात.

आ. ३४. सामान्य मच्छीमारी लोखंडी नौका (ट्रॉलर) : (१) मासे साठविण्याची जागा, (२) गोड्या पाण्याची टाकी, (३) जाळे ठेवण्याची जागा, (४) दोर ठेवण्याची जागा, (५) भांडारगृह, (६) दिवाबत्तीची खोली, (७) ट्रॉल जाळे ओढून घेण्यासाठी वापरण्यात येणारा व विद्युत् शक्तीवर चालणारा यांत्रिक रहाट, (८) रडार, (९) निवासगृह, (१०) एंजिनाची खोली, (११) कर्मचारी, (१२) सुकाणू यंत्रणा, (१३) यारी.

जाळ्याने धरता येते नाहीत असे मोठे मासे व देवमासे धरण्यासाठी बहुतेक ठिकाणी कावर [आ. १ (१)] मारण्याची पद्धत वापरतात. या भाल्यासारख्या कावरला पुढील तीक्ष्ण टोकाजवळ दुसरा एक मागे टोक असलेला कानपा असतो. अशा कावरचे टोक माशाच्या अंगात खोलवर शिरण्यासाठी तो बंदुकीने किंवा यांत्रिक शक्तीने फेकतात. या कावरला १५ ते २० मी. लांबीचा मजबूत दोर बांधलेला असतो. कावर चांगा नेम धरून फेकला म्हणजे तो माशाच्या अंगात खोल शिरून मागे टोक असणाऱ्या कानप्यामुळे चांगला अडकतो. त्यामुळे तो मासा दोरीने ओढून नौकेजवळ आणता येतो व यारीने वर उचलून घेता येतो. देवमासे नौकेमध्ये ओढून घेण्यासाठी नौकेच्या मागच्या बाजूस एक मोठा दरवाजा बसवतात. कावर फेकण्यासाठी वापरीत असलेल्या नौकेचा एक प्रकार आ. ३५ मध्ये दाखविला आहे.

मागे उल्लेखिल्याप्रमाणे विद्युत् आकर्षणाच्या आधारेही मासे पकडता येतात. अशी मासे घरण्याची विद्युत् पद्धत वापरणारी नौका आ. ३६ मध्ये दाखविली आहे. या पद्धतीत नौकेच्या पुढच्या व मागच्या टोकांवरून लांब विद्युत् वाहक केबलींच्या मदतीने मोठ्या आकारमानाचे विद्युत् धनाग्र पाण्यात टांगून ठेवतात. नौकेच्या मध्य भागाजवळून एक मोठे नसराळे जोडलेली मोठ्या व्यासाची लवचिक नळी पाण्यात सोडतात. हे नसराळे विद्युत् ऋणाग्राचे काम करते. नौकेवर बसविलेल्या मोठ्या केंद्रोत्यारी पंपाने [⟶ पंप] नसराळ्यात येणारे पाणी नळीतून वर ओढले जाते. विद्युत् प्रवाह चालू केला म्हणजे (४) या धनाग्रांकडून (३) या ऋणाग्राकडे मासे आकर्षिले जातात. ते नसराळ्याच्या आतील चोषणामुळे नळीत ओढले जातात व नौकेतील टाकीत येतात.

आ. ३५. मोठ्या माशावर कावर (हार्पून) फेकून तो अडकविण्याची पद्धत वापरणारी मच्छीमारी नौका : (१) माशांची टेहळणी करण्याची जागा, (२) कावर फेकण्याची जागा, (३) मासे उचलण्याची यारी.

भरसमुद्रात जाणाऱ्या नौका शक्य तितक्या बंदिस्त जातीच्या करतात त्यामुळे उसळणाऱ्या लाटांचे पाणी नौकेच्या आत शिरत नाही. ज्या नौका दूर अंतरावर जाऊन किंवा ४ दिवसांनंतर परत येतात, त्यांमध्ये जमविलेले मासे सुस्थितीत ठेवण्यासाठी काही विशेष व्यवस्था करावी लागते. त्यासाठी पूर्वी मिठाचा उपयोग करीत, आता शक्य असेल तेथे बर्फाचा उपयोग करतात. अशा नौकेवर माणसांना विश्रांती घेण्यासाठी काही जागा राखून ठेवावी लागते व ३-४ दिवस पुरेल इतके गोडे पाणी व खाद्यपदार्थ बरोबर न्यावे लागतात. अशा नौका एंजिनाने चालवितात.

आ. ३६. विद्युत् मच्छीमारी नौका : (१) नौका, (२) पाण्याचा पृष्ठभाग, (३) विद्युत् ऋणाग्र (नसराळे), विद्युत् धनाग्र, (५) लवचिक चोषण नलिका.

मोठ्या नौकांची लांबी ३० ते ७० मी. पर्यंत असते. त्या किनाऱ्यापासून पुष्कळ दूर अंतरावर जातात व १५ ते २० दिवसांनी किंवा कधीकधी ३ ते ४ महिन्यांनीही परत येतात. या नौकांवर मासे ठेवण्यासाठी शीतगृह वापरतात. त्या चालविण्यासाठी ३०० ते १,००० अश्वशक्तीची एंजिने बसवितात. अशा नौका उत्तर अटलांटिक व उत्तर पॅसिफिक महासागरांत जाऊन देवमासे व इतर जातींचे मोठे मासे पकडतात. त्यांमध्ये मासे पकडण्याच्या सर्व पद्धती वापरतात. काही ठिकाणी एक मध्यवर्ती मोठे जहाज कारखान्यासारखे वापरतात व त्याचा बरोबर प्रत्यक्ष मासे मारण्यासाठी पुष्कळ लहान नौका नेतात. या मोठ्या जहाजावर शीतगृहासह मासे गोठविणे, निर्वात डब्यांत भरणे, मत्स्यपीठ तयार कग्णे यांसाठी साहित्य बसविलेले असते. उत्तर अटलांटिक महासागरात कॉड मासे धरण्यासाठी अशी जहाजे वापरतात. ती हंगाम संपेपर्यंत कित्येक महिने समुद्रात असतात. देवमासे धरण्यासाठी हीच पद्धत वापरतात.

पुष्कळ दिवस समुद्रात राहणाऱ्या सर्व मच्छीमारी नौकांवर गोडे पाणी व खाण्याचे साहित्य ठेवावे लागते. एंजिनाचे इंधन न्यावे लागते व कामगारांसाठी विश्रांतीची जागा राखून ठेवावी लागते. म्हणून अशा नौकांवर खालच्या बहुतेक जागा मासे ठेवण्यासाठी वापरतात आणि पुढच्या व मागच्या बाजूस २-३ मजले बांधून तेथे राहण्याच्या खोल्या बांधतात व जेवणाखाण्याची जागा ठेवतात. मागच्या बाजूस सर्वांत वरच्या मजल्यावर नौका चालविण्याची उपकरणे बसवितात. आधुनिक मच्छीमारी नौकेवर मार्गनिर्देशनासाठी लागणारी सर्व आधुनिक उपकरणे, मासे धरण्यासाठी लागणारी इलेक्ट्रॉनीय उपकरणे व रेडिओ दूरध्वनी यंत्रणा बसविलेली असते.

मार्गनिर्देशनाच्या डेक्का योजनेच्या [⟶ मार्गनिर्देशन] मदतीने मासे असलेली जागा हुडकता येते व पुन्हा जरूर पडेल तेव्हा नेमक्या त्याच जागेवर येता येते. या योजनेद्वारे पाण्याखालील खडक किंवा मोडक्या जहाजांचे भाग यांसारखे अडथळे असल्यास त्यांची जागा लक्षात येते व त्यामुळे त्यांच्यापासून उद्भवणारा धोका टाळता येतो.

प्रतिध्वनिमापन पद्धतीने पाण्याची खोली मोजण्याचे साहित्य वापरले म्हणजे माशांचे थवे कोठे आहेत व ते किती खोल पाण्यात आहात ते समजते. ज्या नौकेवर डेक्का किंवा लोरान मार्गनिर्देशन योजनांची सोय केलेली नसते, तेथे प्रतिध्वनिमापक साधने वापरून पाण्याच्या तळाच्या संदर्भाने मार्गनिर्देशन करता येते व मासे सापडण्याची जागा हुडकता येते [⟶ प्रतिध्वनि सोनार व सोफार]. बहुतेक मोठ्या मच्छीमारी नौकांवर आता हेलिकॉप्टर वापरतात. त्यांचा उपयोग करून माशांची जागा लवकर हुडकून काढता येते.

ओक, वा. रा.

भारतातील मचव्यांचे यांत्रिकीकरण : निरनिराळ्या तऱ्हांचे मचवे वार्याच्या जोरावर चालत असल्यामुळे ज्या वेळी वारा पडतो किंवा विरुद्ध दिशेने वाहतो, तसेच ज्या वेळी भरती प्रतिकूल असते त्या वेळी ह्या मचव्यांना किनाऱ्यावर येण्यास फार उशीर लागतो. वल्ही मारूनही फारसा उपयोग होत नाही. या सर्व अडचणींमुळे मचव्यांची कार्यक्षमता मर्यादित होते. ही कार्यक्षमता वाढविण्याकरिता मचव्यांवर डीझेल एंजिने बसविण्याची कल्पना पुढे आली. महाराष्ट्र व दक्षिण गुजरात या किनाऱ्यावरील मचवे मोठे व मजबूत असल्यामुळे त्यांच्या रचनेत थोडा बदल करून ही एंजिने बसविली गेली. गुजरातेतील वेरावळ-पोरबंदर या भागातले प्रचलित मचवे लहान असत आणि मासेमारीचे क्षेत्र मर्यादित व किनाऱ्यापासून जवळ असल्यामुळे या मचव्यांवर पेट्रोल एंजिन, प्रचालक (मळसूत्री पंखा) व उभा चालक दंड असे एकत्रित संच बसविले गेले. दक्षिण भारताच्या किनारपट्टीचे मचवे लहान ते विशेष कार्यक्षम नसल्यामुळे तेथे नवीन तऱ्हेचे मचवे बांधले गेले व यांवर ट्रॉलसारख्या जाळ्यांनी मासेमारी सुरू झाली. महाराष्ट्रात सुरुवातीस जरी मचव्यांचे यांत्रिकीकरण झाले, तरी जाळी मात्र जुन्या पद्धतीचीच वापरली जात असत. १९६५-६६ सालापासून महाराष्ट्रातही ट्रॉलसारखी सुधारित जाळी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येऊ लागली आणि त्यामुळे मचव्यांच्या बांधणीतही काही फरक करावे लागले. विशेषतः एंजिनासाठी शाकारलेली खोली व त्या मागे जाळ्यातील मासे ओतण्यासाठी जागा यांची सोय करावी लागली.

महाराष्ट्रातील लहान मचव्यांच्या यांत्रिकीकरणाचे प्रयत्न १९४६ सालापासून सुरू झाले. प्रारंभी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय खात्याने ‘तपासे’ हे मासेमारी जहाज बांधले. या प्रयत्नांना खरा जोर १९५१ सालापासून आला. या वर्षापासून या कामासाठी ५०% कर्ज व ५०% अनुदान मिळण्याची सोय उपलब्ध झाली. यानंतरची काही वर्षे महाराष्ट्र या क्षेत्रात पुष्कळ आघाडीवर होता. पुढे इतर राज्यांतही मासेमारी नौकांचे यांत्रिकीकरण सुरू झाले. १९८२ साली भारतात सु. १७,००० यांत्रिक मचवे होते आणि यांपैकी ३,५०० महाराष्ट्रात असल्याचे आढळून आले.

नैर्ऋत्य किनाऱ्यावर १९६५ सालापासून कोळंबीची निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. कोळंबी पकडण्यासाठी ट्रॉल जाळ्याचा प्रामुख्याने उपयोग होऊ लागला व यामुळे मचव्यांच्या यांत्रिकीकरणाची गती वाढली. याचा परिणाम महाराष्ट्र व गुजरात येथील मचव्यांच्या यांत्रिकीकरणात वाढ होण्यात झाला.

खोल समुद्रातील मासेमारीचे भारतातील प्रयत्न : भारताचा समुद्रकिनारा सु. ५,६४० किमी. इतकी आहे. यात अंदमान, निकोबार, लक्षद्वीप वगैरेंचा समावेश आहे. या किनाऱ्यापासून १९ किमी. समुद्राचा भाग भारतीय सार्वभौमत्वाखाली येतो. नुकत्याच मान्य झालेल्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमेच्या नियमाप्रमाणे किनाऱ्यापासून ३७० किमी. पर्यंतचे (२०० सागरी मैलांपर्यंतचे) क्षेत्र हे त्या देशाचे संपूर्ण आर्थिक क्षेत्र गणले जाते. या नियमान्वये भारताचे मासेमारी क्षेत्र २०० लाख हेक्टर असावे, असे मानले जाते. इतके अवाढव्य क्षेत्र असूनही सध्या किनाऱ्यापासून २५ किमी. पर्यंत पूर्ण मासेमारी करण्यात येते. यापुढीस समुद्रात सु. ८० मी. खोलीपर्यंत थोड्याफार प्रणामात मासेमारी होते. त्यापुढील खोल समुद्रात फारच कमी मासेमारी होते. शास्त्रीय दृष्टीने पाहता खोल समुद्र म्हणजे अंदाजे २०० मी. खोलीचा समुद्राचा भाग पण सध्या व्यवहारात अंदाजे ८० मी. पेक्षा जास्त खोल भागास ‘खोल समुद्र’ म्हणून समजतात. या तुरळक किंवा अल्प मासेमारी होणाऱ्या भागात जास्त चांगली व मुबलक मासेमारी व्हावी म्हणून प्रयत्न केले गेले. पहिला प्रयत्न १९०० ते १९०४ पर्यंत ‘प्रिमियर’ या वाफेवर चालणार्याभ ट्रॉलरच्या साहाय्याने करण्यात आला. यानंतर १९०८-०९ या काळात बंगालच्या उपसागरात ‘गोल्डन क्राउन’ या जहाजाने प्रयत्न केले. याच सुमारास ‘व्हायलेट’ व ‘मार्गारीटा’ या ट्रॉलरांनी मद्रास किनाऱ्यावर खोल समुद्रातील मासेमारी सुरू केली. नंतर १९२१-२२ च्या काळात मुंबई व कराची या दरम्यान ‘विल्यम कॅरींग’ या ट्रॉलरने एका अनुभवी इंग्रजी कप्तानाच्या देखरेखीखाली खोल समुद्रातील मासेमारी केली. या ट्रॉलरची लांबी ४१ मी. व रुंदी ८ मी. असून ते २७६ टनांचे होते व त्यावर ४८० अश्वशक्तीची एंजिने होती. या जहाजाने पद्धतशीरपणे एक वर्ष मासेमारी केली परंतु त्यांच्या अनुभवावरून हा प्रयत्न किफायतशीर नाही, असे त्यांना आढळून आले. यानंतरही मद्रास व मुंबईच्या किनाऱ्यावर मोठी जहाजे वापरून मासेमारी झाली. स्वातंत्र्योत्तर काळातही असेच प्रयत्न झाले पण हे फायदेशीर नाहीत, असेच अनुभव आले. १९५० साली मात्र ‘तोयोमारू’ या ३८.५ मी. लांबीच्या जपानी जहाजानो किफायतशीर मासेमारी करून दाखविली. यानंतर भारतात स्थापन झालेल्या ‘न्यू इंडिया फिशरीज’ या इंडो-जपानी कंपनीने’सातपाटी’, ‘पाज’, ‘अर्नाळा’ व ‘पिरोटन’ ही चार जहाजे वापरून यशस्वी मासेमारी केली. ही जहाजे मुंबईपासून दुरवर वेरावळ, द्वारका येथपर्यंत जात परंतु तिथल्या किनाऱ्यापासून मात्र फारशी दूर म्हणजे खऱ्या अर्थाने खोल समुद्रात जात नसत.

स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकाने त्याचे प्रभुत्व असलेल्या खोल समुद्रात किती मत्स्यसंपदा आहे व ती हस्तगत करण्यास आपल्या मासेमारीत काय सुधारणा कराव्या लागतील, कोणत्या प्रकारची जाळी वापरावी लागतीस नौकांत काय सुधारणा कराव्या लागतील वगैरे प्रश्नांचा विचार करण्यासाठी एक अन्वेषण विभाग स्थापन केला. ‘मद्रास’, ‘मीना’, ‘बुमली ’ व ‘चंपा’ या नावांच्या मोठ्या नौकांच्या साहाय्याने सर्वेक्षण सुरू झाले. यानंतर ‘अशोक’ आणि ‘प्रताप’ यांसारखी मोठी जहाजेही या कामास वापरण्यात आली. यांनी मिळविलेल्या माहितीवरून कोणते मासे कोठे, केव्हा व किती प्रमाणात मिळतात हे कळून आले पण आर्थिक दृष्ट्या ही मासेमारी कितपत यशस्वी होईल, याचा अंदाज स्पष्ट झाला नाही. या मासेमारीची स्पष्ट कल्पना यावी व अचूक माहिती असावी म्हणून भारत सरकारने १९७७ साली पोलंड सरकारकडून ‘मोरेना’ नावाचे ६९ मी. लांबीचे व १,००५ टनी जहाज एक वर्षाच्या कराराने मागविले आणि त्याने भारतीय क्षेत्रातील सु. ८० मी. खोलीच्या समुद्रात मासेमारी केली. काही ठिकाणी त्यास काटबांगडे वगैरेसारखे भरपूर मासे मिळाले परंतु या माशास बाजारात फार कमी किंमत आली. यानंतर आणखी एकदोन मोठी जहाजे आणवून प्रयत्न करण्यात आले पण तेही फारसे यशस्वी झाले नाहीत.

याच सुमारास कोळंबीला परदेशात खूप किफायतशीर मागणी येऊ लागली. कोळंबी किनाऱ्यापासून २० किमी. च्या आत मिळते. यामुळे ही मासेमारी लहान यांत्रिक मचवे वापरून करणे शक्य होते. पश्चिम समुद्रात कोळंबीचे प्रमाण पुष्कळ असते परंतु १९७४ पासून पूर्व किनाऱ्यावरील (बंगालचा उपसागर) भागात ती मिळू लागली आहे. या मासेमारीत लहान व मोठे ट्रॉलर वापरण्यात येऊ लागले आहेत. यामुळे या व्यवसायात खूप स्पर्धा सुरू झाली. परिणामी शासनाला मासेमारीच्या मर्यादा आखून द्याव्या लागल्या.

मासेमारीच्या मर्यादा : प्रगत देशांत कोणत्याही बंदरातून मासेमारी करावयाची असेल, तर त्या देशाच्या शासनाकडून त्यासाठी सनद किंवा परवाना काढावा लागतो व त्यातील अटींचे पालन करावे लागते. भारतात मात्र भारतीयांना समुद्रातील मासेमारी करण्यासाठी परवाना काढावा लागत नाही. त्यांच्या मचव्यांची मात्र नोंदणी करावी लागते. परकीयांना मासेमारी करावयाची असेल,तर त्यांच्या जहाजाची नोंदणी व मासेमारीचे परवाने या दोहोंची जरूरी असते कारण नवीन आंतरराष्ट्रीय सागरी कलमानुसार ३७० किमी. च्या आत परराष्ट्रास परवानगीविना मासेमारी करता येत नाही.

अगदी किनाऱ्यालगतच्या समुद्रात अलीकडे जेव्हा कोळंबीच्या निर्यातीमुळे प्रत्यक्ष मासेमारीत स्पर्धा सुरू झाली आणि एंजिनावर चालणारे मचवे व साध्या शिडाचे मचवे यांच्यात संघर्ष होऊ लागले तेव्हा केंद्र शासनाने राज्य शासनांना याबद्दल नियम करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे महाराष्ट्रात जुलै १९८२ साली ‘महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम’ अमलात आला. या अधिनियमानुसार किनाऱ्या पासून ५ किमी. अंतराच्या आत एंजिन असणाऱ्या कोणत्याही मचव्याने मासेमारी करता कामा नये. हा भाग पूर्णपणे लहान होड्या व शिडाचे मचवे यांसाठी राखून ठेवला आहे. हे मचवे मात्र ५ किमी. च्या पलीकडेही जाऊ शकतील. एंजिन असलेल्या सर्व मचव्यांना बंदर अधिकाऱ्यांकडून मासेमारीचे परवाने घ्यावे लागतील व त्यांतील अटींचे पालन करावे लागेल. या अटींचे पालन होत नसेल व संघर्ष होत असेल, तर या बाबतीत न्याय देण्यासाठी प्रत्येक बंदरात एक ‘बंदर समिती’ असेल व या निकालावरचे अपील (अखेरचा निवाडा) त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी देईल. इतर राज्यांतही असे नियम अस्तित्वात आले आहेत किंवा येत आहेत व अशा रीतीने हा व्यवसाय अधिक शिस्तबद्ध होत आहे.

कुलकर्णी, चं. वि.

देशांतर्गत (जमिनीवरील) मत्स्योद्योग

या उद्योगात साधारणपणे गोड्या पाण्यातील मासेमारी अशी कल्पना जरी अभिप्रेत असली, तरी याबरोबरच मचूळ पाण्यातील म्हणजे खाडी विभागाती मासेमारीचाही अंतर्भाव करावा लागेल. नदीतून येणारे गोडे पाणी व भरतीच्या वेळी नदीमुखात शिरणारे समुद्राचे खारे पाणी हे खाडी विभागात मिश्रित होते व यास मचूळ पाणी म्हणतात. हे पाणी भूप्रदेशात असल्यामुळे यातील मासेमारीचा देशांतर्गत मासेमारीत अंतर्भाव होतो. पाऊस व हिमवर्षाव यांतून पृथ्वीवरील गोडे पाणी निर्माण होते. उत्तर व दक्षिण ध्रुवांच्या क्षेत्रांत व इतरत्र थंड प्रदेशांतील पर्वतांवर हिमवर्षावाने बर्फ तयार होते व या गोठलेल्या स्थितीत पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा मोठा साठा असतो. पावसाचे पाणी व बर्फाचे वितळून झालेले पाणी यांच्या प्रवाहातून नदी, नाले, झरे, सरोवरे, तळी वगैरे निर्माण होतात व शेवटी वाहते पाणी नदीरूपाने समुद्रास मिळते. काही पाणी तळी, तलाव, सरोवरे यांत साठविले जाते, तर काही पृथ्वीच्या खालच्या स्तरात भूमिजल म्हणून साठून राहते. हे सर्व पृथ्वीवरील गोडे पाणी महासागर व समुद्र यांच्यातील खाऱ्या पाण्याच्या तुलनेत फारच कमी म्हणजे अवधे ५% आहे. गोड्या पाण्याची वर्गवारी व संचय खालीलप्रमाणे आहे.

जमिनीवरील आर्द्रतेचा संचय ०.८२ लक्ष घ. किमी.
पृष्ठभागीय जलाशयांची जलधारणा २.३० लक्ष घ. किमी.
नद्यानाले इत्यादींतील प्रवाही जल ०.३७५ लक्ष घ. किमी.
जमिनीखालील कायम साठे ८३.५० लक्ष घ. किमी.

यापैकी फक्त पृष्ठभागीय जलाशयातील व नद्यानाले इत्यादींतील प्रवाही पाणी मत्स्यसंवर्धनासाठी उपयुक्त आहे. हे सर्व पाणी २.६७५ लक्ष घ. किमी. एवढे आहे. दर वर्षी येणाऱ्या पावसापासून व उन्हाळ्यात वितळणाऱ्या पर्वतांवरील बर्फापासून हे पाणी मिळते. काही ठिकाणी नलिकाकूपाच्या साह्याने भूस्तरातील पाणी काढून त्याचाही मत्स्योद्योगासाठी उपयोग केला जातो.

भारतामध्ये दरवर्षी सु. ३,७०,००० लक्ष घ. मी. पाणी पावसामुळे उपलब्ध होते व बाष्पीभवन वगळता, भारतातील नद्यांचे पाणी अंदाजे १,६६,५०,००० लक्ष घ. मी. आहे. यातूनच नैसर्गिक तळी व मनुष्यनिर्मित कालवे व पाटबंधारे यांना पाणी मिळते. या सर्व जलसंपदेवरच देशांतर्गत मत्स्योद्याग अवलंबून आहे. निरनिराळ्या जातींचे मासे या जलाशयांतच वाढतात परंतु सर्व क्षेत्रांतले पाणी मत्स्योत्पादनाच्या दृष्टीने सारखे नसते. पाण्यात निरनिराळी लवणे विरघळलेल्या स्थितीत असतात. यांपैकी फॉस्फेट, नायट्रेट व कार्बोनेट ही लवणे योग्य प्रमाणात असली व ऑक्सिजनाची संहती (विरघळलेल्या स्थितीतील प्रमाण) व पाण्याचे तापमान अनुकूल असेल, तर सूर्यकिरणांच्या प्रभावाने पाण्यातील डायाटम, डेस्मीड यांसारखी अतिसूक्ष्म शैवले मोठ्या प्रमाणात वाढू लागतात व परिणामी यांवर जगणारे प्लवक उत्पन्न होते, पाण्याच्या या क्षमतेस पाण्याची उत्पादकता असे म्हणतात. ही उत्पादकता योग्य प्रमाणात असेल व पाण्यात इतर धातवीय लवणे नसतील, तर त्या पाण्यात माशास योग्य असे अन्न प्लवकांच्या रूपात निर्माण होईल व त्यामुळे माशांचे उत्पादन सुलभ होईल. सुदैवाने अशी सर्वसाधारण अनुकूल परिस्थिती भारतातील पुष्कळ जलाशयांतील पाण्यात आढळते व यामुळे येथील मत्स्योत्पादन वाढण्याची शक्यता आहे. शेतीमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी ज्याप्रमाणे रासायनिक खते वापरून जमिनीचा कस वाढवावा लागतो, त्याप्रमाणे जलाशयातही जर काही लवणे कमी प्रमाणात असली, तर रासायनिक द्रव्ये वापरून त्या पाण्याची क्षमता वाढविता येते. विशेषतः लहान तळ्यात व तलावात असे करण्याची आवश्यकता भासते. कित्येकदा काही ठिकाणी भुईमुगाची, तिळाची किंवा इतर तेलवियांची पेंड किंवा तांदूळ, गहू अगर मका यांचा भुसा टाकून माशांना पुरक अन्न देतात किंवा संतुलित केलेल्या अन्नाच्या कण्या देऊन माशांची वाढ करतात.

देशांतर्गत खाऱ्या पाण्याच्या सरोवरात (उदा., विदर्भातील लोणार सरोवरात, राजस्थानातील सांबर सरोवरात, अमेरिकेच्या उटा राज्यातील सॉल्ट लेक सरोवरात) तेथील पाण्याच्या खारटपणामुळे मासे वाढत नाहीत आणि त्यामुळे तेथे व्यावसायिक मासेमारी होत नाही. मात्र आफ्रिकेतील झाईरे देशातील खचदरीमधील सरोवरांचे पाणी फारसे खारट नसल्यामुळे तेथे टिलापिया जातीच्या माशांची पैदास होते परंतु हे मासे लहान व मत्स्यालयांसाठीच वापरले जात असल्याने फारच थोड्या प्रमाणात पकडले जातात. जॉर्डनमधील मूत समुद्राचे पाणी तर इतके तीव्र खारट असते की, त्यात मासे जिवंतच राहू शकत नाहीत.

सागरी मत्स्योत्पादनाच्या मानाने गोड्या व मचूळ पाण्यातील मत्स्योत्पादन पुष्कळ कमी असते, हे कोष्टक क्र. ७ मधील आकड्यांवरून दिसून येईल.

देशांतर्गत मत्स्योत्पादन सागरी उत्पादनापेक्षा कमी आहे असे वाटते. कोष्टकांतील आकड्यांवरून ते सागरी उत्पादनाच्या अवघे १/९ इतके आहे; पण सागरी क्षेत्र देशांतर्गत जलाशयांपेक्षा २० पटींनी मोठे आहे. हे विचारात घेतले म्हणजे देशांतर्गत मत्स्योत्पादन तुलनात्मक दृष्ट्या सागरी उत्पादनापेक्षा जास्त अनुकूल आहे, असे आढळून येईल.

कोष्टक क्र. ७. सागरी व देशांतर्गत मत्स्योत्पादन

मत्स्योत्पादन (हजार टनांत)

वर्ष एकूण सागरी देशांतर्गत
१९७५

१९७६

१९७७

१९७८

६८,६०८

७२,११३

७१,२१३

७२,३७९

६१,२२२

६४,८०७

६३,७२०

६४,९८६

७,३८६

७,३०६

७,४९३

७,३९३

सागरी उत्पादनासाठी मोठमोठी जहाजे, या जहाजांवरील यांत्रिक सामग्री व इतर किंमती साधने यांवर होणारा अवाढव्य खर्च देशांतर्गत मासेमारीत त्यामानाने फारच कमी होतो. देशांतर्गत मासेमारी विखुरलेल्या प्रदेशांत होत असल्यामुळे निरनिराळ्या प्रदेशांतील मच्छीमारांना रोजगारी मिळते. काही प्रदेशांत तर ही रोजगारी त्यांच्या निवासस्थानाजवळच असल्यामुळे त्यांना सोईस्कर असते. अशा विखुरलेल्या मासेमारी क्षेत्रात विक्री-व्यवस्थेची किंवा मोठ्या शीतगृहांची सोय करण्याची आवश्यकता भासत नाही. हे सर्व विचारात घेतले म्हणजे देशांतर्गत मासेमारीतले उत्पादन जरी कमी असले, तरी त्याचे सामाजिक व आर्थिक महत्त्व पुष्कळ आहे यात संशय नाही.

जगातील निरनिराळ्या खंडांतील १९७२-७६ या पाच वर्षातले देशांतर्गत मासेमारीचे सरासरी उत्पादन कोष्टक क्र. ८ मध्ये दिले आहे.

कोष्टक क्र. ८. निरनिराळ्या खंडातील देशांतर्गत सरासरी मत्स्योत्पादन (१९७२-७६)
खंड उत्पादन (टनांत)
उत्तर अमेरिका

दक्षिण अमेरिका

आशिया

आफ्रिका

ऑस्ट्रेलिया

यूरोप

रशिया

१,४५,५३६

१,८०,०००

७२,९३,०६९

१४,३१,४४४

१३,४०७

२,६८,५९२

८,४१,३५६

या कोष्टकातील आकडेवारीवरून असे दिसते की, आशिया खंडात देशांतर्गत मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. या खंडात या क्षेत्रात चीन अग्रेसर आहे. त्यानंतर बऱ्याच फरकाने भारताचा दुसरा क्रमांक लागतो. काही देशांतील १९७६-७८ या तीन वर्षाच्या देशांतर्गत मासेमारीचे आकडे कोष्टक क्र. ९ मध्ये दिलेले आहेत.

कोष्टक क्र. ९ काही देशांतील देशांतर्गत मत्स्योत्पादन
उत्पादन (टनांत)
देश १९७६ १९७७ १९७८
चीन

भारत

रशिया

बांगला देश

इंडोनेशिया

टांझानिया

थायलंड

१३,००,०००

७,९९,२२१

७,७०,३१०

७,३६,०००

४,०१,३५३

१,९०,७८४

१,४७,२९४

१३,००,०००

८,६३,४२९

७,७०,८६२

७,४०,०००

४,१४,१६१

२,१४,२०८

१,२२,३७४

१२,६०,०००

८,९५,३६३

७,३२,४१५

५,४०,०००

४,३०,०००

२,३४,२००

१,५०,०००

सामन हे मासे समुद्रातून प्रजननासाठी नदीमुखात येतात व येथून काही अंतरावरच आपली अंडी घालतात. उत्तर अमेरिका, यूरोप, रशिया, तसेच जपान, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या प्रदेशांत सामन मासे नदीमुखात आले की, त्यांची मासेमारी करणे प्रचलित आहे. या मासेमारीत मोठी फास जाळी, कोंडवाडी पिंजरे, गोल पिंजरे अशी विविध प्रकारांची जाळी वापरली जातात. मासे उथळ पाण्यात आले किंवा बंधाऱ्यावरुन उड्या मारू लागले की,रेड इंडियन लोक भाल्याने किंवा तिरकमठ्याने त्यांची शिकार करतात. हे मासे नदीमुखात प्रजननासाठी आले की, ते पकडणे शक्य होते. यामुळे यांची जर फार प्रमाणात मासेमारी झाली, तर ही जात नष्ट होण्याची भीती आहे. हा मासा फार चविष्ट व मच्छीमारांचा आवडता मासा आहे. हा नष्ट होऊ नये म्हणून प्रादेशिक शासनाने काही उपाय योजले आहेत. या माशांना त्यांच्या अंडी घालण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचता यावे म्हणून कित्येक मोठमोठ्या घरणांवर ‘मत्स्यसोपान’ बांधण्यात आले आहेत. या माशांचे संरक्षण करण्याकरिता आंतरराष्ट्रीय सामन आयोग व काही संस्थाही स्थापन केल्या गेल्या आहेत. हा मासा थंड प्रदेशातील समुद्रांत राहतो. तो भारताच्या किनाऱ्यावरील नदीमुखांत येत नाही. सामन माशांच्या कुलातील (सामोनिडी कुलातील) गोड्या पाण्यात राहणाऱ्या माशांच्या एका गटास ट्राउट असे म्हणतात. हे मासे भारतात काश्मीर व निलगिरी भागातल्या नद्यांच्या थंड पाण्यात परदेशातून आणून सोडले आहेत. येथे हे मासे चांगले वाढतात व त्यांचे प्रजननही होते.

व्होल्गा, डॅन्यूब यांसारख्या मोठ्या नद्यात स्टर्जन हे मासे सापडतात. यांच्या अंड्यांपासून ‘कॅव्हिअर’या नावाचा चविष्ट पदार्थ तयार करतात. हा पदार्थ यूरोप व रशिया या प्रदेशांमध्ये जेवणातलाएक अत्युत्कृष्ट पदार्थ म्हणून समजला जातो. रशियात या माशाच्या संवर्धनाचे मोठमोठ्या तळ्यांतील तंत्र फार प्रगत आहे.

यूरोपातील नद्यांत वाम (ईल) मासे महत्त्वाचे आहेत. यांचे उत्पादनही चांगले आहे. प्रजननासाठी या माशांचे अटलांटिक महासागरात होणारे स्थलांतर उल्लेखनीय आहे. चीनमध्ये कार्प व मांजरी मासे यांचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होते. जगात सर्वत्र आढळणारा सामान्य कार्प (सायप्रिनस कार्पिओ) हा चीनमधून निर्यात झाला. ह्याची पैदास व वाढ गोड्या पाण्याच्या तलावात होते व अन्न म्हणून हा सर्वत्र वापरला जातो. सोनमासा (गोल्डफिश) हाही चीनमध्येच पैदा झाला. जगात सर्वत्र हा मासा काचपात्रात ठेवून शोभेसाठी वापरतात. जर्मनी, हंगेरी या देशांत सामान्य कार्पचे संवर्धन मोठ्या प्रमाणात केले जाते. यांगत्सीकिअँग, मेकाँग वगैरे नद्यातील गोड्या पाण्यातील मासेमारी आर्थिक दृष्ट्या फार महत्त्वाची आहे. थायलंड, इंडोनेशिया या देशांत लहान तळ्यांतील गोड्या पाण्यातील मासेमारी व मचूळ पाण्यातील मत्स्यसंवर्धन या उद्योगांना प्राधान्य दिले जाते. अलीकडे डेन्मार्क, जर्मनी यांसारख्या प्रगत देशांत ट्राउटचे संवर्धन मोठ्या प्रमाणात चालू आहे. अमेरिकेत बास व ब्ल्यूगिल या माशांबरोबर मांजरी माशांची जोपासना व विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

भारतातील देशांतर्गत मासेमारीची केंद्रे म्हणजे नद्या, तळी, सरोवरे व धरणे ही होत. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा व कावेरी ह्या मुख्य नद्यांत निरनिराळ्या क्षेत्रांत मासेमारी चालते. हिराकूद, रिहांड, गोविंदसागर, गांधीसागर, शिवाजीसागर, नागार्जुनसागर हे मोठे जलाशय व देशभर विखुरलेली लहानमोठी तळी व उत्तर भारतात झील या नावाने ओळखले जाणारे पाणथळ येथेही मासे पकडले जातात. नदीमुखाजवळच्या दुआबी प्रदेशातील मचूळ पाणी, पुलिकत, चिल्का आदी मचूळ पाण्याची सरोवरे, तसेच केरळ, कर्नाटक व इतरत्र भारताच्या समुद्रकिनारपट्टीच्या आतील बाजूस शेकडो किलोमीटर पसरलेले आणि मधूनमधून समुद्रात व नद्यांस जोडलेले नैसर्गिक कालव्यासारखे जलप्रवाह (बॅकवॉटर्स) ही सर्व मचूळ पाण्याची जलसंपदा एकंदर भारतीय देशांतर्गत मत्स्योद्योगात आधारभूत आहे. काही ठिकाणी भूमिजलापासून नलिकाकूपांच्या साहाय्याने पाणी घेतले जाते व ते तळ्यात सोडून त्यात मत्स्योत्पादन केले जाते. वरील जलसंपदेत वाढणारे मासे विविध तऱ्हेचे असतात. काही मुख्य व व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या गोड्या व मचूळ पाण्यातील माशांचे प्रकार कोष्टक क्र. १० मध्ये दिलेले आहेत.

कोष्टक क्र. १०. गोड्या व मचूळ पाण्यातील महत्त्वाचे मासे

प्रचलित नाव शास्त्रीय नाव
                                          गोड्या पाण्यातील मासे
कटला(तांबरा) कटला कटला
रोहू लेबिओ रोहिटा
मृगळ सिऱ्हिनस मृगाला
कलबासू लेबिओ कॅल्यासू
तांबीर लेबिओ फिंब्रिएटस
कानोशी पुंटीयस कोला
पोटील पुंटीयस पल्चीलस
पोष्टी, खवळ पुंटीयस सराना
महसीर किंवा खडशी टॉर खद्री
पुटीटोरा टॉर पुटीटोरा
तुरिया टॉर टॉर
म्हसळा टॉर म्हसळा
मरळ चाना नरूलियस. चा. स्ट्रॉएटस
डोख चाना याचुआ
मुरी (लोचीस) लेपिडोसेफॅलिक्थीस व पोटिया
वडशिवडा वॉलॅगो अट्टू
आमळी ऑक्सिगॅस्टर क्लुपिऑयडिस(चीला क्लुपिऑयडिस )
शिंगाला मिस्टस सिंवाला
शिलण सायलुंडिया सायलंडिया
पंगस पॅगासियस पॅगासियस
वळंज कॅलिक्रस बायमॅक्युलेटस
मागूर क्लॅरिअस बॅट्रॅकस
शिंगी हेटेरोन्यूस्टिस फॉसिसिस
फलकूट, पात नॉटॉप्टेरस, चिताला, नॉ. नॉटॉप्टेरस
कोई, खजुरी नायास टेस्ट्यूडिनीय
टोकी शेनेन्टोडॉन कॅन्सिला
वाम मॅस्टोसीम्बलस आर्मॅटस
अहिर अँग्विला अँग्विला
गुरामी ऑस्फ्रोनेमस गोरामी
गँबुझीया गॅम्ब्यूझिया ऑफिनीस
खरवी गोबीयस गियूरीस
दांडवन रासयोरा डॅनिकोनिअस
मळ्या गारा मळ्या
पिकू प्लोकाइलस लिनी
ट्राउट साल्मो गार्डनेरी, सा. इरीडीयस
स्नोट्राउट शिझोपोरॅक्स प्लॅजिओस्टोमस
                                                                     मचूळ पाण्यातील मासे
बोय, भादवी म्युजिल सेफॅलस
काळुंदर एट्रोप्लस सुर्टेन्सीस
बडा स्कॅटोकॅगस आर्गस
पाला हिल्सा इलिशा
टिलापिया सीरेपिरोडॉन मोझँबिका
जिताडा, खजुरा लॅटेस कॅल्कॅरिफेर
बाडस चॅनॉस चॅनॉस
बडस मेगॅलॉप्स सायप्रिनॉयडीस
मुडदुशी, रेणवी सिलॅगो सिहमा
तांब लुटियानस जाती
रावस पॉलिनीमस टेट्रडॅक्टिलस
निवटा बोलिऑप्थॅल्मस डुसुमेरी
निवटा पेरिऑप्थॅल्मस
चावरे झिंगे मॅक्रोब्रॅकियम रोझेन्वर्गी
घोड झिंगे मॅक्रोब्रॅकियम माल्कमसनी
खडपाली कोळंबी पेनीयस मोनोडॉन

उत्पादन : मानवाची उत्क्रांती पृथ्वीच्या भूप्रदेशावर झाली असे मानले, तर आदिमानवाच्या वसाहती नदी, तळे, सरोवर अशा जलसंचयानजीक निर्माण झाल्या असाव्यात. अन्नाकरिता वन्य पशूंची आणि पक्ष्यांची शिकार करता करता या जलसंचयातले प्राणी म्हणजे मुख्यत्वेकरून मासे हेही अन्न म्हणून वापरता येतात, हे त्यास उमगले असावे. यातूनच भारतासकट पृथ्वीवरील सर्व देशांत गोड्या पाण्यातील मासेमारीचा उगम झाला असावा. जसजशी नौकानयनाची साधने उपलब्ध झाली, तसतसे मानवाने समुद्रकिनाऱ्यावरच्या मासेमारीतून सागराच्या मासेमारीकडे प्रगती केली असावी.

जागतिक : देशांतर्गत मासळीच्या उत्पादनाची मोजदाद करण्यातही पुष्कळ अडचणी आहेत. सागरी मासळी बंदरात उतरविली जाते व ही बंदरे मोजदाद करण्याची कें द्रे बनतात. याउलट गोड्या पाण्यातील मासळी नदी, तलाव, सरोवरे अशा असंख्य आणि विखुरलेल्या क्षेत्रातून असंख्य मच्छीमारांकडून पकडली जाते. कित्येक ठिकाणी माल थोडा असल्यास तो बाजारात येण्यापूर्वीच विकला जातो. यामुळे मासळीच्या उत्पादनाची अचूक नोंद होऊ शकत नाही. तरीही संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेने प्रसिद्ध केलेल्या माहितीप्रमाणे काही प्रमुख जातींच्या उत्पादनाचे १९७५-७८ या चार वर्षांचे आकडे कोष्टक क्र. १० मध्ये दिलेले आहेत.

कोष्टक क्र. १०. विविध मत्स्यगटांचे देशांतर्गत जागतिक उत्पादन

           मत्स्यगट                                            उत्पादन (टनांत)
१९७५ १९७६ १९७७ १९७८
कार्प (रोहू, कटला वगैरे)

टिलापिया, काळुंदर इ.

मांजरी मासे व इतर

स्टर्जन

नदीतील वाम

सामन, ट्राउट, स्मेल्ट इ.

पाला, बाडस इ.

मचूळ पाण्यातील इतर

गोड्या पाण्यातील कोळंबी

गोड्या पाण्यातील तिसऱ्या

बेडूक

५,५६,६४०

२,९०,०९०

५५,६०,४३१

२७,५९२

५७,४४६

५,५१,६७०

७,५०,३५९

१,४८,८५३

५४,३४०

५७,११४

१,३३७

५,६४,३६०

३,०२,९२४

५३,२९,३५८

३०,९४६

६७,२४३

५,५५.७६७

७,६५,८५७

१,२१,८७६

४६,८३२

१,२८,५७३

१,२१२

५,८२,९२१

३,५२,०६४

५३,८४,८०६

३१,७४१

७१,२४९

६,३२,७६०

७,६१,९९३

८६,१२९

४७,५६७

१,३८,५४९

८२३

५,६०,८२३

३,६२,२७९

५१,७७,२०३

२७,७३९

७६,६३३

६,२१,०२१

८,३८,२०८

९१,३०९

४४,४३८

२,२३,९९५

९०८

भारत : कोष्टक क्र. ११. मधील आकड्यांवरून असे दिसून येईल की, भारतात देशांतर्गत मासळीचे उत्पादन सागरी उत्पादनाच्या अर्ध्यांपेक्षाही जास्त होऊ लागले आहे आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे. याचे मुख्य कारण हे की, मत्स्यसंवर्धनासाठी लागणारे मत्स्यबीज वाढत्या प्रमाणूत मिळू लागले आहे व त्यामुळे जास्त जलविस्तार मत्स्यसंवर्धनाखाली येऊ लागला आहे. मत्स्यबीजाच्या उपलब्धतेबरोबर मत्स्यसंवर्धन तंत्रातही सुधारणा होत आहे.

कोष्टक क्र. ११. भारतातील मत्स्योत्पादन (टनांत)
वर्ष सागरी देशांतर्गत
१९६८

१९७४

१९७५

१९७६

१९७७

१९७८

१९७९

१९८०

९,३४,६०१

१२,१७,७९७

१४,२२,६९३

१३,५२,८६६

१२,५९,७८२

१४,०३,६०७

१३,८८,३८०

१२,३४,२४७

५,९०,९९९

७,८३,३२१

८,५०,०००

७,९९,२२१

८,६३,४२९

८,९५,३६३

गोड्या पाण्यातील मासळीची जातवार विभागणी करणे कठीण आहे. ही मासळी असंख्य ठिकाणी पकडली जाते व पुष्कळ वेळा ती बाजारात येण्यापूर्वीच विकली जाते. या मासळीची स्थूलमानाने विभागणी मार्केटिंग ऑफ फिश इन इंडिया१९६१ या पुस्तकात दिली आहे, ती कोष्टक क्र. १२ मध्ये दिली आहे परंतु त्यानंतरच्या वीस वर्षातील एकंदर प्रगती लक्षात घेता त्यात फरक पडला असावा असा अंदाज आहे. हा फरकही कोष्टकात दर्शविला आहे.

देशांतर्गत मासेमारीची साधने : या मासेमारीत लागणारी साधने जरी सागरी मासेमारीत लागणाऱ्या साधनांच्या धर्तीवरच असली, तरी त्यांत बरीच विविधता आढळते. याचे कारण नद्या, तलाव,खाड्या या ठिकाणची परिस्थिती वेगवगळी असते. यामुळे येथे वापरण्यात येणाऱ्या साधनांतही फरक पडतात. काही ठिकाणी पाणी खोल व संथ असते, तर काही ठिकाणी ते उथळ वा वाहते असते. काही ठिकाणी पाणतळ खडकाळ असतो, तर काही ठिकाणी तो दलदलीचा चिखलयुक्त असतो. काही ठिकाणी तळातील चिखलात रुजून वाढलेल्या वनस्पती असतात, तर काही ठिकाणी पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या वनस्पती असतात. काही ठिकाणी भरतीच्या वेळी पाण्याखाली आलेला विस्तीर्ण प्रदेश असतो, तर ओहोटीच्या वेळी हाच उघडा पडलेला आणि चिखलाने भरलेला प्रदेश आढळतो. काही ठिकाणी गोड्या पाण्याची लहानमोठी तळी, तर काही ठिकाणी शेकडो चौरस किमी. चे चिल्का सरोवरासारखे मचूळ किंवा खाऱ्या पाण्याचे जलसंचय आढळतात.

कोष्टक क्र. १२. भारतातील गोड्या पाण्यातील गटवार मत्स्योत्पादनाची टक्केवारी.
             मत्स्यगट १९६१ टक्केवार १९८१ टक्केवारी
कार्प (कटला, रोहू वगैरे)

मांजरी मासे (शिंगाळे, शिवडे वगैरे)

कोय, मागूर, मरळ वगैरे

कोळंबी (लहानमोठी सर्व)

पाती (नॉटॉप्टेरस)

बोय, भादवी वगैरे

वाम

चाप्रा, पाला वगैरे

आमळी

मळ्या, मुरी

टिलापिया

इतर

३७.०

३४.०

१०.०

६.५

४.८

४.४

०.७

०.६

२.०

१००.००

४२.०

३०.०

६.०

७.०

२.०

३.०

०.८

३.०

२.०

१.०

१.२

२.०

१००.००

या विविध प्रकारांच्या जलाशयांत उपयोगी पडणारी जाळी, सापळे, करंडे, गळ, भाले, तलवारी, तिरकमठे, बंदुका व माशांना गुंगी आणणारी औषधे यांतही विविधता आढळते. याचे वर्णन मागे सागरी मत्स्योद्योगात दिले आहे.

खोल पाण्यातील मासेमारी करण्याकरिता पाण्याच्या पृष्ठभागावर फिरावे लागते. हे करण्यास पाण्यावर तरंगणाऱ्या साधनाची जरूरी असते. याकरिता वापरात असलेले अत्यंत सोपे साधन म्हणजे तराफा. साधे लाकडी ओंडके, सुक्या जाड काट्यांचे भारे, केळीचे खुंट (खांब) इ. तरंगणाऱ्या वस्तू एके ठिकाणी बांधून व वरचा पृष्ठभाग सपाट करून तराफा बनवतात व यावर उभे राहून जाळी टाकून मासेमारी केली जाते. रिकामी पिंपे एके ठिकाणी बांधून त्यांवर फळ्या बांधूनही तराफा तयार करतात. बिहार, ओरिसा किंवा दक्षिणेत कावेरी नदीमध्येही मातीची मडकी बांधून पूर्वी असे तराफे करीत असत. दोनतीन सीलबंद डबे किंवा सुके भोपळे एकत्र बांधून त्यावर मच्छीमार स्वार होतात व जाळे वापरतात. काही वेळा हलक्या लाकडाचे ओंडके पोखरून लहान होड्या तयार करतात व त्यांत बसून वल्ही वापरून फिरत असताना जाळी टाकली जातात. मोठ्या जलाशयात याच कामासाठी चांगल्या सागवानी लाकडाच्या होड्या वापरल्या जातात. या होड्या आकारमानाने लहान असतात. आफ्रिकेतील व्हिक्टोरिया नियांझा, ॲल्बर्ट नियांझा, तसेच अमेरिकेतील लेक सुपीरियर, लेक मिशीगन यांसारख्या अवाढव्य सरोवरांत मासेमारीत लागणारी निरनिराळी यंत्रसामग्री असलेली जहाजे वापरली जातात. या यंत्रांच्या साहाय्याने समुद्रावरच्या मासेमारीत वापरण्यात येणारी ट्रॉल, वावरी (फास जाळे), दावणी गळ वगैरे जाळ्यांचा उपयोग केला जातो.

भारतातील देशांतर्गत मासेमारीत ट्रॉल जाळ्याचा उपयोग अगदी अलीकडेच करण्यात येऊ लागला आहे. दुसरी जाळी मात्र काही ठिकाणी लहान यांत्रिक मचव्यांवरून वापरली जात आहेत. त्यातल्या त्यात नद्यांतून वापरले जाणारे विशिष्ट जाळे म्हणजे ‘पट्टे जाळे’ किंवा ‘महाजाल’ हे होय. हे जाळे पडद्यासारखे सु. ८० मी. लांबीचे व सु. ३ ते ४ सेंमी. आसाचे असते. ते दोन्ही बाजूंना भक्कम दांड्यास किंवा लाकडी वाशाला बांधतात व त्याला ओढण्यासाठी दोन्ही बाजूंना दोरखंड असतात. या पडद्यासारख्या जाळ्यास त्याच्या वरच्या किनारीला तरंगण्यासाठी भेंडे आणि खालच्या किनारीला बुडण्यासाठी वजने बांधलेली असतात. खालची किनार वर उचलून जाळ्याच्या आतील भागास बांधून ओचा तयार करतात. जेथे मासे असण्याचा संभव आहे अशा ठिकाणी हे जाळे पाण्यात ओढले जाते. यानंतर जाळ्याची दोन्ही टोके किनाऱ्यावर आणून ते ओढले जाते. ओढण्यासाठी प्रत्येक टोकास आठ माणसे लागतात. अशा रीतीने जाळे ओढले जाऊ लागले की, मासे पडद्यासारख्या जाळ्यावर घडकतात व निसटून जाण्याच्या प्रयत्नात तळापर्यंत जातात व तेथे असलेल्या जाळ्याच्या लांब पिशवीसारख्या ओच्यात अडकतात. जाळे किनाऱ्यावर ओढले गेले की, ते मच्छीमाराच्या हाती लागतात. काही ठिकाणी या जाळ्याचे दोन भाग करतात व त्याच्या मध्यभागी लांब निमुळती जाळ्याच्या पडद्याचीच पिशवीसारखी खोळ बांधतात. त्यामुळे दोन्ही बाजूंस जाळे व मधे खोळ असे जाळे तयार होते (आ. १४). जाळे ओढत असताना इतस्ततः पळणारे मासे शेवटी या खोळीत शिरतात व शेवटच्या निमुळत्या भागात अकडतात. काही प्रांतांत फेक जाळ्याच्या खालच्या किनारीलाही वर वर्णन केल्याप्रमाणे ओचा काढतात. अशा ओच्यात जास्त मासे अडकतात.

लहान नद्यांच्या पात्रात, ज्या वेळी उन्हाळ्यात पाणी कमी असते, तेव्हा सुट्या दगडांचे नरसाळ्यासारखे निमुळते बांध करून त्यांच्या अरुंद तोंडावर खाब रोवतात व रुंद तोंडाचे पण निमुळते होत जाणारे बोकसीसारखे जाळे बांधतात. नंतर नदीचे पाणी या दगडी रचनेत वळविले जाते. या वाहत्या पाण्यातून आलेले मासे निमुळत्या जाळ्यात (ज्याला खोरी म्हणतात) पकडले जातात. हे जाळे विशेषतः सायंकाळी बांधतात व सकाळी उचलतात.

कुलकर्णी, चं. वि.

नद्यांतील मासेमारी : जगातील गोड्या पाण्याच्या मासेमारीत नद्यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. जमिनीवर किंवा पर्वतावर पडलेल्या पावसाचे पाणी, तसेच उंच पर्वतावर असलेले बर्फ वितळल्यामुळे वाहून येणारे पाणी अखेर नद्यांत येते. यामुळे गोड्या पाण्याचा मोठा साठा म्हणजे नदीप्रवाह होय. मोठमोठी धरणे नद्यांवरच बांधली जातात. नद्या या पृथ्वीवरील जीवनाचा व त्यातल्या त्यात मत्स्यसंपदेचा मुख्य आधार आहेत. नाईल, ॲमेझॉन, मिसिसिपी, मिसूरी, व्होल्गा, डॅन्यूब, झँबीझी, मेकाँग, तसेच भारतातील गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, गोदावरी यांसारख्या मोठ्या नद्यांत असंख्य जातींच्या माशांची निपज व वाढ होत असते आणि मासेमारीचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो.

कोणत्याही नदीचे मुख्यतः तीन भाग पडतात. पहिला म्हणजे उगमाजवळील भाग. हा साधारणतः डोंगराळ प्रदेशाचा बनलेला असतो. यातून नदी वाहताना तिचे पात्र अरुंद व लहान असते. नदीचा उगम बर्फाच्छादित डोंगरात होत नसल्यास पाण्याच्या दृष्टीने नदीचे पात्र हंगामी स्वरूपाचे असते. दुसऱ्या भागात नदी सपाट प्रदेशातून वाहते व तिला लहान उपनद्या आणि ओढे मिळतात. यामुळे नदीचे पात्र पाण्याने संपन्न असते व त्यात बारमाही पाणी असते. तिसरा भाग म्हणजे नदीमुख. या भागात नदी समुद्रास मिळते. नदीमुखाजवळ मुख्य पात्रास फाटे फुटतात व हा भाग त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. मासेमारीच्या दृष्टीने नदीचा दुसरा व तिसरा भाग महत्त्वाचा आहे. कारण या भागांत बारमाही पाण्याचा पुरवठा व काही ठिकाणी मोठाल्या खोल डोहाच्या रूपाने माशांच्या वास्तव्यास सतत पाणी उपलब्ध होते. त्रिभुज प्रदेशातील भौगलिक परिस्थिती व समुद्राच्या भरती-ओहोटीचा परिणाम यांमुळे या भागातील पाण्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म दुसऱ्या भागातील पाण्यापेक्षा भिन्न असतात. यामुळे या दोन्ही विभागांत आढळणाऱ्या माशांच्या जातींतही फरक आढळतात.

जगातील सर्व नद्यांची एकूण लांबी किती असेल याबावत निश्चित माहिती उपलब्ध नाही. लांबीच्या दृष्टीने जगातील पहिल्या २८ नद्यांची लांबी (यात भारतातील फक्त ब्रह्मपुत्रा नदीचा समावेश आहे) एकूण ४२,६०० किमी. आहे. यात आफ्रिकेतील नाईल नदी ही सर्वांत मोठी म्हणजे ६,६५० किमी. लांबीची आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा क्रमांक २३ वा असून तिची लांबी २,९०० किमी. (तिबेट व बांगला देशातील लांबीसह) आहे.

भारतातील नद्यांचे विभाजन खालीलप्रमाणे करता येईल : (१) गंगेचे खोरे, (२) ब्रह्मपुत्रेचे खोरे, (३) सिंधू नदीचे खोरे (या खोऱ्याचा फार थोडा भाग आता भारताच्या हद्दीत आहे), (४) दक्षिणेकडील पूर्ववाहिनी नद्यांची खोरी व (५) दक्षिणेकडील पश्चिमवाहिनी नद्यांची खोरी. यांपैकी गंगा व तिच्या उपनद्यांची एकूण लांबी ८,०४० किमी. आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यां मिळून ४,०२३ किमी. भरतात. दक्षिणेकडील पूर्ववाहिनी नद्यांत महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांचा समावेश आहे व त्यांची उपनद्यांसह एकूण लांबी ६,४३७ किमी. आहे. पश्चिमवाहिनी नद्यांत नर्मदा व तापी या दोनच महत्त्वाच्या नद्या आहेत व त्यांची उपनद्यांसह एकूण लांबी ३,३८० किमी. आहे.

नद्यांचा उगमाजवळचा विभाग पाण्याच्या दृष्टीने हंगामी असल्यामुळे मत्स्यसंवर्धनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा ठरत नाही. म्हणून ज्या नद्या बर्फाच्छादिन पर्वतातून उगम पावतात त्या वरील नियमास अपवाद म्हणून समजाव्यात. अशा नद्यांचा उगम हिमालय, आल्प्‌स किंवा रशिया वगैरेंसारख्या शीतकटिबंधातल्या प्रदेशात असणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतांतून होतो. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे या नद्यांस भरपूर पाणी असते पण पाण्याचे तापमान फार कमी असल्यामुळे अशा पाण्यात ट्राउटसारख्या थंड पाण्यात राहणाऱ्या काही थोड्या महत्त्वाच्या माशांच्या जाती आढळतात. याउलट सपाट मैदानावरील जलप्रवाहात बारमाही पाणी असते व तापमानही फार थंड नसते. त्यामुळे त्यात असंख्य जातींचे लहान मोठे मासे आढळतात. या पाण्यात प्रवाहाबरोबर वाहून येणाऱ्या अनेक जैव (सेंद्रिय) द्रव्यांमुळे या पाण्याची उत्पादनक्षमताही जास्त असते. कटला, रोहू मृगळ, मरळ, शिवडा, शिंगाडा, बोय (बॅगारियस), महसीर आणि काही जातींची कोळंबी हे विविध प्रकारचे मासे भारतातील नद्यांत आढळतात. कटला, रोहू, मृगळ यांसारख्या माशांचे प्रजनन नद्यांतच होत असल्यामुळे त्यांचे मत्स्यबीज मोठ्या प्रमाणात नद्यांच्या किनारी भागातून गोळा केले जाते. चीनमधील सिल्व्हर कार्प, ग्रास कार्प, बिगहेड कार्प, ब्लॅक कार्प व मड कार्प, तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील बास, ब्ल्यूगिल, सनफिश व ईल आणि रशियातील एसिपेन्सर या महत्त्वाच्या जाती त्या त्या विभागांतील नद्यांत आढळतात. नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेशातील पाणी भौतिक व रासायनिक दृष्ट्या मध्य भागापेक्षा निराळे असते. यामुळे या भागात आढळणार्याट जाती निराळ्या असतात. जिताडा (भेकरी), पाला, बोय, काळुंदर, निवटे, कोळंबी, वडशी, वडा या येथे आढळणाऱ्या काही जाती आहेत.

नद्यांतील मासेमारीसाठी फास जाळी वापरतात. ही जाळी तागडीसारखी वर भेंडे व खाली वजने लावून तरंगत ठेवली जातात. जेथे नदीपात्रात काही अडथळे नसतात तेथे ओढ जाळी वापरतात. ही जाङी गोल असून ती सोडल्यानंतर त्यांची दोन्ही टोके धरून किनाऱ्याकडे खेचून आणली जातात. बऱ्याच ठिकाणी लहान होडीतून एका माणसास सोडता येतील अशी फेक जाळी उपयोगात आणली जातात. यांशिवाय पेलनी, झाप यांसारखी लहान हातजाळी व सापळे ही वापरली जातात. नद्यांतील मासेमारी ही पाण्याचा साठा, प्रवाह इ. गोष्टींवर अवलंबून असल्याने मासेमारीची जागा ऋतुमानानुसार बदलत असते, तसेच ही मासेमारी मोठ्या सामूहिक पद्धतीने न होता एकेकट्याकडून अगर लहान गटाने होत असते. पकडलेल्या सर्व मासळीचे एकत्रीकरण होत नाही व यामुळे नद्यांच्या मत्स्योत्पादनाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. भारतातील १९६४ ते १९७४ या दशकातील गोडया पाण्यातील वार्षिक मत्स्योत्पादन सरासरी ७.५ लक्ष टन इतके होते. यांपैकी निदान ३.५ ते ४.० लक्ष टन मत्स्योत्पादन नद्यांतील असावे, असा अंदाज आहे.

नदीवर बांधल्या जाणाऱ्या धरणामुळे पाण्याच्या प्रवाहात खंड पडतो. धरणामुळे निर्माण झालेल्या जलाशयाचा व धरणाखालील नदीच्या पात्राचा माशांच्या हालचालीच्या दृष्टीने संबंध तुटतो. अनेक जातींचे मासे प्रजननासाठी किंवा अन्नाच्या शोधात ठराविक ऋतूत स्थलांतर करतात पण वरील कारणाने या स्थलांतरास बाध येतो. यामुळेड सामन, पाला यांसारखे समुद्रातून नदीच्या गोड्या पाण्यात प्रजननासाठी स्थलांतर करणारे मासे अशा नद्यांतून नष्ट होत जातात. ही अडचण दूर करण्यासाठी ब्रिटन, कॅनडा, अमेरिका यांसारख्या देशांत सामन माशांना त्यांच्या अंडी घालण्याच्या आनुवंशिक नदी भागात किंवा ओढ्यात पोहोचण्यासीठी नदीच्या पात्रात त्या धरणावर विशिष्ट प्रकारच्या मत्स्यस्थलांतर शिड्या (मत्स्यसोपान) अगर अन्य प्रकारचे मत्स्यमार्ग तयार करून दिलेले असतात. यामुळे सामन मासे धरणाच्या तळाच्या पातळीपासून थेट वरच्या पातळीपर्यंत म्हणजे कधीकधी ३० मी. उंचीपर्यंत जाऊन आपल्या आनुवंशिक ठिकाणी जाऊन प्रजनन करू शकतात. भारतात पाला या माशांच्या बाबतीत अशा तऱ्हेची अडचण कृष्णा, कावेरी, गोदावरी या नद्यांवर असणाऱ्या अनेक धरणांमुळे उत्पन्न झाली आहे. पाकिस्तानातील गुलाम महंमद व सक्कर या धरणांमुळेही सिंधू नदीतील माशांची विणावळ खुंटली आहे. या सर्व ठिकाणी योग्य असे मत्स्यमार्ग नाहीत. पंजाबात काही ठिकाणी योग्य असे मत्स्यमार्ग नाहीत. तेथे काही ठिकाणी असे मार्ग बांधण्याचा प्रयत्न झाला परंतु तो अयशस्वी ठरला. मत्स्यमार्गाचे आकृतिबंध व बांधकाम त्या त्या माशाच्या स्वभावधर्मास सुयोग्य असेच असावे लागते. हे काम जिकिरीचे असते.

औद्योगिकीकरणामुळे विविध प्रकारचे कारखाने नदीकिनाऱ्याजवळ उभारले जात आहेत. या कारखान्यांतील सांडपाणी आणि निरुपयोगी रासायनिक व इतर द्रव्ये नदीच्या पात्रात सोडली जातात. यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन फार मोठ्या प्रमाणात माशांचा संहार होतो. हे थांबविण्यासाठी बहुतेक प्रगत देशांत व भारतातही प्रदूषण प्रतिबंधक कायदे अस्तित्वात आले आहेत. यामुळे मत्स्यसंहारास आळा बसेल व मत्स्यसंवर्धन सुकर होईल, अशी आशा आहे. [⟶ प्रदूषण].

साने, प्र. रा.

बृहत् जलाशयातील मासेमारी : नैसर्गिक मोठी सरोवरे व मनुष्यनिर्मित मोठी धरणे ही बृहत् जलाश य या सदरात मोडतात. या जलाशयांचा उपयोग शेतीस पाणीपुरवठा करण्यासाठी किंवावीजनिर्मितीसाठी केला जातो. बृहत् जलाशयाची सर्वमान्य अशी व्याख्या केली गेलेली नाही, तरीही ज्या जलाशयाचा विस्तार उन्हाळ्यात सुद्धा कमीत कमी २०० हेक्टर असेल अशा जलाशयास बृहत् जलाशय म्हणतात.

जगातील बृहत् जलाशयांच्या एकूण विस्ताराबाबत निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. हीच स्थिती भारतातील जलाशयांबाबत आहे तरी पण काही उपलब्ध माहितीच्या आधारे भारतातील बृहत् जलाशयांचा विस्तार अंदाजे ७.५ लाख हेक्टर असावा, असे गृहीत धरले जाते. भारतात प्रतिवर्षी नवेनवे प्रकल्प अस्तित्वात येत असल्यामुळे या जलाशयांचा विस्तार वाढत आहे.

जलाशय कोणत्या भौगोलिक विभागात आहे यावरच त्यातील माशांच्या जाती अवलंबून असतील. हिमालय किंवा आल्प्‌स यासारख्या बर्फमय प्रदेशात असलेल्या जलाशयाचे पाणी थंडगार असते व अशा पाण्यात ट्राउटसाखे मासे जगू शकतात. डोंगराळ व खडकाळ प्रदेशातील जलाशयात व जलप्रवाहात महसीर (खडशी) सारखे मासे आढळतात. उष्ण कटिबंधातील सपाट जमिनीवर निर्माण केलेल्या जलाशयात या प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांच्या जलप्रवाहात संथ व स्थिर पाण्यातील कटला, रोहू, मृगळ, मरळ, शिंगाडा अशा विविध प्रकारच्या जाती आढळतात. भौगोलिक परिस्थीतीनुसार पाण्याच्या एकूण सेंद्रिय उत्पादनातही पुष्कळच फरक असतो व यामुळे पाण्यातील विशिष्ट प्रकारचे प्लवक किंवा इतर अन्न यानुसार त्यावर वाढणाऱ्या माशांचे प्रकार व संख्या अवलंबून असते. मुख्य किंवा उपनदीवर धरण बांधले गेले म्हणजे मनुष्यनिर्मित जलाशय निर्माण होतात. या जलाशयातील पाणी ज्या नदीप्रवाहातून घेतले जाते त्या नदीप्रवाहातील माशांच्या जाती या धरणातील पाण्यात आढळतात. धरणामुळे निर्माण झालेल्या जलाशयातील परिस्थिती नदीच्या प्रवाहातील परिस्थितीपेक्षा हळूहळू वेगळी बनत जाते. पाण्याची खोली, पाण्याच्या निरनिराळ्या पातळीवरीळ तापमान, त्यातील ऑक्सिजनाचा व कार्बन डाय-ऑक्साइडाचा साठा, त्यात वाढणारे प्लवक व वनस्पती ही या जलाशयात नदीप्रवाहापेक्षा निराळी असतात. या बदलत्या वातावरणाशी समरस न होऊ शकणाऱ्यां माशांच्या जाती जलाशयात हळूहळू नष्ट होतात. तसेच ज्यांना हे वातावरण अनुकूल आहे अशा नव्या जाती येथे येतात, सोडल्या जातात किंवा निर्माण होतात व झपाट्याने वाढू लागतात.

लहान तळ्यात ज्या प्रमाणात मत्स्योत्पादन घेणे शक्य होते त्या प्रमाणात बृहत् जलाशयात ते होत नाही. या मोठ्या जलाशयातील हेक्टरी उत्पादन फारच कमी असते. लहान तळ्यात निसर्गतःच पौष्टिक लवणे जास्त प्रमाणात असल्यामुळे सेंद्रिय पदार्थ, प्लवक वगैरे माशास लागणारे अन्न जास्त प्रमाणात असते. आवश्यक वाटल्यास खताद्वारे लवणे व इतर पूरक अन्न पाण्यात टाकून मत्स्योत्पादन वाढविणे शक्य होते. तसेच लहान तळ्यातील मासे पकडणेही सोपे असते. मोठ्या तळ्यात किंवा जलाशयात कितीही मत्स्यबीज सोडले, तरी ते अपुरे पडते. अमेरिका व रशिया यांसारख्या प्रगत राष्ट्रांतही मोठ्या जलाशया- तील मत्स्योत्पादनाचे प्रमाण हेक्टरी ४० ते ५० किग्रॅ. पेक्षा जास्त नाही. भारतात हे प्रमाण १९७६ पर्यंत हेक्टरी फक्त ७ ते ८ किग्रॅ. इतकेच होते. मेत्तूर (तमिळनाडू) येथील स्टॅनले धरणासारख्या अनेक वर्षे भरपूर मत्स्यबीज साठा असलेल्या जलाशयात हे हेक्टरी ३० ते ३५ किग्रॅ.इतके आहे. स्टॅनबरी यांच्या मते अमेरिकेतील मोठ्या जलाशयात सध्या मत्स्योत्पादनाचे प्रमाण दर हेक्टरी साधारणपणे २० किग्रॅ. इतके आहे. हे १९७६ पर्यंत २६ किग्रॅ. व विसाव्या शतकाच्या अखेरीस हेक्टरी ४० किग्रॅ.पर्यंत वाढवावे लागेल. डेव्हिड यांच्या मते रशियातील मोठ्या जलाशयांतील मत्स्योत्पादन प्रतिवर्षे हेक्टरी २० ते ४० किग्रॅ. असावे. १९७२ मधील उपलब्ध आकडेवारीनुसार भारतातील निरनिराळ्या मोठ्या जलाशयांतील मत्स्योत्पादन कोष्टक क्र. १३ प्रमाणे होते.

कोष्टक क्र. १३. भारतातील विविध बृहत् जलाशय व त्यांतील हेक्टरी मत्स्योत्पादन
जलाशय हेक्टरी मत्स्योत्पादन (किग्रॅ.)
भवानीसागर (तमिळनाडू) १०
रिहांड (उत्तर प्रदेश)
नागार्जुनसागर (आंध्र प्रदेश)
पुंडी (तमिळनाडू) ७.५
तुंगभद्रा (कर्नाटक) ६.९
मेत्तूर (तमिळनाडू) ३६.८
बोर (महाराष्ट्र, जि. वर्धा) २५
येलदरी (महाराष्ट्र, जि. परभणी) ८ ते १४.५
सिद्धेश्वर (महाराष्ट्र) ५.८
शिवाजीसागर (महाराष्ट्र-कोयना)

जगातील अतिशय प्रचंड व महत्त्वाचे गोड्या पाण्याचे बृहत् जलाशय कोष्टक क्र. १४ मध्ये दिले आहेत.

पाच हजार चौ. किमी. क्षेत्रफळांपेक्षा जास्त विस्ताराचे जगात निदान २२ तरी बृहत् जलाशय आहेत. भारतातील सर्वांत मोठे धरण महानदीवरील हिराकूद हे होय. याचे क्षेत्रफळ सरासरी ७३७ चौ. किमी. इतके आहे. महाराष्ट्रातील कोयनेवरील शिवाजीसागर ह्या जलाशयाचे क्षेत्रफळ १२१ चौ. किमी. इतके आहे.

कोष्टक क्र. १४. जगातील महत्त्वांचे बृहत् जलाशय

देश जलाशयाचे नाव क्षेत्रफळ (चौ. किमी.)
अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा लेक सुपीरिअर ८१,४६०
मध्यपूर्व आफ्रिका व्हिक्टोरिया ६७,०००
अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा ह्यूरन ३८,९००
अमेरिकेची संयुक्त संस्थाने मिशिगन ५८,०००
मालावी (आफ्रिका) न्यासा २९,६०४
रशिया बैकल ३१,५००

जलाशयाच्या प्रचंड विस्तारामुळे माशांचे दर हेक्टरी उत्पन्न कमी भासत असले, तरी एकूण उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात होऊन अनेक गरीब मच्छीमारांना एक बारमाही उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले आहे. कटला, रोहू, मृगळ इ. मत्स्योत्पादनाच्या द्दृष्टीने उपयुक्त अशा जातींच्या मत्स्यबीजाचा साठा मोठ्या प्रमाणात व सुरक्षित ठिकाणी केल्यास व अनावश्यक मत्स्यजाती कमी केल्यास एकंदर मत्स्योत्पादन खूपच वाढेल. मोठे जलाशय काही उपयुक्त जातींच्या प्रजननास जास्त पोषक आहेत.

कुलकर्णी, चं. वि.

प्लवक

पृथ्वीवरील जलाशयांच्या (१) खाऱ्यां पाण्याचा विभाग (महा- सागर व समुद्र), (२) गोड्या पाण्याचा विभाग (नद्या, गोड्या पाण्याची सरोवरे व तळी), (३) मचूळ पाण्याचा विभाग (नदी- मुखे) या तीनही विभागांत निरनिराळ्या असंख्य जातींच्या सजीवांचे अस्तित्व आहे. या सजीवांच्या राहण्याच्या व वावरण्याच्या सवयीं-प्रमाणे त्यांचे स्थूलमानाने तीन प्रकार पडतात. पाण्याच्या तळाशी वास्तव्य करणाऱ्यां सजीवांना ‘नितलवासी’ [→नितल जीवसमूह], पाण्यामध्ये स्वैरपणे वावरणाऱ्यां सजीवांना ‘तरणक’ आणि पाण्याच्या अगदी वरच्या स्तरात तरंगत राहणाऱ्यां सूक्ष्मजीवांना ‘प्लवक’ म्हणतात. प्लवकांवर इतर सर्व जलचर प्राण्यांचे जीवन अवलंबून असल्याने मत्स्योद्योगाच्या द्दृष्टीने प्लवकांचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. समुद्रकिनाऱ्यांजवळील पाण्यात प्लवकांचे प्रमाण जास्त असते, तर खोल समुद्रात ते कमी असते. प्लवकविहीन पाण्याचे साठे फारच क्वचित आढळतात.

निरनिराळ्या प्लवकांची वैशिष्ट्ये विचारात घेऊन त्यांचे वनस्पति-प्लवक व प्राणि-प्लवक असे दोन विभाग पाडले आहेत. वनस्पति-प्लवकांचे चार मुख्य प्रकार आहेत : (१) डायाटम (करंडक), (२) डायनोफ्लॅजेलेटे, (३) नील-हरित शैवले व (४) फ्लॅजेलेटे. यांपैकी डायाटम हे फार महत्त्वाचे आहेत. [→ डायाटम; शैवले].

प्राणि-प्लवकांमध्ये असंख्य जाती असून बऱ्यांच संघांतील वर्गात समाविष्ट केलेल्या सूक्ष्मजीवांचा यात समावेश आहे. यांपैकी नेहमी आढळणाऱ्यां व त्यातल्या त्यात सागरी प्राणि-प्लवकांत आढळणाऱ्यां प्रांण्यांत सोलमुंडेला, आबेलिया, डायफीस, टिनोफोर, पॉलिकीट, पोडॉन इत्यादींचे डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जग- णारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्वावस्था) व पिले खेकडे, शेवंड, कोळंबी इत्यादींची पिले अँसिटस, सॅजिट्टा, डोलिओलम, माशांची अंडी आणि छोटी पिले इत्यादींचा अंतर्भाव होतो.

बांगडा, तारली, पेडवे, अँकोव्ही, हेरिंग इ. मासे मुख्यतः प्लवकां- वरच जगतात. जगातील सु. ७ कोटी टन मत्स्योत्पादनात या माशांचे प्रमाण ४०% आहे. इतर मासे प्रौढावस्थेत जरी प्रत्यक्ष खात नसले, तरी त्यांची छोटी पिले प्लवक खाऊनच मोठी होतात आणि मग ती इतर लहान मासे खाऊ लागतात. कॉड, हॅडॉक, ट्यूना, फ्लाउंडर, हॅलिबट, मुशी इ. माशांच्या सवयी अशा आहेत. यावरून असे दिसून येईल की, काही मासे आयुष्यभर प्लवकांवर जगतात, तर काही त्यांच्या बाल्यावस्थेत प्लवकांवर व प्रौढावस्थेत इतर माशांवर जगतात. सर्व माशांचे आद्य स्वरूपाचे अन्न प्लवक होय. जेथे प्लवक कमी तेथे मासळी कमी व जेथे प्लवक जास्त तेथे मासळी भरपूर प्रमाणात असते, असे सर्वसाधारणपणे आढळते. यावरून सागरी जीवनातील अन्न-साखळीतील प्लवकांचे महत्त्व लक्षात येईल.

जगातील सर्व महासागरांत व समुद्रांत मिळून वनस्पति-प्लवकांचे वार्षिक सरासरी उत्पादन ५० × १०१० टन होते, असा एक अंदाज करण्यात आलेला आहे. वा वनस्पति-प्लवकांचा अन्न म्हणून प्राणि-प्लवकांनी उपयोग केला व त्यातील २० टक्क्यांचे जरी प्राणि-प्लवकांत रूपांतर झाले, तरी सर्व समुद्रांत मिळून दरवर्षी १० × १०१० टन इतके प्राणि-प्लवक निर्माण होईल. यावरून समुद्राची प्राण्यांच्या अन्नसाखळी-तील क्षमतेची कल्पना येईल.

गोड्या पाण्यातील प्लवक : समुद्राप्रमाणेच गोड्या पाण्यातही वनस्पति-प्लवक व प्राणि-प्लवक विखुरलेले असतात. सागरी प्लवकांप्रमाणे गोड्या पाण्यातील प्लवकांचेही मत्स्योत्पादनात फार महत्त्वाचे स्थान आहे. सागरी पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात कित्येकदा प्लवकांचे प्रमाण जास्त असते. वनस्पति-प्लवकांत एककोशिक (एकाच पेशीच्या बनलेल्या), बहूकोशिक, तसेच समूहाने राहणाऱ्यां एककोशिक अशा विविध प्रकारच्या शैवलांचा समावेश होतो. नील-हरित व हरितद्रव्य असलेल्या निरनिराळ्या जातींची शैवलेही यांत मोडतात. प्राणि-प्लवकां-मध्ये एककोशिक आदिजीवांपासून (प्रोटोझोआंपासून) ते बहुकोशिक अपृष्ठवंशीपर्यंत (पाठीचा कणा नसणाऱ्यांपर्यंत) विविध प्राणी आढळतात. सर्वसाधारणपणे आढळणारे प्राणि-प्लवक व्हॉर्टिसेला, डिफ्लुजिया, विविध कवचधारी प्राण्यांचे डिंभ, डॅफनिया, सायक्लॉप्स इ. होत.

वनस्पति-प्लवक किंवा प्राणि-प्लवक वैयक्तिक रीत्या अतिसूक्ष्म व पारदर्शक असले, तरी त्यांची संख्या इतकी प्रचंड असते की, त्यामुळे व विशेषतः वनस्पति-प्लवकांतील हरितद्रव्यामुळे पाण्यास विशिष्ट रंग प्राप्त होतो व पाण्याची घनताही वाढते. प्लवकांच्या वाढीस सूर्यप्रकाशाची व विशिष्ट तापमानाची आवश्यकता असल्यामुळे साधारण उथळ पाण्यात व खोल पाण्याच्या वरच्या स्तरातच प्लवक मोठ्या प्रमाणात आढळतात. सरोवरांत व तलावांत अनेकदा प्लवक मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. हाव्हॅनाजवळील एका तळ्यात दर चौ. मी. पाण्याच्या पृष्ठभागात ६६७ घ. सेंमी. इतके प्लवक आढळले. मिशिगन सरोवरात तेच प्रमाण १७६ घ. सेंमी., तर इंडियानातील टर्की सरोवरात १,४३९ घ. सेंमी. इतके आढळते.

अनेक ठिकाणी व भिन्न खोलींवर आढळणाऱ्यां निरनिराळ्या प्लवकांचा गुणात्मक व परिमाणात्मक अभ्यास करण्यासाठी विविध पद्धतींचा व साधनांचा उपयोग करण्यात येतो. [→प्लवक].

कुलकर्णी, चं. वि.

मत्स्यसंवर्धन

लहान तळ्यातील, तसेच मोठ्या तलावातील किंवा अगदी छोट्या मत्स्यालयातील किंवा मत्स्यपेटिकेतील (काचपात्रातील) मत्स्यपालन या सर्वांचा अंतर्भाव मत्स्यसंवर्धनात होतो. पारंपरिक अर्थाने लहान अगर मोठ्या तळ्यातील व्यावसायिक मत्स्यपालनास मत्स्यसंवर्धन असे म्हणतात. तळे किंवा तलाव यांच्या काटेकोर व्याख्या करण्यात आलेल्या नाहीत. कोणत्याही पाण्याच्या लहान साठ्यास तळे म्हणता येईल व त्याची कमाल मऱ्यांदा ५ हेक्टरापर्यंत अपेक्षित असेल. यापेक्षा मोठ्या जलाशयास तलाव व त्याहीपेक्षा मोठ्या जलाशयास सरोवर म्हटले जाते. पुष्कळसे जलाशय पाण्याच्या हंगामी साठ्याचे तर काही बारमाही पाणी असणारे असतात.

गोड्या पाण्यातील : गोड्या पाण्याच्या तळ्यामधील मत्स्यसंवर्धन हा मासळीचे उत्पादन वाढविणारा आणि मच्छिमारांना चांगला रोज- गार मिळवून देणारा एक व्यवसाय आहे. तळ्यातील पाण्याचा साठा आणि त्याची नैसर्गिक व योजनापूर्वक वाढविलेली उत्पादकता यांचा पुरेपूर उपयोग करून दर हेक्टरी जास्तीत जास्त मासळीचे उत्पादन वाढविण्याची तंत्रे विकसित झालेली आहेत. बारमाही पाणी असणारे ०.२ ते २ हेक्टर विस्ताराचे तळे मत्स्यसंवर्धनासाठी जास्त उपयोगी ठरते. जलद वाढ, पाण्यातील सर्व थरांतील नैसर्गिक व कृत्रिम अन्नाचा वापर करण्याची क्षमता, शक्यतो प्लवक किंवा जलवनस्पती-वर उपजीविका, तळ्यातच प्रजनन होणारे किंवा इतरत्र प्रजनन झाल्यास पिले मिळण्याची सुलभता या निकषांवर मत्स्यसंवर्धनासाठी माशांच्या जातींची निवड केली जाते.

भारतात सर्वत्र कटला (फटला कटला), रोहू (लेबिओ रोहिटा) व मृगळ (सिर्‍हिनस मृगाला) या जाती मत्स्यसंवर्धनात वापरात आहेत. सामान्य कार्प (सायप्रिनस कार्पिओ) हा जगात सर्वत्र वापरला जातो. ग्रास कार्प, सिल्व्हर कार्प व सामान्य कार्प ह्या जाती अलीकडे भारतातही वापरण्यात येत आहेत.

भारतीय मेजर कार्प (कटला, रोहू, मृगळ) माशांचे प्रजोत्पादन उत्तर भारतातील नद्यांत होते. पावसाळ्याच्या प्रारंभी त्यांची बीजे (पिले) नदीतून गोळा करून विक्रीसाठी आणली जातात. मत्स्यबीजांच्या विक्रीचे कलकत्ता हे सर्वात मोठे केंद्र आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीत ऑक्सिजनाने पुरेसे संपृक्त (पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन विरघळलेले) असे पाणी भरून त्यात ही पिले सोडली जातात व या पिशव्या रेल्वेने अगर विमानाने कलकत्ता येथे अगर इतर इष्ट स्थळी रवाना केल्या जातात.

मोठ्या तळ्यात सोडण्यापूर्वी हे बीज लहान आकारमानाच्या संगोपन तळ्यात जोपासण्यात येते. चुना, नायट्रोजन, फॉस्फरसयुक्त खते, शेण वगैरेंच्या साहाय्याने बीजाला योग्य असे अन्न निर्माण करणे, कीटकांचा व इतर शत्रूचा नायनाट करणे ही काळजी घेऊन ही पिले १२ ते १५ मिमी. पासून ७५ ते १०० मिमी. लांबीची होईपर्यंत वाढविली जातात व नंतर ती तळ्यात सोडण्यात येतात.

सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटने शोधून काढलेल्या नवीन पद्धतीनुसार तळ्यामध्ये वर उल्लेखिलेली रसायने व खते विशिष्ट प्रमाणात टाकून मासळीला योग्य असे नैसर्गिक अन्न निर्माण केले जाते. मत्स्यसंवर्धनासाठी राखून ठेवलेल्या तळ्यात पाण्याच्या वरच्या स्तरात राहणारे व प्लवक भक्षण करणारे कटला, सिल्व्हर कार्प यांसारखे मासे ३०% सोडले जातात. सर्व स्तरांत राहणारे व वनस्पतिभक्षक रोहू, ग्रास कार्प यांसारखे मासे ४०% तर तळाशी राहणारे मृगळ, सामान्य कार्प यांसारखे मासे ३०% असे प्रमाण असते. या प्रमाणात दर हेक्टरी या माशांची ५,००० पिले पाण्यात सोडली जातात. पेंड, भाताचा कोंडा यांसारखे खाद्य माशांना दररोज त्यांच्या वजनाच्या २% प्रमाणात दिले जाते. शेणखत व उर्वरकांची (वरखतांची) मात्राही दर महिन्यास नियमित दिली जाते. सु. आठ महिन्यांत प्रत्येक माशाचे वजन पाऊण ते एक किग्रॅ. इतके होते. परंपरागत पद्धतीने (खत व उर्वरकांचा वापर न करता) मासळीचे उत्पादन दर हेक्टरी सरासरी ६०० किग्रॅ. येते पण वरील तंत्राच्या वापराने हे उत्पादन ३,००० ते ८,००० किग्रॅ.पर्यंत वाढू शकते. पुण्याजवळच्या हडपसर येथील मत्स्यमळ्यात हे उत्पादन १०,००० किग्रॅ.पर्यंतही गेले होते. मात्र यात ग्रास कार्प व सिल्व्हर कार्प यांचा भरणा जास्त होता. खात्रीलायक व शुद्ध बीजाच्या पुरवठ्यासाठी मेजर कार्प माशांचे प्रेरित प्रजनन करण्याचे (कृत्रिम रीत्या उत्तेजित करून प्रजनन करण्याचे) तंत्रही भारतात विकसित झाले आहे. या तंत्रात ⇨ पोष ग्रंथीचा स्राव प्रजननास प्रेरक म्हणून वापरतात. विशिष्ट पद्धतीने बांधलेल्या तळ्यात पावसाळ्यात नवीन पावसाच्या पाण्याच्या लोंढ्याचा प्रेरक म्हणून उपयोग करून बांध पद्धतीने प्रजनन हा प्रकार आयोजित करण्यात येतो. सामान्य कार्प माशाचे प्रजनन नैसर्गिक रीत्या होते; पण त्यांची अंडी चिकटण्यासाठी पाण्यात जलवनस्पतींचा साठा असावा लागतो.

चीनमध्ये मत्स्यसंवर्धन प्राचीन काळापासून चालू आहे. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात चीन अग्रेसर आहे. येथे सिल्व्हर कार्प, ग्रास कार्प, सामान्य व बिगहेड या माशांचे संवर्धन होते. नद्यांतून बीज गोळा करून त्यांची जातवार विभागणी करण्यात येते. संगोपनापूर्वी हानिकारक प्राण्यांचा नाश करण्यात येतो. शेणखताबरोबरच उग्र वासाच्या वनस्पतीही खत म्हणून वापरल्या जातात. तळ्यातील मत्स्यसंवर्धनासाठी निवडलेल्या माशांच्या जाती एकमेकींस पूरक असाव्या लागतात. नैसर्गिक अन्नाबरोबरच रेशमाचे किडे, सोयाबीनची पेंड व इतर पूरक अन्नही वापरले जाते. जलवनस्पतींवर उपजीविका करणारा व तळ्यातून त्यांचे निर्मूलन करणारा ग्रास कार्प हा चिनी मत्स्यसंवर्धनातील एक वैशिष्ट्यपूर्ण मासा होय. चीनमध्ये कित्येक तळ्यांमध्ये उत्पादनाचे प्रमाण दर हेक्टरी ७,५०० किग्रॅ.पेक्षा जास्त आहे. प्रेरित प्रजननाद्वारे व नव्या विकसित पद्धतींमुळे कोणत्याही जातीच्या माशाचे शुद्ध बीज मिळविणे शक्य झाले आहे.

भारतीय व चिनी मेजर कार्प यांच्या व्यतिरिक्त मत्स्यसंवर्धंनासाठी टिलापिया (टिलापिया मोझॅम्बिका), मरळ (चाना जाती), मागूर (क्लॅरिअस बॅट्रॅकस) वगैरे मासेही वापरण्यात येतात. मरळ आणि मागूर हे मासे मांसाहारी आहेत. ते पाण्याव्यतिरिक्त हवेतील ऑक्सिजनचाही वापर श्वसनाकरिता करतात.

टिलापिया हा वनस्पतिभक्षक मासा आहे. तो मूळचा आफ्रिकेतील असून त्याचे प्रजनन वर्षभर चालू असते. मादी तोंडात अंडी ठेवून पिले वाढविते. यामुळे तळ्यात या माशांची संख्या खूप वाढते. तळ्यात कोणतेही खत किंवा खाद्य न टाकले, तरी या माशांचे उत्पादन दर हेक्टरी ३,००० किग्रॅ.पर्यंत येते; पण माशांची संख्या जास्त झाल्यामुळे परिणामी मात्र त्यांचे आकारमान लहान रहाते. यामुळे कित्येक मत्स्यसंवर्धनाचा व्यवसाय करणारे हा मासा पसंत करीत नाहीत. मेजर कार्प माशाबरोबर टिलापियाचे संवर्धन केल्यास अन्नासाठी स्पर्धा सुरू होते व याचा परिणाम मेजर कार्पच्या वाढीवर होतो.

मरळ ही जात मत्स्याहारी आहे. या माशाबरोबर टिलापियाचे संवर्धन केल्यास मरळला खाद्य म्हणून टिलापियाचा उपयोग होतो. मागूर मासा प्रौढावस्थेत मांसाहारी असला, तरी त्याचे मुख्य खाद्य म्हणजे कीटकांच्या अळ्या, झिंगे व तळांतील इतर जीवजंतू हे होय. यांची पिले मात्र प्लवकांवर उपजीविका करतात. मांसाहारी माशांची वाढ कमी असली, तरी ते जास्त चविष्ट असतात आणि म्हणून त्यांना बाजारात जास्त भाव मिळतो. त्यांना योग्य प्रकारचे व भरपूर अन्न देता आल्यास त्यांचे उत्पादन दर हेक्टरी ५०,००० किग्रॅ.पर्यंतही गेले आहे व यामुळे हे संवर्धन किफायतशीर होऊ शकते.

जोशी, र. ह.

मचूळ पाण्यातील : हे पाणी नद्यांच्या मुखाजवळ असते आणि त्यात भरती-ओहोटीनुसार फरक पडतो. या पाण्यात लवणांचे प्रमाण स्थिर नसते. अशा परिस्थितीत जिवंत राहण्याची क्षमता असलेले मासेच येथे आढळतात. मचूळ पाण्यातील मत्स्यसंवर्धन करण्यासाठी नदीमुखाजवळ असलेल्या खाड्यांत भरतीच्या वेळी आलेले पाणी अडवून ते या खाड्यांजवळ बंधारे घालून तयार केलेल्या उथळ तळ्यात सोडले जाते. या तळ्यात ठिकठिकाणी झडपा असतात व त्यांच्या साहाय्याने पाण्यावर नियंत्रण ठेवले जाते. अशा तळ्यांच्या समूहास मत्स्यशेत म्हणतात. या निमगोड्या पाण्याच्या तळ्यात मासे व मत्स्यव्यवसायातील इतर प्राणी यांचे संवर्धन केले जाते.

मत्स्यशेत तयार करताना मत्स्यबीज भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी लागते. तसेच समुद्रकाठच्या मातीचाही अभ्यास करावा लागतो. मातीचा चिकटपणा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, धूप वगैरे गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. या तळ्यात नैसर्गिक रीत्या माशांकरिता किती अन्न उपलब्ध होईल हे पहावे लागते आणि त्यानुसार पाण्यात किती कृत्रिम अन्न टाकावे लागेल, हे ठरवावे लागते, भरती-ओहोटीच्या प्रमाणावर तळ्याच्या बांधाची उंची, समुद्रकिनाऱ्यांपासूनची उंची व लांबी हे ठरवावे लागते. पाण्याची लवणता आणि तापमान ज्या मत्स्यजातीचे संवर्धन करावयाचे तिला पोषक आहे की नाही, हे पहावे लागते. संवर्धन करावयाच्या मत्स्याच्या किती म्हणजे एक किंवा अधिक जाती निवडावयाच्या व मत्स्यबीजाचे प्रमाण किती ठेवावयाचे हेही ठरवावे लागते. मत्स्यशेताची आखणी करताना समुद्रकाठच्या नैसर्गिक रचनेचाही अभ्यास करावा लागतो. मत्स्यशेत बांधल्यानंतर त्यात माशाकरिता नैसर्गिक अन्ननिर्मिती होऊ देणे, पुरेसे मत्स्यबीज गोळा करून आत सोडणे, तलावातील उपद्रवी मासे काढणे, जीवोपजीवी (दुसऱ्यां सजीवांच्या जीवावर उपजीविका करणारे) जीवजंतू नाहीसे करणे, माशांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे, तळ्यातील अनावश्यक गवत व झाडेझुडपे काढून टाकणे, बंधारे, झडपा, नाले, चर यांची दुरूस्ती करणे आणि मासेमारी, वाहतूक व विक्री यांची व्यवस्था करणे अशी अनेक कामे बघावी लागतात.

मचूळ पाण्यातील माशांची व्यापारी द्दृष्ट्या सर्वांत मोठी उलाढाल इंडोनेशिया, तैवान व फिलिपीन्समध्ये चालते. या खालोखाल ती इटली, फ्रान्स व इस्राएल या देशांत चालते. इतरत्र या क्षेत्रात विशेष सुधारणा आढळून येत नाही. वर उल्लेखिलेल्या आग्नेय आशियातील देशांत प्रत्येक मत्स्यशेत हे एक स्वतंत्र मत्स्यव्यवसाय केंद्र असते. प्रत्येक केंद्रात मत्स्यबीज संगोपनासाठी, मत्स्यसंवर्धनासाठी व मत्स्य-संपादनासाठी वेगवेगळे तलाव असतात. इंडोनेशियातील अगदी साधे मत्स्यशेत म्हणजे ०.४ ते २.४ हेक्टरचा व ०.२ ते १.०३ मी. खोलीचा एक नाला आणि त्यात झडपद्वार व प्रत्येकास जाळी असलेला एकएक तलाव अशा स्वरूपाचे असते. अशा मत्स्यशेतास (तलावास) ‘सांबक’ म्हणतात. यापेक्षा पुष्कळच सुधारित प्रकारच्या मत्स्यशेतास ‘पोराँग’ म्हणतात. यामध्ये पाणी प्रथम एका मुख्य तलावात नाल्याद्वारे आणले जाते व येथून ते याच तलावाभोवती बसविलेल्या दहा-बारा इतर तलावांतून प्रत्येकाच्या स्वतंत्र चराद्वारे वाहवले जाते. नाल्याला व प्रत्येक चराला झडपद्वार व जाळी असते. प्रत्येक तलाव स्वतंत्रपणे मुख्य तलावात रिकामा करता येतो. पोराँग पद्धतीमध्ये मत्स्यबीज संगोपनासाठी व मत्स्यसाठवणुकीसाठी एकएक तलाव राखून ठेवलेला असतो. उरलेले सर्व तलाव मत्स्यसंवर्धनासाठी वापरतात. तिसरा प्रकार ‘तामान’ हा पोराँगसारखाच पण समुद्रसपाटीपासून उंचावर असलेली मत्स्यशेते होत.

तैवान येथील मत्स्यशेतांना वून म्हणतात. यात मुख्य तलाव नसतो. नाल्यातून पाणी सरळ तळ्यातच जाते. येथे संगोपन-संवर्धन तलावां-बरोबर, समुद्राच्या अगदी काठाजवळ एक हिवाळी तलाव बांधतात व तो झापा वगैरेंनी झाकून ठेवतात. हिवाळ्यात तापमान २ ते ४ से. खाली गेले की, मत्स्यबीजे जगविण्यासाठी ती या हिवाळी तलावात सोडली जातात.

फिलिपीन्समधील मत्स्यशेतात इतर प्रकारच्या तलावांबरोबर एक मध्यस्थ तलाव असतो. मत्स्यबीजे प्रथम यात सोडून नंतर ती संगोपन तलावात नेली जातात. पाणी नाल्याद्वारे वा सरळ प्रथम मुख्य तलावात, तेथून मत्स्यबीज तलावात व शेवटी मत्स्यसंवर्धन तलावात नेले जाते.

या तिन्ही देशांत नैसर्गिक म्हणजे समुद्रकिनाऱ्यांवरील मत्स्यबीज गोळा करताना केळीच्या किंवा नारळाच्या पानांचा विणून केलेला पडदा पाण्यात फिरवून मत्स्यबीजे एका कोपऱ्यांत आणून नंतर ती छोट्या जाळ्यांनी उचलणे किंवा असंख्य निमुळत्या टोकांची जाळी बांबूच्या कामट्यांनी वाहत्या पाण्यात उभी करून त्यात मत्स्यबीज अडकूदेणे या पद्धतींचा अवलंब केला जातो. मत्स्यबीजाची वाहतूक मातीच्या गाडग्यांतून करण्यात येते. मत्स्यबीजाला तलावातील पाण्याचा सराव होण्यासाठी पकडल्यानंतर थोडे दिवस ते मत्स्यबीजसंगोपन तलावात ठेवले जाते. परजीवी जीवजंतू मारण्यासाठी वर्षातून एकदा संपूर्ण तलाव रिकामा करून उन्हात वाळवितात. त्यानंतर त्यात थोडेथोडे पाणी सोडून शैवले व प्लवक वाढू देतात. जरूर पडल्यास जैव (सेंद्रिय) खतेही टाकतात. झडपांबरोबरच्या जाळ्या आतील मासे बाहेर जाऊ नयेत व बाहेरील नको असलेले मासे आत येऊ नयेत यांसाठी असतात. मातीची धूप थांबविण्यासाठी काही जागी झाडे लावतात. मत्स्यबीज गोळा करण्यापासून ते मत्स्यविक्री होईपर्यंत निरनिराळ्या पायऱ्यांवर दलालांमार्फत व्यवहार होतो व या सर्वातून एक प्रचंड धंदा उभा राहतो.

या तिन्ही देशांत प्रामुख्याने मिल्कफिश (चॅनॉस चॅनॉस) या माशाचे संवर्धन होते. यानंतर संवर्धनात बोय (मुलेट) या माशाचा क्रम लागतो. इंडोनेशिया व फिलिपीन्स या देशांत प्रत्येकी १,६५,००० हेक्टर व तैवानमध्ये २८,००० हेक्टर क्षेत्र मत्स्यसंवर्धनाखाली आहे. मिल्कफिशचे उत्पादन इंडोनेशिया व फिलिपीन्समध्ये प्रत्येकी ५०,००० टन व तैवानमध्ये ७०,००० टन होते. बोयींचे संवर्धन प्रामुख्याने इटली व इझ्राएल आणि त्या खालोखाल आग्नेय आशियात चालते. या संवर्धनात टिलापिया माशांचाही हळूहळू क्रम लागत आहे. यांचे संवर्धन प्रामुख्याने आफ्रिकेत करण्यात येते. आग्नेय आशियातही यांच्या संवर्धनाकडे लक्ष दिले जात आहे. याशिवाय संवर्धनास उप-युक्त अशा माशांच्या अनेक जाती आहेत. संयुक्त संवर्धनाचे प्रयोग चालू आहेत. या प्रयोगांत वापरल्या जाणाऱ्यां माशांच्या काही उल्लेखनीय जाती पुढीलप्रमाणे आहेत : काळुंदर (एट्रोप्लस सुरटेनसीस), जिताडा (लॅटेस कॅलकॅरिफेर), नवेरी (थेरॅपॉन प्लंबस), चिराई (मेगॅलॉप्स सायप्रिनॉइडीस), टोकी (इलॉप्स), वाम (मोनोप्टेरस आल्वा), बॅराकुडा (स्फिरीना जेलो), वडा (स्कॅटोफॅगस आर्गस ), अनेक प्रकारचे शिंगाळे, अहिर (अँग्विला अँग्विला), खरबी (गोबीपस), ढोमा (अंव्रिना सीरोसा) व अनेक प्रकारची कोळंबी.

भारतात सु. दोन लक्ष हेक्टर खार जमीन आहे. यातील फक्त ०.६ टक्के उपयोगात आणली जाते. भारतात या संवर्धनाचे दोन प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार पश्चिम बंगालमधील सुंदरबन भागात आढळतो. याला ‘भासाबंधा’ किंवा ‘भेरी’ असे म्हणतात. या प्रकारात वर वर्णन केलेली पाणी अडवून मासे वाढविण्याची पद्धत अवलंबिली जाते. दुसरा प्रकार केरळात आढळतो. यास ‘पोक्काली’ असे म्हणतात. या दोन्ही प्रकारांत संवर्धनाचे काम अगदी मागासलेल्या पद्धतीने चालते.

भेरी या प्रकारात पावसाळ्याच्या सुरूवातीला विशेषतः भरतीच्या वेळी, पाण्याबरोबर माशांची पिले नाला व त्यात असलेल्या झडपेतून तलावात घेतली जातात व त्यांना बंदिस्त केले जाते. वर्षानंतर लागेल तशी त्यांची मासेमारी केली जाते. मासेमारी करण्याच्या वेळी तलावातील पाणी बाहेर सोडून देतात. या संगोपनाकडे विशेष लक्ष न दिले गेल्यामुळे फारच थोडे म्हणजे हेक्टरी अवघे १५० किग्रॅ. उत्पन्न मिळते.

पोक्काली ही केरळातील पारंपरिक पद्धती आहे. सप्टेंबर महिन्यात भातशेती आटोपल्यावर त्याच शेतात मुद्दाम केलेल्या खाचांद्वारे भरतीचे पाणी घेतले जाते. या पाण्याबरोबर निरनिराळ्या जातींच्या माशांच्या व कोळंबीची पिले येतात. खाचांवर झडपा व जाळ्या बसवितात. आत आलेली पिले पाचसहा महिने वाढली म्हणजे त्यांची मासेमारी करतात. सुमारे ४,४०० हेक्टर जमिनीवर हे उत्पादन घेतले जाते व ते दर हेक्टरी सु. ७८६ किग्रॅ. पर्यंत असते.

आता या पद्धतीत सुधारणा होत आहे. भारत सरकारच्या सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, बरॅकपूर (प. बंगाल) व सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, कोचीन या दोन्ही संस्थांनी संशोधन करून नवीन तंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे हे उत्पादन दर हेक्टरी ३,०००-४,००० किग्रॅ. पर्यंत वाढले आहे. यात सु. २,००० किग्रॅ. कोळंबी असल्यामुळे किंमतही भरपूर मिळते, मत्स्यसंवर्धनास उत्तेजन देण्यासाठी भारत सरकारने काही अनुदानेही दिली आहेत. त्यामुळे या व्यवसायास बरीच चालना मिळाली आहे.

कोचीनजवळ नारक्काल येथे एक चांगला मत्स्यमळा आहे. याशिवाय अय्यरमयेंगु, मलीपूरम, करपूरम, एरन होली इ. ठिकाणी योजनाबद्ध नवीन मत्स्यमळे सुरू करण्यात आले आहेत. येथे नवे तंत्र वापरून व भरपूर खाद्य देऊन हेक्टरी ३,०००-६,००० किग्रॅ.पर्यंत उत्पादन काढले जाते. तमिळनाडूमध्ये तुतिकोरीन व अड्यार, आंध्र प्रदेशात काकिनाडा व पुलिकत सरोवर, ओरिसातील चिल्का सरोवर व बंगालमध्ये काकद्वीप येथे नवीन मत्स्यमळे सुरू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात असे मत्स्यमळे फार कमी, तरीही मुंबईजवळच्या वसई, भाईंदर, भांडूप, वडाळा, उरण या मिठागरांच्या प्रदेशात पावसाळ्यातील गोडे पाणी साठवून त्यात भरतीच्या पाण्याबरोबर येणाऱ्यां मासळीची पिले चार-पाच महिने वाढवून आणि नंतर त्याची विक्री करण्याची पद्धत रूढ आहे.

या मचूल पाण्याच्या मस्त्यसंवर्धनात उपयोगी असणाऱ्यां भारतातील माशांच्या प्रमुख जाती बोय, मुडदुशी (रेणवी), चॅनॉस, खरबी, तसेच निरनिराळ्या जातीची कोळंबी, काळुंदर, वडा, जिताडा या होत.

रानडे, अनिल मा.

‘मत्स्यसंवर्धन’ या संज्ञेत माशांखेरीज कोळंबी, काकई, बेडूक, स्पंज, सागरी शैवले, ऑयस्टर, मोत्यांची कालवे वगैरे जलीय सजीवांच्या संवर्धनाचाही समावेश होतो. यांपैकी काही महत्त्वाच्या सजीवांच्या संवर्धनासंबंधी खाली माहिती दिलेली असून ऑयस्टर व मोत्यांची कालवे यांच्या संवर्धनाविषयीची माहिती अनुक्रमे ‘ऑयस्टर’ आणि ‘मोती’ या नोंदींत दिली आहे.

कोळंबी : जगामध्ये कोळंबीचे वार्षिक उत्पादन सरासरी सहा लाख टन आहे. कोळंबीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे देश म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने (१,०९,००० टन), भारत (८०,००० टन), जपान (७०,००० टन) आणि थायलंड (४०,००० टन) हे होत. कोळंबीच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारतातून निऱ्यांत होणाऱ्यां मासळीत जवळजवळ ८०% कोळंबी असतात. यापासून भारताला सु. १०० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते. सर्व देशांत कोळंबीच्या मासेमारीवर जास्त भर दिला जातो कारण जगात सर्वत्र कोळंबीस मोठ्या प्रमाणावर मागणी आहे व तिला किंमतही चांगली मिळते. जागतिक मत्स्योत्पादनात कोळंबीचे प्रमाण १% असते, तर मत्स्योत्पादनाच्या एकूण उत्पन्नात ते ५% आहे. कोळंबीच्या उत्पादनात आणखी वाढ करता येणे शक्य आहे. कोळंबीला काही ठिकाणी ‘चिंगाटी’ व ‘झिंगे’ या नावांनीही ओळखण्यात येते [→चिंगाटी].

कोळंबीच्या अनेक जातीपैकी जलद वाढणाऱ्यां व आकारमानाने मोठ्या असणाऱ्यां जाती फार थोड्या आहेत. मोठ्या आकारमानाच्या कोळंबीस जास्त किंमत येते. पेनीयस ही मोठ्या जातीची असल्यामुळे हिला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. हिची वाढही फार जलद होते. ह्या कोळंबीचे नैसर्गिक उत्पादन फार कमी आहे पण ह्या कोळंबीचे आकारमान व वाढ लक्षात घेऊन हिचे नैसर्गिक उत्पादन कसे वाढविता येईल याकडे सर्व देशांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. भारत आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये गेल्या चार-पाच शतकांपासून अगदी साध्या पद्धतीने कोळंबीचे संवर्धन केले जात आहे. भरतीच्या पाण्याबरोबर आलेली कोळंबीची पिले पाण्यासह शेतात सोडून पाच- सहा महिने त्यांची वाढ करून ती पकडली जातात. ही पद्धत शास्त्रशुद्ध नसल्याने तिच्यापासून फार उत्पादनही मिळत नाही.

शास्त्रशुद्ध तंत्र वापरून कोळंबीच्या संवर्धनाचा पहिला यशस्वी प्रयोग १९३४ साली जपानमध्ये झाला. एम्. फुजिनागा हे कोळंबीच्या संवर्धनाचे आद्य जनक आहेत. त्यांनी पेनीयस जॅपोनिकस या जातीच्या कोळंबीची कृत्रिम पैदास करण्यात यश मिळविले. ही पद्धत पूर्णपणे विकसित करण्यासाठी त्यांनी पुढे २५ वर्षे सतत संशोधन केले. १९५९ मध्ये त्यांनी पहिला ‘कोळंबी संवर्धन मळा’ तयार केला. पुढे १५ वर्षात जपानमध्ये अशा तर्‍हेचे वीस मळे सुरू झाले व त्यांपासून ४,००० टन वार्षिक उत्पादन होऊ लागले.

आ. ३७. कोळंबीचे संवर्धन : (१) नॉप्लियस, (२) प्रोटोझोइया, (३) मायसिस, (४) डिंभोत्तर अवस्था (छोटे पिलू).

कोळंबीच्या प्रजननाचे ऑक्टोबर ते डिसेंबर व मार्च ते जून असे दोन हंगाम असतात. ह्या काळात मादी समुद्रात अंडी घालते. प्रत्येक मादी सरासरी ३ ते ४ लाख अंडी घालत असावी. मैथुन होत असतानाच मादी अंडी सोडते व नर त्यांवर शुक्राणू टाकतो. निषेचित (फलित) झालेल्या अंड्यांतून १३ ते १४ तासांनंतर डिंभ बाहेर पडतात. हे दिसण्यात अगदी वेगळे असतात. यांचे निरनिराळ्या अवस्थांतून रूपांतरण झाल्यावर ते छोट्या कोळंबीसारखे दिसू लागतात. यातील पहिल्या पाच अवस्थांतील डिंभास ‘नॉप्लियस’ असे म्हणतात. या अवस्था दीड ते दोन दिवसांत पूर्ण होतात. यापुढील तीन अवस्थांना ‘प्रोटोझोइया’ असे म्हणतात व त्या पूर्ण होण्यास ५ ते ६ दिवसांचा अवधी लागतो. यानंतर तीन अवस्थांतून जाऊन ‘मायसिस’ ही अवस्था प्राप्त होते. यासाठी परत पाच दिवसांचा कालावधी लागतो (आ. ३७). अशा रीतीने १२ ते १५ दिवसांत या अकरा अवस्था व तीन प्रकारच्या डिंभावस्थांतून गेल्यावर ही पिले कोळंबीसारखी दिसू लागतात व समुद्राच्या पृष्ठभागावर वावरू लागतात. डिंभावस्थेत या निरनिराळ्या अवस्थांतून जात असताना मात्र ती समुद्राच्या पृष्ठभागाखालच्या पाण्यात फिरत असतात.

कोळंबीची १०-१५ मिमी. इतकी लहान पिले समुद्राच्या काठावर येतात व तेथून ती खाड्या व खाजण भागातील मचूळ पाण्यात जातात. या ठिकाणी त्यांचे ३ ते ४ महिने वास्तव्य होते. ह्या काळात त्यांची वाढ ६० ते ७० मिमी. इतकी होते. यानंतर त्या खोल समुद्राकडे परततात व तेथे १० ते १२ महिन्याच्या अवधीत त्यांची वाढ १४० ते १६० मिमी. इतकी होते. एवढी वाढ झाली की, त्या मच्छीमारीस योग्य झाल्या असे समजण्यात येते. कोळंबीचे आयुष्य अंदाजे सरासरी दोन वर्षे इतके असते.

कोळंबीच्या शास्त्रशुद्ध संवर्धनाच्या जपानी पद्धतीमध्ये १० मी. लांब, १० मी. रूंद व २ मी. खोलीच्या सिमेंटच्या टाक्यांमध्ये अंडी घालणाऱ्यां ३० ते १०० माद्या सोडल्या जातात. या टाक्यांतील तापमान २५ ते ३० से. व लवणता ३२-३५% इतकी ठेवली जाते. या टाक्यांतील पाणी संथ गतीने वाहते ठेवले जाते व त्यात हवेचे प्रवाहही सोडले जातात. माद्या बहुधा टाक्यांत सोडल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्यां दिवशी अंडी घालतात. अंडी घालून झाल्यावर माद्या टाक्यांतून बाहेर पडल्यावर पुढील अकरा अवस्थांतरातून जाण्यास त्यांना १३ ते १५ दिवस लागतात. पहिल्या पाच नॉप्लियस या अवस्थेत त्यांना खाण्याची गरज लागत नाही पण यानंतर मात्र खाणे देणे आवश्यक असते. प्रथम त्यांना एककोशिक वनस्पतींचे खाद्य देतात. हे अन्न निराळ्या टाक्यांत तयार करण्यात येते. पाण्यात तरंगणारे हे अन्न, या टाक्यांतून पाणी पंपाच्या साह्याने कोळंबीचे डिंभ असलेल्या टाक्यांत सोडून डिंभापर्यंत पोहोचविले जाते. वनस्पतियुक्त खाद्यात ‘आयसोक्रायसीस’, ‘मोनोक्रायसीस’ व ‘स्केलेटोनीमा’ ही खाद्ये जास्त उपयुक्त ठरली आहेत. मायनीस या अवस्थेत डिंभ आल्यावर त्यांना आर्टेमिया नावाच्या प्राण्यांची पिले खाद्य म्हणून द्यावी लागतात.

छोटी पिले तयार झाल्यावर त्यांना गांडुळे, मासे वगैरेंचे बारीक केलेले मांस खाण्यास दिले जाते. या अवस्थेत त्यांना जर पुरेसे खाद्य मिळाले नाही, तर ती एकमेकांस मारून खातात. सर्वसाधारणपणे दहा हजार पिलांना दररोज २० ग्रॅ. खाणे लागते. ही पिले एक महिन्याची होईपर्यंत हे खाद्य हळूहळू ८० ते १२० ग्रॅ. पर्यंत वाढवावे लागते. एका महिन्यात १५ ते २० मिमी. लांबीची व १० ग्रॅ. वजनाची पिले तयार होतात. यानंतर ती पुढील संवर्धनासाठी निराळी केली जातात. या स्थितीतील पिलास कोळंबीचे बीज म्हटले जाते व ते पुढील वाढीसाठी संवर्धन तळ्यात सोडले जाते.

संवर्धन तळी ०.०१ ते १० हेक्टरापर्यंतच्या निरनिराळ्या आकारमानांची असू शकतात. भरतीच्या वेळी मोठ्या नळातून समुद्राचे पाणी या तळ्यात घेतले जाते व ओहोटीच्या वेळी ते बाहेर टाकले जाते. अशा रीतीने या तळ्यात समुद्राचे ताजे पाणी सारखे खेळवले जाते. नळाला जाळी बसविली असल्यामुळे बाहेरचे प्राणी आत येऊ शकत नाहीत, तसेच आतील वाढणारी पिले बाहेर जाऊ शकत नाहीत. या तळ्यातील पाण्याबाहेरील ऑक्सिजनाचे प्रमाण एक दशलक्ष भागांत ३.५ भाग याच्या खाली जाता कामा नये. कोळंबीचे बीज म्हणून समजली जाणारी पिले १५ ते २० मिमी. लांबीची असतात. दर हेक्टरी दीड लाख या प्रमाणात अशी पिले तळ्यात सोडावी लागतात. काही ठिकाणी संवर्धन तळ्यात सोडण्यापूर्वी या पिलांची वाढ ३० ते ४० मिमी. पर्यंत होऊ देण्यात येते. या आकारमानाच्या पिलांची साठवणूक मात्र दर हेक्टरी १ लाख या प्रमाणात केली जाते. संवर्धन तळ्यात नैसर्गिक खाद्य अगदी कमी प्रमाणात असल्यामुळे पिलांना रोज बाहेरून खाद्य द्यावे लागते. वाटी, मुळे, तिसऱ्या (तिन्ही शिंपाधारी प्राणी) व मासे यांचे बारीक केलेले मांस रोज सायंकाळी तळ्यात टाकले जाते. खाद्याचे स्वतःच्या मांसात रूपांतर करण्याची कोळंबीची क्षमता अगदीच निकृष्ट आहे. १० ते १५ किग्रॅ. खाद्यापासून १ किग्रॅ. कोळंबीचे उत्पादन होते. कोळंबी १० महिन्यांत २० ते २५ ग्रॅ. वजनाची होते म्हणजे १ किग्रॅ. मध्ये ४० ते ५० नग भरतात. यावरून असे आढळते की, वर्षात दर हेक्टरी १,५०० ते २,००० किग्रॅ. कोळंबीचे उत्पादन होते. ही कोळंबी अगदी ताज्या स्थितीत असल्यामुळे तिला भावही चांगला येतो. जर २५ रूपये हा भाव गृहीत धरला, तर दर हेक्टरी जवळजवळ ५०,००० रूपयांची कोळंबी पैदा होते. यावरून कोळंबीचे संवर्धन किती फायदेशीर आहे, याची कल्पना येईल.

व्यापारी दृष्ट्या कोळंबीचे संवर्धन फक्त जपानमध्ये करण्यात येते. अमेरिका, यूरोप व इतर पुष्कळ प्रदेशांत हे संवर्धन अजून प्रायोगिक अवस्थेतच आहे. भारतामध्ये कोळंबीच्या शास्त्रशुद्ध संवर्धनाकडे १९७० पासून जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. भारतात कोळंबीच्या ६० हून अधिक जाती असल्या, तरी संवर्धनासाठी योग्य अशा चारच जाती आहेत. त्यांची नावे अनुक्रमे पेनीयस मोनोडॉन, पे. इंडिकस, पे. सेमिसल्केटस व पे. मर्ग्युइन्सीस अशी आहेत. गेल्या सहा-सात वर्षात या जातींच्या संवर्धनाची पद्धत विकसित करण्यात आली आहे. मेटापेनीयस डॉब्सनी ह्या कोळंबीच्या संवर्धनाची पद्धत १९७७ च्या सुमारास केरळात विकसित केली गेली. याखेरीज आंध्र प्रदेशातील काकिनाडा, तमिळनाडूमधील अड्यार, पश्चिम बंगालमधील काकद्वीप व महाराष्ट्रातील रत्नागिरी येथेही कोळंबी संवर्धनावर निरनिराळे प्रयोग चालू आहेत. केरळातील भात शेतीत कोळंबी संवर्धनाची पूर्वापार चालत आलेली पद्धत आता खंडित झाली आहे व याऐवजी नवीन शास्त्रशुद्ध पद्धत प्रचलित होत आहे.

मॅक्रोब्रॅकियम रोझेनबर्गी (बडे झिंगे) व मॅ. माल्कमसनी (सफेत झिंगे) या गोड्या पाण्यातील कोळंबीच्या दोन जाती आहेत. या दोन्ही जातींच्या कोळंबीचे आकारमान मोठे व चव चांगली असल्यामुळे त्यांना चांगली किंमत येते. हे झिंगे किनाऱ्यांवरील खाड्यांत प्रजननसाठी येतात व नंतर नदीभागात राहतात. सफेत झिंगे भारताच्या पूर्व किनाऱ्यांवर आढळतात. या दोन्ही जातींचे संवर्धन तळ्यात करता येते. या जातींचे बीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करण्याची पद्धती अजून विकसित झाली नाही, तसेच त्यांच्या वाढीला पोषक वातावरण व त्यांचे खाद्य यांवरही विशेष संशोधन झालेले नाही. यावर जास्त माहिती उपलब्ध झाल्यावर या कोळंबीचे संवर्धन आर्थिक दृष्ट्या फायद्याचे होईल, अशी अपेक्षा आहे.

रानडे, मा. र.

काकई : वाटी, मुळे, तिसऱ्यां, कालवे यांच्या जातीच्या दोन शिपांचे कवच असणारा हा एक प्राणी आहे. वाटी, मुळे व तिसऱ्यां हे प्राणी वाळूत राहतात व वाळूवरून अगदी हळू हालचाल करू शकतात. कालवांची एका बाजूची शिंप खडकास चिकटलेली असते. त्यामुळे कालवे एका जागेवरून दुसऱ्यां जागेवर जाऊ शकत नाहीत. काकई हे प्राणीही खडकाला चिकटलेले असतात पण हे चिकटणे त्यांच्या दोन शिंपांतून बाहेर डोकावणाऱ्या एका तंतूच्या पुंजक्यामुळे असते. या तंतूंना ‘बायसस’ असे म्हणतात. चिकटण्याच्या या प्रकारामुळे त्यांचे संवर्धन करणे सुलभ होते. बऱ्यांच देशांत काकईचे संवर्धन अलीकडेच सुरू झाले आहे. या संवर्धनाच्या तंत्रात खूपच सुधारणा झाल्यामुळे हा धंदा खूप उत्पादन देणारा व फायदेशीर ठरला आहे.

आ. ३८. काकईचे संवर्धन : (१) काकई, (२) बूशे पद्धत, (३) तराफा पद्धत.

काकईच्या पुष्कळ जाती उपलब्ध असल्या, तरी संवर्धनासाठी प्रामुख्याने मायटिलस एव्युलिस व मा. गॅलोप्रोव्हीन्सिअँलिस या जाती वापरल्या जातात. भारतात अलीकडेच मा. व्होरीडीस या जातीचे संवर्धन करण्यास सुरूवात झाली आहे पण हे संवर्धन अजून व्यावसायिक स्वरूपात सुरू झालेले नाही. काकई आठ-दहा महिन्यांची झाली की, ती जननक्षम होते व प्रजनन करण्यास सुरूवात करते. एप्रिल ते ऑगस्ट या काळात अंडी व त्याबरोबर शुक्राणू समुद्रात सोडले जातात. समुद्रातच अंड्यांचे निषेचन होते व भ्रूणविकासास सुरूवात होते. एक ते दोन मिमी. आकारमानाचे पिलू तयार होण्यास १० ते १५ दिवस लागतात. अशी लाखो पिले काही काळ समुद्रात स्वैरपणे फिरतात आणि मग दगडावर, खडकावर, मोठ्या वनस्पतीवर, लाकडाच्या ओंडक्यावर वा इतरत्र जेथे सोईस्कर असेल तेथे स्थिर होतात व वाढू लागतात. यांचे मुख्य अन्न म्हणजे वनस्पति-प्लवक होय. काकईचे संवर्धन सर्वप्रथम फ्रान्समध्ये सुरू झाले. पॅट्रिक वॉल्टन या आयरिश खलाशांनी १२३५ च्या सुमारास ही संवर्धन पद्धती शोधून काढली. फ्रान्सच्या एसनोड किनाऱ्यांजवळ मोठ्या खाजण जमिनी आहेत. ओहोटीच्या वेळी या जमिनी उघड्या पडतात. या जमिनींवर पक्षी मोठ्या प्रमाणात आढळत म्हणून त्यांना पकडण्यासाठी वॉल्टन यांनी दोन मोठ्या काठ्यांच्या साहाय्याने जाळे लावले. त्यांना असे आढळले की, जाळ्यासाठी लावलेल्या काठ्यांवर काकईची पिले फार मोठ्या प्रमाणावर चिकटत आहेत. इतकेच नव्हे, तर तळाशी असणाऱ्यां काकईपेक्षा या काठ्यांवरची काकई झपाट्याने वाढते. या निरीक्षणावर आधारित काकई संवर्धन पद्धती प्रचारात आली. वॉल्टन यांनी शोधून काढलेल्या या पद्धतीत पुढे पुष्कळ सुधारणा झाल्या. या पद्धतीस अजूनही ‘बूशे’ पद्धत म्हणतात.

बूशे पद्धतीत काकईचे बीज (लहान पिले) मे ते जुलैच्या दरम्यान गोळा केले जाते. नैसर्गिक रीत्या जेथे काकई आढळते अशा भरती ओहोटीच्या टापूत सु. ३ मी. लांबीचे व १३ मिमी. जाडीचे दोर टांगून ठेवले जातात. दोन-तीन आठवड्यांत ५ ते १० मिमी. लांबीचे काकईचे बीज या दोरांस फार मोठ्या प्रमाणात चिकटते. यानंतर हे दोर काढून घेऊन ४ मी. लांबीच्या व १५ ते २० सेंमी. जाडीच्या ओक वृक्षाच्या खांबांवर गुंडाळले जातात. हे खांब रेतीत अर्धेअधिक पुरलेले असतात. या खांबांवर खेकडे चढू नयेत म्हणून बुडाशी प्लॅस्टिकचे किंवा अन्य प्रकारचे वेष्टन केलेले असते. अशा तर्‍हेने खांबावर चिकटलेली काकई वाढू लागते. हे खांब शेकड्यांनी ओळीत रोवलेले असतात (आ. ३८).

यूरोप-अमेरिकेच्या थंड प्रदेशात अती थंडीच्या मोसमात काकईची अजिबात वाढ होत नाही. सबंध वर्षात ही वाढ फक्त ५ सेंमी. इतकी होते. या आकारमानाची काकई बाजारात नेण्यास योग्य समजली जाते. मायटिलीकोला इंटेस्टिनॅलिस हे जंतू काही काकईमध्ये आढळतात. काकईच्या शरीरात यांची संख्या वीसहून जास्त असली, तर काकईचा मृत्यू होतो. काकईमध्ये इतर प्रकारचे किडे असल्यास त्यांची वाढ खुंटते.

काकईचे संवर्धन हा एक घरगुती धंदा आहे. एक कुटुंब सरासरी १०,००० ते २५,००० खांब रोवते. एका खांबापासून वर्षाला सरासरी १० किग्रॅ. काकई (५ किग्रॅ. मांस) मिळते. यामुळे दरवर्षी दर हेक्टरी ४,५०० किग्रॅ. (२,२५० किग्रॅ. मांस) इतके उत्पादन घेता येते. फ्रान्समध्ये दरवर्षी ३०,००० टन काकईचे उत्पादन होते.

स्पेनमध्ये काकई संवर्धनाची पद्धती निराळी आहे. हे संवर्धन प्रामुख्याने गॅलिशियन या भागात आढळते. या संवर्धनाला १९४६ साली सुरूवात झाली. या पद्धतीत जपानमध्ये कालवासाठी प्रचारात असलेली तराफा पद्धत अवलंबिली जाते. २० मी. लांब व २० मी. रूंद तराफ्यामध्ये ५० ते १०० मिमी. रूंदीच्या लाकडी पट्ट्या अर्ध्या मीटर अंतरावर मारल्या जातात. अशा एका तराफ्यावर सु. ५०० दोर टांगलेले असतात. काही तराफे मोठे म्हणजे सु. ७०० चौ. मी. इतके असतात. व त्यांवरील दोरांची संख्याही १,००० पर्यंत असते. हे तराफे २० टन कॉंक्रीटच्या नांगरावर ठेवले जातात. फ्रान्सप्रमाणे स्पेनमध्येही हा एक कौटुंबिक धंदा म्हणून समजला जातो. एका कुटुंबाच्या मालकीचे दोन किंवा तीन तराफे असतात. काही कुटुंबे २५ पर्यंत तराफे बाळगतात. एका तराफ्यापासून १२० टन काकईचे (६० टन मांस) उत्पन्न होते. एका हेक्टरमध्ये असे दहा तराफे लावता येतात म्हणजे दर हेक्टरी ६०० टन काकईचे (मांस) उत्पादन घेता येते. तराफा पद्धतीमुळे काकईचे फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येते. स्पेनमध्ये सुरूवातीच्या वीस वर्षात ३,००० हून अधिक तराफे बांधले गेले. सध्याचे उत्पन्न प्रतिवर्षी १,००,००० टन इतके आहे व हे सर्व काकई संवर्धनातूनच काढले जाते.

फिलिपीन्स, तैवान, कंबोडिया व थायलंड या प्रदेशांत १९६० सालापासून काकई संवर्धनास सुरूवात झाली. फिलिपीन्समध्ये २ मी. लांब व १ मी. रूंदीच्या तबकामध्ये (ट्रेमध्ये) कालवाचे शिंपले ठेवून ते टांगले जातात व यावर काकईचे बीज पकडले जाते. मग या कालवाच्या शिंपल्यांची १ मी. लांबीची माळ तारेमध्ये गुंफून ती बांबूंच्या तराफ्यावर टांगली जाते. १० मी. लांब व १ मी. रूंदीच्या तराफ्यावर अशा १,००० माळा लावल्या जातात. येथे काकईची वाढ झपाट्याने होते आणि आठ ते दहा महिन्यांत ८ सेंमी. लांबीची, विक्रीसाठी योग्य अशी काकई तयार होते. फिलिपीन्समधील काकई संवर्धन फक्त मानिला येथे होते आणि त्यांचे उत्पादन दरवर्षी २,००० टन इतके असते.

काकईची संवर्धनामधील उत्कृष्ट उत्पादनक्षमता पाहून इतर बऱ्यांच देशांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. काकईमध्ये १३% प्रथिने, ८% ग्लायकोजेन व २.४% चरबी असते. आग्नेय आशियातील देशांत व इतरत्र जेथे पुरेसे प्रथिनेयुक्त अन्न मिळत नाही, अशा ठिकाणी काकईचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन करून ही गरज भागविणे शक्य आहे. उदा., भारत व पाकिस्तान यांच्या किनाऱ्यांवर सु. ५,००० चौ. किमी. क्षेत्र असे आहे की, जेथे काकईचे संवर्धन करणे शक्य आहे. या क्षेत्रातून १० लाख टन काकईचे उत्पादन करता येणे शक्य आहे, असा अंदाज करण्यात आलेला आहे. काकईचे जागतिक उत्पादन सु. ३ लाख टन आहे. यात हॉलंड (१ लाख टन), स्पेन (१ लाख टन), फ्रान्स (३०,००० टन), डेन्मार्क (२०,००० टन) आणि जर्मनी (१२,००० टन) या देशांतील उत्पादनाचा वाटा मोठा आहे. या उत्पादनातील जवळजवळ ९०% उत्पादन काकई संवर्धनातून होते.

भारतात नैसर्गिक रीत्या सापडणाऱ्या काकईचे उत्पादन दरवर्षी साधारण ८०० ते ९०० टन इतके आहे. त्यातील ८०% उत्पादन कालिकत विभागात होते. महाराष्ट्रात रत्नागिरी व मालवण या दोन ठिकाणी काकई मिळते व येथील उत्पादन २ ते ३ टन इतके आहे. भारतात काकई संवर्धनास १९७० नंतर सुरूवात झाली. केरळमधील विळींजम व तमिळनाडूमधील तुतिकोरीन या ठिकाणी काकईचे संवर्धन यशस्वी रीत्या करण्यात आले आहे. महाराष्ट्रातही हे प्रयोग १९७६ सालापासून हाती घेण्यात आले आहेत. भारतासारख्या उष्ण प्रदेशांत काकईची वाढ झपाट्याने होते, असे आढळून आले आहे. रत्नागिरीमध्ये सापडणारी मा. व्हीरीडीस ही जात एका वर्षात १० सेंमी. इतकी होते. यावरून या भागात काकईचे संवर्धन किती फायदेशीर होऊ शकेल याची कल्पना येते.

रानडे, मा. र.

बेडूक : भारतात जरी बेडकाचा अन्न म्हणून उपयोग होत नसला, तरी चीन, अमेरिका व काही यूरोपीय देशांत हे फार रूचकर अन्न म्हणून समजले जाते.

बेडकाचे पाय हा अन्नाच्या दृष्टीने त्याच्या शरीराचा फार महत्त्वाचा भाग आहे. भारतातून होणाऱ्यां जलजीवांच्या निऱ्यांतीत बेडकांच्या गोठविलेल्या पायांची होणारी निऱ्यांत ही फार महत्त्वाची आहे. १९७८ मध्ये ७७,९४६ टन निऱ्यांतीपैकी ३,५०० टन निऱ्यांत बेडकांच्या पायांची होती. निऱ्यांतीपासून मिळालेल्या २१२.१६ कोटी रूपयांच्या परदेशी चलनापैकी ८.४३ कोटी रूपये बेडकांच्या पायांपासून मिळाले. जलद गोठविण्याची प्रक्रिया करण्याकरिता वापरण्यात येणारे बेडूक शेतामध्ये किंवा तळ्यामध्ये नैसर्गिक रीत्या आढळणारे असतात. नैसर्गिक रीत्या वाढणाऱ्यां व निऱ्यांतीस उपयुक्त अशा बेडकांच्या प्रामुख्याने दोन जाती भारतात आढळतात. त्यांपैकी राना टायग्रिना ही जात महाराष्ट्रात आणि पश्चिम व उत्तर भारतात, तर रा. हेक्झॅडॅक्टिला ही जात बंगाल व दक्षिण भारतात आढळते. रा. टायग्रिना जातीचे बेडूक जमिनीवर दूरवर फिरतात व कधीकधी पाण्याचा आश्रय घेतात. हे निरनिराळ्या जातींच्या कीटकांवर व लहानसहान जीवांवर आपली उपजीविका करतात, याउलट रा. हेक्झॅडॅक्टिला ही जात पाण्यात राहते व पाण्यातील जीव व वनस्पती खाऊन आपली गुजराण करते. रा. टायग्रिना पेक्षा या जातीची वाढही जास्त जलद होते. बेडकांचे संवर्धन हे अलीकडच्या काळापर्यंत उपेक्षित क्षेत्र राहिले आहे. गेल्या काही वर्षात केंद्रीय अंतर्देशीय मत्स्य अनुसंधान संस्थेकडून बेडूक संवर्धनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जात आहे व सुधारित तंत्र शोधण्यात येत आहे. प्रेरित प्रजननाचाही अभ्यास करण्यात येत आहे.

तैवानमध्ये बेडूक संवर्धन करण्याची सु. २०० केंद्रे आहेत. तेथे संवर्धनासाठी रॉ. कॅटेसबिअँना ही बेडकाची अमेरिकन जात वापरली जाते. या जातीतील नराच्या कानाचा पडदा डोळ्याच्या आकारमानाच्या दुप्पट असतो व गळा पिवळा असतो. मादीच्या कानाचा पडदा डोळ्यापेक्षा थोडासाच मोठा असतो व गळा पांढरा ठिपकेदार असतो. बेडूक संवर्धन केंद्रात बेडकाच्या जीवनक्रमातील प्रत्येक अवस्थेसाठी वेगळे तळे वापरले जाते. या तळ्याभोवती व तळ्यावर जाळीचे आच्छादन असते. अंडी घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्यां टाकीचे आकारमान १० ते १५ चौ. मी. असते. या प्रत्येक टाकीत एक नर व ३ ते ४ माद्या सोडतात. नर मादीला पाण्यात पाठीमागून विळखा घालतो व पुढील पायांनी तिचे पोट दाबून धरतो. ही अवस्था १ ते २ दिवस टिकते. मादी साधारणपणे सकाळच्या वेळी पाण्यात अंडी सोडते व नराकडून या अंड्याचे निषेचन होते. अंड्यांचे पुंजके पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात. एक मादी सु. ९,००० अंडी घालीत असली, तरी त्यांतून सरासरी १,००० पिले मिळतात. अंडी घातल्यावर ती हलकेच तेथून काढून दुसऱ्यां टाकीत सोडतात. या टाक्या सिमेंट-कॉंक्रीटच्या असतात व त्यांत पाणी खेळते ठेवण्याची व्यवस्था असते. पाण्याचे तापमान २४ से. ते २७ से. इतके असते, तर अंड्यांचा विकास साधारणपणे ७२ तासांत होतो व ती फुटून त्यांतून डिंभ बाहेर येतात. पहिला आठवडा डिंभांना त्यांच्या शरीरात असलेले खाद्य पुरते. आठ दिवसानंतर या डिंभांना उकडलेल्या अंड्याचा बलक खाऊ घालतात. वीस दिवसांनंतर या डिंभांना या टाकीतून काढून टाकून दुसऱ्यां टाकीत सोडले जाते. या टाकीचा तळ मातीचा असतो व यात ३० ते ४० सेंमी. खोल पाणी असते. टाकीचे आकारमानही मोठे असते. या टाकीत डिंभांची वाढ होते. या अवस्थेतील डिंभास ⇨ मैकेर असे म्हणतात. दर चौ. मी. ला १,००० या प्रमाणात या टाकीत डिंभ वाढविले जातात. पहिल्या महिन्यांत त्यांना मासळीचा भुगा व भुईमुगाची पेंड खाऊ घालतात. दुसऱ्यां महिन्यापासून रताळ्याचे पीठ, भाताचा कोंडा, वाया जाणारे अन्न व यांसारखे इतर स्वस्त खाद्य दिवसातून दोनदा देतात. बेडकाचे डिंभ सर्वभक्षी आहेत.

कालांतराने या डिंभांचे रूपांतर व्हावयास लागते. त्यांची शेपटी प्रथम संकोच पावते व शेवटी पूर्णपणे जिरून जाते, हळूहळू चारी पायांचा विकास होतो व त्यांच्या शरीररचनेत व आकारात बदल घडून ती बेडकासारखी दिसू लागतात. या रूपांतरणास लागणारा काळ हा तापमान, अन्न व जातीच्या अंगभूत गुणांवरही अवलंबून असतो. काही डिंभांत हे रूपांतर दोन किंवा तीन महिन्यांत होते, तर काहींत ६ ते ८ महिनेही लागतात. मोठ्या आकारमानाचे बेडूक मिळविण्याकरिता पाण्याचे तापमान १६ से. पेक्षा कमी करून रूपांतरणाचा काळ लांबविता येतो. यामुळे डिंभांची वाढ चांगली होऊन त्यांचे आकारमान मोठे होते.

रूपांतरणानंतर आकारमानाप्रमाणे बेडकांची विभागणी करण्यात येते व एका आकारमानाचे बेडूक एका टाकीत किंवा तळ्यात सोडले जातात. ह्या टाकीत किंवा तळ्यात १५ ते २५ सेंमी. खोल पाणी असावे लागते व तळ्याच्या क्षेत्रापैकी एक चतुर्थांश भाग कोरडा, उंच व उतरता असावा लागतो. या तळ्यात बेडकांना त्यांचे विशिष्ट खाद्य देण्यात सुरूवात करतात. एका तळ्यात एकाच आकारमानाचे बेडूक ठेवावयाचे असल्यामुळे त्यांच्या वाढीत फरक आढळून आल्यास लहान बेडूक काढून दुसरीकडे हलविले जातात. दर चौ. मी. ला ६० ते १२० लहान बेडूक ठेवून त्यांची जोपासना केली जाते.

सुरूवातीस लहान बेडकांना गांडुळे, माश्यांच्या अळ्या, लहान मासे, कोळंबी व यांसारखे लहान जिवंत प्राणी हे खाद्य देण्यात येते. माश्यांच्या अळ्या वाढविण्यासाठी लाकडी पेटीवर तारेची जाळी ठेवून तीवर सडणारे मासे ठेवतात. या सडणाऱ्यां माशांवर माश्या बसून अंडी घालतात. या अंड्यांतून निघणाऱ्या अळ्या जाळीतून खालच्या पेटीत पडतात. रोज दोनदा खाद्य देण्यात येते व या खाद्याचे वजन बेडकाच्या वजनाच्या १/१० इतके असते. हळूहळू लहान मृत प्राणीही खाद्य म्हणून दिले जातात. दोन महिन्यानंतर म्हणजे बेडूक १२ सेंमी. आकारमानाचे झाले म्हणजे त्यांना दुसऱ्यां तळ्यात हलविण्यात येते. येथे त्यांची संख्या प्रत्येक चौ. मी. जागेत ३० ते ५० इतकी असते. या तळ्यात हे बेडूक पूर्ण आकारमानाचे होईपर्यंत वाढविले जातात. येथे त्यांना गोगलगाई अन्न म्हणून दिल्या जातात. तसेच तीव्र प्रकाशाचे दिवे या तळ्यावर लावून कीटक आकर्षित केले जातात. यामुळे परस्परच बेडकांच्या अन्नांची सोय होते. रूपांतरण झाल्यावर सु. ७ महिन्यांत बेडकांचे वजन ३०० ग्रॅ. होते. खाण्याजोग्या आकारमानाचे बेडूक होण्यास ८ ते १० महिने लागतात व या वेळी त्याचे वजन सरासरी १५० ते २०० ग्रॅ. असते. [→ बेडूक].

जोशी, र. ह.

स्पंज :पोरिफेरा संघातील बहुकोशिक अपृष्ठवंशी प्राण्यास स्पंज म्हणतात. यांच्या शरीरावर सर्वत्र छिद्रे असतात. स्पंजाच्या सु. ५,००० जाती आहेत. बहुतेक जाती समुद्रात आढळतात. काही जाती गोड्या पाण्यातही राहतात. हे पाण्यात खडकांना किंवा इतर पदार्थांना कायमचे चिकटलेले असतात.

स्पंजांचे मुख्य अन्न प्लवक व सूक्ष्म प्राणी हे होय. त्यांचे प्रजोत्पादन लैंगिक पद्धतीने, मुकुलनाने, कुडमिकांमुळे किंवा पुनरूदभवनाने होते [→प्रजोत्पादन; पोरिफेरा]. स्पंजाचे तीन वर्गात विभाजन होते : (१) कॅल्केरिया, (२) हेक्झॅक्टिनेलिडा व (३) डेमोस्पंजिया. अंग स्वच्छ करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्यां स्पंजास ‘बाथस्पंज’ म्हणतात व तो डेमोस्पंजिया या वर्गात मोडतो.

व्यापारी दृष्ट्या स्पंजांच्या सहा जाती महत्त्वाच्या आहेत. त्या प्रामुख्याने भूमध्य समुद्र व मेक्सिकोच्या आखातात सापडतात. हिंदी महासागरातही ऑस्ट्रेलियाजवळ स्पंज उत्पादन काही प्रमाणात होते. स्पंजाचे सर्वांत जास्त वार्षिक उत्पादन (सु. ६९,००० किग्रॅ.) सध्या स्पेनमध्ये होते. त्यानंतर तुर्कस्तान (४५,००० किग्रॅ.) व अमेरिकेची संयुक्त संस्थाने (२१,००० किग्रॅ.) या देशांचा क्रमांक लागतो.

स्पंज काढायच्या दोन पद्धती आहेत. त्या अनुक्रमे बुडी मारून स्पंज काढणे व गळाने उचलून स्पंज काढणे या होत. नौकेच्या साह्याने खोल पाण्यातील स्पंज गळाने ओढून काढले जातात पण या पद्धतीत ते तुटण्याचा व लहान स्पंज दगावण्याचा संभव जास्त असतो.

स्पंजाचे संवर्धन करण्यासाठी त्याचे तुकडे करून ते एखाद्या जड वस्तूला बांधतात व ती वस्तू पाण्यात सोडतात. यथाकाल स्पंजाची वाढ होते. ही फार सोपी पद्धती आहे. या पद्धतीत स्पंज वापरताना तो चिरडला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते, तसेच तो पाण्यातच कापावा लागतो. जपानी पद्धतीत स्पंजाचे तुकडे करतात व सु. २ सेंमी. अंतरावर ते दोरीस बांधतात. ही दोरी एका बाटलीला बांधून पाण्याखाली तरंगत ठेवली जाते. अशा दोऱ्यांच्या खालील टोकास सिमेंटचे किंवा असलेच इतर प्रकारचे जड ठोकळे बांधतात म्हणचे त्यामुळे दोऱ्यां सरळ राहतात. अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यात व बहामा द्वीपसमूहात स्पंजाचे पातळ पापुद्रे सिमेंटच्या थाळ्यांना किंवा दगडांना बांधून ते पाण्यात सोडतात. यथाकाल यांवर स्पंज वाढतो. भारतात या दिशेने प्रयत्न करण्यास पुष्कळ वाव आहे.

रानडे, अनिल मा.

शैवले : शैवलांचे आठ विभाग आहेत. जवळजवळ सर्व विभागांतील काही जाती सागरात आढळतात. यांपैकी क्लोरोफायटा, फेओफायटा व र्‍होडोफायटा या विभागांतील शैवले जास्त प्रमाणात आढळतात. क्लोरोफायट्याच्या सु. ६,५०० जाती आहेत व ही शैवले हिरवी आहेत. फेओफायटा ही पिवळट रंगाची शैवले आहेत. ती बहुतेक सर्व समुद्रांत आढळतात. काही एककोशिक तर काही अनेककोशिक आहेत. काहींचे तंतुयुक्त शरीर शाखायुक्तही असते. या वर्गातील कित्येक शैवले मोठी असून त्यांची रचना जटिल (गुंतागुंतीची) असते. या वर्गाच्या सु. १,००० जाती आहेत. र्‍होडोफायटा ही शैवलेही मोठी व समुद्रात आढळणारी आहेत. यांपैकी काही जाती जीवोपजीवी आहेत. यांच्या सु. २,५०० जाती आहेत.

काही शैवले मुक्तसंचारी, तरंगती व सूक्ष्म अशी असतात, तर काही खडकावर स्थिर व मुळे सोडणारी अशी असतात. शैवलांची वाढ पाण्याच्या गुणधर्मांवर व सूर्यकिरण पाण्यात कुठवर शिरतात यांवर अवलंबून असते. समशीतोष्ण कटिबंधात शैवले सु. ६० मी. खोली खाली वाढत नाहीत; पण याच कटिबंधातील भूमध्य समुद्रात मात्र किती तरी खोली वर ती आढळली आहेत. समुद्रकिनाऱ्यांजवळच्या पाण्यातील व यापेक्षा खोल असलेल्या पाण्यातील शैवले निरनिराळ्या जातींची असून त्यांत खूप फरक दिसतो. वेलीय विभागात (थंडीच्या पाण्यात) क्लोरोफायटा तर वेलापवर्ती विभागात (थडीपार किंवा किनाऱ्यांपार पाण्यात) प्रामुख्याने फेओफायटा शैवले जास्त आढळतात. यापेक्षा खोल पाण्यात र्‍होडोफायट्याचे प्राधान्य असते.

गोड्या पाण्यातील शैवलांच्या जाती जगभर पसरल्या आहेत. सागरी शैवलांच्या जातींत मात्र भौगोलिक परिस्थितीमुळे लक्षणीय फरक आढळून येतात. उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध यांतील समुद्रांत आढळणाऱ्या जाती व निरनिराळ्या महासागरांत आढळणाऱ्या जाती यांत हे फरक प्रामुख्याने दिसून येतात. हे फरक भूखंडामुळे झालेली पाण्याची विलगता व निरनिराळ्या समुद्रांत व महासागरांत आढळणारा तापमानांतील फरक यांमुळे घडून येतात, असे दिसते.

डायाटमे ही सागरी शैवलांतील सूक्ष्म शैवले होत. पाण्यातील जीवशृंखलेत हे सुरूवातीचे जीव होत. पाण्यातील सर्वांत जास्त भाग हे जीव व्यापतात. पृथ्वीवर वनस्पतींद्वारे निर्माण होणाऱ्या ९० अब्ज टन अन्नापैकी निम्मे अन्न या सूक्ष्म शैवलांपासून मिळते. [→ डायाटम].

व्होडोफायसी वर्गातील तांबडी शैवले व्यापारी दृष्ट्या फार महत्त्वाची आहेत. जपानमध्ये पॉर्फिरा या शैवलांचे फार मोठ्या प्रमाणात संवर्धन केले जाते. सतराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले हे संवर्धन ‘नोरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. या प्रकारात बांबू किंवा इतर झाडांच्या कामट्यांच्या मोळ्या समुद्रकाठी पाण्यात दूरवर उभ्या करतात. दोन ते चार आठवड्यांत या मोळ्यांवर पॉर्फिराची बीजुके (प्रजोत्पादक घटक) चिकटतात व त्यांपासून शैवले फुटून वाढू लागतात. यानंतर या मोळ्या नदीमुखाशी किंवा खाडीत आणल्या जातात व तेथे त्या नवीन फुटलेल्या शैवलांची वाढ होते. गरजेनुसार ही शैवले कापली जातात. आधुनिक पद्धतीत बीजुके गोळा करण्यासाठी नायलॉन जाळी किंवा ताडाच्या तंतूची जाळी पाण्याच्या पृष्ठभागावर समांतर अशी ताणून उभी करतात. के. एम्. अँड्र्यू या वनस्पतिशास्त्रज्ञांनी पॉफिराचा समग्र जीवनवृत्तांत १९४९ साली शोधून काढला. त्याचा या धंद्यात फार उपयोग झाला. या वेळेपर्यंत बीजुके कशी तयार होतात आणि कोठून येतात हे ज्ञात नव्हते. सध्या जपानमध्ये ही बीजुके कृत्रिम पद्धतीने तयार केली जातात. सिमेंटच्या टाक्यात ही बीजुके तयार होतात. त्यांना योग्य तितका प्रकाश, तापमान व अन्नद्रव्ये पुरवून, अंकुर फुटेपर्यंत वाढविण्यात येते व नंतर पुढील संवर्धनासाठी समुद्रात सोडली जातात. त्यांची वाढ १० ते १५ सेंमी. इतकी झाली की, त्यांची कापणी करण्यात येते. अशी कापणी ३-४ वेळा होते. कापलेली शैवले वाळविली जातात आणि मग ती विक्रीला काढतात. जपानमध्ये दरवर्षी सरासरी १,२०,००० टन उत्पादन निघते. थोड्याफार प्रमाणात पॉर्फिराचे संवर्धन कोरियातही करतात. जपानमध्ये पॉर्फिराखेरीज एंटेरोमॉर्फा व मोनोस्ट्रोमा या हरित शैवलांचेही अल्प प्रमाणात संवर्धन केले जाते.

फेओफायसी वर्गातील ‘केल्प’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्यां तपकिरी शैवलांचेही संवर्धन जपानमध्ये केले जाते. पॉर्फिराप्रमाणेच बीजुके तयार करून तो एका विशिष्ट अवस्थेपर्यंत वाढविण्यात येतात व मग पुढील वाढीसाठी समुद्रात सोडण्यात येतात. यासाठी तराफे व दोरखंड यांचा उपयोग केला जातो. अशा रीतीने संवर्धित केलेल्या शैवलांचे वार्षिक उत्पादन ६०,००० टनांपर्यंत होते, असे आढळले आहे.

लॅमिनेरिया हे तपकिरी शैवल अन्न म्हणून उपयोगात येत नाही. त्यापासून आयोडीन मिळते. या शैवलाच्या संवर्धनाच्या पद्धती केल्पप्रमाणेच आहेत. चीन व कोरियात हे संवर्धन मोठ्या प्रमाणात चालते. शैवले तराफ्यांवर किंवा दोऱ्यांवर वाढवितात. काही ठिकाणी समुद्राच्या तळाशी असलेल्या दगडांना बांधूनही यांची वाढ केली जाते.

भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवरही निरनिराळ्या जातींची शैवले आढळतात. पश्चिम किनाऱ्यांवर यांचे प्रमाण जास्त आहे. जामनगर येथील सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये या शैवलांवर यांच्या उपलब्धतेबाबत व औषधी गुणधर्मांबाबत संशोधन केले जाते, असेच संशोधन कोचीन येथील सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट व गोवा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी येथेही चालते.

‘आगर’ या द्रव्याचे उत्पादन ग्रॅसिलॅरिया व जेलिडियम या वंशांतील जातींच्या शैवलांपासून होते [→आगर]. तसेच अल्जिन तयार करण्यास मायकोसिस्टिस पायरीफेरा, लॅमिनेरिया सॅकॅरिना इ. शैवले लागतात. या शैवलांचे संवर्धन किनाऱ्यांवरून समुद्रात दोरखंडाचे जाळे किंवा तराफे बांधून त्यांवर या शैवलांची बीजुके लावून करण्यात येते. चार ते सहा महिन्यांत ही शैवले कापण्यास योग्य होतात. दर मीटर दोरखंडापासून ३-५ किग्रॅ. ग्रॅसिलॅरियाचे शैवल मिळू शकते. असे पीक वर्षातून तीनदा घेता येते व ते किफायतशीर होते. दक्षिण भारताच्या किनाऱ्यांवरील समुद्रात या संवर्धनास चांगला वाव आहे. [→ शैवले].

कुलकर्णी, चं. वि.; रानडे, अनिल मा.

माशांखेरीज अन्य जलचर प्राण्यांची मासेमारी

मासेमारीच्या दृष्टीने माशांखेरीज इतर अनेक जलचर प्राणीही महत्त्वाचे असून त्यांपैकी खेकडे, शेवंडे, देवमासे व कासवे यांच्या मासेमारी संबंधीची माहिती खाली दिली आहे.

खेकडे : कवचधर वर्गाच्या (क्रस्टेशिया) मॅलॅकोस्ट्रॅका उपवर्गा- तील डेकॅपोडा गणातील ब्रॅकियूरा या उपगणातील हा प्राणी होय. याला मुंबई भागात चिंबोरी असे म्हणतात. खेकडे जगात सर्वत्र आढळतात आणि त्यांच्या सु. ४,५०० जाती आहेत. बहुतेक जाती समुद्रात राहणाऱ्यां आहेत. काही जाती गोड्या पाण्यात राहतात व त्या भूचरही आहेत. खेकडे समुद्रकिनाऱ्यांच्या उथळ पाण्यापासून ते ३,७०० मी. खोलीपर्यंत पाण्यात आढळतात. भूचर खेकडे जास्त प्रमाणात उष्ण प्रदेशात राहतात व मधूनमधून ते समुद्राच्या पाण्यातही जातात कारण त्यांचे डिंभ त्या पाण्यात वाढतात. हे अपृष्ठवंशी प्राणी आहेत. यांचे शरीर कठीण कवचाने झाकलेले असते. ते त्यांच्या संधियुक्त पायांनी चालतात किंवा पोहतात.

माणूस खेकड्यांचा खाण्याकरिता उपयोग करतो. या दृष्टीने यूरोपात आढळणाऱ्यां कॅन्सर परप्युरस, कॅ. पॅग्पुरस व कॅलिनेक्टिस सॅपायडस ह्या जाती, अमेरिकेत आढळणारी कॅ. मॅजिस्टर आणि भारतात आढळणाऱ्या सिला सेरॅटा व नेपच्यूनस पेलॅजिकस या खाऱ्या पाण्यातील व पॅराटेल्फ्यूजा स्पिनिजेरा ही गोड्या पाण्यातील, या जाती महत्त्वाच्या आहेत. यांपैकी कॅ. पॅग्युरस व कॅ. मॅजिस्टर हे खेकडे चालणारे आहेत. त्यामुळे त्यांना असलेल्या आठही पायांची टोके अणकुचीदार असतात. कॅ. सॅपायडस हे खेकडे पोहणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या शेवटच्या पायाच्या जोडीची टोके वल्ह्याप्रमाणे चपटी असतात.

इतर कवचधारी प्राण्यांप्रमाणे खेकडेही वाढ होत असताना आपले कवच (कात) वेळोवेळी टाकतात. प्रथम जुने कवच तडकते व खेकडा बाहेर येतो. या वेळी त्याचे अंग मऊ असते. काही दिवसांतच त्याच्या आकारमानात वाढ होऊन नवीन कवच येते व ते टणक बनते. यानंतर हे टणक कवच तडकून टाकले जाईपर्यत खेकड्याची वाढ होत नाही. हा कवच टाकण्याचा प्रकार सरीसृप (सरपटणाऱ्या) प्राण्याच्या कात टाकण्यासारखा आहे. जेव्हा खेकडा कात टाकण्याच्या तयारीत असतो तेव्हा त्याच्या शेवटच्या पायाच्या जोडीच्या शेवटून दुसऱ्यां जोडावर बाहेरील बाजूस एक गुलाबी रंगाची अरूंद रेघ दिसते. या अवस्थेतील खेकड्यास ‘कात टाकणारा’ (पीलर) असे म्हणतात. जेव्हा कात टाकण्याची क्रिया सुरू होते तेव्हा खेकड्याच्या पाठचे कवच शरीरापासून वेगळे होते. या अवस्थेतील खेकड्यास ‘बस्टर’ असे म्हणतात. कवच टाकल्यानंतर बाहेर आलेल्या खेकड्यास ‘सॉफ्ट’ (मऊ) असे म्हणतात कारण त्याचे शरीर मऊ असते. दोन दिवसांनंतर नवे कवच तयार होऊ लागते. या अवस्थेत ‘बकरम’ म्हणतात. शेवटी जेव्हा कवच कठीण (टणक) बनते त्या अवस्थेस ‘हार्ड क्रॅब’ असे म्हणतात.

अमेरिकेत मऊ व कठीण निळे खेकडे पकडण्याकरिता वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. मऊ खेकडे उथळ पाण्यात ‘डिप-नेट’ या प्रकारच्या जाळ्यांनी पकडतात. ह्या जाळ्यास २ मी. लांबीची एक लाकडी मूठ असते. या मुठीस ३० सेंमी. व्यासाचे लोखंडी कडे जोडलेले असते. या कड्यास २.५ सेंमी. आसाचे पिशवीसारखे सुताचे जाळे जोडलेले असते. दुसऱ्या प्रकारच्या जाळ्यास ‘पुश-नेट’ म्हणतात. याचे लोखंडी कडे दुप्पट आकारमानाचे पण अर्धवर्तुळाकार असते. मच्छीमार लहान होडीतून उथळ पाण्यात खेकडे शोधतात आणि जवळच्या जाळ्याने पटकन खेकडे धरतात.

खोल पाण्यात ‘डिप-नेट’ किंवा ‘ड्रेज-नेट’ ही जाळी वापरतात. या दोन्ही प्रकारच्या जाळ्यांचे सांगाडे त्रिकोणी आकाराचे व ६० सेंमी. ते १.५ मी. लांबीचे असतात व त्यांना शेवसुताच्या जाळीची पिशवी जोडलेली असते. डिप-नेटच्या सांगाड्याच्या दांड्याला दाते नसतात; पण ड्रेजच्या खालच्या दांड्याला १० सेंमी. लांब दाते अस-तात आणि त्यांच्या जाळीच्या जवळचा भाग लोखंडी कड्यांच्या जाळीचा बनविलेला असतो. नौकेच्या मागील भागावरून जाळे मागे समुद्राच्या तळावर सोडतात आणि नंतर ७० ते १८५ मी. लांबीपर्यंत ओढत नेऊन वर खेचून घेतात आणि त्यामधील खेकडे बाहेर काढतात.

कठीण खेकड्यांकरिता डिप-नेट व ड्रेज-नेट यांशिवाय ‘टॉर्ट-लाइन’ सुद्धा वापरतात. ही म्हणजे ७ सेंमी. जाडीची व ०.४ ते १.६ किमी. लांबीची शेवसुताची दोरी असते. या दोरीच्या दोन्ही टोकांना ४.५ किग्रॅ. वजनाचे नांगर जोडलेले असतात. मुख्य दोरीला दर ४५ सेंमी. अंतरावर १५ सेंमी. लांबीचे दोरीचे लहान तुकडे बांधलेले असतात. या तुकड्यांना ‘स्नूड’ असे म्हणतात. प्रत्येक स्नूडच्या टोकाला ‘वास’ म्हणजे आमिष म्हणून ताजे किंवा खारवलेले मासे बांधतात. ही पद्धत उन्हाळ्यात अवलंबिली जाते. थंडीत गारठल्यामुळे खेकडे सुस्त बनतात व आमिषाकडे आकर्षिले जात नाहीत. थंडीमध्ये ड्रेज-नेट वापरण्याची पद्धत आहे.

‘क्रॅब पॉट्स’ या नावाने ओळखले जाणारे सापळे पॅसिफिकच्या किनाऱ्यांवर वापरले जातात. हे सापळे चौकोनी खोक्यासारखे, लोखंडी चौकटीचे, आकारमानाने ६० सेंमी. लांबीरूंदीचे असे अस- तात. या खोक्याच्या खालच्या भागात ‘घास’ (मांसाच्या किंवा माशाच्या तुकड्याचे आमिष) ठेवण्याकरिता एक लंबवर्तुळाकार वाटी असते. वाटीच्या आकाराच्या उघड्या तोंडातून खेकडे प्रथम खालच्या भागात येतात व तेथून पोहत वरच्या कप्प्यात शिरतात व तेथून ते बाहेर पडू शकत नाहीत. स्थानिक कायद्यानुसार प्रत्येक मच्छीमार एका वेळेस ३५ ते ५० सापळे लावू शकतो.

किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात खांबावर छोट्या छोट्या झोपड्या बांधून त्यांत ३.५ मी. लांब, १.२५ मी. रूंद व ३० सेंमी. खोल अशी तरंगती खोकी ठेवतात व या खोक्यांत कात टाकणारे खेकडे आणून सोडतात. ही खोकी पाइन किंवा सायप्रस जातीच्या लाकडांच्या पट्ट्यांची केलेली असतात. दोन पट्ट्यात ५ मिमी. अंतर ठेवले जाते. यामुळे खोक्यात पाणी खेळते राहते. ही खोकी दिवसातून कमीत कमी तीन वेळा तरी तपासली जातात आणि प्रत्येक वेळी आत आलेले कात टाकणारे खेकडे बाहेर काढले जातात. लाकडाच्या १० सेंमी. खोल खोक्यात बर्फाचा चुरा व शेवाळे टाकून त्यात हे जिवंत कात टाकणारे खेकडे बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतात.

लाकडी पिंपात बर्फ टाकून त्यामध्ये जिवंत कठीण खेकडे बाजारात पाठविले जातात किंवा हे खेकडे अर्धा तास वाफेवर शिजवून त्यांतील मांस काढून ते पत्र्याऱ्यांऱ्यांच्या डब्यांत भरून विक्रीसाठी बाजारात पाठविले जाते.

पॅरालिथोडीस कॅमचॅटिका या खेकड्यास अलास्कन किंवा जपानी ‘किंग क्रॅब’ म्हणतात. हा खरोखरीचा खेकडा नसून याचा समावेश अँनॉम्यूरा उपगणात होतो. हे खेकडे बेरिंग समुद्राच्या थंड पाण्यात अल्यूशन बेटांच्या आसपास सापडतात. हे आकारमानाने २२ सेंमी. लांब व वजनाने ५.५ किग्रॅ.पर्यंत असू शकतात. यांना पकडण्यास १६० ते २०० मी. खोल फास जाळे वापरावे लागते. जाळ्याचा प्रत्येक तुकडा ४५ सेंमी. लांब, ३ मी. उंच व ४५ सेंमी. आसाचा असतो. असे सरासरी वीस तुकडे एकत्र जोडून त्याच्या दोन्ही टोकांना नांगर बांधतात. खेकडे पकडण्यास ट्रोल जाळेही वापरतात. २,००० ते ८,००० टन खेकडे मोठ्या जहाजावर आणवून तेथे ते बर्फात गोठवून किंवा डब्यांत भरून बाजारात पाठवितात.

सिला सेरॅटा हा भारतात सर्वत्र व मुबलक प्रमाणात आढळणारा खेकडा आहे. साधारणपणे या खेकड्याची वाढ १० ते १३ सेंमी. असली, तरी जास्तीत जास्त २० सेंमी. पर्यत वाढलेले खेकडे आढळले आहेत.पोर्ट्यूनस पिलाजिकस हा निळा खेकडा सु. १२ सेंमी. व पो. सांगवायनोलेंटस हा तीन डोळी खेकडा सु. ८ सेंमी. आकारमानाचा असतो. चॅरिबीडीस क्रुसिएटा या खेकड्यात चौकडीची नक्षी असते व त्याचे आकारमान ८ ते १३ सेंमी. इतके असते. हा खेकडा किनाऱ्यापासून दूर सु. ४० मी. खोल पाण्यात मिळतो.

मॅटुटा ल्यूनारिस हा खेकडा फक्त ८ सेंमी. पर्यंत वाढतो. याच्या पाठीवर दोन्ही बाजूंना दोन लांब काटे असतात व याचे पाय पोहण्यास उपयुक्त असे चपटे असतात. काही ऋतूंमध्ये हे खेकडे महाराष्ट्रातही विपूल प्रमाणात मिळतात; पण ते आकारमानाने लहान असल्यामुळे त्यांना विशेष किंमत येत नाही व हे गरीबांचे अन्न म्हणून समजले जाते. पोटोमोनिडी कुलातील १३ सेंमी. पर्यंत वाढणारे पॅराटेल्फ्यूजा जॅक्यूमॉनटी या नावाचे गोड्या पाण्यातील खेकडे शेतात व तळी आणि ओढे यांच्या काठांवर फार मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पकडले जातात.

महाराष्ट्रात खेकड्यांच्या मच्छीमारीचा हंगाम ऑगस्ट ते ऑक्टोबर हा असतो. खेकडे पकडण्यास लोखंडी गळ किंवा बांबूला बांधलेल्या व आकडी असलेल्या लोखंडी सळ्या वापरतात. या लोखंडी सळ्यांस ‘धरकन’ किंवा ‘आकडी’ असे म्हणतात. खडकांच्या भेगांत लपून बसलेले खेकडे वरील साधनांनी बाहेर काढले जातात. ‘काबे’ या पद्धतीत एका लांब काठीला दोरी बांधलेली असते आणि त्या दोरीच्या मोकळ्या टोकाला घास अडकवितात. असे बरेचसे काबे कमरेइतक्या खोल पाण्यात दगडांच्या भेगांत बसवून वेळोवेळी त्यांचे निरीक्षण केले जाते व मांस खाण्याकरिता आलेले खेकडे पकडले जातात.

भारतात तसेच महाराष्ट्रातही ‘पत्रावली’ या पद्धतीचा खेकडे पकडण्यासाठी उपयोग करतात. हा प्रकार टॉर्ट लाइनसारखाच आहे. यात ३० मी. ते ६० मी. लांब दोरीला दर १ मी. अंतरावर घास अडकविलेले असतात. दोरीचे एक टोक चिखलात घट्ट रोवलेल्या खुंटास बांधलेले असते व दुसरे टोक मोकळे असून त्यास एक तरंगणारे बूच बांधलेले असते. ही दोरी छातीइतक्या खोल पाण्यात सोडून ठेवतात व थोड्याथोड्या वेळाने तिची तपासणी करतात. घासाजवळ आलेले खेकडे पकडून पिशवीत जमा करतात.

सध्या महाराष्ट्रात लहान खेकड्यांची हत्या फार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या जाती नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. हे टाळण्यासाठी सरकारी पातळीवर काही निर्बंध घालणे आवश्यक झालेले आहे. [→ खेकडा].

छापगर, ब. फ.

शेवंडे : कवचघर वर्गातील डेकॅपोडा गणातील हे प्राणी आहेत. भारतात सापडणाऱ्यां शेवंड्याला पाश्चिमात्य नामकरणानुसार खरा शेवंडा न मानता त्याला ‘काटेरी शेवंडा’ असे म्हणतात. शेवंड्यांच्या मासेमारीत काटेरी व बिनकाटेरी अशा दोन्ही प्रकारच्या शेवंड्यांचा समावेश होतो. बिनकाटेरी शेवंड्यांच्या नांग्या मोठ्या व फुगीर असतात व कवच गुळगुळीत असते. होमेरस गॅमॅरस हा शेवंडा यूरोपात आढळतो. याच्या मासेमारीची सुरूवात एकोणिसाव्या शतकात झाली असावी. हा शेवंडा ४.५ किग्रॅ. पर्यंत वाढतो आणि नॉर्वे व ब्रिटीश बेटांच्या आजूबाजूस आढळतो. हो. अमेरिकॅनस हा शेवंडा अमेरिकेत आढळतो. याची सरासरी लांबी २३ सेंमी. असली, तरी ६० सेंमी. लांबीचे व १४ किग्रॅ. पर्यंत वजनाचेही या जातीचे शेवंडे असू शकतात. कॅनडातही या शेवंड्यांची मासेमारी महत्त्वाची मानली जाते. नॉर्वेजवळ आढळणारा नेफ्रॉस नॉर्वेजिकसहा शेवंडा ‘स्कॅम्पी’ या नावाने ओळखला जातो. हा १५ ते २५ सेंमी. लांबीचा असताना पकडतात. दक्षिण गोलार्धात जासस लॅलांडी हा शेवंडा आढळतो. हा सरासरी ५० सेंमी. लांब व वजनाने ४.५ किग्रॅ. असतो. याची मासेमारी दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर होते.

शेवंड्याच्या मासेमारीत ‘लॉबस्टर पॉट्स’ हे घासयुक्त सापळे वापरतात. या सापळ्यांचा आकार लंबवर्तुळाकार नळकांड्यासारखा असतो आणि लाकडी पट्ट्या अर्धवर्तुळाकार चौकटींवर जोडून ते बनविलेले असतात. या सापळ्यात शेवंड्यांना आत जाण्यासाठी नरसाळ्याच्या आकाराचे एक किंवा दोन मार्ग ठेवलेले असतात. त्यात घास म्हणून ताजे, खारे किंवा थोडे खराब झालेले पण चरबीयुक्त असे मासे ठेवण्यात येतात. हे सापळे साधारणपणे १० मी. ते ९० मी. खोल पाण्यात सोडण्यात येतात.

काटेरी शेवंड्यांना मोठ्या नांग्या नसतात परंतु त्यांचे शरीर व पाय काटेरी असतात. मादी पोटाच्या खालील बाजूस अंडी घेऊन फिरते. यथाकाल त्यांतून डिंभ बाहेर येतात. ते आकारमानाने लहान, पारदर्शक, काचेसारखे गुळगुळीत, भिंतीवरील कोळ्यासारखे दिसतात. त्यांना ‘फायलोसोमा’ म्हणतात. हळूहळू हे डिंभ पाण्यात इकडेतिकडे हिंडू लागतात. जवळजवळ दहा महिने अनेक वेळा कात टाकल्यावर ते शेवंड्यासारखे दिसतात व समुद्राच्या तळाशी जाऊन स्थिर होतात. या वेळी त्यांचे आकारमान सरासरी ५ सेंमी. असते. काटेरी शेवंडा जगातील सर्व उष्ण व समशीतोष्ण समुद्रांत सापडतो. साधारणपणे तो खडकाळ भागात राहतो पण काही वेळा तो समुद्राच्या तळाशीही आढळला आहे. यूरोपमध्ये मिळणाऱ्या काटेरी शेवंड्यांच्या जातीस पॅन्युलिरस एलिफास (पॅ.व्हल्गॅरीस) असे म्हणतात. अमेरिकेत पॅ. आरगस व पॅ. इंटरप्टस या जाती आढळतात.

व्यापारी दृष्ट्या भारतातील महत्त्वाचा काटेरी शेवंडा पॅ. होमॅरस (पॅ. डॅसिपस) हा होय. काटेरी शेवंड्याच्या भारतात आढळणाऱ्यां इतर जाती म्हणजे पॅ. बर्गेरी, पॅ. पॉलिफेगस, पॅ. ऑरनॅटस आणि पॅ. व्हर्सिकलरया होत. हे शेवंडे भारताच्या संपूर्ण किनाऱ्यावर सापडतात. त्यातल्या त्यात केरळ, तमिळनाडूचा आग्नेय किनारा व महाराष्ट्राचा किनारा येथे हे मुबलक आहेत. केरळच्या किनाऱ्यांवर पॅ. होमॅरस व महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर पॅ. पॉलिफेगस ह्या जातींचे शेवंडे जास्त प्रमाणात आढळतात. भारतातील सर्व शेवंड्यांच्या मासेमारीत ह्या दोन जातींच्या शेवंड्याचे प्रमाण ९९% आहे. महाराष्ट्रात मुख्यत्वे ठाणे व रायगड या जिल्ह्यांत शेवंड्यांची मासेमारी जास्त प्रमाणात होते. या मासेमारीचा हंगाम ऑक्टोबर ते मेपर्यंत असतो. थंडीच्या दिवसातही ही मासेमारी चालते. या वेळी शेवंड्यांच्या प्रजननाचाही हंगाम असतो.

या मासेमारीकरिता महाराष्ट्रात ‘हूप’ या नावाची जाळी वापरण्यात येतात. या जाळ्यांना ऑंखा, आसू, हिळा, गरंडा व फूक अशी स्थानिक नावे आहेत. हे जाळे अंदाजे ०.७ ते १.५ मी. व्यासाचे व बांबू किंवा लोखंडाचे कडे असलेले असते. यास घमेल्याच्या किंवा टोपलीच्या आकाराचा घोळ असलेले जाळे बांधतात. गोल कड्यांना दोन जाड दोऱ्यां काटकोनात बांधलेल्या असतात व या दोऱ्यांच्या जोडावर घास अडकविलेला असतो. घास म्हणून ताज्या किंवा सुक्या मुशी, पाकट, वाकटी यांचे मांस अथवा बकरी किंवा मेंढीचे आतडे वापरतात. जाळ्याच्या कड्यास तीन दोऱ्यां शिंक्यासारख्या बांधतात व या एकत्र करून यास एक लांब दोरी बांधण्यात येते. या दोरीच्या टोकाला बूच, पांगाऱ्यांच्या लाकडाचा तुकडा किंवा वाळका दुध्या भोपळा बांधून हे जाळे समुद्रात सोडले जाते. प्रत्येक मच्छिमार एका वेळी सु. १० ते १५ ‘गाडा जाळी’ वापरतो. ही जाळी होड्यांतून नेली जातात व ती ७ ते ८ मी. खोल पाण्यात सोडली जातात. गरीब मच्छीमार पांगाऱ्यांच्या लाकडाच्या ओंडक्यावर बसून जाळे घेऊन समुद्रावर जातात. या लाकडाच्या ओंडक्यांना तरंडा किंवा उलांडी असे म्हणतात. ही गाडा जाळी सोईस्कर अंतर ठेवून सोडली जातात व दर १५ मिनिटांनी तपासून त्यांत आलेले शेवंडे पकडले जातात. किनाऱ्यांवर इतर मासे पकडण्यासाठी वापरात असणाऱ्यां कालेव, वाणा इ. प्रकारच्या जाळ्यांनीही, तसेच काही नवीन प्रकारच्या फास जाळ्यांनीही शेवंडे पकडले जातात. जिवंत शेवंडे सुरक्षित ठेवण्याकरिता १.८ मी. लांब, ०.६ मी. रूंद व ०.६ मी. उंच या आकारमानाची पेटीवजा लाकडी चौकट सर्व बाजूनी काथ्याच्या जाळ्याने विणली जाते व या जाळ्यात पकडलेले शेवंडे ठेवतात. अशा एका पेटीत सु. १,००० शेवंडे १५ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. या प्रकारची जाळी ठाणे जिल्ह्यातील उत्तन, धिवली व वरोर या ठिकाणी वापरण्यात येतात.

अगदी अलीकडच्या काळापर्यंत शेवंड्याची मासेमारी महाराष्ट्रात गौण मानली जात होती. म्हातारे मच्छीमार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल मच्छीमार, ज्यांच्याकडे भांडवलाच्या अभावी मासेमारी नौका, जाळी इ. साहित्य नसलेले मच्छीमार हेच शेवंड्यांची मासेमारी करीत असत. १९६० सालापासून गोठवलेल्या शेवंड्याची निऱ्यांत यूरोप व जपान या देशांना होऊ लागली आहे व हा धंदा भरभराटीस येऊ लागला आहे. १९६९ साली महाराष्ट्रातून रू. ३५,८१,९१० किंमतीचे १,६६,९५० किग्रॅ. वजनाचे शेवंडे निऱ्यांत झाले. यात शेवंड्यांच्या शेपट्यांचाच अंतर्भाव आहे. सहा शेपट्यांचे वजन सरासरी १ किग्रॅ. भरते. असे गृहीत धरल्यास एकूण १० लाख शेवंडे उपयोगात आले. याव्यतिरिक्त स्थानिक बाजारातही बरेच शेवंडे विकले गेले.

निऱ्यांतीकरिता शेवंड्याचा मागचा अर्धा भाग तोडतात. हा भाग मांसल असतो. शेपटीस एक लहान चिरा देऊन आतील आतडी बाहेर ओढून काढून फेकून देतात. क्लोरीन घातलेल्या पाण्याने या शेपट्या स्वच्छ धुतात व मग त्यांचे आकारमानाप्रमाणे वर्गीकरण करून, मेण लावलेल्या पुठ्ठ्याच्या डब्यात भरतात व शीतगृहात गोठविण्या-साठी हे डबे पाठविले जातात. [→ शेवंडा].

छापगर, ब. फ.

कासवे : सरीसृप वर्गाच्या कीलोनिया (कूर्म) गणातील हा प्राणी आहे. या गणात कासवांच्या सु. २५० जाती आहेत. कासवे उष्ण कटिबंधात आढळतात. काही जाती समशीतोष्ण प्रदेशातही आढळतात. कासवे सर्वसाधारणपणे जलचर असून समुद्रात, गोड्या पाण्यात किंवा मचूळ पाण्यात राहतात. काही जाती भूचर आहेत. कासवाच्या जातींपैकी फक्त तीन जातींची कासवे खाण्यास योग्य समजली जातात आणि ती सर्व कीलोनिडी कुलातील आहेत.

कीलोनिया मिडास हे समुद्रात राहणारे कासव जगातील उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत सर्वत्र आढळते. याला ‘हिरवे कासव’ असेही म्हणतात. हे खाद्य कासव असून याच्यापासून केलेले सार (सूप) व मांसाचे खाद्यपदार्थ यांची सर्वत्र प्रशंसा केली जाते. या कासवांची बरीच हत्या होत असल्यामुळे आता त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत आहे. ही कासवे सु. १ मी. लांब आणि जास्तीत जास्त २२५ किग्रॅ. वजनापर्यंत वाढतात. सतराव्या शतकात यूरोपियन सागरी प्रवासी आपल्या दीर्घ काळाच्या सफरीवर जाताना मुबलक व पुरेसा अन्न पुरवठा म्हणून ही जिवंत कासवे बरोबर नेत असत. माद्या समुद्र किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी बाहेर आल्या म्हणजे त्या पकडणे सोपे जाते म्हणून कासवे पकडण्याचे काम त्यांच्या प्रजनन काळात होत असे. पकडलेल्या कासवांचे पाय बांधून त्यांना उताणे ठेवले म्हणजे ती पळून जाऊ शकत नाहीत.

या कासवांची चरबी हिरव्या रंगाची असते आणि म्हणून त्यांना हिरवी कासवे हे नाव मिळाले आहे. समुद्रातील टर्टल ग्रास नावाची वनस्पती खाल्ल्यामुळे त्यांच्या चरबीस हिरवा रंग येतो. या कासवांना समुद्रात किंवा किनाऱ्यांवर पकडण्यासाठी फास जाळ्याचा उपयोग करण्यात येतो. या कासवाचा अंडी घालण्याचा काळ मे ते जुलै हा असतो. प्रत्येक अंडे चेंडूसारखे गोल असते. अंड्याचे कवच थोडे मऊ व लवचिक असते. कासवांचे नर त्यांचे सर्व आयुष्य समुद्रातच घालवितात. याउलट मादी मात्र अंडी घालण्यासाठी किनाऱ्यांवर येते. कासवाच्या पोटामधील हिरव्या रंगाच्या चरबीच्या पट्ट्याला ‘कॅलीपी’ असे म्हणतात. सु. ४५ किग्रॅ. वजन असलेल्या कासवाच्या मांसाला व विशेषतः त्याच्या कॅलीपीला जास्तीत जास्त किंमत मिळते. यापेक्षाही मोठ्या म्हणजे सु. ९० किग्रॅ. वजनाच्या कासवांना त्या मानाने बरीच कमी किंमत मिळते.

कीलोनिडी कुलातील आणखी एक महत्त्वाची जाती म्हणजे हॉक्सबील टर्टल (एरिट्मोचिलिस इंब्रिकॅटा) (ससाण्यासारखी चोच असलेले, श्येन चंचू कासव) ही होय. ही कासवे जगातील सर्व उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांतील समुद्रात सापडतात. या कासवाचे कवच व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे आहे. ही कवचे ७५ ते ८० सेंमी. लांबीची असतात. त्यांच्यावर असलेले खवले छपरावरील कौलाप्रमाणे एकमेकांवर थोडे चढलेले असतात. कवचे गरम पाण्यात बुडवून किंवा अन्य प्रकारे त्यांना गरम करून हे खवले वेगळे काढले जातात. खवले पारदर्शक असून त्यांवर सुंदर काळे, तपकिरी किंवा पिवळे ठिपके असतात. कवचापासून निराळ्या केलेल्या खवल्यांचा आकार ओबडधोबड असतो. उष्णता व दाब यांचा उपयोग करून ते सरळ केले जातात व जरूर त्या आकाराचे कापले जातात. नंतर ते ज्या कामास वापरावयाचे असतील त्या कामास योग्य अशा रीतीने एकमेकांस जोडले जातात. पुरातन काळापासून या कासवांच्या कवचांना फार किंमत मिळत असून रोमन राजे त्यांची ईजिप्तमार्गे यूरोपात आयात करीत असत. या कासवांच्या कवचांचा उपयोग जडावाच्या कामाकरिता, सौंदर्यप्रसाधने तसेच आरशांच्या आणि चष्म्यांच्या चौकटी, चाकू-सुऱ्यांच्या मुठी किंवा लहानसहान दागिने करण्याकरिता होतो. इतर काही जातींच्या कासवांचीही कवचे यासाठी वापरात आहेत पण ती यापेक्षा निकृष्ट दर्जाची समजली जातात. हॉक्सबील कासवांचे मांस खाण्याकरिता विशेष पसंत केले जात नाही.

लॉगरहेड टर्टल (कॅरेटा कॅरेटा किंवा थॅलॅसोचेलीस कॅरेटा) ही कीलोनिडी कुलातील कासवे सर्वत्र आढळतात. हिरव्या कासवांप्रमाणे हीही समुद्रात राहणारी मोठ्या आकारमानाची कासवे आहेत. यांची कमाल लांबी जरी ज्ञात नसली, तरी ४०० किग्रॅ. वजनाची या जातीची कासवे आढळली आहेत. साधारणपणे यांची लांबी १ मी. व वजन १५० किग्रॅ. इतके असते. हे कासव मांसाहारी आहे. यांची कवचे अपारदर्शक असतात व त्यांची किंमत कमी असते. यांची अंडी खाण्यास रूचकर असतात. वाळूत खड्डा खणून त्यात मादी एका वेळी जवळ जवळ १६० पर्यंत अंडी घालते. सूऱ्यांच्या उष्णतेने अंडी उबवली जातात व दोन महिन्यानंतर अंड्यातून पिले बाहेर येतात. जरी सर्व समुद्रकिनाऱ्यांवरील मच्छीमार लोक या कासवांचे मांस खात असले, तरी त्यांना व्यापारी दृष्ट्या फारसे महत्त्व नाही.

भारताच्या समुद्रकिनारपट्टीवर कासवे आढळत असली, तरी त्यांची नियमित अशी मासेमारी फार थोड्या प्रमाणावर होते. दक्षिण भारतात काही ठिकाणी ती पद्धतशीरपणे केली जाते. १९७५ पासून शासनाने कासवांच्या निऱ्यांतीवर बंदी घातली आहे, कारण त्यांची संख्या घटत आहे आणि जर निऱ्यांत अशीच चालू राहिली, तर त्यांचा विनाश होण्याचा संभव आहे. हा कायदा अंमलात येण्यापूर्वी सु. ४०,००० रूपयांहून अधिक किंमतीची हिरवी कासवे दर वर्षी जिवंत स्थितीत रामेश्वरहून श्रीलंकेला निऱ्यांत केली जात असत. त्याचप्रमाणे ६० टनांहून अधिक वजनाची कासवांची कवचे भारतातून हॉलंड, जर्मनी, इंग्लंड आणि सिंगापूर येथे निर्यात केली जात असत. १९६७ साली कासवांची कवचे २५ पैसे किग्रॅ. या भावाने विकली जात असत, तीच १९६९ साली २० रू. किग्रॅ. व १९७५ साली १८५ रू. प्रती किग्रॅ. या दराने विकली जाऊ लागली.

कासवांची संख्या घटत चालल्यामुळे व व्यापाराकरिता जास्त कासवे उपलब्ध करून देण्याकरिता १९७२ साली अमेरिकेतील एका संस्थेने त्यांचे संवर्धन किंवा ‘शेती’ करण्याचे सुरू केले. या संस्थेने समुद्रकिनाऱ्यांवरून कासवांची अंडी गोळा करून त्यांतून ६०,००० कासवे कृत्रिम रीत्या वाढविली. तीन वर्षात या कासवांचे वजन ५० किग्रॅ. झाले. एका कासवापासून २५ किग्रॅ. मांस, ३.५ किग्रॅ. कॅलीपी, ५.५ किग्रॅ. तेल, ८ किग्रॅ. कवच आणि १ किग्रॅ. कातडे इतके पदार्थ मिळतात. फक्त ७ किग्रॅ. वजनाचा भाग निरूपयोगी असतो. मद्रासजवळही कासवांच्या संवर्धनाचा उपक्रम सुरू झाला आहे. १९७७ मध्ये ५,००० हून अधिक अंडी उबवली गेली व त्यांमधून बाहेर आलेली छोटी पिले पुन्हा समुद्रात सोडण्यात आली.

महाराष्ट्रात कासवांच्या उपलब्धतेसंबंधी निश्चित माहिती नाही. मुंबई चौपाटीच्या समुद्रकिनाऱ्यांवर कासवांची अंडी अनेकदा आढळतात. तसेच कोळ्यांच्या जाळ्यामध्येही अनेक वेळा कासवे अडकून येतात. विहिरीतील गोडे पाणी स्वच्छ रहावे म्हणून त्यात कासवे सोडण्याचा प्रघात आहे. कोकणातील शेतकरी पावसाळ्यात काही वेळा शेतात आढळणारी कासवे खाण्यासाठी वापरतात. महाराष्ट्रात व भारतात इतरत्र कासव संवर्धनास पुष्कळच वाव आहे. [→ कासव ].

छापगर, ब. फ.; इनामदार, ना. भा.

देवमासे : यांचे बाह्यस्वरूप जरी माशासारखे असले, तरी ते मत्स्य वर्गात मोडत नाहीत. हे सस्तन प्राणी असून जलचर आहेत. देवमासे महासागरांत व समुद्रांत राहतात, काही किनाऱ्यांजवळ तर अगदी काही थोडे गोड्या पाण्यात राहतात. सगळ्या देवमाशांचा समावेश सिटॅसिया गणात होतो. सर्व नामशेष झालेले देवमासे आर्किओसीटाय या उपगणात मोडतात. सध्या जिवंत असलेल्या देवमाशांचा समावेश मिस्टिसीटाय व ओडॉंटोसीटाय या दोन उपगणांत होतो. मिस्टिसीटाय उपगणातील देवमाशास दात नसतात. याऐवजी ३००-४०० तिकोनी शृंगी पट्ट (केगटिनयुक्त तकटे) असून ते तालूच्या प्रत्येक बाजूस जोडलेले असतात. या रचनेस ‘बलीन’ असे म्हणतात. याचा उदरनिर्वाह प्लवकांवर होतो. या उपगणातील बहुतेक देवमासे आकारमानाने मोठे व थंड समुद्रात राहणारे आहेत. ब्ल्यू व्हेल (निळा देवमासा), फिनबॅक व्हेल, राइट व्हेल, हंपबॅक (कुबड असलेला) व्हेल, ग्रे (करडा) व्हेल इ. देवमासे या उपगणातील होत.

ओडॉंटोसीटाय ह्या उपगणातील देवमाशांना दात असतात व यामुळे मासे, स्क्किड वगैरे मोठे प्राणी यांना खाता येतात. हे उष्ण समुद्रात राहतात. स्पर्म व्हेल (वसा तिमी) किंवा ⇨ कॅशलॉट ही देवमाशांची मोठी जात या उपगणात मोडते. याशिवाय किलर व्हेल, नारव्हेल, पायलट व्हेल वगैरे देवमासेही या उपगणात आहेत.

सिटॅसिया गणातील देवमासे आकारमानाने १.५ मी. पासून ३० मी. पर्यंत लांब असतात. पूर्ण वाढ झालेल्या देवमाशाचे वजनही ५० किग्रॅ. पासून १,७०० किग्रॅ. पर्यंत असू शकते. निळा देवमासा सर्वांत मोठा व जास्त वजनाचा असून तो पूर्ण वाढ झालेल्या हत्तीपेक्षाही मोठा असतो. नामशेष झालेल्या डायनोसॉर या सरीसृप प्राण्यापेक्षाही हा निळा देवमासा मोठा असतो. हे नियततापी (परिसराच्या तापमानात बदल होत असला, तरी शरीराचे तापमान एका ठराविक पातळीवर स्थिर असणारे) प्राणी असून वायुश्वासी (श्वसनासाठी हवेचा सरळ उपयोग करणारे) आहेत. इतर सस्तन प्राण्यांच्या कातड्यावर केस असतात तसे केस देवमाशाच्या अंगावर नसतात. त्याच्या कातड्याखाली चरबीचा एक जाड थर (ब्लबर) असतो. यामुळे शरीरातील उष्णता बाहेर न जाता तापमान कायम (साधारणपणे ३३ से.) राहण्यास मदत होते.

प्राचीन काळापासून देवमाशाची शिकार करण्यात येत आहे. ही शिकार धोक्याची, महाकठीण व अतिशय धाडसाची असते. या शिकारीच्या पद्धतीतही वेळोवेळी बदल होत गेले आहेत. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी स्पेनमधील बास्क लोकांना भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यांवर मेलेला देवमासा सापडला. त्याच्या ब्लबरपासून त्यांना खूप तेल मिळाले व त्याचा त्यांनी चर्चमधील वातीच्या दिव्यासाठी उपयोग केला. प्रथम ही शिकार बिस्केच्या उपसागरात होत असे. पुढे तेथे देवमासे मिळेनासे झाल्यावर मुख्य सागरात त्यांचा शोध सुरू झाला. स्पेनच्या जहाजांखेरीज हॉलंड, जर्मनी, इंग्लंड, डेन्मार्क, नॉर्वे, अमेरिका व जपान या देशांची जहाजेही देवमाशांच्या शिकारीकरिता समुद्रावर आणि महासागरात जाऊ लागली. बरीच वर्षे राइट व्हेल व बोहेड व्हेल ह्या दोन जातींच्या देवमाशांची शिकार प्रामुख्याने होत असे. अठराव्या शतकात अमेरिकन शिकाऱ्यांनी प्रथमच स्पर्म व्हेल या देवमाशाची शिकार केली. हा देवमासा २० ते २५ मी. लांब असून याच्या तोंडात सुळ्यासारखे दात होते.

देवमाशाची शिकार करण्याकरिता सुरूवातीस ज्या नावा किंवा होड्या वापरल्या जात त्या लहान होत्या. अशा लहान होड्यांतून जाऊन देवमाशासारख्या मोठ्या प्राण्याची शिकार करणे फार धाडसाचे होते. शिकाऱ्यांना कित्येक वेळा बरेच महिने किंवा एक-दोन वर्षे अज्ञात समुद्रावर हिंडावे लागे. कधीकधी त्यांचा जगाशी संबंधही तुटत असे. पुढे या कामासाठी मोठी जहाजे वापरण्यात येऊ लागली. या मोठ्या जहाजांवर लहान होड्या असत. देवमासा श्वसनासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर आल्याचे दिसले की, लहान होड्या समुद्रात सोडून वल्हवत त्या दिशेने न्यावयाच्या, केवळ अंदाजाने त्याचा पाठलाग करावयाचा व जेव्हा देवमासा होडीजवळ आला आहे असे दिसेल तेव्हा त्याच्या प्रचंड शरीरावर हार्पून (कावर) फेकावयाचा, असे या शिकारीचे तंत्र असे; पण काही वेळा देवमासा होडीच्या खाली येऊन शेपटीच्या प्रचंड फटक्याने होडीचा चक्काचूर करीत असे व सर्व शिकारी पाण्यात फेकले जात. हार्पूनमुळे देवमाशास प्राणघातक अशी जखम क्वचितच होते. हार्पूनला जोडलेल्या दोराचे दुसरे टोक होडीला बांधलेले असते. यामुळे शिकाऱ्यांना देवमाशावर पकड मिळाली, तरी तो कित्येक किलोमीटर पोहत होडी ओढून नेत असे. काही वेळा देवमासा पाण्यात दोराच्या लांबीपेक्षाही जास्त खोल जाऊ लागला, तर होडी बुडण्याची शक्यता निर्माण होत असे. अशा परिस्थितीत हार्पूनमुळे देवमाशावर जरी पकड मिळविता आली असली, तरी दोर कापून टाकून त्याला मोकळे सोडणे व होडी वाचविणे याशिवाय दुसरा मार्ग नसे. अठराव्या शतकात ही शिकार सर्वांत जास्त साहसी शिकार म्हणून समजली जात असे.

जर शिकार हाती लागली, तर लहान होडीत बसून शिकारी देवमाशास ओढून जहाजाच्या बाजूस आणीत व त्यास साखळदंडाने बांधून ठेवीत. या स्थितीत ब्लबरमधून चरबी व तेल काढून घेऊन उरलेले शरीर समुद्रात फेकून द्यावयाचे असा अमेरिकन शिकाऱ्यांचा प्रघात होता.

प्राचीन काळी जपानमध्ये देवमासा पकडण्यासाठी जाळे वापरीत असत. मासा जाळ्यात सापडल्यावर त्याला भाला, तलवार यांसारखी अस्त्रे वापरून ठार मारीत असत. ही पद्धत अतिशय धोक्याची होती. १८७० पासून मात्र जपान्यांनी नॉर्वेजियन हार्पून पद्धतीचा स्वीकार केला. ब्लबरचे तुकडे करून भांड्यात टाकून विस्तवावर गरम केले की, उष्णतेमुळे तेल मिळत असे व ते जहाजावरील पिंपांत साठवून ठेवण्यात येत असे. कित्येक धाडसी शिकाऱ्यांनी या उद्योगावर बरीच संपत्ती मिळविली.

स्वेन्ड फॉइन यांनी १८६४ साली हार्पून तोफेचा शोध लावला व यानंतर हार्पून तोफ लावलेल्या आगबोटी समुद्रावर संचार करू लागल्या. ह्या तोफेच्या साहाय्याने सु. ४५ किग्रॅ. वजनाचा व १.२ मी. लांबीचा हार्पून देवमाशाच्या शरीरात मारतात. हार्पूनच्या शेपटीच्या टोकास ७० ते ११० मी. लांब दोराचे एक टोक बांधतात व दुसरे टोक आगबोटीस बांधतात. काही जातींच्या हार्पूनच्या डोक्यावर एक कुलपी गोळा असून तो हार्पून उडवल्यावर २ ते ३ सेकंदात फुटतो व त्यातून लोखंडाचे तुकडे सर्वत्र उडतात. यामुळे देवमासा घायाळ होतो व मरतो. हार्पूनच्या पुढील टोकापासून काही अंतरावर चार किंवा जास्त दाते असतात. तोफेतून हार्पून उडतांना यांचीघडी झालेली असते पण हार्पून देवमाशाच्या शरीरात घुसल्यावर व त्यास बांधलेला दोर सरळ ताठ होताच हे दाते उकलतात व देवमासा हार्पूनला अडकतो.

आधुनिक पद्धतीत देवमाशाच्या शिकारीत हार्पून तोफेशिवाय मोटारबोट, विजेच्या धक्क्याने मारणे, विमाने, हेलिकॉप्टर, दुर्बिण याही साधनांचा उपयोग केला जातो. देवमासा मारल्यावर त्याच्या शरीरात हवा भरून त्याला फुगवितात व आपली मालकी दर्शविणारे निशाण त्याच्या शरीरात खोचून त्याला पाण्यावर तरंगत राहू देतात. याप्रमाणे बरेचसे देवमासे मारल्यावर मोटारबोटीच्या साहाय्याने त्यांना किनाऱ्यांवर ओढत आणले जाते व तेथून कारखान्यात नेऊन त्यांचे तेल, मांस व हाडे वेगळी केली जातात. जपान, नॉर्वे व इतर काही देशांत, जेथे गोमांस पुरेसे मिळत नाही, तेथे देवमाशाचे ताजे मांस खाद्य म्हणून वापरले जाते. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका व कॅनडा या देशांतही ह्या मांसाचा अन्न म्हणून उपयोग केला गेला. अजमासे २० किग्रॅ. वजनाचे मांसाचे तुकडे बर्फात गोठवून व डब्यात भरून बाजारात पाठविले जातात. हवाबंद डब्यांतूनही हे मांस विकले जाते. हंपबॅक व्हेल, से व्हेल व कॅलिफोर्नियन ग्रे व्हेल यांचे मांस उत्कृष्ट असते. एका हंपबॅक व्हेलपासून अजमासे दहा टन मांस मिळते. देवमाशाच्या शरीराचा कोणताही भाग वाया जात नाही.

देवमाशाच्या उपयुक्तततेमुळे या व्यवसायात खूपच भांडवल गुंतलेले आहे व बऱ्यांच लोकांना रोजगार मिळालेला आहे, तरीदेखील शक्तिशाली साधनांनी देवमाशांचा संहार करणे योग्य नाही कारण त्यांचे प्रजनन फार कमी आहे व योग्य वेळीच या शिकारीवर निर्बंध घातले नाहीत, तर त्यांचा विनाश होण्याची भीती निर्माण झाली आहे. [→ देवमासा]

मुठे, प्र. त्र्यं.

माशांचे उपयोग, परिरक्षण व त्यांपासून मिळणारे विविध पदार्थ

मासळीचा उपयोग मानवासाठी, पाळीव जनावरांसाठी व शेतीसाठी होतो. हा उपयोग अन्न म्हणून, खत म्हणून किंवा माशापासून काढलेली तेले व इतर द्रव्ये या स्वरूपांत होतो. मासळीची उपयुक्तता तिच्या जातीवर, आकारमानावर व ताजेपणावर मुख्यतः अवलंबून असते. काही मासे आकारमानाने फार लहान असल्यामुळे खाण्यास अवघड असतात, तसेच काहींच्या काटेसदृश अस्थी नीट काढता येत नाहीत व त्यामुळे खाण्यास अवघड वाटतात. असे मासे त्यांचे काटे, आतडी वगैरेंचे मत्स्यपीठ करतात व ते कोंबड्यांना किंवा गाईम्हशींना त्यांच्या खाद्यात पूरक पौष्टिक अन्न म्हणून देतात. जे मासे खराब झाल्यामुळे मानवी खाद्य किंवा पशुखाद्य म्हणून वापरता येत नाहीत त्यांचा शेतीला व विशेषतः फळबागांना खत म्हणून उपयोग होतो. काही माशांपासून पौष्टिक तेले काढतात, तर काहींपासून औषधी पदार्थही मिळतात.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या आकडेवारीप्रमाणे १९७४-७८ या काळातील विविध उपयोगांनुसार जगातील एकंदर मत्स्योत्पादन कोष्टक क्र. १६ मध्ये दिले आहे.

कोष्टक क्र. १६. विविध उपयोगांनुसार जगातील एकंदर मत्स्योत्पादन

                     उपयोग १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८
(अ) मानवासाठी खाद्य म्हणून ४८,३०७ ४८,२०१ ५०,०५२ ५१,४८८ ५१,३७८
    (१) ताजी मासळी १९,११७ १८,७५४ १९,०२७ २१,२९२ २०,३१३
    (२) गोठवलेली मासळी १२,००२ ११,२०८ १३,४८० १२,९७१ १३,२३७
    (३) सुकी, खारविलेली ७,९४८ ८,०६७ ८,१४६ ७,७०६ ८,१०८
    (४) हवाबंद डब्यांतील ९,२४० ९,२४० ९,४०० ९,५२० ९,७२०
(आ) इतरांसाठी २०,५८८ २०,३३५ २२,०६१ १९,७२५ २१,०००
    (१) जनावरांसाठी पीठ वगैरे १९,५८८ १९,३३५ २१,०६१ १८,७२५ २०,०००
    (२) तेल व इतर प्रकार १,००० १,००० १,००० १,००० १,०००
(इ) मासळीचे एकंदर जागतिक उत्पन्न ६८,८९५ ६८,५४४ ७२,११३ ७१,२१३ ७२,३७८

माणसासाठी अन्न म्हणून ज्या माशांचा वापर केला जातो ते मासे ताज्या स्थितीतच नव्हे, तर इतर अन्न प्रकारांतही बाजारात पाठविले जातात. जपानमध्ये २००-३०० प्रकारांनी प्रक्रिया केलेली मासळी बाजारात उपलब्ध असते. मासळी गोठविताना काही प्रकारात माशांचे कातडे किंवा खवले पूर्णपणे काढून टाकण्यात येतात, काहींत पोट व अन्ननलिका काढून टाकण्यात येते. काही मासे प्रथम शिजवून मग गोठविले जातात. गोठविण्याच्या प्रकारात जशी विविधता आढळते, तशीच मासे खारविण्याच्या प्रकारांतही आढळते. आधुनिक काळात मासे टिकविण्याची नवी तंत्रे व जलद वाहतुकीची साधने उपलब्ध झाल्यामुळे पूर्वीचा मासे खारवून ते सुकवून ठेवण्याचा प्रकार बराच कमी झाला आहे. याऐवजी मासे गोठविणे व हवाबंद डब्यात भरणे हा प्रकार जास्त वापरात येऊ लागला आहे. तरीही १९७८ च्या आकडेवारीवरून असे दिसते की, एकंदर सु. ३१,९०,००० टन मासळी खारवून सुकविली जाते. त्यात कॉड मासे २४,००० टन, हेरिंग १,३१,००० टन व सार्डीन २,८६,००० टन इतके आहेत. भारतात अलीकडील काळात सुक्या मासळीचे उत्पादन फक्त ४,४०,००० टन होते. भारतात खारवून सुकविलेल्या मासळीपेक्षा नुसत्या उन्हात सुकविलेल्या मासळीचे प्रमाण जास्त असते. सर्व जगात मिळून खारविलेल्या मासळीचे प्रमाण कमी होत असले, तरी जनावरांसाठी (कुक्कटपालन आणि दुग्धव्यवसाय) या प्रथिनयुक्त खाद्याची मागणी सतत वाढत आहे; पण पुरेसा साठा उपलब्ध नाही.

भारतातील मासळीच्या वापराची टक्केवारी १९७७-७८ साली साधारणपणे कोष्टक क्र. १७ मध्ये दिल्याप्रमाणे होती. त्यात थोडाफार फरक झाला, तरी सर्वसाधारण प्रमाण तेच राहिले आहे. भारतात अन्नाखेरीजच्या उपयोगांकरिता फारच थोड्या प्रमाणात माशांचा वापर केला जातो.

कोष्टक क्र. १७. भारतातील मासळीच्या वापराची टक्केवारी (१९७७-७८)

             वापर टक्केवारी
ताज्या स्वरूपात ७०
उन्हात सुकवून १२
मिठात खारवून
गोठवून किंवा हवाबंद डब्यात
मासळीचे पीठ, खत इ. स्वरूपांत
मासळीचे तेल वगैरे

खाद्य म्हणून कोणती मासळी वापरायची हे प्रत्येकाच्या आवडीबरोबरच त्याच्या आर्थिक परिस्थितीवरही अवलंबून असते. यामुळे खेडोपाडी किंवा किनाऱ्यांपासून दूरवर असलेल्या भागात सुक्या मासळीचा उपयोग जास्त प्रमाणात होतो.

कुलकर्णी, चं. वि.

परिरक्षण : मासे हे मानवाचे महत्त्वाचे अन्न आहे. त्यांत प्रथिने विपूल प्रमाणात असतात. पाण्यातून बाहेर काढल्यावर योग्य काळजी न घेतल्यास थोड्याच अवधीत मासे खराब होतात. पाण्यातून काढल्याबरोबर जर ते बर्फात गोठवले किंवा प्रशीतन करून साठवून ठेवले, तर ते बराच काळ टिकतात व अन्न म्हणून वापरता येतात. यांशिवाय मासे साठविण्याचे इतरही प्रकार आहेत व त्यांपैकी काही खाली दिले आहेत. या प्रकारांचा अंतर्भांव परिरक्षण प्रक्रियेत होतो.

 मासे वाळविणे : माशातील जलांश काढून टाकला, तर सूक्ष्मजीव किंवा एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणारी प्रथिने) यांचा माशांच्या मांसावर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. पाण्यातून मासे बाहेर काढल्यावर ते उन्हात वाळविण्याची पद्धत भारतात पुष्कळ ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रचलित आहे. सागरी मासेमारीत पकडलेल्या माशांपैकी ३५% मासे उन्हात वाळविले जातात. काही वेळा जमिनीवर पसरून, तर काही वेळा बांबूस बांधून हे मासे वाळविले जातात. बोंबील हा मासा अशा रीतीने विक्रीकरिता तयार केला जातो, हे सुपरिचित आहे. मासा मोठा असेल, तर त्याचे तुकडे करून व त्यावर मीठ घालून मग तो सुकविला जातो. या प्रक्रियेत जर मासा खराब झाला, तर खत म्हणून याचा उपयोग करतात. काही ठिकाणी ही प्रक्रिया यंत्राच्या साहाय्याने केली जाते.

खारवणे : या प्रक्रियेत मिठाचा उपयोग करतात. मिठामुळे जंतूंची वाढ व एंझाइमांची क्रिया थांबते. सुके खारवणे व ओले खारवणे असे खारवण्याचे दोन प्रकार आहेत. सुक्या खारवण्याच्या पद्धतीत माशांचा थर करून त्यावर कोरडे मीठ पसरले जाते. मीठ व मासे यांचे प्रमाण १:३ ते १:८ इतके विविध आढळते. ओल्या खारवण्याच्या पद्धतीत मासे स्वच्छ धुवून मिठाच्या संहत (मिठाचे प्रमाण जास्त असलेल्या) विद्रावात टाकतात. हा विद्राव कुंडात ठेवलेला असतो. टाकलेले मासे चांगले मुरेपर्यंत दररोज ढवळले जातात. मिठाचे संघटन, खारवण्याची पद्धती, तापमान इत्यादींवर, खारवलेल्या माशांचा दर्जा अवलंबून असतो. शुद्ध मिठात खारवलेले मासे फिक्कट पिवळ्या रंगाचे असतात व ताज्या माशाप्रमाणे शिजविता येतात; पण मिठामध्ये जरी अगदी अल्प प्रमाणात कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम असले, तर माशांचे मांस पांढरे व कडक होते व कडवट लागते. सार्डीन, मॅकेरेल, सीयरफिश, मार्जारमीन, मुशी हे मासे, तसेच कोळंबी खारवण्यास योग्य समजली जातात.

धुरावणे : (धूर देणे, धुरी देणे). धुरात असलेल्या फिनॉलिक घटकांमुळे तो सौम्य प्रमाणात पूतिरोधक (रोगकारक सूक्ष्मजीवांचा नाश करणारा वा त्यांची वाढ रोखणारा) असतो. तसेच त्यातील उष्णतेमुळे माशांच्या शरीरातील जलांशही काढून टाकला जातो. या दोन्ही क्रिया माशांच्या परिरक्षणास साहाय्यकारक आहेत. धुरावर मासे टांगल्यावर त्यांना विशिष्ट धुरकट असा वास लागतो व त्यांना आकर्षक स्वरूपही प्राप्त होते. धुरावण्याची प्रक्रिया उष्ण व थंड अशी दोन प्रकारे आणि जरूरीप्रमाणे कमीअधिक प्रमाणात करता येते. उष्ण प्रकारात जळण ठेवलेला एक खड्डा तयार करून त्यावर वरून व खालून उघडे असलेले पिंप ठेवले जाते आणि त्यातून बाहेर पडणाऱ्यां धुरात मासे दांड्यांवर अडकविले जातात. थंड प्रकारात जळणाचा खड्डा लांब ठेवून एका नळीने धूर पिंपात सोडला जातो. ही प्रक्रीया यंत्रसामग्री वापरून मोठ्या प्रमाणावरही करता येते. भारतात धुरावलेले मासे फारसे लोकप्रिय नाहीत. ओरिसा व तमिळनाडू या राज्यांच्या काही भागांत ही प्रक्रिया प्रचलित आहे. धुरावलेले सार्डीन, मॅकेरेल, पापलेट, फीत मासे व विशेषतः पाला हे मासे उत्कृष्ट दर्जाचे समजले जातात.

डब्यात भरणे : या प्रकारात माशांचे बारीक तुकडे करून ते खारविले जातात व डब्यात भरण्यापूर्वी सु. दोन तास खाऱ्या पाण्यात शिजविले जातात. शिजविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भांड्यास आतून कागदाचे अस्तर लावलेले असते. यामुळे माशांचा भांड्याच्या धातूशी संपर्क येत नाही. शिजताना माशातून बाहेर पडणारे बाष्प शोषून घेण्याची व्यवस्था असते. यामुळे शिजवलेले मासे कोरडे होऊन मग डब्यात भरले जातात. डब्यातील हवा काढून त्यावर डब्याचे झाकण डाख देवून पक्के बसविण्यात येते. हवाबंद डब्यातील माशात त्याचा मूळ स्वाद पुष्कळच अधिक प्रमाणात टिकून रहातो. सार्डीन व मॅकेरेल हे मासे या प्रकारात जास्त प्रमाणात वापरले जातात. [→ डबाबंदीकरण].

वरील प्रकारांखेरीज भारतात मसाले वापरून, लोणची वगैरे स्वरूपातही मासे साठविले जातात. माशांच्या परिरक्षणात काही रसायनांचाही उपयोग केला जातो. वरील कोणत्याही प्रकाराने माशांचे परिरक्षण केले, तरी ते अन्न म्हणून वापरण्यास काही बाध येत नाही. माशाचा (व त्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा) ताजेपणा व तो खाण्यास योग्य आहे किंवा नाही हे प्रामुख्याने त्याच्या वासावरून व दृश्य स्वरूपावरून आणि याला पूरक म्हणून त्याच्या स्पर्शावरून व चवीवरून ठरविण्याची पद्धत सर्वांत जुनी असून अजूनही ती मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते. माशांपासून तयार केलेल्या पदार्थांची रासायनिक व जीववैज्ञानिक परीक्षा केल्यानंतरच ते वापरण्यास योग्य आहेत की नाहीत, हे ठरविले जाते.

माशापासून मिळणारे महत्त्वाचे पदार्थ : तेल : माशापासून मिळणारी तेले औषधी व औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त आहेत. सबंध माशापासून काढलेल्या तेलास ‘काया तेल’ असे संबोधिता येईल. हे तेल माशाच्या जातीनुसार निरनिराळ्या रंगांचे असू शकते. साध्या रंगहीन प्रकारापासून सोनेरी, पिवळसर हिरवट किंवा तांबडे हे प्रकार आढळतात. माशांच्या तेलाचे घटक इतर प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या तेलापेक्षा भिन्न आहेत. सार्डीन, हेरिंग व सामन या माशांपासून मिळविण्यात येणारी काया तेले व्यापारी दृष्ट्या विशेष महत्त्वाची आहेत. काही माशांच्या यकृतापासून मिळणारे तेल अत्यंत उपयुक्त आहे. कॉड व मुशी मासे यांच्या यकृतात भरपूर प्रमाणात तेल मिळते. या तेलात अ जीवनसत्त्वाचा नैसर्गिक रीत्या भरपूर साठा आढळतो. काही माशांच्या यकृतातून काढलेल्या तेलात ड हे जीवनसत्त्वही आढळते. काही माशांपासून मिळणाऱ्यां यकृतातील तेलात तेलाचे प्रमाण जास्त तर अ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी, काहींत तेलाचे प्रमाण कमी तर अ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त, तर काहींत तेल व अ जीवनसत्त्व हे दोन्ही घटक विपुल प्रमाणात आढळतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा ‘कॉडलिव्हर ऑईल’ भारतात मिळेनासे झाले तेव्हा शार्कलिव्हर ऑईल काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. प्रथम १९४० मध्ये कोझिकोडे येथे, नंतर मुंबई, बडोदे, त्रावणकोर व इतर ठिकाणीही शार्कलिव्हर ऑईल काढण्याचे कारखाने सुरू झाले.

सबंध माशाच्या शरीरापासून काढलेल्या तेलास (काया तेलास) अनिष्ट वास येतो. शुद्धीकरण प्रक्रियेत हा वास काढून टाकता येतो. या तेलाचे शुद्धीकरण करून व वास काढल्यावर ते खाद्य तेल म्हणून वापरता येते. या तेलाचे पचन सुलभपणे होते. या तेलाचा उपयोग मार्गारीन, धुण्याचा साबण व स्वस्त प्रकारच्या प्रसाधनांत वापरण्यात येणारा साबण तयार करण्याकरिताही होतो. कातड्याच्या उद्योगधंद्यातही हे तेल वापरले जाते; तसेच रंग, व्हार्निश व तत्सम पदार्थ तयार करण्यातही याचा उपयोग होतो.

मत्स्यचूर्ण : डब्यात भरण्याकरिता माशांचे परिरक्षण करताना किंवा त्यांचे तेल काढून घेतल्यावर शिल्लक राहिलेले किंवा जास्त मोठे मासे उपलब्ध असल्यास ते वाळवून त्यांचे चूर्ण केले जाते. वाळविण्याच्या अनेक तर्‍हा आहेत. यात प्रथिनांचे प्रमाण पुष्कळ असते म्हणून जनावरांच्या आहारात हे मत्स्यचूर्ण मिसळले जाते. हलक्या प्रतीचे मत्स्यचूर्ण खत म्हणून वापरतात. नवीन तंत्रज्ञान वापरून चांगल्या प्रतीच्या माशांपासून मनुष्याच्या आहारात वापरता येईल असे मत्स्यपीठ तयार केले जाते. मनुष्याच्या आहारात या मत्स्यपीठाचा वापर केल्याने प्रथिनांचा भरपूर पुरवठा होतो.

माशांचा लगदा : बारिक तुकडे केलेल्या माशांच्या लगद्यावर सल्फ्यूरिक अम्ल व फॉर्मिक अम्ल यांच्या मिश्रणाची अथवा सल्फ्यूरिक अम्ल व मोलॅसिस (उसाच्या रसातील ज्या भागापासून साध्या प्रक्रियांनी साखरेचे स्फटिक करता येत नाहीत असा भाग) यांच्या मिश्रणाची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे अनिष्ट वास जातो व लगद्यातील जीवनसत्त्वे मत्स्यचूर्णापेक्षा अधिक प्रमाणात तशीच राहतात. हा पदार्थ जनावरांना खाण्यास दिला जातो.

इतर पदार्थ : मुशी माशाच्या शेपटीच्या पक्षाखेरीज (पराखेरीज) इतर पक्षांचे सार फार चांगले होते. चीन व फिलिपीन्स या देशांत हा फार चविष्ट पदार्थ समजला जातो. सार करण्यापूर्वी हे पक्ष मुळापासून कापून काढून स्वच्छ धुतात व त्यांवर लाकडाची राख व चुन्याची भुकटी टाकून ते उन्हात वाळवितात व नंतर त्यांना धूर दिला जातो. यामुळे ते खुसखुशीत व ठिसूळ होतात.

काही माशांच्या अंड्यांनाही खाद्यपदार्थ क्षेत्रात फार महत्त्व आहे. यांचे पदार्थ चविष्ट लागतात. यांत प्रथिनांचे बरेच घटक, तसेच ब, क, ड, ई ही जीवनसत्त्वेही भरपूर प्रमाणात असतात. ही अंडी पुष्कळशा खाद्यपदार्थांत वापरली जातात.

माशांची चरबी किंवा तेले काढल्यानंतर त्यांच्या उरलेल्या भागापासून प्रथिने विलग करण्यात येतात. या प्रथिनांचा उपयोग खाद्यात किंवा औषधी व औद्योगिक क्षेत्रांत करता येतो. भारतीय मुशी व रे हे या दृष्टीने उपयुक्त मासे होत.

खाद्य म्हणून ज्यांचा उपयोग होऊ शकत नाही पण इतर कामात जे वापरता येतात असेही काही पदार्थ माशांपासून मिळतात.

माशांची कातडी, कापून उरलेले तुकडे व हाडे यांपासून मत्स्यसरस तयार करतात. सरस काढून घेतल्यावर राहिलेले अवशेष खत म्हणून वापरतात. माशांच्या वाताशयापासून (हवेच्या पिशव्यांपासून) ‘आयसिंग्लास’ हा पदार्थ तयार करतात. याचा उपयोग मुख्यतः वाइन, बिअर, शिर्का (व्हिनेगार) इत्यादींच्या निर्मलीकरणात (स्वच्छ करण्यासाठी) होतो. मोठ्या माशांची कातडी कमावून त्यांच्या अलंकारिक वस्तू बनवितात.

आयरन, जे. डब्ल्यू. (इं.); जमदाडे, ज. वि. (म.)

वाहतूक, विक्री व आंतरराष्ट्रीय व्यापार

भारतातील वार्षिक मत्स्योत्पादन सरासरी २० लाख टन आहे. यांपैकी एक तृतीयांश उत्पन्न गोड्या पाण्यातील मासळीचे आहे. गोड्या पाण्यातील मासळी तलाव, नद्या इ. विखुरलेल्या जलाशयांतून मिळते. यामुळे या केंद्रांतून मिळणाऱ्या मासळीस ग्राहक नजीकच्या क्षेत्रातीलच असतात. मासेमारीचे दिवस या ग्राहकांच्या मागणीवर ठरविले जातात किंवा बदलले जातात. या सर्व परिस्थितीमुळे गोड्या पाण्यातील मासळीचे एकूण उत्पादन सागरी मासळीपेक्षा बरेच कमी असते; पण या मासळीला मिळणारी एकूण किंमत अंदाजे सागरी मासळीला मिळणाऱ्या किंमतीइतकी असते. सागरी मासळी ठराविक केंद्रांवरच उतरली जाते. काही जाती कमी प्रतीच्या असल्यामुळे त्यांना कमी किंमत येते. मासळी नाशवंत असल्याने आणि शिवाय वाहतुकीच्या अडचणी, मासळी मिळण्याची हंगामी विपुलता इ. कारणांमुळे एकूण उत्पादनाच्या ६५% उत्पादन असूनही सागरी मासळीला एकूण किंमत मात्र बरीच कमी येते. अलीकडे सागरी उत्पादनातील कोळंबीला परदेशांतून मोठी मागणी असल्याने, तसेच भारतातील अंतर्गत वाहतुकीत बर्फात गोठवून मासळी पाठविता येत असल्याने उत्पादनाच्या आकड्यात वाढ झाली आहे.

पावसाळ्यातील हवामान प्रतिकूल असल्यामुळे या दिवसांत सागरी मत्स्योत्पादन विशेष होत नाही. याउलट हिवाळ्यात भरपूर मत्स्योत्पादन होते. नदीकिनारी राहणारे अनेक मच्छीमार पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात शेतीकामात गुंतलेले असल्यामुळे नद्यांतील गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन या काळात थोडे असते. तलावातील मत्स्योत्पादन मात्र पाण्याची पातळी कमी असताना म्हणजे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर होते. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की, मऱ्यांदित क्षेत्रे व ठराविक हंगाम यांचा मत्स्यपुरवठ्यावर परिणाम होतो व त्याचेच प्रतिबिंब विक्रीच्या दरावर दिसते.

वाहतूक व विक्री : मत्स्योत्पादनात पकडलेले बहुतेक सर्व मासे खाण्याकरिता वापरले जातात. साधारणपणे मासे पकडल्यानंतर ते मिळाले त्याच स्थितीत विक्रीसाठी पाठविले जातात. जर ते विपुल प्रमाणात मिळाले, तर त्यांवर बर्फ टाकून ते काही काळ टिकतील असे गृहीत धरून दूरच्या केंद्रावर विक्रीसाठी पाठविले जातात. या कामी मोटार लॉंचची किंवा मालमोटारींची (ट्रकांची) योजना केली जाते. सामान्यतः गिर्‍हाईकाला ताजा मासा घेणे आवडते. ताज्या माशांच्या विक्रीचे प्रमाण निरनिराळ्या देशांत जरी निरनिराळे असले, तरी सामान्यतः ४०% मासे ताज्या स्थितीत विकले जातात व ६०% माशांवर टिकविण्याची प्रक्रिया होऊन नंतर ते वापरण्यात येतात. भारतात एकूण उत्पादनाच्या ६६% मासे ताज्या स्थितीत विकले जातात. विकसनशील देशांत मासळी टिकविण्यासाठी सुकविणे, खारविणे इ. पद्धतींचा प्रामुख्याने वापर होतो, तर विकसित देशांत मासे बर्फात गोठविणे किंवा हवाबंद डब्यात भरणे या पद्धतींचा वापर होतो. नॉर्वे देशात २०% मासे सुकविले जातात.

ताजे मासे पकडल्यानंतर मागणी असल्यास लगेच नजीकच्या मासळी बाजारात नेले जातात किंवा तेथेच त्यांची लिलावाने विक्री होते. वाहनाची योग्य सोय असल्यास ताजे मासे दूरवरच्या ग्राहक केंद्राकडे पाठविले जातात. ठाण्यात किंवा वसई भागात पकडलेली मासळी बर्फातून मुंबई बाजारात येते. येथे तिचा लिलाव होऊन बर्फ, हमाली, बाजारपेठेचे शुल्क (मार्केट फी), अडत वगैरे खर्च वजा जाता उरलेली रक्कम सहकारी संस्थेद्वारा किंवा खाजगी व्यापाऱ्यांकडून मच्छीमारास मिळते. काही ठिकाणी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी बंदरात माल खरेदी करतात. खर्चासाठी आगाऊ रक्कम देऊन ठराविक भावात माल घेतला जातो. ही प्रथा आता कमी झाली आहे. रत्नागिरीला कोळंबी वगैरे मासळी अगोदर भाव ठरवून विकत घेतली जाते व मग थर्मोकोलच्या पेट्यांत बर्फातून मालमोटारीने मुंबई किंवा इतरत्र तिच्यावर प्रक्रिया करण्याकरिता व हवाबंद डब्यांत भरण्याकरिता पाठविली जाते.

मुंबई बंदरातील ससून गोदी किंवा कसारा बंदर या ठिकाणी आणलेल्या मासळीचा तेथेच लिलाव होतो आणि बंदरातील खर्च, हमाली व अडत वजा जाता राहिलेली रक्कम मच्छीमारास मिळते. मासळी बंदरात आणण्याकरिता होणारा बर्फाचा खर्च, तेल वगैरेंचा खर्च त्याला करावा लागतो. काही ठिकाणी अडतदार हा खर्च उधार म्हणून करतो. ही अडत ससून गोदी येथे ५ ते ६% तर शिवाजी मार्केटमध्ये ७ ते १०% आहे. सहकारी क्षेत्रात मच्छीमारांना ५ ते २० हजार रूपयांपर्यंत आगाऊ रकमा द्याव्या लागतात. ह्या रकमा अपेक्षित मालाच्या किंमतीवर आधारित असतात. महाराष्ट्रात सहकारी क्षेत्रात हा व्यापार बऱ्यांच मोठ्या प्रमाणावर चालतो.

मासळीच्या वाहतुकीसाठी शीतगृहासारख्या सोयी असलेल्या वाहनांचा उपयोग केला जातो. मासे पकडल्यानंतर जेथे लगेच वाहनांची उपलब्धता नसते तेथे शीतगृहे बांधलेली असतात व काही काळ मासळी तेथे ठेवली जाते. पाठविण्याची व्यवस्था होताच थर्मोकोलच्या पेट्यांतून बर्फात मालमोटारीने किंवा रेल्वेने वाहतूक केली जाते. काही भागांत रेल्वेने या वाहतुकीकरिता प्रशीतन वाघिणी उपलब्ध केल्या आहेत.

ताज्या मासळीच्या विक्रीचे प्रमाण माशांच्या जातींवर व मागणीवर अवलंबून असते. सुसंपन्न समाजातील लोक एका विशिष्ट जातीची मागणी करतात. कमी मूल्याची, लहान आकारमानाची मासळी टोपलीच्या भावाने विकली जाते. किरकोळ विक्रीसाठी वाटे लावून विक्री केली जाते. कालवे डझनाच्या भावाने विकली जातात. पापलेट, सुरमई यांसारखी दर्जेदार मासळी कोडीवर (२२ नग) ठोक व्यापारात, तर नगावर किरकोळ व्यापारात विकली जाते. बांगड्यांचा किरकोळ व ठोक भाव अनुक्रमे शेकडा किंवा हजारावर ठरविला जातो. गोड्या पाण्यातील बहुतेक मासळीची विक्री वजनावर ( किलोग्रॅम किंवा टन) होते. मोठ्या प्रमाणावर मिळालेली मासळी साधारणपणे लिलावावर विकली जाते. सेंट्रल फिशरीज कॉर्पोरेशन ही संस्था गोड्या पाण्यातील मासळी विविध केंद्रांतून खरेदी करून तिची विक्री कलकत्त्यात करते. गोड्या पाण्यातील मासळीला व त्यातल्या त्यात कटला, रोहू, मृगळ ह्या जातींना बंगालमध्ये कायम स्वरूपाची व पुष्कळ मागणी आहे. त्यामुळे पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, विदर्भ इ. भागांतून ही मासळी रेल्वेने कलकत्त्यास पाठविली जाते. गंगा व नर्मदा या नद्यांत, विशेषतः पावसाळ्यात, मासळी मोठ्या-प्रमाणावर मिळते व बर्फातून ती कलकत्ता व मुंबई येथे पाठविली जाते. गोड्या पाण्यातील मासळीचे सर्वांत मोठे खरेदी-विक्री केंद्र कलकत्ता येथे आहे, तर सागरी मासळीचे मुंबई येथे आहे.

सागरी मत्स्योत्पादन सर्व किनाऱ्यांवर सारखे नाही. पूर्व किनाऱ्यांपेक्षा पश्चिम किनाऱ्यांवर जास्त मत्स्योत्पादन होते व त्यातही केरळच्या किनारपट्टीवर सर्वांत जास्त उत्पादन होते. किनाऱ्यांवरील निरनिराळ्या पट्ट्यांत निरनिराळ्या जातींचे प्रमाण जास्त आढळते. रत्नागिरीच्या दक्षिणेस बांगडा, हेल, तारली, पेडवे, मुशी व कोळंबी आढळतात, तर उत्तरेकडे बोंबील, मांदेली, जवळा या जाती अधिक प्रमाणात मिळतात. या जातींव्यतिरिक्त अन्य मासळी बहुतांशी ताज्या स्थितीत खाण्यासाठी वापरली जाते. मांदेली, बोंबील, जवळा, वाकटी या जाती विपुल प्रमाणात मिळत असल्यामुळे त्या उन्हाळ्यात सुकविल्या जातात व नंतर त्यांची विक्री होते. बोंबिलाचा दर ४,००० नगांच्या चक्कीवर ठरविला जातो. अन्य सुक्या मासळीचा दर वजनावर अगर पोत्यावर ठरविला जातो. बांगडे, सुरमई, मुशी इ. खारविली जातात. सुक्या व खाऱ्यां मासळीची खरेदी दलालामार्फत उत्पादन केंद्रात होते आणि मालमोटारींनी किंवा अन्य साधनांनी ती देशाच्या इतर भागांत रवाना होते. तेथे किरकोळ विक्री मापावर किंवा वजनावर केली जाते. मुंबईत शिवडी येथे सुक्या मासळीची खरेदी-विक्रीची कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. असाच दुसरा मोठा बाजार अंधेरी येथेही आहे.

कुलकर्णी, चं. वि.; देसाई, श्री. श्री.

आंतरराष्ट्रीय व्यापार : मासळीचा व तिच्यापासून तयार होणाऱ्यां विविध पदार्थाचा आंतरराष्ट्रीय व्यापार बऱ्यांच वर्षापूर्वीपासून चालू आहे. ज्या देशात मासळीचे उत्पन्न कमी आहे व अन्नासाठी मासळीची गरज आहे त्या देशास इतर संपन्न देश मासळी निऱ्यांत करतात. तसेच ज्या देशात मासळीस चांगला भाव मिळतो तेथेही इतर देशांतून मासळीची निऱ्यांत होते. काही देश मासळीपासून निरनिराळे पदार्थ बनवितात व हे पदार्थ परदेशात निऱ्यांत करतात. नॉर्वेमध्ये हेरिंग व कॉड या माशांची मासेमारी फार मोठ्या प्रमाणात होते. पूर्व यूरोपात या माशांना खूप मागणी असल्यामुळे नॉर्वेहून हे मासे तिकडे निऱ्यांत केले जातात. भारत व त्याच्या जवळपासचे इतर देश यांच्यात पूर्वी असा व्यापार चालत असे; पण चांगली दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्यामुळे व माशांच्या परिरक्षणाचे तंत्र तितकेसे विकसित झालेले नसल्यामुळे निऱ्यांतीचे प्रमाण फार थोडे होते. निऱ्यांतीत प्रामुख्याने खारवलेल्या व सुकवलेल्या मासळीचाच समावेश होता. आधुनिक काळात दळणवळणाची साधने व माशांचे परिरक्षण यांत खूपच प्रगती झाली आहे. त्यामुळे सर्व जगभरच मासळीच्या आयात-निऱ्यांतीच्या व्यवहारात खूप वाढ झाली आहे. १९७८ सालची या क्षेत्रातील आकडेवारी विचारात घेतली, तर असे आढळून येईल की, या वर्षात निरनिराळ्या देशांनी मिळून एकूण १२ अब्ज डॉलरांपेक्षा जास्त किंमतीच्या मासळीची आयात केली, तर काही देशांनी मिळून एकूण ११ अब्ज डॉलरांचा माल, आपणास नको असलेला किंवा परदेशी चलन मिळविण्याच्या हेतूने निऱ्यांत केला. प्रत्येक देशाची मासळीची आयात त्या देशातील लोकांच्या खाद्यसवयींवर अवलंबून असते.

कोष्टक क्र. १८. जगातील काही प्रदेशांचा व देशांचा मासळीचा आयात व्यापार

(वजन टनांत व किंमत हजार अमेरिकन डॉलरांमध्ये)

प्रदेश वा देश १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८
आफ्रिका वजन ४,२४,०४९ ४,३८,४८४ ५,०४,१९८ ४,६४,७०१ ५,१५,६४५
किंमत २,२०,९५० २,७६,२८५ ३,४४,४५९ २,९४,५३१ ३,३५,०१६
उत्तर अमेरिका वजन १२,५७,३०० १२,२९,४७१ १३,५०,२८० १२,८४,५९७ १६,६८,४११
किंमत १७,४४,१२५ १६,४३,८८४ २१,८९,५९१ २४,१८,६९१ २५,९०,७२५
अमेरिकेची संयुक्त संस्थाने वजन १०,४२,९०० ९,४३,३०० ११,०६,५०० १०,२७,८६० १०,७३,१४०
किंमत १५,१८,५९९ १३,८१,२७१ १८,९०,८६९ २०,८५,८४५ २२,२५,९४६
दक्षिण अमेरिका वजन १,०४,६२० १,७८,५२४ १,४७,७४० १,३७,७२७ १,४७,२४१
किंमत ९३,६७२ ९६,१४२ ९०,२३६ १,०८,४७९ १,३८,९०७
पेरू वजन ३०० ३०० ३०० ३०० ३००
किंमत ६३४ ५६३ ४१४ ३८१ ३८१
आशिया वजन ११,३०,३०० १३,०१,४६० १४,०३,८८१ १६,३८,८१९ १७,२८,१०३
किंमत १४,२३,२३९ १६,३७,९०७ २२,८४,०६१ २८,८४,५२२ ३७,४८,८५०
जपान वजन ५,८७,५०० ६,४२,५०० ७,२२,३०० ९,४२,६९१ ९,२३,०००
किंमत १०,५०,३०८ १२,१८,०६२ १७,८३,९२६ २२,९५,५०३ ३०,४१,६०६
भारत वजन ४,४०० २,०२५ ३०० ३०० ३००
किंमत ३,११६ १,४७७ २५७ २८३ २८०
यूरोप वजन ४२,२६,१०० ४३,३५,२६९ ४३,९९,७३० ४२,०८,५१० ४४,३५,४०३
किंमत ३२,०४,८८४ ३१,३७,३३२ ३१,३७,३३२ ४१,३२,४९४ ५०,०३,९९३
ओशिॲनिया वजन १,१८,९०० १,०२,९६५ ९४,१२५ १,०८,०२४ ९३,८९९
किंमत १,५०,६३६ १,२९,२६० १,२६,०४८ १,५८,७०० १,७४,१७३
रशिया वजन ३१ ६१ ३१ ५० ७९
किंमत २६ ३५ २८ ४५ ५०
जागतिक वजन ७२,८७,८७९ ७६,४७,५३१ ७९,३०,५५६ ७८,८७,६४१ ८३,६८,२८७
किंमत ६८,६४,०८१ ६९,५५,९१२ ८६,७०,१०० १,००,४२,८१३ १,२०,३३,०५

इ.स. १९६२ पूर्वी मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर, ब्रम्हदेश या देशांत भारतातून सुके बोंबील, सुकी कोळंबी (सोडे), सुकट, खारावलेल्या मुशी, बांगडे, सुरमई वगैरे निऱ्यांत होत असत. उन्हात सुकविलेले मुश्यांचे नुसते पक्षही सार करण्यासाठी सिंगापूरला रवाना होत असत. तसेच माशांचे वाताशय (भोत) सुकवून सिंगापूरमार्गे फ्रान्सला पाठविले जात असत. मासळी किंवा तिच्यापासून तयार केलेले पदार्थ यांच्या निऱ्यांतीची उलाढाल सु. ६ ते ८ कोटी रूपयांपर्यंत होत असे. १९६३-६४ सालापासून कोचीन आणि इतर ठिकाणी कोळंबी सोलून ती गोठविण्याचे व तिचे गठ्ठे तयार करण्याचे कारखाने सुरू झाले. ह्या गठ्ठ्यांची जपान, अमेरिका वगैरे देशांस निर्यात होऊ लागली व या व्यापाराचे क्षेत्र खूपच वाढले. १९८१ साली हा व्यापार सु. २८० कोटी रूपयांचा झाला. यात महाराष्ट्राचा हिस्सा सु. ३२ कोटी रूपयांचा होता. मासळी व मासळीचे पदार्थ यांच्या व्यापारात बेडकांच्या तंगड्यांचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या वर्गीकरणाप्रमाणे बेडकांचा अंतर्भाव जलीय जीवसंपत्तीत केला आहे. यातच माशांचा समावेश आहे. यूरोपमध्ये बेडकांच्या तंगड्यांपासून केलेले खाद्यपदार्थ कोंबडीपासून केलेल्या खाद्यपदार्थांपेक्षाही जास्त रूचकर समजले जातात. यामुळे बेडकांच्या तंगड्यांना जास्त मागणी आहे व ती दिवसेंदिवस वाढत आहे. बेडकांच्या तंगड्या अंतर्भूत असलेल्या मासळीच्या व्यापाराची १९७४ ते १९७८ या काळातील काही प्रदेशांची व देशांची आकडेवारी कोष्टक क्र. १८ व १९ मध्ये दिली आहे.

कोष्टक क्र. १९. जगातील काही प्रदेशांचा व देशांचा मासळीचा आयात व्यापार

(वजन टनांत व किंमत हजार अमेरिकन डॉलरांमध्ये)

प्रदेश वा देश १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८
आफ्रिका वजन ५,७०,५०० ५,५२,६७३ ४,८८,५६९ ३,७३,८९७ ३,९५,१४१
किंमत ३,६६,८३८ ३,५३,८३३ ३,६६,११५ ३,८३,०४१ ३,७८,२८८
उत्तर अमेरिका वजन ६,६२,७०० ६,४७,६९९ ७,३२,६३३ ८,७२,२०९ १०,०७,६२९
किंमत ९,७७,१४३ १०,७५,८३० १४,००,३०६ १७,१६,३७२ २३,७६,७५२
अमेरिकेची संयुक्त संस्थाने वजन २,२२,१८० १,९६,३०० २,२०,००० २,२६,०३३ ३,५०,७२९
किंमत २,८२,६४१ २,९८,०३४ ३,७१,८९९ ५,००,०६४ ८,९७,२६१
दक्षिण अमेरिका वजन ९,९९,२०० १२,१७,१४० १०,९४,१११ १०,९३,१०९ १३,११,१०१
किंमत ४,६६,४१४ ४,०४,७७८ ५,२९,०१८ ६,४१,८०२ ७,९६,४७६
पेरू वजन ७,३३,७०० ९,५१,१०० ६,४९,१०० ५,२८,५७९ ६,०७,२५१
किंमत २,५५,९११ २,१२,५८६ २,१२,८६८ २,२८,०४३ २,५२,३८५
आशिया वजन १३,९६,५०० १५,४६,८०६ १५,९०,०४४ १८,५६,८६५ २१,१६,४०८
किंमत १४,३१,२१४ १७,२१,२९३ २१,९७,६७१ २७,५०,१२५ ३०,४९,३७३
जपान वजन ७,०८,२०० ५,९३,४०० ६,४२,४०० ५,८२,९२२ ७,४५,०४८
किंमत ६,०९,११२ ४,८९,९५८ ६,४९,३७३ ६,३१,३५७ ७,४८,७८६
भारत वजन ४९,७०० ५३,५३८ ५८,८६४ ६४,९६४ ७८,०००
किंमत (ह.डॉं.) ९५,०८० १,३२,८७९ १,९२,००१ २,०५,७२७ २,२९,३६०
किंमत (ह.रू.) ७,७१,०६९ ११,०७,३२१ १७,१९,०४९ १७,९७,७७४ १८,८०,०००
यूरोप वजन २९,०९,३०० ३०,५४,९९९ ३४,०३,८१२ ३४,३०,७४५ ३४,९८,७४५
किंमत २४,०६,५७७ २३,८९,९०८ २९,९८,७५८ ३४,९६,६६७ ३९,९४,३२४
ओशिॲनिया वजन १,३२,९०० १,०६,५३४ १,२४,८३९ १,३६,०४० १,४२,८४६
किंमत २,०६,९८९ २,०२,७४७ २,३४,५६७ ३,०८,६८१ ३,३७,६५५
रशिया वजन ४,११,८०० ५,५१,००० ५,२६,९०० ४,५९,१३४ ५,१६,२२९
किंमत १,६२,०५८ २,१२,१५९ १,९८,४४८ १,९५,१९८ २,३७,२२१
जागतिक वजन ७०,८२,९०० ७६,७६,८५१ ७९,८०,९०८ ८२,२१,६९० ८९,८८,३९९
किंमत ८०,१७,३१३ ६३,६०,८४८ ७९,२४,९०३ ९४,७०,७३६ १,११,७०,०९३

माशांची निऱ्यांत परदेशातून येणाऱ्यां मागणीवर अवलंबून असते व ही मागणी त्या त्या देशाच्या मत्स्यसंपदेवर, त्याला उपलब्ध असलेल्या तांत्रिक ज्ञानावर व त्या देशाच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून असते. दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशातून अँकोव्हेटा नावाच्या लहान आकारमानाच्या माशाचे पीठ निऱ्यांत होते. हे मासे लहान असले, तरी यांचे विशाल थवे किनाऱ्यांजवळ येतात. १९७० साली या जातीचे १.२ कोटी टन मासे पकडले गेले व यांपासून २१ लाख टन मत्स्यपीठाची निऱ्यांत करण्यात आली. जवळपासच्या देशांची व उत्तर अमेरिकेची शेकडो जहाजे ही मच्छीमारी करीत. यामुळे या माशांची आद्यसंपदा कमी झाली व एकंदर उत्पन्न १.२ कोटी टनांपासून २० ते ४० लक्ष टनांवर आले.

भारतातून १९७२ साली ३८,००० टन वजनाचे व ५८ कोटी रूपयांचे मत्स्यपदार्थ निऱ्यांत केले गेले. १९८१ साली हीच निऱ्यांत ३८,००० टनांवरून ७५,००० टनांवर व ५८ कोटी रूपयांपासून २८६ कोटी रूपयांवर आली. १९७१-८१ या दहा वर्षात मालाच्या किंमती वाढल्या असल्या, तरी निऱ्यांत होणाऱ्यां मालाच्या वजनात त्या प्रमाणात वाढ झाली नाही.

भारतातून १९७७ ते १९८१ या कालखंडात निऱ्यांत झालेली मासळी व तत्सम पदार्थांची वजने व किंमती कोष्टक क्र. २० मध्ये दिलेली आहेत.

कोष्टक क्र. २०. भारतातून मासळीची व तत्सम पदार्थांची होणारी निर्यात

(वजन टनांत व किंमत हजार रूपयांत)

मासळी व तत्सम पदार्थ १९७७ १९७८ १९७९ १९८० १९८१
गोठविलेली कोळंबी वजन ४७,२३९ ५१,२२३ ५३,६११ ४७,७६९ ५४,५३८
किंमत १५,३२,२०६ १७,९०,६४४ १६,५१,२७१ १८,४३,९७३ २४,८५,२२०
गोठविलेले शेवंडे वजन ५९६ ६९१ ७५२ ५०१ ६३६
किंमत ३८,८०४ ४५,६६८ ५३,४६५ २७,८८९ ४७,००३
गोठविलेले मासे वजन ३,७६५ ९,९३१ २४,१२६ ११,१९६ ८,५६५
किंमत ३८,५६६ ६३,३९६ १,१५,५८५ १,११,९३९ ९४,५२६
गोठविलेले माकुल वजन १,०८९ ९७९ १,३३९ १,६०३ १,४८८
किंमत १७,३१५ १६,५९१ १५,३१० ३०,३२६ ३२,५२५
गोठविलेले स्क्विड वजन ६०७ २,४२८ २,१०७ २,१७९ १,३१४
किंमत ६,५०१ ३२,६७७ २८,०३३ २५,०८४ १५,६९०
डब्यातील कोळंबी वजन १२८ २०४ १३९ ३६५ १००
किंमत ५,२२१ ९,१४९ ६,४२८ १५,७९४ ४,९००
सुकविलेली कोळंबी वजन २३५ १९ १२४ ५६
किंमत १,७११ ७५ ३२२ १,१४९ ८०९
सुकविलेले मासे वजन ४,२२१ ६,३११ ३,७२८ ४,३४० १,५२३
किंमत २२,७३० ३२,१३५ १८,९३४ २०,८०२ १४,४०८
मुशीचे पक्ष व भोत वजन २८७ ४२३ ३७२ ३३२ ४००
किंमत २२,४६९ ३४,६७६ २९,३४२ ३२,५२६ ३८,८११
बेडकांच्या तंगड्या (गोठविलेल्या) वजन २,८३४ ३,६७० ३,७६४ ३,०९५ ४,३९८
किंमत ६५,९६७ ८४,२५१ ८७,१५० ७३,२०० १,१९,५५०
इतर पदार्थ वजन ३,९६३ २,१८२ २,३२७ ३,०४६ २,३८१
किंमत १५,८८४ १२,३१२ १४,५५४ १६,१८६ १३,६७६
एकंदर निर्यात वजन ६४,९६४ ७७,९४६ ९२,१८४ ७४,५४२ ७६,३७५
किंमत १७,६७,३७४ २१,२१,५७४ २०,२०,२९२ २१,८८,७६६ २८,६७,१२८

मत्स्यनिर्यात धोरण : निर्यात व्यापार मुख्यतः निर्यात करणाऱ्या देशाच्या उत्पादनक्षमतेवर व अंतर्गत गरजेवर अवलंबून असतो. याबरोबरच आयात करणाऱ्या देशाची गरज व त्या देशाचे निर्यात करणाऱ्या देशाबरोबरचे राजकीय संबंध हेही महत्त्वाचे असतात. तसेच प्रत्येक देशाचे आरोग्यासंबंधी काही नियम असतात. त्यात अन्नाचा व औषधांचा समावेश असतो. माशासारख्या खाद्यपदार्थाची आयातही नियमाप्रमाणे करावी लागते. या नियमात जे बसेल व जेवढे बसेल तेबढेच दुसरा देश निर्यात करू शकतो. भारताला परकीय चलनाची आवश्यकता असल्यामुळे हे चलन मिळविण्याकरिता निर्यातीत येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने एक्स्पोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी स्थापन केली आहे. माशांची किंवा मत्स्यपदार्थांची निर्यात करावयाची असेल, तर या एजन्सीचे संबंधित अधिकारी या साठ्याची तपासणी करतात व त्यांनी केलेल्या नियमात जर हा साठा बसत असेल, तरच तो निर्यात करण्याचे प्रमाणपत्र देतात. या प्रमाणपत्राला इतर देशांत मान्यता असते व यामुळे निर्यात सुकर होते. कधीकधी प्रत्यक्ष कारखान्यात जाऊनही मालाची तपासणी करण्यात येते व प्रमाणपत्र दिले जाते.

मत्स्यपदार्थ निऱ्यांतीतील इतर अडचणी दूर करण्यासाठी व या विषयाचा विकास करण्यासाठी मरीन प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अँथॉरिटी या नावाची संस्था स्थापण्यात आली आहे. यामुळेही या धंद्यातील बऱ्याच अडचणींचे निवारण झाले आहे. परदेशात पाठविलेल्या मालाची योग्य किंमत मिळावी म्हणून निऱ्यांत बँकेच्या व्यवहाराचीही व्यवस्था केली आहे. १९६५-६६ सालापासून निर्यात किंमतीच्या १०% रक्कम निऱ्यांत व्यापाराच्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू आयात करण्यासाठी वापरता येत असे व याकरिता परवाना मिळविता येत असे. ही सोय आता बंद झाली आहे. तरी हवाबंद डब्यास लागणाऱ्या पत्र्याची किंमत भारतात जास्त असल्यामुळे अशा डब्यातून निर्यात केल्या जाणाऱ्या मालावर अनुदान दिले जाते. यामुळे आपल्या देशातील व्यापाऱ्यांना किंमतीच्या बाबतीत इतर व्यापाऱ्यांशी स्पर्धा करणे शक्य होते. अशा रीतीने भारत सरकार परकीय चलन मिळवून देणाऱ्या निर्यात व्यापारास उत्तेजन देते. या क्षेत्रात सहकारी संस्थांना वाव मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारही निर्यातीवर अनुदान देते. या सर्व सवलतींमुळे मत्स्यपदार्थांचा व्यापार व निर्यात दिवसेंदिवस वाढत आहे.

कुलकर्णी, चं. वि.

संबंधित अन्य व्यवसाय

मचवे किंवा होड्या तयार करण्याचा व्यवसाय मत्स्योद्योगाशी संबंधित अशा अन्य व्यवसायांपैकी एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. विकसित देशांत आता या होड्या, मचवे किंवा जहाजे लोखंडी पत्र्याची बनविलेली असतात. लोखंडी पत्र्याच्या पट्ट्या किंवा तुकडे रिव्हेटांनी किंवा डाखकामाने एकमेकांस जोडले जातात. जहाजे बांधण्याच्या मोठ्या कारखान्यातच मत्स्योद्योगास लागणारे मचवे किंवा जहाजे बनविली जातात. या जहाजांची मोजमापे मत्स्योद्योगास उपयुक्त अशी असावी लागतात. अशी जहाजे बांधण्याच्या क्षेत्रात यूरोपातील बरेच देश व जपान हे अग्रगण्य आहेत.

भारतासारख्या विकसनशील देशात १५-१६ जहाजबांधणी कारखाने आहेत. त्यांपैकी काही कारखान्यांत मत्स्योद्योगास लागणाऱ्या जहाजांचीही बांधणी होते. काही कारखान्यांत तंतुरूप काच वापरून मासेमारी मचवे बनविण्यात येतात. एका कारखान्यात तर सिमेंट व लोखंडी सळ्या वापरून मचवे बनवितात. वापरात असणारे बहुसंख्य मचवे लाकडाचे असल्यामुळे ते कसबी सुताराकडून बनविले जातात. असे मचवे बांधणे हा एक कुटिरोद्योग आहे. असे मचवे बांधणारे नोंदणी केलेले फक्त ७० किंवा ८० च कारखाने आहेत. या मचव्यांची किंमत त्याच्या लांबी, रूंदी व खोली तसेच लाकूड व आकृतिबंध यांवर अवलंबून असते. १९८२ मध्ये उपलब्ध असलेल्या माहिती- नुसार एंजिन बसविण्यास योग्य अशा वापरात असलेल्या मचव्याची किंमत महाराष्ट्रात साधारणपणे रू. ८०,००० होती. या मचव्याची लांबी, रूंदी व खोली अनुक्रमे १६ मी., ३.५ मी. व १.५ मी. असते. असा एक मचवा बनविण्यासाठी चार कसबी सुतार व चार मदतनीस यांना सरासरी सहा महिने काम करावे लागते. अशा मचव्यांची योग्य ती काळजी घेतल्यास ते २० ते २५ वर्षे काम देऊ शकतात. शिडाचे मचवे ३० ते ३५ वर्षेही टिकतात. महाराष्ट्रात दर वर्षी सु. १५० ते २०० नवीन मचव्यांची भर पडते. याशिवाय मत्स्योद्योगास लागणाऱ्यां लहान मोठ्या होड्याही बांधण्याचे व त्या वापरात आणण्याचे काम चालू असते.

मासे पकडण्यासाठी जाळी बनविणे हाही मत्स्योद्योगाशी निगडीत असा महत्त्वाचा व्यवसाय आहे. पूर्वी ही जाळी सुताच्या धाग्याची बनवीत असत. चांगल्या पिळाच्या सुताच्या धाग्याला गाठी मारून जाळे तयार करणे हे सर्व जगभर प्रचलित होत. या गाठी साध्या गाठीपेक्षा निराळ्या असत व त्या सहजासहजी सुटत नसत. १९४० सालानंतर साधे कापड विणण्याच्या मागाप्रमाणे मासेमारीकरिता वापरण्यात येणारी जाळी विणण्याचे माग अस्तित्वात आले. हे माग यूरोपात व त्यातल्या त्यात ब्रिटन व फ्रान्समध्ये प्रथम सुरू झाले. नायलॉनाचा धागा तयार होऊ लागल्यापासून या धाग्याची स्वयंचलित मागावर मासेमारीकरिता मोठ्या प्रमाणावर जाळी तयार होऊ लागली आहेत. ही जाळी नेहमीच्या जाळ्यासारखी गाठीची किंवा बिनगाठीचीही बनविता येतात. या क्षेत्रात जपान पुष्कळच अग्रेसर आहे. भारतात १९८२ साली अशा प्रकारची जाळी करणारे आठ लहान व एक मोठा असे नऊ कारखाने होते. तरीही कित्येक प्रकारची जाळी या कारखान्यांतील मागांवर काढता येत नाहीत. त्यामुळे काही प्रकारची जाळी अजूनही हाताने विणावी लागतात. ज्या वेळी वाईट हवेमुळे किंवा पावसाळी मोसमामुळे मच्छीमारी करता येत नाही त्या वेळी मच्छीमार हा वेळ जाळी विणण्यात खर्च करतात. मच्छीमारांच्या स्त्रियादेखील फावल्या वेळी विणून जाळी करतात व ती त्यांना स्वतःला नको असल्यास विकून पैसे मिळवितात. काही स्त्री-पुरूषांचा तर हा मुख्य व्यवसायच असतो.

मासेमारीसाठी लागणारे दोर तयार करणे हा पूर्वी किनारपट्टीतील लोकांचा एक महत्त्वाचा कुटिरोद्योग होता. नारळाच्या काथ्यापासून व सुंभापासून दोऱ्या तयार करीत असत व या दोऱ्यांचे मोठे दोर बनवीत असत. आता नारळाचा काथ्या व सुंभ यांऐवजी नायलॉनाचे धागे वापरून त्यांपासून दोर बनवितात. हे दोर बनविण्याचे कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांत नायलॉनाचे धागे, जाळी व दोर हे मत्स्योद्योगास लागणारे सर्व सामान तयार होते.

पूर्वी मच्छीमारी मचव्यांना लागणारी कापडी शिडे बनविणे हाही मत्स्योद्योगाशी संबंधित असा व्यवसाय होता. आता आधुनिक मचव्यांचे यांत्रिकीकरण झाल्यामुळे व त्यांत एंजिने बसविल्यामुळे शिडाची आवश्यकता भासत नाही. हे मचवे चालविण्यासाठी तंत्रज्ञ, एंजिनचालक व तंत्रशाळा यांची आवश्यकता भासू लागली आहे व मत्स्योद्योगाशी संबंधित असे हे नवीनच रोजगार क्षेत्र निर्माण झाले आहे. मचव्यावरील एंजिने व इतर यंत्रसामग्री, तसेच कप्प्या, भोवरकड्या, पाणफळे, लोखंडी तारदोर, कड्या तरंगे, साखळ्या अशा कितीतरी वस्तू तयार करण्यासाठी निरनिराळे कारखाने अस्तित्त्वात येऊ लागले आहेत. एंजिनास दररोज लागणारे तेल व वंगण पुरविण्यासाठी, एंजिनाचे सुटे भाग पुरविण्यासाठी निरनिराळ्या कंपन्या निघत आहेत. या सर्व मत्स्योद्योगाशी संबंधित असलेल्या क्षेत्रात खूपच रोजगार उपलब्ध झाला आहे.

मत्स्योद्योगाच्या वाढीबरोबरच मासळी गोठविण्याचे कारखाने व ताजी मासळी दूरवर पाठविण्यास आवश्यक असणारे बर्फ पुरविणारे बर्फाचे कारखानेही स्थापन झाले आहेत. माशांच्या निर्यातीसाठी लागणारी खोकी, त्यांना गुंडाळण्यास लागणारा विशिष्ट प्रकारचा कागद, खोक्यावर चिकटविण्यास लागणारी लेबले यांसारखे आनुषंगिक लघुउद्योगही अस्तित्वात आले आहेत.

कुलकर्णी, चं. वि.

मत्स्योद्योग शिक्षण, संशोधन व आंतरराष्ट्रीय संस्था

शिक्षण, प्रशिक्षण व विस्तार : दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जी तांत्रिक व वैज्ञानिक प्रगती झाली तिचे परिणाम मत्स्योद्योगावरही झाले. हा उद्योग पूर्वी गरीब व निरक्षर समाजाकडे त्यांचे उपजीविकेचे साधन म्हणून होता. मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्यां नौकांचे यांत्रिकीकरण, तसेच इतर साधनांचे आधुनिकीकरण आणि मासळी टिकविण्याच्या नव्या पद्धती यांमुळे या उद्योगात पुष्कळ फेरफार करण्यात आले व त्याचे जुने स्वरूप पार बदलले. साहजिकच या उद्योगातील संबंधितांना यांविषयीचे शिक्षण देण्याची गरज भासू लागली आहे. या क्षेत्रात सध्या ज्या सोयी उपलब्ध आहेत त्यांची थोडक्यात माहिती खाली दिली आहे.

महाराष्ट्राच्या ज्या भागात मच्छीमार समाजाची संख्या मोठी आहे त्या भागात शासनाने ‘मत्स्योद्योग प्राथमिक शाळा’ स्थापन केल्या आहेत. अन्य विषयांबरोबरच मत्स्योद्योग हा विषयही या शाळांतून शिकविला जातो. शासनाने व्यावसायिक प्रशिक्षण शाळा म्हणून या शाळांना मान्यता दिली आहे. सात वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर अंतिम परीक्षा घेण्यात येते व उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रकारच्या शाळा रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, साखरीनाटे, मिठबाव व तारकर्ली येथे, तर रायगड जिल्ह्यात बागमांडले व करंजे येथे आणि ठाणे जिल्ह्यात सातपाटी व नवापूर येथे आहेत. शासनातर्फे चालविण्यात येणाऱ्यां आठ शाळांव्यतिरिक्त जिल्हा परिषदांच्या काही शाळांतूनही मत्स्योद्योग हा विषय शिकविला जातो. अशा शाळांतील शिक्षकांस मत्स्योद्योग विभागातर्फे आवश्यक ते शिक्षण देण्यात येते व शाळांना आवश्यक ती उपकरणे व साधने पुरविली जातात.

ठाणे जिल्ह्यातील सातपाटी येथे शासनामार्फत १९६४ साली मत्स्योद्योग माध्यमिक शाळा स्थापन करण्यात आली. शालान्त परीक्षेसाठी मत्स्योद्योग हा एक जादा विषय घेण्यास माध्यमिक शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे. इतर माध्यमिक शाळांत हा विषय शिकविता यावा म्हणून अशा शाळांना शासन आर्थिक साहाय्यही देते. यामुळे वसई, अर्नाळा, दातिवरे, बागमांडले, मिठबाव, रत्नागिरी या ठिकाणच्या काही माध्यमिक शाळांत हा विषय शालान्त परीक्षेस घेण्याची सोय झाली आहे. पदवी परीक्षेपर्यंत हा विषय घेण्याची सोय अजून महाराष्ट्रात तरी उपलब्ध नाही. ज्या विद्यापीठात जीवविज्ञान किंवा प्राणिविज्ञान हा विषय शिकविला जातो, तेथे या विषयांतर्गत माशांची जीवनविषयक माहिती दिली जाते. पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्राणिविज्ञान या विषयात सागरी प्राणिविज्ञान किंवा मत्स्यविज्ञान या विषयांचा समावेश आहे. काही विद्यापीठांत मत्स्यविज्ञानाकरिता निराळ्या शाखा उपलब्ध आहेत. पदवी परीक्षेस जीवविज्ञान हा विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता मत्स्योद्योगाचे पुढील शिक्षण ‘केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्था’, वेसावा, मुंबई येथे मिळू शकते. येथे दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. सामान्यतः प्रतिवर्षी तीस उमेदवारांची निवड होते. या संस्थेतून मिळालेली पदविका पदव्युत्तर परीक्षेच्या दर्जाची मानण्यास भारत सरकारने अनुमती दिली आहे.

यांशिवाय कोकण कृषी विद्यापीठाच्या कक्षेत येणारी दोन संशोधन केंद्रे महाराष्ट्रात आहेत. यांपैकी पहिले रत्नागिरी येथील मरीन बायॉलॉजिकल रिसर्च स्टेशन आणि दुसरे मुंबई येथील तारापोरवाला मरीन बायॉलॉजिकल रिसर्च स्टेशन हे होय. या केंद्रांत मत्स्योद्योगाशी संबंधित असलेल्या इतर जलचरांचाही अभ्यास केला जातो. येथे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या देऊन उच्च पदवीकरिता मार्गदर्शन केले जाते. भारतातील इतर काही विद्यापीठांतही (उदा., कर्नाटक कृषी विद्यापीठ, केरळ विद्यापीठ) मत्स्योद्योगातील पदव्युत्तर अभ्यासाची व उच्च पदवी संपादन करण्याची व्यवस्था आहे. भारताबाहेर ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, नॉर्वे आणि इतर काही यूरोपियन राष्ट्रे व जपान येथे मत्स्योद्योग संशोधन संस्था व विद्यापीठे आहेत.

रत्नागिरी, अलिबाग, वसई व वर्सोवा येथे शासनामार्फत ‘मत्स्योद्योग प्रशिक्षण केंद्रे’ चालविली जातात. या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा असतो व यात सामान्यतः शिक्षित मच्छिमार युवकांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण काळात शिष्यवृत्ती देण्यात येते. आधुनिक साधने, नौकानयनशास्त्र, एंजिने इ. मच्छीमारीशी संबंधित असलेल्या विषयांची सैद्धांतिक व प्रात्यक्षिक माहिती या प्रशिक्षणात देण्यात येते.

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज ऑपरेटीव्हज, एर्नाकुलम् ही केरळ राज्यातील संस्था इंग्रजी माध्यमातून मत्स्यविषयक विविध प्रश्रांवर प्रशिक्षण देते. यात एंजिन चालक, जहाजतंत्रज्ञ, जहाजबांधणी, रेडिओ दूरध्वनी चालक इ. विषयांचा समावेश आहे. निवडलेल्या उमेदवारांना प्रवासखर्च व वेतन दिले जाते. या सर्व प्रशिक्षणाचा कालावधी सु. १५ महिन्यांचा असतो.

मंगलोर येथील मरीन प्रॉडक्ट्स प्रोसेसिंग ट्रेनिंग सेंटरतर्फे दहा महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतो. विज्ञान विषयाच्या पदवी-धरास येथे प्रवेश मिळतो. मासे गोठविणे, हवाबंद डब्यात भरणे, मासळीचे खाद्यपदार्थ बनविणे इ. विषयांचे प्रशिक्षण येथे दिले जाते.

गोड्या पाण्यातील मत्स्यविषयक प्रशिक्षण पश्चिम बंगालमधील बरॅकपूर येथील मत्स्योद्योग प्रशिक्षण संस्थेत दिले जाते. प्राणिविज्ञान विषय घेऊन पदवीधर होणाऱ्यांसाठी या संस्थेतर्फे एक वर्षाचा अभ्यासक्रम असून प्रतिवर्षी चाळीस उमेदवार घेतले जातात.

इंग्रजी माध्यमातून शालान्त परीक्षेपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे देशांतर्गत मत्स्योद्योग प्रशिक्षण संस्थेतर्फे नऊ महिन्यांचा प्रशिक्षणक्रम असून निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित राज्यातर्फे वेतन मिळते.

मत्स्योद्योगात झालेली क्रांती, आधुनिक साधने व त्यांचा वापर, नवीन शोध इ. माहिती मच्छीमारांपर्यंत व मत्स्योद्योगात असलेल्या लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. या ज्ञानाचा विस्तार कसा करावा यासंबंधीचे शिक्षण हैदराबाद येथील सेंट्रल फिशरीज एक्स्टेन्शन सेंटर या संस्थेत दिले जाते. विविध राज्यांच्या मत्स्योद्योग विभागांच्या कर्मचाऱ्यांसाठी अभ्यासक्रम असून याचा कालावधी नऊ महिन्यांचा आहे. कित्येक राज्यांत मत्स्यविकास विस्तार अधिकारी हे काम करण्यासाठी नेमले आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, नॉर्वे, जपान इ. मत्स्योद्योगातील प्रगत राष्ट्रांत मत्स्यविकास विस्तारावर भर दिला जातो.

कुलकर्णी, चं. वि.

संशोधन : मत्स्योद्योगावरील संशोधनाची व्याप्ती मोठी आहे. यात नुसत्या माशांवरील संशोधनाचाच अंतर्भाव नसून सागरी जीवविज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान, जीवरसायनशास्त्र, सांख्यिकी (संख्याशास्त्र), अर्थशास्त्र वगैरे इतर संबंधित शास्त्रांचाही समावेश होतो. यामुळे या विषयाच्या संशोधनासाठी विविध विषयांत पारंगत असलेल्या शास्त्रज्ञांना एकत्र येऊन गटागटाने संशोधन करावे लागते. या संशोधनाचे ढोबळमानाने मूलभूत संशोधन, अनुप्रयुक्त संशोधन व अनुयोजक (परिस्थितीनुसार वा गरजेनुसार योग्य ते बदल योजण्यासंबंधीचे) संशोधन असे तीन विभाग केले जातात. हे तीनही विभाग परस्परसंबंधित व एकमेकांस पूरक असे आहेत. यामुळे या तीनही प्रकारचे संशोधन एकत्र होणे आवश्यक आहे. या सर्व संशोधनाचा अंतिम उद्देश मत्स्योत्पादनाची वाढ करणे हा आहे.

एकोणिसाव्या शतकातील मत्स्यविषयक संशोधन जगातील निरनिराळ्या प्रदेशांतील मासे गोळा करणे व त्यांचे वर्गीकरण करणे यापुरतेच प्रामुख्याने मर्यादित होते. विसाव्या शतकात या संशो धनाच्या कक्षा वाढल्या आणि त्यात माशांचा जीवनवृत्तांत, त्यांचे स्थलांतरण, अन्न, प्रजनन पद्धती वगैरे क्षेत्रांतील सर्वांगीण अभ्यासास सुरूवात झाली. याच वेळी माशांचे वसतिस्थान असलेले समुद्र, गोड्या पाण्याची तळी, नद्या वगैरे जलाशयांच्या अभ्यासासही सुरूवात झाली. या संशोधनासाठी लागणारी निरनिराळी उपकरणेही शोधून काढण्यात आली. १९३० सालानंतर मत्स्योद्योगाच्या द्दष्टीने मासेमारी पद्धतींचा माशांच्या समूहांवर, त्यांच्या संख्येवर किंवा आकारमानावर होणारे परिणाम, प्रजोत्पत्तीवर पडणारा ताण व मच्छीमारांच्या उत्पन्नावर होणारे परिणाम यांचा अभ्यास, त्यात वापरण्यात येणाऱ्या होड्या, मचवे, जहाजे, जाळी वगैरेंतील सुधारणा, पकडलेल्या माशांची वाहतूक, परिरक्षण व मत्स्यजन्य पदार्थांचे उत्पादन यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. नॉर्वे, स्वीडन, रशिया, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इ. देश मत्स्योद्योग संशोधनात आघाडीवर आहेत. या देशांत कॉड, हेरिंग, प्लेस, हॅलिबट, ईल, सामन इ. माशांवर बरेच संशोधन झाले आहे.

भारतातील माशांच्या वर्गीकरणावर पहिला ग्रंथ एम्. ई. ब्लॉक यांनी १७८५ मध्ये लिहिला. त्यानंतर स्नायडर, बी. हॅमिल्टन, पी. ब्लिकर, ई. ब्लीथ इ. संशोधकांनी मोठ्या मेहनतीने भारतीय माशांची माहिती मिळवून ग्रंथ लिहिले. डब्ल्यू. एच्. साइक्स या लष्करी अधिकाऱ्यांनी ‘फिशेस ऑफ द दख्खन’ या १८३१ मध्ये सादर केलेल्या आपल्या अहवालात पुण्याच्या परिसरात आढळणाऱ्या माशांचे वर्णन केले होते. १८७८ मध्ये फ्रान्सिस डे यांनी आपल्या फिशेस ऑफ इंडिया या अभिजात ग्रंथात त्या वेळी ज्ञात असलेल्या १,३८० माशांच्या जातींची वर्गवारी केली व वर्णने दिली. एच्. एल्. होरा यांनी १९२० पासून या विषयावर पुष्कळ लेखन केले. हे सर्व ग्रंथ, प्रबंध किंवा शोधनिबंध रूपाने प्रसिद्ध झाले आहेत. हे लेखन मुख्यतः मत्स्यजीवन व माशाची वर्गवारी या स्वरूपाचे होते. मत्स्योद्योगास पोषक असे संशोधन स्वातंत्र्यकालापूर्वी मद्रास, पंजाब, बंगाल व महाराष्ट्र या राज्यांत चालू होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर म्हणजे १९४७ नंतर या संशोधनाची भारतीय पातळीवर रचना करण्यात आली. प्रथम सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, कोचीन व सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, बरॅकपूर (प.बंगाल) या दोन मध्यवर्ती संशोधन संस्था भारत सरकारने स्थापन केल्या. हळूहळू या संस्थाच्या शाखा भारताच्या निरनिराळ्या राज्यांत स्थापण्यात येऊन या संशोधनास गती मिळाली. यानंतर १९६६ साली पणजी (गोवा) येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेची स्थापना करण्यात आली व सागराचे सर्वांगीण संशोधन सुरू झाले.

ज्या देशांत मत्स्योद्योग हा प्रगत व मुख्य उद्योग आहे त्या देशांत त्याचा सर्वांगीण अभ्यास करण्याकरिता संशोधन संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. इंग्लंडमधील प्लिमय येथे मत्स्योद्योगाच्या संशोधनाकरिता स्थापिलेली संस्था सर्वांत जुनी असावी असे दिसते. संशोधनात्मक सामग्रीने सुसज्ज अशी समुद्रावर जाऊ शकणारी जहाजे लोस्टॉफ्ट व अँबर्डीन येथे आहेत. यूरोपातील प्रगत मत्स्योद्योग असणाऱ्या इतर देशांतही अशाच संशोधनात्मक सोयी आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत असे संशोधन मध्यवर्ती व राज्य सरकारांच्या सहकाऱ्यांने चालते. मध्यवर्ती सरकारच्या मत्स्यसंवर्धन खात्याच्या प्रयोगशाळा सिॲटल (वॉशिंग्टन) व वुड्सहिल (मॅसॅचूसेट्स) येथे आहेत. इतरत्रही अशा प्रयोगशाळा विखुरल्या आहेत. कॅलिफोर्निया राज्याच्या सरकारने ला हॉइया येथे व इतरत्र आपल्या मालकीच्या अशा प्रयोगशाळा व जहाजे संशोधन काऱ्यांसाठी ठेवली आहेत. कॅनडामध्येही तीन ठिकाणी मत्स्यसंशोधनासाठी अशा प्रयोगशाळांची स्थापना केली आहे. जपान व रशिया या देशांतही मोठाली मत्स्यसंशोधन केंद्रे स्थापण्यात आली आहेत. समुद्रावर मत्स्यसंशोधनासाठी जाणाऱ्यां मोठाल्या जहाजांपैकी नॉर्वेतील ‘जी. ओ. सार्स’ व ‘जोहान जोर्ट’, दक्षिण आफ्रिकेतील ‘आफ्रिकाना’, ब्रिटनमधील ‘अर्नेस्ट होल्ट’ व ‘क्लायोन’, जर्मनीतील ‘अँटोन डोर्न’ आणि कॅनडातील ‘ए. टी. कॅमरन’ ही काही जहाजे होत.

मासे पाण्यात निरनिराळ्या खोलींवर राहतात. समुद्रातील काही मासे किनाऱ्यांपासून कित्येक किलोमीटर दूर राहत असल्यामुळे त्यांच्यासंबंधी संशोधन करण्यासाठी व त्यांचे संवर्धन करण्यासाठी लागणारी साधने फार किंमती असतात व त्यामुळे ती अविकसित देशांच्या आवाक्याबाहेर असतात. भारताचा किनारा सु. ५,६०० किमी. लांब असून त्यावर बऱ्याच नद्या व खाड्या आहेत. भारतात गोड्या पाण्याचे मोठे तलाव, नदीप्रवाह व धरणे आहेत. तथापि भारतात एवढे मोठाले जलाशय व त्यांत विविध प्रकारचे मासे व इतर उपयुक्त जलचर प्राणी आढळत असले, तरी अन्न म्हणून ते अपुरेच आहेत. जगात भारताचा मत्स्योत्पादनात आठवा क्रमांक आहे, तरीही दरडोई मत्स्य आहारात मात्र खालचा क्रमांक आहे.

सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने भारतीय मत्स्योत्पादनाचे सर्वेक्षण केले होते. यामुळे भारतातील मत्स्योत्पादनाच्या वार्षिक उत्पन्नाचा अंदाज आला. या सर्वेक्षणाचा उपयोग भारतातील मत्स्योद्योग योजनांना व तसेच संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या सांख्यिकी विभागालाही झाला.

निरनिराळ्या माशांच्या मच्छीमारीचे हंगाम, त्यांचे भौगोलिक वितरण, त्यांचे जीवनचक्र, त्यांची अंडी घालण्याची पद्धत व क्षमता, पिलांची वाढ व मृत्युसंख्या, त्यांचे अन्न, आयुर्मर्यादा, स्थलांतर, त्यांचे शत्रू अशा विविध विषयांची माहिती मिळविणे व त्यातील काही बाबतींत उपाय योजना करणे यांसंबंधी प्रयत्न व संशोधन १९५० नंतरच्या काळात जारीने चालू झाले आहेत. मासेमारीकरिता नवीन जागा शोधून काढणे, माशांची अंडी घालण्याची ठिकाणे हुडकून काढणे, त्यांच्या वार्षिक उत्पादनाच्या चढउताराची पाहणी करणे वगैरेंद्वारे मिळणार्‍या सर्व माहितीचा मत्स्योद्योगाच्या विकासाच्या द्दष्टीने चांगला उपयोग होत आहे.

बोंबील या माशावर केलेल्या संशोधनावरून असे आढळून आले आहे की, हा मासा सु. २१० मिमी. इतका वाढला म्हणजे जननक्षम होतो; पण तो या अवस्थेत येण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर त्याची मासेमारी होते. अगदी लहान पिलेही मोठ्या प्रमाणावर मारली जातात व जीवविज्ञानाच्या द्दष्टीने ते अयोग्य आहे. या माशाबद्दल इतके ज्ञान मिळाले, तरी त्यांची अंडी घालण्याची नेमकी ठिकाणे, पिलांचा जीवनक्रम, मासेमारीच्या हंगामानंतर हे मासे कोठे जातात वगैरे त्यांच्या संबंधीच्या पुष्कळ गोष्टींचा अजून उलगडा झालेला नाही. या माशांचे उत्पादन कमीअधिक प्रमाणात घटत असल्यामुळे त्यांची मासेमारी जास्त प्रमाणात होत असावी असे दिसते. म्हणून या संदर्भात संशोधन होणे आवश्यक आहे. जाळ्यात सरसकट लहान मोठे मासे पकडले जातात तेव्हा जाळ्याच्या आसांतून लहान मासे निसटून जाऊ शकतील म्हणजे माशांच्या प्रजननात वाढ होईल, अशा प्रकारे जाळ्यांत सुधारणा करण्याच्या दृष्टीने संशोधन करण्यात येत आहे.

बोंबील माशांप्रमाणेच तारली, बांगडा, घोळ, दाढा (दाडा), करळी, बले, कोळंबी इ. आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या माशांवर संशोधन झाले आहे किंवा सुरू आहे. कोळंबीच्या स्थलांतराचा अभ्यास करण्याकरिता रत्नागिरी येथे २,००० जिवंत कोळंबीना रंगाचे अंतःक्षेपण (इंजेक्शन) देऊन समुद्रात सोडण्यात आले व त्यांच्या हालचालींचा अभ्यास करण्यात आला.बांगडा माशांची पिले नैर्ऋत्य किनार्‍यावर मिळाली आहेत व यावरून यांचे अंडी घालण्याचे ठिकाण कोणते असावे याविषयी अंदाज करण्यात येत आहेत. याचप्रमाणे तारलीची अंडी व पिले यांचाही अभ्यास चालू आहे.

किनाऱ्यालगतच सतत मासेमारी होत राहिल्यास तिचा मत्स्योत्पादनावर अनिष्ट परिणाम होण्याचा संभव आहे. हे टाळण्याकरिता मासेमारीचे क्षेत्र विस्तृत करून खोल पाण्यातील मासेमारीला जास्त उत्तेजन देणे आवश्यक आहे. भारत सरकारने खोल समुद्रात समन्वेषक (पाहणी करण्यासाठी) मासेमारी करण्याकरिता मुंबई येथे १९४६ साली एक उपकेंद्र सुरू केले. या केंद्रात मोठ्या यांत्रिक मचव्यांच्या साहाय्याने ट्रॉल व बटवा जाळे ह्या प्रकारच्या जाळ्यांचा वापर करून तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ खोल पाण्यात राहणार्‍या माशांची पाहाणी करतात व त्यांचे क्षेत्र ठरवितात. यामुळे मत्स्योद्योगाच्या वाढीस गती मिळाली आहे. अशाच कामासाठी केरळच्या किनार्‍यावर नॉर्वेच्या सहकार्याने एक आणि नंतर संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या साहाय्याने दुसरा असे एकूण दोन प्रकल्प सुरू झाले. १९७७ साली भारत-पोलंड समन्वेषक प्रकल्प महाराष्ट्र व गुजरात किनार्‍याजवळील खोल पाण्यातील (५० मी. खोलीखालील) मासेमारीच्या सर्वेक्षणासाठी सुरू झाला. यामुळे या क्षेत्रात बरीच प्रगती झाली आहे.

या निरनिराळ्या प्रकल्पांपासून मिळालेल्या माहितीमुळे मत्स्योत्पादन वाढले असले, तरी नवीन व सुधारित साधनांची आवश्यकताही वाढली आहे. हे साध्य करण्यासाठी भारत सरकारने १९६२ मध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी ही संस्था कोचीन येथे सुरू केली. भारताच्या किनार्‍याची रचना, हवामान, मॉन्सून आदी वारे, समुद्राचे प्रवाह इ. गोष्टी विचारात घेऊन योग्य अशा नौका, जाळी व उपकरणे शास्त्रीय दृष्ट्या तयार करण्याचे काम येथे चालू आहे. तसेच निर्यातीच्या दृष्टीने पकडलेले मासे जास्त काळ टिकविता यावेत याकरिता त्यांच्यावर कोणत्या प्रक्रिया करणे आवश्यक आहे, या संबंधीही संशोधन चालू आहे.

भारताचा सागरी किनारा मोठा आहे व त्यावर अनेक खाड्या आहेत. तसेच किनार्‍यालगत मचूळ पाण्याचे मोठाले जलसंचयही आहेत. याखेरीज नद्या, नाले व विस्तीर्ण तलाव यांत विपुल गोडे पाणी आहे. या गोड्या पाण्यात रोहू, कटला, मृगळ, कलबासू, पाला वगैरे उत्तम प्रतीचे मासे आढळतात. या मत्स्यसंपदेचे प्रमाण आधुनिक तंत्रे वापरून वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. यांपैकी काही प्रकल्प महत्त्वाचे आहेत. ‘संमिश्र मत्स्य संवर्धन’ हा प्रयोग कटक येथे सुरू करण्यात आला आहे. संमिश्र मत्स्य संवर्धनाचा अर्थ म्हणजे परस्परांत पूरक अशा माशांचा समूह करून त्यांचे सामुदायिक संवर्धन करणे, तसेच जलसंचयातील अन्नसामग्री व जागा यांचा पूर्ण उपयोग करून घेणे आणि याकरिता निरनिराळ्या थरांतील अन्न खाणार्‍या माशांची निवड करून त्यांचे उत्पादन वाढविणे याकडे विशेष लक्ष दिले जाते. या प्रयोगात प्रथम कटला, रोहू, मृगळ या भारतीय कार्प माशांचा उपयोग केला गेला. नंतर सामान्य कार्प व ग्रास कार्प हे मासे भारतीय कार्प माशाबरोबर ठेवण्यात आले. हे प्रयोग मत्स्योत्पादनाच्या वाढीच्या दृष्टीने उपयुक्त ठरले. भारताच्या इतर राज्यांतही हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्रात पुण्याजवळ हडपसर येथे संमिश्र मत्स्य संवर्धन यशस्वी रीत्या करण्यात आले. या केंद्रात माशांची अंडी व पिले इतक्या प्रमाणात तयार झाली की, ती दुसर्‍या राज्यांना पुरविणे शक्य झाले. सध्या इंडियन कौन्सिल ऑफ अँग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेने हे प्रयोग अखिल भारतीय पातळीवर सुरू केले आहेत. या पद्धतीने दर हेक्टरी ४,००० किग्रॅ. इतके उत्पन्न मिळते, असे आढळून आले आहे. एका लहानशा तळ्यातील हे उत्पादन हेक्टरी ८,५०० किग्रॅ.पर्यंत पोहचले होते.

दुसरा उल्लेखनीय प्रयोग म्हणजे प्रवर्तित प्रजनन हा होय. गोड्या पाण्यात आढळणारे रोहू, कटला, मृगळ, कलबासू आदी भारतीय कार्प मासे वाहत्या पाण्यात अंडी घालीत नाहीत. त्यांना ⇨ पोष ग्रंथीच्या हॉर्मोनाचे (उत्तेजक स्रावाचे) अंतःक्षेपण योग्य वेळी व योग्य प्रमाणात देऊन अंडी घालण्यास उद्युक्त करावे लागते. ही पद्धती यशस्वी करण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. एकट्या महाराष्ट्र राज्यात या पद्धतीने दर वर्षी जवळजवळ तीन कोटी पिले निर्माण केली जातात.

अन्नधान्य निर्मितीत संकरित धान्ये निर्माण करून एक क्रांती घडवून आणण्यात आली आहे. अशीच क्रांती माशांमध्ये करण्यास संकरित माशांच्या जाती निर्माण करण्यावर प्रयोग चालू आहेत व यातही शास्त्रज्ञांना बरेच यश मिळाले आहे. यामुळे जलद वाढणार्‍या व जास्त चवदार जाती निर्माण करण्यात आल्या आहेत.

पाला हा मासा फार लोकप्रिय आहे. तो समुद्रातून मोठमोठ्या नद्यांत अंडी घालण्याकरिता स्थलांतर करतो; परंतु नद्यांवर धरणे बांधल्यामुळे या माशाच्या हालचालीवर परिणाम होऊन त्याचे प्रजनन कमी होण्याचा संभव निर्माण झाला आहे. हे टाळण्याकरिता साठवलेल्या पाण्यात याचे प्रजोत्पादन कसे करता येईल यावर संशोधन सुरू झाले व त्यातही शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.

कोळंबीच्या उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने कोळंबी संवर्धनावरही प्रयोग चालू आहेत. हे संशोधन मुख्यतः कोकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी केंद्र; सेंट्रल मरीन रिसर्च इन्स्टिट्यूट, कोचीन; सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, बरॅकपूर वगैरे ठिकाणी चालू आहे. रत्नागिरी किनार्‍यावर निमखार्‍या पाण्यात सापडणारे ‘बडे झिंगे’ ही आकारमानाने जगातील सर्वांत मोठी कोळंबीची जात आहे व हिचेही कृत्रिम संवर्धन करण्यात यश मिळाले आहे.

भारताच्या किनाऱ्यावर सापडणारा ‘काकई’ हा प्राणीही महत्त्वाचा आहे; पण याची मासेमारी फार कमी प्रमाणात होते. याचेही उत्पादन वाढविणे शक्य आहे, असे आढळून आले आहे.

कालवापासून मोती काढण्याचे संशोधन जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. भारतात तुतिकोरीन व विलिगम् येथेही संवर्धनावर व मोत्यांवर संशोधन चालू आहे.

भारतात माशांची मागणी व पुरवठा यांत फार मोठी तफावत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज थोड्याफार प्रमाणात भागविण्यास मत्स्योत्पादनात वाढ होणे अत्यंत आवश्यक आहे. भारताच्या विस्तीर्ण किनार्‍याचा व देशांतर्गत जलसंचयाचा पुरेपुर फायदा करून घेण्याच्या दृष्टीने मत्स्योत्पादनाच्या विकास योजना फार महत्त्वाच्या असून त्यांना अग्रक्रम मिळणे आवश्यक आहे.

बाळ, द. बा.

नियतकालिके : भारतात व परदेशात मत्स्योद्योगासंबंधी विविध नियतकालिके प्रसिद्ध होतात. त्यांपैकी काही महत्त्वाच्या नियतकालिकांची नावे खाली दिली आहेत.

सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (कोचीन) तर्फे इंडियन जर्नल ऑफ फिशरीजकौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (नवी दिल्ली) तर्फे इंडियन जर्नंल ऑफ मरीन सायन्सेससेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (मुंबई) तर्फे जर्नल ऑफ इंडियन फिशरीज अँसोसिएशनसेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (बरॅकपूर) तर्फे जर्नंल इनलँड फिशरीज सोसायटी ही नियतकालिके प्रसिद्ध होतात. यांखेरीज जर्नंल मरीन बायोंलॉजिकल अँसोसिएशन (एर्नाकुलम्, कोचीन), फिशरी टेक्नॉलॉजिस्ट (कोचीन), फिशिंग चाइम्स (विशाखापटनम्), दर्यावर्दी (मुंबई) इ. नियतकालिके इतर संस्था प्रसिद्ध करतात. काही परदेशी नियतकालिके पुढील होत (कंसात प्रकाशन संस्था व स्थळ अथवा नुसते प्रकाशन स्थळ दिलेले आहे) : अँक्वाकल्चर (एत्सेव्हिएर, अँम्स्टरडॅम, नेदर्लंड्स), बुलेटिन जॅपनीज सोसायटी ऑफ सायंटिफिक फिशरीज (टोकियो,जपान) कॅनेडियन जर्नंल फिशरीज अँड अँक्वेटिक सायन्सेस (कॅनेडियन सायंटिफिक इन्फर्मेशन ब्रँच, ओटावा), कमर्शियल फिशिंग (कमर्शियल फिशिंग एंटरप्राइज, फ्लिटवुड, ब्रिटन), फिश फार्मिंग इंटरनॅशनल व फिशिंग न्यूज इंटरनॅशनल (हाइवे पब्लिकेशन्स, ब्रिस्टल, ब्रिटन), फिशरीज बुलेटीन ऑफ अमेरिकन फिशरीज सोसायटी (बेथेस्डा, मेरिलँड, अमेरिका), लिम्नॉलॉजी अँड ओशनोग्राफी (अमेरिकन सोसायटी ऑफ लिम्नॉलॉजी अँड ओशनोग्राफी, क्राफ्टन, अमेरिका), प्रोग्रेसिव्ह फिश कल्चरीस्ट (यू. एस. फिश अँड वाइल्ड लाइफ सर्व्हिस, कोलोरॅडो, अमेरिका), वर्ल्डं फिशिंग (इंडस्ट्रियल प्रेस, लंडन), एफ ए. ओ न्यूज- लेटर फिशरी स्टॅटिस्टिक्स (एफ ए ओ, रोम).

आंतरराष्ट्रीय संस्था : सागरी मत्स्योद्योग हा समुद्रावर चालतो. यात काम करणार्‍या मच्छीमारांना व इतर व्यक्तींना सतत समुद्रावर फिरावे लागत असल्यामुळे त्यांच्या हालचालींना नैसर्गिक मर्यादा किंवा अडथळे असत नाहीत. त्यांच्या होड्यांतून किंवा मचव्यांतून ते आपल्या देशाच्या किनार्‍यापासून दूरवर इतर कोणी अटकाव करीपर्यंत जाऊ शकतात. या प्रकारच्या भ्रमणात काही फायदे, तर काही तोटेही आहेत. यातूनच तंटेबखेडेही निर्माण होतात. हे टाळण्यासाठी प्रत्येक देशाच्या सागरी परिसीमा ठरविण्यात आल्या आहेत (‘मासेमारीच्या मर्यादा’ या उपशीर्षकाखालील माहिती पहावी). असे आढळून येते की, काही जातींचे मासे निरनिराळ्या हंगामांत निरनिराळ्या ठिकाणी आढळतात. याचे कारण मुख्यतः काही जातींच्या नैसर्गिक स्थलांतराच्या सवयी होत. स्थलांतराची कारणे अनेक आहेत [→ प्राण्यांचे स्थलांतर]. स्थलांतराच्या नैसर्गिक सवयीमुळे ज्या देशाजवळची जागा मासे पसंत करतात त्या देशातील मच्छीमार प्रामुख्याने या माशांची मच्छीमारी करतात पण याबरोबरच इतर देशातील मच्छीमारही येथे मच्छीमारी करण्यास येतात व त्यामुळे या ठिकाणी अनिर्बंध मासेमारी होते. परिणामी या जातीच्या माशांच्या आद्य संपदेवर याचा अनिष्ट परिणाम होतो. या माशांचे प्रजनन घटते व पुढील हंगामात स्थलांतरणामुळे आवक कमी होते. यामुळे या ठिकाणच्या नजीकच्याच नव्हे, तर तेथे निरनिराळ्या ठिकाणांहून येणार्‍या सर्वच मच्छीमारांचे नुकसान होते. ही सागरसंपत्ती सर्व मानवजातीची असल्यामुळे सर्व देशांनी मिळून यावर विचार करणे आवश्यक आहे असे सर्वास पटू लागले व यासाठी एखादी आंतरराष्ट्रीय संस्था स्थापण्याची गरज वाटू लागली. १८५० सालानंतर उत्तर यूरोपातील मच्छीमार यांत्रिक मचवे वापरू लागले. नॉर्थ सी व इतर समुद्रांत दूरवर जाऊन त्यांची मच्छीमारी सुरू झाली. यामुळे मासळीची आद्य संपदा कितपत टिकेल याविषयी शंका निर्माण झाली. ही आद्य संपदा टिकावी म्हणून सर्वांना लागू पडतील व मान्य होतील असे नियम असावेत, असे वाटू लागले. मत्स्यसंपदेचे संशोधन व्हावे, हीही गरज भासू लागली.

(१) इंटरनॅशनल कौन्सिल फॉर द एक्स्प्लोरेशन ऑफ द सी : या सर्व विचारांची परिणती पहिली आंतरराष्ट्रीय संस्था १९०२ साली हॉलंडमध्ये स्थापण्यात झाली. या संस्थेचे नाव इंटरनॅशनल कौन्सिल फॉर द एक्सप्लोरेशन ऑफ द सी हे होते. या संस्थेच्या कामात पुढील विषयांचा समावेश आहे : (अ) सर्व प्रकारचे सागरी संशोधन, (आ) सागरी संशोधनाच्या पद्धतींतील सुसूत्रीकरण, (इ) महासागरविज्ञानाची माहिती व (ई) मत्स्योद्योगासंबंधीची सांख्यिकीय माहिती.

यानंतर इतर बर्‍याच आंतरराष्ट्रीय संस्था अस्तित्वात आल्या. त्यांची माहिती खाली दिली आहे.

(२) इंटरनॅशनल कमिशन फॉर सायंटिफिक एक्स्प्लोरेशन ऑफ द मेडिटेरॅनियन सी : ही संस्था माद्रिद (स्पेन) येथे १९०९ मध्ये स्थापन झाली. तिच्या नावाप्रमाणे ती भूमध्य समुद्रामधील मत्स्यसंशोधनाचे काम करू लागली; परंतु या संस्थेचा फारसा प्रभाव पडला नाही. या ऐवजी फ्रान्स व इटली या देशांत स्वतंत्र संस्था अस्तित्वात आल्या.

(३) इंटरनॅशनल पॅसिफिक हॅलिबट कमिशन : या आयोगाचा करार मुख्यतः कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांमध्ये १९२३ साली झाला. हॅलिबट हे मासे ईशान्य पॅसिफिक महासागरातच जास्त प्रमाणात मिळतात. यांना किंमत चांगली येत असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात यांची मासेमारी होऊ लागली. या माशांच्या आद्य संपदेस होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी हा आयोग नेमला गेला. या आयोगाने या माशांच्या जीवनक्रमाविषयी संशोधन सुरू केले व नंतर या माशाच्या मासेमारीसंबंधी नियम केले. हे नियम दर वर्षी एकंदर किती मासे मारायचे व ते कोणत्या हंगामात मारायचे याविषयी होते. या नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले व त्यामुळे मत्स्योत्पादनात खूप सुधारणा झाली. १९३१ साली फक्त २ कोटी किग्रॅ. मासेमारी झाली व ती वाढत वाढत १९६२ साली ३.४ कोटी किग्रॅ. वर गेली. शास्त्रीय संशोधनाच्या आधारे व केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले म्हणजे उत्पादन कसे वाढते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

(४) इंटरनॅशनल पॅसिफिक सामन कमिशन : या आयोगाचा करार १९३७ साली कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्यात झाला. कॅनडातील फ्रेझर नदीत येणार्‍या सॉकआय सामन या प्रख्यात माशाचा या करारात समावेश आहे. या माशावर बरेच संशोधन झाले आहे. ही जात नाहीशी होईल अशी भीती एके काळी वाटत होती; पण या संशोधनामुळे व अन्य उपायांमुळे ही भीती आता राहिलेली नाही.

(५) नॉर्थ पॅसिफिक फर सील कमिशन : या आयोगासंबंधीचा करार अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, जपान व रशिया या देशां- मध्ये १९५७ साली झाला. फर सील हा बर्फाळ समुद्रात राहणारा सस्तन प्राणी असून याच्या अंगावर लोकरीचे (फरचे) केस असतात. याची फार मोठ्या प्रमाणावर हत्या होत असे. ही हत्या थांबविण्यासाठी हा करार करण्यात आला. याच्या शिकारीवर बरेच निर्बंध घालण्यात आले असले, तरी ते पुरेसे नाहीत. [→ फर-२].

(६) इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन : सध्या अस्तित्वात असलेला हा आयोग १९४८ साली स्थापन झाला. देवमासा हा जलचर सस्तन प्राणी असून याचे प्रजनन फार कमी आहे. याची शिकार फार वर्षांपासून चालू आहे. जपान, रशिया, नॉर्वे, आइसलँड, अर्जेंटिना इ. देशांतील मच्छीमार देवमाशांची शिकार फार मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे याची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली व देवमाशाच्या विविध जाती (विशेषतः निळा देवमासा ही जात) नष्ट होतील काय, अशी भीती उत्पन्न झाली. याची जाणीव लीग ऑफ नेशन्स या संस्थेस १९२४ साली प्रथम झाली व त्यांनी या मासेमारीवर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन केले. यानंतर १९३१, १९३२, १९३८, १९३९ व १९४४ या वर्षी निरनिराळे करार झाले आणि दर वर्षी १६,००० निळ्या देवमाशांपेक्षा जास्त देवमासे मारू नये असे ठरले; परंतु ही मर्यादा कटाक्षाने पाळली जात नसे. या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या दृष्टीने वरील १९४८ चा आयोग अस्तित्वात आला; पण त्याचाही विशेष उपयोग झाला नाही. अखेर १९७८ च्या स्टॉकहोम परिषदेत देवमाशाच्या शिकारीवर पूर्ण बंदी घालण्यात आली.

(७) नॉर्थ-ईस्ट अटलांटिक फिशरीज कमिशन : हा आयोग १९६३ साली प्रस्थापित झाला. नॉर्थ सी व त्यालगतच्या इतर समुद्रांत लहान माशांची मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होऊ लागली होती. याचा मत्स्योद्योगावर विपरीत परिणाम होऊ लागला. हे संकट टाळण्याकरिता त्या समुद्रांलगतच्या सर्व राष्ट्रांनी एप्रिल १९४६ मध्ये एकत्र येऊन जाळ्याचे कमीतकमी आस किती असावे व किती लांबीपेक्षा लहान मासे मारू नये हे ठरविले व तसा करार केला. असाच दुसरा करार १९५९ साली झाला व या अन्वये १९६३ साली वरील आयोग अस्वित्वात आला.

(८) इंटरनॅशनल कमिशन फॉर नॉर्थ-वेस्ट अटलांटिक फिशरीज : हा आयोग १९५० मध्ये स्थापन झाला. या आयोगाचे मुख्य काम म्हणजे या भागातील मत्स्यसंपदेवर व विशेषतः हॅडॉक माशाच्या जीवनक्रमावर संशोधन करणे व त्याच्या मासेमारीवर नियंत्रण ठेवणे, हे होते.

(९) इंटर-अमेरिकन ट्रोपिकल ट्यूना कमिशन : याला पॅसिफिक ट्यूना कमिशन असेही म्हणतात. याची स्थापना १९४९ मध्ये झाली. याचे मुख्य सभासद अमेरिकेची संयुक्त संस्थाने, मेक्सिको, कोस्टा रीका, पनामा व कॅनडा हे होत. यात जपान नंतर सामील झाले. या आयोगातर्फे ट्यूनाचे स्थलांतर, त्याची आद्य संपदा, त्याचा हंगाम व त्याचा जीवनक्रम या विषयांवर संशोधन होते. आद्य संपदेत कमतरता न येता संतुलित उत्पादन कसे मिळविता येईल यासंबंधी आयोगातर्फे शिफारशी करण्यात येतात.

(१०) इंटरनॅशनल नॉर्थ पॅसिफिक फिशरीज कमिशन : दुसर्‍या जागतिक युद्धानंतर जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा या तीन देशांत महासागरी मासेमारीविषयी चर्चा होऊन जून १९५३ मध्ये हा आयोग स्थापन झाला. यामध्ये मुख्यत्वेकरून जपानने सामन, हॅलिबट व हेरिंग या माशांची मासेमारी कितपत करावयाची याची चर्चा होऊन त्यासंबंधी वेळोवेळी निर्णय घेतला जातो. तसेच ईशान्य पॅसिफिकमधील सामन व वायव्य पॅसिफिकमधील सामन यांच्यामधील विभागणी रेषेचा विचार करून निरनिराळ्या देशांचा उत्पादनातील वाटा ठरविला जातो.

(११) परमनंट कमिशन ऑन कॉंन्झरर्वेशन ऑफ मरीन रिसोर्सेस ऑफ साऊथ पॅसिफिक : हा आयोग १९५२ साली स्थापन झाला व यात चिली, पेरू व एक्कादोर हे देश सामील झाले. या तीन देशांनी त्याच वर्षी आपल्या मासेमारीची परिसीमा किनार्‍यापासून ३२० किमी. (२०० मैल) घोषित केली. या घोषणेची अंमलबजावणी या आयोगामार्फत झाली. अँकोव्हेटा, ट्यूना व देवमासे यांच्या आद्य संपदेचे परिरक्षण हेही या आयोगाचे एक कार्य होते आणि यासाठी ट्यूना व व्हेकिंग आयोगांशी हे सतत संपर्क साधून असतात.

(१२) जपान-सोव्हिएट फिशरीज कमिशन फॉर नॉर्थ-वेस्ट पॅसिफिक : हा आयोग १९५६ साली स्थापण्यात आला. यात मुख्यत्वेकरून कॅमचॅटका द्वीपकल्पाच्या अवतीभोवती असणार्‍या सामन मासेमारीविषयी विचार होऊ लागला. याकरिता या आयोगाचा या भागातील दुसर्‍या आयोगाशी सतत संपर्क असतो.

(१३) कमिशन फॉर फिशरीज रिसर्च इन वेस्टर्न पॅसिफिक : या आयोगाची स्थापना जून १९५६ मध्ये झाली. यात चीन, व्हिएटनाम, कोरिया व रशिया या देशांचा समावेश आहे. या आयोगाचा मुख्य उद्देश महासागरविज्ञान, देशांतर्गत जलाशय व आद्य मत्स्यसंपदा परिरक्षण यांवरील संशोधन हा आहे.

(१४) जॉइंट कमिशन फॉर ब्लॅक सी : हा आयोग १९५९ साली बल्गेरिया, रूमानिया व रशिया या तीन देशांच्या संमतीने स्थापिला गेला. यात मुख्यत्वेकरून काळ्या समुद्रातील माशांच्या महत्त्वाच्या जातींच्या संरक्षणासाठी जाळ्याचे लहानातले लहान आस व व पकडण्यास योग्य असा लहानात लहान कोणता मासा समजावा यावर लक्ष दिले जाते व माशांचे परिरक्षण करण्यासाठी नियम केले जातात.

(१५) मिक्स्ड कमिशन ऑफ १९६२ : हा आयोग पूर्व जर्मनी, पोलंड व रशिया या देशांनी सागरी मासेमारीत एकमेकांस साहाय्य व सहकार निर्माण करण्याकरिता स्थापिला.

(१६) जपान-कोरिया जॉईंट फिशरीज कमिशन : हा करार १९६५ साली झाला. याचा मुख्य उद्देश खुल्या सागरातील मासेमारीत सामाईक विभाग ठेवून त्यावर आपला ताबा ठेवणे हा होता.

(१७) संयुक्त राष्ट्रांच्या सुरूवातीपासूनच ⇨ अन्न व शेती संघटना स्थापन झाली. या संघटनेच्या कक्षेतच मत्स्योद्योगही येतो. सागरी व देशांतर्गत मत्स्योद्योगाचा सर्वांगीण विकास करण्याची आणि मत्स्यसंपदेचा पूर्ण उपयोग करून घेण्याची जबाबदारी या संघटनेवर आहे. यासाठी महानिदेशकांच्या हाताखाली तज्ञ अधिकारी वर्ग नेमून खालील आंतरराष्ट्रीय संस्था स्थापण्यात आल्या.

(अ) इंडो-पॅसिफिक फिशरीज कौन्सिल : याची स्थापना फेब्रुवारी १९४८ मध्ये झाली. हिंदी व पॅसिफिक (पश्चिम) महासागरांलगतच्या देशांच्या मत्स्यविकासाच्या योजनांचा विचार करणे व सयुक्तिक सूचना करणे हे या संघटनेचे मुख्य काम आहे. यासाठी प्रादेशिक परिषदा भरवून देशोदेशींच्या शास्त्रज्ञांना विचारविनिमय करण्याची संधी मिळे.

(आ) जनरल फिशरीज कौन्सिल फॉर मेडिटेरॅनियन सी : ही संघटना १९४९ मध्ये अस्तित्वात आली. भूमध्य समुद्राभोवतालच्या देशांतील मत्स्योद्योगाचा विचार करून सूचनावजा शिफारसी केल्या जात.

(इ) लॅटिन अमेरिकन फिशरीज कौन्सिल (१९५१).

(ई) रिजनल फिशरीज ॲडव्हायझरी कमिशन फॉर साउथ-वेस्ट अटलांटिक (१९६२).

वरील (इ) व (ई) या दोन्ही संघटनांचे कार्य (अ) व (आ) यांप्रमाणेच परंतु त्या त्या क्षेत्रासंबंधी असे. या सुमारालाच म्हणजे १९६२ साली सरमहानिदेशकांच्या कार्यालयात ‘अँडव्हायझरी कमिटी ऑन मरीन रिसोर्स रिसर्च’ या नावाची एक सल्लागार समिती नेमण्यात आली. १९६६ साली मत्स्योद्योगविषयीच्या कार्यात एकसूत्रीपणा आणण्यासाठी मत्स्योद्योगाकरिता स्वतंत्र खाते सुरू करण्यात आले. या खात्यास मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मत्स्योद्योगाविषयी एक समिती स्थापन करण्यात आली. अन्न व शेती संघटनेने निरनिराळ्या विभागांत सुरू केलेल्या विकासांच्या कार्यक्रमाचे निरीक्षण व नियंत्रण या समितीकडे सोपविण्यात आले आहे.

(उ) इंडियन ओशन फिशरी कमिशन : हा आयोग १९६७ साली स्थापण्यात आला. हिंदी महासागरालगतचे सर्व देश या आयोगाचे सभासद आहेत. सभासद देशांच्या निरनिराळ्या मत्स्योद्योगविषयक विकास व संशोधन योजनांना चालना देणे, नव्या योजना तयार करण्यास मदत करणे आणि तयार केलेल्या योजना तपासणे हे या आयोगाचे मुख्य कार्य आहे. सांख्यिकीय माहितीचे समालोचन व मत्स्यसंपदेसंबंधी इतर संघटनांना माहिती पुरविणे हेही काम या आयोगामार्फत होते. या संघटनेपूर्वी इंटरनॅशनल इंडियन ओशन एक्स्पीडीशन या नावाची एक प्रासंगिक संघटना हे कार्य करीत होती.

(ऊ) फिशरी कमिटी फॉर ईस्ट-सेंट्रल अटलांटिक : ही समिती १९६७ मध्ये स्थापली गेली. पश्चिम आफ्रिकेतील सागरीतीरावरचे देश आणि जपान, कोरिया, इटली, फ्रान्स यांसारखे दूरचे देशही या समितीचे सभासद आहेत. वरील सागर विभागातील मत्स्यसंपदेचे परिरक्षण, यासाठी आवश्यक अशा संशोधनाचे नियमन व रास्त स्तरावर उत्पादनाच्या परिसीमा ठरविणे हे या आयोगाचे कार्य आहे.

(१८) इंटरनॅशनल कमिशन फॉर कॉंन्झर्वेशन ऑफ अटलांटिक ट्यूना : ट्यूना माशांच्या आद्य संपदेचे संरक्षण करण्यासाठी उपाय सुचविणे व त्यांचे नियमन करणे हे या आयोगाचे उद्दिष्ट आहे. या आयोगाची स्थापना मे १९६६ मध्ये झाली. याचे सभासद ब्राझील, फ्रान्स, कॅनडा, घाना, जपान, कोरिया इ. देश आहेत.

(१९) इंटरनॅशनल कमिशन फॉर साउथ-ईस्ट अटलांटिक फिशरीज : या आयोगाची स्थापना ऑक्टोबर १९७१ मध्ये झाली. या विभागातील मत्स्यसंपदेच्या परिरक्षणासाठी योजना आखणे व या योजना कार्यान्वित करण्यास मदत करणे, हे या आयोगाचे काम आहे. बल्गेरिया, जपान पोलंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका, स्पेन, रशिया इ. दूरदूरचे देश याचे सभासद आहेत. रास्त स्तरावरच्या उत्पादना- साठी परवाने सुचविणे हेदेखील या आयोगाचे काम आहे.

यांशिवाय इतर कित्येक देशांत कोळंबी, खेकडे, शेवंडे, कालवे इत्यादींविषयी करार झाले आहेत परंतु इतर देशावर त्यांचा फारसा परिणाम होत नसल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय महत्त्व नाही. (चित्रपत्रे ३०, ३१).

कुलकर्णी, चं. वि.

पहा : मत्स्यपारध; मत्स्य वर्ग; मत्स्यविकार.

संदर्भ : 1. Algarswamy. K. Molluscan Resourses of the World, Seafood Export Journal, Vol. 5 No. l, Cochin, 1975.

2. Andrews, R. C. All About Whales, New York, 1954.

3. Bardack, J. E.; Ryther, J. H.; McLarney, W. O. Aquaculture, New York, 1972.

4. Bayne, B. L. Marine Mussels, their Ecology and Physiology, London, 1976.

5. Budker, P. Whales andWhaling, London, 1958.

6. Central Marine Fisheries Research Institute, Indian Fisheries 1947-77, Cochin.

7. Chhapgar, B. F. Crab Fishing at Bombay, Journal of Bombay Natural History Society, Bombay, 1962.

8. Chhapgar, B. F.; Deshmukh, S. Lobster Fishery of Maharashtra, Journal of Indian Fisheries Association. Vol. I, No. 1, Bombay, 1971.

9. Cromie, W. J. The Living World of Sea, Englewood Cliffs, N. J., 1966.

10. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IV. Supplement Fish and Fisheries, New Delhi, 1962.

11. Durve, V. S. The Culture of Edible Molluses inthe Castal Water.

12. Food and Agriculture Organisation of the United Nations, Yearbook of Fishery Statistics (a), Fishery Commodities Vol. 47, Rome, 1978.

13. Fujinaga, M. Kuruma Shrimps, Geneva, 1967.

14. Hora, S. L.; Pillay, T. V. R. Handbook of Fish Culture in Indo-Pacific Region, FAO Fish Biol. Tech. Pap. 14, 1962.

15. Idyll. C. P. The Sea Against Hunger, New York.

16. Iverson, E. S. Farmingthe Edge of the Sea, London, 1968.

17. Jhingran, V. G. Fish and Fisheries of India, Delhi. 1977.

18. Khanna, S. S. An Introduction To Fishes, Allahabad, 1980.

19. Kulkarni, C. V.; Ranade, M. R. Fishes of Maharashtra, Bombay, 1975.

20. McKee, A. Farming of the Sea, New York, 1969.

21. Pope, C. H. The Reptile World, London, 1960.

22. Raymoni, J. E. G. Plankton and Productivity in the Oceans, London, 1963.

23. Tressler, D. K.; Lemon, J. M. MarineProducts of Commerce, New York, 1951.

24. Vibert, R. Ed. Fishing with Electricity, London, 1967.

25. Vogel, Z. Reptilesand Amplubians, London, 1964.

26. Walford, L. A. LivingResources of the Sea, New York, 1958.

२७. भारतीय कृषि अनुसंधान संस्था, मत्स्यविकास पत्रिका, अंक ११, ऑगस्ट १९७४नई दिल्ली, १९७४.

देशी मच्छीमारी नौका पाण्यात सोडली जात आहे (केरळ).
नवीन बांधणीची ट्रॉलर नौका
तुतिकोरिन येथे तळ उघडणाऱ्या ट्रॉल जाळ्याने पकडलेले मासे
बंदरात लागलेल्या ट्रॉलर नौका
मुंबई किनाऱ्यावर पकडलेले एका नौकेतील मासे
बाजारात विकावयास ठेवलेले मासे
सुकविण्याकरिता टांगून ठेवलेले बोंबील मासे
सुकविलेले बोंबील साठविण्याकरिता नेले जात आहेत
कोळंबी सोलण्याची क्रिया
उन्हात वाळविलेले मासे एकत्र बांधले जात आहेत
निर्यातीसाठी गोठविण्याकरिता कोळंबी सोलणे, धुणे व वर्गीकरण करणे.
सागरी अन्नाचे डबाबंदीकरण
खिमा तयार करण्यासाठी स्वस्त माशांतील हाडे काढून टाकली जात आहेत
तबकांमध्ये मासे गोठविले जात आहेत
पाऊस पडला नाही तरीही कार्प मत्स्यबीज तयार करणारे केंद्र
श्रीनिवास मत्स्यबीज क्षेत्र (क्षेत्रफळ १.२ हे.)
मुंबई येथील आधुनिक कोळंबी संवर्धन केंद्र