खाटीक पक्षी : याचा लॅनिइडी या पक्षिकुलात समावेश होतो. याच्या सु. १० जाती भारतात आढळतात काही सगळीकडे आढळतात, काही थोड्या भागातच आढळतात, तर एकदोन हिवाळ्यात बाहेरून भारतात येतात. ‘तांबूस पाठीचा खाटीक’ भारतात सर्वत्र आढळणारा व नमुनेदार खाटीक पक्षी आहे. याचे शास्त्रीय नाव लॅनियस स्कॅक असे आहे. हिमालयात २,४४० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. मोकळ्या सपाट प्रदेशात आणि शेतीच्या आसपास हा राहतो.

खाटीक पक्षी

हा पक्षी बुलबुलापेक्षा मोठा पण साळुंकीपेक्षा लहान असतो. कपाळ काळ्या रंगाचे, चोचीच्या बुडापासून डोळ्यांमधून मागे गेलेला एक काळा पट्टा, डोके करडे, खांद्यापासून मागे शेपटीपर्यंतचा पाठीचा भाग तांबूस, पंख काळे शेपटी काहीशी लांब आणि काळी व तपकिरी खालचा भाग तांबूस छटा असलेला पांढरा चोच जाड, टोकाशी वाकडी आणि काळी पाय काळे. नर आणि मादी सारखीच दिसतात. हे बहुधा एक एकटेच हिंडत असतात.

लहान पक्षी व त्यांची पिल्ले, उंदीर, सरडे व सर्व प्रकारचे किडे हे याचे भक्ष्य होय. एखाद्या काटेरी झाडाच्या पुढे आलेल्या फांदीवर किंवा झुडपावर निश्चल बसून हा भक्ष्याची टेहळणी करतो. एखादा लहान प्राणी किंवा किडा दिसण्याचाच अवकाश, तो झडप घालून त्याला पकडतो व झाडावर नेऊन त्याचे तुकडे करून खातो. भक्ष्य पकडण्याचा याचा उद्योग दिवसभर चालू असतो. पोट भरलेले असले तर पकडलेला प्राणी झाडावरील एखाद्या मोठ्या काट्याला टोचून ठेवतो व दुसरा पकडण्याची तयारी करतो. अशा तऱ्हेने कित्येक प्राणी व किडे तो काट्यांना टोचून ठेवतो लहर लागेल तेव्हा या प्राण्यांचे लचके तोडून खातो. याचा आवाज कर्कश असतो प्रजोत्पादनाच्या काळात तो मंजूळ सूर काढतो. दुसऱ्या पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या आवाजांची हा हुबेहुब नक्कल करतो.

प्रजोत्पादनाचा काळ फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत असतो. एखाद्या काटेरी झाडावर फांदीच्या दुबेळक्यात किंवा झुडपावर काटक्या, गवत, चिंध्या वगैरेंचे खोल वाटीच्या आकाराचे घरटे तो बांधतो. मादी दर खेपेला तीन ते सहा अंडी घालते, ती फिक्कट हिरव्या रंगाची असून त्यांवर तपकिरी ठिपके असतात.

कर्वे, ज. नी.