कुत्रा : हा स्तनि-वर्गाच्या मांसाहारी गणातल्या कॅनिडी कुलातील कॅनिस वंशाचा प्राणी आहे. लांडगा (कॅनिस ल्युपस), कोल्हा (कॅनिस ऑरियस), कोयोट (कॅनिस लॅट्रॅन्स) हे इतर जंगली प्राणी याच वंशातील आहेत. ह्या सर्व प्राण्यांची शरीररचना, हाडांचा सांगाडा ह्यांमध्ये पुष्कळच साम्य आहे पण आकार, कातडी, केस व रंग ह्यांमध्ये फरक आहेत. कुत्र्याच्या वंशातील वर उल्लेखिलेल्या सर्व जातींमध्ये संकर होऊ शकतो व संकरित प्रजा प्रजोत्पादनक्षम असते म्हणून कुत्रा ह्या प्राण्याच्या उत्पत्तीचा विचार करताना कोल्हा व लांडगा हे कुत्र्याचे पूर्वज असावेत असे दिसते. ह्याच कारणासाठी माणसाळलेल्या कुत्र्याच्या सर्व जाती कॅनिस फॅमिलिरिस  ह्या जातिविशिष्ट नावाने ओळखल्या जातात. कुत्र्यांच्या जंगली जातींमध्ये ऑस्ट्रेलियातील डिंगो, आफ्रिकेतील केप हंटिंग, अमेरिकेतील कॅरॅसिसी, भारतातील ढोले व चीनमधील रॅकून ह्या जातींचा समावेश आहे.

गुणलक्षण व वागणूक: कुत्रा हा पदांगुलीचर (पायाच्या बोटांवर जोर देऊन चालणारा) प्राणी असून त्याच्या पुढच्या पायाच्या पंजाला पाच व मागील पायाच्या पंजाला चार बोटे असतात. बोटांवरील नख्या प्रतिकर्षी (आत बाहेर काढता येणाऱ्या) नसतात. त्याच्या दातांची एकूण संख्या बेचाळीस असून त्यांची मांडणी पुढचे दात ६/६, सुळे २/२, पूर्वदाढा ८/८ व दाढा ४/६ अशी असते. त्यांची जीभ मऊ असून तिच्यावरीलद्रवाच्या बाष्पीभवनाने तो शरीरातील उष्णतेचे नियंत्रण करू शकतो. त्याचे घ्राणेंद्रिय चांगलेच तीक्ष्ण असते. सहा मी. खोलवर पुरलेल्या माणसाच्या प्रेताचा मागोवा तो वासावरून घेऊ शकतो. त्याच्या वागणुकीतील बऱ्याच गोष्टींचा खुलासा त्याच्या पूर्वजाचा– लांडग्याचा– अभ्यास केल्याने मिळाला आहे. रस्त्याने जाताना एक पाय वर करून ठिकठिकाणी लघवी करून मार्गावर वासाच्या खुणा करून ठेवणे, खाद्य पुढे असताना वरचढ प्राण्याने आधी खाणे, थोडेफार खाद्य पुरून ठेवणे, परका प्राणी आला असताना भुंकणे, भीती वाटत असताना कर्कश आवाज काढणे, दुसऱ्या जनावराला भिवविण्यासाठी गुरगुरणे, दोघांत भांडण चालू असताना शेपटी वर करून ताठरपणाने चाल करून जाणे, पराभव झाला असताना उताणे पडणे किंवा शेपटी खाली करून केकाटत जाणे, जिंकला असताना पराभूत कुत्र्यावर उभे राहून गुरगुरणे, प्रणयाराधनातील विशिष्ट वर्तणूक, संभोगानंतर त्याच स्थितीत काही काळ राहणे इ. कुत्र्याच्या वागणुकीतील बऱ्याच लकबींचा उगम लांडग्याच्या वर्तनात सापडतो.

उत्पत्ती व इतिहास : कुत्र्याच्या उत्पत्तिविषयी प्राणिशास्त्रज्ञांत जरी अजून एकमत झाले नसले, तरी त्याची उत्पत्ती बहुधा लांडग्यांपासूनच झाली असावी असे मानण्यात येते. लांडग्यांसारखेच लहान मोठे आकारमान कुत्र्यांमध्येही आहे. शिवाय त्याच्या दातांची ठेवण लांडग्याच्या दातांच्या ठेवणीशी पुष्कळशी मिळतीजुळती आहे. कुत्र्याच्या वागणुकीतील पुष्कळ गोष्टींचे लांडग्याच्या वागणुकीशी असलेले साम्य लक्षात घेता कोल्ह्यापासून कुत्र्याची उत्पत्ती झाली असावी, असे मानण्याला फारसा आधार नाही.

पुरातन काळापासून कुत्रा हा मानवाचा सोबती आहे. आरंभी मनुष्याच्या रानटी अवस्थेत तो विस्तावावर मांस शिजवीत असताना सुटणाऱ्या वासामुळे कुत्रा त्याच्याजवळ आला व राहिला. मनुष्य त्याला मांस देऊ लागला. पुढे तो मांस मिळविण्यासाठी मनुष्याला मदत करू लागला आणि मानवाचा मित्र व चाकर झाला, असे पुरातन अवशेषांवरून दिसून येते. पुरापाषाण युगातील पन्नास हजार वर्षांपूर्वीच्या गुहांतील कोरीव चित्रकामात शिकारी माणसाच्या शेजारी कुत्र्याच्या ओबडधोबड आकृती आढळतात. मध्यपाषाण युगाच्या सुरुवातीस ॲझीलियन संस्कृतीच्या संबंधात डेन्मार्कमध्ये कुत्र्याचे अवशेष सापडले आहेत. सालुकी नावाची कुत्र्याची जात ख्रि.पू. ७००० ते ६००० वर्षांपूर्वी ईजिप्तमध्ये होती व नंतर इराणमध्ये (त्यावेळच्या पर्शियामध्ये) जोपासली गेली, असा उल्लेख आहे. वैदिक वाङ्‍मयातही कुत्र्यासंबंधीचे उल्लेख आहेत. महाभारतात युधिष्ठिराबरोबर स्वर्गाच्या दारापर्यंत एकटा कुत्राच होता असे दाखवून त्याचा इमानीपणा वर्णिला आहे. इंद्राची ‘सरमा’ नावाची कुत्री प्रख्यात होती. वेदकाळात काही कारणामुळे कुत्रा हा अपवित्र समजला गेलेला असला, तरी पुढे धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या त्याची महत्ता कमी न लेखता श्रीदत्तात्रेयाच्या सान्निध्यात त्याला स्थान देण्यात आले. पूर्वी ईजिप्तमधील लोक कुत्रा मेल्यास कुटुंबातील माणसे सुतकाचे चिन्ह म्हणून श्मश्रू करवीत असे हीरॉडोटस यांनी लिहिले आहे. शिवाजी महाराजांच्या एका विश्वा सू कुत्र्याची समाधी रायगडावर आहे. शाहू महाराज वारल्यावर त्यांच्या ‘खंड्या’ नावाच्या इमानी कुत्र्याने चितेत उडी टाकून प्राण दिला. साताऱ्यानजीक संगम माहुलीस महाराजांची समाधी आहे तेथेच त्याचीही समाधी असून त्यावर त्याची प्रतिमा बसवलेली आहे.

प्रजनन : जगातील निरनिराळ्या प्रदेशांत पाळलेल्या कुत्र्यांच्या बाबतीत प्रजननाच्या तपशिलात बराच फरक आढळतो. सर्वसाधारणपणे कुत्री (मादी) एक वर्षाची झाल्यावर वयात येते. काहींना यापेक्षा आधी, सहा महिन्यांनीच पहिला ॠतुस्राव होतो यानंतर दर सहा महिन्यांनी ॠतुचक्र सुरू राहते. ॠतुकाळी जननेंद्रियातून रक्त पडते व यावेळी मूत्रात येणाऱ्या दर्पयुक्त पदार्थामुळे कुत्रे (नर) मादीकडे आकर्षिले जातात. ॠतुकाळ जरी एक आठवडा राहत असला, तरी त्यानंतर काही दिवस– दोन आठवडेपर्यंत सुद्धा– कुत्री नराला संयोग करू देते. हा काळ संपण्यापूर्वी ७२ तास अंडमोचन (अंडाशयातून अंडे बाहेर पडणे) होते. ॠतुकाळ सुरू असताना कुत्री एकापेक्षा अधिक नरांना संयोग करू देते. अशा वेळी कधीकधी एकाच वेतात दोन नरांची पिले असण्याचा संभव असतो. नर-मादीच्या फलित संयोगानंतर ६२-६३ दिवसांनी कुत्री विते. अगदी लहान आकाराच्या ‘चिवावा’सारख्या जातीत एक किंवा दोन तर मोठ्या जातीत आठ ते दहा पिले होतात. पाच वर्षांनी मादीची जननक्षमता कमी होऊ लागते व आठ वर्षाच्या सुमारास संपूर्ण नष्ट होते.

आनुवंशिकता : हल्ली अस्तित्वात असलेल्या कुत्र्यांच्या जाती निरनिराळ्या जातींच्या संकरातूनच नव्हे तर संकरित प्रजेच्या संकरांपासून उत्पन्न झाल्या आहेत आणि त्यामुळेच कुत्र्यांचे आकार, वजन, केसांची लांबी व मऊपणा, रंग इ. बाबतींत विविधता आढळते. आनुवांशिकीच्या सिद्धांताच्या आधारावर कुत्र्यांचे विविध रंग, त्यांच्या छटा, अंगावरील पांढरे ठिपके, ठिपक्यांचा आकार (लहान मोठा) याबाबतींत प्रयोग करून निरनिराळ्या रंगांच्या जाती निर्माण केल्या गेल्या. त्याचप्रमाणे निरनिराळ्या अवयवांच्या ठेवणीचा विचार करता डॅशहुंडच्या पायाचा आखुडपणा, बुलडॉगच्या तोंडाचा बसकेपणा, स्पॅनियल व अल्सेशियन जातींतील कानांची लांबी व ठेवण याही बाबतींत वैशिष्ट्ये निर्माण झाली. इतकेच काय पण संकरातील जनुकांच्या (गुणसूत्रावरील म्हणजे आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्मघटकांवरील आनुवंशिक लक्षणे निर्देशित करणाऱ्या एककांच्या) विनिमयामुळे कुत्र्यांच्या स्वभाव विशेषांच्या बाबतीतही बदल घडवून आणून त्या त्या जातीची स्वभाव वैचित्र्येही निर्माण झाली.

कुत्र्याची निगा : मूलत: कुत्रा हा मांसाहारी प्राणी आहे. त्याच्या शरीरक्रियाविज्ञानाचा विचार करता तो बराच काळ उपाशी राहू शकतो. गरजेपुरते क जीवनसत्त्व तो शरीरात बनवू शकत असल्यामुळे त्याला भाजीपाला व फळे यांची आवश्यकता नसते. सवयीने बटाटे, टोमॅटो, गाजर, द्विदल धान्य आणि खरे तर मनुष्य खातो ते सर्व अन्न तो खाऊ शकतो. सामान्यपणे त्याला डुकराचे मांस, न शिजवलेले मासे व कोंबडी देत नाहीत. बाजारात कुत्र्याचे खाद्य म्हणून जे मिळते त्यात दूधभुकटी, अंडी, पनीर, मासे, कॉडलिव्हर तेल, मोलॅसिस (उसाच्या रसातील ज्या भागापासून साखरेचे स्फटिक साध्या प्रक्रियांनी करता येत नाहीत असा भाग) आदी पदार्थांचा समावेश असतो. कुत्र्यांना रोज किती खाणे द्यावे लागते यासंबंधी नक्की कोष्टक ठरविलेले नसले, तरी खालील प्रमाण मार्गदर्शक ठरावे. अगदी लहान जातीच्या कुत्र्यास रोज २०० ते २५० ग्रॅ., ५ ते १० किग्रॅ. वजनाच्या कुत्र्यांना ४५० ग्रॅ., १० ते २२ किग्रॅ. वजनाच्या कुत्र्यांना ६७५ ग्रॅ. व २२ किग्रॅ. वजनावरील कुत्र्यांना १ ते १·८ किग्रॅ. खाद्य देतात. अन्न पुढे ठेवल्यावर झपाझप जेवढे अन्न कुत्रा खातो तेवढीच त्याची भूक समजतात व त्याप्रमाणे कमीजास्ती अन्न देतात.


कुत्री आपल्या पिलांना ७ ते १० आठवडेपर्यंत पाजते. तोपर्यंत त्यांना बाहेरून खाद्य देण्याची सहसा जरुरी नसते. तथापि आईच्या दुधाला जोड म्हणून थोडेफार दूध देणे योग्य ठरते. आईचे दूध तुटल्यावर पिलाला ६ ते १० आठवड्यांमध्ये ४ तासांच्या अंतराने ४ वेळा, १० आठवडे ते ६ महिनेपर्यंत ५ तासांच्या अंतराने ३ वेळा व ६ महिन्यानंतर १ वर्षापर्यंत २ वेळा खाणे देतात. एका वर्षानंतर थोराड जाती सोडून बाकी जातीच्या कुत्र्यांना दिवसाकाठी एकदा खाणे दिले तरी चालते. पिलांना ३ महिन्यांनंतर हळूहळू मांस देतात. पिलांच्या खाण्यामध्ये ड जीवनसत्त्व व लोह यांचा समावेश करणे इष्ट  ठरते. सहा महिनेपर्यंत पिलांची वाढ जलद होत असते व नंतर त्यात थोडीशी भर पडून दीड ते दोन वर्षांपर्यंत वाढ पूर्ण होते. कुत्र्याला मधूनमधून अंघोळ घालतात पण चरचरणारा साबण वापरत नाहीत. शिकारी कुत्र्यांना सहसा अंघोळ घालण्याची प्रथा नाही.  कुत्री विण्यापूर्वी तिला अंघोळ घालतात म्हणजे तिच्या कातडीवरील कृमींच्या अंड्यांनी पिले दूषित होत नाहीत. केसाळ कुत्र्यांना नियमितपणे विंचरण्याची जरुरी असते. दिवसातून दोन वेळा तरी कुत्र्यांना मलमूत्र विसर्जनासाठी बाहेर नेणे इष्ट ठरते. लहानपणापासून घराबाहेर मलमूत्र करण्याची त्यांना सवय लावावी लागते.

उपयोग : (१) शिकारीच्या कामात कुत्र्यांचा विविध प्रकारे उपयोग होतो. लांडगा जन्मत: शिकारी प्रवृत्तीचे जनावर आहे. तो कळपात राहतो आणि आपल्या गुहेची चांगली राखण करतो. त्याची शिकार असलेल्या जनावरांचे कळप पाठलाग करून हाकलत नेतो. लांडग्याकडून कुत्र्यामध्ये उतरलेल्या ह्या व अशा इतर गुणांमध्ये आपल्या सोईप्रमाणे बदल घडवून आणवून मनुष्यप्राण्याने कुत्र्यांचा उपयोग विविध कामांसाठी करून घेतला आहे. हाऊंड जातीचे कुत्रे जमिनीवरील सस्तन प्राण्यांची वासावरून शिकार करण्यात पटाईत आहेत. ब्लडहाऊंड हे कित्येक तासांपूर्वी शिकार निघून गेली असली तरी तिचा मागोवा वासाने काढतात. पक्ष्यांच्या शिकारीची बाब मात्र वेगळी आहे. पक्षी मारणे अगर मालकाने मारलेला पक्षी हुडकून आणण्याच्या कामी रिट्रिव्हर ही जात तरबेज आहे. बहिरी ससाण्याच्या शिकारीसाठी स्पॅनियल कुत्र्याचा उपयोग होतो. बहिरी ससाणा पाहिल्यावर कुत्रा जमिनीवर आडवा पडतो व पक्ष्यावर व त्याच्यावर जाळे टाकले जाते तेव्हा तो स्वस्थ राहतो. सेटर नावाची कुत्र्याची जात जाळ्यात पक्षी सेट (set) करणे (म्हणजे जाळ्यात घालणे किंवा अडकविणे) यावरूनच निर्माण झाली. पुढे बंदुकीचा शोध लागल्यावर हेच सेटर जातीचे कुत्रे पॉइंटर म्हणून शिकार हुडकून काढण्याकरिता वापरण्यात येऊ लागले. शिकारीतील शेवटला टप्पा जो झडप घालणे ते काम टेरिअर जातीचे कुत्रे चांगल्या तऱ्हेने करतात. अशा रीतीने शिकारीतील सर्व बाबींमध्ये मानवाने कुत्र्यांचा उपयोग करून घेतला आहे. (२) कुत्र्याचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्यामुळे विशेष शिक्षण दिलेल्या कुत्र्यांचा गुन्हा शोधण्यासाठी चांगला उपयोग होतो. गुन्हेगाराचा संपर्क असलेली एखादी वस्तू (त्यात जमिनीचाही अंतर्भाव आहे) जेथपर्यंत वास घेण्यास उपलब्ध आहे तेथपर्यंतच कुत्रा गुन्हेगाराचा माग काढू शकतो. गुन्हेगार वाहनात बसून अथवा पाण्यातून पसार झाल्यास पुढील भाग काढण्यास कुत्रा असमर्थ होतो. (३) मालमत्तेच्या रक्षणाकरिता राखणदार म्हणून त्यांचा उपयोग होतो. ह्या कामी अल्सेशियन, डोबरमन ह्या जाती उपयोगी पडतात. (४) गुरांचे-मेंढरांचे कळप हाकलून विवक्षित स्थळी मालकाच्या हुकूमाप्रमाणे नेणे व चुकलेले जनावर शोधून आणून कळपात सोडणे ही कामे कोली जातीची कुत्री उत्तम करतात. (५) बर्फाळ प्रदेशात गाड्या ओढण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग करतात. एका गाडीला ८ ते १० कुत्री जोडतात. ती ताशी ८ किमी. प्रमाणे १,००० किग्रॅ. वजन एका गाडीतून रोज ४० किमी. वाहून नेऊ शकतात. (६) सोबत व लाडके जनावर म्हणूनही कुत्र्याचा उपयोग दुर्लक्षण्यासारखा नाही. याकरिता मध्यम आकाराच्या लहान जातींची निवड केली जाते. (७) आंधळ्यांना मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग केला जातो. मार्गातील अडथळे आणि वाहतूक चुकवून कुत्र्याला आंधळ्याचा मार्गदर्शक व्हावयाचे असते. म्हणून ह्या कामी मालकाला व कुत्र्याला देण्यात येणारे शिक्षण बरेच कष्टाचे असते. (८) संशोधन कार्यामध्येही कुत्र्यांचा उपयोग होतो. आनुवंशिकता व स्वभाव वैचित्र्य यांच्या अभ्यासाकरिता तसेच वैद्यकीय उपचारात्मक संशोधनामध्ये त्याचा उपयोग करण्यात येतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मधुमेहावरील संशोधन व रक्तरसावरील संशोधन. अंतराळ संशोधनामध्येही त्याचा उपयोग करण्यात आला आहे. (९) मनोरंजनासाठी कुत्र्यांच्या धावण्याच्या शर्यती १९१९ मध्ये प्रथम प्रचारात आल्या. ग्रेहाऊंड व सालुकी ह्या जाती शर्यतीसाठी प्रसिद्ध आहेत. [→ कुत्र्यांच्या शर्यती].

शिकविणे : कुत्र्याच्या नुकत्याच जन्मलेल्या पिलाला दिसत नाही व ऐकूही येत नाही. त्याचे कान आठवड्यानंतर कार्यक्षम होऊ लागतात व त्याला आवाज कळू लागतो. ह्याच सुमारास हिरडीतून दात वर येऊ लागतात. दोन आठवड्यांच्या सुमारास डोळे उघडतात. मध्यंतरीच्या काळात ते सरपटण्याऐवजी चालायलाही शिकते आणि आपल्या भावंडांबरोबर खेळायला लागते. मालकाच्या येण्याजाण्याकडे त्याचे लक्ष जाते व ते हुंगून वास घ्यावयास लागते. मालक यावेळी त्याच्याशी सलगी करतो व ते आठ आठवड्यांचे झाल्यावर त्याला शिकविण्यास सुरुवात करतो. कारण यावेळी पिलाच्या तंत्रिका तंत्राची (मज्जासंस्थेची) पूर्ण वाढ झालेली असते. सुरुवातीचे शिकविणे त्याला चांगल्या सवयी लावण्याबाबतचे असते. विवक्षित ठिकाणी मलमूत्र विसर्जन करणे, इतरत्र न करणे ‘बस’, ‘उठ’, ‘चल’, ‘आण’ इ. हुकूम पाळणे ह्या गोष्टींवर भर देतात. कुत्र्याला शिकविणे ही एक कला आहे. पाश्चिमात्य देशांत कुत्र्याला व त्याच्या मालकाला शिकविण्याचे वर्ग आहेत. शिकविताना धिमेपणा, चातुर्य, हुशारी, ममता इ. गुणांचा शिक्षकाला उपयोग होतो. लहान वयाच्या कुत्र्यांना शिक्षेचा धाक दाखवला तरी चालतो पण प्रौढ कुत्र्याला मारलेले मुळीच आवडत नाही. प्रोत्साहन, शाबासकी व बक्षिसादाखल खाऊ देऊनच त्यांना शिकविण्याचे कार्य पार पाडावे लागते. कुत्र्याच्या प्रमस्तिष्काच्या बाह्यकाची (मेंदूच्या सर्वांत वरच्या स्तराची) चांगली वाढ झालेली असल्यामुळे तो बुद्धिवान प्राणी आहे. त्याची ज्ञानेंद्रिये बरीच तीव्र आहेत. माणसापेक्षा कितीतरी अधिक पटीने तो ऐकू शकतो. एंगेलमान ह्या जर्मन संशोधकांनी केलेल्या प्रयोगावरून असे दिसून आले की, जो आवाज माणूस ६ मी. अंतरावरून ऐकू शकत नाही तोच आवाज कुत्रा २४ मी. अंतरावरून ऐकून हुकूम पाळतो. कुत्र्याचे नाक चांगलेच संवेदनाक्षम आहे. तो तऱ्हेतऱ्हेचे वास कसे ओळखू शकतो याविषयी आश्चर्य वाटते. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, कुत्र्याच्या नाकाची विशिष्ट रचना व प्रत्यक्ष मेंदूंतील तंत्रिकातंतूंशी (मज्जातंतूंशी) त्याची जोडणी यामुळे ओलसर नाक असलेला निरोगी कुत्रा नाकातील निःस्रावाच्या मार्फत आजुबाजूच्या हवेतील स्वाद व वास शोषून घेतो. एकदा वास घेतलेली वस्तू काही काळानंतरही तो ओळखू शकतो. कुत्र्याला रंगाचे ज्ञान असत नाही. त्याची दृष्टी मात्र माणसापेक्षा खूपच कमी असते. थोड्याशा अंतरावर वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला उभा असलेला निश्चल माणूस तो जाणू शकत नाही पण माणसाने हालचाल केली की, ती त्याला चटकन जाणवते. उत्तमपैकी शिकवलेला कुत्रा १०० प्रकारच्या आज्ञा पाळू शकतो. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस जर्मनीने ४० ते ५० हजार कुत्रे शिकवून तयार ठेवले होते. त्यांची मुख्य कामे लष्करी साठ्यांची राखण करणे, छावणीत शिरलेल्या परस्थांचा माग काढणे व निरोप पोहोचविण्याचे काम करणे अशी होती.  कोणत्या जातीच्या कुत्र्याची शिकविण्यासाठी निवड करावी हे तो कुत्रा कोणत्या कामाकरिता वापरावयाचा आहे यावर अवलंबून असते. अर्थात प्रत्येक कुत्र्याला थोड्याफार प्रमाणात तरी शिक्षण देणे जरूरीचे असतेच.


श्वान पैदास संस्था व प्रदर्शने: पश्चिम यूरोप आणि उत्तर अमेरिकेत कुत्र्यांची पैदास करणारे बरेच लोक आहेत. कुत्र्यांच्या निरनिराळ्या जातींची शास्त्रोक्त पैदास व प्रदर्शने ही एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाली. इंग्लंडमध्ये कुत्र्यांचे पहिले प्रदर्शन न्यू कॅसल येथे १८५९ मध्ये भरले होते असे ई.सी. ॲश यांनी लिहून ठेवले आहे. अमेरिकेतही ह्याच सुमारास कुत्र्यांची प्रदर्शने भरू लागली व न्यूयॉर्क येथे १८८० साली झालेल्या प्रदर्शनात कुत्र्यांच्या २९ जाती होत्या. कुत्र्यांच्या प्रदर्शनातील बक्षिसांसंबंधीचे नियम ठरवणे, जातींची प्रमाणित मोजमापे, रंग, आकार व इतर वैशिष्ट्ये ठरवणे, कुत्र्यांच्या संबंधीचे कायदेशीर नियम करण्यास मदत करणे व कुत्र्यांसंबंधीचे इतर प्रश्न सोडवणे इ. कामे करण्यासाठी ‘केनेल क्लब ऑफ इंग्लंड’ नावाची संस्था ब्रिटनमध्ये १८७३ साली स्थापन झाली. ‘अमेरिकन केनेल क्लब’ ही संस्था १८८४ साली स्थापन झाली, पण तत्पूर्वी १८४४ मध्ये ‘फॉक्सहाऊंड ॲसोसिएशन’ नावाची संस्था अस्तित्वात होती. इतर देशांतही ह्याच कामासाठी अशाच स्वरूपाच्या संस्था स्थापन झाल्या. भारतात दोन ‘केनेल क्लब’ असून त्यांच्या मार्फत मोठ्या शहरांतून कुत्र्यांची प्रदर्शने भरतात. अमेरिकेत व इतर पाश्चात्त्य देशांत कुत्र्यांसंबंधी माहिती प्रसारित करणारी नियतकालिके आहेत, इतकेच नव्हे तर त्यांच्यासंबंधी लिहिलेले स्वतंत्र ग्रंथही उपलब्ध आहेत.

जाती: एकाच कुलातले पण हवामान, अन्न प्रकार व संकरजनन ह्यांमुळे कुत्र्यांच्या निरनिराळ्या जाती अस्तित्वात होत्या, त्यात विसाव्या शतकामध्ये आणखी भर पडत गेली व अजूनही त्यांची संख्या वाढतच आहे. अमेरिकन केनेल क्लबने सर्वांत जास्त म्हणजे शंभराहून अधिक जातींची नोंद केली असली, तरी जगातील सर्व कुत्र्यांच्या जातींची संख्या चारशेच्या आसपास असावी असा अंदाज आहे. आकार, वजन, रंग व त्यांच्या छटा, केसांची लांबी, त्यांचा मऊपणा, नाक व कान यांची ठेवण, कानांची लांबी, स्वभाव वैशिष्ट्ये इ. बाबतींत जातीजातींत बरीच विविधता आढळते. सर्वांत लहान जातीच्या कुत्र्याचे वजन ६०० ग्रॅ. तर मोठ्यात मोठ्या कुत्र्याचे वजन १०० किग्रॅ. इतके असते. त्याचप्रमाणे २० सेंमी. ते १·२५ मी. पर्यंत उंची असलेले कुत्रे आहेत. रंगाच्या बाबतीत तर बरीच विविधता दिसून येते. ह्या सर्व जातींचे वर्गीकरण करण्याच्या पद्धती निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या आहेत. पण सामान्यपणे शिकारी व बिनशिकारी असे मुख्य दोन वर्ग समजले जातात. केनेल क्लब ऑफ इंग्लंड या संस्थेने शिकारी वर्गात हाऊंड, टेरिअर यांसारख्या जातींचा तर बिनशिकारी वर्गात विविध कामे करणारी कुत्री, खेळण्यासारखी (टॉय ब्रीड) कुत्री व इतर सर्व जातींचा समावेश केलेला आहे. अमेरिकन केनेल क्लबने तयार केलेले वर्गीकरण खाली दिले आहे.

(१) शिकारी : शिकारीमध्ये मनुष्याला मदत करणारी कुत्री निरनिराळ्या तऱ्हेनेही मदत देतात. त्यांचे शिक्षणही त्या विशिष्ट कार्यापुरते परिपूर्ण असते. काही जातींची कुत्री माणसांना शिकार हुडकून देतात पण स्वत: शिकार मारीत नाहीत. काही मनुष्याने मारलेली शिकार हुडकून काढून त्याला आणून देतात. ही दोन्ही कामे करणाऱ्या कुत्र्यांच्या जातींचा ह्या वर्गात समावेश होतो. उदा., पॉइंटर, सेटर, स्पॅनियल, रिट्रिव्हर.

 (२ )हाऊंड : माणसाने दाखवून दिल्यावर शिकार मारणारे, त्याचप्रमाणे शिकार पाहणारे व मारणारे अशा दोन्ही जाती या वर्गामध्ये मोडतात. उदा., ग्रेहाऊंड, फॉक्सहाऊंड, ब्लडहाऊंड, डीअरहाऊंड.

 (३) विविध कामे करणारी : जनावरे वळवणारे, घरी व शेतवाडीवर राखण करणारे, सोबत करणारे अशा जातींचा समावेश ह्या वर्गात केला जातो. उदा., मॅस्टिफ, न्यूफाउंडलंड, जर्मन शेपर्ड, ग्रेट डेन, सेंट बर्नार्ड, एस्किमो.

 (४) टेरिअर : ब्रिटिश बेटांवरील विशिष्ट जातींचाच ह्यामध्ये समावेश आहे.‘टेरे’ म्हणजे धरणी, धरणीवरील गुहेत राहणाऱ्या जंगली प्राण्यांची शिकार करणारे म्हणून टेरिअर हे नाव पडले. उदा., बुलटेरिअर, फॉक्सटेरिअर, आयरिशटेरिअर.

 (५) खेळण्यासारखी : लहान जातींच्या कुत्र्यांचा हा वर्ग आहे. बऱ्याचशा जाती म्हणजे मोठ्या जातींच्या बुटक्या आवृत्त्याच म्हटले तरी चालेल. उदा., पेकिंगीझ पग, पोमेरेनियन.

 (६) बिनशिकारी : सोबत व प्रदर्शनाकरिताच ज्या जातींची ख्याती आहे अशा विविधता असलेल्या जाती ह्या वर्गामध्ये समाविष्ट केल्या आहेत. उदा., बुलडॉग. डॅलमेशन, चाऊचाऊ. वर उल्लेखिलेल्या वर्गीकरणात समाविष्ट करता न येण्यासारख्या अन्य काही जाती आहेत. त्यांतील काहींना तर कुठल्याच देशातील केनेल क्लबची मान्यता नाही.

कायदे : इंग्लंडमध्ये सहा महिन्यांवरील कुत्रा पाळण्यासाठी परवाना असणे कायद्याने जरूर आहे व तो टपाल कार्यालयात मिळतो. कुत्रा दुसऱ्यांदा चावल्यास त्याच्या मालकाला कायद्याने नुकसानभरपाई देणे भाग पडते व अशा कुत्र्याला ठार करण्याचा हुकूम न्यायाधीश देऊ शकतो. दुसऱ्याचा कुत्रा चोरणे, ठार मारणे हे दंडनीय गुन्हे आहेत. अशाच तऱ्हेचे कायदे अमेरिका व इतर देशांत केलेले आहेत. कुत्रे पाळण्यासाठी परवाना घेतला पाहिजे असा कायदा भारतातील मोठ्या शहरांच्या बहुतेक नगरपालिकांनी केला आहे.

रोग : मनुष्यप्राण्याप्रमाणे कुत्र्यामध्ये दैहिक, प्राकृतिक व संसर्गजन्य रोग असतात. हृद्‌रोग आणि कर्करोग यांसारखे प्राकृतिक रोग कुत्र्यांना होतात. काही प्रमुख रोगांचा उल्लेख खाली केला आहे.

डिस्टेंपर : मुख्यत्वेकरून कुत्र्यांच्या पिलांना विषाणूमुळे (अतिसूक्ष्म जंतूमुळे, व्हायरसामुळे) होणारा सांसर्गिक रोग. विषाणूंच्या बरोबरच इतर जंतूंचाही प्रवेश शरीरात होतो व त्यामुळे फुप्फुसशोधासारख्या (फुप्फुसाच्या दाहयुक्त सुजेसारख्या) समस्या वाढून त्याचा परिणाम रोग बरेच दिवस रेंगाळण्यात होतो. रोगी कुत्र्यांच्या संसर्गाने अगर त्यांच्या मलमूत्राने दूषित झालेले पाणी व खाद्य खाल्ल्यामुळे निरोगी कुत्र्यांना रोग होतो. रोगी कुत्र्याच्या उच्छ्‌वासातील तुषारांनी हवेतूनही रोगप्रसार होतो. भारतातील जातींमध्ये ह्या रोगाचे प्रमाण कमी दिसते पण परदेशी जातींमध्ये जास्त आढळते. कुत्र्याला ३९ते ४०से. ताप येतो आणि तो २-३ दिवस राहतो. रोगाचा परिपाक काल (रोगाची बाधा झाल्यापासून रोगलक्षणे दिसू लागेपर्यंतचा काळ) ३ ते ७ दिवसांचा आहे. डोळे येतात, त्यातून पातळ नि:स्राव येतो, हा स्राव पुढे पुवासारखा घट्ट व चिकट होतो. ताप तीन दिवसांनी कमी होतो पण पुन्हा वाढतो. तो बरेच दिवस कमी होत नाही. चिकट व घाण वास येणारे जुलाब होतात. फुप्फुसशोथ, खोकला, काही वेळा अपस्मार (वारंवार बेशुद्धी आणणारा मज्जातंतूंचा विकार), मागच्या पायांचा पक्षाघात ही लक्षणे दिसतात. पोटावर खालच्या बाजूस बारीक पुळ्या दिसतात. पायाचा चवडा जाड होतो. एक वर्षाच्या आतील कुत्र्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते. लक्षणाप्रमाणे उपचार करतात. अंड्यापासून तयार केलेली प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. ती ८ ते १० आठवडे वयाच्या पिलांना टोचतात. ही लस दरवर्षी टोचणे इष्ट ठरते.

सांसर्गिक यकृतशोथ : (रूबार्थ रोग), इंग्लंड, अमेरिका, स्वीडन वगैरे देशांत लहान वयाच्या कुत्र्यांत हा रोग आढळतो व त्यात मृत्यूचे प्रमाणही बरेच आहे. अमेरिकेत कोल्ह्यामध्ये आढळणाऱ्या ‘फॉक्स एनसेफलायटिस’ ह्या रोगाशी बराच मिळताजुळता आहे. विषाणूमुळे होणारा हा कुत्र्यांचा संसर्गजन्य रोग आहे. प्रामुख्याने यकृत व रक्तवाहिन्यांच्या भित्तीचा हा रोग आहे. रिचर्ड ग्रीन यांनी १९३० साली रोगी खोकडामधून ह्या रोगाच्या विषाणूंचा शोध लावला. पुढे त्यांनीच १९३४ साली प्रायोगिक रीत्या कुत्र्यांमध्ये ह्या विषाणूंनी रोग उत्पन्न केला. सीव्हन रूबार्थ यांनी १९४७ साली कुत्र्यांना नैसर्गिक रीत्या ह्याच विषाणूमुळे हा रोग होतो हे सिद्ध केले. रोग तीन ते नऊ महिन्यांच्या कुत्र्यांच्या पिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. तीव्र प्रकारात पिलू आजारी न दिसता एकाएकी मेलेले आढळते. कमी तीव्र प्रकारात रोगाचा परिपाक काल ६ ते ९ दिवसांचा असतो. रोगाचे पहिले लक्षण म्हणजे ४०ते ४१से. ताप येतो व तो सहा दिवसांपर्यंत राहतो. कधीकधी थोडासा ताप येऊन कमी होतो व एवढ्यावरच रोग थांबतो. ताप दोन दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास रोगाची इतर लक्षणेही दिसू लागतात. भूक न लागणे, उलट्या, रक्तमिश्रित जुलाब, मान, डोके व जीभ यांवर शोफ (द्रवयुक्त सूज), पोटावर यकृताच्या जागी दाबल्यास दुखते व कुत्रा कण्हू लागतो. तोंडातील श्लेष्मकला (अस्तरासारखी पातळ त्वचा) लालभडक होणे हे महत्त्वाचे लक्षण समजले जाते. रक्तवाहिन्यांमध्ये विकृती होत असल्यामुळे आंत्रावरणाखाली (आतड्यावरील पडद्याखाली) पाणी साठते. कनीनिका (बुबुळ) निळसर, पांढरी होते. लक्षणात्मक उपचार करतात. कुत्र्यापासून तयार केलेला प्रतिरक्तरस (रोगप्रतिकारक ग्लोब्युलीन म्हणजे एक प्रकारचे प्रथिन असलेला रक्तातील द्रव पदार्थ) रोग बरा करण्यास उपयोगी पडतो. ऊतकसंवर्धकामध्ये (कृत्रिम रीत्या वाढविलेल्या ऊतकांमध्ये म्हणजे पेशी समूहांमध्ये व्हायरसाची वाढ करून) तयार केलेली प्रतिबंधक लस उपलब्ध असून ती कार्यक्षम आहे. कुत्र्याचा डिस्टेंपर व सांसर्गिक यकृतशोथ ह्या दोन्ही रोगांवरील एकत्रित लसही बाजारात उपलब्ध आहे. मुख्यत्वे रोगी कुत्र्याच्या मूत्रामधून रोगप्रसार होतो. रोगातून बरे झालेले कुत्रे रोगवाहक असते.


अलर्क रोग : (पिसाळ रोग). विषाणूमुळे कुत्र्यांना होणारा प्राणघातक भयंकर रोग. रोगी कुत्र्याच्या दंशामुळे हा इतर प्राण्यांना तसेच माणसांनाही होतो. रोगामुळे मुख्यत: तंत्रिका तंत्रात व मेंदूत विकृती उत्पन्न होते व कुत्रा पिसाळतो. पिसाळलेला कुत्रा सैरावैरा पळतो व जे जे दिसेल त्याला चावतो. त्याच्या लाळेतून जाणाऱ्या विषाणूमुळे रोगाचा प्रसार होतो. माणसांत, इतर प्राण्यांत अगर कुत्र्यांत रोगलक्षणे दिसू लागल्यावर कुठलाही खात्रीलायक उपाय अस्तित्वात नाही व म्हणूनच पाश्चात्त्य देशांत अलर्क प्रतिबंधक लस टोचल्याशिवाय कुत्रे पाळण्याचा परवाना मिळत नाही. [ → अलर्क रोग].

नृत्यवात : डिस्टेंपर किंवा त्यासारख्या विषाणूजन्य रोग होऊन गेल्यावर फार अशक्तपणा आला असल्यास तंत्रिका तंत्रावर ताण पडल्यामुळे हा रोग होतो. रोगाचे नक्की कारण समजलेले नाही, तथापि विषाणू अगर जंतूंच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या विषारी पदार्थाचा तंत्रिका तंत्रावरील परिणाम हे असावे असा अंदाज आहे. शरीरातील एखाद्या भागातील एक किंवा अधिक इच्छानुवर्ती (इच्छेनुसार हालचाल करता येणाऱ्या) स्नायूंचे लयबद्ध आकुंचन व प्रसरण होत राहते व त्यावर रोग्याचा ताबा राहत नाही. कपाळावरील, ओठांच्या व खालच्या जबड्याच्या स्नायूंचे आकुंचन-प्रसरण सुरू होऊन मान व पुढचे पाय यांना हा संपर्क पोहोचतो. तोंडास फेस येतो. शक्तिवर्धक औषधे व जीवनसत्त्वयुक्त आहार यांनी रोग बरा होण्यास मदत होते. रोगावर विशिष्ट उपचार उपलब्ध नाही.

कुत्र्यांचा उन्माद : वारंवार झटके येणारा हा एक तंत्रिकाजन्य रोग असून त्याची निश्चित कारणे माहीत झालेली नाहीत. काही तज्ञांच्या मते ब ह्या जीवनसत्त्वाचा अभाव, टायलेशिया ट्रिटिसी  या परजीवीचे (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या जीवाचे) गव्हाच्या शिळ्या पिठात दिसणारे बीजाणू (परजीवीचे सुप्तावस्थेतील निरोधक रूप), पोटातील कृमी व बाह्य कानातील परजीवी ही ह्या रोगाची कारणे असू शकतात. रोग आनुवंशिकही असू शकतो. ग्रेहाऊंड कुत्र्यामध्ये शर्यतीच्या पहिल्या काही पल्ल्यात रोगलक्षणे आढळतात. गन जातीच्या कुत्र्यांना काम करू लागताच बंदुकीच्या पहिल्या आवाजाबरोबर झटका येतो. कुत्रा अस्वस्थ होऊन ओरडू लागतो, धावत सुटतो, क्वचित बेशुद्ध होऊन पडतो. त्याच्या हालचालींमध्ये विसंगती दिसून येते, डोळे तारवटलेले दिसतात व तो धन्याचा आवाज ओळखू शकत नाही. तो शरीराचे स्नायू जोर करून ताणतो, धडपडतो व खाली पडतो. काही वेळाने थोडे शांत होऊन उठतो तेव्हा थकून गेलेला दिसतो. असा झटका २ ते ३ मिनिटे टिकतो, पण फिरून १० ते २० मिनिटांनी येतो वा एकापाठोपाठ एक झटके येतात.

ताज्या गव्हाच्या पिठाचे पदार्थ, अंडी, मांस व दूध असा अ आणि ब जीवनसत्त्वयुक्त आहार यामुळे रोगप्रतिबंध होण्यास मदत होते. रोगी कुत्र्याला शारीरिक किंवा मानसिक त्रास होणार नाही अशी भोवतालची परिस्थिती ठेवतात. नेहमीच्या आहारात बदल केल्यास हितकारक ठरतो. कुत्र्याला झटका आला, तर काहीही उपचार लागू पडत नाही म्हणून त्याने धडपड करू नये, स्वत:ला किंवा इतरांना इजा करू नये ह्याची काळजी घेतात. बाहेर शिकारीसाठी नेलेला असेल तर ताबडतोब घरी आणतात. तो कुक्कुरालयात (कुत्र्याच्या घरात) असल्यास दूर निराळा ठेवतात म्हणजे इतरांना त्रास होत नाही. आचके येऊन गेल्यानंतर कुत्र्यास ॲस्पिरीन, क्लोरीटोन, ल्युमिनॉल यांसारखी औषधे देतात त्यामुळे तो काही तास शांत राहतो पण औषधांचा परिणाम संपल्यानंतर पुन्हा आचके येतात, तरीपण ही शामक औषधे एकसारखी चालूच ठेवणे योग्य नाही.

लेप्टोस्पायरोसिस : लेप्टोस्पायरा इक्टेरोहॅमरेजिका  व ले. कॅनिकोला  या सूक्ष्मजंतूंमुळे कुत्र्यांमध्ये होणारा संसर्गजन्य रोग. रोगी किंवा नुकत्याच बऱ्या झालेल्या कुत्र्यांच्या मूत्रातून ४ ते १८ महिनेपर्यंत रोगजंतू आढळतात. निरोगी कुत्र्यांना या रोगजंतूंचा संसर्ग होऊन रोगप्रसार होतो. माणसात हे रोगजंतू रोग उत्पन्न करतात आणि ताप व कावीळ अशी लक्षणे दिसतात.

कुत्र्यामध्ये ताप, भूक न लागणे, हगवण, वांत्या, शोष पडणे, तोंडाला घाण येणे, कावीळ इ. लक्षणे दिसतात. काही वेळा विशेषत: लहान वयाच्या कुत्र्यात मूत्रपिंडशोथ, मूत्रविषरक्तता (मूत्रातून बाहेर फेकले जाणारे घातक पदार्थ रक्तात मिसळणे) होऊन शुद्ध हरपून मृत्यू ओढवतो.

रोगोपचार लवकर सुरू केले तर पेनिसिलिनाचा चांगला उपयोग होतो. रोगप्रतिबंधक लस उपलब्ध आहे.

गोचिडजन्य ताप : बबेसिया कॅनिस  व ब. गिबसोनाप  ह्या परजीवी प्रजीवांमुळे (एकच पेशी असलेल्या जीवांमुळे, प्रोटोझोआंमुळे) कुत्र्यांना होणारा संक्रामक (संसर्गजन्य) रोग. ब. कॅनिस यूरोप, अमेरिका, भारत व आफ्रिका या प्रदेशांत आढळतो, तर ब. गिबसोनाय भारतात आढळतो. रक्तातील तांबड्या पेशीत जगणारे हे परजीवी ऱ्हीपीसेपिलस सॅंगवीनसहीमोफायसॅलिस बायस्पिनोसा नावाच्या गोचिड्यांमार्फत रोगी कुत्र्यातून निरोगी कुत्र्यात गोचिड्यांच्या लाळेतून चाव्याच्या वेळी टोचले जातात. रोगी कुत्र्याचे रक्तशोषण करतेवेळी गोचिड्यांच्या शरीरात गेलेले प्रजीव अंड्यांमार्फत त्यांच्या (गोचिड्यांच्या) पुढील पिढीत जाऊन रोगप्रसार करतात. ४२से. पर्यंत ताप चढणे, रक्तक्षय, कावीळ, रक्तांकितमूत्र ही प्रमुख रोगलक्षणे दिसतात. कधीकधी तंत्रिका तंत्रात विकृती (दोष) उत्पन्न होते. रोग बरेच दिवस रेंगाळत राहिल्यावर मृत्यू ओढवतो. ट्रिपॅन ब्ल्यू, ॲकॉप्रिन, फेनॅमिडाइन ही औषधे टोचल्याने रोग बरा होतो. गोचिड्यांचा नायनाट केल्याने रोगप्रतिबंध होतो.

कृमिजन्य रोग : (अ) अंतःजीवोपजीवी : कुत्र्यांना बऱ्याच जातींच्या गोलकृमींमुळे आजार संभवतात. त्यातील स्कॅरिस, अँकायलोस्टोमा, टॉक्सोकॅरा  ह्या जातींच्या कृमींमुळे जुलाब, रक्तक्षय, कृश होत जाणे यांसारखी लक्षणे दिसतात. टीनीया, डिप्लीडियम आणि इकिनोकॉकस  जातींच्या फीतकृमींमुळे चिरकारी (दीर्घकालीन) जुलाब, अपस्मार इ. लक्षणे दिसतात. इकिनोकॉकस ह्या कुत्र्याच्या कृमीमुळे माणसालाही आजार होतो. कुत्र्यांना मधूनमधून कृमिनाशक औषधे दिल्याने कृमिजन्य आजार होत नाहीत. (आ) बाह्यजीवोपजीवी : सॉरकॉप्टिस  व सोरॉप्टिस  नावाचे माइट (एक प्रकारची कीड) कुत्र्यांच्या केसांच्या मुळात घुसतात आणि त्यामुळे अतिशय कंड सुटून खाजविल्याने केस गळून पडतात. ह्या रोगाला ‘लूत’ म्हणतात. लूत बरी होण्यासाठी गंधकाच्या मलमासारख्या औषधांचा उपचार सतत करणे आवश्य असते.

पिसवा व उवा ह्यांमुळे कुत्रा अस्वस्थ होतो, एकसारखे खाजवतो व त्यामुळे कातडीचा क्षोभ होतो. उवा त्यांच्या सर्व आयुष्यभर कुत्र्याच्या अंगावरच राहतात. त्यामुळे तेलमिश्रित द्रव लावल्याने त्यांचा नायनाट करता येतो. पिसवांचा नायनाट मात्र कुत्र्याच्या अंगावर तसेच पिसवांच्या प्रजननाच्या जागांवर कीटकनाशक भुकटी फवारून करावा लागतो.

गोचिडी शक्यतोवर हातांनी उपटूनच काढाव्या लागतात. त्याचबरोबर टिकिसॉलासारखी मिश्रणे लावतात म्हणजे गोचिड्या मरून गळून पडतात. (चित्रपत्रे ३ व ४).

संदर्भ : 1. Hagan, W.A. Bruner, D.W. The Infectious Diseases of Domestic Animals, London, 1951.  

     2.Indian Council of Agricultural Research, Handbook of Animal Husbandry, New Delhi, 1967.     

3. Leyer, E.S. Dogs of the World, London, 1964.  

     4. Merchant, I.A. An Outline of the Infectious Diseases of Domestic Animals, Minneapolis (U.S.), 1953.

     5. Prater, S.H. The Book of Indian Animals, Madras, 1965.

     6. Soman, W.V. The Indian Dog, Bombay, 1963.

खळदकर, त्रिं. रं. काळे, म. ग. नामदास, रा. भा.


एअरडेल बीगल  फिनिश स्पिट्झ डॅशहुंड बुलटेरिअर लाशा आप्‌सो


ब्लडहाऊंड बुलडॉग गोल्डन रिट्रिव्हर सालुकी कॉकर स्पॅनियल अल्सेशियन