शंख : मॉलस्का हा मृदुकाय म्हणजे शरीर मऊ असलेल्या प्राण्यांचा संघ आहे. गॅस्ट्रोपोडा हा या संघाचा एक वर्ग असून या वर्गात गोगलगायी, कवड्या, लिंपेट, हेटेरोपॉड इ. प्राणी येतात. या बहुतेक प्राण्यांना एकपुटी, कप्पे नसलेले, कठीण कवच असते. या कवचाला शंख व त्यात राहणार्‍या गॅस्ट्रोपॉड (उदरपाद) प्राण्यांना शंखधारी वा शंखवासी म्हणतात. शंख सामान्यपणे मळसूत्राप्रमाणे सर्पिल व असमित (विभाजनाने दोन समान न होणारा) असतो. कँकिओलीन व कॅल्शियम कार्बोनेट (कॅल्साइट वा अँरॅगोनाइट) यांच्या विशिष्ट थरांनी शंख बनलेला असतो. या कवचाच्या लगेच खाली असणार्‍या त्वचेच्या घडीला म्हणजे प्रावाराच्या स्रावापासून हे थर तयार होतात. शंखाचा आतला पृष्ठभाग चिनी मातीसारखा दिसतो तर काहींचा मोत्यासारखा दिसतो. शंखाची वेटोळी एकमेकांस चिकटलेली असून लगतच्या दोन वेटोळ्यांमधील संधिरेषेला सेवनी म्हणतात. शेवटचे वेटोळे सामान्यपणे आधीच्या वेटोळ्यांपेक्षा मोठे असते. शेवटचे वेटोळे वगळून उरणार्‍या शंखाच्या भागाला त्याचा कळस वा शिखर म्हणतात आणि कळसाच्या टोकाला शिखराग्र म्हणतात. शिखराग्रापासून सर्वांत दूर असलेला शंखाचा भाग म्हणजे त्याचा पाया होय. काही प्राण्यांच्या शंखाच्या पायाच्या पश्च टोकाजवळील वरील भागात कॅल्शियममय किंवा केराटीन या प्रथिनाचे शृंगमय पदार्थाचे पत्र्यासारखे झाकण असते, त्याला प्रच्छद म्हणतात. बहुतेक गॅस्ट्रोपॉड प्राणी आपले शरीर आखडून शंखात घेऊ शकतात. प्राणी शंखात शिरल्यावर हे प्रच्छद घट्ट लावून घेतो. त्यामुळे शंखाचे द्वारक (मुख) बंद होते आणि मासे, खेकडे यांसारख्या शत्रूंपासून त्याचे रक्षण होते. थंड प्रदेशातील काही गॅस्ट्रोपॉड प्राणी हिवाळ्यात शंखामध्ये झोपून राहतात म्हणजे शीतनिद्रा घेतात. या काळात ते शंखाचे द्वारक एका झाकणाने बंद करून घेतात. शीतनिद्रेचा काळ संपताना हे झाकण प्राणी विरघळवून टाकतो. अशा रीतीने शंखाचा संरक्षणासाठी उपयोग होतो. तसेच काही अवयवांना त्याचा आधारही मिळतो.

शंखाच्या वेटोळ्यांच्या आतील बाजू एकमेकींना घट्ट चिकटलेल्या असतात. त्यामुळे कवचाच्या मध्यभागी शिखराग्रापासून पायापर्यंत जाणारा एक कण तयार होतो, त्याला मध्याक्षक म्हणतात. अशा प्रकारे शंखातील पोकळी मुखापासून शिखराग्रापर्यंत सलग असते. शिखराग्र निरीक्षकापासून दूर राहील अशा रीतीने शंख हातात धरल्यास व मुखाच्या बाजूने पाहिल्यास मुख निरीक्षकाच्या उजवीकडे येऊ शकते. अशा प्रकारे शंखाच्या उजवीकडे वळलेल्या गुंडाळीचे वर्णन दक्षिणावर्ती असे करतात. बहुतेक गॅस्ट्रोपॉडांचे शंख दक्षिणावर्ती असतात. थोड्याच प्राण्यांचे शंख याच्या उलटे म्हणजे वामावर्ती (गुंडाळी डावीकडे वळलेले) असतात. काही शंखांत विकुंडलन म्हणजे वेटोळ्यांच्या र्‍हास झालेला आढळतो. [⟶ गॅस्ट्रोपोडा].

शंखांचे आकार, आकारमान, रंग, त्यावरील नक्षी, चकाकी, मुखाचे स्वरूप इ. बाबतींत पुष्कळ विविधता आढळते. या वैशिष्ट्यांचा उपयोग गॅस्ट्रोपॉड प्राण्यांचे वर्गीकरण करतानाही होतो. पेला, नलिका, पट्टी, घुमट, गोल, बिंब, शंकू, द्विशंकू, चाती, टोपी, बुटका मनोरा, ज्वालामुखी (उदा., लिंपेट) इ. अनेक आकारांचे शंख असतात. शंखांचे आकारमानही अगदी भिन्न असते. कॅरिबियन समुद्र व ऑस्ट्रेलियाचा समुद्रकिनारा येथील काही शंखांचे (उदा., हॉर्सकाँच) आकारमान ६० सेंमी. पेक्षा जास्त असते. जमिनीवरील महाकाय आफ्रिकी गोगलगायींचे २० शंख एका ओळीत जवळजवळ ठेवल्यास त्यांची एकूण लांबी २·५ सेंमी. पेक्षाही कमी असते. काही शंखांचे पृष्ठभाग गुळगुळीत, चकचकती, रंगहीन अथवा रेषा, पट्टे, ठिपके यांची रंगीबेरंगी नक्षी असलेले असतात तर काही शंखांवर उंचवटे, पुटकुळ्या, वरंबे इ. असल्याने त्यांचे पृष्ठभाग खडबडीत असतात. काही शंखांवर काट्यांसारख्या रचनाही असतात. गॅस्ट्रोपॉड प्राण्यांमध्ये जीवनप्रणाली व पर्यावरण यांना अनुरूप असा शंख निर्माण करण्याची प्रवृत्ती आढळते. उदा., समुद्रतटीय प्रदेशांत लाटांमध्ये टिकून राहतील असे जड व बळकट शंख तयार होतात तर खंड-फळीच्या वरील पट्ट्यात वजनाला हलके शंख तयार होतात आणि २,००० ते ३,००० मी. खोलीच्या वितलीय भागांतील शंख आधिक पातळ व रंगहीन असतात. जमिनीवरील प्राण्यांचे शंखही भार कमी व्हावा म्हणून वजनाला हलके व पातळ असतात. अशा प्रकारे शंखांचा पर्यावरणाशी परस्परसंबंध असतो. त्यामुळे जीवाश्मरूपातील शंखांचा त्या काळातील पर्यावरणाविषयी अंदाज बांधण्यासाठी उपयोग होऊ शकतो. काही जीवाश्मरूप शंख हे सूचक जीवाश्म म्हणजे ते ज्यात आढळतात, त्या खडकांचा काळ सूचित करणारे अवशेष असतात. उदा., मार्चिसोनिया हे उत्तर जुरासिक (सु. १८·५ ते १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळाचे, तर फायला हे क्रिटेशन (सु. १४ ते ९ कोटी वर्षापूर्वींच्या) व इओसीन (सु. ५·५ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या) या काळाचे निदर्शक जीवाश्म आहेत. जीवाश्मरूप शंखांचा गॅस्ट्रोपॉड प्राण्यांच्या वर्गीकरणासाठीही उपयोग होतो.

व्यवहारात शंखांचे अनेक उपयोग होतात. पूर्वीच्या काळी कवड्या नाणी म्हणून वापरीत. धार्मिक कार्यातही शंख वापरले जातात. उदा., शंखांची पूजा केली जाते, त्यांचा मंगलवाद्य व पूर्वीच्या काळी रणवाद्य म्हणून उपयोग होई. देवीचे भक्त कवड्यांच्या माळा गळ्यात घालतात तसेच कपड्यांवरही कवड्या लावतात. काही शंखांचा चुनकळी बनविण्यासाठी उपयोग होतो. रंगबेरंगी व वैशिष्ट्यपूर्ण शंख कलात्मक वस्तू, अलंकरण, दागदागिने, सुशोभन यांसाठी वापरतात. कवड्या सारीपाटासारख्या काही खेळांमध्ये वापरल्या जात. काही खेकडे रिकामे शंख शोधून त्यात राहतात, म्हणून त्यांना शंखवासी खेकडे म्हणतात [⟶ खेकडा, शंखवासी]. शंखसंग्रहाचा छंदही एक लोकप्रिय छंद आहे. कलाकुसरीसाठी शंखशिंपले वापरतात. [⟶ शंखशिंपल्यांचे कलाकाम].

ठाकूर, अ. ना.

जपान, चीन, ओशिॲनिया, ऑस्ट्रेलिया आणि कॅलिफोर्निया आखात येथे आढळणारे गोगलगायींचे शंख.

    

न्यु कॅलेडोनिया, ऑस्ट्रेलिया, जपान, सुलू समुद्र आणि श्रीलंका येथे आढळणारे व्होल्यूटा प्रजातीचे शंख.

    

उष्ण कटिबंधातील प्रवाळाभित्तीत वास्तव्य करणाऱ्या कोनस प्रजातीचे मौल्यवान शंख.

   

फिलिपीन्स, जपान, ऑस्ट्रेलिया आणि चीन येथे आढळणारे असामान्य आकाराचे शंख व शिंपले.

दुर्मिळ असणारे फ्लॉरिडा सागरी शंख व शिंपले कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळ आढळणारा हॅलिओटिस प्रजातीचा इअर शेल ( ॲबलोनी ) शिंपला. बाहेरील भाग ( डावीकडे वर ), बाहेरील आवरण काढल्यानंतर चकाकणारा भाग ( उजवीकडे ) आणि आतील मुक्तद्रव्याचे अस्तर ( डावीकडे खाली ).
ऑस्ट्रेलिया, हॉँगकॉँग, पॅसिफिक बेटे आणि पूर्व आफ्रिका या ठिकाणी आढळणारे शंख. क्यूबातील झाडांवर आढळणाऱ्या लिग्यूअस प्रजातीच्या गोगलगायींचे शंख.

पॅसिफिक सागरी शंख

न्यू इंग्लंड येथे आढळणाऱ्या सागरी मॉलस्क प्राण्यांचे शंख व शिंपले.

फिलिपीन्समधील जंगलात आढळणाऱ्या गोगलगायींचे विविध प्रकारचे शंख