सील : मांसाहारी गणाच्या पित्रिपीडिया उपगणातील सस्तन प्राणी. उष्ण कटिबंधातील समुद्र वगळून इतर सर्व समुद्रांत व समुद्रकिनाऱ्यांवर सील आढळतात. थंड प्रदेशांत ते अधिक असून काही गोड्या पाण्याच्या तलावांतही आढळतात.

खाऱ्या पाण्यातील सील प्राण्यांचा समावेश फोसिडी कुलात केला आहे. त्यांना बाह्यकर्ण नसतात. बाह्यकर्ण असलेल्या फर सील प्राण्यांचा (सागरी सिंह) ओटॅरिइडी कुलात आणि बाह्यकर्णाचा अभाव असलेल्या व सील प्राण्याशी साम्य असलेल्या वॉलरस या प्राण्याचा ओडोबेनिडी कुलात समावेश करतात. [⟶ जलसिंह वॉलरस].

वरील तिन्ही कुलांतील प्राण्यांच्या चार पायांचे रुपांतर वल्ह्यासारख्या पादांमध्ये झालेले असते. सीलचे अग्रपाद बरेच पुढच्या बाजूला असतात आणि पश्चपाद बरेच मागे असतात. पश्चपाद मागच्या बाजूला वळलेले असून त्यांचा उपयोग पोहण्यासाठी होतो. पश्चपाद पुढच्या बाजूला वळू शकत नसल्यामुळे सील जमिनीवर असताना त्यांचा उपयोग पुढे जाण्यासाठी होत नाही. जमिनीवर असताना अग्रपाद जमिनीवर टेकवून त्या आधाराने तो पुढे सरकतो. काही वेळा सील घसरत घसरत किंवा लोळत पुढे जातो. सागरी सिंहाचे वल्ह्यासारखे अग्रपाद शरीराच्या एकूण लांबीच्या एक चतुर्थांशापेक्षा जास्त लांब, जाडजूड व कूर्चायुक्त असतात. वॉलरसाचे पाद सीलसारखे असतात. तो पोहताना आपल्या पश्चपादांचा वापर पुढेपुढे ढकलण्यासाठी करतो. नर व मादीमध्ये वरच्या जबड्यात मोठे व लांब सुळे असतात त्यांमुळे वॉलरस ओळखता येतात.

सील प्राण्याला दृष्टी व वासाचे ज्ञान उत्तम असते, परंतु ऐकू कमी येते. याची लांबी १२५ ते ६५० सेंमी. पर्यंत असते आणि वजन ९० किग्रॅ. पासून ३·५ मे. टनापर्यंत असते. फक्त काहीच सीलांचे वजन ९० किग्रॅ. पेक्षा कमी असते. वलयांकित सील हा सर्वांत लहान व हत्ती सील हा सर्वांत मोठा सील आहे. सीलला २६ ते ३६ दात असतात. छेदक दात साधे असून त्यांना टोके असतात. उपदाढांना तीन किंवा अधिक टोके असतात. त्यांच्या त्वचेखाली (ब्लबरचे) चरबीचे जाड आवरण असते. त्यामुळे थंड प्रदेशातील पाण्यामध्ये त्यांचे शरीर उबदार राखले जाते. या चरबीपासून तेल काढतात.

सीलांचे मुख्य अन्न मासे व सेफॅलोपॉड प्राणी हे होय. चित्रक सीलांचे भक्ष्य मात्र पक्षी व लहान सील असते. त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या मिशांमुळे त्यांना पाण्यातील दाबांमध्ये झालेले बदल ओळखता येतात. अंधार असलेल्या पाण्यातही ते शिकार करु शकतात. आंधळे सीलसुद्घा शिकार करु शकतात. मुख्यतः ते क्रीलवर उपजीविका करतात. काही सील बराच काळ उपाशी राहू शकतात. विशेषतः पकडल्यावर ते जवळजवळ १०० दिवसांपर्यंत उपाशी राहू शकतात.

ध्रुवीय सील श्वासोच्छ्‌वासासाठी बर्फातून आरपार छिद्र पाडतात. हत्ती सील झोपलेला असताना पाच मिनिटे श्वास घेतो व सात ते आठ मिनिटे श्वास रोखतो. काही जाती सु. ६०० मी. खोल पाण्यात जाऊ शकतात आणि ३० मिनिटे त्यामध्ये राहू शकतात. त्यावेळेस ते हृदयाचे ठोके प्रतिमिनिट ४— १५ इतके कमी करतात. त्यामुळे त्यांच्या रक्तातून जात असलेला ऑक्सिजन थोडाथोडा वापरला जातो. ते जेव्हा पाण्यात बुडी मारतात तेव्हा नासाद्वारे आणि कान बंद करु शकतात.

सीलांचे प्रजोत्पादन समुद्रात किंवा काहींत नदी समुद्राला जेथे मिळते त्या ठिकाणी होते. काही सील नर १० ते २० माद्यांबरोबर हिंडताना आढळतात. गर्भावधी २७० ते ३५० दिवसांचा असतो. जन्मतः पिलांचे वजन ५ ते ४५ किग्रॅ. पर्यंत असते. काही पिले उपजतच पाण्यात पोहू शकतात, तर काही कित्येक आठवडे पाण्यापासून दूर राहतात. कमीतकमी दहा दिवस व जास्तीतजास्त अनेक आठवडे पिलू आईचे दूध पिते. दुधामध्ये सु.५०% वसा असल्यामुळे पिलाची वाढ जलद होते. कित्येक प्रजातींत जन्मतः पिलांच्या अंगावर मऊ दाट लोकरीचे आवरण असते. आयुर्मान जवळजवळ ४० वर्षे असते.

सील प्राण्यांची शिकार करून त्यांचा खाण्याकरिता व मऊ उबदार कातडीचा उपयोग कपड्यांसाठी केला जातो. हाडांपासून हत्यारे व चरबीपासून तेल काढले जाते. एकेकाळी यूरोपातील समुद्रकिनाऱ्यावर व अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्यावर सील मारण्याचा व्यवसाय जोरात होता परंतु उत्तरोत्तर कमी होणारी संख्या पाहून हा व्यवसाय कमी होत गेला. आता त्यांच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.

हिंसक देवमासा व ध्रुवीय अस्वल हे सीलांचे मुख्य शत्रू होत.

जोशी, मीनाक्षी र.

सील प्राण्यांचे प्रकार : बंदर सील : याची त्वचा पिवळसर, राखाडी ते काळसर रंगाची असून त्यावर तपकिरी व पिवळ्या रंगाचे ठिपके असतात. याची लांबी सु. १·५ मी. असते.

पट्टेदार सील : याची त्वचा तपकिरी रंगाची असून विशेषेकरून मान, खांदा व पाठीमागील भाग यांवर पिवळ्या रंगाचे पट्टे असतात. ते अल्यूशन बेटे व अलास्काच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळतात.

वलयांकित सील : याची त्वचा गडद तपकिरी रंगाची असून त्यावर पिवळसर रंगाची वलये असतात. ते ध्रुवीय समुद्राजवळ आढळतात.

हार्प सील : नराची त्वचा पिवळसर रंगाची असून त्यावर विशेषे-करून खांद्याजवळ तपकिरी रंगाचे पट्टे असतात. याची लांबी सु.२ मी. असते. ते ध्रुवीय समुद्राजवळ आढळतात.

बीअर्‌डेड सील : याची त्वचा राखाडी ते पिवळसर रंगाची असते. नासाद्वाराजवळ लांब केस असतात. याची लांबी ३ ते ४ मी. असते. ते ध्रुवीय समुद्र ते न्यू फाउंडलंड या भागांत आढळतात.

करडा सील : याची त्वचा चंदेरी ते राखाडी रंगाची असून त्यावर काळसर रंगाचे ठिपके असतात. याची लांबी ३ ते ४ मी. असते. ते नोव्हा स्कोशा ते ग्रीनलंड या भागांत आढळतात.

फणाधारी सील : याची त्वचा काळसर रंगाची असून त्यावर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. नराच्या डोक्यावर स्नायूंचा उंचवटा असतो. तो चिडल्यावर नासापटाचा भाग फुगवतो म्हणून त्याला फणाधारी सील असे नाव आहे. याची लांबी २·५ ते ३ मी. असते. ते न्यू फाउंडलंड ते ग्रीनलंड या भागांत आढळतात.

हत्ती सील : याची त्वचा तपकिरी ते काळसर रंगाची असते व लांबी ६ ते ७ मी. असते. (चित्रपत्र).

पहा : जलसिंह वॉलरस.

पाटील, चंद्रकांत प.


वॉलरसांचा कळपबर्फातील सीलसीलचे पिलू पोहताना

हत्ती सीलचा जबडासील आपल्या नवजात पिलासोबतसील सागरतळाशी पोहतानासीलांचा कळप नवजात पिलांसोबत