नरवानर गण: (प्रायमेट्स). स्तनिवर्गातील हा एक गण असून त्यात माणसाचा समावेश केलेला असल्यामुळे कार्ल लिनीअस यांनी या गणाला पहिले स्थान दिले होते. माणसाखेरीज माकडे, मानवसदृश कपी, लेमूर, टार्सिअर इत्यादींचा या गणात अंतर्भाव होतो.

या गणातील प्राण्यांची मुख्य लक्षणे पुढे दिल्याप्रमाणे आहेत : हाताचा अथवा पायाचा अंगठा बोटांच्या समोर आणता येतो हाताच्या आणि पायाच्या बोटांच्या टोकांवर चपटी नखे किंवा क्वचित नखर (नख्या) असतात जत्रुकास्थी (कॉलरच्या ठिकाणी असणारे हाड) असते नेत्र कोटर (डोळे ज्यांत असतात ते खळगे) अस्थींनी वेढलेले असतात कृंतक (पुढचे दात), रदनक (सुळे) आणि चर्वणक (दाढा) असे तीन प्रकारचे दात असतात छातीवर स्तन ग्रंथी असतात. अगदी खालच्या दर्जाचे प्रायमेट्स (उदा., लेमूर) चतुष्पादच असतात असे म्हणावयास हरकत नाही, कारण चालताना अथवा धावताना ते हातापायांचा उपयोग करतात. लेमूरपेक्षा वरच्या दर्जाचे प्रायमेट्स हातांच्या साहाय्याने झाडांवर चढतात, फांदी पकडून लोंबकळतात किंवा एका फांदीवरून दुसरीवर जातात. यांच्यापेक्षा वरच्या दर्जाचे प्रायमेट्स मागील पायांवर उभे राहून चालू किंवा धावू शकतात (उदा., बॅबून).

नरवानर गणाचे स्वाभाविक रीतीने दोन उपगण पडतात : प्रोसिमिआय आणि अँथ्रोपॉयडिया.

प्रोसिमिआय : या उपगणामध्ये ट्युपेइडी, लेमुरॉइडी, इंड्रीडी, डॉबेंटोनीइडी, लोरिसिडी आणि टार्सिइडी ही सहा कुले आहेत.

आ.१. भारतीय वृक्षवासी छछुंदर (ॲनाथाना इलियटाय)

ट्युपेइडी: या कुलात वृक्षवासी छछुंदरांचे (श्र्यू) पाच वंश आहेत. प्रोसिमिआय उपगणातील हे अतिशय आद्य कुल आहे. हे प्राणी लहान व सडपातळ असून काहीसे खारीसारखे असतात. यांना नखर असतात. अती प्राचीन प्रायमेट्स कसे असतील याचा हे प्राणी नमुना आहेत, असे म्हणता येईल. या कुलात ५ वंश व सु. १५ जाती असून त्या पूर्व आशिया, नैर्ऋत्य चीन, भारत, मलेशिया, बोर्निओ आणि फिलिपीन्स बेटांत आढळतात. भारतीय जातीचे प्राणिशास्त्रीय नाव ॲनाथाना इलियटाय आहे.

लेमुरॉइडी: या कुलात सहा वंश असून ⇨ लेमूर हा त्यांपैकी एक आहे. हा वृक्षवासी असून रात्रिंचर आहे. लेमूर मॅलॅगॅसीमध्ये (मादागास्करमध्ये) आढळतात. यांचे अग्रमस्तिष्क (लहान मेंदू) लहान आणि गुळगुळीत असते. पश्च मस्तिष्क (मोठा मेंदू) वरच्या दर्जाच्या प्रायमेट्समधल्याप्रमाणे अग्रमस्तिष्काने झाकलेले नसते. डोळे मोठे असून नेत्रकोटरातून थोडे बाहेर आलेले असतात.

आ.२. इंड्री (इंड्री इंड्री)

इंड्रीडी: या कुलातील प्राणी (उदा., इंड्री) लेमूरांपेक्षा बरेच मोठे असतात. या कुलात तीन वंश आणि चार जाती आहेत. हे प्राणी मॅलॅगॅसीच्या अरण्यात आढळतात. हे पूर्णपणे वृक्षवासी आहेत. यांचे मागचे पाय लांब असल्यामुळे एका फांदीवरून दुसरीवर त्यांना सहज उड्या मारता येतात. काही जातींत शेपटी अगदी आखूड असते आणि बाहेरचे कान डोक्याच्या बाजूवर असलेल्या लांब मऊ केसांनी काहीसे झाकलेले असतात. हे प्राणी शाकाहारी असून झाडांची पाने व कळ्या खातात. यांचे लहान कौटुंबिक गट असून त्यांत २–५ प्राणी असतात.

डॉर्बेटोनीइडी : या कुलात डॉबेंटोनिया हा एकच वंश शिल्लक राहिलेला आहे. डॉबेंटोनिया हा असामान्य प्राणी मॅलॅगॅसीमध्ये आढळतो, याला आय-आय म्हणतात. हे प्राणी एकलकोंडे व रात्रिंचर आहेत [→ आय- आय].

लोरिसिडी : या कुलात सहा वंश आणि सु. बारा जाती आहेत. या कुलातील प्राणी मध्य आणि द. आफ्रिका, आसाम, द. भारत, श्रीलंका, आग्नेय आशिया, इंडोनेशिया व फिलिपीन्स बेटे येथे आढळतात. या कुलातले सगळे प्राणी जंगलात राहणारे व वृक्षवासी असून ते हळूहळू रांगतात. मुस्कट आखूड असते हे रात्रिंचर असल्यामुळे डोळे फार मोठे असतात शेपूट नसते पण असलेच, तर अतिशय आखूड असते. लोरिस टार्डिग्रेडस  ही जाती द. भारतात आणि निक्टिसेबस कूकँग ही जाती आसाममधील अरण्यात आढळते [→ लोरिस].

टार्सिइडी: या कुलात फक्त एकच वंश असून त्याच्या तीन जाती आहेत. हे प्राणी बोर्निओ, फिलिपीन्स बेटे, सेलेबीझ आणि सुमात्राच्या जंगलांत आढळतात. ⇨ टार्सिअर हा एक लहान प्राणी असून त्याची लांबी १५ सेंमी. असते. शेपटी २५ सेंमी. लांब असते आणि तिच्या टोकावर केसांचा झुपका असतो. मागचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. त्यांचा उपयोग उड्या मारण्याकरिता आणि बागडण्याकरिता होतो. घोट्याचा भाग लांब झालेला असतो. हातांच्या आणि पायांच्या बोटांच्या टोकांवर गोल मऊ चकत्या असतात. त्यांचा उपयोग फांदीची पकड घेण्याकरिता होतो. शरीराच्यामानाने यांचे डोळे फारच मोठे असतात. टार्सिअरमध्ये पुढील लक्षणे एकत्रित झालेली दिसून येतात–आद्य लक्षणे, लेमूरसारखी लक्षणे, काही विशेषित लक्षणे आणि प्रगत अथवा माकडांसारखी लक्षणे.

अँथ्रोपॉयडिया : या उपगणात प्लॅटिऱ्हिनी व कॅटॅऱ्हिनी या दोन श्रेणी आहेत. प्लॅटिऱ्हिनी श्रेणीत नव्या जगातील (पश्चिम गोलार्धातील) माकडांचा समावेश केलेला आहे. या श्रेणीत कॅलिथ्रिसिडी (हॅपॅलिडी) आणि सेबिडी ही दोन कुले आहेत. कॅटॅऱ्हिनी श्रेणीत जुन्या जगातील (पूर्व गोलार्धातील) माकडे, कपी आणि माणूस यांचा अंतर्भाव होतो. या श्रेणीत सर्कोपिथेसिडी (माकडे, लंगूर, बॅबून वगैरे), हायलोबेटिडी (गिबन, सिॲमँग वगैरे), पाँजिडी (चिंपँझी, गोरिला वगैरे) आणि होमिनिडी (माणूस) या कुलांचा समावेश होतो.

प्लॅटिऱ्हिनी श्रेणीतील माकडांत नाकपुड्या एकमेकींपासून दूर असतात. अंगुष्ठ (आंगठा) बोटांसमोर आणता येत नाही काही प्राण्यांचे शेपूट परिग्राही (पकड घेणारे) असते. श्रोणि-किण (ढुंगणावरचे घट्टे) नसतात व गालाच्या आतील बाजूस कपोलकोष्ठ (गालातील पिशव्या) नसतात.


आ.३. रेशमी मार्मोसेट (कॅलिथ्रिक्स)

कॅलिथ्रिसिडी : या कुलात फार लहान आणि अतिशय आद्य लक्षणे असणाऱ्या जिवंत माकडांचा–मार्मोसेट आणि टॅमॅरिन–यांचा समावेश होतो. यांचे शेपूट लांब व केसाळ असते पण परिग्राही नसते. हस्तांगुष्ठ (हाताचा आंगठा) लांब असून पादांगुष्ठ (पायाचा आंगठा) लहान असतो. पादांगुष्ठावर चपटे नख असते बाकीच्या सर्व बोटांवर अणकुचीदार नखर असतात. हे प्राणी वृक्षवासी असून दिनचर आहेत. यांचे लहान कौटुंबिक गट असतात. ते मुख्यतः कीटकभक्षक आहेत परंतु ते फळे, बिया, पाने, कोंब वगैरेसुद्धा खातात. कॅलिथ्रिक्सचे (मार्मोसेटचे) कान मोठे असून त्यांच्यावर पांढरट केसांचे झुपके असतात. याच्या शेपटीवर काळ्या व करड्या केसांची वलये असतात.

सेबिडी : या कुलातील माकडे–स्पायडर माकड, हाउलर माकड–द. अमेरिकेत, विशेषतः ब्राझीलच्या उष्ण प्रदेशातील अरण्यात आढळतात. ही वृक्षवासी आणि दिनचर आहेत. यांपैकी पुष्कळांची शेपटी परिग्राही असते. तिचा उपयोग ते लोंबकळण्याकरिता, झोके घेण्याकरिता किंवा एखादा पदार्थ पकडण्याकरिताही करतात. यांच्या प्रत्येक जबड्यात एक चर्वणक दात (दाढ) जास्त असतो. एकूण ३६ दात असतात. हातापायांच्या सगळ्या बोटांवर चपटी नखे असतात. यांचे लहान कौटुंबिक गट असतात पण ओरडणाऱ्या (हाउलर) माकडांचे गट बरेच मोठे असतात.

आ.४. स्पायडर मंकी (कोळी माकड अँटिलिस पेंटाडॅक्टिलस)

कॅटॅऱ्हिनी श्रेणीतील प्राण्यांच्या नाकपुड्या जवळजवळ असतात व त्यांची द्वारे खालच्या बाजूकडे वळलेली असतात. शेपूट परिग्राही नसते कधीकधी ते अवशेषी असते अथवा मुळीच नसते. हाताचा आंगठा बोटांसमोर आणता येतो. दात ३२ असतात.

सर्कोपिथेसिडी : या कुलात जुन्या जगातील सगळी माकडे आणि बॅबून यांचा समावेश होतो. यांना श्रोणि-किण असतात. काहींच्या गालांच्या आतील बाजूला कपोलकोष्ठ असतात छातीचे हाड अरुंद असते आंत्रपुच्छ (ॲपेंडिक्स) नसते. माकडे (मॅकाक) धट्टीकट्टी असतात. झाडावर चढण्यात ती जरी पटाईत असली, तरी काही जवळजवळ पूर्णपणे भूचर झाली आहेत. ती मुख्यतः आशियात (आग्नेय आशिया, चीन, जपान, भारत) आढळतात. उत्तर आफ्रिकेतील अल्जीरिया आणि मोरोक्कोमध्येही ती आढळतात. उत्तर आफ्रिकेतील माकडाच्या एका जातीला कधीकधी बार्बरी कपी (मॅकाका इन्यूअस) म्हणतात. माकडे काटक असतात व बंदिस्त अवस्थेतही त्यांची भरभराट होते. ती बहुधा सर्वभक्षी असतात पण मलेशियातील एक जातीचे माकड (मॅकाका आयरस) ओहोटीच्या वेळी समुद्रतीरावर जाऊन क्रस्टेशियन (कवचधारी) व मॉलस्क (मृदुकाय) प्राणी गोळा करून खाते. त्याला मलेशियात ‘खेकडेखाऊ माकड’ म्हणतात. माकडांपैकी ‘ऱ्हीसस माकड’ (मॅकाका म्युलाट्टा) सुप्रसिद्ध आहे. जीववैज्ञानिक आणि वैद्यकीय संशोधनाकरिता याचा उपयोग करतात. माणसाच्या रक्तगटांचा गूढ प्रश्न सोडविण्याकरिता या प्राण्यांचाच उपयोग केला गेला [→ रक्तगट ऱ्हीसस घटक].

बॅबून स्थलचर प्राणी असून उघड्या खडकाळ प्रदेशात राहतात. ते वाढून फार मोठे होतात आणि भयानक दिसतात. माणसासारखा जमिनीवर राहणारा असला, तरी त्याच्याप्रमाणे हा ताठ उभा राहत नाही हा चतुष्पादच आहे. मुस्कट लांब आणि पुढे आलेले असून नाकपुड्या त्याच्या टोकापाशी असतात. नराचे रदनक (सुळे) लांब असल्यामुळे तो क्रूर दिसतो. यांचे शेपूट सामान्यतः लांब असते. श्रोणि-किण असतात. हे दिनचर असून त्यांचे व्यवस्थित समाज असतात. हे सर्वभक्षी असून सुरवंट, कीटक, विंचू, लहान पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी व विविध वनस्पतिजन्य पदार्थ खातात. बॅबूनच्या चार जाती असून त्या आफ्रिकेच्या निरनिराळ्या भागांत सापडतात [→ बॅबून].


आ.५. मँड्रिल (मँड्रिलस स्फिंक्स)

मँड्रिल प. आफ्रिकेच्या भूमध्यरेषेजवळच्या प्रदेशात आढळतो. यांचे शेपूट अगदी आखूड–जवळजवळ अवशेषी–असते. डोके मोठे आणि मुस्कट फुगलेले असते. मुस्कटावर ठळक निळे कंगोरे असतात आणि नाकपुड्या भडक शेंदरी रंगाच्या असतात. पुष्कळदा अंगावरील केसांचा (फरचा) रंग सुंदर असतो. श्रोणि-किणांचा रंगदेखील झगझगीत असतो. याला पांढरी शुभ्र टोकदार दाढी असते. या सगळ्यांमुळे याचे स्वरूप विशेष नजरेत भरण्यासारखे असते. हे प्राणी सर्वभक्षी आहेत [→ मँड्रिल].

वानर (लंगूर) मुख्यतः वृक्षवासी आणि शाकाहारी आहेत. यांना कपोलकोष्ठ नसतात. शेपूट लांब व बारीक असते. यांचे प्रेसबिटिस आणि ऱ्हायनोपिथेकस हे दोन वंश आहेत. प्रेसबिटिस वंशाचे वानर मलेशिया, श्रीलंका, भारत (काश्मीर आणि हिमालयाचा दक्षिणेकडील उतरणीवरचा प्रदेश) येथे आढळतात. भारतात यांच्या चार जाती आणि सामान्य जातीच्या सु. १५ प्रजाती आहेत. ऱ्हायनोपिथेकस वंशाचे वानर तिबेट व वायव्य चीनच्या पर्वतांवरील अरण्यांत आढळतात. नासावानर वरील वानरांचे नातेवाईक असून फक्त बोर्निओत आढळतात. यांचे नाक लांब व मांसल असते [→ वानर].

आ.६. नासावानर (प्रोबॉसिस मंकी)

हायलोबेटिडी : या कुलात हायलोबेटिस (गिबन) आणि सिमफॅलँगस (सिॲमँग) हे दोन वंश आहेत. दोन्ही आग्नेय आशियात आढळतात. ⇨ गिबन आसाम व तैवानपासून (फोर्मोसापासून) जावा, सुमात्रा आणि बोर्निओपर्यंत आढळतात. हे प्राणी सडपातळ आणि फार चपळ असतात. झाडांच्या शेंड्याजवळ यांची वर्दळ असते. झाडांच्या फांद्या धरून लोंबकळत ते भटकत असतात. जमिनीवर ताठ उभे राहून माणसाप्रमाणे ते चालू शकतात. चालताना त्यांचे हात जमिनीला टेकतात. यांचे लहान कौटुंबिक गट असून त्यांत सहापर्यंत प्राणी असतात. यांच्या श्रोणि-किणांची चांगली वाढ झालेली असून ते तऱ्हेतऱ्हेच्या रंगांचे असतात. हे सामान्यतः फळे, पाने, कळ्या वगैरे खातात पण कधीकधी कीटक, पक्ष्यांची पिल्ले आणि अंडीही खातात.

पाँजिडी : या कुलात ⇨ चिंपँझी, ⇨ गोरिला आणि ⇨ ओरँगउटान यांचा समावेश होतो. यांपैकी गोरिला व चिंपँझी आफ्रिकेत आणि ओरँगउटान सुमात्रा आणि बोर्निओत आढळतात.

चिंपँझी (पॅन ट्रॉग्लोडायटीझ) पश्चिम आणि मध्य विषुववृत्तीय आफ्रिकेत आढळतात. यांची उंची १५० सेंमी. पेक्षा अधिक नसते. हे आपले सगळे आयुष्य अरण्यात व पानझडी जंगलात घालवितात. पुष्कळदा ते जमिनीवर उतरून चतुष्पादांप्रमाणे चालतात. कधीकधी ते ताठ उभे राहतात पण सामान्यतः या अंगस्थितीत ते चालत नाहीत. चिंपँझींचे लहान कौटुंबिक गट असतात किंवा कौटुंबिक गटांचे समूह असतात. झाडांवर उंच जागी हे फांद्यांची ओबडधोबड घरटी बांधून त्यांत रात्री विश्रांती घेतात. यांना शिकविले तर हे किचकट आणि गुंतागुंतीची कामे करू शकतात. यावरून त्यांच्या अंगी बरेच बुद्धिचातुर्य असल्याचे दिसून येते. तुलनात्मक मानसशास्त्राच्या प्रायोगिक अभ्यासाकरिता यांचा उपयोग करतात.

गोरिला (गोरिला गोरिला) आफ्रिकेत भूमध्यरेषेलगतच्या प्रदेशात राहतात. गोरिला गोरिला  या जातीच्या दोन उपजाती असून एक अरण्यात राहणारी आणि दुसरी पर्वतावर राहणारी आहे. हा प्राणी दिसायला उग्र असून त्याची उंची १५० सेंमी. पेक्षा जास्त असते. हात बरेच लांब असतात. पाय जाड आणि आखूड असून पाऊल बरेचसे माणसाच्या पावलासारखे असते. गोरिला वृक्षवासी नाहीत. ते आपला दररोजचा बहुतेक वेळ झुडपांमधून भटकण्यात घालवितात. ते चतुष्पादांप्रमाणे चालतात. यांचे वीस किंवा जास्त प्राण्यांचे समूह असून ते कौटुंबिक गटांचे बनलेले असतात. ते स्वभावाने गरीब व भित्रे असतात. ते पूर्णपणे शाकाहारी असून फळे, बांबूचा कोवळा पाला, झाडांची कोवळी पाने, गवत वगैरे खातात.

ओरँगउटान (पोंगो पिग्मियस) सुमात्रा व बोर्निओतील समुद्रकाठच्या अरण्यात राहतो. याची उंची १२०– १५० सेंमी. किंवा त्यापेक्षाही जास्त असते. वृक्षवासी जीवनाकरिता याचे अतिशय विशेषीकरण झालेले असते. हा झाडांवरून क्वचितच खाली उतरतो. हा आपल्या लांब हातांनी लोंबकळत हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जातो. झाडावर सु. ३–८ मी. उंचीवर हा झोपण्याकरिता माच बांधतो. अंगावर लांब, लालसर केस असतात. डोके लहान असून डोळे जवळजवळ असतात. रदनक मोठे असून त्यांचा उपयोग फळे फोडण्याकरिता आणि शत्रूवर हल्ला करण्यासाठी होतो. हा शाकाहारी असून अंजिराच्या जातीची फळे, फुलांचे तुरे, कोवळी पाने वगैरे खातो. हा अतिशय बुद्धिमान प्राणी असून त्याची दृष्टी मंद व श्रवणशक्ती तीव्र असते.

होमिनिडी : या कुलात आधुनिक मानव (होमो सेपिएन्स) आणि त्याचे लुप्त पूर्वगामी यांचा समावेश होतो. मानवाचे शरीर ताठ उभे असून शरीराचा सर्व भार पायांवर असतो. पाय हातांपेक्षा लांब असून मजबूत असतात. पादांगुष्ठ बोटांसमोर आणता येत नाही. मेंदूचा विकास झालेला असतो. माणूस भूचर असून द्विपाद आहे. तो सर्वभक्षी आहे. प्राचीन माणूस शिकारीत मिळालेल्या भक्ष्याचे तुकडे करण्याकरिता रदनक दातांचा उपयोग करीत असे [→ मानवप्राणि].


प्रायमेट्समध्ये एका वेळी एकच पिल्लू जन्मते पण काही कपी व माकडे यांना एका वेळी दोनसुद्धा पिल्ले होतात. माकडांमध्ये गर्भावधी ५ महिन्यांचा असतो. कपींमध्ये ८ ते ९ महिन्यांचा असतो. पुष्कळ जातींमध्ये ऋतुस्रावाच्या वेळी बाह्य जननेंद्रियांजवळची त्वचा फुगते व लाल होते. पूर्व गोलार्धातील प्रायमेट्सच्या कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) ४८ गुणसूत्रे (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) असतात. दोन वंशांमध्ये व जातींमध्ये संकरण आढळून येते.

माकड आणि कपी यांमध्ये कुटुंबसंस्था व बहुपत्नीत्व आढळते. कुटुंबाचे स्थैर्य नराच्या प्रभावी गुणांवर अवलंबून असते. बऱ्याच वेळा माकडे एकमेकांच्या शरीरावरील लवेत काहीतरी वेचत असताना आढळतात. माकडे, कपी व टार्सिअर यांच्या चेहेऱ्यावर वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे हावभाव दिसून येतात. आनंद, भीती, काळजी, स्वतःवर होणारा हल्ला इ. भाव दाखविण्यासाठी ते वेगवेगळे आवाज काढू शकतात.

कपी व माकडे यांना नेहमी स्वतःभोवतालच्या वस्तूंबद्दल कुतूहल वाटत असते आणि ती वस्तू निरखून, वास घेऊन, तिला हात लावून ती काय आहे, हे जाणण्याचा ती प्रयत्न करतात. बॅबून बंदिवासात ५० वर्षांपर्यंत जगतो. कपी व माकडेही ५० वर्षे जगतात. यांची दृष्टी द्विनेत्री आणि त्रिमित असते मेंदू विकसित असतो. टार्सिअर, पूर्व आणि पश्चिम गोलार्धातील माकडे, मानवसदृश कपी व माणूस यांत क्रमाक्रमाने अधिक विकसित मेंदू आढळून येतो. माणसाचा मेंदू सर्वांत जास्त विकास पावलेला व टार्सिअरचा सर्वांत कमी विकास पावलेला आहे. कपींमध्येही माणसासारखेच रक्तगट आढळून येतात.

जोशी, मीनाक्षी

जीवाश्म : (शिळारूप अवशेष). या गणातील प्राण्यांचे जीवाश्म पॅलिओसीन ते आतापर्यंतच्या (गेल्या सु. ६·५ कोटी वर्षांच्या) काळातील खडकांत आढळले असून या प्राण्यांचा उत्कर्ष मायोसीन-प्लायोसीन (सु. २ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या) काळात आणि उबदार हवामानाच्या प्रदेशांत झाला. यांचे थोडेच जीवाश्म आढळतात व ते क्वचितच अखंड स्वरूपात आढळतात. यामुळे त्यांच्यावरून त्यांच्या क्रमविकासासंबंधीचे (उत्क्रांतीसंबंधीचे) निष्कर्ष काढणे अवघड ठरते. इओसीनच्या अखेरीपासून ते ऑलिगोसीनच्या प्रारंभापर्यंत (सु. ३·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) जसजशी शुष्कता वाढत गेली तसेतसे हे प्राणी दक्षिणेकडे सरकत गेल्याचे त्यांच्या जीवाश्मांवरून दिसून येते.

आधीचे प्रायमेट्स वृक्षवासी होते, नंतर ते उघड्या रुक्षवनात (सॅव्हानात) राहू लागले. माकडे व कपी यांचा क्रमविकास होताना त्यांचे कृंतक दात कमी होत जाऊन शेवटी प्रत्येक जबड्यात दोन कृंतक दात राहिले. या गणातील प्राण्यांचा क्रमविकास पाहिल्यास मोठा मेंदू व चांगली दृष्टी असलेले आणि पुढील पायांचा हातासारखा उपयोग अधिक चांगल्या तऱ्हेने करू शकणारे प्राणी टिकून राहिलेले आढळतात. क्रमविकास होताना होमिनॉयडिया गटातील प्राण्यांचे शेपूट आखूड व मेंदू प्रगत होत गेल्याचे दिसून येते.

पॅलिओसीन (सु. ६·५ ते ५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील या प्राण्यांचे जीवाश्म कॅनडा, फ्रान्स व अमेरिका येथे आढळत असून प्लेसिओलेस्टस प्रॉब्लेमॅटिक्स हा वायोमिंग (अमेरिका) येथे आढळलेला जीवाश्म सर्वांत आधीचा (मध्य पॅलिओसीन) आहे. खऱ्या लेमूरांचे पॅलिओसीन काळातील जीवाश्म मॅलॅगॅसीत (मादागास्करमध्ये) आढळलेले आहेत.

इओसीन (सु. ५·५ ते ३·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात यांचे पुष्कळ जीवाश्म आढळतात. या काळात नोथॅर्क्टस जीवाश्म सामान्य असून टार्सिइडी, ॲडॅपिडी व ओमोमाइडी या कुलांतील प्राण्यांचे जीवाश्म उ. अमेरिका आणि यूरोप येथे मध्य पॅलिओसीन ते इओसीन या काळातील आदिम प्रायमेटांचे जीवाश्मच मुख्यत्वे आढळतात.

ऑलिगोसीन (सु. ३·५ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील यांचे जीवाश्म विशेषतः ब्रह्मदेश, टेक्सस (अमेरिका) व ईजिप्त येथे आढळतात. टार्सिअराची वैशिष्ट्ये असलेल्या आदिम प्राण्यांचे जीवाश्म जगात सर्वत्र आढळले आहेत. मात्र आता टार्सिअस ही एकच जाती ईस्ट इंडीज व फिलिपीन्समध्ये आढळते. या काळातील ट्यूपेइडांचे जीवाश्म मंगोलियात, लोरिस पोट्टो व गॅलॅगो यांचे आग्नेय आशिया व आफ्रिका येथे आणि मोइरिपिथेकस, पॅरापिथेकस इ. जीवाश्म ईजिप्तमध्ये आढळले आहेत. ऑलिगोसीनच्या अखेरीस लेमूर प. गोलार्धात निर्वंश झाले मात्र पू. गोलार्धात अनुकूल ठिकाणी टिकून राहिले.

मायोसीन (सु. २ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील यांचे जीवाश्म यूरोपात आणि आशियात जास्त प्रमाणात आढळतात. अलीकडेच पूर्व आफ्रिकेतही या काळातील जीवाश्म सापडले आहेत. केन्यामध्ये गॅलॅगोंचे, अर्जेंटिनात व कोलंबियात रुंदनासिका माकडांचे, ईजिप्तमध्ये अधोनासिका माकडांचे, मध्य यूरोपात गिबनचे, भारतात ओरँगउटानचे इ. जीवाश्म सापडले आहेत. कपी ऑलिगोसीनमध्ये वा मायोसीनच्या प्रारंभी, तर जमिनीवर राहणारी माकडे (मेसोपिथेकस) मायोसीनच्या अखेरीस अवतरली असावीत.

कपीचा सर्वांत जुना जीवाश्म कैरोजवळील फायुम येथे आढळला, तर मौंट बांबोली (इटली) येथील ओरिओपिथेकस हा महत्त्वाचा जीवाश्म आहे. व्हिक्टोरिया सरोवराजवळील (पू. आफ्रिका) भागात कपींचे पुष्कळ जीवाश्म (हाडे व दात) आढळले आहेत. उदा., लिम्नोपिथेकस, प्रोकॉन्सूल इत्यादी. यूरोप व आशियात कपींचे जीवाश्म आढळतात परंतु प. गोलार्धात त्यांचे जीवाश्म सापडले नाहीत.

अंकारापिथेकस, मेसोपिथेकस, डोलिकोपिथेकस इ. प्रगत वंशांचे जीवाश्म दक्षिण व मध्य यूरोपातील प्लायोसीन (सु. १·२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांत आढळले आहेत. बॅबून हे प्लायोसीनमध्ये अवतरले असावेत.

प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) काळातील या प्राण्यांचे जीवाश्म द. आफ्रिका, भारत, चीन इ. भागांत आढळले असून होमिनिडी कुलातील प्राण्यांचा प्रसार याच काळात झाला. माकड वा कपी नसलेल्या जायगँटोपिथेकस या प्राण्याचे जीवाश्म द. चीनमध्ये तर लोरिसाचा दात भारतात आढळला आहे. डायनोपिथेकस ही प्रायमेट्समधील सर्वांत मोठी जाती याच काळात आढळते. मायोसीन व प्लायोसीन काळातील प्रोकॉन्सूल, ड्रायोपिथेकस, शिवापिथेकस इत्यादींवरून ओरँगउटान, चिपँझी व गोरिला हे कपी या काळात आले असावेत.

दगडी हत्यारे ही आधीच्या मानवाचे वैशिष्ट्य असून अशी हत्यारे प्लाइस्टोसीनच्या प्रारंभापासून वापरात असल्याचे आढळते. मात्र मानवाचे जीवाश्म क्वचितच आणि तेही विखुरलेल्या स्वरूपात आढळत असल्याने त्याचा क्रमविकास निश्चितपणे ठरविता येत नाही परंतु मानवी क्रमविकासाचे वेगवेगळे चार टप्पे ओळखता येतात [→ मानवप्राणि].

भारतीय:  भारतामध्ये या गणातील प्राण्यांचे जीवाश्म हिमालयाच्या पायथ्याजवळील शिवालिक टेकड्यांत आढळतात [→ शिवालिक संघ]. त्यांपैकी काही जीवाश्मांचे वंश व जाती पुढीलप्रमाणे आहेत. पूर्व शिवालिक (पूर्व ते मध्य मायोसीन) : शिवपिथेकस इंडिकस, ड्रायोपिथेकस, इंद्रालोरिस, ब्रह्मपिथेकस, पॅलिओसिमिया मध्य शिवालिक (पूर्व प्लायोसीन ते मध्य मायोसीन) : पॅलिओपिथेकस, सेम्नोपिथेकस, ड्रायोपिथेकस, रामपिथेकस (मानव वंशाचे संभाव्य पूर्वज), सुग्रीवपिथेकस, सर्कोपिथेकस, मॅकॅकस आणि उत्तर शिवालिक (पूर्व प्लाइस्टोसीन ते पूर्व प्लायोसीन), सिमिया, सेम्नोपिथेकस, पॅपिओ. या गणाचा सर्वांत अलीकडील (मध्य प्लाइस्टोसीन) जीवाश्म धोक-पठाण भागात आढळला आहे.

ठाकूर, अ. ना.

संदर्भ : 1. Buettner-Janusch, J., Ed. Evolution and Genetic Biology of Primates, 2 Vols., New York 1963, 1964.

2. Devore, I. Primate Behaviour, New York, 1965.

3. Hill. W. C. O. Primates : Comparative Anatomy and Taxonomy, 9 Vols., New York, 1953.

4. Jay, P. C., Ed. Primates, New York, 1968.

5. Schultz, A. H. The Life of Primates, New York, 1969.