सांडा (युरोमॅस्टिक्स ॲकॅथिन्युरस)सांडा : या सरड्याच्या सहा जाती असून त्यांचा समावेश ॲगॅमिडी कुलाच्या युरोमॅस्टिक्स प्रजातीत करतात. ते उ.आफ्रिका, सौदी अरेबिया, सिरिया, पर्शिया व वायव्य भारत या प्रदेशांतील रेताड आणि कोरड्या पट्ट्यांत आढळतात. शेपटी आखूड व जाड असून ती मोठ्या काटेरी खवल्यांच्या मंडलांनी आच्छादलेली असते, तर शरीर दबलेले व डोके बारीक खवल्यांनी आच्छादलेले असल्यामुळे बहुधा गुळगुळीत असते. कर्णपटल पूर्ण उघडे असते. कृंतक दात मोठे असतात व प्रौढात ते एकत्र येऊन कापणाऱ्या दातांच्या एक किंवा दोन जोड्या होतात. त्यांच्यामध्ये व दाढांमध्ये एक मोकळी दातरहित जागा असते. घशावर एक आडवी घडी असते. गुदपूर्व व उर्विका (मांडीवरील) छिद्रे विकसित झालेली असतात.

सांडा मुख्यतः शाकाहारी असून पाने, गवत व फळे तसेच किडेही खातात. ते कडक उन्हात त्वचा शेकतात. ते सर्वस्वी भूचर व दिनचर असून राहण्यास रेताड जागा पसंत करतात. रात्री, पाऊस येण्याच्या सुमारास किंवा धुसर व कडाक्याच्या थंडीत ते बिळांत विश्रांती घेतात. त्यांची बिळे वाळू किंवा कठीण जमिनीत केलेली असतात. तसेच ते खडकांच्या फटीतही लपून बसतात. आपल्या बळकट पायांनी व आखूड वाकड्या नखांनी ते सतत बिळे करतात. तापमान १६° से. च्या खाली गेल्यास ते कोरडे होतात. हिवाळ्यात ते शीतसुप्ती घेतात. काटेरी शेपटीचा उपयोग संरक्षणासाठी केला जातो. ते आपल्या बिळांत असे बसतात की, शेपटीने बिळांचे अरुंद तोंड बंद होते. हात लावल्यास ते शेपटीचे आडवे फटकारे मारतात. त्यांचा चावा फारच वेदनादायक असतो. एप्रिल व मे हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. ते अंडज प्राणी आहेत.

युरोमॅस्टिक्स हार्डविकी ही जाती मूळची वायव्य भारत व पाकिस्तानातील आहे. ती राजस्थान, दिल्ली व आग्रा येथे आढळते. तिची लांबी सु. ३० सेंमी. पर्यंत असते. तिचा रंग फिकट करडा असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके व क्वचित प्रसंगी त्यांच्यामध्ये फिकट निळे बारीक ठिपके असतात. शेपटीचा खालचा भाग पांढरट असून त्यावर हिरवट छटा असते. मांडीच्या पुढच्या बाजूवर एक मोठा काळा चट्टा ही तिची वैशिष्ट्यपूर्ण व स्पष्ट ओळख खूण आहे.

यु. ॲकॅथिन्युरसयु. स्पायनिपेस या जाती अल्जेरिया, ट्युनिस आणि ईजिप्तमध्ये रेताड व खडकाळ जागी आढळतात. या जातींचे मोठे सरडे सु. ४५ सेंमी. लांबीचे असतात. युरोमॅस्टिक्स प्रजातीतील इतर जातींप्रमाणे हे आवाज काढू शकत नाहीत. आफ्रिकेतील जाती आपल्या शरीराचा रंग बदलतात. थंडीत त्यांचा रंग वरील बाजूस मुख्यतः करडा किंवा तपकिरी काळा आणि खाली मळकट पांढरा असतो. तापमान वाढू लागले की, त्यांचा रंग फिकट तपकिरी किंवा नारिंगी पिवळा व हिरवा होतो. त्यावर काळे किंवा बारीक तपकिरी ठिपके उमटतात. [⟶ वर्णकी लवक].

पहा : सरडा.

जमदाडे, ज. वि.