कार्प : अस्थिमत्स्यांच्या (ज्या माशांचा सांगाडा अस्थींचा बनलेला असतो अशा माशांच्या) सायप्रिनिडी कुलातल्या बहुतेक माशांना कार्प असे म्हणतात. हे गोड्या पाण्यात राहणारे असून यांचे पुष्कळ वंश आणि जाती आहेत. या सर्व जातींच्या माशांची संख्या अगणित आहे. भारतात गोड्या पाण्यात आढळणाऱ्या एकंदर माशांपैकी ६४ टक्के मासे कार्प किंवा कार्पसदृश आहेत.

कार्प हे नाव विशेषेकरुन सायप्रिनिडी कुलातील सायप्रिनिनी या उपकुलातल्या एका दणकट माशाला दिलेले आहे. हा सायप्रिनिडी कुलाचा प्रारुपिक (नमुनेदार) प्रतिनिधी आहे. याचे शास्त्रीय नाव सायप्रिनस कार्पिओ हे असून हा खरा कार्प मासा होय.

कार्प (सायप्रिनस काप्रिओ)

हा खाद्यमत्स्य असल्यामुळे फार प्राचीन काळापासून माणूस याचे संवर्धन करीत आला आहे. यामुळे सगळया जगभर त्याचा प्रसार झाला आहे. याच्या मूळ वसतिस्थानाविषयी निश्चित माहिती नाही, पण कॅस्पियन समुद्र आणि चीन यांच्या मधला आशियाचा भाग हे याचे मूलस्थान असावे असा समज आहे. तेथून यूरोपात आणि यूरोपातून उत्तर अमेरिकेत त्याचा प्रवेश झाला. हल्ली वरील सर्व प्रदेशांतील सरोवरे, तलाव, नद्या व वहाळ यांत तो आढळतो.

कार्पची लांबी ६० सेंमी. पर्यंत आणि वनज १८ किग्रॅ. पर्यंत असते याचा रंग तपकिरी असून शरीरावर मोठे खवले असतात. तथापि, मिरर-कार्प या उपजातीत खवले अगदी थोडे पण फार मोठे असून विखुरलेले असतात लेदर-कार्प या उपजातीत खवले मूळीच नसतात. मुख अग्र टोकाशी असून बहिःक्षेप्य (बाहेर काढता येणारे) असते ओठ मांसल असतात मुखाच्या प्रत्येक बाजूला वरच्या ओठापासून निघालेल्या स्पृशा (स्पर्शग्राही जाड तंतू) असतात मुखात दात नसतात, पण क्लोमांच्या (कल्ल्यांच्या) मागे असलेल्या ग्रसनी-दंतांचा (घशातील हाडावरील दातांचा) अन्नाच्या चर्वणाकरिता उपयोग होतो. पक्ष (तोल सांभाळण्यास वा हालचालीस उपयोगी पडणाऱ्या त्वचेवरील स्नायुमय घड्या, पर) अपारदर्शक, धूसर हिरव्या रंगाचे, तपकिरी किंवा कधीकधी किंचित तांबूस असतात. वाताशय (वायू साठविलेली पिशवी) वेबर-अस्थिकांच्या (वेबर या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या लहान हाडांच्या) साखळीने कानाला जोडलेला असतो.

वनस्पति-द्रव्य, डिंभ (अळ्या), कीटक, कृमी आणि इतर लहान प्राणी हे यांचे भक्ष्य होय. मोठे कार्प लहान मासेही खातात. मादी पाणवनस्पतींवर अंडी घालते. ती ४–८ दिवसांत फुटून पिल्ले बाहेर पडतात. नैसर्गिक निवासस्थानात ती एका वर्षात १५ सेंमी. लांब होतात, परंतु मत्स्य-पल्वलात (लहान तळ्यात) ती वाढविल्यास एका वर्षात त्यांची लांबी याच्या दुपटीपेक्षाही जास्त होऊ शकते. दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी हा मासा वयात येतो.

  

काही वर्षांपूर्वी या जातीचे मासे श्रीलंकेमधून आणून निलगिरीवरील जलाशयात सोडले होते. तेथील आणि आजूबाजूच्या सपाट प्रदेशातील तलावांचे हवापाणी त्यांच्या अंगवळणी पडल्यामुळे जवळजवळ सर्व वर्षभर (विशेषतः जानेवारी-एप्रिल) त्यांचे प्रजोत्पादन अबाधित चालू असते. पल्वल-संवर्धनाच्या दृष्टीने ही जाती फार उपयुक्त आहे, कारण ऑक्सिजनाचे पाण्यातले प्रमाणे कमी झाले किंवा कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण बरेच वाढले तरी हा मासा या दोन्ही गोष्टी सोसू शकतो. अंडी पिवळी आणि वाटोळी असून जलतृणाला चिकटलेली असतात. ती गोळा करुन संवर्धन-पल्वलांत ठेवतात. पहिल्या वर्षात पिल्लांची लांबी ४१-४६ सेंमी. (वजन ०.९-१·४ किग्रॅ.) व दुसऱ्या वर्षी ६१ सेंमी. (वजन २·३ किग्रॅ.) होते. उटकमंड येथील यरकॉड सरोवरात ७६ सेमी. लांबीचे (वजन ६·८ किग्रॅ.) मासे आढळलेले आहेत.

सायप्रिनिडी कुलातील बहुतेक कार्प माशांचा खाण्याकरिता उपयोग करतात. भारतात कार्प माशंच्या ६० पेक्षाही जास्त जाती आहेत. काही महत्त्वाच्या जातींची मराठी नावे पुढीलप्रमाणे आहेत : चिलवा, वडस, अळकूट, दांडवणा, सांडी, कानोशी, तांब, तांबडा मासा (रोहू), मिरगल, तांबरा (कटला), खडची (कोळशी) आणि फणकूट

कर्वे, ज.नी.