माकड : स्तनी वर्गातील नरवानर गणाच्या अँथ्रोपॉयडिया या उपगणातील प्राण्यांस ढोबळमानाने माकड असे म्हणतात. इंग्लिश निसर्गवैज्ञानिक जॉन रे (१६२७–१७०५) यांनी बॅबून सोडून इतर सर्व सपुच्छ नरवानरांस माकड व पुच्छरहित नरवानरास कपी अशी संज्ञा दिली आहे. [⟶ नरवानर गण].

साधारणपणे माकडांचे दोन विभाग केले जातात. पहिल्या विभागात जुन्या जगातील (आशिया, यूरोप व आफ्रिका या खंडांतील) तर दुसऱ्या विभागात नव्या जगातील (उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांतील) माकडांचा समावेश केला जातो. अँथ्रोपॉयडिया या उपगणाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

श्रेणी :

प्लॅटिऱ्हिनी 

 
 

अधिकुल 

:

सेबॉयडिया 

 
   

कुल 

:

कॅलिथ्रिसिडी उदा., मार्मोसेट.

   

कुल 

:

सेबिडी उदा., स्पायडर माकड, हाउलर (ओरडणारे) माकड.  

     

श्रेणी :

कॅटाऱ्हिनी 

 
 

अधिकुल 

:

सर्कोपिथेकॉयडिया 

 
   

कुल 

:

सर्कोपिथेसिडी उदा., जुन्या जगातील माकडे-लंगूर, मॅकॉक इ.

     
 

अधिकुल 

:

होमिनॉयडिया 

 
   

कुल 

:

हायलोबेटिडी उदा., गिबन 

   

कुल 

:

पाँजिडी उदा., चिंपँझी, गोरिला, ओरँगउटान 

   

कुल 

:

होमिनिडी उदा., आधुनिक मानव. 

माकडे उष्ण कटीबंधातील प्रदेशात राहतात. ती चार पायांवर चालतात. मोठ्या आकारमानाचे बॅबून व मँड्रिल सोडून इतर सर्व माकडे वृक्षवासी आहेत. जमिनीवरून चालताना ती पायाचा सबंध तळवा जमिनीस टेकवून चालतात. ती ताठ बसू शकतात किंवा सरळ उभी राहू शकतात. यामुळे त्यांचे हात इतर कामे करण्यास मोकळे राहतात. माकडांचा चेहरा लहान व चपटा असतो. त्यांचे हात व पाय परिग्राही (पकड घेणारे) असून प्रत्येकास पाच बोटे असतात. हस्तांगुष्ठ (हाताचा अंगठा) व पादांगुष्ठ (पायाचा अंगठा) इतर बोटांपेक्षा भिन्न असतात. बोटांची नखे चपटी असतात. मार्मोसेट या माकडात बोटावर तिक्ष्ण नखरे (नख्या) असतात व फक्त अंगुष्ठावर चपटी नखे असतात. बहुतेक माकडे दिनचर आहेत. ही कळप करून राहतात व कळपाने भक्ष्याच्या शोधार्थ हिंडतात. झाडपाला, फळे, पक्ष्याची अंडी, लहान प्राणी किंवा कीटक यांवर यांचा उदरनिर्वाह चालतो. हाउलर आणि बॅबून या माकडांच्या कळपाचे नेतृत्व वयस्कर नराकडे असते.

नरवानर गणातील इतर प्राण्यांप्रमाणे माकडाच्या मेंदूचे आकारमान मोठे असते. माकडांच्या हातापायांची संचारक्षमता चांगली असते व त्यांची दृष्टीही तीक्ष्ण असते. या सर्व लक्षणांमुळे माकडे क्रियाशील असतात. पुष्कळदा ती माणसाचे अनुकरण करतात.

नव्या जगातील माकडे : यांचा समावेश प्लॅटिऱ्हिनी या श्रेणीत होतो. त्यांचे नाक रुंद असते. नाकपुड्या वरच्या बाजूस वळलेल्या व पसरट पडद्याने एकमेकींपासून विभागलेल्या असतात. जबड्याच्या प्रत्येक बाजूस, वरखाली तीन तीन उपदाढा असतात. यांना अंगठा बोटांसमोर आणता येत नाही. गालाच्या आतील बाजूस कपोलकोष्ठ (गालातील पिशव्या) नसतात. तसेच श्रोणि-किणही (ढुंगणावरील घट्टेही) नसतात. कानाच्या नळ्या अस्थिरहित असतात. कॅटाऱ्हिनी श्रेणीतील माकडांपेक्षा (जुन्या जगातील माकडांपेक्षा) यांच्या डोक्याच्या कवटीच्या हाडांची रचना निराळी असते. पहिले पडणारे दात (दुधाचे दात) २४ असतात व हे पडल्यावर कायमचे ३६ दात येतात. दंत्यसूत्र [⟶ दात] पुढीलप्रमाणे असते: कृं. २/२, सु १/१, उदा., ३/३, दा ३/३ = ३६. शेपूट लांब व काही जातींत परिग्राही असते. शेपटीच्या खालचे कातडे केशविरहित असते. यांचे डोळे लहान असतात. गर्भाशय साधा, वार चकतीप्रमाणे असते व मादीच्या छातीवर दोन स्तन असतात. काही जातींत बोटांवरील नखे पसरट असण्याऐवजी त्या ठिकाणी अणकुचीदार नखरे असतात. ही माकडे जात्या मंद व शांत स्वभावाची असतात. ती माणसाळविण्यास सोपी व आपल्या धन्यावर प्रेम करणारी असतात. यांचा प्रसार दक्षिण अमेरिकेत मेक्सिकोच्या दक्षिणेपासून ते अर्जेंटिनाच्या उत्तरे पर्यंत व पॅसिफिकपासून ते अटलांटिक किनाऱ्यापर्यंत झालेला अढळतो. या श्रेणीतील काही महत्त्वाच्या माकडांच्या गटांची वैशिष्ट्ये खाली दिली आहेत.

मार्मोसेट: कॅलथ्रिसिडी कुलातील माकडांत दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या मार्मोसेटांचा समावेश होतो. यांच्या १० जाती आहेत. यांच्या कित्येक जाती, विशेषत: तेजस्वी सोनेरी रंगाचे लायन मार्मोसेट (लिओटोपिथेकस रोझॅलिया) विनाश पावण्याच्या मार्गावर आहे. या माकडांत अक्कलदाढेचा अपक्षय (ऱ्हास) झाला आहे. यामुळे दातांची एकूण संख्या ३६ वरून ३२ वर आली आहे. या माकडांत बरीच आद्य वैशिष्ट्ये पहावयास सापडतात. बोटांवर पसरट नखांऐवजी नखरे, अपरिग्राही शेपूट आणि एका वेळी दोनपेक्षा जास्त पिलांना जन्म देणे ही त्यांपैकी काही आद्य वैशिष्ट्ये होत. सामान्य मार्मोसेटाची (कॅलिथ्रिक्स जॅकस) लांबी सु. २३ सेंमी. व त्याचे झुपकेदार शेपूट सु. ३० सेंमी. लांब असते. त्याची फर (कातडीवरील केस) मऊ असते. प्रत्येक केस मुळाशी काळा, मधे पिवळा व टोकाशी पांढरा असतो. सर्वसाधारण अंगाचा रंग हिरवट पिवळा दिसतो. कानांची टोके पांढरी असतात. पिलांची काळजी नर घेतो. पिले लहान असताना त्याच्या पोटास चिकटतात. थोडी मोठी झाली की, ढुंगणावर चढतात व शेवटी खांद्यांवर वाढतात. मादी पिलांना अंगावर पाजण्यापुरते घेते. ही माकडे दिनचर असली, तरी दिवसाचा बराच वेळ झोपून काढतात. एकमेकांच्या अंगावरचे केस ही अत्यंत दक्षतेने स्वच्छ करतात. ही आपसात सहसा भांडत नाहीत. माद्यांत सहसा भांडणे होत नाहीत. झालीच तर नरांत माद्यांकरिता कधीकधी भांडणे होतात. ॲ‌मेझॉनच्या जंगलात आढळणारी पिग्मी मार्मोसेट (सेब्युला पिग्मिया) ही जाती सर्व जिवंत माकडांत लहान असून त्यांच्या शरीराची उंची सु. ९ सेंमी. असते. मार्मोसेटाशी संबंधित असलेली टॅमॅरिन गटातील माकडे झाडावर चढण्यात व उड्या मारण्यात पटाईत आहेत.


टिटी, साकी व युकारी : या सर्व गटांतील माकडे वृक्षवासी आहेत. फळे व कीटक हे यांचे भक्ष्य आहे. यांना ३६ कायमचे दात असतात. सर्व बोटांवर नखे असतात. यांचे आकारमान मोठ्या खारीएवढे असते. टिटी व साकी यांचे शेपूट लांब असते पण युकारीमध्ये ते लहान असते. या सर्व गटांतील माकडांत शेपूट परिग्राही नाही, फर जाड व निरनिराळ्या रंगाची असते. पांढऱ्या गळ्याच्या टिटीचा (कॅलिसेबस टॉर्‌कॅटस) रंग काळा असतो आणि तोंड, गळा व हात पांढरे असतात. ही माकडे ब्राझील, एक्वादोर व पेरू या देशांत आढळतात. साकी माकडांचे केस लांब व कुरळे असतात आणि शेपूट झुबकेदार असते. ही गुयाना व ब्राझीलमध्ये आढळतात. यांच्या चार जाती असून काही जातींत डोके पांढरे, तर काहींत डोके काळे असते. युकारी माकडांची शेपटी लहान व झुबकेदार असते. त्यांचे रंगही भडक असतात. यांच्या तीन जाती ॲ‌मेझॉन नदीच्या खोऱ्यात आढळतात. ही सर्व माकडे संघचारी आहेत.

हाउलर (हाउलिंग) माकड : हे माकड वैशिष्ट्यपूर्ण आवाज काढते. हा आवाज बऱ्याच अंतरावरून ऐकू येतो. स्वरयंत्राच्या लघुकोशातून हा आवाज काढला जातो. या ठिकाणचे स्वरयंत्राचे हाड पुष्कळ वाढलेले असते व ते तुतारीसारखे असते. नव्या जगातील माकडांत हे सर्वांत मोठे माकड होय (वजन ७ ते ९ किग्रॅ.). याचे आकारमान मोठ्या कुत्र्याएवढे असते. यांचे रंग पावसामुळे बदलतात. तांबड्या रंगाचे नारिंगी रंगात व नारिंगी रंगाचे पिवळ्या रंगात रूपांतर होते. या माकडांचा ॲ‌ल्यूटा प्रजातीत समावेश होतो व त्यांच्या ६ जाती आहेत. ती दक्षिण अमेरिका ते मध्य अमेरिका या प्रदेशात आढळतात.

कॅप्युचिन माकड : याचे डोके, गळा व छाती पांढरी असते. डोक्यावर गडद तपकिरी रंगाच्या केसांची झालर असते. उड्या मारण्यात व धावण्यात ती फार पटाईत असून लहान पक्षी, कीटक, अळ्या, पाने, फळे इ. सर्व खातात. ही माकडे चतुर आहेत. बंदीवासात ठेवल्यावर ती मानवाची नक्कल करण्यास शिकतात. रानटी अवस्थेत असलेली या गटातील माकडे कोंबड्यासारख्या पाळीव पक्ष्यांचा नाश करतात व फळबागांची नासधूस करतात. सेबिडी कुलातील सेबस प्रजातीतील ही माकडे अर्जेंटिना ते हाँडुरस या दरम्यानच्या जंगली प्रदेशात राहतात. यांच्या टोळीत ३० पर्यंत माकडे असतात.

स्क्विरल माकड : दक्षिण अमेरिकेतील विस्तृत प्रदेशांत आढळणारी (सायमिरी प्रजातीतील ) ही माकडे दिसण्यात मोहक व सुंदर आहेत. यांची कवटी व मेंदू मोठा असतो. आकारमान खारीपेक्षा मोठे व रंग पिवळट हिरवा असतो. डोक्याचा रंग दाट व पायाच्या खालच्या भागाचा रंग लाल असतो. रानटी अवस्थेत ही पाली, अंडी आणि कीटकांवर आपली उपजीविका करतात. यांच्या टोळीत १०० पर्यंत माकडे असतात.

स्पायडर माकड : हे अंगाने सडपातळ असते. याचे हातपाय लांब असतात. शेपूट बरेच लांब व परिग्राही असते. याच्या बोटांत अंगुष्ठांचा अभाव असतो, तरीही चार बोटांनी हे सफाईने झाडावर चढते. याचे शेपूट म्हणजे याचा हातच होय. जेव्हा हे शेपटीच्या आधाराने झाडाच्या फांदीला लोंबकळते व आपले हात-पाय बाजूस पसरते तेव्हा ते कोळ्यासारखे दिसते म्हणून याला ‘स्पायडर माकड’ म्हणतात. याच्या निरनिराळ्या जाती ब्राझील, गुयाना, एक्वादोर व पेरू या देशांत आढळतात. काही जातींत अंगावरील सर्व केस काळे, तर काहींत तपकिरी असतात. ही माकडे कळप करून राहतात. एका मोठ्या कळपात चाळीस ते पन्नास माकडे असतात. काही वेळा मोठ्या कळपाचे लहानलहान कळपांत विभाजन होते. प्रत्येक लहान कळपात काही माद्या, त्यांची पिले व एक किंवा दोन नर असतात. धोक्याची सूचना मिळताच लहान कळप एकत्र येतात व अशा रीतीने पुन्हा तयार झालेला मोठा कळप सुरक्षित ठिकाणी पळून जातो. प्रौढ माकडांचा रंग कोणताही असला, तरी पिलांचा सुरुवातीचा रंग काळा असतो. जन्मानंतर सहा महिने पिले अंगावर पितात. या माकडांचा ॲ‌टिलिस प्रजातीत समावेश होतो.

वुली माकड : नव्या जगातील मोठ्या आकारमानाच्या माकडांपैकी ही माकडे असून लॅगोथ्रिक्स प्रजातीत ती मोडतात. दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागात ही आढळतात. स्पायडर माकडांप्रमाणे यांचे शेपूट परिग्राही असते अंगुष्ठ असतात. बाहूंची लांबी पायांपेक्षा जास्त असते. अंगावर करड्या रंगाचे केस असतात.

डाउराउकाउलिस : या गटातील माकडांना रात्रिंचर कपी असेही म्हणतात. यांचे तोंड घुबडासारखे व डोळे मोठे असतात. यांना दिवसा दिसत नाही. दिवसा ही झाडात लपून बसतात. यांचे शेपूट परिग्राही नसते. ही गुयाना, ब्राझील व पेरू या भागांत आढळतात. एओटस या प्रजातीत त्यांचा समावेश होतो.


जुन्या जगातील माकडे : यांचा समावेश कॅटाऱ्हिनी या श्रेणीत होतो. पूर्व गोलार्धातील उष्ण प्रदेशात, मॅलॅगॅसी (मादागास्कर) व ऑस्ट्रेलिया हे प्रदेश सोडून इतर सर्व ठिकाणी ही माकडे आढळतात. यांचे नाक निरुंद असते. नाकपुड्या जवळजवळ असून खालील बाजूस वळलेल्या व पातळ पडद्याने विभागलेल्या असतात. दोन्ही बाजूंच्या जबड्यांत वर व खाली दोन उपदाढा असतात. पडून पुन्हा येणारे वीस व कायमचे असे एकंदर ३२ दात असतात. यांचे दंत्यसूत्र पुढीलप्रमाणे असते : कृं २/२, सु. १/१, उदा २/२, दा ३/३ = ३२, बहुतेक माकडांत कपोलकोष्ठ असतात. खाल्लेले अन्न काही काळ या कपोलकोष्ठांत साठविता येते. कानाच्या अस्थियुक्त नळ्या डोक्याच्या कवटीत असतात. हाताचा अंगठा बोटांसमोर आणता येतो. यांना आंत्रपुच्छ (लहान आतडे व मोठे आतडे यांच्या संधिस्थानापासून खाली असणारी पिशवीसारखी वाढ ॲ‌पेंडिक्स) नसते. कधीकधी रवंथ करणाऱ्या प्राण्याप्रमाणे यांचे पोटही विभागलेले असते. यांचे शेपूट परिग्राही नसते. काही जातींत शेपूट लांब, तर काहींत आखूड असते. शेपूट नसलेली माकडेही आढळतात. या माकडांच्या ढुंगणावर केशविरहित, कठीण ठिगळासारखे पट्टे (श्रोणि-किण) असतात. पुष्कळदा हे श्रोणि-किण रंगीत असतात. या माकडांत विणीचा हंगाम ठराविक नसतो. लैंगिक दृष्ट्या वयात आलेले नर सर्वकाल जननक्षम असतात. गर्भधारणा न झालेल्या माद्यांमध्ये मासिक ऋतुचक्र नियमित असते. ऋतुचक्राच्या एका विशिष्ट अवस्थेत मादीची बाह्य जननेंद्रिये व त्याजवळची जागा थोडी सुजते. गर्भधारणेचा काळ निरनिराळ्या जातींत निरनिराळा असतो. कमीतकमी साडेचार महिने, तर जास्तीत जास्त सात महिने हा काळ आढळला आहे. एका विणीत एक पिलू जन्मते. क्वचित् प्रसंगी दोन पिले जन्मल्याचे आढळले आहे. यांच्या दोन स्तन ग्रंथी छातीवर असतात. वारेचा आकार चकतीसारखा असतो. काही जातींत वार एकावर एक ठेवलेल्या दोन चकत्यांची बनलेली असते. यातील मुख्य चकतीस नाळ जोडलेली असते. मादी पिलांचे संगोपन करते. काही जातींत ती हे काम नराच्या मदतीशिवाय करते. पिलू काय खाते याची प्रथम चव मादी घेते व ते खावे किंवा नाही हे ती पिलास शिकविते. झाडाच्या फांदीवर कसे चढावे, उड्या कशा माराव्यात याचे शिक्षणही पिलास आईकडून मिळते. वेळप्रसंगी आई पिलाचे कान धरावयास किंवा त्यास थप्पड मारावयासही मागे पुढे पाहत नाही. जुन्या जगातील माकडांच्या जातींपैकी बऱ्याच जाती निरनिराळ्या प्राणिसंग्रहालयांत आढळतात.

लंगूर : ही सर्कोपिथेसिडी कुलातील माकडे स्पायडर माकडांसारखी सडपातळ असतात. यांचे शेपूट परिग्राही नसते. बोर्निओ, जावा, सुमात्रा, श्रीलंका, भारत व तिबेट येथील जंगलांत ३,९०० मी. उंचीपर्यंत ही आढळतात. प्रेसबिटिस या प्रजातीतील माकडात अंगुष्ठ अविकसित असते. कपोलकोष्ठ नसतो. शाकान्नाचे पचन सुलभ व्हावे म्हणून पोटाचे निरनिराळ्या भागांत विभाजन झालेले आढळते. या लंगूर माकडांत हनुमान माकड (वानर) हे प्रसिद्ध आहे [⟶ वानर]. याचे शास्त्रीय नाव प्रेसबिटिस एन्टेलस हे आहे. या माकडाचे केस रुपेरी असतात व तोंड काळे असते. चेहऱ्याच्या कडेस करड्या पांढऱ्या केसांचे कल्ले असतात. हिमालयात राहणारे लंगूर हे हनुमान माकडाचीच एक जाती आहे. ही माकडे १,८०० मी. उंचीवर आढळतात. आग्नेय आशियातील कॅप्ड लंगूर व डोक्यावर काळा तुरा असलेले ब्लॅक क्रेस्टेड लंगूर किंवा लीफ माकड हे हनुमान माकडाचेच जवळचे नातेवाईक होत. या कुलातील चपट्या नाकाचे माकड (पिनोपीथेकस रॉक्सिलानी) हे तिबेटमध्ये व अत्यंत शीत प्रदेशात बर्फाच्या सान्निध्यात आढळते. शुंडाधारी माकडात (नासावानरात) फक्त नरासच शुंडा (लांब व मांसल नाक) असते. या शुंडारूपी नाकाची लांबी सु. ७·६ सेंमी. असते व ही शुंडा तोंडावरून हनुवटीपर्यंत उतरते. यांची मादी व पिले यांचे नाक मात्र चपटे असते. हे माकड बोर्निओच्या दमट जंगलात नदीसन्निध आढळते. हे पोहण्यात पटाईत आहे. याला स्थानिक लोक ‘गोरा माणूस’ म्हणून संबोधितात. याचे शास्त्रीय नाव नेझॅलिस लार्व्हेटस असे आहे.

कोलोबस माकड : ही आफ्रिकेत राहणारी माकडे आहेत. लंगूर माकडापेक्षा यांचे अंगुष्ठ लहान असतात. यांचे रेशमासारखे लांब केस शरीराच्या दोन्ही बाजूंस लोंबतात व ते दुरून एखाद्या वस्त्रासारखे दिसतात. शेपूट सुंदर गोंडेदार असते. फरकरिता यांची शिकार केली जाते. ग्युरेझा (कोलोबस ॲ‌बिसिनिकस) या जातीच्या माकडांची इतकी हत्या झाली की, त्यांच्या संरक्षणाकरिता कायदा करण्यात आला आहे. हे माकड सुंदर असून रंगाने काळे असते. याच्या चेहऱ्याभोवती पांढरे केस असतात व शेपूटचही पांढरे असते. पिले लहान असताना पांढरी असतात. काही जाती तांबड्या किंवा तपकिरी रंगाच्याही असतात. ब्लॅक कोलोबस, अर्साइन ग्युरेझा, मॅटल्ड कोलोबस या आफ्रिकेत आढळणाऱ्या इतर जाती आहेत. ही माकडे नेहमी जंगलातील झाडांवर राहतात व तेथेच त्यांना फळे व पाने या रूपाने लागणारे अन्न मिळते. ही बंदीवासात फार काळ जगत नाहीत.

मॅकॉक, ग्वेनॉन, पाटस व मँगाबे : या गटात सर्वत्र आढळणाऱ्या प्राणिसंग्रहालयांत ठेवलेल्या बऱ्याच जातींच्या माकडांचा समावेश होतो. या सर्व माकडांच्या शेपट्या लांब व अपरिग्राही असतात आणि शेवटच्या टोकापर्यंत त्यांच्यावर आखूड केस असतात. ह्यांच्या अंगुष्ठांची पूर्ण वाढ झालेली असते. हातपाय सारख्याच लांबीचे असतात. पोट साधे (न विभागलेले) असते. कपोलकोष्ठ असतात. रानटी अवस्थेत ते समूह करून राहतात. एका टोळीत बरीच माकडे असतात. टोळीचे नेतृत्व अनुभवी नराकडे असते. प्रत्येक टोळीचे क्षेत्र वेगळे असते. आपल्या क्षेज्ञाचे संरक्षण करण्याकरिता वेळ प्रसंगी टोळ्यांची एकमेकींशी भांडणे होतात. टोळीचा नेता निवडताना योग्य ती काळजी घेतली जाते. नेता हा नेहमी टोळीच्या आघाडीवर असतो व आसमंताचे निरीक्षण करून टोळीस कोठे जावयाचे याचा इषारा देतो. शेतात टोळी उतरली की, प्रत्येक माकड कोवळ्या धान्यावर तुटून पडते. हे खाल्लेले अन्न प्रथम कपोलकोष्ठात साठविले जाते. यानंतर या माकडांची धाड इतस्ततः उड्या मारून शेताची नासधूस करते. लहान पिले आईच्या पोटास चिकटून असतात. जेव्हा काही भीती नसेल तेव्हा ती जमिनीवर इतस्ततः बागडतात व त्यांच्या आया त्यांच्याकडे कौतुकाने बघत बसतात. टोळीच्या नेत्याकडून इषारा मिळाल्याबरोबर आया पिलांना बोलावितात आणि सर्वजण सुरक्षित ठिकाणी पळून जातात. एकमेकांचे केशसंमार्जन करणे हा त्यांचा आवडता छंद आहे. रात्री सर्व माकडे मोठ्या झाडांच्या उंच टोकावर विश्रांती घेतात. यांपैकी बऱ्याच जाती आफ्रिकेत आढळतात.

मॅकॉक :  ही मॅकाका या प्रजातीची माकडे चीन, जपान, भारत, ब्रह्मदेश व मलेशिया या देशांत आढळतात. यांपैकी एक जाती उत्तर आफ्रिका व जिब्राल्टर येथे आढळते. ही माकडे शरीराने बळकट असून थंडी सहन करू शकतात. यांपैकी काही माकडे उंच बर्फाच्छादित शिखरावर आढळली आहेत. या प्रजातीतील मॅकाका म्यूलाट्टा जातीच्या माकडास ऱ्हीसस माकड म्हणतात. हे माकड उत्तर भारतात व आग्नेय आशियात सर्वत्र आढळते. हे कळप करून राहणारे, चपळ व शक्तिमानही आहे. याचे केस लांब व करड्या रंगाचे असतात. याचे श्रोणि-किण लाल रंगाचे असतात. प्रायोगिक संशोधनात जीववैज्ञानिक व वैद्यकीय शाखांत याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला आहे. माणसांच्या रक्तगटांचा प्रश्न सोडविण्यासही या माकडावरच प्रयोग केले गेले [⟶ ऱ्हीसस घटक]. पिगटेल्ड मॅकॉक (मॅ. नेस्ट्रिना) या माकडाच्या तीन उपजाती आसाम, ब्रह्मदेश, थायलंड, मलेशिया व ईस्ट इंडीज या प्रदेशांत आढळतात. याची लांबी सु. ६० सेंमी. असून शरीर बळकट असते. शेपटाची लांबी सु. १५ सेंमी. असते. हे झाडावर चढू शकत असले, तरी बराच वेळ जमिनीवर राहते. सुमात्रामध्ये या माकडांना झाडावरचे नारळ तोडण्यास शिकविले जाते. जपानी मॅकॉक (मॅ. फुस्‌कॅटा) व आसामी मॅकॉक (मॅ. आसामेन्सिस) या दोन्ही जातींची माकडे पाण्याच्या गोठणबिंदूच्या खाली −८° ते −११° से. तापमानात जगू शकतात. बार्बरी कपी (मॅ. इन्यूअस) हे माकड पुच्छरहित आहे. याचे मुस्कट लांब असते. हे मोरोक्को व अल्जीरिया या भागांत आढळते. ते जिब्राल्टरचे रहिवासी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. बार्बरीहून (उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को, अल्जिअर्स, ट्यूनिस व ट्रिपोली या भागातून) ते जिब्राल्टर येथे आणले गेले म्हणून याला बार्बरी कपी असे म्हणतात. यूरोपात आढळणारे हे एकच माकड आहे.


ग्वेनॉन : हे माकड सर्कोपिथेकस या प्रजातीचे आहे. काँगो व अंगोला येथे आढळणारे सर्कोपिथेकस टॅलॉपाइन हे पिवळट हिरव्या रंगाचे माकड फक्त सु. ८० सेंमी. लांब असते व याचे शेपूट सु. ३५ सेंमी. लांब असते. नायजेरिया ते काँगो या प्रदेशांत आढळणारे मिशाळ माकड (स. सीफस सीफस) काळपट हिरव्या ते निळसर-करड्या रंगाचे असते. याचे तोंड निळे असते व त्यावर पांढऱ्या रंगाच्या मिशा असतात. लायबीरियातील स. डायना या माकडाचे तोंड, पाय व शेपूट काळे, शरीर करड्या रंगाचे, तर मान व छाती पांढरी असते. पश्चिम आफ्रिकेतील मोना माकड हे फार देखणे आहे.

पाटस : या माकडाचे शास्त्रीय नाव एरिथ्रोसेबस पाटस आहे. हे ग्वेनॉन माकडांचे जवळचे नातेवाईक आहे. हे वृक्षवासी नाही. याच्या शरीराचा वरचा रंग नारिंगी, खालील पांढरा व तोंडाचा काळा असतो. इथिओपियात व पूर्व आफ्रिकेत हे आढळते.

मँगाबे : क्रेस्टेड किंवा ग्रे-चिक्ड मँगाबे या नावाने ओळखण्यात येणाऱ्या माकडाचे शास्त्रीय नाव सर्कोसेबस अल्बीजेना असे आहे. याचे डोक्यावरचे केस लांब असून त्याचा रंग मधोमध काळा आणि बाजूस करडा असतो. हे कॅमेरून ते युगांडा या भागात विपुल आढळते. याच्या कॉलर्ड मँगाबे, क्रेस्टेड मँगाबे, अजाइल मँगाबे, इ. जाती मर्यादित प्रदेशांतच आढळतात.

बॅबून व माँड्रिल : ही माकडे आफ्रिकेत आढळतात. ही आकारमानाने मोठी असतात. ती नेहमी चार पायांवर चालतात. लांब मुस्कट, टोकाशी असलेल्या नाकपुड्या व बळकट दात यांमुळे यांच्यात व कुत्र्यात साम्य आहे. यांचे सुळे बळकट असतात. काहींना आयाळ असते. यांचे श्रोणि-किण मोठे व रंगीत असतात. जननेंद्रियांचा भाग उघडा व भडक रंगाचा असतो. डोळे लहान असतात. शेपूट साधारण लांब व त्यावरील केस विरळ असतात.

अरबी अथवा पवित्र बॅबून याचे शास्त्रीय नाव पॅपिओ हॅमॅड्रिॲ‌स असे आहे. हे सोमाली प्रजासत्ताक व तांबड्या समुद्राच्या दोन्ही बाजूंस डोंगराळ प्रदेशांत आढळतात. चक्मा बॅबून, गिनी बॅबून, पिवळा बॅबून इ. जातीही सुप्रसिद्ध आहेत. [⟶ बॅबून].

गेलाडा बॅबून (थिरोपिथेकस गेलाडा) हे दुसऱ्या प्रजातीतील असले तरी इतर बॅबूनशी संबंधित आहे. याच्या नाकपुड्या इतर बॅबूनसारख्या टोकावर नसून बाजूला असतात. हे इथिओपियात आढळते.  

मँड्रिल याचे शास्त्रीय नाव मँड्रिलस स्फिंक्स असे आहे. हे सर्वांत कुरूप व क्रूर माकड आहे. [⟶ मँड्रिल].

बॅबून व मँड्रिल आफ्रिकेत व अरेबियात ३,००० ते ३,९०० मी. उंचीवर, डोंगराळ भागात आढळतात. ही जंगलात राहत नाहीत कारण त्यांना झाडावर चढणे जमत नाही. ही कळपाने राहतात. एका कळपात २०० ते ३०० प्राणी असतात. कळपाचे नेतृत्व वयस्कर नराकडे असते. हे आपल्या कळपाशी व बांधवांशी एकनिष्ठ असतात. यांच्या कळपात एकपत्नीकत्व किंवा बहुपत्नीकत्वही आढळते. नर आपल्या माद्यांचे रक्षण करतो. तो सहसा दुसऱ्याच्या मादीच्या वाटेस जात नाही. पिलांचे संगोपन आई करते. पिलू आईच्या छातीस कवटाळते व पिते. थोडे मोठे झाल्यावर ते केशसंमार्जनात रस घेते. यांचा कळप संघटित असतो. कळपातील सर्व माकडे शिस्तीचे पालन करतात.

मानवसदृश कपी : कॅटाऱ्हिनी श्रेणीतील होमिनॉयडिया अधिकुलात मानवसदृश कपींचा समावेश होतो. हे कपी मानवाचे जवळचे नातेवाईक आहेत. शारीर (शरीररचनाविज्ञान), शरीरक्रियाविज्ञान व मानसशास्त्र दृष्ट्या यांच्यात व मानवात बरेच साम्य आहे. यांना शेपूट नसते, हे दोन पायांवर उभे राहू शकतात आणि यांच्या मेंदूची योग्य वाढ झाली आहे. काही माकडांत (उदा., बार्बरी कपी) शेपटीचा अभाव असतो पण हे अपवादात्मक आहे. मानवाप्रमाणे पुच्छ कशेरूकांची (शेपटीच्या मणक्यांची) संख्या बरीच कमी म्हणजे तीन किंवा चार इतकी असते व ते सायुज्जित (एकत्रित) होऊन त्याचे माकडहाड बनते. जरी बऱ्याच वेळा ते चार पायांवर चालत असले, तरी त्यांची गणना चतुष्पाद प्राण्यांत होत नाही. याचे हस्तपादादी अवयव माकडापेक्षा मानवासारखे आहेत. माणसात पायापेक्षा हाताची लांवी कमी असते. चिंपँझीत हातपायांची लांबी सारखी असते तर गोरिला, ओरँगउटान व गिबन यांमध्ये हात पायापेक्षा जास्त लांब असतात. मानवसदृश कपीत व मानवात सर्व कंटकप्रवर्ध (स्नायूंच्या जोडणीत उपयोगी पडणाऱ्या कशेरूकांच्या काट्यासारख्या वाढी) मागेच कललेले असतात. या कपींच्या कवटीची धारणक्षमता जवळजवळ मानवाइतकीच असून मेंदूचे आकारमान मानवाच्या मेंदूएवढे असते. इतकेच नव्हे, तर मेंदूच्या पृष्ठभागावरच्या वळ्या (संवेलके) व त्यांचा विस्तारही जवळजवळ मानवाप्रमाणेच असतो. ओरँगउटानच्या व मानवाच्या मेंदूत पुष्कळच साम्य आहे. मानवाच्या मेंदूतील ब्रॉका संवेलकात (पी. पी. ब्रॉका या फ्रेंच शस्त्रक्रिया-विशारदांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या संवेलकात) वाचेचे केंद्र असते, तसलेच केंद्र चिंपॅंझीच्या मेंदूत असावे असे दिसते. या कपींच्या व त्यातल्या त्यात चिंपॅंझीच्या वर्तनावरून असे वाटते की, यांच्या मेंदूत मानवाशी तुलना करण्याइतके विकसनशील बुद्धीचे केंद्र असावे. [⟶ मानवसदृश कपि].

गिबन : मानवाशी सगळ्यात कमी सादृश्य असणारा हा कपी आहे. जरी शरीराच्या मानाने याचा मेंदू मोठा असला, तरी याला बुद्धी बेताचीच आहे. याचे हात इतर कपींच्या मानाने मोठे असून फक्त याच्यातच इतर माकडांत असणारे श्रोणि-किण असतात. याचा समावेश हायलोबेटिडी या कुलात होतो. हे ब्रह्मदेश, थायलंड, इंडोचायना, मलेशिया, सुमात्रा, जावा व बोर्निओ या प्रदेशांत आढळतात. हायलोबेटीस हूलाक हा. लार या दोन जातींची सरासरी उंची ९० सेंमी. व वजन ६·८ किग्रॅ. असते. मलेशियात व सुमात्रात आढळणारी सिॲ‌मँग (हा. सिनडॅक्टीलस) ही जाती ९० सेंमी. पेक्षा जास्त उंच व वजनात सु. ११ किग्रॅ. असते. हे कपी अंगाने सडपातळ व पळण्यात चपळ असतात. ते झाडाझुडपात राहतात. जमिनीवर असताना सरळ उभे राहून चालणारे ते एकमेव कपी होत. चालताना ते सबंध तळवा टेकवितात व हाताने तोल सांभाळतात. यांचे हात इतके लांब असतात की, उभे राहिल्यावर ते जवळजवळ जमिनीस टेकल्यासारखे वाटतात. काही वेळा पायांची बोटे एकमेकांस चिकटलेली आढळतात. शरीररचनेतील हे फेरफार वृक्षवासी राहणीचे प्रतीक मानण्यास हरकत नाही. सिॲ‌मँग कपी सुमात्रात ३,००० मी. उंचीवरील जंगलांत भक्ष्याच्या शोधार्थ गेलेले आढळतात. यांना पोहता येत नाही व पाण्याची भिती वाटते. हे दिवसभर एकत्रपणे आवाज काढत हिंडतात. सिॲ‌मँगचा आवाज सर्वांत मोठा असतो. हे फळे व पाने खाऊन राहतात पण कधी कधी कीटक, कोळी, पक्ष्यांची अंडी व लहान प्राणी हेही यांचे भक्ष्य असते. बंदीवासात ते कच्चे किंवा शिजविलेले मांसही खातात. प्रथम हात पाण्यात बुडवून ओला करावयाचा व नंतर चाटून त्यावरचे पाणी तोंडात घ्यायचे ही त्यांची पाणी पिण्याची विशिष्ट पद्धत आहे. पाच ते आठ वर्षांच्या काळात ते वयात येतात. यांचा गर्भावधी सात महिन्यांचा असतो. मादी एका वेळी एकच पिलू प्रसवते. पिलू आईच्या अंगावर सात महिने पिते. लहान पिलू तीन ते चार वर्षांचे होईपर्यंत स्वतःचा बचाव करू शकत नाही. दरवर्षी वीण होत असल्यामुळे एकावेळी दोन तीन असहाय पिले आईबापास सांभाळावी लागतात व यातूनच यांची कुटुंबसंस्था निर्माण होते. यांच्यात पुष्कळदा बहुपत्नीकत्वही आढळते. रात्री ते पानांत लपून बसतात व तेथेच झोपतात. घरटे बांधत नाहीत. बंदीवासात ठेवल्यास ते मित्रत्वाने वागतात. आनंद, भिती, आश्चर्य अशा भावना ते निरनिराळे आवाज काढून व चेहऱ्यावर भाव दर्शवून व्यक्त करतात. यांची शिक्षण ग्रहण करण्याची क्षमता इतर कपींच्या मानाने कमी आहे. [⟶ गिबन].


ओरँगउटान : यांची पोंगो पिग्मियस ही एकच जाती आहे. हे सुमात्रा व बोर्निओच्या जंगलांत आढळतात. यांच्यात व मानवाच्या चेहऱ्यात बरेच सादृश्य आहे. या कपीच्या डोक्याची वाढ ऊर्ध्वमुखी (वरच्या बाजूने) आहे. याचे कपाळ उंच व कमानदार असते. याला मानवाप्रमाणे १२ वक्षीय कशेरुक (छातीचे मणके) आणि १२ बरगड्यांच्या जोड्या असतात. याचे हात गोरिला व चिंपॅंझी यांच्या मानाने लांब, पाय आखूड व सुळे विषाच्या दातांसारखे असतात. कवटीची धारणक्षमता गोरिला व चिंपॅंझी यांच्या दरम्यान असते. चेहरा व तळवे सोडून सर्व अंगावर केस असतात. केसांचा रंग तांबडा-तपकिरी असतो. नराचे केस मादीपेक्षा लांब व जाड असतात. नर मादीपेक्षा आकारमानाने मोठा असतो. याचा कंठकोष्ठ (कंठाजवळील हवेची पिशवी) मोठा असतो व छातीपर्यंत लोंबतो. गालात दोन कपोलकोष्ठ असतात. याची उंची सु. १·३ मी. व वजन सु. ६८ किग्रॅ. असते. ओरँगउटान हे कपी गिबनपेक्षा कमी चपळ आहेत. ते विशेष वेड्यावाकड्या उड्या मारीत नाहीत. यांचा पाठलाग केला, तर ते माकडासारखे इतस्ततः न पळता मानवासारखा बुद्धीचा उपयोग करून स्वतःचे संरक्षण करतात. झाडांच्या कळ्या व फळे हे यांचे मुख्य खाद्य होय. ते तोंडाने पाणी पितात. पाठीवर उताणे पडून किंवा कुशीवर पडून ते झोप घेतात. थंडीत किंवा पावसाळ्यात ते अंगावर पानांचे पांघरूण घेतात. प्रौढ नर समागमापुरते माद्यांजवळ येतात. इतर वेळी ते निराळे राहतात. लैंगिक प्रौढत्व वयाच्या दहाव्या वर्षाच्या जवळपास येते. गर्भावधी साधारणपणे साडे आठ ते नऊ महिने असतो. एका वेळी फक्त एकच पिलू जन्मते. जन्मतः पिलाचे वजन सु. ९०० ग्रॅ. असते. मादी पिलाला साधारण दीड वर्षेपर्यंत अंगावर पाजते. बंदीवासात हे प्राणी थोडे थोडे शिकू शकतात. [⟶ ओरँगउटान].

गोरिला : यांची गोरिला गोरिला ही एकच जाती सामान्यतः मानण्यात येते. हे आफ्रिकेतील कॅमेरून, गाबाँ व काँगो येथील दाट जंगलात आढळतात. नरवानर गणात गोरिला हा सर्वांत मोठा व शक्तिमान प्राणी आहे. यांच्या नराची उंची १·८ मी. व वजन सु. २०० किग्रॅ. असते. बर्लिन प्राणिसंग्रहालयात ठेवलेल्या गोरिलाचे वजन २८८ किग्रॅ होते. हे प्राणी दिसण्यात क्रूर आहेत. यांचे कान लहान व मानवासारखे आहेत. डोळे खोल व जबड्याचे स्नायू बळकट असतात. यांच्या कवटीची धारणक्षमता ओरँगउटान किंवा चिंपॅंझी यांच्यापेक्षा कमी असते. जबडे बळकट व सुळे विषाच्या दातांसारखे असतात. हात व पाय यांचे प्रमाण ओरँगउटानपेक्षा अधिक मानवासारखे असले, तरी हात पायांपेक्षा बरेच लांब असतात. याला सरळ छाती काढून उभे राहता येत नाही किंवा चालता येत नाही. पायाच्या तळव्यांच्या बाहेरील बाजूवर व हाताच्या बोटांच्या सांध्यांवर हा उभा राहतो. हा जवळजवळ जमिनीवरच राहणारा बनला आहे. यांच्या माद्या व पिले झाडावर चढू शकतात पण प्रौढ नराला त्याच्या स्थूल व जड शरीरामुळे हे जमत नाही.

नर गोरिला, त्याच्या माद्या व पिले यांचे कुटुंब बनते. काही वेळा पुष्कळ कुटुंबे एकत्र राहून त्यांचा एक समूह बनतो. या समूहात कधी कधी ४० प्राणी असतात. भक्ष्याच्या शोधार्थ ते सारखे हिंडत असतात व भटके जीवन जगतात. यांच्या वसाहतीवर हल्ला झाल्यास नर व माद्या एकत्र जमून लढतात व मोठे आवाज काढून अतिक्रमण करणाऱ्यास भिववितात. बाराव्या वर्षी यांना लैंगिक प्रौढत्व येते. हे बंदीवासात समागम करीत नाहीत. यामुळे यांच्या लैंगिक जीवनाविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. बर्लिन प्राणिसंग्रहालयात ठेवलेल्या छोट्या गोरिलाच्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की, यांची वाढ फार झपाट्याने होते. प्राणिसंग्रहालयात आणलेल्या १३·५ किग्रॅ. वजनाच्या गोरिलाचे ७ वर्षांनंतर तो मेला त्यावेळी २७० किग्रॅ. वजन झाले होते. गोरिला व ओरँगउटान यांची मानसिक क्षमता साधारणपणे सारखीच असते. हा चिंपँझी इतका बुद्धिमान नाही. [⟶ गोरिला].

चिंपँझी : याचे शास्त्रीय नाव पॅन ट्रॉग्लोडायटीझ असे आहे. सिएरा लिओनपासून ते काँगोच्या पूर्व प्रदेशापर्यंत हे आढळतात. या जातीत निवासक्षेत्रानुसार अनेक उपजाती आहेत. ठेंगू चिंपँझी (पॅ. पॅनिस्कस) ही काँगोच्या दक्षिणेस आढळणारी उपजाती स्वतंत्र जाती आहे, असे काही प्राणिशास्त्रज्ञ मानतात. शारीर दृष्ट्या चिंपँझीची रचना पुष्कळशी मानवासारखी आहे. मेंदू, दंत्यसूत्र व हातापायांची सापेक्ष लांबी यांत हे सादृश्य आढळते. याचा मेंदू नरवानरांमध्ये सर्वांत जास्त विकसित झालेला असून त्यातील संवेलके मानवापेक्षा फारशी निराळी नाहीत. याच्या वर्तनावरून असे दिसते की, याची बुद्धी इतर नरवानरांपेक्षा सरस आहे. शरीरक्रियावैज्ञानिक दृष्ट्या रक्ताचे गुणधर्म व ऊतकांची (पेशीसमूहांची) रोपणक्षमता यांवरूनही इतर कपींपेक्षा मानवाशी याचा निकटचा संबंध असावा, असे दिसते. मानवाप्रमाणे चिंपँझीतही शरीराचा रंग, कवटीचा आकार, उंची वगैरे लक्षणांत फेरफार आढळतात. चिंपँझीचे कान लांब, डोळे वैशिष्ट्यपूर्ण व रंग काळा असतो. नराची उंची १·५ मी., तर मादीची १·२ मी. असते. हा गिबन किंवा ओरँगउटानपेक्षा कमी पण गोरिलापेक्षा जास्त प्रमाणात वृक्षवासी आहे. तो जमिनीवर चार पायांनी चालतो. दोन पायांवर उभा राहिला किंवा चालू लागला, तर दोन हात एकातएक गुंतवून कंबरेवर मागील बाजूस ठेवतो. यामुळे त्यास तोल सांभाळण्यास मदत होते. हे कुटुंब करून राहतात. कुटुंबात एक नर, एक किंवा एकापेक्षा अधिक माद्या व पिले असतात. दिवसा ते फळे, पाने या भक्ष्याच्या शोधार्थ हिंडतात व रात्री झाडावर फांद्यांचा व पानांचा बिछाना करून झोपतात. ते तोंडाने पाणी पितात. त्यांना पाण्याच्या प्रवाहाचे किंवा जलाशयाचे आकर्षण नाही व ते पोहू शकत नाहीत. बंदीवासात यांचे प्रजनन (पैदास) झालेले आहे व त्यामुळे यांच्या प्रजननाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. सात-आठ वर्षांत यांना लैंगिक प्रौढत्व प्राप्त होते. मादीचे ऋतुचक्र २६ किंवा २७ दिवसांचे असते. गर्भावधी आठ ते नऊ महिन्यांचा असतो. एका वेळी मादी एक पिलू प्रसवते. जन्मतः पिलाचे वजन १·८ किग्रॅ. असते. मादी पिलाची काळजी घेते. मानवापेक्षा याची वाढ झपाट्याने होते. याचे आयुष्य मानवापेक्षा फार कमी आहे. वयाच्या ३० व्या वर्षी यांना म्हातारपण येते. त्यांचा मृत्यू पन्नासाव्या वर्षी झाल्याचे आढळले आहे. चिंपँझीची शिकण्याची व नक्कल करण्याची क्षमता चांगली आहे. अंगावर कपडे चढविणे, टेबलावर बसून जेवण करणे, घर झाडणे, किल्ली चालविणे, हातोडी व इतर हत्यारे वापरणे. दुचाकी चालविणे आणि धूम्रपान करणे ही कामे हे माणसासारखी करावयास शिकतात. हे शिकण्यात जरी अनुकरण करण्याचाच भाग विशेष असला, तरी ज्या कामात बुद्धीचा उपयोग करावा लागतो अशीही कामे ते करतात. उदा., जर खाण्याचा पदार्थ उंचावर ठेवल्यामुळे त्यांच्या हातात येण्यासारखा नसेल, तर एकावर एक पेट्या रचून व त्यांवर चढून तो हस्तगत करणे त्यांना शिकवावे लागत नाही. इतर अनेक प्रयोगांवरूनही हे सिद्ध करता आले आहे. त्यांची स्मरणशक्ती उल्लेखनीय आहे. एकदा पाहिलेली व्यक्ती ते ओळखतात. तसेच एकदा चालविलेले यंत्रही कालांतराने त्यांना दिले, तर त्यांना ते पुन्हा चालविता येते. याला आपल्या भावनाही व्यक्त करता येतात. आश्चर्य, कुतुहल, वैताग, भीती, राग, आनंद, दुःख आणि निराशा हा आपल्या चेहऱ्यावर व्यक्त करू शकतो. निराशेपोटी हंदके देतानाही हा आढळला आहे. आलिंगन व चुंबन यांद्वारे तो आपले प्रेम व्यक्त करतो. [⟶ चिंपँझी]. 

पहा : ओरँगउटान गिबन गोरिला चिंपँझी टोपी माकड नरवानर गण पुराप्राणिविज्ञान बॅबून मँड्रिल मानवप्राणि मानवसदृश कपि वानर.

संदर्भ : 1. Burton, M. and Others, Larousse Encyclopedia of Animal Life, London, 1976.

            2. Hill, W. C. O. Primates : Comparative Anatomy and Taxonomy, 9 Vols., New York, 1953-75.

            3. Schrier , A. M. Hariow, H. F. Stolnitz, F., Ed., Behaviour of Nonhuman Primates, 2. Vols., New York, 1965.

            4. Walker, E. P. and Others, Mammals of the World, Vol. I, Baltimore, 1964.

इनामदार, ना. भा.


ऱ्हीसस माकडे (माद्या व पिल्ले)चिंपँझीवूली माकडहायलोबेटीस हूलॉककोलोंबस माकडटोपी माकड