भंगुरतारा : एकायनोडर्माटा संघाच्या ऑफियूरॉयडिया वर्गातील प्राण्यांना सामान्यतः भंगुरतारा (ब्रिटल स्टार) म्हणतात. जवळजवळ सर्व समुद्रांत उथळ पाण्यापासून खोल पाण्यापर्यंत हे सापडतात. काही जाती भरती व ओहोटीच्या खुणांच्या मधल्या प्रदेशात सापडतात, तर काही चिखलांच्या फटीत किंवा दगडाखाली आढळतात.

भंगुरतारा

केंद्रबिंब (मध्यवर्ती तबकडी) व केंद्रबिंबापासून निघणारे पाच बाहु हे याच्या शरीराचे मुख्य भाग होत. बाहू केंद्रबिंबापासून वेगळे दिसतात. काहींत बाहुंना शाखा असतात उदा., ॲस्ट्रोफायटन बाहु सांधलेल्या लहान लहान खंडांचे बनलेले असतात व टोकाकडे निमुळते असतात. संदंशिका (पृष्ठावरील चिमट्यासारख्या बारीक संरचना) नसतात. पृष्ठीय (वरच्या) भागावर पट्टयांसारख्या पातळ अस्थिका (लहान हाडे) असतात, त्यांच्या कडांवर लहान मोठे काटे असतात काही वेळा विषम, कॅल्शियममय कणिका आढळतात. यूरिॲलिडामध्ये अंकुशांसारखे (आकड्यांसारखे) भाग असतात. प्रत्येक बाहूच्या कंकालात (सांगाड्यात) आतील बाजूला चरणार अस्थिकांची (ज्यांच्यावर नळीसारखे बारीक पाय असतात अशा अरीय क्षेत्रांवरील लहान हाडांची) एक ओळ असते. जोडीच्या चरणावर अस्थिका संयुक्त होतात व या संयुक्त भागाला मणका म्हणतात. मणक्यांची माळ तयार झालेली दिसते. लागोपाठचे मणके एकमेकांना उखळीच्या सांध्यांनी जोडलेले असतात. मणक्यांना मजबूत स्नायू जोडलेले असतात, यामूळे मणके सगळ्या दिशांना हलू शकतात. हा प्राणी आपले बाहू लांब पसरतो व जवळ ओढून घेतो त्याचप्रमाणे बाहू वाकवितो व ताठ करतो. या क्रियांची वरचेवर पुनरावृत्ती करुन तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो.

 आहारनाल (अन्नमार्ग) पिशवीसारखा असून त्याचे भाग बाहूत नसतात. आहारनाल मुखामधुन बाहेर येऊ शकत नाही. मुखामध्ये काटे असतात व ते चर्वणाचे काम करतात. मॉलस्क (मृदुकाय) प्राणी व कृमी हे यांचे मुख्य अन्न होय, काही भंगुरतारे चिखलातील अन्नकण मिळविण्यासाठी चिखल खातात उलट काही मासे भंगुरतारे खातात. मॅड्रेपोराइट (चापट, वाटोळे किंवा पंचकोनी, पृष्ठावर खोबणी असलेले व आरपार भोके पडलेले कॅल्शियममय तकट) मुखीय पृष्ठावर असतो.

जलवाहिका तंत्राचे (ज्या वाहिन्यांमधून पाण्यासारख्या पातळ द्रवाचे अभिसरण होते त्या वाहिन्यांच्या बनलेल्या तंत्राचे) अरीय नाल अधर (त्रिज्यीय मोठ्या नलिका खालच्या) खाचेत असतात. नालपादांना (नळीसारख्या बारीक पायांना) शाखा असतात. खाचांना आवरण असते. नालपदांना चूषणबिंब (शोषण तबकडी) व तुंबिका (वाहिन्यांचे चंबूसारखे भाग) नसतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता नालपादांचा उपयोग होत नाही. मणक्यामध्ये स्नायु असतात व या स्नायुंशी जुळणाऱ्या गुच्छिका [ज्यांच्यापासून तंत्रिका तंतू (मज्जातंतू) निघतात अशा तंत्रिका कोशिकांचे (पेशींचे) समूह] तंत्रिका-रज्जूवर (मज्जारज्जूवर) असतात.

जनन ग्रंथी केंद्रबिंबात असून त्यांची रचना अरीय असते. काही थोड्या भंगुरताऱ्यांमध्ये जनन ग्रंथी बांहूमध्ये गेलेल्या आढळतात. लिंगे भिन्न असतात काही मात्र उभयलिंगी (नर व मादीची इंद्रिये एकाच प्राण्यात असलेले असे) व जरायुज (पिलास जन्म देणारे) असतात उदा., अँफियूरा डिंभाला (भ्रूणानंतरच्या स्वतंत्र्यपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेला) ऑफिओप्लूटियस म्हणतात. तुटलेल्या भागांचे पुनर्जनन होणे हा याचा विशेष गुणधर्म आहे.

मोशी, मीनाक्षी