ल्वॉफ, आंद्रे : (८ मे १९०२- ). फ्रेंच जीववैज्ञानिक सूक्ष्मजंतुविलयन या प्रक्रियेच्या आकलनात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. रेणवीय जीवविज्ञानातील या कार्याबद्दल त्यांना १९६५ सालचे वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञान विषयाचे नोबेल पारितोषिक ⇨फ्रांस्वा झाकॉब व ⇨झाक ल्यूसँ मॉनो या फ्रेंच जीववैज्ञानिकांबरोबर विभागून मिळाले. 

ल्वॉफ यांचा जन्म आयने-ल-शॅतो येथे झाला. त्यांचे शिक्षण पॅरिस विद्यापीठात झाले. त्यांनी १९२१ मध्ये निसर्गविज्ञानाची पदवी, १९२७ मध्ये एम्.डी. व १९३१ मध्ये निसर्गविज्ञानाची पीएच्.डी. या पदव्या मिळविल्या. पदवीधर झाल्यावर १९२१ मध्येच ते पाश्वर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी साहाय्यक (१९२५-२९), प्रयोगशाळा प्रमुख (१९२९-३८) व सूक्ष्मजैव शरीरक्रियाविज्ञान विभागाचे प्रमुख (१९३८-६८) या पदांवर काम केले. ते या इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळाचे सदस्यही होते (१९६६-७८). या पदावर काम करण्याबरोबरच ते पॅरिस विद्यापीठात सूक्ष्मजीवविज्ञानाचे प्राध्यापक (१९५९-६८) आणि व्हीलझ्वीफ येथील कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रमुख (१९६८-७२) होते.

ल्वॉफ यांनी प्रारंभी फ्लॅजेलेट प्राण्यांमधील वृद्धि-घटक, सिलिएट प्राण्यांतील वृद्धि-घटक, कार्यक्षम व शरीरक्रियावैज्ञानिक विकास, तसेच हीमोफायलस इन्फल्यूएंझी या सूक्ष्मजंतूला आवश्यक असणाऱ्या कोझायमेज घटकाचे अभिज्ञान व त्याचे सूक्ष्मजंतूतील शरीरक्रियावैज्ञानिक कार्य यांसंबंधी संशोधन केले. त्यांनी प्रोटोझोआंच्या आकारजननाचा अभ्यास करून या प्राण्यांत केंद्रकबाह्य (कोशिकेच्या-पेशीच्या- कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल पुंजाच्या बाह्य) अनुहरण (आनुवंशिक लक्षणांचे पुढील पिढीत होणारे संक्रमण) होते, असा शोध लावला. त्यानंतर त्यांनी सूक्ष्मजंतुविलयनासंबंधी संशोधन केले. या प्रक्रियेत सूक्ष्मजंतुभक्षक व्हायरस सूक्ष्मजंतूला संसर्गित करतो व आश्रयी सूक्ष्मजंतूच्या कोशिकेच्या विभाजनाद्वारेच सूक्ष्मजंतूच्या त्यापुढील पिढ्यांत संक्रामित होतो. अशा सूक्ष्मजंतूच्या स्वतःच्या डीएनएमध्ये [डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लामध्ये → न्यूक्लिइक अम्ले] व्हायरसाचे डीएनएही असते. यामुळे सूक्ष्मजंतूंच्या कोशिका विभागजनात त्याच्या गुणसूत्रांबरोबर (आनुवंशिक लक्षणे पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांबरोबर) व्हायरसांचे सुद्धा द्विगुणन होते. हे व्हायरस संक्रामण असांसर्गिक रूपात होते व काही विशिष्ट परिस्थितीत हे रूप सांसर्गिक रूपाची उत्पत्ती करते. या सांसर्गिक रूपामुळे सूक्ष्मजंतू कोशिकेचे विलयन म्हणजेच विघटन होते व त्यातून बाहेर पडलेल्या व्हायरसांत इतर आश्रयी सूक्ष्मजंतूना संसर्गित करण्याची क्षमता असते, जंबुपार प्रारणामुळे (वर्णपटातील लांभळ्या रंगापलीकडील अदृश्य तरंगरूपी ऊर्जेमुळे) सूक्ष्मजंतुविलयन प्रक्रिया प्रवर्तित होते, असे ल्वॉफ यांनी एल्. सिमिनोव्हिच व एन्. केल्डगार्ड या सहकार्यांच्या मदतीने दाखविले. त्यानंतर त्यांनी बालपक्षाघाताच्या (पोलिओच्या) व्हायरसासंबंधी अभ्यास करून प्राथमिक संसर्गाच्या विकासात अविशिष्ट (म्हणजेच सर्वसाधारण परिणाम घडवून आणणारे) घटक महत्त्वाचे कार्य करतात, असे दाखविले. जीवनसत्त्वे सूक्ष्मजीवांच्या बाबतीत वृद्धि-घटक व कोएंझाइम [⟶ एंझाइमे] असे दुहेरी कार्य करतात, असाही त्यांनी शोध लावला.

ल्वॉफ यांना नोबेल पारितोषिकाखेरीज शिकागो, ऑक्सफर्ड, ग्लासगो व लूव्हॉ या विद्यापीठांच्या सन्मानीय पदव्या, तसेच फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसची विविध पाच पारितोषिके, ॲकॅडेमी ऑफ मेडिसीनचे बार्व्ये पारितोषिक, रॉयल नेदर्लंड्स ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे लेव्हेनहूक पदक, ब्रिटिश बायोकेमिकल सोसायटीचे कीलीन पदक, आइन्स्टाइन पुरस्कार वगैरे सन्मान मिळाले. सोसायटी फॉर जनरल मायक्रोबायॉलॉजी, अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, लंडनची रॉयल सोसायटी, रशियाची ॲकॅडेमी ऑफ मेडिसीन वगैरे कित्येक मान्यवर संस्थांचे ते सदस्य आहेत. ते इंटरनॅशनल ॲसोसिएशन ऑफ मायक्रोबायॉलॉजिकल सोसायटीजचे अध्यक्ष व वैद्यकीय शास्त्रांचे संघटन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय समितीचे सदस्य आहेत.

जगताप, राजेंद्र वा.