भाता : कमी-अधिक दाबाची हवा विविध कार्यांसाठी अधूनमधून अथवा सतत पुरविणाऱ्या साधनाला भाता

आ. १. एकेरी हातभाता : (१) फळी, (२) छिद्र, (३) चामड्याच्या चुणीदार घड्या, (४) प्रोथ.

म्हणतात. बाजाच्या पेटीत सूर काढण्यासाठी, इंधन प्रज्वलित करण्यासाठी, केरकचरा व धूळ उडवून देऊन सफाई करण्यासाठी, ओले भाग सुकविण्यासाठी, प्रदूषित हवा किंवा इंधन ज्वलनात निर्माण होणारा धूप पांगवण्यासाठी इ. निरनिराळ्या कामांसाठी भाता वापरतात. बाजाच्या हातपेटीत खंडित हवा पुरवण्यासाठी एकेरी भाता वापरतात, तर पायपेटीत एकासारखी हवा पुरविण्यासाठी दुहेरी भाता वापरतात. दुहेरी भात्यात हवा साठविण्याचे दोन कप्पे असतात. अशा प्रकारचा भाता लोहाराच्या दुकानात भुईभट्टीतील कोळसे प्रज्वलित करण्यासाठीही वापरतात व तो एका हाताने चालवितात. बाजाच्या हातपेटीचा भाताही एका हाताने चालवितात. भाता हा एक प्रकारचा दाबयुक्त हवा पुरविणारा पंपच म्हणावा लागेल.

हातभाता : एकेरी : पुरातन काळात ग्रीक लोक जेव्हा ईजिप्तमध्ये स्थायिक झाले तेव्हा उघडझाप क्रियेने चामड्याच्या पिशवीत हवा घेऊन ती हाताच्या दावाने बाहेर सोडणे या कल्पनेवर आधारित असा पहिला भाता तयार केला गेला. नंतरच्या काळात त्याच्या रचनेत पहिला भाता तयार केला गेला. नंतरच्या काळात त्यांच्या रचनेत थोडा बदल करण्यात आला. भात्याच्या आकाराच्या दोन लाकडी पातळ फळ्या चुणीदार घड्या पाडलेल्या चामड्याने खिळे ठोकून एकत्र जोडतात. एका फळीला एक मोठे छिद्र (किंवा अनेक लहान छिद्रे) ठेवून त्याच्या आतील अंगावर चामड्याची आत उघडणारी झडप बसवितात. फळ्यांची एका बाजूची टोके जवळ आणून त्या ठिकाणी एक पोलादी प्रोथ (निमुळत्या तोंडाची नळी) पक्का बसवितात. फळ्यांची दुसऱ्या बाजूची टोके अलग असून त्यांवर अंगच्या मुठी ठेवलेल्या असतात. या मुठी हातात धरुन अलग केल्या की, झडपेतून बाहेरील हवा आत घुसते आणि नंतर मुठींवर दोन्ही हातांचा दाब देऊन फळ्या मिटल्या की, झडप बंद होऊन आतील हवा प्रोथावाटे बाहेर पडते. प्रोथाचे बाहेरचे छिद्र लहान असते. या क्रियेमुळे दाब युक्त हवा पुरविली जाते. हा भाता हव्या त्या ठिकाणी नेता येत असल्याने त्याचा उपयोग धातूच्या ओतकामात वापरण्यात येणाऱ्या माती अथवा रेती साच्यातील [⟶ ओतकाम] खोल भागातील सुटी रेती साच्याला धक्का न लावता बाहेर उडवून काढण्याकरिता करता येतो.

आ. २. दुहेरी हातभाता : (१) वरची फळी, (२) मधली फळी, (३) खालची फळी, (४) झडप, (५) प्रोथ, (६) वजन, (७) साखळी किंवा दोरी.

दुहेरी : या भात्यात एकेरी हातभात्याच्या आकाराच्या तीन फळ्या असतात. मधल्या फळीला खालची व वरची फळी चुणीदार घडया पाडलेल्या दोन स्वतंत्र चामडयांनी खिळे ठोकून एकत्र जोडतात. खालच्या व मधल्या फळ्यांना मोठी छिद्रे पाडून त्यांच्या आतील अंगावर चामडयाच्या झडपा बसवितात. तिन्ही फळ्यांची एका बाजूची टोके एकत्र जोडून त्या ठिकाणी एक प्रोथ पक्का बसवितात. बाह्य फळ्यांची दुसऱ्या बाजूची टोके अलग ठेवतात. खालच्या फळीचे अलग टोक दोरीने किंवा लोखंडी साखळीने वर ओढल्यास त्या फळीच्या छिद्रातून बाहेरील हवा खालच्या कप्प्यात घुसते व तेथून तो मधल्या फळीतील छिद्रातून वरच्या कप्प्यात शिरते. साखळी खाली सोडली की, खालच्या कप्प्यात पुन्हा बाहोरील हवा घुसते व मधल्या फळीतील झडप बंद होते. पुन्हा साखळी वर ओढल्यावर वरच्या कप्प्यातील हवा प्रोथावाटे बाहेर पुरविली जाते. खालच्या फळीला खाली एक वजन अडकवून ती खाली उघडण्याची योजना केलेली असते. वरच्या फळीवर दुसरे एक वजन ठेवलेले असून त्यामुळे प्रोथातून बाहेर पडणाऱ्या हवेवर दाब निर्माण होतो. हे वजन बदलून जरुरीनुसार दाब कमीजास्त करता येतो. अशा प्रकारे या भात्याने दाबयुक्त हवेचा पुरवठा लोहाराच्या भट्टीतील इंधनाचे तापमान वाढविण्यासाठी करतात. मात्र हा भाता एका जागी बसवावा लागतो. या भात्यातून सर्वसाधारणतः मिळणाऱ्या हवेचा दाब सु. ०.१ किग्रॅ. प्रती सेंमी.२ असतो आणि दर मिनिटास ३० वेळा भाता ओढल्यास भात्यातून दर मिनिटास सु. १ घ. मी. हवा बाहेर पडते.

यांत्रिक भात : (ब्लोअर). या भात्यांद्वारे दाबयुक्त हवा निर्माण करण्यासाठी फिरत्या पात्यांचा उपयोग करतात. हवेच्या अभिसरणासाठी वापरण्यास येणाऱ्या साधनाला पंखा म्हणतात. या पंख्याच्या बाबतीत दाब गुणोत्तर (हवेचे मूळ घनफळ व ती पंख्यातून बाहेर पडल्यावर असणारे तिचे घनफळ यांचे गुणोत्तर) फारच कमी असते. ज्या साधनातून पुरविलेल्या हवेचा मापकदर्शित अंतिम दाब ( भोवतालच्या हवेचा दाब व साधनातून पुरविल्या गेलेल्या हवेचा अंतिम एकूण निरपेक्ष दाब यांतील फरक) ०.०७ किग्रॅ. / सेंमी. पेक्षा कमी असतो त्याला केंद्रोत्सारी पंखा [ ⟶ पंखा] म्हणतात कारण त्यातून खूप हवा कमी दाबाने पुरविली जाते. पण जेव्हा हवेचा मापक दर्शित अंतिम दाब ०.०७ ते २.५० किग्रॅ. / सेंमी. पर्यंत निर्माण केला जातो तेव्हा अशा साधनाला केंद्रोत्सारी भाता म्हणतात कारण त्याचे कार्य केंद्रोत्सारी वायू संपीडकाप्रमाणेच [⟶ संपीडक] असते. जेव्हा हवेचा मापकदर्शित अंतिम दाब २.५० किग्रॅ. / सेंमी. पेक्षा जास्त निर्माण केला जातो तेव्हा अशा साधनास केंद्रोत्सारी संपीडक म्हणतात. जे भाते अतिशय शीघ्र गतीने फिरविले जातात त्यांना टर्बो – भाते म्हणतात. त्यांतील ⇨ टरबाइन वाफेने किंवा इंधन वायूने फिरविले जाते. बरेचसे यांत्रिक भाते विद्युत् चलित्राने (मोटरने) चालवितात. कल्हई लावण्यासारख्या कामासाठी वापरावयाच्या भट्टीकरिता हाताने चालवावयाचा छोटा यांत्रिक भाताही उपलब्ध आहे. केंद्रोत्सारी पंखे बहुधा वायुवीजन (हवा खेळती ठेवणे), शीतन, तापन, ज्वलन झोत (ज्वलनामुळे निर्माण होणारा वायुप्रवाह), शुष्कीकरण, धूळ सफाई इ. कार्यांसाठी वापरतात. कापड गिरणीत पिंजलेला कापूस हवेच्या दाबाने नळातून ढकलून हव्या त्या ठिकाणी नेला जातो. केंद्रोत्सारी भाते आणि संपीडक विशेषकरून भट्ट्यांसाठी वापरतात. त्यांची गती ३,००० फेरे / मि.पर्यंत असते. उच्च तापमानाला वितळणाऱ्या निरनिराळ्या धातूंचा रस करण्यासाठी, धातुकांपासून (कच्च्या रूपातील धातूंपासून) धातूचे उत्पादन करण्यासाठी व धातूच्या शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या भट्ट्यांत इंधनाच्या ज्वलनाकरिता व इतर प्रक्रियांसाठी भारी दाबाची हवा सतत पुरवावी लागते. इंधनाचे ज्वलन सुरू झाल्यावर त्याच्या झळांचे भट्टीच्या सर्व भागात अभिसरण करण्यासाठी व भट्टीच्या रोधकी रचनेतून धूर भट्टीबाहेर धुराड्याद्वारे ढकलण्यासाठी भरपूर हवेचा झोत निर्माण करावा लागतो. पाण्यापासून वाफ निर्माण करण्यासाठी ⇨ बाष्पित्राच्या (बॉयलरच्या) रचनेतील नळ्यांतून किंवा त्याच्या बाहेरून झळा सारण्यासाठी व अभिसरणासाठी भरपूर हवेचा झोत लागतो. यासाठी भारी दाबाच्या हवेचा सतत पुरवठा करावा लागतो. नलिकामार्गातून वा नळातून हवा पुरविताना, त्यातील रोधामुळे अंतिम दाब कमी होतो. म्हणून अती उच्च दाबाची हवा टर्बो – भात्याने पुरवितात. त्याची गती ३,५०० फेरे / मि. इतकी असते. अक्षीय पंखे केंद्रोत्सारी पंख्यापेक्षा जास्त प्रमाणात वेगाने चालतात म्हणून त्यांचा उत्पादन केंद्रांत जास्त प्रमाणात वापर करतात. बंदिस्त जागेतील दूषित हवा काढून घेण्यासाठी अक्षीय पंखे वापरतात. अक्षीय पंखा सापेक्षतः कमी दाबाची जास्त घनफळाची हवा पुरवू शकतो, तर केंद्रोत्सारी पंखा जास्त दाबाची पण कमी घनफळ असलेली हवा पुरवितो.

पहा : पंखा संपीडक.

गानू, अ. प. दीक्षित,चं.ग.