रधित्र : (शेपर व प्लेनर). धातूंच्या छोट्या-मोठ्या भागांचे बाह्य पृष्ठभाग सपाट, तिरकस, परिवक्री किंवा विविध रूपरेषांनुरूप एकधारी हत्याराने तासून तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राला ‘रधित्र’ म्हणतात. छोट्या रधित्रात (शेपरमध्ये) लहान व मध्यम आकारमानांचे नग पकडतात व मोठ्या रधित्रात (प्लेनरमध्ये) अवजड मोठ्या आकारमानांचे नग (उदा., यंत्राचे एकमेकांत मागे-पुढे होणारे भाग वगैरे) पकडतात. रधित्राचे वर्गीकरण त्याचा रेटक (रेटा देणारा भाग) कोणत्या प्रकारे कार्य करतो त्यानुसार आडवे किंवा उभे अशा प्रकारे केले जाते. छोटे रधित्र व मोठे रधित्र यांतील मुख्य फरक म्हणजे छोट्या रधित्रात नग कार्यपटावर (मंचावर) पकडलेला (स्थिर) असून कर्तन हत्यार मागे-पुढे होते आणि मोठ्या रधित्रात एक किंवा अधिक हत्यारे आडव्या भुजेवर स्थिर असून कार्यपटावर पकडलेला नगच मागे-पुढे होत असतो. त्याचप्रमाणे छोटे रधित्र हे लहान प्रमाणातील कर्तनासाठी वापरतात आणि मोठे रधित्र हे सर्वसाधारणपणे अवजड नगाचा ओबडधोबड पृष्ठभाग तासणक्रियेने सपाट करण्यासाठी व जास्त लांबी-रुंदीच्या नगांचे तासण करण्यासाठी वापरतात.

एकधारी हत्यार आडव्या सरकभुजेवरील बिजागरी पेटीवर हत्यारी शीर्षात बसविलेले असून ते आडव्या सरकभुजेवर सरकण्याची योजना केलेली असते, आडवी सरकभुजा रधित्राच्या उभ्या स्तंभावर खाली-वर सरकण्याचीही योजना केलेली असते. रेटकाची चाल ही नगाच्या लांबीप्रमाणे कमीजास्त करता येते. या दोन्ही प्रकारच्या रधित्रांत अग्र (पुढच्या) चालीत तासणक्रिया होते, तर पश्र्च (मागच्या) चालीत धारेचे हत्यार नगाच्या पृष्ठभागावर बिजागरी पेटीमुळे उचलले गेल्याने तासणक्रिया होत नाही. कर्तनाच्या वेळेत बचत करण्यासाठी पश्च चाल अग्र चालीपेक्षा दोन ते तीन पट जलद करण्यात येते. त्यामुळे हत्याराची झीज ही कमी होऊन कंपने कमी होतात. प्रत्येक परतीच्या वेळी संभरण केले जाते (कर्तन हत्याराला अग्र चाल दिली जाते). उभ्या रधित्रात उभ्या रेटकाची चाल खाली-वर ठेवलेली असून खालच्या चालीत तासणक्रिया घडते व वरच्या चालीत घडत नाही. नग आवश्यकेप्रमाणे फिरत्या वर्तुळाकार कार्यपाटावर किंवा कार्यपाट कोनात फिरवून ठेवता येतो. या यंत्राचा उपयोग चाक, कप्पी, दंतचक्र, तबकडी व जोडकडे यांच्या तुंब्यात चावीगाळे तासण्यासही होतो. छोट्या रधित्रामध्ये रेटकाची जास्तीत जास्त चाल ही त्याची क्षमता ठरविते आणि त्याला जास्तीत जास्त २० अश्वशक्त्ती लागते. मोठ्या रधित्रात नगाची जास्तीत जास्त रुंदी व लांबी त्याची क्षमता ठरविते आणि ते चालविण्यास १५० पर्यंत अश्वशक्त्ती लागते व २ ते २·५ मी. रुंदीच्या व १० ते १५ मी. लांबीच्या नगावर क्रिया करण्याची त्याची क्षमता असते.

छोट्या आडव्या व उभ्या रधित्रात यांत्रिक भुजा चालन व द्रवीय चालन या दोन प्रकारांची यंत्रे असतात. मोठ्या रधित्रात दंतचक्रमालेशी संबंधित दंतपट्टी-दंतचक्रिका, स्क्रू-नट व दंतपट्टी-मळसूत्र (वर्म) या चालन प्रकारांची यंत्रे असतात.

आ. १. छोटे भुजा रधित्र : (१) बैठक, (२) साटा, (३) रेटक, (४) कार्यपट, (५) आडवी सरक, (६) उभी सरक, (७) दंतचक्र पेटी, (८) विद्युत चलित्र, (९) रेटक चाल नियंत्रक, (१०) कोन-तबकडी (११) बिजागरी पेटी, (१२) एकधारी हत्यार, (१३) यंत्रशेगडा.

छोटे भुजा रधित्र : याची बैठक बिडाची ओतीव असून तिच्या मागील टोकास एक उभा बिडाचा पोकळ साटा अंगचाच बसविलेला असतो. त्यामुळे तासण प्रेरणेचे धक्के शोषले जाऊन तासणक्रिया सफाईदारपणे होते. साट्यामध्ये यांत्रिक भुजा चालनाची यंत्रणा बसविलेली असते. भुजा ओतीव बिडाची असून तिचे खालचे टोक बैठकीवरील खिळीच्या टेकूवर आधारलेले असते. या भुजेच्या मागील बाजूस एक दंतचक्र असून त्यात त्रिज्येच्या दिशेत गाळा ठेवलेला असतो. त्यात एक चौरस ठोकळा एका स्क्रूच्या साहाय्याने मध्यापासून परिघापर्यंत हव्या त्या अंतरावर सरकवून रेटकाची चाल हवी तेवढी मर्यादित करता येते. या योजनेमुळे ही दंतचक्री भुजा बनते. ती दंतचक्रमालेने विद्युत्‌ चलित्राला (मोटरला) जोडलेली असते. त्यामुळे हव्या त्या गतीने दंतचक्री भुजा फिरू लागली की, उभी गाळायुक्त्त भुजा टेकू-खिळीवर डाव्या उजव्या दिशेस डोलते व रेटकाला आडवी पश्र्चाग्र (मागे-पुढे) चाल मिळते. दंतचक्र पेटी साट्यात बसविलेली असते. बिडाचा रेटक साट्याच्या माथ्यावरील चौकटीत सरकता बसविलेला असतो. साट्याच्या दर्शनी भागावर उभे सरकमार्ग ठेवलेले असतात. त्यावर बिडाच्या पेटीच्या आकाराचा कार्यपट हाताने किंवा स्वयंचलित आडवा सरकविण्याची योजना केलेली असते. कार्यपटाच्या माथ्यावर व दोन्ही बाजूंना अंगचे इंग्रजी टी (T) आकाराचे गाळे ठेवलेले असतात. त्यामुळे नगाची बांधणी त्यावर पक्की करता येते. नग मोठा असल्यास कार्यपटावर जखडतात व लहान असल्यास यंत्र-शेगडा कार्यपटावर जखडून त्यात घट्ट पकडतात. काही रधित्रांत कोन-तबकडी असून ती आडव्या पातळीत हव्या त्या कोनात कलती करून पक्की करतात. त्यामुळे नगाचे तिरकस तासण करता येते. रेटकाच्या दर्शनी तोंडावर एक बिडाची कोन-तबकडी बसविलेली असून तिच्यावर बिजागिरी पेटी बसविलेली असते. बिजागरी पेटी हव्या त्या कोनात फिरवून पक्की करता येते व नगाचा पृष्ठभाग हव्या त्या कोनात तासणे शक्य होते. बिजागरी पेटीच्या तोंडावर बोल्टाने एकधारी हत्यार पक्के बसवितात. हे हत्यार एका स्क्रूने खाली-वर हाताने सरकवून तासणक्रियेकरिता लागणारे संभरण पुरवितात. बिजागरी पेटीमुळे रेटकाच्या पश्र्चचालीत तासण हत्यार नगाच्या पृष्ठभागावरून उचलले जाते.

आ. २. छोटे द्रविय रधित्र : (१) तेलाची टाकी, (२) दंतचक्री पंप, (३)विमोचन झडप, (४) नियामक झडप, (५) व्युत्क्रमी झडप, (६) व्युत्क्रमी तरफदांडी, (७) ओढखुंट्या, (८) रटेक, (९) दद्ट्याम, (१०) सिलिंडर, (११) हत्यारी शीर्ष, (१२) एकधारी कर्तन हत्यार, (१३) नग, (१४) यंत्रशेगडा, (१५)कार्यपट, (१६) बिजागरी पेटी.

छोटे द्रवीय रधित्र : या प्रकारच्या रधित्राची रचना आ. २ मध्ये दाखविल्याप्रमाणे असते. यातील महत्त्वाचा फरक म्हणजे या प्रकारच्या यंत्रात यांत्रिक भुजा, दंतचक्री भुजा, दंतचक्रमाला व दंतचक्र पेटी नसते. यामध्ये रेटकाची हालचाल द्रवीय दाबाने होत असल्याने यंत्राला धक्के बसत नाहीत. रधित्राच्या तळाला तेलाची टाकी असून तेल दंतचक्री पंपाने नलिकांतून व नियामक झडपेमधून एका सिलिंडरामध्ये व परत टाकीत येते आणि प्रत्येक आवर्तनात रेटक मागे-पुढे सरकतो. ओढखुंट्यांचे अंतर बदलल्याने रेटकाची चाल हवी तेवढी मर्यादित करता येते. रेटकाची चाल नियामक झडपेने मंद अथवा जलद होते.

आ. ३. मोठे रधित्र : (१) रूळमार्गी बैठक, (२) सरकताकार्यपट, (३) नग, (४) स्तंभ, (५) स्तंभावरील उभेसरकमार्ग, (६) कमान, (७) आडवी सरकभुजा, (८) बिजागरी पेटीचे हत्यारी-शीर्षे, (९) चालन यंत्रणा,(१०) सरकभुजेवरील आडवेसरकमार्ग.

मोठे रधित्र : या प्रकारच्या रधित्रात बैठक बिडाची ओतीव व अवजड असल्याने तासण प्रेरणेचे धक्के शोषून घेते. या बैठकीच्या माथ्यावर लांबीच्या दिशेत अंगचे दोन रूळ असतात. त्यांवर बिडाचा कार्यपट लांबीच्या दिशेत पश्र्चाग्र चालीत सरकविण्याची योजना केलेली असते. कार्यपटाच्या वरच्या बाजूस अंगचे टी-गाळे नग दाबपकडीने आणि बोल्टाने जखडण्यासाठी ठेवलेले असतात. कार्यपटाच्या लांबीच्या एका बाजूवर त्याची चाल हवी तेवढी मर्यादित करण्यासाठी दोन ओढखुंट्या ठराविक अंतरावर सरकवून पक्क्या करतात. खुल्या बाजूच्या रधित्रात बैठकीच्या एका बाजूवर तर बंद बाजूच्या रधित्रात दोन्ही बाजूंवर बिडाचे स्तंभ उभे काटकोनात पक्के बसविलेले असतात आणि ते माथ्याच्या ठिकाणी बिडाच्या आडव्या कमानीने पक्के जोडलेले असतात. आ. ३ मध्ये अशा प्रकारचे रधित्र दाखविलेले आहे. खुल्या बाजूच्या रधित्रात कार्यपटाच्या रुंदीपेक्षा थोड्या जास्त रुंदीचा नग जखडून परंतु बंद बाजूच्या रधित्रात जास्तीत जास्त कार्यपटाच्या रुंदीइतकाच नग जखडता येतो. उभ्या स्तंभाच्या दर्शनी अंगावर अंगचे उभे सरकमार्ग ठेवलेले असतात. या मार्गांवर कार्यपटाशी समांतर एक बिडाची आडवी सरकभुजा वर-खाली नगाचे तासण-संभरणासाठी सरकविण्याची योजना केलेली असते. या सरकभुजेजवळ आडवे अंगचे सरकमार्ग असून त्यांवर दोन हत्यारी शीर्षांचे पल्याण (आधार) आडवे सरकविण्याचीही स्वयंचलित यंत्रणा नगाच्या रुंदीच्या किंवा बाजूच्या पृष्ठभागाच्या तासण-संभरणासाठी बसविलेली असते. एका स्तंभाच्या बाजूस विद्युत्‌ चलित्र व दंतचक्र पेटी बसवून निरनिराळी पश्चाग्र गती दंतचक्रमालेतून कार्यपटाला पुरविण्याची निरनिराळी चालन यंत्रणा वापरतात. कार्यपटाच्या तळाला नट अथवा दंतपट्टी बसवून त्यांच्याशी अनुक्रमे स्क्रू आणि मळसूत्र किंवा दंतचक्रिका निगडित करून चालनक्रिया केली जाते. वेग बदलता येणारे विद्युत्‌ चलित्रही काही रधित्रांत चालनासाठी वापरतात. या यंत्रात एकाच वेळी नगाच्या दोन वा तीन पृष्ठभागांचे यंत्रण करता येते. चक्री कर्तक रधित्रात एकधारी हत्याराऐवजी उच्च प्रतीच्या पोलादाचा बहुधारी चक्री कर्तक वापरून तासणक्रिया जलद केली जाते. एकधारी हत्यारे निरनिराळ्या कामांसाठी निरनिराळ्या आकाराची असून काही नगांच्या उजव्या-डाव्या अंगांच्या तासणासाठी जोडीने वापरावी लागतात.

भारतात बहुतेक प्रकारची छोटी व मोठी रधित्रे ‘हिंदुस्तान मशिन टूल्स’,‘कूपर एंजिनिअरिंग कंपनी’ वगैरे कारखाने तयार करीत असून त्यांची निर्यातही केली जाते.

संदर्भ :

  • Baumeister, T.; Marks, L. S., Ed., Standard Handbook for Mechanical Engineers, New York, 1967.
  • Chaman, W. A. J., Workshop Technology, Part 2, London, 1972.
  • Habcmit, F. H., Modern Machine Tools, Princeton, 1963.
  • Patel, R. C. and others, Mechanical Technology, Vol. II, Baroda, 1972.
  • E. Houghton, P. S., Workshop Practice, Bombay , 1962.

लेखक : वैद्य, ज. शि.; दीक्षित, चं. ग.; गोसावी, वि. पां.