वातचलित हत्यारे : (न्यूमॅटिक टूल्स). हवेवर दाब दिल्याने तीत जी शक्ती साठविली जाते तिचा वापर करून चालविण्यात येणाऱ्या  हत्यारांना वातचलित (किंवा वायवीय) हत्यारे म्हणतात. सर्वसाधारण कामासाठी वापरण्यात येणारी अशी हत्यारे १० ते २५ किग्रॅ. पर्यंत वजनाची असल्याने ती कारागिराला उचलण्यास व कार्यान्वित करण्यात हलकी, सुकर तशीच सुबाह्य होतात.

हवेवर ठराविक दाब देण्याचे काम एखाद्या इंधनावर चालणाऱ्या एंजिनाने किंवा विद्युत् चलित्राने (मोटरने) एका संपीडकात (पोलादी बंद टाकीत) केले जाते. [⟶ संपीडक]. नंतर अशी हवा लवचिक नळीद्वारे हत्याराला पुरवितात. साधारणपणे हवेवर दर चौ. सेंमी.ला ६.३ ते ८.७५ किग्रॅ. दाब दिला जातो. या हत्यारांनी काम जलद व सुलभपणे करता येते. गाड्यावर संपीडक आणि एंजीन बसवून या फिरत्या संचाने हव्या त्या ठिकाणी काम करता येते. संपीडकातील हवा एकाच वेळी ३-४ लवचिक नळ्यांतून घेऊन ३-४ कारागीर स्वतंत्रपणे काम करू शकतात. तसेच देखभालीसाठी फारसा खर्च येत नसल्याने उत्पादन कामामध्ये या हत्यारांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. विद्युत् शक्तीवर चालणाऱ्या हत्यारांमधील झटका बसणे किंवा ठिणग्यांनी आग लावणे अगर स्फोट होणे अशासारखे धोके या हत्यारांत नसून पाण्याखालीसुद्धा ही हत्यारे उत्तम काम देतात.

पॅरिसमध्ये विद्युत् शक्तीच्या निर्मितीची व वितरणाची व्यवस्था अंमलात येण्यापूर्वी विविध वातचलित हत्यारे व साधने चालविण्यासाठी दाबयुक्त हवा पुरविणारे ४ ते ५० सेंमी. अशा निरनिराळ्या व्यासांच्या भुयारी नळांचे जाळे १८८० नंतरच्या दशकात बसविण्यात आले होते.

या हत्यारांना देण्यात येणाऱ्या गतीनुसार त्यांचे पुढील तीन गटात वर्गीकरण केले जाते : (अ) आघात हत्यारे, (आ) घूर्णी हत्यारे आणि (इ) आघात-घूर्णी संयोगी हत्यारे.

आ. १. वाताचलित फसबंदी भंजक : (१) गळचेपी तरफ, (२) गळचेपी झडप, (३) दाबयुक्त हवा, (४) हवा निष्कास, (५) पोलादी पाचर, (६) चक्र प्रावरण, (७) टॅपेट बैठक, (८) टॅपेट, (९) दट्ट्या, (१०) उभा हवा मार्ग, (११) सिलिंडर, (१२) कार्यकारी झडप, (१३) मूटदांडी.आघात हत्यारे : या गटातील हत्यारांस सर्वसाधारणपणे ‘वातचलित हातोडी’ अशी संज्ञा दिली जाते. कारण अशा हत्यारांनी हातोडीप्रमाणे सतत आघात-प्रत्याघाताची क्रिया केली जाते. धातूच्या ओतीव यंत्रभागांवरील कडाकंगोरे छिनण्यासाठी वातचलित छन्नी हातोडी वापरतात. बाष्प जनित्रांतील अगर धातूंच्या वस्तूंच्या पृष्ठभागावरील कीटण काढण्यासाठी वातचलित कीटण हातोडीचा उपयोग करतात. अस्फाल्टचे रस्ते उकरण्यासाठी रस्ताभंजक हातोडी वापरतात. चुनखडी अथवा मृत्तिका यांच्या उत्खननासाठी वातचलित फावडी उपयोगात आणतात. काँक्रीट किंवा वीटकाम फोडण्यासाठी फरसबंदी भंजक वापरतात, तर काँक्रीट ठासण्यासाठी काँक्रीट कंपित्राचा (कंप पावणाऱ्या साधनाचा) उपयोग होतो [⟶ काँक्रीट]. रिव्हेट बसविण्यासाठी रिव्हेटिंग हातोडी आणि त्यांच्या फटबंदीसाठी (रिव्हेटच्या कडा चेपण्यासाठी) बोथट छिन्नीसारखी कॉकिंग हातडी वापरतात. जमिनीत खंदक खोदण्यासाठी वातचलित खंदक खोदणारे हत्यार उपयोगात आणतात. धातूंच्या ओतीव वस्तूंसाठी रेतीचे साचे करताना रेती धुमसण्यासाठी वातचलित धुमस हत्यार वापरतात. कोरीवकामासाठी वातचलित कोरणी हातोडीचा उपयोग होतो. या प्रकारच्या आघात हत्यारांत जास्तीत जास्त दर मिनिटाला २०,००० पर्यंत ठोके देता येतात.

वातचलित हातोडीची रचना : या हातोडीचा साटा ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूचा केलेला असतो कारण तो वजनाला हलका असून हादऱ्यांच्या आघातांना टिकण्याचा टणकपणाही त्यात असतो. साट्याच्या पोकळीतील सिलिंडरांच्या आकाराच्या कोठीत एक दट्ट्या मागे-पुढे सरकण्याची व्यवस्था सिलिंडरमध्ये वरच्या व खालच्या अंगातील द्वारांमधून दाबयुक्त हवा आलटूनपालटून सोडून केलेली असते. हवा पुरवठ्याच्या द्वारांना स्प्रिंगांचे पाठबळ दिलेल्या झडपा बसविलेल्या असतात. हत्यार कार्यान्वित करण्यासाठी सिलिंडराकडील वरच्या अंगात एक झडप असते. साट्याच्या सिलिंडराकडील वरच्या भागावर कारागिराला हत्यार धरण्यासाठी मूठदांडी बसविलेली असते. वात संपीडकातून लवचिक नळीतून घेतलेली दाबयुक्त हवा सिलिंडरामध्ये वरच्या भागातून मूठदांडीला बसविलेला खटका दाबून स्प्रिंगेचे पाठबळ असलेल्या गळचेपी झडपेतून पुरविली जाते. त्यामुळे दट्ट्या खाली रेटला जाऊन तो सरकण्याची क्रिया घडते. दट्ट्याच्या खालच्या अंगास चक (पकडणारे साधन) बसविलेला असतो. चकमध्ये पोलादाची छिन्नी, फावडे, पोगर, धुमस यांसारखी पोलादी हत्यारे बसविण्याची योजना खिट्टीच्या योगे केलेली असते. रिव्हेट बसविण्यासाठी रिव्हेटाच्या डोक्याच्या उलट आकाराची रूपण हत्यारे व फटबंदी (कॉकिंग) हत्यारे बसवितात. मूठदांडीतील खटका (तरफ) दाबून गळचेपी झडपेतून कारागिराला वेगवेगळ्या कामांसाठी निरनिराळ्या प्रकारचे जलद किंवा मंद गतीचे, तसेच कमी व जास्त जोराचे ठोके देण्यासाठी हव्या त्या प्रकारची दाबयुक्त हवा घेता येते. चकच्या दांडीच्या माथ्यावर आघात-प्रत्याघातासाठी टॅपेट अथवा रबरी चकती-पटल झडप बसविलेली असते.


रिव्हेट बसविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वातचलित हातोडीत रिव्हेटाचे डोके घडविताना दाब क्रियेसाठी दट्ट्याचा उपयोग करतात आणि तो ⇨कॅम, पाचर किंवा बहुतरफी योजना यांना जोडलेला असतो. जुवाची योजना अशा हातोडीत केलेली असल्यास आघात शोषले जातात व त्यामुळे कारागिराला कमी थकवा येतो . काही हातोड्यांत याच कार्यासाठी सिलिंडराच्या वरच्या भागात एका पोकळीत थोडी हवा साठून राहण्याची व्यवस्था केलेली असते.

हाताने चालविण्यात येणाऱ्या वातचलित फरसबंदी भंजकात सामान्यतः घन पोलादी छिद्रक वापरण्यात येतात व ते आपोआप फिरतील अशी व्यवस्था केलेली नसते. आ. १ मध्ये सुवाह्य फरसबंदी भंजक दाखविलेला आहे. सुमारे ३६ किग्रॅ. वजनाची जड यंत्रे काँक्रीट फरसबंदी, पाया व दगडगोटे फोडण्यासाठी वापरतात. २३ ते ३२ किग्रॅ. वजनाचे भंजक हलक्या काँक्रीट जमिनी, मॅक्‌ॲडम रस्ते व गोठलेल्या जमिनी आणि यापेक्षा कमी वजनाचे भंजक साध्या जमिनी, फरसबंदी व विटांच्या भिंती फोडण्यासाठी वापरले जातात.

वातचलित घूर्णी हत्यारे : या गटातील हत्यारे वात चालित्राच्या साह्याने चालवितात कारण अशा हत्यारांना घूर्णी क्रिया लागते. या हत्यारांना निरनिराळ्या कामांसाठी हवी असणारी गती गळचेपी झडपेतून लागेल तसा दाबयुक्त हवेचा पुरवठा वातचलित्रास केल्याने मिळते. या गटातील बरीचशी हत्यारे वेधन क्रियेने काम करतात. अशा हत्यारांच्या फिरत्या  दांड्याच्या टोकांना चक बसविलेला असून त्यात छिद्रक, छिद्रतासणी, अंतःसूत्रक, छिद्रमुख शांकवीय विस्तारक व पेचकस ही पोलादी हत्यारे बसवून अनुक्रमे छिद्रण, छिद्रतासण, अंतःसूत्रण (आतून आटे पाडणे), छिद्रमुख शांकवीय विस्तारण व पेचकसण या क्रिया केल्या जातात. तसेच फिरत्या दंडाच्या टोकावर अपघर्षकांपासून (घासून व खरवडून पृष्ठभाग गुळगुळीत करणाऱ्या पदार्थांपासून) बनविलेली शाणन चक्रे, कापड किंवा केसापासून बनविलेली चक्रे (बफ), सूक्ष्म रेतीपासून बनविलेली कागदी घासपट्टे व पोलादी चक्री करवती बसवून अनुक्रमे शाणन, उजळण, खंडन व कर्तन या क्रिया केल्या जातात. उत्पादन कामात यंत्रभागांची सफाई करून उजाळा देण्यास, तसेच यंत्राची अथवा उपकरणांची जोडणी करताना काम जलद व सुलभ होण्यासाठी या हत्यारांचा उपयोग होतो.

आ. २. वातचलित शाणन हत्यार : (१) शाणन चक्र, (२) वात चलित्र, (३) गाळणी, (४) स्विच, (५) संपीडित हवा.वातचलित घूर्णी हत्याराची रचना : या हत्याराचा साटा ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूचा केलेला असतो. साट्याच्या पोकळीत मध्यभागी एका पोलादी दांडीच्या टोकावर वात चलित्र पक्के बसविलेले असते. यात एका धूर्णकावर धातूची पाती पक्की बसवून तो साट्यातील कोठीत पात्यांवर सतत दाबयुक्त हवा सोडून फिरविला जातो. घूर्णकाच्या दुसऱ्या टोकास हवे ते हत्यार इष्ट त्या कामासाठी बसविण्याची योजना केलेली असते. ओतीव धातूंच्या अवजड वस्तूंचे अगर यंत्रभागांचे खडबडीत पृष्ठभाग घासून गुळगुळीत करण्यासाठी या हत्यारांचा उत्पादन कामात फार मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात.

आघात घूर्णी संयोगी हत्यारे : या गटातील हत्यारांस घूर्णी व आघात अशा दोन्ही क्रिया कराव्या लागतात.

जल, तेल व धातूंची खनिजे यांच्या समन्वेषणासाठी भूपृष्ठात खूप खोलवर मोठ्या व्यासाची भोके पाडावी लागतात. तसेच दगडी कोळशाच्या खाणीत किंवा डोंगरातून  मार्गनिमिर्तीसाठी बोगदे खोदावे लागतात. अशी भोके उभ्या, तिरप्या व आडव्या दिशेत पाडावी लागतात. काही भोके भूपृष्ठातील निरनिराळ्या खोलींवरील भूपृष्ठाचे नमुने गोळा करण्यासाठी, तर काही सुरुंगाची दारू ठासून स्फोट घडवून आणून खडक फोडण्यासाठी पाडावी लागतात. त्यासाठी भूपृष्ठ छिद्रक दर फेऱ्यागणिक खाली खाली उतरविण्यासाठी त्याच्या माथ्यावर ठोके देण्याची व्यवस्था करावी लागते. यासाठी अशा हत्यारांच्या साट्यांत दट्ट्यांची योजना केलेली असून दाबयुक्त हवेने त्याची हालचाल करतात आणि छिद्रकाला एक तर हाताने किंवा वातचलित रॅचेट चाक व खिटी  यांच्या यांत्रिक संयोगाने स्वयंचलित घूर्णी प्रेरणा देतात. निरनिराळ्या कामांसाठी लागणाऱ्या अशा हत्यारांना भूछिद्रक, खडक छिद्रक, मेखचालक, विस्थापक छिद्रक आणि निमज्जक हातोडी असे म्हणतात. कमी खोलीवर भोके पाडण्यासाठी अशी हत्यारे हातात धरून चालविता येतात पण हजारो मीटरांपर्यंत खोल छिद्रण करताना ती यंत्रांच्या साह्याने चालवितात अगर गाड्यांवर बसवून किंवा मालट्रकवर चढवून यांत्रिक पद्धतीने वापरतात. छिद्रक भरीव अथवा पोकळ असून तो उच्च प्रतीच्या कार्बनी पोलादापासून बनवितात. मोठाल्या व्यासांच्या भोकांसाठी नळ्यांसारखे पोकळ छिद्रक असतात व त्यांतून भूपृष्ठाचे स्तर बाहेर पडतात. तसेच खडकांत भोक पाडताना खडकाचा झालेला चुरा अथवा भूगा मधूनमधून भोकांतून दाबयुक्त हवा पुरवून बाहेर उडवावा लागतो. तसेच काही छिद्रक दंडांच्या तोंडावर अत्यंत कठीण अशा मिश्र पोलादाचे तुकडे बसविल्यामुळे ते घर्षणामुळे गरम होऊन त्याची धार कमी होऊ नये म्हणून कर्तन तेलाचा किंवा शीतकाचा कर्तन भागावर पुरवठा करावा लागतो. यासाठी पोकळ छिद्रक उपयोगी पडतात. [⟶ बोगदा, वेधन व छिद्रण].


इतर वातचलित हत्यारे किंवा साधने : दाबयुक्त हवेचा उपयोग उत्पादन कारखान्यातून इतर विविध कामांसाठी किंवा प्रक्रियांसाठी करतात आणि त्यासाठी वातचिलत साधने वापरतात. गतीतील चढ-उताराचे अचूक व निश्चित नियमन करण्यासाठी दाबयुक्त हवेवर चालणारा उच्चालक [⟶ उच्चालक यंत्रे] उपयोगी पडतो. धातूंच्या ओतीव वस्तू किंवा यंत्रमागांच्या पृष्ठभागावरील रेती काढून टाकण्यासाठी, तसेच यंत्रमागांच्या पृष्ठभागांची सफाई करण्यासाठी वालुकाक्षेपण व गोलिका ताडन साधनांचा फार चांगला उपयोग होतो. या साधनातून कठीण रेतीचा किंवा धातूच्या कठीण गोळ्यांचा मारा दाबयुक्त हवेने करतात [⟶ पृष्ठ अंत्यरूपण, धातूंचे]. धातूंचे झिजलेले यंत्रभाग पुन्हा पूर्ववत करण्यासाठी दाबयुक्त हवेने त्यांच्या पृष्ठभागावर धातूंच्या रसाची सूक्ष्म कणांच्या रूपात फवारणी करतात. त्यासाठी वातचलित धातुफवारणीचे पिस्तुल व बंदुकीसारखे साधन वापरतात. वस्तू किंवा वास्तूचे रंगकाम करण्यासाठी दाबयुक्त हवेच्या साहाय्याने रंग फवारण्यासाठी ⇨हवा ब्रश उपयोगात आणतात.

आगगाडीची गती रोधण्यासाठी वातचलित गतिरोधकांची योजना केलेली असते [⟶ गतिरोधक]. अनेक ठिकाणी नळ्यांमधील वातचलित वाहतूक डब्यांतून टपालाची ने-आण करण्यात येते. कारखान्यांतून किंवा खाणींतून मालाची ने-आण करण्यासाठी वातचलित माल किंवा वस्तू वाहक बसविलेले असतात. गोठविलेले खाद्यपदार्थ, बियाणे, खनिजे, सिमेंट वगैरे विविध प्रकारचा माल वातचलित प्रणालीद्वारे हाताळता येतो [⟶ मालवाहू यंत्रे व वाहक साधने]. यंत्रावर काम करताना वस्तू किंवा भाग चकमध्ये घट्ट पकडून ठेवण्यासाठी वातचलित चक किंवा शेगडा तसेच धारक पकड वापरतात. धातूच्या पत्र्यापासून वस्तू अथवा यंत्र भागांचे शीत अवस्थेत उत्पादक करण्यासाठी जी दाबयंत्रे वापरतात त्यांसाठी वातशक्तीचाच उपयोग करतात. रेतीचे साचे करताना जी प्रक्रिया करावी लागते तीसाठीसुद्धा विविध ओतकामाच्या साधनांत किंवा यंत्रांत वातशक्तीचा उपयोग केला जातो.

पहा : संपीडक.

संदर्भ : 1. Anderson, B. W. The Analysis and Design of Pneumatic Systems, New York, 1967. 

            2. Compressed Air and Gas Institute, Compressed Air and Gas Handbook, New York,1966.

दीक्षित, चं. ग.