रॅचेट चाक व खिटी : ही एक महत्त्वाची यांत्रिक प्रयुक्ती असून एकाच दिशेने होणारी पण त्याउलट दिशेने न होणारी गती देण्यासाठी तिचा अनेक यंत्रांत व उपकरणांत उपयोग करण्यात येतो. रॅचेट चाक हे सामान्यतः दातेरी असून खिटीच्या (हिला कुत्रे असेही म्हणतात) साहाय्याने याचे कार्य होते. उच्चालक रहाटयंत्रासारख्या (विंचसारख्या) यंत्रास अटकाव करून त्याने उचललेले वजन धरून ठेवणे, अटकाव केलेला भाग निसटू न देणे अगर उलट दिशेने फिरण्यास प्रतिबंध करणे यांसारख्या कामांसाठी या प्रयुक्तीचा उपयोग करतात. खिटीला पुढे मागे अशी रॅचेटवर गती देऊन खंडित वा अंतरित (थांबून थांबून होणारी) गती निर्माण करण्यासाठी सुद्धा ही प्रयुक्ती वापरतात. अशा प्रकारे या प्रयुक्तीच्या साहाय्याने पश्चाग्र (मागे-पुढे) अगर दोलन गतीचे रूपांतर खंडित परिभ्रमी गतीत, त्याचप्रमाणे या उलटही करता येते. रॅचेटचे दाते करवतीप्रमाणे असल्यामुळे खिटीच्या टोकाचा भाग दात्यावरून एका दिशेकडे जाताना घसरतो, तर त्याच्या उलट दिशेत तो दोन संलग्न दात्यांमध्ये अटकून राहतो. यामुळे मिळालेल्या गतीचे प्रत्यावर्तन होत नाही.

आ. १. साधे रॅचेट चाक व खिटी : (१) रॅचेट चाक, (२) दोलन भुजा, (३) चालक खिटी, (४) अटक व धारक खिटी.रॅचेट हे सरळ वा वक्र पट्टीच्या स्वरूपातही असते. खिटी विविध आकारांची असते, उदा., विकेंद्री बसविलेली (रॅचेटपेक्षा निराळे फिरण्याचे केंद्र असलेली) चकती, गोलक धारवा इ. रॅचेटवर खिटी धरून ठेवण्यासाठी गुरुत्वाकर्षण, स्प्रिंग वा केंद्रोत्सारी प्रेरणा (केंद्रापासून दूर ढकलणारी प्रेरणा यात खिटी रॅचेटच्या आत बसविलेली असते) यांचा उपयोग सामान्यतः केला जातो.

साधे रॅचेट चाक व खिटी यांनी बनलेली प्रयुक्ती आ. १ मध्ये दाखविली आहे. यात २ या भुजेच्या (तरफ दांडीच्या) दोलन गतीने १ हे रॅचेट चाक बाणाच्या दिशेने फिरविले जाते. ३ ही चालक खिटी भुजेवर बसविलेली असून भुज उलट दिशेने जाताना ४ ही अटक वा धारक खिटी चाकाच्याविरुद्ध दिशेतील गतीला प्रतिबंध करते. यामुळे चाकाला एकाच दिशेने नमुनेदार खंडित गती मिळते.

आ. २. रॅचेट चाक व खिटी : (१) रॅचेट पट्टी, (२) चालक खिटी, (३) तरफ दांडी, (४) धारक खिटी.पट्टीच्या आकाराच्या रॅचेटमध्ये रॅचेटची हालचाल सरळ रेषेत होण्यासाठी चालक खिटी तरफ दांडीवर बसविलेली असते, तर धारक खिटी स्थिर भागावर बसवितात (आ. २). मोटारगाडीच्या काही उत्थापकांत (जॅकमध्ये) अशी यंत्रणा वापरतात. रॅचेटने उचललेले वजन चालक खिटी उचलण्याच्या पुढील गतीकरिता वर जाईपर्यंत जागी राहावे म्हणून धारक खिटी कार्य करते. ती रॅचेटला खाली घसरू देत नाही. दुहेरी क्रिया करणाऱ्या खिटीने दोन्हीपैकी कोणत्याही एका दिशेत गती देता येते किंवा तिची अटक क्रिया उलट करता येते. कॅम खिटीचा [⟶ कॅम ] पाचरीप्रमाणे उपयोग करून रॅचेट चाकाच्या सव्य दिशेतील (घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या दिशेतील) गतीला प्रतिबंध करता येतो व अपसव्य गतीला मोकळीक देता येते. या तंत्राचा उपयोग

आ. ३. खिट्यांचे काही उपयोग : (अ) दुहेरी क्रिया करणारी खिटी,, (आ) उलट अटक क्रिया करु शकणारी खिटी, (इ) कॅम खिटी, मोटारगाडी चढावरून जाताना गतिरोधकाच्या पायट्यावरून पाय काढून घेतल्यावर ती मागे घसरण्यास प्रतिबंध होण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रयुक्तीत करतात.

चाकावरील दाते गुंतविण्यातील ढिलाई कमी करण्यासाठी लहान दात्यांचा अथवा अतिरिक्त स्थिर खिट्यांचा किंवा आवाजरहित (मुक्त चक्री) रॅचेटचा उपयोग करतात. आवाजरहित रॅचेटचे दोन प्रकार आ. ४ मध्ये दाखविले आहेत. यात आतील चालक घटकाच्या अपसव्य परिभ्रमी गतीमुळे गोळ्यांच्या पाचरी क्रियेद्वारे बाहेरील अनुगामी घटकाला गती मिळते. यातील विविध रचनांत निमुळत्या होत गेलेल्या खाचांत पाचरीप्रमाणे बसण्यासाठी गोळ्या, लाटा (रूळ) किंवा विकेंद्री बसविलेल्या खिट्या वापरतात. त्यामुळे आवाजरहित, स्थिर, ढिलाईरहित व एकाच दिशेतील गती मिळते. सायकलीच्या मुक्त चक्रात अशी यंत्रणा वापरतात. उच्च गतीच्या यंत्रांत दातेरी रॅचेटच्या तुटक गतीमुळे मोठा धक्का निर्माण होतो. अशा यंत्रांत सतत बदलणारी पण दिशेच्या दृष्टीने संवेदनशील क्रिया करणारी वरील प्रकारची रॅचेट प्रयुक्ती उपयुक्त असते.

आ. ४. आवाजरहित अथवा मुक्त चक्री रॅचेट : (अ) एकाच गोळीचे मूलभूत रॅचेट : (१) चालक घटक, (२) अनुगामी घटक, (३) गोळी (आ) स्प्रिंगयुक्त मूलभूत प्रकार : (१) चालक घटक, (२) अनुगामी घटक, (३) गोळी, (४) स्प्रिंग (यात स्प्रिंगचा वापर केल्यामुळे कोणत्याही प्रारंभिक स्थितीतील गोळ्यांची पाचरी क्रिया निश्चित होते).निरनिराळ्या चालक व गतिरोधक यंत्रणा रॅचेट प्रयुक्त्यांच्या वापरामुळे सुरक्षित झालेल्या आहेत. रॅचेट चाक व अटक खिटी यांचा सुरक्षा गतिरोधक म्हणून जहाजावरील ⇨कॅप्स्टनमध्ये, रहाटयंत्रात, यारीत वा इतर शक्तिचलित ⇨उच्चालक यंत्रात उपयोग करतात. अडचणीच्या जागी वापरता येण्यासाठी पेचकस व पाना यांत रॅचेटचा उपयोग करतात. डोलमिट व धातूंना भोके पाडण्यासाठी वापरण्यात येणारा हस्तछिद्रक यांच्या मुठीचा पूर्ण फेरा करणे शक्य नसते तेव्हा रॅचेट वापरतात. अनेक गणन प्रयुक्त्या रॅचेटच्या उपयोगावर आधारलेल्या आहेत. यंत्रात संस्करणासाठी मालाचा पुरवठा करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या रॅचेट संभरकाने खिटी बसविलेल्या भुजेला गती देऊन रॅचेट चाक व संभरक स्क्रू यांची हालचाल घडवून आणली जाते. असा रॅचेट संभरक अनेक प्रकारच्या यंत्रांत वापरला जातो व त्याची क्रिया बहुधा स्वयंचलित असते, उदा., ⇨रधित्राचा कार्यपट कर्तन हत्याराच्या प्रत्येक चालीच्या वेळी रॅचेटच्या साहाय्याने बाजूने थोडासा सरकवितात. या गतीमुळे नगाच्या यंत्रण करावयाच्या संपूर्ण पृष्ठभागावर योग्य संस्करण क्रिया करता येते.

गानू, अ. प. ओक, वा. रा. दीक्षित, चं. ग.