झिरपबंदी : (सीलिंग). दाब असलेला वायू वा द्रव पदार्थ एखाद्या पात्रातून, उपकरणातून किंवा यंत्रातून झिरपू नये म्हणून केलेली प्रतिबंधक योजना. पात्रांचे, उपकरणांचे अथवा यंत्रांचे भाग एकत्र जोडावे लागतात व मधून मधून सुटेही करावे लागतात. अशा वेळी या जोडण्यात येणाऱ्या भागांत जर फट राहिली, तर तीतून द्रायू (वायू अथवा द्रव) निसटून त्याच्या दाबाची मात्रा कमी होत जाईल. येथे संपर्कात येणारे भाग स्थिर किंवा गतिमानही असू शकतात.

आ. १. नरम गॅसकेटांचे प्रकार : (१) गॅसकेट

अशी जोडणी ज्यात करावी लागते अशा स्थिर भागांच्या वस्तूंची परिचित उदाहरणे म्हणजे प्रेशर कुकर, औद्योगिक दाबपात्रे व बाष्पित्र (बॉयलर) ही होत. यांत द्वारे असून त्यांना पाळ्या जोडलेल्या असतात. त्यांवर घालावयाच्या झाकणांनाही पाळ्या असतात. या पाळ्या जोडताना जो झिरप प्रतिबंधक (आ. १) घालावा लागतो, त्याला गॅसकेट म्हणतात. गॅसकेटे साधारण पातळ असून ती कमी दाबासाठी नैसर्गिक वा कृत्रिम रबर, चामडे, ॲस्बेस्टस, कागद, प्लॅस्टिक यांसारख्या नरम व लवचिक पदार्थांची करतात. उच्च दाबासाठी ती तांबे, ॲल्युमिनियम, पोलाद इ. वर्धनीय धातूंची करतात (आ. २). आकृतीत गॅसकेटांच्या कड्यांचे काटच्छेद दाखविले आहे. ही पहिल्या प्रकारच्या गॅसकेटांपेक्षा बरीच जास्त पातळ असतात.

आ. २. धातूची गॅसकेटे

आ. ३. दट्ट्याच्या परिघावरील कडी : (१) दट्ट्या, (२) कडी

सापेक्ष गोल गतीने फिरणारे वा सरळ सरकणारे भाग जोडताना निरनिराळ्या प्रकारांच्या झिरप प्रतिबंधक योजना वापरतात. उदा., एंजिनातील सिलिंडरामध्ये पश्चाग्र (पुढे-मागे) सरकणाऱ्या दट्ट्याच्या परिघावर बिडाची कडी (आ. ३) बसवितात. त्याचप्रमाणे वाफ एंजिनाच्या दट्ट्याचा दांडा व सिलिंडराचे बंद तोंड अथवा पंपाचा फिरणारा दंड व बाजूचे झाकण यांसाठी भरणपेटी व टोपण (आ. ४) वापरून झिरप बंद करतात. भरणपेटीत दंडाभोवती ॲस्बेस्टसची किंवा रबराची दोरी गुंडाळून अथवा त्यांची कडीही बसवून ती एका टोपणाने पेटीत दाबून धरतात.

अती वेगाने फिरणाऱ्या दंडासाठी प्रतिबंधक म्हणून व्यूह पद्धतीचे (लेबिरिंथ, आ. ५) बंधन योजतात. हे मुख्यतः वाफेच्या टरबाइनात वापरतात. या व्यूहात दंडावर तीन वा चार कडी बसवितात. दंडाभोवतालच्या ही

आ. ४. भरणपेटी व टोपण : (१) फिरणारा दंड, (२) झाकण व भरणपेटी, (३) टोपण, (४) भरण. आ. ५. व्यूह पद्धतीने वाफ टरबाइनातील झिरपबंदी : (१) दंड, (२) काया, (३) कडी.

कायेतही (कवचातही) तसलीच वा निराळी कडी योग्य तऱ्हेने बसविलेली असतात. ही दोन्ही ठिकाणची कडी एकमेकांच्या शेजारी वा समोरासमोर शक्य तितकी निकट पण प्रत्यक्ष स्पर्श न होता फिरतात. या रचनेत झिरप पूर्णपणे बंद होत नाही पण तिचे प्रमाण अगदी अल्प राहते. या रचनेचा मुख्य फायदा म्हणजे हीत घर्षणजन्य ऊर्जाहानी अगदी कमी असते.

आ. ६. यांत्रिक प्रतिबंधक : (१) दंड (२) कवच.

फिरणाऱ्या दंडासाठी, विशेषतः जेथे दाब व गती जास्त असतात, तेथे यांत्रिक प्रतिबंधक (आ. ६) वापरतात. यात धातूच्या आणि कार्बनाच्या कड्याच्या जोडाचा उपयोग करतात. जोडातील एक कडे दंडाला व दुसरे कवचाला बसवितात.

कड्यांच्या समोरासमोरच्या बाजू (तोंडे नव्हेत) एकमेकांवर घासत राहतात. म्हणून त्या अगदी गुळगुळीत करतात व शिवाय त्यांचे पृष्ठभाग अगदी जुळते असावे लागतात.

संदर्भ : Baumeister, T. Marks, L. S., Eds. Standard Handbook for Mechanical Engineers, New York, 1967.

जोशी, म. वि.