आटे पाडणे : एखाद्या दंडगोल भागाभोवती दोरी गुंडाळल्याप्रमाणे थोडासा कल देऊन जर एक सलग खाच पाडीत गेले, तर त्या भागावर खाचेचे जितके वळसे झालेले असतील तितक्या तिरप्या धारा उत्पन्न झाल्या आहेत असे दिसते. या धारांना ‘आटे’ म्हणतात. बोल्टासारख्या भरीव दंडगोल भागावरील आट्यांना ‘बाहेरचे आटे’ म्हणतात व नटाच्या भोकातील आट्यांना ‘आतले आटे’ म्हणतात.

आटे पाडण्याचे काम हाताने फिरवण्याच्या हत्याराने करता येते किंवा त्यासाठी लेथ किंवा चक्री कर्तक (मिलिंग) यंत्रांचा उपयोग करता येतो. हाती पद्धतीमध्ये बाहेरच्या आट्यांसाठी बहि:सूत्रक (डाय) हत्यार वापरावे लागते व आतल्या आट्यासाठी अंत:सूत्रक (टॅप) हत्यार वापरावे लागते. ज्याप्रमाणे आट्यांचे निरनिराळे प्रकार असतात, त्यानुसार बहि:सूत्रक व अंत:सूत्रकांचेही निरनिराळे प्रकार असतात.

हाती पद्धतीमधील एका हत्याराने फक्त एका ठराविक व्यासाच्या दंडगोल भागावरच आटे पाडता येतात. परंतु लेथवर आटे पाडताना एकाच सामान्य टोकदार हत्याराने कोणत्याही व्यासाच्या दंडगोल किंवा शंकूसारख्या भागावर आटे पाडता येतात.

आ. १. बहि:सूत्रक

बाहेरचे आटे : हाती पद्धतीने दंडगोल भागावर बाहेरचे आटे पाडण्यापूर्वी दंडगोल भागाचा व्यास ठराविक मापाचा असावा लागतो. हाती पद्धतीच्या बहिःसूत्रकाचे कर्तक व दांडी असे दोन भाग असतात (आ. १ व २). कर्तक कडक पोलादापासून तयार केलेला असतो व त्याचा आकार साधारणत: नटासारखा असतो. त्याच्या भोकामध्ये अक्षीय दिशेने तीन किंवा चार पन्हळ्या पाडलेल्या असतात. या पन्हळ्यांमुळे हत्याराच्या आतील आट्यांमध्ये अनेक कर्तक दात तयार होतात व त्या पन्हळ्यांमधून कापलेल्या वस्तूचा चूर सहजी बाहेर काढला जातो. 

आ. १ मध्ये एका बाजूकडे काप काढलेला कर्तक दाखविला आहे व आ. २ मध्ये कर्तक घरावयाची दांडी दाखविली आहे. कर्तक धरणाऱ्या दांडीच्या मधल्या भोकामध्ये कर्तक बसवून तो चार स्क्रूंच्या मदतीने दांडीमध्ये पक्का अडकवून ठेवतात. कर्तकाच्या एका पन्हळीतून काप काढलेला असला, तर त्या कापामध्ये एका स्क्रूचे टोक घुसवून कर्तकाचा आकार काही प्रमाणात कमीजास्त करता येतो. आटे पाडताना सुरुवातीला कर्तक सैल ठेवतात व नंतर तो थोडा थोडा आवळीत जातात. ज्या वस्तूवर आटे पाडावयाचे असतात तिचा एकीकडील भाग शेगड्यामध्ये घट्ट धरून ठेवतात व खुल्या टोकाकडून आटे पाडण्याचे हत्यार दोन्ही हातांनी सारखे दाबून नटासारखे सव्य दिशेने (घड्याळातील काट्यांच्या हालचालीच्या दिशेने) अर्धा फेरा पुढे व पाव फेरा मागे असे फिरवीत जातात. आटे पाडताना त्या भागावर थोडे वंगणतेल सोडले, तर आटे चांगल्या प्रतीचे होतात व हत्यार पुष्कळ दिवस टिकते. 

यांत्रिक शक्तीने लेथवर आटे पाडताना आटे पाडावयाचा भाग लेथच्या चकमध्ये (फिरणाऱ्या पकडीत) नीट धरून यांत्रिक शक्तीने फिरवला जातो व आटे पाडणारे हत्यार यंत्राच्या हत्यार-धारकामध्ये बसवून फिरणाऱ्या भागाच्या गतीला अनुरूप अशा सापेक्ष गतीने यांत्रिक शक्तीनेच सरकविले जाते.

आ. २. बहि:सूत्रक-दांडी

काही विशेष प्रकारच्या लेथवर काम जलद करण्यासाठी हाती हत्यारासारखेच काम करणारे विशेष बनावटीचे बहि:सूत्रक हत्यार वापरतात. हे हत्यार पुढे सरकत असताना फिरणाऱ्या वस्तूवर आटे पाडीत जाते. आटे पाडण्याची जागा संपली म्हणजे ते हत्यार सैल करून एकदम आरंभस्थानी आणता येते. नळ्यांच्या टोकावर आटे पाडण्याकरिता अशा पद्धतीचे खास यंत्र असते.

आतले आटे : कोणत्याही पद्धतीने आतले आटे पाडण्यापूर्वी त्या जागी ठराविक व्यासाचे भोक तयार करावे लागते. या भोकाचा व्यास त्यात बसणाऱ्या स्क्रूच्या बाहेरच्या व्यासापेक्षा कमी असतो.अशा भोकांची मापे बहुतेक मानक (प्रमाणभूत) पुस्तकातील कोष्टकांमध्ये दिलेली असतात. भोकामध्ये आतले आटे पाडण्याचे काम हाती पद्धतीने करण्यासाठी तीन अंत:सूत्रक हत्यारांचा एक संच असतो. असा संच आ. ३ (अ, आ, इ) मध्ये दाखविला आहे. अंत:सूत्रक दोन हातांनी नीट दाबून धरण्याकरिता व फिरविण्याकरिता दांडी वापरतात. अंत:सूत्रकाचे वरचे चौकोनी टोक या दांडीच्या मधोमध असलेल्या चौकोनी भौकात बरोबर बसते. त्यामुळे दांडी दाबून सव्य दिशेने फिरविली म्हणजे कर्तक हत्यार भोकामध्ये आटे पाडीत पुढे सरकत जाते. अ, आ, इ हे तीन अंत:सूत्रक एकामागून एक असे भोकात घालून दाबून फिरवीत गेले म्हणजे भोकामध्ये पाहिजे तसे आटे तयार होतात. आ. ३ मध्ये दाखविलेल्या अंत:सूत्रकाचे, आटे पाडलेला भाग (सूत्रक) साधा मूळ भाग (जंघा) आणि मागचे चौरस टोक, असे तीन भाग असतात.


 आ. ३. अंत:सूत्रक संच व दांडी

आटे पाडलेल्या भागात बहि:सूत्रक हत्याराप्रमाणेच तीन किंवा चार पन्हळी पाडलेल्या असतात. त्यामुळे आट्यांच्या भागामध्ये अनेक कर्तक दात तयार होतात व पन्हळ्यांमधून कापलेल्या धातूचा चूर बाहेर पडण्यास मदत होते. संचातील पहिल्या (अ) कर्तकाचा पुढचा बराच भाग निमुळता केलेला असतो, त्यामुळे तो भोकात सहज शिरतो. दुसऱ्या (आ) कर्तकाचे पुढचे टोक एक-दोन आट्यांपुरतेच निमुळते केलेले असते. हे दोन्ही कर्तक भोकातील पृष्ठभागावर खाच कापीत जातात आणि खाचेच्या मधल्या भागात आटे तयार होतात. तिसरा कर्तक (इ) खाचेची खोली पूर्ण करून आट्यांना सफाईदार बनवतो.

यांत्रिक पद्धतीने आतले आटे पाडण्याकरिता छिद्रण-यंत्राचा किंवा लेथचा उपयोग करता येतो. छिद्रण-यंत्रावर आटे पाडावयाचा भाग टेबलावरील शेगड्यामध्ये पक्का धरून ठेवतात. कर्तक इत्यार छिद्रण-यंत्राच्या हत्यार धरणाऱ्या नळीमध्ये म्हणजे तर्कूमध्ये बसवून खाली दाबून हाताने हळूहळू फिरवतात. लेथवर अंत:सूत्रकाने आतले आटे पाडताना आटे पाडावयाचा भाग लेथच्या माथ्याकडील मुख्य तर्कूवर बसवून हातानेच हळूहळू फिरवतात व कर्तक हत्यार लेथच्या पायाकडील तर्कूमध्ये धरून फिरणाऱ्या भोकामध्ये घुसवून पुढे रेटतात. त्यामुळे कर्तक हत्यार भोकामध्ये सरळ रेषेत पुढे सरकत जाते व भोकाच्या आतल्या पृष्ठावर खाचा पडतात व आटे उत्पन्न होतात. आटे पाडण्याचे काम जलद करण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचे विशेष साहित्य मिळते. यातील अंत:सूत्रक हत्यार भोकामध्ये जरूर त्या खोलीपर्यंत गेले म्हणजे आपोआप उलट फिरून भोकाच्या बाहेर येते. 

आ. ४. घडवण पद्धतीने बाहेरचे आटे पाडण्याची क्रिया वर वर्णन केलेल्या पद्धती साधारणत: त्रिकोणी आट्यांकरिताच उपयोगी पडतात. या पद्धतीमध्ये आट्यांमधील खाच तयार करताना येथील मूळ द्रव्य उकरून बाहेर काढले जाते.

 आ. ५. घडवण पद्धतीचा अंत:सूत्रकआटे घडविणे : घडीव पद्धतीने आटे तयार करताना वस्तूमधील द्रव्य उकरले जात नाही. ते फक्त खाचेच्या दोन्ही बाजूंकडे रेटले जाते व आट्याचा भाग घडीव पद्धतीने उत्पन्न केला जातो. ही क्रिया मूळ वस्तूच्या थंड अवस्थेतही करता येते. घडीव पद्धतीने बाहेरचे आटे पाडण्याची एक पद्धत आ. ४ मध्ये दाखविली आहे. यामध्ये पृष्ठावर तिरप्या खाचा असलेले अ, आ हे कडक पोलादाचे दोन सपाट भाग वापरतात. यांपैकी एक भाग स्थिर ठेवतात व त्यावर आटे पाडावयाचा दंडगोल ठेवून दंडगोलावर दुसरा भाग यांत्रिक शक्तीने दाबून आणि पुढेमागे सरकवून दंडगोल भागाला लाटतात. त्यामुळे दंडगोलभागावर तिरप्या खाचा पडत जातात व खाचेतील द्रव्य दोन्ही बाजूंना सरकून त्यामधून आटे तयार होतात. दंडगोलाचा मूळ व्यास बरोबर असला म्हणजे आटे तयार झाल्यानंतरचा व्यास पाहिजे तितका होतो. या पद्धतीने पोलादासहित सर्व धातूंवर आटे घडविता येतात. बाटलीच्या तोंडावर बसविण्याच्या पत्र्याच्या फिरकी टोप्यांमध्ये असलेले आटे घडवण-पद्धतीनेच तयार केलेले असतात. त्याकरिता मुद्रा (डाय) व मुद्राकारक (पंच) पद्धतीचे यंत्र वापरावे लागते.

आ. ५ मध्ये घडवण-पद्धतीने आतले आटे पाडण्याचा अंत:सूत्रक दाखविला आहे. या सूत्रकाने तांबे, पितळ व ॲल्युमिनियम अशा नरम धातूंना व इतर तंतुक्षम वस्तूंना आटे पाडता येतात.

अंत:सूत्रक व बहि: सूत्रक हत्यारांनी पाडलेल्या आट्यांचा आडवा छेद त्रिकोणी असतो. साधे बोल्ट व नट बनविण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो. परंतु चौकोनी किंवा तत्सम विशेष आकाराचे छेद असलेले आटे बनवण्याकरिता लेथ किंवा चक्री कर्तक यंत्र वापरावे लागते. कोणत्याही पद्धतीने तयार केलेले आटे विशेष सफाईदार व अचूक मापाचे करण्यासाठी ते पुन्हा सहाण (ग्राइंडिंग) यंत्रावर घासतात.

पहा : बोल्ट व नट स्क्रू.

भिडे, शं. गो.