प्रच्छिद्रण यंत्र:(बोअरिंग मशीन). अभियांत्रिकी कामात छिद्रण यंत्राने एखाद्या तयार (निर्मित) यंत्रभागात किंवा वस्तूत पाडलेले छिद्र किंवा मूळचेच असलेले भोक एकतर मोठ्या व्यासाचे करण्यासाठी किंवा त्याचे अचूक वर्तुळाकार अंत्यरूपण करण्यासाठी ज्या यंत्राचा उपयोग करतात त्यास प्रच्छिद्रण यंत्र व या यंत्रणाच्या (कातण्याच्या) क्रियेस प्रच्छिद्रण म्हणतात. या यंत्राचे वर्गीकरण दोन मुख्य वर्गांत केले जाते : (अ) आडवे प्रच्छिद्रण यंत्र व (आ) उभे प्रच्छिद्रण यंत्र.

आडवे प्रच्छिद्रण यंत्र :केवळ प्रच्छिद्रण कामासाठी वापरावयाचे यंत्र इंग्लंडमध्ये जॉन विल्किन्‌सन यांनी प्रथम १७७५ साली तयार केले व त्यामुळेच जेम्स वॉट यांच्या पहिल्या वाफेच्या एंजिनाचे काम होऊ शकले. या यंत्राच्या साहाय्याने १४३ सेंमी. व्यासाच्या सिलिंडराचे प्रच्छिद्रण करता येत असे. फक्त प्रच्छिद्रण कामासाठी बनविलेल्या यंत्रावर मोठ्या निर्मित भागांचे प्रच्छिद्रण केल्यावर जर त्यावर छिद्रण व चक्री कर्तन क्रिया करावयाच्या असल्यास असे भाग स्वतंत्र ⇨ छिद्रणयंत्रावर व ⇨ चक्रीकर्तनयंत्रावर हलवून पुन्हा बसवावे लागतात. यात वेळ तर जास्त जातोच पण त्या भागाचे पुनर्योजन करताना स्वतंत्र यंत्रांतील सूक्ष्म दोषांमुळे किंवा त्रुटींमुळे निर्मित भागाचे अचूक यंत्रण होत नाही. यासाठी बहुधा संयुक्तपणे प्रच्छिद्रण, छिद्रण व चक्री कर्तन क्रिया करता येतील अशी एकाच यंत्रात रचना केलेली असते. अशा संयुक्त यंत्राचे तीन प्रकार असतात : (१) कार्यपट (कार्यमंच) प्रकार, (२) रधित्र-पट प्रकार व (३) भू-पट प्रकार.

आ. १. संयुक्त प्रच्छिद्रण कार्यपट यंत्र : (१) बैठक, (२) शीर्ष-स्तंभ, (३) दंडिका-शीर्ष, (४) फिरती दंडिका, (५) कार्यपट, (६) टेकू स्तंभ, (७) आधार धारवा, (८) सरकमार्ग, (९) पल्याण.

कार्यपटप्रकार:आ. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे या यंत्राची रचना असते. या यंत्रात बैठक बिडाची ओतीव असून तिच्या पृष्ठभागावर अंगचे सरकमार्ग ठेवलेले असतात. बैठकीच्या लांबीवर बिडाचे ओतीव पल्याण (धरून ठेवण्यासाठी योग्य आकार दिलेला आधाराचा भाग) बसविलेले असून ते बैठकीच्या लांबीवरील सरकमार्गावर (फिरत्या दंडिकेशी समांतर) डाव्या-उजव्या बाजूस सरकविण्याची योजना केलेली असते. पल्याणाच्या पृष्ठभागावर अंगचे सरकमार्ग ठेवलेले असून त्यावर बिडाचा ओतीव कार्यपट फिरत्या दंडिकेशी काटकोनात पश्चाग्र (मागे-पुढे) सरकविण्याची व्यवस्था केलेली असते. कार्यपटावर ज्याचे प्रच्छिद्रण, छिद्रण अथवा चक्री कर्तन करावयाचे तो निर्मित भाग पक्का बसवितात. बैठकीच्या उजव्या बाजूस एक बिडाचा उभा स्तंभ बैठकीशी काटकोनात पक्का बसविलेला असतो. या स्तंभाच्या समोरील पृष्ठभागावर अंगचेच सरकमार्ग ठेवलेले असतात. या सरकमार्गांवर वर-खाली बिडाचे ओतीव दंडिका-शीर्ष विद्युत्‌ चलित्राने (मोटरने) सरकविण्याची व हव्या त्या जागी पक्के करण्याची योजना केलेली असते. दंडिका-शीर्षात दंतचक्रपेटी बसविलेली असून विद्युत्‌ चलित्राने हवी असेल ती फिरती गती देतात. फिरत्या दंडिकेत प्रच्छिद्रणदंड किंवा छिद्रक किंवा चक्री कर्तक बसवून प्रच्छिद्रण किंवा छिद्रण  किंवा चक्री कर्तन क्रिया निर्मित भागावर करतात. दंडिकेच्या गतीची दिशा उलटसुलट करण्याचीही व्यवस्था केलेली असते. बैठकीवरील सरकमार्गावर सरकवून हव्या त्या जागी पक्का करता येईल असा बिडाचा ओतीव उभा टेकू स्तंभ बैठकीशी काटकोनात, बैठकीच्या डाव्या बाजूस ठेवलेला असतो. या स्तंभात आधार धारवा (फिरत्या दंडाला आधार देणारा भाग) हव्या त्या ठिकाणी सरकवून पक्का करण्याची सोय असते. त्यामुळे प्रच्छिद्रण दंडाच्या दुसऱ्या टोकाला धारव्याचा आधार (टेकू) देता येतो. फिरती दंडिका उच्च प्रतीच्या पोलादाची केलेली असते. या प्रकारचे यंत्र मध्यम आकारमानाच्या व वजनाने कमी असलेल्या निर्मित भागावर यंत्रण करण्यासाठी वापरतात, कारण त्याची फिरती दंडिका अशा कामासाठी कंपनयुक्त (हादरामुक्त) राहील अशी रचना केलेली असते. प्रच्छिद्रणदंडात एक किंवा अनेक कर्तनक (उच्च शक्तीच्या धातूचे सामान्यतः पोलादाचे, एकच टोक असलेले धातू कर्तनासाठी वापरावयाचे तुकडे) पक्के बसविण्याची व्यवस्था केलेली असते. या यंत्रावर जास्तीत जास्त २२,००० किग्रॅ. वजनाच्या मर्यादित आकारमानाच्या निर्मित भागावर काम होऊ शकते.

आ. २. उभे प्रच्छिद्रण यंत्र : (१) बैठक, (२) साटा, (३) फिरता कार्यपट, (४) उभे कर्तक शीर्ष, (५) आडवे कर्तक शीर्ष, (६) आडवा काटकोनी सरकपाट, (७) कमान.

रधित्र-पटप्रकार:या यंत्रामध्ये रधित्र यंत्रासारखी [→रधित्र] बैठक व कार्यपट असतात. बैठकीवरील सरकमार्गावर कार्यपट मागे-पुढे हलविण्याची व्यवस्था असते. दंडिका स्तंभ व टेकू स्तंभ स्थिर असतात परंतु दंडिकेच्या अक्षाच्या समांतर हालविता येतात. यंत्राच्या कार्यपटाची हालचाल दंडिकेच्या अक्षाच्या काटकोनात होते. या यंत्रावर ७०,००० किग्रॅ. वजनाच्या निर्मित भागाचे यंत्रण करता येते.

 भू-पटप्रकार:या प्रकारच्या यंत्रात दंडिका-शीर्ष स्तंभ भू-पटावर (जमिनीच्या पातळीवरील पटावर) बसविलेला असतो. निर्मित भाग भू-पटावर स्थिर बसवून शीर्ष स्तंभ निर्मित भागाच्या सापेक्ष इष्ट ठिकाणी हलविण्याची व्यवस्था केलेली असते. यात बैठक व पल्याण हे भाग नसतात. या यंत्रावर खूपच अवजड भागांचे यंत्रण करता येते.

वरील सर्व प्रकारच्या यंत्रांवर काही उपांगे बसवून विशिष्ट प्रकारची  यंत्रण कामेही करता येतात. उत्पादन कामासाठी काही विशिष्ट रचनेची प्रच्छिद्रण यंत्रेही तयार करतात. त्यांत प्रच्छिद्रणदंड फिरता नसून पुढे-मागे सरकतो व वस्तू वर्तुळाकार फिरते. काहींत प्रच्छिद्रणदंड फिरता असून तो पुढे-मागेही सरकतो व वस्तू स्थिर राहते. प्रच्छिद्रण कामाकरिता लेथ यंत्राचाही उपयोग होऊ शकतो. [→ लेथ].


उभे प्रच्छिद्रण यंत्र :आ. २ मध्ये दाखविलेल्या यंत्राचा साटा (सांगाडा) व माथ्याची कमान बिडाची ओतीव असून साट्याच्या दोन्ही बाजूंच्या दर्शनी उभ्या स्तंभांच्या पृष्ठभागावर अंगचे सरकमार्ग असून त्यावर काटकोनात एक आडवा बिडाचा ओतीव सरकपाट वर-खाली सरकवून हव्या त्या ठिकाणी पक्का करता येतो. या आडव्या सरकपाटाच्या पृष्ठभागावर अंगचे सरकमार्ग असून त्यावर बिडाची दोन उभी कर्तक शीर्षे हव्या त्या अंतरावर सरकवून पक्की करता येतात. ही कर्तक शीर्षे बिडाच्या रेटकाने वर-खाली सरकविण्याची योजना केलेली असते. उजव्या बाजूच्या स्तंभावर एक जादा आडवे सरकणारे कर्तक शीर्ष बसविलेले असते. उभी कर्तक शीर्षे उभ्या पातळीत हव्या त्या कोनात फिरवून चालविता येतात. साट्याच्या दोन दर्शनी स्तंभातील पोकळीला तळाला बिडाची ओतीव बैठक बसविलेली असून तिच्या वरच्या पृष्ठभागावर आडव्या पातळीत उभ्या आसावर फिरणारा बिडाचा कार्यपट धारव्यांत बसविलेला असतो. ज्या निर्मित भागाचे किंवा वस्तूचे प्रच्छिद्रण करावयाचे असते त्याची पक्की बांधणी या कार्यपटावर करतात. त्याचे कर्तन (यंत्रण) उभ्या खाली-वर सरकणाऱ्या कर्तक शीर्षातील कर्तकांनी केले जाते. हे यंत्र विद्युत् चलित्रावर चालते. थोड्या जागेत मोठाले अवजड निर्मित भाग यावर कातले जातात व त्यांचे वजन पायावर सारखे विभागले जाऊन त्यांचा समतोल राखला जातो.

अशाच प्रकारचे काम टरेट लेथवर [→ लेथ] त्यातील कर्तक शीर्षात अनेक निरनिराळे कर्तक बसवूनही करता येते.

आ. ३. प्रच्छिद्रण हत्यारे : (अ) प्रच्छिद्रण कर्तक हत्यार : (१) कर्तक हत्यार, (२) सिलिंडर (आ) प्रच्छिद्रणदंड : (१) दंड, (२) कर्तक, (३) पकड मळसूत्र (स्क्रू) (इ) प्रच्छिद्रण शीर्ष : (१) शीर्ष, (२) कर्तक धारक ठोकळा, (३) कर्तक, (४) दंड (ई) संयोजनक्षम शीर्ष : (१) निर्मित भाग, (२) कर्तक, (३) संयोजनक्षम शीर्ष.

सूक्ष्ममापी प्रच्छिद्रण यंत्र : हे यंत्र विद्युत्‌ चलित्रावर चालते व त्यावर छिद्रित भागाचे अंत्यरूपण ०·००२ मिमीं. पर्यंत अचूक होते. हे यंत्र उत्पादन कामासाठी वापरतात.  

छिद्रपाट प्रच्छिद्रण यंत्र :प्रचंड प्रमाणावर वस्तूंचे किंवा निर्मित भागांचे उत्पादन करताना प्रत्येक नगावर एकच क्रिया जलद व्हावी म्हणून यंत्रावर ⇨ छिद्रपाटवधारकपकडीवापरतात. नगात योग्य जागी अचूक छिद्रण व्हावे म्हणून छिद्रण यंत्रात छिद्रपाट वापरतात. त्यामुळे अशा छिद्रपाटातील छिद्रांचे अचूक प्रच्छिद्रण करून त्यांच्या पृष्ठभागाचे उत्तम अंत्यरूपण व्हावे म्हणून छिद्रपाट प्रच्छिद्रण यंत्राचा उपयोग करतात. हे यंत्र विद्युत्‌ चलित्रावर चालते. याचा वापर छिद्रपाटाव्यतिरिक्त मुद्रा व मापकांसाठीही करतात. या यंत्राची रचना उभ्या चक्री कर्तन यंत्रासारखी असून त्याची निर्मिती पहिल्या महायुद्धाच्या सुमारास झाली. औद्योगिक उत्पादन कारखान्यांतून याचा विशेषकरून यांत्रिक हत्यारांच्या विभागात उपयोग करतात. प्रच्छिद्रण कर्तकाने छिद्रात अचूक वेध घ्यावा म्हणून योजिलेले सूक्ष्ममापी पूरक पुरोगामी मळसूत्र होय. त्यामुळे स्थानवेध ०·००२ मिमी. मापापर्यंत अचूक मिळतो. 

प्रच्छिद्रण हत्यारे :फिरत्या दंडिकेत किंवा सरकत्या प्रच्छिद्रण शीर्षात प्रच्छिद्रणदंडात धारेचे कर्तक पक्के बसवून किंवा कर्तक-धारकात कर्तक बसवून किंवा कर्तक दंड वापरून प्रच्छिद्रण क्रिया करतात. अशी कर्तन हत्यारे व त्यांचे धारक निरनिराळ्या आकारांचे असतात. धारक उच्च प्रतीच्या पोलादाचे घडीव असतात. कर्तक मिश्र पोलाद किंवा कार्बाइड किंवा हिरकणीचे तयार केलेले असतात.  

आ. ३ मध्ये काही प्रच्छिद्रण हत्यारे दाखविली आहेत. संयोजनक्षम शीर्षाचा उपयोग छिद्रपाट प्रच्छिद्रण यंत्रात विशेषकरून करतात.  

सर्वगामी प्रच्छिद्रण यंत्रात एकदा निर्मित भाग किंवा वस्तू पक्की बसविल्यावर ती जागची न हलविता तिच्या वरच्या व बाजूच्या पृष्ठभागांवर प्रच्छिद्रण करता येईल अशी यंत्रणाच्या हत्यारांची रचना केलेली असते. याशिवाय प्रच्छिद्रण यंत्रामध्ये छिद्रक-चक्री कर्तक व छिद्रतासणी अशी कर्तन हत्यारेही वापरता येतात.  

पहा : यांत्रिक हत्यारे.

संदर्भ : 1. Habicht, F. H. Modern Machine Tools, Princeton, 1963.

            2. Wilson, F. W. Harvey, P. D., Ed. Tool Engineers Handbook, New York, 1959.

हर्डीकर, व. म. दीक्षित, चं. ग.