न्यूकोमेन, टॉमस : (२४ फेब्रुवारी १६६३ – ५ ऑगस्ट १७२९). इंग्रज अभियंते. त्यांनी ‘वातावरणीय एंजिना’चा (खाणीतून पाणी खेचणाऱ्या पहिल्या व्यावहारिक वाफ एंजिनाचा) शोध लावला. त्यांचा जन्म इंग्‍लंडमधील डार्टमथ (डेव्हन परगणा) येथे झाला. त्यांचे औपचारिक शिक्षण विशेष झालेले नव्हते. लोहारकीच्या आपल्या व्यवसायामुळे त्यांचा कॉर्नवॉलमधील कथिलाच्या खाणींशी सारखा संबंध येई. खाणीतून पाणी खेचण्यासाठी घोड्यांचा वापर किती खर्चिक पडतो, हे त्यांना तेथे आढळले. म्हणूनच आपले सहकारी नळकामगार जॉन कॉली यांच्याबरोबर त्यांनी सु. १० वर्षे वाफेच्या पंपावर प्रयोग केले. न्यूकोमेन यांच्याही अगोदर डेनिस पालरिन, एडवर्ड समरसेट, टॉमस सेव्हरी हेही वाफ एंजिनाच्या संशोधनविकासात गुंतले होते. तथापि सेव्हरी यांनी १६९८ मध्ये ‘पाणी वर काढण्याच्या साधना’चे एकस्व (पेटंट) घेतले. या साधनात सिलिंडर-दट्ट्या असे काही नव्हते, पण वाफेचा मात्र उपयोग केलेला होता. या विषयासंबंधी मूलगामी विचार करून न्यूकोमेन यांनीच बाष्पित्र (बॉयलर) व सिलिंडर हे स्वतंत्र वेगळे केले व सिलिंडरात दट्ट्याही वापरला. दट्ट्याचा वापर यशस्वी रीत्या केलेले हे पहिले व्यावहारिक एंजिन होय. या एंजिनाचे तत्त्व तसे फार साधे होते. यात सिलिंडरात वाफ सोडली जाते व त्यामुळे दट्ट्याची हालचाल होते. दट्ट्यावर त्यानंतर थंडगार पाणी झोताच्या स्वरूपात टाकले जाते व त्यामुळे वाफेचे संद्रवण (पाण्यात रूपांतर) होऊन निर्वात प्रदेश तयार होतो. वातावरणीय दाबाने दट्ट्या मूळ स्थितीस जातो आणि हीच प्रक्रिया पुनःपुन्हा घडते. दट्ट्याच्या पश्च-अग्र गतीने शेवटी त्याचे पाणी खेचण्याच्या पंपात रूपांतर होते [→ वाफ एंजिन]. हे एंजिन म्हणजे खऱ्या अर्थाने वाफ एंजिन नसून ‘वातावरणीय एंजिन’ होते कारण न्यूकोमेन यांच्या कल्पनेनुसार त्यात उपयुक्त कार्य वातावरणीय दाबाने केले जाण्याची योजना होती. अशा रीतीने पहिले दप्तरी नोंद झालेले न्यूकोमेन एंजिन डड्ली कॉस्‌‌ल (स्टॅफर्डशर) जवळ १७१२ साली उभारण्यात आले. टॉमस सेव्हरी यांनी अभिकल्पित केलेल्या एंजिनापेक्षा हे एंजिन अधिक सुरक्षित व जास्त कार्यक्षम होते. या एंजिनामुळे वाफेचा उच्चदाब निर्माण होत नसे आणि जळणही कमी लागे. या एंजिनाचे एकस्व न्यूकोमेन यांना मिळू न शकल्याने त्यांनी आपल्या एंजिनाच्या विकासासाठी आणि त्याच्या उत्पादनासाठी सेव्हरींच्या भागीदारीत एक कंपनी स्थापन केली. रॉबर्ट हुक या प्रसिद्ध अभियंत्यांनी न्यूकोमेन यांना सुरुवातीच्या काळात मार्गदर्शन केले.

यूरोपात व विशेषतः इंग्‍लंडमध्ये न्यूकोमेन यांचे एंजिन सु. ७५ वर्षे प्रचारात होते. जेम्स वॉट यांच्या एंजिनामुळे न्यूकोमेन एंजिन काळाच्या पडद्याआड गेले. लंडन येथे ते मृत्यू पावले.

ओगले, कृ. ह. कुलकर्णी, सतीश वि.