दाबपकड : (क्‍लॅम्प). निरनिराळ्या यांत्रिक हत्यारांच्या साहाय्याने यंत्र भागांचे किंवा वस्तूंचे (नगांचे) यंत्रण (कातकाम) करताना असे भाग किंवा वस्तू यंत्राच्या कार्यमंचावर योग्य स्थानी घट्ट पकडून ठेवण्याकरिता, तसेच एखाद्या संरचनात्मक कामात अनेक भाग एकत्र जोडताना ते योग्य स्थितीत राहण्याकरिता किंवा निरनिराळ्या भागांची अचूक व जलद जुळणी करून एखादे यंत्र वा उपकरण उभारताना ज्या धारक पकडीचा उपयोग करतात, तीत सुटे भाग योग्य जागी राहण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या साधनांना दाबपकड (किंवा चाप वा चिमटा) म्हणतात. जेव्हा मोठ्या प्रमाणावर व कमी वेळात वस्तूंचे उत्पादन करावयाचे असते, तेव्हा अनेक प्रकारचे छिद्रपाट व धारक पकडी वापराव्या लागतात [ → छिद्रपाट व धारक पकड]. छिद्रपाटाचा उपयोग छिद्रण, प्रछिद्रण, चक्रीकर्तन व छिद्रतासणी यंत्रांत यंत्रण करणाऱ्या हत्यारांचे वस्तूवर अचूक जागी कार्य होण्यासाठी करतात तर धारक पकडीचा उपयोग वस्तू यंत्रण करताना कार्यमंचावर योग्य स्थानी रहावी याकरिता करतात. वितळजोडकामात (वेल्डिंगमध्ये) एकत्र जोडावयाचे भाग धारक पकडीने योग्य जागी घट्ट धरून ठेवतात. अशा छिद्रपाट व धारक पकडी साधनांत अनेक प्रकारच्या दाबपकडी वापरतात.

प्रकार : दाबपकडींच्या रचनेत दाब देण्यासाठी केलेल्या योजनेनुसार त्यांचे मळसूत्री, कॅम, बहुतरफी, पट्टी, साधी, संयुक्त कॅम–पाचर, बहु–नगी, बिजागरी, पंप, तरती, द्रवीय व वायवीय असे वर्गीकरण केले जाते.

दाबपकडींचे काही प्रकार : (अ) कंसाकृती दाबपकड (आ) यंत्र शेगडा (इ) चक्रमाथ्या मळसूत्चीरी दाबपकड (ई) कॅंम दाबपकड : (उ) बहुतपरफी दाबपक (ऊ) बिजागरी दाबपकड (ए) पंप दाबपकड : (ऐ) वायवीय दाबपकड


यंत्र शेगडा (आकृती आ) हा मळसूत्री दाबपकडीचा प्रकार असून त्यात एक जबडा पक्का असतो व दुसरा मळसूत्राने सरकवून वस्तूवर दाब देतात. द्विमळसूत्री दाबपकडीत कठीण पोलादाचे, तोंडाला चप असलेले दोन जबडे दोन मळसूत्रांनी सरकवून सुटे भाग एकत्र जखडून ठेवतात. सुतारकामात लाकडे किंवा फळ्या एकत्र जोडताना घट्ट आवळून धरण्यासाठी वापरण्यात येणारे भीड हे मळसूत्री दाबपकडीचेच उदाहरण आहे. बिडाच्या इंग्रजी व्ही (V) आकाराच्या ठोकळ्यावर दंडगोल वस्तू दाबून धरण्यासाठी कंसाकृती दाबपकड (आकृती अ) वापरतात. हिच्या बिडाचा कंसाकृती सांगाडा असून मध्यभागातून पोलादी मळसूत्र सरकवितात. आणखी एका प्रकारात इंग्रजी सी (C) आकाराचा बिडाचा सांगाडा असून त्याच्या एका उघड्या तोंडावर अंगचाच जबडा काढलेला असतो. दुसरा बिडाचा तबकडीच्या आकाराचा जबडा विरुद्ध तोंडातील अंगाच्या आटे पाडलेल्या पुंगळीतून एक मळसूत्र सरकवून वस्तूवर दाब देतात. बाजाच्या पेटीच्या भात्यासारख्या वस्तू चिकट द्रवाने अथवा सरसाने एकत्र जोडताना अशा दाबपकडीचा उपयोग करतात. छिद्रपाट व धारक पकडींसाठी अनेक प्रकारच्या मळसूत्री दाबपकडी वापरतात. यांत नटबोल्टाच्या मळसूत्र दंडिकेलाच अंगचे पंखी, चक्री, दांडी, गुंडी इ. विविध आकारांचे माथे ठेवलेल्या मळसूत्रांचा किंवा मळसूत्र दंडिकेच्या तळाला बिजागरी ठेवून वरच्या टोकाला अशाच विविध आकारांचे स्वतंत्र नट बसवून वापर करतात.

कॅम दाबपकडीत (आकृती ई) विकेंद्री आणि सर्पिल अशा दोन प्रकारच्या कॅमांनी [→ कॅम] दाब दिला जातो. बहुतरफी दाबपकडीत (आकृती उ) तरफांचा उपयोग केलेला असून एक संयोजक मळसूत्र असते. आडवी हाततरफ उभी केली म्हणजे झटक्यात मळसूत्राच्या टोकावर दाब येतो. पट्टी दाबपकडीत मधोमध आरपार गाळा असलेली पोलादी पट्टी असून ती बोल्टावर सरकविता येते. साध्या दाबपकडीत टेकणाची साधने वापरून विविध यांत्रिक हत्यारांच्या कार्यमंचावर वस्तू पकडून ठेवण्यासाठी त्या वापरल्या जातात. यांचे अनेक प्रकार आहेत. उदा., कार्यमंचावर टी (T) आकाराच्या अंगच्या गाळ्यात टी–बोल्टाचे डोके सरकवून व त्यावर दाब साधने बसवून, नटाने आवळून वस्तूवर दाब देतात. संयुक्त कॅम–पाचर दाबपकडीत कॅम व पाचर यांची योजना करून दाब दिल्याने पकड घट्ट राहते. बहु–नगी दाबपकडीत एकापेक्षा जास्त नग (वस्तू) एका किंवा जास्त दाबसाधनाने पकडून ठेवले जातात. दाबासाठी यांत्रिक किंवा वायवीय शक्ती वापरतात. बिजागरी दाबपकडीत (आकृती ऊ) संयोजक मळसूत्राने दाब देताना टेकू बिजागरीवर फिरते असल्याने तिचे दुसरे टोक वस्तूला टेकण देते. पंप दाबपकडीत (आकृती ए) एका पुंगळी पट्टाने वस्तूवर दाब देण्याची व्यवस्था केलेली असते. यातही अनेक प्रकार आहेत. पुंगळी दट्‌ट्याचे काम करते. पुंगळीच्या बाह्यांगावरील काही भागावर दाते पाडलेले असून ते एका हातदांडीने फिरवून पुंगळी पट्ट वस्तूवर दाब देण्यासाठी खाली उतरवितात. तरत्या दाबपकडीत धारक पकडीच्या साट्यावरील टेकूधारी पट्‌ट्यावर डाव्या बाजूस एक जबडा पक्का बसविलेला असून दुसरा बिजागरी जबडा उजव्या बाजूस असतो. या दोन समाकारी जबड्यांत वस्तूवर संयोजनक्षम मळसूत्राने दाब देतात. द्रवीय दाबपकडीत पंपाने तेलावर दाब निर्माण करून तो वस्तूवर पोहोचविला जातो. द्रवीय शक्तीवर चालणाऱ्या यांत्रिक हत्यारांत वस्तू पकडण्यासाठी याचा बव्हंशी वापर करतात. वायवीय दाबपकडीत वात संपीडकातील दाबयुक्त हवा पुरवून वस्तूवर दाब देतात. या दोन्ही प्रकारच्या दाबपकडी सारखेच कार्य करतात पण द्रवीय दाबपकडीत उच्‍च दाबाला टिकणारा द्रवयुक्त सिलिंडर वापरावा लागतो, तर त्यामानाने हवायुक्त सिलिंडर कमी दाबाला टिकणारा असला तरी चालतो. या दोन्ही दाबपकडींचे अनेक प्रकार आहेत. वायवीय दाबपकडीच्या एका प्रकारात (आकृती ऐ) सिलिंडरामध्ये नळीने दाबयुक्त हवा सोडल्यावर दट्‌ट्यावर दाब येतो व तो बहुतरफेला रेटतो. त्यामुळे तरफेचे मोकळे टोक वस्तूवर दाब देते. काम संपल्यावर वस्तू सुटी करण्यासाठी सिलिंडरातील हवा काढून टाकतात.

दाबपकडीची रचना सोपी असावी कारण गुंतागुंतीच्या रचनेत जास्त भाग लागतात व त्यामुळे वापरात त्यांची झीज होऊन ते सैल पडून त्यांची पकडण्याची क्षमता कमी होते. याशिवाय वस्तूचा आकार व वजन, पृष्ठभागाचा खरखरीतपणा, वस्तूवर येणाऱ्या यंत्रणाच्या वा अन्य प्रेरणा व त्यांच्या दिशा, झीज, पकडलेली वस्तू कारागिराला सहजपणे दिसणे, यंत्रणाच्या हत्यारांच्या चालीत अडथळा येऊ न देणे, वस्तूवर दाब देताना वस्तूत किंवा दाबपकडीत विकृती निर्माण होऊ नये इ. गोष्टी दाबपकडी तयार करताना विचारात घ्याव्या लागतात.

संदर्भ : 1. Judge, A. W. Engineering Workshop Practice, London.1953.

           2. Wilson, F. W. Harvey, P. D. Ed. Tool Engineer’s Handbook, New York, 1959.

गोखले. श्री. पु. दीक्षित, चं. ग.