पंखा : वारा घेण्याचे एक साधन. पंखे वारण्याची पद्धत प्राचीन तसेच सार्वत्रिक असल्याचे दिसून येते. ताडपत्र, वाळा, मुंजतृण, खजुराची पाने, बांबू, हस्तिदंत, अभ्रक, मोराची वा शहामृगाची पिसे, कासवाचे कवच आणि कागद इत्यादींपासून पंखे तयार करतात. ते विविध आकारांचे असतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतींनी व साधनांनी तयार करतात.

आ. १. अभ्रकाचे जडावकाम केलेला हस्तिदंती पंखा, फ्रान्स.प्राचीन ईजिप्तमध्ये व ॲसिरियात पंख्यांना धार्मिक व सामाजिक प्रतीक म्हणून महत्त्व होते. राजाला पंख्याने वारा घालणाऱ्या लोकांना मोठा मान असे. इ. स. पू. चौदाव्या शतकातील तूतांखामेनच्या थडग्यामध्ये सोन्याचा छाप असलेल्या दांडीचे व पांढऱ्या तपकिरी रंगाच्या पिसांचे दोन पंखे आढळले आहेत. लहान दांडीचे अर्धवर्तुळाकार पंखे वापरण्याची प्रथा श्रीमंत ईजिप्शियन स्त्रियांमध्ये रूढ होती काही धार्मिक समारंभांत आणि कर्मकांडांतही पंखे वापरीत. उद्योगशीलता आणि संपन्नता यांचे प्रतीक म्हणूनही ग्रीक देवतांच्या डोक्यावर पंखे लावले जात. मध्ययुगीन यूरोपमध्ये पंखे प्रचलित होते. चौदाव्या शतकात राजघराण्यातील पंखे हस्तिदंती मुठीचे असून त्यांवर जरीचे भरतकाम केलेले असे. काही राजघराणीपंख्यांचा उपयोग राजचिन्ह अथवा राजमुद्रा म्हणूनही करीत. पंधराव्या शतकात यूरोपमध्ये पंख्याचा वापर कमी झाला. तथापि पोर्तुगीजांनी यूरोपमध्ये पूर्वेकडील घडीचे पंखे प्रचलित केले होते. दुसरा चार्ल्‌स व कॅथरिन यांच्या लग्‍नानंतर (१६६२) इंग्‍लंडचा भारताशी व्यापार सुरू होऊन भारतातील पंखे तिकडे जाऊ लागले. त्यामुळे सतराव्या व अठराव्या शतकांत भारतामध्ये पंख्यांचे उत्पादन बरेच वाढले. या पंख्यांवर कोरीवकाम केलेले असून रंगीत चित्रांनी ते सजविलेले असत. व्हिक्टोरिया राणीने तर १८७० मध्ये पंख्यांचे एक प्रदर्शनच भरविले होते.

फ्रान्समध्ये पंख्याचे उत्पादन चौदाव्या व पंधराव्या शतकांत इतके वाढले, की परिणामतः तेथील कारागिरांनी आपली एक संघटनाच उभारली. चौदाव्या लुईच्या प्रॉटेस्टंटविरोधी धोरणामुळे मात्र कित्येक कारागीर परागंदा होऊन हॉलंड-जर्मनीसारख्या देशांत गेले. पुढे पुढे फ्रेंच पंख्याचा आकार लहान झाला व दर्जाही खालावला. त्या काळात राजकीय घटनांची चित्रे पंख्यावर काढीत आणि त्यांतून वृत्तप्रसारही केला जाई.

आ. २. जपानी पंखा जपानमध्ये सहाव्या शतकात व चीनमध्ये नवव्या शतकात कोरीवकाम केलेले पंखे प्रचलित होते. चिनी लोक हस्तिदंत व कासवाचे कवच यांचा उपयोग करून कलात्मक पंखे तयार करीत. जपानमध्ये ताडपत्र्यांपासून, वटवाघुळीच्या पंखांसारखे घडीचे पंखे तयार करीत. पंखा हा जपानी वेशभूषेचाच एक महत्त्वाचा भाग असून तेथे निरनिराळ्या प्रसंगी कलात्मक पंखे वापरतात. पूर्वीच्या काळी ‘ओको मियोनी’ पंखे दरबारात वापरीत तर लोखंडी मुठीचे, लाल आणि काळ्या रंगात चंद्रसूर्यतारकांची चित्रे असलेले ‘गन सेन’ पंखे लढाईमध्ये इशाऱ्यासाठी वापरीत असत. सतराव्या शतकात ‘माय ओगी’ हा दहा काड्यांचा पंखा नृत्यासाठी वापरण्यात येई. अठराव्या शतकात पंख्यासाठी भरतकाम केलेल्या पिशव्या लोकप्रिय ठरल्या. अमेरिकेत व यूरोपात धाडण्यासाठी जपानी लोक कोरीवकाम केलेले, रंगीत चित्रे काढलेले, कलात्मक पंखे तयार करीत असत.

भारतामध्ये पंख्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतात. पुराणकाळातील अग्‍निदेवतेच्या डाव्या हातात पंखा असे. होमहवनात अग्‍नीला वारा घालण्यासाठी हरणाच्या कातड्याचा (धवित्र) पंखा वापरीत तर देवीच्या  पूजेत पंख्याऐवजी ताडपत्र वारण्याची प्रथा असे. राजवल्लभ या वैद्यक ग्रंथात भोवळ, दाह, तहान, घाम व श्रम नाहीसे करणे हे पंख्याचे सामान्य गुण दिलेले आहेत. ताडपत्राच्या पंख्याने कफ, वात, पित्त यांचा त्रास कमी होतो व केसांच्या पंख्याने वारा घेतला असता माणसाचे तेज वाढते, असाही उल्लेख ग्रंथांत आढळतो.

आ. ३. मणिकाम केलेला भारतीय पंखा, कच्छ-सौराष्ट्र.

भारतामध्ये पंखे तयार करण्यासाठी बहुधा बांबू, वाळा, मुंजतृण, खर्जुरपत्रे, ताडपत्रे, मोरपिसे, हस्तिदंत, अभ्रक व कागद यांचा उपयोग करण्यात येतो. त्यांपैकी बांबूचे पंखे पुणे-नागपूरसारख्या ठिकाणी व इतरत्र तयार करतात. त्यांवर फक्त हिरव्या-लाल रंगाची साधीच नक्षी असते. त्याला खर्चही फार पडत नाही त्यामुळे किंमतही कमी असते. वाळ्याच्या पंख्यावर मात्र कधी भरतकाम केलेले असते, तर कधी टिकल्या वा मोरपिसे लावून त्यांचे सौंदर्य वाढविण्यात येते. एके काळी महाराष्ट्रातील सावंतवाडी येथील वाळ्याचे पंखे फार प्रसिद्ध होते. येथील कारागीर पंख्यांना शोभा आणण्यासाठी त्यांना जालिया (लेस) किंवा भुंग्यांचे रंगीबेरंगी पंख लावीत असत, तर पूर्वीच्या बिकानेर संस्थानातील रेनी या गावी करण्यात येणाऱ्या वाळ्याच्या पंख्यांना हस्तिदंती मुठी लावीत. हा पंखा तयार करताना प्रथम बांबूच्या ताटीला वाळा बसवितात आणि मग तो दोऱ्याने शिवून त्यावर मखमल, कलाबतू, बेगड, टिकल्या इत्यादींच्या साह्याने विविध प्रकारचे नक्षीकाम करून सभोवती जाळीच्या वा साध्या कापडाची किंवा मोरपिसांची झालर लावून त्याला सुशोभित करतात. या पंख्याच्या दांड्याही रंगीत व कलापूर्ण कातलेल्या असून त्या बनविण्याचे काम कातारी लोक करतात. म्हैसूरातही वाळ्याचे पंखे तयार होतात. त्यांची झालर वाळ्याचीच असून तिच्यावर मयूरपुच्छादिकांची सुंदर नक्षी उठविलेली असते. तेथे पंख्यांच्या दांड्या चंदनी लाकडाच्या करतात. त्यांवरही बरेच नक्षीकाम केलेले असते. केवळ मोरपिसांचेच पंखे पूर्वीच्या काळी झांशी, इटावा, आग्रा या ठिकाणी तयार करून विक्रीसाठी ठेवण्यात येत असत. सध्याही काही ठिकाणी मोरपिसांच्या पंख्यांना सोन्याची वा रुप्याची पट्टी लावलेली किंवा टिकल्या बसविलेले कलापूर्ण पंखे तयार होतात. त्यांची किंमत फार असते.


कच्छ व सौराष्ट्र येथे पूर्वीच्या काळी भरतकामयुक्त सुताचे पंखे अतिशय कलात्मक पद्धतीने तयार करण्यात येत तर पूर्व बंगाल (बांगला देश) मधील कोरीवकामयुक्त हस्तिदंती पंखे खूपच वैशिष्ट्यपूर्ण असत. तमिळनाडूमधील कडप्पा जिल्ह्यातील चितवैल व तंजावर ही गावे एके काळी ताडपत्राच्या पंख्यांसाठी फार प्रसिद्ध होती. तंजावरचा माल सुरेख असे. या पंख्यांना अभ्रकाची झालर असून दांड्यांवर रंगीबेरंगी काचतुकडे लावलेले असत. कडप्पा जिल्ह्यातच नोसमगावी एक प्रकारचे कागदी पंखेही तयार करण्यात येत असत. हे पंखे तयार करताना प्रथम ताडाच्या पानांवरील शिरांनुरूप बांबूच्या सारख्या काड्या लावून त्यांवर कागद चिकटवीत व नंतर त्यावर कापड लावण्यात येई. त्या कापडाला मग लाल रंग देऊन त्यावर पंख्याच्या एका बाजूला मोरपिसावरील डोळे आणि दुसऱ्या  बाजूला तऱ्हेतऱ्हेचीचित्रे, पानेफुले काढण्याची व त्यावर सोनेरी वर्ख लावण्याची पद्धत होती तर कधीकधी या कागदी किंवा कापडी पंख्याला लाखेचे पाणी देऊन तो चमकदार रंगांनी रंगविण्यात येई त्यामुळे पंखा मनोवेधक वाटे.

विजेवर चालणारे पंखे येण्यापूर्वी भारतात सर्वत्र वरीलप्रमाणे हातपंखे तयार करण्याची चाल होती. त्यांचा उपयोग घरगुती कामाकडे तसेच कार्यालयात हवा घेण्यासाठी होत असे. कार्यालयातील कापडी पंखे मात्र मोठ्या आकाराचे असून त्यांना सुंदर झालर लावलेली असे व ते हलविण्यासाठी एक लांब दोर पंख्याला अडकवून तो बाहेर सोडण्यात येई. नोकरचाकर तो दोर ओढून पंखा हलवीत व त्यामुळे खोलीत वारा खेळे. पेशवाईत अशाच तऱ्हेचे पंखे पलंगावरही लावलेले असत.

जोशी, चंद्रहास

आ. ४. केंद्रोत्सारी पंखा : (१) कवच, (२) आगम मार्ग, (३) नोदक, (४) निर्गम मार्ग.यांत्रिक पंखा :हवा, वायू किंवा बाष्प यांंचा थोड्या प्रमाणात दाब वाढवून प्रवाह निर्माण करणे व त्यांचे अभिसरण करणे हे यांत्रिक पंख्यांचे कार्यअसते. वातानुकूलनयंत्रणेमध्ये वातानुकूलित हवेचे अभिसरण, इमारतीतील वायुवीजन, बंदिस्तजागेतील रासायनिकवाअन्य उत्पादन प्रक्रियेमुळे उत्पन्न होणारे विषारी वायू बाहेर काढून टाकणे, बाष्पित्रामध्ये (बॉयलरमध्ये) ज्वलनाकरिता हवा पुरविणे, उत्पादन क्षेत्रात हलक्या पदार्थांचे एका जागेहून दुसऱ्या जागी  परिवहन करणे, कपडे कोरडे करणे वगैरे विविध ठिकाणी यांत्रिक पंखे वापरतात. पंख्यातील फिरणाऱ्या भागातून जाताना होणाऱ्या वायूच्या गतीनुसार यांत्रिक पंख्यांचे दोन प्रकार होतात : (१) केंद्रोत्सारी व (२) अक्षीय.

केंद्रोत्सारी पंखे :या पंख्यात वायूचा प्रवाह अरीय (त्रिज्येच्या) दिशेने असतो. आ. ४ मध्ये केंद्रोत्सारी पंखा दाखविला आहे.

आ. ५. मोठ्या पंख्याच्या नोदकाची रचना

आकृतीमधील पंख्याचे कवच लोखंडी पत्र्याचे किंवा बिडाचे बनविलेले असते. त्याचा आकार विशिष्ट वलयाकार असून नोदकासभोवती बंद कोठी बनते. नोदकाच्या एका बाजूला त्याच्या केंद्रावर वायू आत येण्याकरिता चक्राकार आगम मार्ग असतो. नोदक विद्युत् चलित्राच्या (मोटरच्या) किंवा अन्य चलित्राच्या साहाय्याने चक्राकार फिरतो. लहान पंख्यात एका पत्र्याच्या तबकडीवर अरीय पाती बसवून नोदक तयार करतात. नोदकाच्या दंडाला एकाच बाजूला गोलक धारवा (फिरता दंड योग्य ठिकाणी राहण्यासाठी देण्यात येणारा आधार बेअरिंग) असतो. मोठ्या पंख्यात दोन्ही बाजूंना तबकड्या असतात व नोदक दंडाला दोन गोलक धारवे असतात. आ. ५ मध्ये अशा प्रकारचा नोदक दाखविला आहे.

 नोदक फिरावयास लागल्यावर आगम मार्गातून वायू पंख्यात चोषला जातो (ओढून घेतला जातो). नोदकाच्या पात्यांमधील जागेतून वायू केंद्रबिंदूपासून परिघाकडे जातो. ह्या क्रियेमध्ये वायूची गती वाढत जाते. कवचाच्या वलयाकारामुळे वायूच्या वेगाचे रूपांतर दाब निर्माण करण्यात होते. दाबयुक्त वायू निर्गम मार्गातून पंख्यास जोडलेल्या नळीत जातो.

आ. ६. नोदक पात्यांचे आकार व ती बसविण्याचे प्रकार : (अ) गतीच्या दिशेने वळविलेली, (आ) अरीय (सरळ), (इ) गतीच्या विरुद्ध दिशेने वळविलेली, (ई) वातपर्ण, (उ) गतीच्या विरुद्ध दिशेने कललेली (सरळ).

नोदकाची पाती तीन प्रकाराने तबकडीबर बसवितात : (१) अरीय दिशेने, (२) गतीच्या दिशेने वळविलेली आणि (३) गतीच्या विरुद्ध दिशेने वळविलेली. पात्यांचे आकारही तीन प्रकारचे असतात : (१) सरळ, (२) वक्र आणि (३) वातपर्ण (याचा आकार असा असतो की, त्याच्या प्रतलातील अल्प रोधामुळे त्याच्या गतीच्या दिशेला लंब अशी वायुगतिकीय प्रतिक्रिया – उच्चालन – निर्माण होते).

केंद्रोत्सारी पंख्याचा दाब पंख्याच्या वेगावर अवलंबून असतो. अरीय व गतीच्या दिशेने वळविलेल्या पात्यांचा नोदक वापरल्यास पंख्यातून बाहेर जाणाऱ्या वायूचे घनफळ जसजसे वाढत जाते तसतशी पंख्याला लागणारी अश्वशक्ती वाढत जाते, आणि पंख्याच्या पूर्ण कार्यभाराइतके वायूचे घनफळ आल्यावर विद्युत् चलित्रावरील कार्यभार प्रमाणाबाहेर जाण्याची शक्यता असते. या पंख्यावर सतत लक्ष ठेवावे लागते. या पंख्याचा वेग इतर पंख्यांपेक्षा कमी असतो व आवाज जास्त असतो. गतीच्या विरुद्ध दिशेने वळविलेल्या पात्यांचा नोदक वापरल्यास चलित्रावरील कार्यभार केव्हाही जास्त होण्याची शक्यता नसते व आवाज कमी असतो. वातपर्ण आकाराच्या पात्यांच्या पंख्याची किंमत इतरांच्या पेक्षा जास्त असते परंतु कार्यक्षमता जास्त असल्यामुळे चलित्राचा दैनंदिन खर्च कमी येतो. म्हणून मोठ्या पंख्यात वातपर्ण पाती वापरतात. पात्यांची संख्या ५ ते ६६ इतकी असू शकते.


अक्षीयपंखा : या पंख्यांचे दोन उपप्रकार आ. ७ मध्ये दाखविले आहेत. 

आ. ७. अक्षीय पंखे : (अ) मार्गदर्शक पात्यांचा अक्षीय पंखा : (१) नलिका कवच, (२) आगम मार्ग, (३) स्थिर आगम मार्गदर्शक पाती, (४) नोदक, (५) स्थिर निर्गम मार्गदर्शक पाती (आ) प्रचालक अक्षीय पंखा : (१) विद्युत् चलित्र, (२) प्रचालक, (३) रक्षक जाळी, (४) भिंतीचा भाग.

आ. ७ (अ) मध्ये मार्गदर्शक पात्यांचा अक्षीय पंखा दाखविला आहे. मार्गदर्शक पाती स्थिर असतात किंवा थोड्या मर्यादेत फिरवून पंख्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचे घनफळ नियंत्रित करता येते. तसेच कार्यक्षमतेत सुधारणा करता येते. निर्गम बाजूलाही स्थिर मार्गदर्शक पाती असतात. त्यामुळे वायूच्या गतीचा दाबात रूपांतर करण्यास उपयोग होतो. काही ठिकाणी असा तऱ्हेचे  अक्षीय पंखे मार्गदर्शक पात्यांशिवायही वापरतात. आ. ७ (आ) मध्ये प्रचालक अक्षीय पंखा दाखविला आहे. बंदिस्त जागेतील दूषित हवा काढून घेण्यास याचा उपयोग होतो. यालाच निष्कास पंखा असे म्हणतात. अक्षीय पंख्यांच्या नोदकाच्या पात्यांची संख्या ३ ते २६ असते.

अक्षीय पंखे केंद्रोत्सारी पंख्यापेक्षा जास्त वेगाने चालतात व त्यांचा आवाजही जास्त होतो, म्हणून उत्पादन केंद्रात यांचा उपयोग जास्त प्रमाणात करतात.

केंद्रोत्सारी आणि अक्षीय पंख्यांची कार्यक्षमता प्रत्येक मिनिटास ३ घ. मी. पासून १४,००० घ.मी. पर्यंत असते.

वातानुकूलन यंत्रणेत किंवा इतर  उपयोगातसुद्धा पंख्यावरील कार्यभार बदलत असतो व त्याप्रमाणे पंख्याचे प्रदान (पंख्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचे घनफळ) बदलणे जरूर असते. कार्यभार व प्रदान यांची सांगड   घालण्याची यंत्रणा स्वयंचलित असते. प्रदान नियंत्रण तीन प्रकारे करतात. (१) पंख्याच्या चलित्राचा वेग बदलून पंख्याचे प्रदान कमीजास्त करता येते परंतु यामघ्ये खर्चात बचत होत नाही. (२) निर्गम मार्गात झडपा घालून त्यांची उघडझाप नियंत्रित करून प्रदानात फरक करता येतो. या प्रकारात खर्चाची बचत होते. (३) आगम मार्गात मार्गदर्शक पाती बसवून त्यांची नोदकाच्या सापेक्ष असलेली स्थिती बदलून पंख्याचे प्रदान नियंत्रित करता येते. मार्गदर्शक पात्यांमुळे आत योणाऱ्या वायूला फिरकी गती मिळते. त्यामुळे पंख्याची कार्यक्षमता कमी होऊन प्रदानात फरक होतो.   

ओक, वा. रा. सप्रे. गो. वि.

 घरगुती वापराचे पंखे : हे पंखे ( १ ) छताला लावण्याचे पंखे आणि ( २ ) टेबलावर किंवा घोडीवर (स्टँडवर) बसविण्याचे पंखे अशा दोन प्रकारचे असतात. हे पंखे घराखेरीज कार्यालयात, उपाहारगृहात, रेल्वे डब्यात व इतरत्रही तत्सम उपयोगासाठी वापरतात.

छताला लावण्याचे पंखे: या पंख्यांना सर्वसाधारणपणे तीन पाती असतात. काही पंख्यांना मोठ्या आकारमानाची दोनच पातीही वापरतात. पंख्याची हवा बाजूला सारण्याची क्षमता त्याच्या पात्याच्या व्यासावर व त्याच्या वेगावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे अशा पंख्याचा वेग मिनिटाला २०० फेऱ्यापर्यंत असतो आणि व्यास ९० सेंमी., १०५ सेमी., १२० सेंमी. अथवा १४० सेंमी. असतो. अशा एका प्रकारच्या १४० सेंमी. पात्याच्या १९५ प्रती मिनिट फेरे करणाऱ्या पंख्याला ९० वॉटचे अंशावृत ध्रुव पद्धतीचे एककलाविद्युत् चलित्र [⟶ विद्युत् चलित्र] वापरण्यात आलेले आहे. पुष्कळ वेळा शक्तिगुणक [विद्युत् मंडलात वाहणारी उपयुक्त शक्ती (वॉटमध्ये) व प्रत्यक्ष खर्च होणारी शक्ती (व्होल्ट x अँपिअर) यांचे गुणोत्तर] वाढविण्यासाठी योग्य प्रकारचे विद्युत् धारित्र (विद्युत् भार साठविणारे साधन) वापरतात. काही वेळा अशा धारित्राचा उपयोग एक कला चलित्र  सुरू करण्यासाठीही करतात. अशा प्रकारच्या पंख्यापासून दर मिनिटाला १६० से ३०० घ.मी. हवा खेळविली अथवा फेकली जाते.

टेबलावरचे पंखे : या प्रकारच्या पंख्याचा वेग जास्त म्हणजे दर मिनिटाला १,२०० ते १,५०० फेऱ्यांपर्यत असतो. याचे चलित्र बहुधा अंशावृत ध्रुव एक कला पद्धतीचे असते. याला साधारणपणे २५ ते ४० वॉट शक्ती लागते. काही वेळा एक कला धारित्र वापरलेले आणि पिंजऱ्याच्या स्वरूपाचा घूर्णक असलेले चरित्रही वापरतात. प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशेने वाहणारा) व एकदिश प्रवाह या दोहोंवर चालणारी चलित्रेही वापरतात पण अशा चलित्राचा आवाज मोठा असल्याने, रेडिओ व दूरचित्रवाणी यांच्या कार्यक्रमांच्या ग्रहणकार्यात त्यामुळे अडथळा निर्माण होत असल्याने तसेच त्यांची देखभाल फार करावी लागत असल्याने या प्रकारची चलित्रे असलेल्या पंख्यांचा वापर आता फार कमी झालेला आहे.

टेबलावरील पंख्याची हवा दूर सारण्याची क्षमता त्याच्या पात्याच्या व्यासावर व त्याच्या वेगावर अवलंबून असते. साधारणपणे पात्याचा व्यास ३० ते ४५ सेंमी. असतो. अशा पंख्यापासून प्रती मिनिट ६० ते ७५ घ. मी. हवा खेळविली जाते. पंख्याचे तोंड फिरवून खोलीमध्ये सर्व बाजूंस हवा खेळविण्याची सोय केलेली असते. यासाठी पंख्याचे तोंड १२०° कोनातून फिरविले जाते. रेल्वेच्या डब्यात वापरल्या जाणाऱ्या य़ा प्रकारच्या पंख्यांचे तोंड २७०° चे ३६०° कोनांतून फिरविले जाण्याची सोय केलेली असते.

वरील दोन्ही प्रकारच्या पंख्यांचा वेग विद्युत् रोधक वापरून आणि विजेचा दाब कमीजास्त करून नियंत्रित करता येतो. काही पंख्यांत यासाठी प्रवर्तनी अवरोधन (प्रत्यावर्ती प्रवाहाला मंडलातील प्रवर्तक घटकामुळे कंप्रता–दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांची वा आवर्तनांची संख्या – परिणामाद्वारे होणारा विरोध) वापरतात. त्याची किंमत जास्त असते पण त्याच्या वापरामुळे वीज कमी लागते.

पंख्याचा आवाज : पंखा चालू असताना होणारा आवाज ही निरनिराळ्या उपयोगांच्या दृष्टीने लक्षणीय बाब असते. यांत्रिक दृष्ट्या पंखा कार्यक्षम असला पण त्याचा फार आवाज होत असला, तर तो वापरण्यास अयोग्य ठरतो. घरगुती उपयोगाच्या बाबतीत असा आवाज किमान असणे महत्त्वाचे असते. पात्यांचा अभिकल्प (आकार व आकारमान या दृष्टींनी केलेला आराखडा), कार्य, परिस्थिती, संतुलन व बसविण्याची पद्धती योग्य तऱ्हेची वापरून आवाज कमी करता वेतो. एखाद्या नळीसारख्या खोबणीत पंखा बसवून आवाज नळीच्या बाहेर पडण्याच्या अगोदरच शोषला जाईल अशी व्यवस्था करता येते. सामान्यतः आवाज हा हवेच्या वेगावर अवलंबून असल्यामुळे इवेचा वेग कमी केल्यास आवाज कमी होतो.


देखभाल :जे पंखे कायमचे वापरात असतात, त्यांच्या धारव्यात नियमितपणे वंगण तेल घालावे लागते. दर ६ ते १२ महिन्यांनी पंखा उघडून त्यातील सर्व धूळ व घाण काढून टाकावी. खोललेले चलित्र पुन्हा बसविल्यावर त्यांचे संतुलन तपासून पहावे लागते, नाही तर धारवे खराव होतात. टेबल पंख्याची फारच थोडी देखभाल करावी लागते. त्याचे धारवे बंदिस्त प्रकारचे असतात. अंशावृत ध्रुव पद्धतीचे चलित्र असेल, तर त्याला अघूनमधून वंगण तेल घालावे लागते. सर्वगामी पद्धतीचे चलित्र असेल, तर त्यातील दिक्‌परिवर्तक [⟶ दिक्‌परिवर्तन] व स्पर्शक (ब्रशेस) वर्षातून एकदा साफ करावे लागतात. जरूर पडल्यास दिक्‌परिवर्तक काढूनही घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे स्प्रिंग आणि स्पर्शक जरूर पडल्यास बदलावे लागतात. कार्बनाची धूळ दिक्‌परिवर्तकातून पूर्णपणे काढून टाकणे इष्ट असते. चलित्र सुरू करण्यासाठी व वेग बदलण्यासाठी वापरलेला रोधक पूर्णपणे तपासून त्यावरील धूळ झटकून टाकावी, नाही तर तो गरम होऊन आग लागण्याचा संभव असतो, तसेच विद्युत निरोधन खराब होते.

पहा : वायुवीजन विद्युत् चलित्र. 

बापट, प्र. रा. कुलकर्णी, पं. तु.

संदर्भ: 1. Knowlton, A. E., Ed. Standard Handbook of Electrical Engineers, Tokyo, 1957.

   2. Severns, W. H. Fellow, J. R. Air Conditioning and Refrigeration, London, 1961.

   3. Woods, G. Woods Practical Guide to Fan Engineering, Colchester, 1960.