लिफ्ट : (एलिव्हेटर). माणसे किंवा माल उभ्या कूपकातील एका पातळीवरून दुसऱ्या पातळीवर नेणाऱ्या फलाटाच्या वा पाळण्याच्या (डब्याच्या) स्वरूपाच्या साधनाला लिफ्ट म्हणतात. बहुतेक बहुमजली इमारतींत व इतर उंच संरचनांत (उदा., धरणे, जहाजे) तसेच खाणींत लिफ्टांचा वापर करण्यात येतो. बहुतेक आधुनिक लिफ्ट विद्युत् चलित्रांनी (मोटरींनी) संतुलक वजनाच्या साहाय्याने तारदोर व कप्प्या यांच्या प्रणालीद्वारे मार्गदर्शी रुळांवरून चालविण्यात येतात. अधिकाअधिक उंच इमारती बांधण्याचा मार्ग लिफ्टमुळे खुला झाल्यामुळे अनेक आधुनिक शहरांना (विशेषतः अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील) वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्वरूप प्राप्त होण्यात लिफ्टचा निश्चितच वाटा आहे.

इतिहास : बांधकामाकरिता यांत्रिक साधनाने भार उचलण्याच्या पध्दतीचा इतिहास किमान रोमन काळापर्यंत मागे जातो. रोमन वास्तुशिल्पज्ञ व अभियंते व्हिट्रूव्हिअस (इ. स. पू. पहिले शतक) यांनी मानवाच्या, प्राण्याच्या वा जलीय शक्तीवर चालणाऱ्या आणि कप्प्या, रहाट वा कॅप्स्टन (उभा रहाट) यांचा उपयोग करणाऱ्या उच्चालक फलाटांचे वर्णन केलेले आढळते. अशा प्रयुक्त्यांकरिता वाफेच्या शक्तीचा वापर इ. स. १८०० च्या सुमारापर्यंत इंग्लंडमध्ये सुरू झाला. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभाच्या काळात द्रवीय लिफ्ट प्रचारात आली. तीत फलाट कूपकाच्या उंची इतक्याच खोलीवर कूपकाच्या खाली रुतविलेल्या सिलिंडरातील दट्ट्याला जोडलेला होता. सिलिंडरातील द्रवावर वाफ पंपाने दाब देण्यात येई व त्यामुळे दट्ट्यावरील फलाट वर उचलला जाई. ही दट्ट्याची लिफ्ट दट्ट्याच्या मर्यादित लांबीमुळे जास्त उंचावर जात नसे व तिचा वेग प्रती मिनिट १८५ ते २१५ मी. असे. नंतर पाळण्याचा वेग वाढविण्यासाठी व दट्ट्याची लांबी कमी करण्यासाठी कप्पी संचाचा उपयोग करण्यात आला. या सर्व साधनांत पाळण्याच्या वजनाला समतोल राखणारे संतुलक वजन वापरण्यात आले होते आणि त्यामुळे पाळण्यातील माणसांचा वा मालाचा भार उचलण्यास पुरेशी होईल इतकीच शक्ती वापरावी लागे. १८५० पावेतो ही तत्त्वे मुख्यत्वे मालाच्या उच्चालकांसाठीच वापरण्यात येत होती कारण त्या काळी वापरात असलेले दोर मजबुतीच्या दृष्टीने प्रवाशांकरिता उपयोगात आणण्याइतपत विश्वासार्ह नव्हते. १८५३ मध्ये र्इ. जी. ओटिस यांनी एक सुरक्षा प्रयुक्ती प्रचारात आणली आणि तीमुळे प्रवासी लिफ्ट प्रत्यक्षात येऊ शकली. या प्रयुक्तीचे न्यूयॉर्कमधील क्रिस्टल पॅलेस एक्सपोझिशन या प्रदर्शनात प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पाळण्याच्या सांगाड्याच्या वरच्या टोकावर बसविलेल्या या प्रयुक्तीत एका पकडीसारख्या रचनेचा समावेश होता आणि उच्चालक दोर तुटून त्यातील ताण कमी होताच पाळण्याच्या मार्गदर्शी रूळांना ही पकड रचना घट्ट धरून ठेवीत असे. पहिली खरी प्रवासी लिफ्ट न्यूयॉक येथील हॉवौट डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये १८५७ मध्ये ओटिस यांनी बसविली. या लिफ्टला लक्षणीय यश मिळाले व ती वाफ शक्तीवर एका मिनिटापेक्षाही कमी वेळात पाच मजले चढून जाई.

पुढील तीन दशकांत वाफ शक्तीवर चालणाऱ्याध लिफ्टची विविध रूपे प्रचारात आली पण १८८० नंतरच्या दशकाच्या मध्यास लिफ्ट चालविण्यासाठी विद्युत् चलित्राच्या उपयोगास सुरुवात होईपर्यंत कोणतीही महत्त्वाची प्रगती झाली नाही. पहिली व्यावहारिक विद्युत् प्रवासी लिफ्ट न्यूयॉक शहरातील डिमारेस्ट बिल्डिंगमध्ये १८८९ साली बसविण्यात आली. या लिफ्टमध्ये इमारतीच्या तळघरात बसविलेला दोर गुंडाळणारा खाचा पाडलेला दंडगोल फिरविण्यासाठी एकदिश विद्युत् प्रवाहावर चालणाऱ्या चलित्राचा मळसूत्र व मळसूत्री चाकाद्वारे [→ दंतचक्र ] उपयोग करण्यात आला परंतु दंडगोलाच्या मर्यादित व्यासामुळे ५० मी. उंचीपर्यतच या लिफ्टचा उपयोग करता येई व तिचा वेग दर मिनिटाला सु. ११५ मी. असे. इंग्लंडमध्ये फ्रॉस्ट व स्ट्रट यांनी पाळण्यापासून कूपकाच्या वरच्या बाजूला बसविलेल्या कप्पीवरून संतुलक वजनापर्यंत जोडलेल्या दोरांचा व कप्पीलाच शक्ती लावणाऱ्या उच्चालक यंत्रणेचे १८९५ मध्ये प्रात्यक्षिक दाखविले. त्यामध्ये पाळण्याचे वजन व संतुलक वजन ही कर्षणाची (ओढण्यासाठी साहाय्य करणाऱ्या घर्षणाची) हमी देण्यास पुरेशी होती. या कर्षण चालन यंत्रणेमुळे दोर गुंडाळणाऱ्या दंडगोलाने येणाऱ्या मर्यादा दूर होऊन अधिक उंच कूपक बांधणे व अधिक वेग मिळविणे शक्य झाले. १९०४ मध्ये चालना कप्पी सरळ विद्युत् चलित्राच्या आर्मेचराला [→ विद्युत् चलित्र] जोडून ‘दंतचक्ररहित चालन’ हे वैशिष्ट्य प्रचारात आले व त्यामुळे वस्तुतः अमर्याद वेग मिळविता येऊ लागला.

प्रारंभी एकदिश विद्युत् चलित्र व चलरोधक नियंत्रण यांचा उपयोग प्रवेग मिळविण्यासाठी उत्तम असल्याचे ठरविण्यात आले. तथापि प्रत्यावर्ती (मूल्य व दिशा ठराविक क्रमाने वारंवार उलटसुलट बदलणाऱ्या) विद्युत् प्रवाहाची वितरण पद्धती विस्तृत प्रमाणात वापरात आल्याने कमी वेगाच्या प्रवासी व मालवाहू सेवेकरिता एक व दोन वेगी प्रत्यावर्ती चलित्रे बऱ्याचदा वापरण्यात येतात. एकदिश चलित्र आणि प्रत्यावर्ती प्रवाह पुरवठा वापरावयाचा असल्यास लिफ्टच्या शक्ती पुरवठ्यासाठी परिवर्तक (प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाचे एकदिश विद्युत् प्रवाहात परिवर्तन करणारी) योजना वापरावी लागते. जेथे लिफ्टकरिता एकदिश चलित नियंत्रण वापरले जाते तेथे परिवर्तक संच म्हणून चलित्र-जनित्र संच बहुधा वापरला जातो.

प्रारंभी एकदिश चलित्राबरोबर चलरोधक नियंत्रण प्रचारात आले. यात चलित जरूरीप्रमाणे प्रवेगित व ऋणप्रवेगित करण्यासाठी योग्य तितका कमी वा जास्त रोध मंडलात समाविष्ट करण्यात येतो. आर्मेचरला जाणाऱ्या संवाहक तारांची जोडणी बदलली म्हणजे दिशा बदलता येते.उच्च वेग व सुरळीत प्रवेग यांसाठी रोध टप्पांची संख्या मोठी असावी लागते. ही नियंत्रण पद्धत १९०० सालाच्या सुमारास प्रत्यावर्ती चलित्रांसाठीही उपयोगात होती व काही सुधारणा करून ती १९१९ पर्यंत वापरात होती. या पद्धतीत शक्तिव्यय जास्त होतो व रोध टप्पांची संख्या मोठी नसल्यास प्रवेग सापेक्षतः अनियमित असतो. ही अडचण सोडविण्यासाठी बहुविध विद्युत् दाबांची पद्धती विकसित करण्यात आली. या पद्धतीत चालक यंत्रावर क्रमाक्रमाने निरनिराळे विद्युत् दाब लावण्यात येतात. याकरिता प्रत्येक स्थिर विद्युत् दाब असलेल्या बहुगुणित जनित्रांचा समावेश असलेला जनित्र-चलित्र संच वापरण्यात येतो.

उंच इमारती बांधण्यात येऊ लागल्यावर आणि बदलत्या भाराच्या परिस्थितीत सुरळीत व जलद प्रवेग वा ऋणप्रवेग लिफ्टच्या उच्च वेगासाठी आवश्यक झाल्याने विद्युत् दाबात पुष्कळ बदल करणे गरजेचे झाले. यासाठी १९२२ मध्ये चल विद्युत् दाब नियंत्रण पद्धती प्रचारात आली. या पद्धतीत प्रत्येक लिफ्टसाठी एकदिश चलित्र व चलित्र-जनित्र संच वापरतात आणि लिफ्टचा वेग नियंत्रित करण्यासाठी जनित्राच्या क्षेत्र तीव्रतेची जुळणी करून चालक यंत्राला लावलेल्या विद्युत् दाबात बदल करण्यात येतो. ही पद्धत सर्व प्रकारच्या लिफ्टांसाठी आणि एकदिश किंवा प्रत्यावर्ती शक्ती पुरवठ्यासाठी वापरता येते. यामुळे विसाव्या शतकात दंतचक्रयुक्त चल विद्युत् दाब, दंत-चक्रयुक्त प्रत्यावर्ती प्रवाह चल रोधक व दंतचक्ररहित चल विद्युत् दाब अशी तीन प्रकारची लिफ्ट साधनसामग्री उपयोगात आली.

विद्युत् लिफ्ट चालविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रयुक्तीच्या प्रकारात लिफ्टच्या विकासाबरोबरच प्रगती होत गेली. विद्युत् लिफ्टसाठी हाताने ओढावयाच्या दोराच्या प्रकारापासून सुरुवात झाली आणि १८९५ मध्ये पाळण्यात बसविलेला स्विच वा नियंत्रक प्रचारात आला व तो लिफ्ट सेवक नेमलेल्या ठिकाणी १९२० पर्यंत सामान्यतः वापरात होता. पाळण्यातील स्विच नियंत्रण कक्षामधील चुंबकीय स्विचांद्वारे कुशलतेने चालवून सेवक पाळण्याची दिशा, त्याचा वेग, तो चालू करणे वा थांबविणे यांचे नियंत्रण करीत असे. १९१५ मध्ये तथाकथित स्वयंचलित समतलन प्रत्येक मजल्यावरील स्वयंचलित नियंत्रकाच्या रूपात प्रचारात आले. सेवकाने मजल्याच्या पातळीपासून ठराविक अंतरावर हस्त-नियंत्रक बंद केल्यावर हे स्वयंचलित नियंत्रक कार्यान्वित होऊन पाळणा अचूक स्थानी थांबेल अशा प्रकारे त्याला मार्गस्थ करीत. तथापि उच्च वेग प्रचलित झाल्यावर या पद्धतीने पाळणा थांबविणे अवघड होऊ लागल्याने ती अकार्यक्षम ठरली. या पद्धतीची व्यवहार्य वेग मर्यादा दर मिनिटाला १८५ ते २१५ मी. होती.

वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनने १९२५ मध्ये पाळण्यातील स्विचाबरोबर स्वयंचलित अवतरण प्रचारात आणल्याने वेगावरील अनेक मर्यादा दूर झाल्या. यामुळे लिफ्टचा वेग वा भार यांच्या निरपेक्ष कोणत्याही मजल्यावर अचूक व सुरळीत अवतरण शक्य होऊ लागले. या सोयीमुळे उच्च वेगाला मुभा मिळून अधिक उंच इमारती बांधणे शक्य झाल्याने लिफ्टच्या विकासातील आणखी एक टप्पा गाठला गेला. लिफ्टांचे वेग दर मिनिटाला ३६५ मी.पर्यंत वाढले (उदा., १९३१ मध्ये एंपायर स्टेट बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यांकरिता बसविलेल्या लिफ्ट) आणि पुढे त्यात आणखी वाढ होऊन १९७० मध्ये शिकागो येथील जॉन हॅन्कॉक सेंटरमधील लिफ्टांचा वेग दर मिनिटाला ५४९ मी.पर्यंत पोहोचला.

ओटिस कंपनीने १८९२ मध्ये दाब-बटण नियंत्रण प्रचारात आणले व त्यामुळे सज्जामधील किंवा पाळण्यातील बटण दाबून लिफ्ट चालविणे शक्य झाले. याचा मुख्य फायदा म्हणजे प्रवाशाला स्वतःला लिफ्ट चालविण्याची मुभा मिळून सेवकाची जरूरी राहिली नाही. या सोयीचा उपयोग अवतरणाची अचूकता महत्त्वाची नसलेल्या एकेकट्या मंदगती लिफ्टांसाठी मर्यादित होता.लिफ्टांचे स्वयंचलित कार्य काटकसरी असल्याने रुग्णालयांच्या व निवासी (अपार्टमेंट) इमारतीत मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले. यातून हळूहळू १९२५ पावेतो ओटिस कंपनीनेच विकसित केलेली सामूहिक नियंत्रण पद्धती प्रचारात आली. या पद्धतीमुळे बोलावणाऱ्यांच्या मजल्याच्या स्थानांनुसार क्रमाक्रमाने त्यांची पूर्तता करण्याची सोय झाली. बाजूच्या सज्जादतील वा स्थानकातील बटणांवर नोंदविलेल्या बोलावण्यांनुसार पाळण्याचे कार्य चालते. या बटणांपैकी कोणतेही बटण क्षणभर दाबले, तरी पाळण्याची इष्ट दिशेने गती सुरू होते. पाळण्याचा प्रवास चालू असताना पोहोचलेल्या मजल्यांच्या क्रमानुसार तो थांबत जातो. एका दिशेतील सर्व बोलावण्यांची पूर्तता झाल्यावरच पाळण्याच्या प्रवासाची दिशा उलट होऊन मग त्या दिशेतील सर्व बोलावण्यांची पूर्तता केली जाते. पुढे आणखी उपसाधने विकसित करण्यात येऊन या पद्धतीचा दोन किंवा तीन पाळण्यांसाठी उपयोग करण्याकरिता विस्तार करण्यात आला. या योजननेत सर्व पाळण्यांसाठी सज्जातील बटणे समाईक असतात. यात सेवक व सामूहिक नियंत्रण असे दुहेरी नियंत्रणही उपलब्ध झाले.

संकेतानुसारी कार्य हा लिफ्ट नियंत्रणातील एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. न्यूयॉर्कमधील स्टॅंडर्ड ऑइल कंपनीच्या इमारतीत १९२४ मध्ये ही पद्धती कार्यान्वित झाली.यात पाळण्यातील व सज्जातील बटणांवरील बोलावण्यांनुसार पाळणे आपोआप थांबतात. पाळण्यात व प्रत्येक मजल्यावर एक दर्शक व बोलावण्यासाठी दाबक बटण आवश्यक असतात. मजल्यावरील प्रकाशित दर्शकावरून पाळण्याच्या प्रवासाची दिशा, त्याचे स्थान व कोणता पाळणा आता थांबणार आहे हे समजते. सेवकाचे मुख्य कार्य लिफ्टची दारे बंद करणे व पाळणा सुरू करणे हे होते. या पद्धतीत पाळणा थांबविण्याच्या कामातील मानवी घटक दूर झाल्याने दर मिनिटाला सु . ४२५ मी. पर्यंत वेग शक्य झाला. याच सुमारास विद्युत् शक्तीवर कार्य करणारी दारे , रवानगी प्रयुक्ती व संकेत यांत झालेल्या विकासामुळे या पद्धतीची कार्यक्षमता पुष्कळच वाढली.रवानगी प्रयुक्ती ही एखाद्या ठिकाणाहून पाळणा केव्हा सुटला पाहिजे हे दर्शविणारा पाळण्यातील संकेत कार्यान्वित करून पाळणा पाठविते. त्यानंतर झालेल्या विकासामुळे पाळण्याची आरंभक यंत्रणा कार्यान्वित करून पाळण्याची रवानगी करणे साध्य होऊ लागले. ही पद्धती कालावधीच्या (सामान्यतः २०-४० सेकंद) तत्त्वावर कार्य करते. पाळण्यांनी कोणताही ठराविक क्रम अनुसरण्याची आवश्यकता नसते.

वेस्टिंगहाऊस व ओटिस कंपन्यांनी प्रचारात आणलेल्या गट-पर्यवेक्षी नियंत्रकांद्वारे दोन वा अधिक लिफ्टांचा गट एक प्रणाली म्हणून कार्य करतो. या प्रणालीत वाहतुकीच्या मागणीच्या कालावधीनुसार ( उदा., सकाळची वर जाणाऱ्या व सायंकाळी खाली येणाऱ्या कमाल गर्दीच्या वेळा, सर्वसामान्य, रात्रीची व इतर वेळा) सेवा पुरविण्यासाठी योग्य तऱ्हेने लिफ्टांची रवानगी होण्याची सोय असते. बाजूच्या कक्षामध्ये असलेला सेवक ( स्टार्टर ) तेथील एका स्विचाद्वारे सद्यस्थितीतील वाहतुकीच्या प्रकाराला योग्य अशा तऱ्हेने स्वयंचलित रीत्या प्रणाली कार्यान्वित करू शकतो. १९४९ मध्ये आणखी स्वयंचलित वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आल्याने अशा प्रणाली पाळण्यातील सेवकाशिवाय वाहतुकीच्या निरनिराळ्या आकृतिबंधांनुसार स्वयंचलित रीत्या कार्य करू लागल्या. यात प्रवासी पाळण्याच्या स्थानकातील बटणे दाबून त्यांना जावयाच्या मजल्याची नोंद करतात व मग तेथील सेवकाने निवडलेल्या आकृतिबंधानुसार प्रणाली स्वयंचलित रीत्या काम करू लागते. पाळण्यांची रवानगी, दारांची उघडमीट व योग्य कालावधी राखणे हे सर्व स्वयंचलित रीत्या होऊ लागले.

उंच इमारतींमधील लिफ्ट बसविण्यासाठी लागणारी जागा कमीत कमी टेवण्याकरिता दुमजली लिफ्टच्या कल्पनेचा १९३२ मध्ये प्रथम प्रयोग करण्यात आला. प्रत्येक लिफ्टमध्ये एकावर एक व दोन पाळणे असून प्रत्येक वेळी थांबताना ते एकत्रितपणे दोन मजल्यांकरिता काम करतात. दुमजली पाळणे वापरून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता मोठ्या कूपकाची जरूरी न लागता २५% ते ५०% वाढविता येते. प्रवासी या दोन पाळण्यांत दोन पातळ्यांवरून (बहुधा रस्त्यालगतच्या मजल्यावरून व तळघरातून किंवा पोटमजल्यावरून) पोचतात. या दोन पातळ्यांच्या दरम्यान फिरते जिने वापरतात. प्रत्येक थांब्याच्या वेळी दुमजली लिफ्टने दोन मजल्यांना सेवा मिळत असल्याने प्रवासाचा वेळ वाचून दर खेपेस अधिक प्रवासी वाहून नेले जातात. हे तंत्र वाढत्या प्रमाणात वापरण्यात येत असून १९७१ मध्ये शिकागो येथील टाइम-लाइफ बिल्डिंगमध्ये व नंतर इतरत्र स्वयंचलित दुमजली लिफ्ट काम करू लागल्या आहेत. भारतात कोलार येथील सोन्याच्या खाणीत दुमजली लिफ्ट वापरात आहे. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन इमारतींत लिफ्टांना लागणारी जागा किमान ठेवण्यासाठी निराळे तंत्र वापरण्यात आले आहे. प्रत्येक ११० मजली इमारत तीन स्तरांत विभागलेली आहे. खालच्या ४१ मजल्यांच्या स्तरात प्रत्येक सहा लिफ्टांचे चार संच आहेत. त्याचप्रमाणे मधल्या व वरच्या स्तरांतही वेगळे प्रत्येकी सहा लिफ्टांचे चार संच आहेत. ४४ व्या व ७८ व्या मजल्यावर मुख्य मजल्याला ११ उच्च वेगी लिफ्टांनी जोडणारा ‘ आकाश कक्ष ’आहे. सर्वांत खालच्या स्तरातील लिफ्ट मुख्य कक्षापासून नेहमीप्रमाणे सेवा देतात. वरच्या प्रत्येक स्तरातील सर्वांत खालचा मजला आकाश कक्ष होतो आणि त्यांवर मुख्य मजल्यावरून प्रशस्त द्रुतगती व कोठेही न थांबणाऱ्या लिफ्टांतून पोहोचता येते. आकाश कक्षापाशी प्रवासी त्याच्या मजल्यावर पोचण्यासाठी स्थानिक लिफ्टांचा उपयोग करतो. या स्थानिक लिफ्टांचे कूपक मुख्य कक्षाऐवजी आकाश कक्षापाशी सुरू होतात आणि त्यामुळे आकाश कक्षाखालील मजल्यांवर हे क्षेत्र जमीन-क्षेत्र म्हणून वापरता येते.

आधुनिक लिफ्ट : नेहमीच्या मालवाहू व प्रवासी कार्यांखेरीज जहाजे, धरणे व रॉकेट क्षेपण यंत्रणेसारख्या विशेष संरचना अशा निरनिराळ्या उद्दिष्टांकरिता विविध प्रकारच्या लिफ्ट वापरण्यात येतात. उंच बांधकामासाठी जड वजन उचलणाऱ्या व द्रुत गतीने खाली येणाऱ्या लिफ्ट वापरतात. इमारतींच्या व निरीक्षण  मनोऱ्यांच्या  बाह्य बाजूवरून जाणाऱ्या व पारर्दशक भिंती असलेल्या पाळण्याच्या लिफ्ट अलीकडे लोकप्रिय झाल्या आहेत. पॅरिस येथील आयफेल टॉवरवर १८८९ मध्ये अशा लिफ्ट प्रथम बसविण्यात आल्या. अशा लिफ्टांच्या पाळण्यांना काचा लावलेल्या असल्याने प्रवाशांना लिफ्टचा प्रवास चालू असताना आसमंताचे दृश्य पाहता येते.

बहुतेक सर्व आधुनिक लिफ्टांकरिता विद्युत् शक्ती वापरण्यात येते आणि त्याकरिता तारदोर, कप्पी व संतुलक वजन याचा किंवा गुंडाळी-दंडगोल यंत्रणेचा (ही अनेक कमी उंचीच्या मालवाहू लिफ्टांसाठी अद्यापही उपयोगात आहे) अथवा विद्युत्-द्रवीय संयोगाचा उपयोग करतात. तीन वा अधिक तारदोर वापरण्यात येतात. त्यामुळे कप्पीशी संपर्कात असलेला पृष्ठभाग वाढण्याबरोबरच सुरक्षितताही वाढते. तारदोर तुटण्याचे प्रसंग विरळाच उद्‌भवतात.

लिफ्ट चालविणारे चलित्र बहुधा कमी वेगासाठी प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहावर व उच्च वेगासाठी एकदिश प्रवाहावर कार्य करते. एकदिश प्रवाह चलित्राचा वेग बदलण्यासाठी एकदिश जनित्राची क्षेत्र तीव्रता बदलतात आणि जनित्राचे आर्मेचर व चालक चलित्राचे आर्मेचर यांच्या सरळ जोडाची जुळवणी करतात.उच्च वेगी लिफ्टांसाठी दंतचक्ररहित रचना वापरण्यात येते व तीत कप्पीवरून सामान्यतः तारदोरांचे दोन वेढे घेतात. कर्षण लिफ्ट अमर्यादपणे वर जाऊ शकते, तथापि ३० मी.पेक्षा जास्त उंचीवर जाण्यासाठी पाळण्याच्या तळापासून ते संतुलक वजनाच्या तळापर्यंत जाणारे पूरक तारदोर आवश्यक ठरतात. पाळणा जसजसा वर चढतो तसतसे पूरक दोराचे वजन पाळण्याकडे स्थानांतरित होते व पाळणा खाली उतरताना ते संतुलक वजनाकडे स्थानांतरित होते. यामुळे चालक यंत्रावरील भार जवळ-जवळ स्थिर राहतो.

द्रवीय सिलिंडर व दट्ट्ये कमी उंचीकरिता वापरण्यात येणाऱ्या प्रवासी लिफ्टांसाठी व अवजड मालाच्या लिफ्टांसाठी वापरतात. सिलिंडरातील तेलावर दिल्या जाणाऱ्या दाबामुळे दट्ट्या त्याच्या वरच्या टोकाला जोडलेला फलाट वर रेटतो. हा दाब मिळविण्याठी उच्च वेगी विद्युत् पंप वापरतात. पाळणा खाली आणण्यासाठी विद्युत् शक्तीवर काम करणाऱ्या झडपा वापरतात. या झडपांमधून सोडले जाणारे तेल पुन्हा वापरण्यासाठी टाकीत साठविले जाते. विशेष प्रकारच्या सिलिंडर दट्ट्या रचनांचा (यात घटक आडव्या पातळीत ठेवलेल्या रचनांचाही समावेश होतो) नेहमीपेक्षा वेगळ्या कामांसाठी उपयोग करण्यात येतो.उदा., १९०० सालाच्या सुमारास मोठ्या प्रमाणात प्रचारात असलेल्या दोराच्या (वा दंतचक्रयुक्त ) प्रकारच्या द्रवीय लिफ्टांचा उपयोग विमानवाहू जहाजात थोड्या अंतरातून अवजड भार उचलण्यासाठी करण्यात येतो. मात्र याकरिता प्रत्येक टोकाला कप्पांसह दट्ट्या व सिलिंडर बसविलेल्या रचनेचा वापर करण्यात येतो. दट्ट्यावर दाब दिला म्हणजे कप्प्यांमधील अंतर वाढते व मग कप्प्यांभोवती गुंडाळलेले दोर लिफ्ट वर उचलतात.  

स्वयंचलित सेवेसाठी विद्युत् प्रवासी लिफ्ट : (१) मजला नियंत्रक, (२) चालक यंत्र, (३) आरंभक व नियंत्रक, (४) चलित्र-जनित्र संच, (५) गतिनियंता, (६) दुय्यम कप्पी, (७) उच्चालक दोर, (८) मार्गदर्शी चाके, (९) अंतिम मर्यादा स्विच, (१०) गतिनियंत्याचा दोर, (११) अंतिम मर्यादा कॅम, (१२) दरवाजाची उघडमीट करणारी यंत्रणा, (१३) पाळणा, (१४) पाळण्याची सुरक्षा प्रयुक्ती, (१५) पाळण्याबरोबर वरखाली जाणारी विद्युत् केबल, (१६) संतुलक वजनाचे मार्गदर्शी रूळ, (१७) अंतिम थांबवण्याच्या स्विचाचा कॅम, (१८) संतुलक वजन, (१९) पूरक तारदोर, (२०) अंतिम मर्यादा स्विच, (२१) पाळण्याचे मार्गदर्शी रूळ, (२२) पूरक ताण कप्पी, (२३) पाळण्याकरिता तळातील धक्काशोषक.

खालच्या दिशेने पाळणा वाजवीपेक्षा जास्त वेगाने जाण्यास प्रतिबंध होण्यासाठी छतालगतच्या खोलीत ⇨गतिनियंता बसविलेला असतो. उच्चालक दोरांनी वर उचलल्या जाणाऱ्या पाळण्यांसाठी सुरक्षा प्रयुक्ती जोडणे आवश्यक असते व सामन्यतः ती पाळण्याच्या फलाटाच्या खाली बसविलेली असते. पाळण्याचा वेग प्रमाणाबाहेर जाऊ लागताच गतिनियंता त्याच्या कप्पीवरून जाणाऱ्या एका दोराद्वारे सुरक्षा प्रयुक्ती कार्यान्वित करतो. यामुळे शक्तिमान जबडे मार्गदर्शी रुळांना घट्ट पकडून ठेवतात व पाळणा ताबडतोब थांबतो. ही प्रयुक्ती प्रथम लिफ्टचा शक्तिपुरवठा बंद करते व जर प्रमाणबाह्य वेग चालूच राहिला, तर सुरक्षा गतिरोधकाचा (ब्रेकचा) उपयोग करते. कूपकाच्या तळाशी असलेल्या खड्ड्यात पाळणा व संतुलक वजन यांच्या खाली धक्काशोषक बसविलेले असतात. त्यामुळे पाळणा तळमजल्याशी जास्त खाली गेल्यास तो सुरक्षितपणे थांबविता येतो. तसेच अशा प्रसंगी शक्तिपुरवठा बंद करण्यासाठी कूपकात अंतिम मर्यादा स्विचेही बसविलेली असतात.

बहुतेक आधुनिक लिफ्ट स्वयंचलित असून त्यांत प्रत्येक लिफ्ट किंवा त्यांचे गट चालविण्यासाठी नियंत्रक प्रणाली वापरण्यात येतात. सर्वांत जुनी स्वयंचलित प्रणाली म्हणजे एकाच दाब-बटणाची असून तीमुळे एका फेरीसाठी केवळ एका प्रवाशालाही पाळणा वापरता येतो. लहान निवासी इमारतींसाठी व मालवाहू लिफ्टांसाठी ही प्रणाली अद्याप वापरात आहे. एकच लिफ्ट असलेल्या इमारतींसाठी सामूहिक कार्यपद्धती लोकप्रिय आहे. पाळणा एकाच दिशेतील सर्व बोलाविण्यांची क्रमाक्रमाने पूर्तता करतो व नंतर उलट फिरून विरुद्ध दिशेतील सर्व बोलावण्यांची पूर्तता करतो. ही पद्धत मोठ्या निवासी इमारतीत, रुग्णालयांत व लहान कार्यालयीन इमारतीत वापरण्यात येते. या पद्धतीचा एक प्रकार म्हणजे दुहेरी सामूहिक पद्धत होय व तीत दोन पाळणे एकत्रितपणे काम करून बोलावण्यांची पूर्तता करण्यात सहभागी होतात. गट-स्वयंचलित कार्यपद्धतीत दोन वा अधिक पाळण्यांचा गट नियंत्रित करतात आणि निर्दिष्ट कालावधीत हे पाळणे कार्यान्वित राहातील अशी व्यवस्था करतात. रुग्णालये, विविध वस्तू भांडारे व कार्यालये अशा ठिकाणी जर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असेल आणि दोन किंवा अधिक लिफ्ट कार्यान्वित असतील तेथे गट-स्वयंचलित कार्यपद्धती वापरतात.

प्रवासी लिफ्टांची वर्गवारी नियंत्रणाचा प्रकार, धारणक्षमता ( किग्रॅ.भार ) व महत्तम वेग यांनुसार करण्यात येते. निरनिराळ्या सेवांनुसार पाळण्यांचे आकार निरनिराळे असतात. रुग्णालयातील लिफ्टांचे पाळणे रुग्णडोल्या, चाकांच्या खुर्च्या व सुवाह्य उपकरणे वाहून नेण्यासाठी सामान्यतः अरुंद पण खोल असतात. विविध वस्तू भांडारातील पाळणे रुंद व उथळ असून अनेक प्रवांशाना चटकन आत वा बाहेर जाण्यासाठी त्यांना रुंद प्रवेशद्वारे असतात. काऱ्यालयीन इमारतींतील सामान्य लिफ्टांचे पाळणे खोलीपेक्षा जास्त रुंदीचे असतात. प्रवासी लिफ्टांची धारणक्षमता ७०० किग्रॅ. ते ३,२०० किग्रॅ. पर्यंत असते आणि त्यांचे वेग दर मिनिटाला ३० मी. ते ५५० मी. पर्यंत असू शकतात.

सुरुवातीला प्रचारात असलेले पाळण्याचे घडीचे दरवाजे व प्रवेशमार्गावरील हाताने ओढावयाची सरक दारे काही ठिकाणी अद्यापही प्रचारात असली, तरी त्यांची जागा आता बहुतांशी पाळण्याच्या व उच्चालक मार्गाच्या शक्तिचलित दारांनी घेतलेली आहे. उच्चालक मार्गाचे बाहेरचे व पाळण्याचे असे दोन वेगळे दरवाजे हे आधुनिक लिफ्ट प्रणालीतील आवश्यक भाग आहेत. हे दोन दरवाजे सामान्यतः एकाच प्रकारे (उदा.,मध्यभागी उघडणारे, दोन दारे असलेले, एकाच बाजूला सरकणारे), कार्य करतात. दरवाजे उघडण्याचे व बंद करण्याचे कार्य पाळण्यातील विद्युत् चलित करते (कित्येक ठिकाणी हे कार्य अद्याप हाताने केले जाते). यात विद्युत् चलित्राला जोडलेले दरवाजांची उघडमीट करणारे बाहू आणि पाळणा चालू होणे व थांबणे या क्रियांशी दरवाजांची उघडमीट समकालिक होईल अशा योग्य प्रकारे कार्य करणारा नियंत्रक यांचा सहभाग असतो. दरवाजात अडकलेल्या व्यक्तीला इजा होण्याचे टाळण्यासाठी तो बंद होतानाचा वेग नियंत्रित करतात. दरवाजा बंद होताना एखाद्या वस्तूवर आपटला, तर एक संवेदनाग्राहक प्रयुक्ती विद्युत् शक्तीद्वारे तो मागे आणते.  प्रकाशविद्युत् नियंत्रक व इलेक्ट्रॉनीय सान्निध्य प्रयुक्ती (एखादी वस्तू जवळ येत असल्यास विद्युत् संकेत निर्माण करणारी प्रयुक्ती) यांचाही दरवाजा मागे घेण्याची क्रिया नियंत्रित करण्यासाठी उपयोग करतात. उच्चालक मार्गाच्या दरवाजांचे अंतर्बंधन हे सर्व लिफ्टांचे मूलभूत सुरक्षा वैशिष्ट्य असते. उच्चालक मार्गाचे दरवाजे लिफ्ट गतिमान होऊ शकण्यापूर्वी नेहमी बंद स्थितीतच असतील अशा प्रकारे अभिकल्पित केलेले असतात.

एकाकी ठिकाणी, विशेषतः खाजगी निवासगृहातील लिफ्टमध्ये बहुधा बाहेरील विनिमय केंद्राला जोडलेला दूरध्वनी ठेवणे कायद्याने आवश्यक ठरविले आहे. अनेक इमारतींतील लिफ्टांमध्ये आकस्मिक यांत्रिक दोष निर्माण झाल्यास आंतरसंदेशवहनाची सोय केलेली असते. धोकासूचक गजराची बटणे, निकडीच्या वेळेची प्रकाश योजना व आणीबाणीचा विद्युत् शक्तिपुरवठा यांचीही सोय बहुधा केलेली असते. आगीच्या प्रसंगी लिफ्ट वापरणे सुरक्षित नसते कारण आगीमुळे त्या बंद पडण्याची शक्यता असते. सर्वांत जास्त उष्णता असलेल्या ठिकाणी उष्णता संवेदक बटणांमुळे लिफ्ट तेथेच थांबण्याची शक्यता असते.

मालवाहू लिफ्ट : पाळण्याचे आकारमान, पाळणा व फलाट यांची अधिक मजबूत रचना, बाह्यस्वरूप, मंद वेग व सामान्यतः अधिक धारणक्षमता या बाबतींत मालवाहू लिफ्ट प्रवासी लिफ्टांपेक्षा भिन्न असतात. दंतचक्रयुक्त प्रकारच्या लिफ्टांचा वेग दर मिनिटाला २५ मी. ते ६० मी.पर्यंत असतो व धारणक्षमता साधारणपणे ७०० किग्रॅ.ते ७,२५० किग्रॅ.पर्यंत असते. काही विशेष प्रकारच्या लिफ्टांची धारणक्षमता १३,५०० किग्रॅ. किंवा त्यापेक्षाही जास्त असते. मोठी धारणक्षमता व मंद वेग या वैशिष्ट्यांमुळे सामान्यतः मालवाहू लिफ्टांसाठी दंतचक्रयुक्त यंत्रे वापरतात तथापि जास्त वेगाची जरूरी असेल तेथे दंतचक्ररहित यंत्रे वापरली जातात.

मालवाहू लिफ्टांसाठी उभे सरकणारे, दोन भागांत (फळ्यांत) विभागणारे दरवाजे सामान्यतः वापारात आहेत. असे दरवाजे यांत्रिक दुव्याने जोडलेल्या वरील व खालील फळ्यांचे बनविलेले असून खालची फळी मजल्याच्या पातळीवर पडते व वरची पाळण्याच्या छताच्या वर जाते. आतील बाजूस एक संरक्षक फाटक वा कवाड बऱ्या चदा आवश्यक असते. आधुनिक मालवाहू लिफ्टांमध्ये माल चढविणाऱ्या  व उतरविणाऱ्या स्वयंचलित प्रयुक्त्या बसविलेल्या असतात. यात एक बोलाव्याचे बटण दाबल्यावर स्वयंचलित उद्ग्राहक साधन कार्यान्वित होते, पाळणा येतो, माल पाळण्यात ओढून घेतला जातो, पाळणा योग्य मजल्यावर पोचतो व माल उतरविण्यात येतो.

मूकसेवक : (डंब वेटर). नेहमीच्या लिफ्टांखेरीज अनेक रुग्णालये, ग्रंथालये व औद्योगिक इमारतींमध्ये स्वयंचलित मूकसेवकांचा वा सामग्री उच्चालक लिफ्टांचा माल भरलेली तबके, पुस्तके, ढकलगाडे व इतर वस्तू एका मजल्यावरून दुसऱ्यास मजल्यावर हालविण्यासाठी उपयोग करतात. हे मूकसेवक म्हणजे हाताने वा शक्तीने चालविण्याच्या आणि उभ्या मार्गदर्शी रुळांवर वरखाली जाणारा पाळणा असलेल्या माल उचलणाऱ्या व उतरविणाऱ्या  प्रयुक्त्याच असतात. मालवाहू लिफ्ट व मूकसेवक यांतील फरक म्हणजे मूकसेवकांच्या जमिनीचे क्षेत्रफळ ०.८ चौ. मी. पर्यंत मर्यादित असते. धारणक्षमता कमी  असते (२२५ कि ग्रॅ. पेक्षा जास्त नसते) आणि त्यांत सेवक वा प्रवासी कधीही नसतो. आधुनिक मूकसेवक हे लहान प्रमाणावरील विद्युत् लिफ्टच असतात. स्वयंचलित लिफ्टांप्रमाणेच मूकसेवक जेथील बटण दाबलेले असेल, तेथील मजल्यांवर स्वयंचलित रीत्या थांबतात. काही आधुनिक मूकसेवकांत माल चढविण्याची आणि उतरविण्याची स्वयंचलित योजना केलेली असते. सेवक फक्त लिफ्टच्या, समोर माल ठेवतो व लिफ्ट बोलाविण्याकरिता बटण दाबतो.

खाणीतील लिफ्ट : खाणकामात खनिजे, निरुपयोगी खडकाचा चुरा, इतर सामग्री व माणसे यांच्या वाहतुकीसाठी उच्चालक लिफ्टांचा वापर करतात. याकरिता सुरक्षितता विश्वासार्हता व काटकसर या दृष्टींनी विद्युत् लिफ्ट वापरणे सोयीचे असते. धातूच्या खाणी कोळशाच्या खाणींच्या मानाने खूप खोल असतात व त्यामुळे त्यांकरिता वापरावयाच्या लिफ्टाची रचना त्यानुसार करण्यात येते. खाणीत वापरण्यात येणाऱ्या लिफ्टांसंबंधी अधिक विवरण ‘खाणकाम’ या नोंदीत दिलेले आहे.

भारतीय मानक संस्थेने लिफ्टांसंबंधी विविध मानके तयार केलेली आहेत. त्यांत नवीन बसवावयाच्या प्रवासी व मालवाहू लिफ्टांच्या विनिर्दिष्ट आवश्यक (आय एस ४६६६-१९६८), प्रवासी व मालवाहू लिफ्ट बसविणे व त्यांची निगराणी (आय एस १८६० – १९६८), मूकसेवक लिफ्ट बसविणे, कार्य व निगराणी (आय एस ६६२०-१९७२), विविध प्रकारच्या लिफ्टांचे फलाट, उच्चालक मार्गाचे प्रवेशद्वार व यंत्रकक्ष यांच्या बाह्याकाराची मापे (आय एस ३५३४- १९६६), दरवाजांची उघडमीट करणाऱ्या प्रयुक्त्या (आय एस ७७५९ -१९७५) वगैरेंच्या मानकांचा समावेश आहे.

संदर्भ : 1. American Society of Mechanical Engineers, Safety Code for Elevators and Escalators Handbook o A 17.I, 1981.

2. Annet, F. A. Elevators, New York, 1960.

3. Phillips, R.S. Electric Lifts, New York, 1966.

4. Strakosch, G. Verticlal Transportation, New York 1968.

ओक, वा. रा.; कुलकर्णी का. मं.; दिक्षित, चं. ग.