खिळे : घरातील दारे, चौकटी, गाड्या, नावा वगैरे वस्तूंचे लाकडी जोडकाम तसेच पादत्राणांसारख्या चामडी वस्तू पक्क्या करण्यासाठी लोखंडी खिळे किंवा तारचुका वापरतात. खिळ्यांचे मुख्य प्रकार आकृतीत दाखविले आहेत. जातीचे खिळे कायम स्वरूपाच्या मजबूत लाकूडकामात वापरतात. जातीचे बारीक खिळे बूट, जोडे वगैरे चामड्याच्या वस्तूंसाठी वापरतात. जातीचे खिळे (तारचुका) लाकडी खोक्यांसाठी वा हलक्या लाकूडकामासाठी वापरतात.

लोखंडी खिळ्यांचा उपयोग यंत्रयुगाच्याही पूर्वीपासून चालू आहे. यंत्रयुगाच्या पूर्वी लोहार लोखंडी पत्र्याचे तुकडे तापवून त्यांपासून चौकोनी छेदाचे खिळे घडवीत असत. या प्रकारचे खिळे आता यंत्रांच्या साहाय्याने घडविण्यात येतात.

खिळ्यांचे मुख्य प्रकार

इंग्लंडमध्ये १८५० च्या सुमारास यंत्राच्या साहाय्याने तारचुका बनविण्यास सुरुवात झाली. आता निरनिराळ्या व्यासांच्या पोलादी तारांपासून तारचुका बनविणारी यंत्रे बहुतेक सर्व देशांत वापरात आली आहेत. यंत्राने तयार केलेले खिळे व तारचुका अगदी एकसारख्या असतात व त्यांची किंमतही कमी असते. तारचुका साधारणतः १ सेंमी. पासून ७ सेंमी पर्यंत लांबीच्या असतात व त्यांचा  व्यास ०·५ मिमी. पासून ३ मिमी. पर्यंत असतो. व्यवहारात तारचुकांचा प्रकार व्यास व लांबीदर्शक अंकाने दर्शविला जातो. बाजारात मिळणाऱ्या पोलादी तारचुकांचे कोष्टक नमुन्यासाठी खाली दिले आहे. त्यावरून आपणास पाहिजे त्या प्रकारची तारचूक नुसता आकार-अंक सांगून मागता येते.

तारचुका बनविण्याच्या यंत्रामध्ये हव्या त्या जाडीची तार एका बाजूने आत सरकवतात. ही तार यंत्रातील दोन जबड्यांत घट्ट पकडली जाऊन तिच्या टोकावर दट्ट्या आपटतो. त्यामुळे त्या टोकावर दट्ट्याच्या तोंडावर असलेल्या पोकळीप्रमाणे आकार येतो, म्हणजे तारचुकेचा माथा तयार होतो. नंतर दट्ट्या मागे घेऊन जबड्यांची पकड सैल करून तारचुकेच्या लांबीइतकी तार पुढे सरकवली जाते आणि तारेचे टोक छिन्न्यांनी कापले जाऊन टोकावर तीक्ष्ण टोकाच्या प्रसूचीसारखा (पिरॅमिडासारखा) आकार तयार होतो. अशा प्रकारे एक एक तारचूक तयार होते.

या क्रिया यंत्रावर जलद होतात व साधारणतः एका मिनिटात ४०० ते ५०० तारचुका तयार होतात. यंत्रातून निघालेल्या तारचुका नंतर लाकडाच्या भुशात मिसळतात व पिंपात भरून ते पिंप दुसऱ्या यंत्रावर एक तासपर्यंत फिरवतात. असे केल्याने तारचुकांवरील तेल व इतर घाण निघून जाते व त्या चकचकीत होतात. नंतर तारचुकांना पाण्याचा संसर्ग होऊन त्या गंजू नयेत म्हणून पुठ्ठ्याच्या पेटीत भरून ठेवतात. लाकडामध्ये ठोकलेल्या तारचुका सैल पडू नयेत म्हणून काही प्रकारच्या चुकांवर गोल अगर नागमोडी आट्याप्रमाणे सऱ्या पाडतात. काही चुकांना राळेसारखा पदार्थ लावतात. अशा चुका लाकडात घुसत असताना तापतात व चुकांवर लावलेली राळ वितळून त्या लाकडाला घट्ट धरून बसतात.

पोलादी तारचुकांचे कोष्टक
आकार-अंक …. २०
लांबी मिमी. १२·५ २५·४ ३१·७ ३७·५ ४४·४ …. ७६·२
व्यास अंक २० १५ १४ १३ १२ ….
डोक्याचा व्यास मिमी. ३·१ ४·३ ५·१ ६·१ ७·१ …. १२·७
एक किग्र. वजनातील संख्या (सु.) ३,३०० १,८७० १,१९० ६४० २२० …. २०

चामड्याच्या पादत्राणाना लागणाऱ्या चुका आणि टेकस पोलादी तारेपासून न करता नरम लोखंडी पत्र्याचे तुकडे घडवून तयार करतात. या चुकांचा छेद चौकोनी असतो. त्या नरम लोखंडाच्या असल्याने सहज वाकतात. पण तुटत नाहीत व चौकोनी छेदामुळे चामड्यातून निसटतही नाहीत.

गानू, अ. प.