नळ व नळी: द्रव अथवा वायू वाहून नेणाऱ्या दंडगोल आकाराच्या पोकळ वाहिनीस आकारमानानुसार नळ किंवा नळी असे म्हणतात. सामान्यतः अशा वाहिनीचा आतला व्यास व जाडी दिलेली असते तेव्हा तिला नळ असे म्हणतात आणि बाहेरचा व्यास व जाडी दिलेली असते तेव्हा नळी असे म्हणतात. नळ २ ते ३६० सेंमी. व्यासाचे असू शकतात, तर नळ्या १ मिमी. ते १ सेंमी. व्यासाच्या असू शकतात.

नळ व नळ्या पोलाद, शुद्ध लोखंड, बीड, तांबे, पितळ, कथिल, ॲल्युमिनियम, जस्त व शिसे या धातूंपासून बनवितात. तसेच लाकूड, काच, काँक्रीट, ॲस्बेस्टस, सिमेंट, चिनी माती, कॅनव्हास, रबर व प्लॅस्टिक यांपासूनही बनवितात. फार पुरातन काळी कुंभार मातीपासून भाजून खापराचे नळ बनवीत, तसेच पोकळ बांबूही वापरीत. नळ आणि नळ्यांचा उपयोग द्रव, वाफ, हवा, वायू व धूर यांच्या वहनासाठी करतात. अशा पदार्थांचे थंड किंवा उष्ण अवस्थेत वहन करावे लागते. तसेच ते दाबयुक्तही असू शकतात. म्हणून नळ किंवा नळ्यांचा वापर कोणत्या कामाकरिता करावयाचा आहे हे विचारात घेऊन तसेच तापमान, दाब व भक्षणक्रिया (वाहून न्यावयाच्या पदार्थाच्या रासायनिक विक्रियेमुळे होणारी झीज) यांच्या परिणामाला त्या टिकतील हे पाहूनच त्यांची निवड करावी लागते. काही नळांतून कापूस, भुकटी, भुसा अशासारख्या घन पदार्थांचेही वहन करावे लागते. नळ किंवा नळ्यांची जोडणी विविध जोडसाधने वापरून करतात [→ धातु व अधातूंचे जोडकाम नळकाम].

बव्हंशी कार्बनयुक्त व मिश्र पोलादाचे नळ व नळ्या उच्च दाब व तापमानासाठी वापरतात. इतर पदार्थांपासून बनविलेल्या नळ आणि नळ्या साधारणपणे २१ किग्रॅ./सेंमी. याखालच्या दाबासाठी वापरतात.

धातूचे नळ व नळ्या: धातूंपासून नळ व नळ्या तयार करण्याच्या पद्धतींची वर्गवारी ढोबळमानाने चार गटांत केली जाते : (अ) यांत्रिक जोड पद्धत, (आ) ओतीव पद्धत, (इ) वितळजोड (वेल्डिंग) पद्धत आणि (ई) अखंड पद्धत.

आ.१. यांत्रिक कडसांधा प्रकार : (१) धातूची लांब पट्टी, (२) घंटाकृती मुद्रा (डाय), (३) अटक, (४) कडसांधा, (५) नळ किंवा नळी, (६) खेचण यंत्राकडे.

यांत्रिक जोड पद्धत : या पद्धतीत तीन प्रकारांनी धातूच्या पत्र्यापासून किंवा त्याच्या लांब पट्टीपासून त्याच्या लांबीवर वक्राकार वळवून पहिल्या प्रकारात आरोहक सांध्यावर रिव्हेट बंधन [→ रिव्हेट] करून थंड अवस्थेत नळ तयार करतात. दुसऱ्या प्रकारात पत्र्याच्या कडांवर कुलपी खोबणी पाडून दोन्ही कडा थंड अवस्थेत एकमेकींत घट्ट बसवितात. तिसऱ्या प्रकारात पत्र्याची पट्टी भट्टीमध्ये वितळबिंदूच्या तापमानापेक्षा कमी तापमानाला तापवून कडा समोरासमोर आणून यांत्रिक दाबाने घट्ट बसवितात. तसेच तिरकस कडा (काप) कापून एकमेकींवर किंचित चढवून तप्त अवस्थेत दाबून घट्ट बसवितात.

आ.२. यांत्रिक तिरकस कापसांधा प्रकार : (१) अंतर्वक्र लाटा (रोलर्स), (२) आधारदंड, (३) नळ किंवा नळी.

आ. १ मध्ये कडसांधा प्रकार आणि आ. २ मध्ये तिरकस कापसांधा प्रकार दाखविलेले आहेत. या प्रकारांची कल्पना कॉर्नेलिअस व्हाइटहाऊस यांना १८२५ साली प्रथम सुचली.

ओतीव पद्धत: या पद्धतीत धातूंचा रस करून दोन प्रकारांनी नळ बनवितात. या पद्धतीचे जनक रॉबर्ट ब्रूक असून इंग्लंडमध्ये अठराव्या शतकापर्यंत ही वापरीत असत. पहिल्या प्रकारात साचारेतीपासून नळाच्या आकाराचा व मापाचा, लाकडाचा किंवा भाताचा पेंढा वा काथ्या रेतीच्या चिखलाने मढवून तयार केलेला फर्मा वापरून साचा व गाभा बनवितात आणि त्यात रस ओततात. दुसऱ्या प्रकारात दंडगोल पोकळ उष्णतारोधी पदार्थापासून बनविलेला साचा यंत्राने आडवा फिरविताना त्यात रस ओततात. साच्यात अपकेंद्री (केंद्रापासून दूर ढकलणारी) प्रेरणा निर्माण झाल्याने रस साच्याच्या आतील पृष्ठभागावर फेकला जाऊन निवल्यावर जरूर त्या व्यासाची व जाडीची नळी किंवा नळ तयार होतात. अलीकडे दुसऱ्या प्रकाराने लहानमोठ्या व्यासाच्या व जाडीच्या नळांचे उत्पादन करतात [→ ओतकाम].

वितळजोड पद्धत: या पद्धतीत प्रामुख्याने दोन प्रकारांनी नळ किंवा नळ्या तयार करतात : (१) वितळजोड प्रकार आणि (२) विद्युत् रोध दाबजोड प्रकार. वितळजोड प्रकार : मोठाले नळ या प्रकाराने तयार करतात. प्रथम थंड अवस्थेत पत्रा लांबीच्या दिशेत वक्राकार वाकवून त्याच्या कडांना चप (तिरकस काप) मारतात, त्यामुळे दोन्ही कडा समोरासमोर येऊन त्यांत इंग्रजी V अक्षराच्या आकाराचा गाळा निर्माण होतो. हा गाळा विद्युत् स्रोताने किंवा वायुज्वालेने धातुकांडी आणि कडा वितळून रसाने भरून काढतात. त्यामुळे सांध्याचा भाग एकजीव होतो [→ वितळजोडकाम]. काही विशिष्ट कामासाठी (उदा., खनिज तेलाच्या वहनासाठी) नळ्या तयार करताना पत्र्याची पट्टी मळसूत्री किंवा सर्पिल आकारात तिच्या लांबीच्या दिशेत वळवितात आणि वितळजोड प्रकाराने कडा जोडतात. अशा नळ्या दाबाच्या जोराला जास्त टिकतात. तसेच द्रवात चक्री वहनक्रिया होते. भारतात खनिज तेलाच्या वहनासाठी लागणाऱ्या नळ्या या प्रकाराने लोखंड व पोलादनिर्मिती उद्योगांत तयार करतात.


विद्युत् रोध दाबजोड प्रकार: या प्रकारात पोलादी पत्रा किंवा पट्ट (प्लेट) हव्या त्या रुंदीचा व जाडीचा घेऊन प्रथम थंड अवस्थेत यांत्रिक लाटांतून इंग्रजी U अक्षराच्या आकारात वळवितात. नंतर त्याचे अनुशीतन (हळूहळू थंड करण्याची क्रिया) करून पुढच्या यांत्रिक लाटांनी त्याला वर्तुळाकार देतात. अशा प्रकारे बनविलेली प्राथमिक अवस्थेतील नळी दोन अंतर्वक्र लाटांतून नंतर दाबात सारताना दोन्ही कडांच्या भागावर दोन चक्राकार तांब्याची फिरती विद्युत् अग्रे टेकवून विद्युत् रोधाने उष्णता निर्माण करतात. या उष्णतेने कडा वितळून जोड एकजीव होतो [→ वितळजोडकाम].

अखंड पद्धत: या पद्धतीत सांधा किंवा जोड येत नाही म्हणून अशा नळ्यांना सांधा नसलेली वा अखंड नळी म्हणतात. यात तप्त धातूच्या स्तंभापासून बहिःसारण (दाबसारण) पद्धतीने अशी नळी बनवितात. यात दोन प्रकार आहेत : (१) वेधन प्रकार आणि (२) चषकी प्रकार.

वेधन प्रकार: बहिःसारक दाबयंत्राने वेधनक्रिया धातूच्या, विशेषेकरून कार्बनी किंवा मिश्र पोलादाच्या, तप्त भरीव स्तंभात मुद्राकारकाने छिद्रण करून करतात. नंतर तप्त अवस्थेत लाटण किंवा खेचण क्रियेने हव्या त्या मापाच्या नळ्या बनवितात [→ धातुरूपण]. बहिःसारण पद्धतीचा उगम जोसेफ ब्रामा (१७४८–१८१४) यांनी शिशाची नळी बनविण्यासाठी केलेल्या प्रयोगात झाला. या प्रयोगात त्यांनी शिशाचा रस एका पोलादी नळीतून पंपाने निमुळत्या आधार दंडावर रेटला. १८२० साली टॉमस बर यांनी एक दाबयंत्र तयार केले. प्रथम शिशाचा रस एका कोठीत सोडून थिजल्यावर तो द्रवीय रेटकाने वर्तुळाकार गाळा असलेल्या पोलादी मुद्रेतून रेटकाच्या पुढल्या तोंडावर बसविलेल्या आधारदंडावर रेटला आणि नळी तयार केली. १८९१ साली एच्.एरहार्ट यांनी बिडाच्या आरपार गोल गाळा असलेल्या उभ्या ठोकळ्यात धातूचा तप्त स्तंभ ठेवून त्यातून मुद्राकारक दाबाने रेटून पुंगळी बनविली. नंतर खेचण यंत्राने ही तप्त पुंगळी रांगेत बसविलेल्या निरनिराळ्या मापाच्या मुद्रांमधून आतील बाजूस लांब आधारदंड ठेवून लांबविली. अशा प्रकारे बूड असलेली नळी बनविली. याच सुमारास जर्मनीत मॅनेसमान बंधूंनी दोन निमुळत्या फिरत्या लाटांतून तप्त धातुस्तंभ एका वेधनदंडावर सरकवून नळीची जलद उत्पादन पद्धती शोधून काढली. सुरुवातीस दोन्ही लाटांचा आकार मृदंगाप्रमाणे होता आणि त्या विरुद्ध दिशेत फिरवीत. नंतर त्यांत सुधारणा होऊन दोन्ही लाटा निमुळत्या आकाराच्या (शंक्वाकार) करण्यात येऊन त्या एकाच दिशेत फिरविण्यात येऊ लागल्या. या लाटांचा व्यास जवळजवळ एक मी. असून निमुळता कोन १०° चा असतो. निमुळत्या आकारामुळे तप्त स्तंभावर पकड चांगली राहून तो वेधनदंडावर आपोआप हळूहळू पुढे सरकतो. त्यामुळे रेट्याच्या जोराने वेधनक्रिया सतत चालू राहते. नळीच्या आतील व बाहेरील पृष्ठभाग सफाईदार करण्यासाठी नळी दुसऱ्या अंतर्वक्र लाटांतून आतल्या बाजूला आधारदंड सरकवून लाटून काढतात. अशा प्रकारे तयार केलेल्या अखंड कार्बनी व मिश्र पोलादाच्या नळ्या उच्च दाबाला चांगल्या टिकतात. तसेच मिश्र पोलादाच्या नळ्या उच्च तापमानाला चांगल्या टिकतात व धातुभक्षणक्रियेला रोध करतात. आ. ३ मध्ये नळी तयार करण्याची मॅनेसमान पद्धत दाखविली आहे. कमी जाडीच्या नळ्या बनविण्यासाठी प्राथमिक अवस्थेतील नळ्या थंड अवस्थेत वर्तुळाकार गाळा असलेल्या मुद्रेतून वंगण पुरवून ओढून काढतात.

आ.३. नळीच्या निर्मितीची मॅनेसमान पद्धत : (१) शंक्वाकार लाट, (२) वेधनदंड, (३) धातूचा भरीव स्तंभ, (४) नळीची प्राथमिक अवस्था.

चषकी प्रकार: या प्रकारात धातूचा वर्तुळाकार पट्ट तप्त अवस्थेत पोलादी मुद्राकारकाने वर्तुळाकार गाळ्याच्या मुद्रेत यांत्रिक दाबाने रेटतात व प्रथम पंचपात्राच्या आकाराप्रमाणे चषक बनवितात. नंतर तप्त अवस्थेतील चषक क्रमाक्रमाने निरनिराळ्या मापांच्या अनेक मुद्रांतून रेटून हव्या त्या व्यासाची व जाडीची नळी बनवितात. नंतर बुडाचा भाग कापून टाकतात. ज्या वेळेस नळी अचूक सूक्ष्म मापाची व आतून बाहेरून गुळगुळीत व चकचकीत हवी असेल, त्या वेळेस थंड अवस्थेत दाबसारणक्रिया करतात. अशा नळ्या वाहने, फर्निचर व यंत्रे यांच्या रचनेत वापरतात.

उपयोग: धातूंच्या नळ व नळ्यांचा उपयोग मुख्यत्वे द्रव, वाफ, हवा व वायू यांच्या वहनासाठी केला जातो. क्वचित काही घन पदार्थ चूर्ण स्वरूपात वाहून नेण्यासाठी नळ वापरतात. तसेच नळ्यांचा उपयोग अनेक रचनात्मक कामांत व फर्निचर, सायकली व इतर वाहने तयार करण्यासाठी केला जातो. कमी दाबाला टिकणाऱ्या नळ्या कार्बनी पोलादाच्या किंवा लोहेतर धातूंच्या करतात. उच्च दाबाला व तापमानाला टिकण्यासाठी व अम्ल, क्षार (अल्कली), वायू व पाणी या पदार्थांनी धातूचे भक्षण होऊ नये यासाठी मिश्र पोलादाच्या नळ्या वापरतात. अशा नळ्यांतून द्रव व वायुरूप खनिज तेलजन्य पदार्थ, तेल, वाफ, रसायने, द्रव अमोनिया, पेये, मद्य, दूध, रंग वगैरेंचे वहन केले जाते. कार्बनी पोलादाच्या नळ्या फर्निचर व रचनात्मक कामासाठी वापरतात. बिडाचे नळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वापरतात. ॲल्युमिनियम व ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूंच्या नळ्या विमानबांधणीत वापरतात. जस्त व तांब्यापितळेच्या नळ्यांचा उपयोग वातानुकूलन व प्रशीतन यंत्रणेत होतो. संपीडित (दाबयुक्त) हवेच्या वहनासाठीही यांचा उपयोग करतात. शिशाच्या नळ्या द्रव रसायनांच्या वहनासाठी वापरतात. धक्काशोषक म्हणूनही या नळ्यांचा उपयोग होतो. कथिलाच्या नळ्या द्रव खाद्यपदार्थाच्या वहनासाठी वापरतात. पोलादाच्या नळ्या संघनक (बाष्पाचे द्रवात रूपांतर करणाऱ्या साधनात) व उष्णताविनिमयक साधनात वापरतात. मृदू पोलादाच्या नळ्या विद्युत् संवाहक तारांच्या संरक्षणासाठीही वापरतात. कार्बनी पोलादाच्या नळ्या आणि बी प्रतवारीच्या तयार करतात. प्रतीची नळी थंड अवस्थेत सुलभपणे हवी तशी कुंडलाकारही वळविता येते. बी प्रतीची नळी जास्त बलाला टिकते पण तीत तंतुक्षमता कमी असते. नळ्या निरनिराळ्या जोडसाधनांनी जोडण्यासाठी त्यांच्या दोन्ही टोकांवर आटे पाडलेले असतात. पिण्याचे पाणी वाहून नेणाऱ्या शुद्ध लोखंडाच्या नळ्या गंजू नयेत म्हणून त्यांच्या आतील बाहेरील पृष्ठभागांवर जस्ताचा मुलामा देतात. शरीरात अंतःक्षेपण (इंजेक्शन) करण्यासाठी वापरण्यात येणारी सुई ही अगंज (स्टेनलेस) पोलादाची नळीच असते.


अधातूंचे नळ व नळ्या: लाकडी नळ : लाकडाच्या अरुंद पट्ट्या त्याच्या कडांवर जोडून वर्तुळाकार रचना तयार करतात व तिच्या बाह्य अंगावर धातूची १२ ते २५ मिमी. रुंदीची कडी घट्ट बसवितात. लाकडात रासायनिक क्रिओसोट द्रव दाबाखाली भिनविल्याने असे लाकूड कुजत नाही अथवा त्याला कीडही लागत नाही. ज्या ठिकाणी लाकूड मुबलक उपलब्ध असते अशा ठिकाणी लाकडी नळ ज्या जागेवर बसवावयाचे त्या जागीच तयार करतात. अशा नळांचे व्यास १५ सेंमी. पासून ६ मी. पर्यंत असू शकतात. प्लायवुडपासून ६ सेंमी. व्यास व ३·५ मी. लांबीचे नळ तयार करतात. तसेच लाकडी भुसा चिकट द्रवात मिसळून, दाबून त्याच्या लाकडी नळ्या बनवितात. असे लाकडी नळ पाणीपुरवठा, सांडपाण्याचा निचरा, शेतीला पाणी पुरविणे, खाणकाम वगैरेंसाठी वापरतात. थंड, गरम किंवा क्षार व अम्लयुक्त पाण्याच्या वहनासाठी लाकडी नळांचा विशेष उपयोग होतो.

चिनी मातीचे नळ: चिनी माती ही चिकट असून उष्णतारोधी असते. ७ सेंमी. पासून १ मी. व्यासापर्यंत चिनी मातीचे नळ तयार होऊ शकतात. १० मिमी. ते ५० मिमी. व्यासापर्यंतच्या नळ्या उष्णतारोधी व विद्युत् निरोधक कामासाठी बनवितात. चिनी मातीचा ओला गोळा बहिःसारण क्रियेने मुद्राकारकाने मुद्रेत रेटून लांब नळी तयार करतात. नंतर हव्या त्या लांबीचे तुकडे करून एक तोंड विस्फारित करतात. मग असे नळ भट्टीत भाजतात. भाजताना भट्टीच्या भोकांतून मीठ टाकतात. त्याचे बाष्प होऊन चिनी मातीतील सिलिकेत मिसळते. त्यामुळे नळाच्या आतील व बाहेरील पृष्ठभाग गुळगुळीत होऊन त्यावर काचेसारखी चकाकी येते. सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी या नळांचा उपयोग करतात. एका नळाच्या विस्फारित तोंडात दुसऱ्या नळाच्या टोकाचा भाग बसवून जोडकाम करतात.

काँक्रीटचे नळ: दगडाची कच, रेती व सिमेंट यांच्या मिश्रणापासून तयार केलेले नळ सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी वापरतात कारण सांडपाण्याला विशेष दाब नसतो. असे मिश्रण अपकेंद्री प्रेरणेने वक्राकार पोलादी जाळीवर हव्या त्या जाडीचे चढवून एका यांत्रिक फिरत्या साच्यात प्रबलित काँक्रीटचा नळ बनवितात. या नळाच्या एका तोंडावर पोलादी कड्याची कड व दुसऱ्या तोंडावर वर्तुळाकार खोबण असते. अशा नळातून मध्यम दाबाने पाणीपुरवठा करतात. काँक्रीटचे नळ १० सेंमी. पासून २ मी. व्यासापर्यंत असू शकतात. जलसेतूकरिता (ॲक्विडक्टकरिता) या नळांचा उपयोग करतात कारण ते दाबाच्या जोराला उत्तम टिकतात.

सिमेंट ॲस्बेस्टसचे नळ: यूरोपमध्ये प्रथम सिमेंट व ⇨ ॲस्बेस्टस तंतू एकत्र मिसळून नळ तयार करण्यास सुरुवात झाली. हे जाडीला कमी असले करी उत्तम टिकतात. त्यांचा व्यास ७ सेंमी. पासून १ मी. पर्यंत असून लांबी अंदाजे ४ मी. असते. हे भक्षणरोधी असून त्याचा उपयोग वायू व सांडपाणी यांच्या वहनासाठी करतात. जोडकामासाठी यांच्या एका टोकास अंगचेच विस्फारित तोंड ठेवतात.

प्लॅस्टिकच्या नळ्या व नळ: निरनिराळ्या प्रकारच्या प्लॅस्टिकांपासून विशेषकरून पॉलिथिलिनापासून (पॉलिएथिलिनापासून) ज्या नळ्या किंवा नळ बनवितात ते लवचिक, वजनाला हलके, भक्षणरोधी असून स्वस्त पडतात. कारण हे नळ किंवा नळ्या जोडण्याचा आणि जागी बसविण्याचा खर्च खूपच कमी येतो. प्लॅस्टिकच्या चूर्णाला उष्णता देऊन बहिःसारण पद्धतीने यंत्रावर नळ व नळ्यांचे उत्पादन केले जाते. ६ मिमी. पासून १५ सेंमी. व्यासाच्या अशा नळ्या वा नळ तयार केले जातात. त्यांचा उपयोग सांडपाणी, द्रव रसायने, शेती किंवा बागेसाठी पाणी वाहून नेण्याकरिता करतात. ४८°–९३° से. तापमानाला ते टिकू शकतात. पी. व्ही. सी. (पॉलिव्हिनिल क्लोराइड), पॉलिॲसिटल आणि पॉलिप्रोपिलीन या प्लॅस्टिकांपासूनही नळ व नळ्या तयार करतात.

कॅनव्हास व रबरी नळ्या: या नळ्या लवचिक असून त्यांची गुंडाळी करून ठेवता येते. रबरमिश्रित कापसाच्या धाग्यांनी विणून तयार केलेल्या नळीला कॅनव्हास होज म्हणतात. आटे पाडलेल्या पितळी युग्मकाने या जोडता येतात. यांचा उपयोग आग विझविण्यासाठी लागणाऱ्या दाबयुक्त पाण्याच्या वहनासाठी करतात. नुसत्या रबरी नळ्या दाबयुक्त हवा किंवा पाणी यांच्या वहनासाठी वापरतात.

काचेच्या नळ्या: काच तप्त अवस्थेत असतानाच पूर्वी फुंकनळीने तिच्यापासून नळ्या बनवीत असत. आता अशा नळ्या स्वयंचलित यंत्राने बनवितात [→ काच]. या नळ्यांचा उपयोग प्रयोगशाळेतील निरनिराळ्या उपकरणांत वाफ, पाणी, द्रव रसायने, पारा व वायू यांच्या वहनासाठी करतात. काचतंतू दाबून त्यांच्यापासूनही नळ्या तयार करतात.

आ.४. धातूचा होज : (१) नळी, (२) पन्हळी चुण्या, (३) धातूच्या तारेचे किंवा फितीचे विणकाम.

धातूचे होज व लवचिक नळ्या: कॅनव्हास होजप्रमाणे धातूचेही होज बनवितात परंतु त्यांचा उपयोग कलत्या भट्ट्यांना इंधन तेल पुरविण्यासाठी तसेच एंजिनातील तप्त वायूच्या निष्कासासाठी (बाहेर टाकण्यासाठी), एंजिनाला वाफ पुरविण्यासाठी, यंत्रातील वहनाचे हादरणारे भाग जोडण्यासाठी करतात. अशा नळ्या मृदू पोलाद, पितळ, ॲल्युमिनियम किंवा तांबे या धातूंपासून तयार करतात.

आ. ४ मध्ये दाखविलेली नळी धातूच्या पत्र्याच्या पट्टीवर लांबीच्या दिशेत वर्तुळाकार किंवा मळसूत्री (सर्पिल) पन्हळी चुण्या पाडून तयार करतात व बाहेरील पृष्ठभागावर धातूच्या तारेचे विणकाम करून लवचिकता आणतात, तसेच अशा नळ्यांतील द्रव गळण्याचा संभवही कमी होतो.

धातूची लवचिक नळी पत्र्याची अरुंद पट्टी लांबीच्या दिशेत मळसूत्री मार्गाप्रमाणे कुंडलाकृती वळवून अशी कुंडले एकमेकांत यांत्रिक पद्धतीने गुंतवून तयार करतात. तिचा उपयोग विद्युत् संवाहक तारांवर संरक्षक चिलखत म्हणून करतात.

विलेपित नळ व नळ्या: धातूच्या काही नळ्यांना आतल्या किंवा बाहेरच्या अथवा दोन्ही पृष्ठभागांवर जस्त किंवा कथिल धातूचे विलेपन करतात. त्यामुळे त्या गंजत नाहीत. तसेच काही पोलादाच्या नळांच्या आतल्या बाजूवर उष्णतारोधी पदार्थांचा किंवा प्लॅस्टिकचा, डांबराचा अथवा रबराचा लेप देतात. त्यामुळे त्यांच्यात भक्षणरोधकता येते व उष्णतारोधी लेपाने ते उच्च तापमानाच्या द्रवांच्या वहनासाठी उपयुक्त ठरतात. दूरध्वनी तारांसाठी पोलादी जस्तविलेपित पत्र्यापासून रिव्हेट बंधन केलेले नळ खांब म्हणून वापरतात. टरबाइन व इंधन भट्ट्यांच्या ज्वालकासाठी धातूच्या आखूड निमुळत्या नळ्या वापरतात, त्यांना प्रोथ म्हणतात व त्या एका विशिष्ट प्रकारच्या दाबयंत्राने तयार करतात. आग विझविण्यासाठी होजमधील पाण्याचा झोत लांबवर उडावा म्हणून तांब्यापितळेच्या निमुळत्या नळ्या वापरतात. औद्योगिक कारखान्यांत बसविलेल्या नळ्यांतून कोणत्या प्रकारच्या पदार्थाचे वहन केले जाते ते बाहेरून ओळखण्यासाठी खूण म्हणून विशिष्ट रंग दिलेले असतात. उदा., आगप्रतिबंधक जलवाहिन्यांसाठी लाल, ज्वालाग्राही किंवा विषारी पदार्थ वाहिन्यांसाठी पिवळा किंवा नारिंगी, सुरक्षित पदार्थांच्या वाहिन्यांकरिता हिरवा, संरक्षित पदार्थ वाहिन्यांसाठी गडद निळा, मौल्यवान पदार्थ वाहिन्यांकरिता गडद जांभळा. याची संहिता ठरविण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहिन्यांचा नकाशा बघण्यास जो वेळ लागतो तो वाचतो.


भारतीय उद्योग: भारतात दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळापर्यंत ओतीव व वितळजोड पद्धतींनी लोखंडी आणि पोलादी नळांचे उत्पादन होत असे. त्यानंतरच्या काळात धातूच्या नळ्यांचे व नळांचे सुविकसित उत्पादन होऊ लागले. विद्युत् रोध दाबजोड व विद्युत् स्रोत वितळजोड या आधुनिक पद्धतींनी उत्पादन करण्यावर भर देण्यात येऊ लागला. १९६२-६३ साली भारतातून दहा लाख रु. किंमतीच्या नळ व नळ्यांची निर्यात झाली, तर १९७३-७४ मध्ये ती २६ लाखाच्या वर गेली. त्यामुळे जवळजवळ ३–५ कोटी रुपयांचे परकी चलन उपलब्ध झाले. १९७५ मध्ये भारतातून ४६ देशांना नळ व नळ्या निर्यात करण्यात आल्या व त्यांत ब्रिटन, स्वीडन, प. जर्मनी, कॅनडा यांसारखे प्रगत देशही आहेत. प. आशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा इ. बाजारपेठांतून भारतीय नळ्यांना मोठी मागणी आहे. १९७५ साली साध्या व जस्तविलेपित पोलादी नळ्यांचे उत्पादन करणारे १४ कारखाने खाजगी क्षेत्रात होते. आधुनिक पद्धतींनी पोलादी अखंड नळ्यांचे उत्पादन करणाऱ्या खाजगी क्षेत्रातील पाच कारखान्यांचे उत्पादन १९७५ साली ३६,००० टन होते. रेतीसाचा व परिवलित पद्धतींनी तयार केलेल्या नळांना परदेशांत जास्त मागणी असून खाजगी क्षेत्रातील आठ व सरकारी क्षेत्रातील एक असे नऊ कारखाने अशा नळांचे उत्पादन करीत आहेत. देशातील खनिज तेल व नैसर्गिक वायू प्रकल्पांमध्ये भारतात तयार झालेल्या नळ व नळ्यांचा वापर होत आहे. काही विशिष्ट कामासाठी लागणाऱ्या धातुनळ्या मात्र अद्यापही आयात कराव्या लागतात. हैदराबाद येथे ३६ कोटी रु. भांडवलाचा अखंड नळ्या तयार करण्याचा कारखाना उभारलेला असून १९७७ अखेर तेथील अगंज पोलादी नळ्यांच्या निर्मितीचे लक्ष्य २,००० टन होते. हा कारखाना भारतीय अणुऊर्जा आयोगाच्या अणुकेंद्रीय इंधन विभागातर्फे उभारण्यात येत आहे. १९७६-७७ मध्ये भारतातून सु. ४५ ते ५० कोटी रु. किंमतीच्या पोलादी नळ व नळ्यांची निर्यात झाली.

पहा : नळकाम.

संदर्भ : 1. Baumeister, T. Marks, L. S., Eds. Standard Handbook for Mechanical Engineers, New York, 1967.

           2. Crocker, S. King, R. C., Eds. Piping Handbook, New York, 1967.

           3. Littleton, C. T. Industrial Piping, New York, 1962.

कोरगावकर, दी. कृ. ओक, वा. रा. दीक्षित, चं. ग.