तरफ : टेकू असलेला आणि प्रेरणा (जोर) व भार (वजन किंवा रोध) ज्याच्यावर कार्यकारी असतात असा सरळ वा असरल दांडा. तरफेच्या उपयोगाने आपणास कोणत्या तरी रूपाने यांत्रिक लाभ [(भार ÷ प्रेरणा) &gt १]  करून घेता येतो म्हणजे उदा., मोठे वजन त्यापेक्षा कमी जोराने उचलता येते. या दृष्टीने तरफ ही एक साधे यंत्रच आहे. [⟶ साधी यंत्रे] आणि भौतिकीत व यामिकीत (पदार्थांवर होणारी प्रेरणांची क्रिया आणि त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात) ती तशी मानलीही गेली आहे. तरफ ही साध्या यंत्रांपैकी सर्वांत जुनी असून ईजिप्तमधील ५,००० वर्षांपूर्वीच्या शिल्पाकृतींत ती आढळते.

आ. १. तरफांचे वर्ग : (अ) पहिला वर्ग, (आ) दुसरा वर्ग, (इ) तिसरा वर्ग (मापे मिमी.मध्ये).

तरफांचे वर्ग : टेकू (), प्रेरणा (प्र) व भार () यांच्या दांड्यावरील सापेक्ष स्थानांनुसार तरफांचे तीन वर्ग केलेले आहेत आणि त्यांना पहिला, दुसरा व तिसरा वर्ग असेच म्हणतात. हे तीन वर्ग आ. १ मध्ये दाखविले आहेत. पहिल्या वर्गाच्या तरफेत आणि प्र यांच्या मध्ये आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गांत डाव्या टोकाला आहे. दुसऱ्यात च्या जागी आणि तिसऱ्यात प्र च्या जागी सरकला आहे. चे मूल्य दिलेले असेल, समजा १०० किग्रॅ., तर प्र चे मूल्य काढण्यासाठी परिबलांचे तत्त्व वापरता येते (एखाद्या प्रेरणेचे एखाद्या बिंदूभोवतीचे परिबल म्हणजे ती प्रेरणा व त्या प्रेरणेच्या क्रियारेषेपासून त्या बिंदूचे लंबांतर यांचा गुणाकार होय). या तत्त्वानुसार ‘वस्तु समतोलात असता तिच्यावरील फलित परिबल शून्य असते’, तेव्हा :

प्र X (भुजा) ८० =  व X (भुजा) २०                         = १०० X २०    ...  प्र  =  २५ किग्रॅ. (पहिला वर्ग)

आ. २. पहिल्या वर्गच्या तरफांची उदाहरणे : (अ) पहारीने वजन उचलणे, (आ) हातरहाट, (इ) कप्पी.प्र X १०० = व X २०               = १०० X २०             ...  प्र  =  २० किग्रॅ. (दुसरा वर्ग)

प्र X २०   = व X १००            = १०० × १००             ...  प्र = ५०० किग्रॅ. (तिसरा वर्ग) 

या समीकरणांवरून प्र ची मूल्ये मिळतात. पहिल्या व दुसऱ्या वर्गात यांत्रिक लाभ अनुक्रमे ४ व ५ आहे पण तिसऱ्या वर्गात तो ऋण (–) ५ आहे.

उदाहरणे व उपयोग : पहिल्या वर्गाच्या तरफेची उदाहरणे म्हणजे वजन उचलून धरण्यासाठी वापरतानाची पहार [आ. २ (अ)], विहिरीवरील हातरहाट, कप्पी, लहान मुलांचा सी–सॉ ही नेहमीच्या परिचयातील होत. पहारीने वजन उचलताना वजनाची भुजा अगदी आखूड व प्रेरणेची लांब ठेवता येते व त्यामुळे यांत्रिक लाभ मोठा होतो. हातरहाटात [आ. २ (आ)] वजन व प्रेरणा यांच्या भुजांत थोडासा फरक असतो आणि त्यामुळे वजनापेक्षा जोर थोडासाच कमी असतो, तरी पण यांत्रिक लाभ धनच म्हणजे एकापेक्षा अधिक असतो. कप्पीत [(आ. २ (इ)]  दोन्ही भुजा (कप्पीची त्रिज्या) सारख्याच असतात व यांत्रिक लाभ एकच असतो म्हणजे प्रेरणा वजनाइतकीच असते. तथापि यात लावावयाच्या प्रेरणेची दिशा कप्पी अथवा रहाट यांमुळे बदलत असल्याने वजन उचलण्यास सुलभ पडते.

दुसऱ्या वर्गात टेकू व प्रेरणा ही टोकांना जातात आणि वजन त्यांच्यामध्ये असते, प्रेरणेची भुजा सबंध तरफेची लांबीच झाल्याने प्रेरणेचे मूल्य कमी होऊन यांत्रिक लाभ वाढतो. रेल्वे फलाटावरील सामान नेण्याची दुचाकी ढकलगाडी (आ. ३), सुपारी कातरण्याचा आडकित्ता ही दुसऱ्या वर्गाची उदाहरणे आहेत.

आ. ३. दुसऱ्या वर्गाच्या तरफेचे उदाहरण : सामानाची दुचाकी ढकलगाडी

तिसऱ्या वर्गाच्या तरफेत यांत्रिक लाभ ऋण असतो व प्रेरणा वजनापेक्षा जास्त असते. वरील उदाहरणात वजन १०० तर प्रेरणा ५०० किग्रॅ. होईल. व्यवहारात या वर्गाची तरफ लहानसे वजन पण मोठ्या अंतरातून हालविण्यासाठी वापरतात. वजन जरी मोठ्या अंतरातून सरकते, तरी मोठी प्रेरणा बऱ्याच लहान अंतरातून जाते. पातळ लोखंडी पट्टी वाकवून केलेला निखारे उचलायचा चिमटा या वर्गातीलच तरफेचा प्रकार आहे.

आ. ४. संयुक्त तरफ: (अ) पहिल्या वर्गाच्या तीन जोडून, (आ) पहिल्या वर्गाची एक व दुसऱ्या वर्गाची एक अशा दोन जोडून, (मापे मिमी. मध्ये).असरल तरफ : काही वेळा प्रेरणा व रोध यांच्या कार्यरेषा एकमेकींना छेदतात. अशा वेळी तरफ वाकविली, उदा., इंग्रजी एल (L) च्या आकाराची केली, तर काम होते. तरफेच्या दोन भागांतील समाविष्ट कोन कसाही असला, तरी चालू शकते तो काटकोनच हवा असे नाही.

संयुक्त तरफ : अनेक तरफा एकीला एक जोडल्या की, त्यांची संयुक्त तरफ बनते. आ. ४ (अ) मध्ये आ. १ मधील पहिल्या वर्गाच्या तीन तरफा जोडून एक संयुक्त तरफ बनविली आहे. प्रत्येक तरफेतील भुजांचे गुणोत्तर १ : ४ असे ठेवले, तर एकूण यांत्रिक लाभ ४ X ४ X ४ = ६४ होईल व १२८ किग्रॅ. वजन उचलायला फक्त २ किग्रॅ. जोर लागेल. आ. ४ (आ) मध्ये पहिली तरफ पहिल्या वर्गाची आणि दुसरी दुसऱ्या वर्गाची ठेवली आहे. येथे यांत्रिक लाभ ४ X ५ = २० होईल. आ. ४ मध्ये प्रेरणा व वजन यांच्या स्थानांची अदलाबदल केली, तर नवी प्रेरणा थोडीशीच सरकावून नवे वजन मोठ्या अंतरातून सरकविता येईल. वस्तूचे वजन करावयाच्या मंच काट्यात थोड्या जागेत संयुक्त तरफा वापरून मोठा यांत्रिक लाभ मिळवतात. याउलट टंकलेखन यंत्रात बोट थोड्याच अंतरातून हालते, तर टंक त्याच्या किती तरी पट अंतरातून प्रवास करतो.

ओक, वा. रा.