हवा गाळणी :अनुकूल हवा निर्माण करण्यासाठी ज्या अभि-यांत्रिकीय संयंत्रांचा उपयोग करतात, त्याला हवा गाळणी असे म्हणतात. विशिष्ट प्रकारच्या उद्योगात निर्माण केला जाणारा माल अत्यंत विशुद्ध असावा लागतो वा काही बाबतींत तो अत्यंत काटेकोर असणे आवश्यक असते. उदा., अवकाशयानांत कार्य करणाऱ्या लोकांसाठी आवश्यक अन्ननिर्मिती करणारे कारखाने, दूध वा कॉफीची भुकटी निर्माण करणारे कारखाने आणि अन्नप्रक्रिया उद्योगात जेथे प्रत्यक्ष वस्तू निर्माण होते तेथे कार्यपरिसरातील वातावरण अत्यंत विशुद्ध असणे आवश्यक असते. तसेच विविध इलेक्ट्रॉनीय उपकरणांत वापरात येणारे मायक्रोचिप्स निर्माण करणारे कारखाने, उच्च संवेदनशील शास्त्रीय उपकरणे निर्माण करणारे कारखाने अशा ठिकाणी जेथे प्रत्यक्ष वस्तू निर्माण होते त्या विभागातही वातावरण अत्यंत विशुद्ध असणे अत्यावश्यक असते, तरच त्या ठिकाणी निर्माण केला जाणारा माल योग्य त्या अपेक्षित दर्जाचा तयार केला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या उद्योगात कार्यपरिसर अनुकूल असावा लागतो. त्यासाठी विशिष्ट अशा कारखान्यांचे उत्पादन विभाग अत्यंत स्वच्छ असावे लागतात. शिवाय हवा जवळपास पूर्णतः कोरडी (दमटपणाचा अंशही नसलेली) असावी लागते. हवेमध्ये धूळ, धूर वा कोणताही सूक्ष्म जड पदार्थ, वस्तू वा कीटक असता कामा नये, असा दंडक असतो. मात्र, इतक्या सर्व बाबी काटेकोरपणे पूर्णतः पूर्ण करू शकेल अशी हवा जगात कुठेही उपलब्ध होत नाही.

 

हवा गाळणीचा मुख्य उद्देश हवेतील घन वस्तूच्या कणांचे प्रमाण उत्पादन प्रक्रियेला अनुकूल प्रमाणात कमी करणे हा असतो. मानवी डोळ्याला दिसणाऱ्या घन वस्तूच्या कणांचा आकार २० मायक्रोमीटर ( म्यूमी.) इतका असतो. त्याहून अधिक लहान व्यासाचा घन कण डोळ्याने पाहता येत नाही इतका सूक्ष्म असतो. हवा गाळणीमुळे डोळ्याने न पाहता येणारे सूक्ष्म घन कण ज्यांचा व्यास ०.०१ म्यूमी. इतका असतो ते देखील बाजूला काढले जातात. हे सूक्ष्म घन कण हवेच्या झोतातून हवेबरोबर कारखान्याच्या उत्पादन विभागापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा प्रकारे उत्पादन विभागांतर्गत हवा अत्यंत विशुद्ध राखण्याचे कार्य हवा गाळणीच्या यंत्रणेमुळे होते. हवा गाळणीचे गरजेनुसार बरेच प्रकार उपलब्ध असले,तरी प्रामुख्याने पुढील तीन प्रकारच्या हवा गाळणी यंत्रणा जास्त प्रमाणात वापरात येतात : (१) श्यानता आघात गाळणी (व्हिस्कस इम्पिजमेंट फिल्टर), (२) कोरडी गाळणी (ड्राय फिल्टर) व (३) इलेक्ट्रॉनीय हवा स्वच्छक (इलेक्ट्रॉनिक एअर क्लिनर्स ). या तिन्ही प्रकारच्या हवा गाळणींचे कार्य स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असते.

 

श्यानता आघात गाळणी : या गाळणीमध्ये काचतंतूंचा, धातूच्या पातळ चादरींचा वा जाळीचा स्वैर उपयोग करतात. या पदार्थांपासून केलेल्या पडद्यांवर एक प्रकारच्या चिकट आसंजक पदार्थाचा पातळ थर देतात. थर दिलेले काही पातळ पडदे पोलादी टाकीमध्ये अशा रीतीने लोंबकळत ठेवलेले असतात की, त्या पडद्यांच्या पृष्ठावर टाकीत येणाऱ्या वेगवान हवेचा झोत आदळताच हवेच्या जोरदार आघाताने हे लोंबकळणारे पडदे स्वतःभोवती फिरत राहून स्वतःची दिशा बदलतात. पातळ पडद्यांच्या या सततच्या दिशा बदलामुळे हवेच्या झोतातील सर्व अवांछित घन पदार्थ पातळ पडद्यांवरील चिकट आसंजी पदार्थांवर चिकटून घट्ट बसतात आणि कोणताही घन पदार्थ नसलेली विशुद्ध हवा पुढे कोष्ठाकडे जाते. या प्रक्रियेमध्ये हवेच्या झोतातील घन पदार्थ पातळ पडद्यांवर चिकटून बसत असल्याने ठराविक काळाने हे पातळ पडदे टाकीबाहेर काढून स्वच्छकरून त्यांवर चिकट आसंजक पदार्थाचा थर नव्याने द्यावा लागतो वा ते बदलावे लागतात. काचतंतूंच्या चादरींचा पुनर्वापर करता येत नाही. आधुनिक प्रकारच्या श्यानता आघात गाळणींमध्ये– ज्या स्वयंचलित असतात– काचतंतूंच्या चादरींचे रूळ वापरतात किंवा धातूच्या पातळ चादरींचे पट्टे चल स्वरूपात वापरतात. सदर गाळणी हवेच्या झोताच्या वेगानुसार कमी वा अधिक शक्तीच्या असतात.

 

कोरडी गाळणी : कोरड्या गाळणीचे निरनिराळ्या गरजांनुसार विभिन्न अभिकल्पांचे लहान-मोठे असे कित्येक प्रकार बाजारात तयार करून मिळतात. कोरड्या गाळणीमध्ये हवा गाळण्याचे (हवेच्या झोतातील अवांछित घन पदार्थ शोषून घेण्याचे) कार्य करण्यासाठी प्रामुख्याने काचतंतूंचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात असला, तरी कित्येक वेळा सेल्युलोज कागद, कापूस, पॉलीयुरेथेन वा तत्सम अन्य संश्लेषित पदार्थांचा देखील उपयोग केला जातो. काचतंतूंचा मोठ्या प्रमाणात उपयोग होण्याची कारणे म्हणजे एकतर हा पदार्थ अन्य पदार्थांपेक्षा बऱ्याच प्रमाणात स्वस्त असतो. तसेच काचतंतूंच्या जाळीदार स्वाभाविक अशा रचनेमुळे सूक्ष्म आकाराचे अवांछित घन पदार्थ देखील हवेच्या झोताच्या दाबामुळे काचतंतूंच्या जाळीमध्ये सहजपणे अडकून पुढे जाणारी हवा – कोष्ठाकडे जाणारी अनुकूल हवा – चांगल्यापैकी शुद्ध असते. कोरड्या गाळणीत वापरल्या जाणाऱ्या काचतंतू जाळीला कोणत्याही प्रकारचे चिकट आसंजक पदार्थ न लावता काम होऊ शकते. हवेचा झोत काचतंतूंवर जोराने आघात करताच हवेचे विसरण होते. त्यामुळे हवा काचतंतूंच्या छिद्रांत यदृच्छ घुसून हवेतील घन कण सच्छिद्र काचतंतूंमध्ये अडकतात. कोरड्या गाळणीची यंत्रणा श्यानता आघात गाळणी यंत्रणेच्या तुलनेत अधिक सुटसुटीत, आटोपशीर असल्याने अधिक स्वस्त व अधिक लोकप्रिय झाली आहे.

 

इलेक्ट्रॉनीय हवा स्वच्छक : ज्या उद्योगांमध्ये अत्युच्च विशुद्ध हवा असणे गरजेचे असते तेथे हे स्वच्छक वापरले जातात. हवा गाळणीच्या या प्रकारामध्ये हवेचा झोत आयनीकरण झालेल्या क्षेत्रातून उत्सर्जित केला जातो, तेथून पुढे ॲल्युमिनियमाच्या पातळ चादरींमधून अनुकूल हवा कोष्ठात पाठविली जाते. ॲल्युमिनियमाच्या पातळ चादरीवर जलविद्राव्य (पाण्यात विरघळणाऱ्या) पदार्थाचा थर चढविलेला असतो. या जलविद्राव्य पदार्थाच्या थरावर अवांछित घन कण चिकटून राहत असल्याने ठराविक काळाने ॲल्युमिनियमाच्या पातळ चादरी स्वच्छ करणे अगत्याचे असते.

भिडे, शं. गो.