घनद्रव्य पंप : सिलिंडरात किंवा तशाच उभट बंदिस्त भांड्यात येणारा तुकड्यातुकड्यांचा किंवा धान्यासारखा दाणेदार राशीमाल वर चढविण्यासाठी उपयोगी पडणारा पंप. द्रव किंवा वायूंसाठी पंप असतात तसाच हा घनांसाठी आहे. द्रवांसाठी जसे स्पष्ट विस्थापन (उदा., दट्ट्याचे) व चक्रीय गतिक (उदा., अपमध्य म्हणजे पदार्थ मध्यपासून दूर ढकलणारा) अशा दोन जातींचे पंप असतात त्याचप्रमाणे  घनद्रव्यांसाठीही दोन जातींचे पंप आहेत. यातील पहिल्या जातीचे कोळसा, कोक वगैरेंचे जरा मोठाले खडे वर नेण्यासाठी आणि दुसऱ्या जातीचे धान्यासारखे पदार्थ वर नेण्यासाठी वापरतात. घनद्रव्य पंपाची कल्पना चटकन न येणारी अशी असल्याने काही उदाहरणांवरूनच त्याची रचना व कार्य स्पष्ट केली आहेत. पहिल्या जातीच्या पंपाचा एक प्रकार आ. १ मध्ये दाखविला आहे. आ. १ (अ) मध्ये दाखविलेल्या स्थितीत पंपातील (४) हा दट्ट्या वर सरकत आहे आणि दट्ट्यावर पडलेला घन माल (२) या मार्गाने बाहेर ढकलला जात आहे. पंपाच्या

आ. १. द्रवीय शक्तीने चालणारा स्पष्ट विस्थापन जातीचा घनद्रव्य पंप. (अ) पंपातून घन मालाचे निष्कासन, (आ) पंपामध्ये घन मालाचे भरण : (१) पंपाच्या सिलिंडरात घनद्रव्य पडण्याचा मार्ग, (२) पंपातील घनद्रव्य पंपातून बाहेर पडण्याचा मार्ग, (३) पंपाचा सिलिंडर, (४) पंपातील दट्ट्या, (५) सबंध पंप वळविण्याची आधार खीळ, (६) दट्ट्या वर सरकविण्याचा द्रवीय सिलिंडर, (७) पंप वळविण्याचा द्रवीय सिलिंडर, (८) प्रवेश झडप, (९) निष्कास झडप.

सिलिंडरात दट्ट्या अगदी वर आला म्हणजे राशीमालाचे निष्कासन (बाहेर टाकण्याची क्रिया) थांबते, सबंध सिलिंडर (५) या खिळीभोवती फिरविला जातो आणि सिलिंडराचे तोंड आ. १ (आ) मध्ये दाखविल्याप्रमाणे (१) या मार्गासमोर येते. या स्थितीत सिलिंडरामध्ये घन माल गुरुत्वानेच भरला जातो. या वेळी दट्ट्या अगदी खाली गेलेला असतो. नंतर सबंध पंप पुन्हा फिरवून आ. १ (अ) मध्ये दाखविलेल्या स्थितीत आणतात आणि दट्ट्या वर सरकू लागतो. दट्ट्या वर सरकविण्यासाठी (६) हा स्वतंत्र द्रवीय सिलिंडर आहे.

मोठ्या आकाराच्या रासायनिक विक्रियक पात्रामधून अशा पंपाने घनद्रव्य वर सरकविले जात असतानाच विशिष्ट तापमान राखून ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन ] आणि ⇨ क्षपण  या दोन्ही क्रिया एकाच वेळी (पण निरनिराळ्या ठिकाणी) साधता येतात व निरुपयोगी होणारे घनद्रव्य पात्राच्या बाहेर टाकता येते. असे पंप तेलयुक्त शेलाचे (एक प्रकारच्या गाळाच्या खडकाचे) खडे भाजण्याच्या भट्टीमध्ये विशेषकरून वापरले जातात. या भट्टीमध्ये ज्वलनासाठी लागणारी हवा वरून खाली येते. भट्टीच्या वरच्या तोंडाजवळ भाजलेल्या शेलाचा अवशेष जळत असतो व तेथे उत्पन्न होणारे गरम वायू खाली येताना भट्टीतील शेलाच्या खड्यांना तापवितात, त्यामुळे खड्यांतील तेल बाष्परूपाने बाहेर पडते व खालच्या शेलावरून जाताना थंड होऊन द्रवरूप घेते आणि भट्टीच्या तळाजवळ साठते.

अशा पंपातून बाहेर पडणारा माल अगदी हळूहळू वर जातो, परंतु पंपाचा आकार पाहिजे तितका मोठा करता येत असल्याने मोठ्या पंपातून एका दिवसात १,००० टन माल वर ढकलता येतो. या पंपातील सिलिंडर आणि दट्ट्या यांच्यामधील फट अगदी बारीक असते आणि त्यामुळे आत आलेला माल फटीतून खाली पडत नाही.

घनद्रव्य पंपाची दुसरी जात गतिक प्रकारची आहे. या जातीच्या पंपाचा एक नमुना आ. २ मध्ये दाखविला आहे. याचा उपयोग धान्य, खोबरे, कवचयुक्त फळे, दाणेदार खते, प्लॅस्टिक, गंधक वगैरेंच्या गुलिका (गोळ्या), मीठ इ. घन राशीमाल बोटीच्या कोठारातून धक्क्यावरील गुदामात वा रेल्वेच्या वाघिणीत किंवा मालमोटारीत चढविण्यासाठी – भरण्यासाठी  होतो. या पंपाचे मुख्य कार्यकारी भाग म्हणजे चालक यंत्र (एंजिन किंवा आ. २ धान्य वगैरे दाणेदार माल हाताळण्याचा गतिक जातीचा घनद्रव्य पंप : (अ) फक्त चोषण, (आ) फक्त फुंकणे, (इ) चोषण व फुंकणे. विद्युत् चलित्र म्हणजे मोटर) आणि दोन चक्रीय भाते (पंखे) होत. या भात्यांची व नळांची जोडणी अशा रीतीने करता येते की, हाताळावयाच्या मालाचे नुसते चोषण (शोषून ओढून घेणे), नुसते फुंकणे किंवा एकाच वेळी ही दोन्हीही होऊ शकतील. या तीन प्रकारांची जोडणी आ. २ मध्ये अनुक्रमे (अ), (आ) व (इ) मध्ये दाखविली आहे. आ. २ (अ) मध्ये नुसत्या चोषणानेच सर्व कार्य साधले जात असता मालाच्या चोषणाच्या जागी चोषण नळाच्या तोंडाभोवती जरा मोठ्या व्यासाच्या नळाचा एक तुकडा ठेवतात. यामुळे चोषणक्रियेला मदत होते. या व दुसऱ्या दोन्ही आकृतींत मालाच्या व हवेच्या वहनाची दिशा बाणांनी दाखविली आहे. त्यावरून कार्यपद्धती स्पष्ट होते. तीनही आकृतींतील डावीकडील भाता हा मुख्य असून तो हवेवर कार्य करतो व उजवीकडील भाता धान्य पुढे ढकलण्याचे काम करतो. 

पहा : पंप.

ओगले, कृ. ह., ओक, वा. रा.