नेस्मिथ, जेम्स : (१९ ऑगस्ट १८०८– ७ मे १८९०). स्कॉटिश  यांत्रिक अभियंते. विविध⇨यांत्रिक हत्यारांच्या अभिकल्पांत  (आराखड्यांत) त्यांनी महत्त्वाच्या सुधारणा केल्या. त्यांचा जन्म  एडिंबरो येथे झाला. यांत्रिकीचे प्राथमिक ज्ञान व थोडा अनुभव एडिंबरो  येथेच मिळविल्यावर ते मॉडस्ले सन्स अँड फील्ड या इंग्लंडमधील  प्रसिद्ध अभियांत्रिकीय धंद्याच्या कंपनीत नोकरीला आले. त्यांची हुशारी  पाहून हेन्‍री मॉडस्ले यांनी त्यांना पुढे आपले स्वीय साहाय्यक केले.  मॉडस्ले यांचा १८३१ मध्ये मृत्यू झाल्यावर थोड्याच दिवसांनी नेस्मिथ  यांनी ही कंपनी  सोडली व एडिंबरो येथे परतून स्वतःचा धंदा सुरू  केला पण तेथे धंद्याला वाव कमी असल्याचे दिसल्यावरून लवकरच  पॅट्रिक्रॉप्ट येथे १८३४ साली स्वतःची ‘ब्रिजवॉटर फाउंड्री’ नावाची  ओतशाळा सुरू केली. थोड्याच अवधीत त्यांनी नव्यानव्या कार्यासाठी  यंत्रे अभिकल्पून ती बनविण्यास सुरुवात केली. त्यांतील महत्त्वाची  म्हणजे रधित्र (१८३६) व वाफ घण (१८३९) ही आहेत. त्यांच्या  रधित्रांतील मुलभूत रचना आजच्या रधित्रातही दिसून येते. त्यांनी तयार  केलेल्या वाफ घणामुळे मोठाल्या भागांची घडाई शक्य झाली व ती  जलदही होऊ लागली. या घणाचा उपयोग पुढे स्तंभिका ताडकातही  (उभ्या दिशेतील भाराला आधार देण्यासाठी किंवा आडव्या दिशेतील  दाब प्रेरणांना विरोध करण्याकरिता जमिनीत स्तंभाकार संरचना ठोकून  बसविणाऱ्या साधनातही) त्यांनी केला.

नेस्मिथ यांना त्यांच्या यंत्रामुळे खूप पैसा मिळाला व ते १८५६  मध्ये निवृत्त होऊन पेनहर्स्ट (केंट परगणा, इंग्लंड) येथे स्थायिक झाले  आणि तेथे त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला. तांदळाच्या  दाण्यासारख्या दिसणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागाचे त्यांनीच प्रथम निरीक्षण  केले. बेंजामिन बेकर यांच्या एलेमेंट्‌स ऑफ मेकॅनिझम (१८५८) या  ग्रंथातील रिमार्क्स ऑन टूल्स अँड मशिनरी हा भाग नेस्मिथ यांनी  लिहिला. याशिवाय जेम्स कार्पेंटर यांच्याबरोबर द मून ए प्लॅनेट, ए वर्ल्ड अँड सॅटेलाइट (१८७४) हा ग्रंथ लिहिला. ते लंडन येथे मृत्यू  पावले.

ओगले, कृ. ह.