डीझेल, रुडोल्फ : (१८ मार्च १८५८–१९ सप्टेंबर १९१३). जर्मन यांत्रिक अभियंते व संशोधक. त्यांच्याच नावाने पुढे ओळखल्या गेलेल्या संपीडन-प्रज्वलन (इंधन तेल पेटविण्याकरिता ज्यात दाब देऊन तापमान वाढविलेल्या हवेचा उपयोग करतात अशा) एंजिनाचे जनक. त्यांचा जन्म पॅरिस येथे झाला. आऊग्जबुर्ग व म्यूनिक येथे अभियांत्रिकीय शिक्षण घेतल्यानंतर पॅरिस येथील एका शीतक कारखान्यात त्यांनी व्यवस्थापकाचे काम केले (१८८०–९०).

त्या वेळी प्रचलित असलेल्या कोळशाचा वायू हे इंधन वापरणाऱ्या ⇨ अंतर्ज्वलन एंजिनाची औष्णिक कार्यक्षमता कमी असून ती वाढविता येणे शक्य आहे, असे म्यूनिक विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांना समजले व यावरून स्फूर्ती घेऊन त्यांनी नंतर बर्लिन येथे १८९२ मध्ये नोकरी करीत असताना एका नव्या पद्धतीच्या अंतर्ज्वलन एंजिनाच्या कार्यपद्धतीबाबत एकस्व (पेटंट) मिळविले. यात सुधारणा सुचविणारे एकस्वही त्यांनी १८९३ मध्ये घेतले. याच वर्षी त्यांनी ‘एका नव्या तर्कशुद्ध एंजिनासंबंधीचे सिद्धांत व त्याची रचना’ हा लेख लिहिला. यातील कल्पनांनुसार प्रयोग करून हे नवीन एंजिन बनविण्यासाठी त्यांनी आऊग्जबुर्ग येथील एक यंत्र कारखाना व एसेन येथील क्रप कारखाना यांचे सहकार्य घेतले. या एंजिनासाठी प्रथमतः त्यांनी दगडी कोळशाची भुकटी हे त्या काळी सर्वांत स्वस्त असलेले इंधन वापरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी दाट खनिज तेल वापरले आणि शेवटी पाच वर्षांच्या प्रयत्नानंतर १८९७ मध्ये त्यांच्या एकस्वामध्ये वर्णिल्याप्रमाणे चालणारे म्हणजे संपीडित हवेच्या तापमानानेच इंधनाचे प्रज्वलन होणारे व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले एंजिन यशस्वी रीत्या तयार केले. हे एंजिन २५ अश्वशक्तीचे, उभ्या सिलिंडराचे, हवेच्या दाबाने इंधन तेलाचे अंतःक्षेपण होणारे, चार धावांचे, जड, दणकट, मंदगतीचे पण उच्च औष्णिक कार्यक्षमतेचे होते.

कामाच्या सोयीच्या दृष्टीने १८९५ पासून डीझेल म्यूनिक येथे स्थानिक झाले. अमेरिका व कॅनडा येथे डीझेल एंजिने बनविण्याचा व विकण्याचा परवाना १८९८ मध्ये आडोल्फस बुश या कारखानदारांनी घेतला. औद्योगिक उपयोगाचे पहिले डीझेल एंजिन त्यांनी स्वतःच्या कारखान्यात १८९८ मध्ये तयार केले. त्यांनी १९०४ व १९१२ मध्ये अमेरिकेला भेटी दिल्या व दुसऱ्या भेटीत तेथे व्याख्यानेही दिली. १९१३ मध्ये ‘डीझेल एंजिनाची उत्पत्ती’ हा दुसरा लेख त्यांनी लिहिला. त्याच वर्षी इंग्लंडच्या आरमारी खात्याशी विचारविनियम करण्यासाठी जहाजाने जात असता इंग्लिश खाडीत बुडून ते मृत्यू पावले.

ओगले, कृ. ह.