तारामंडळ, कृत्रिम : निरभ्र रात्री प्रत्यक्षात दिसणारा आकाशाचा देखावा जसाच्या तसा एका घुमटाच्या आतल्या पृष्ठावर प्रक्षेपित करणारे उपकरण. ज्या इमारतीत हे उपकरण असते, तिलाही सामान्यपणे हीच संज्ञा वापरतात. या उपकरणाने सूर्य, चंद्र, ग्रह, तारे इ. खस्थ पदार्थांची स्थाने व गती (हालचाली) आणि काही ज्योतिषशास्त्रीय आविष्कार दाखविण्यात येतात. ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी ग्रहांची (प्लॅनेट) भासमान गती दाखविण्यासाठी हे उपयुक्त असल्याने याचे ‘प्लॅनेटेरियम’ हे इंग्रजी नाव पडले आहे. ज्योतिषशास्त्रज्ञ व नाविक यांना खगोल व मार्गनिर्देशन यांची माहिती करून देण्यासाठी हे उपकरण वापरले जाते व सामान्य माणसाला आकाशाची ओळख करून देण्याच्या दृष्टीनेही हे उपयुक्त आहे. तारामंडळाच्या घुमटाला आतून पांढरा वा फिकट रंग दिलेला असतो वा पांढऱ्या लिननचे अस्तर लावलेले असते. उपकरण सामान्यतः घुमटाच्या मध्यभागी ठेवलेले असते व त्याच्या भोवताली प्रेक्षक बसतात. चित्रपटाप्रमाणेच आत अंधार करून या उपकरणाचे कार्यक्रम दाखवितात. यांत्रिक प्रयुक्ती आणि विद्युत् चलित्राच्या (मोटारीच्या) साहाय्याने उपकरण चालते.

झाइस-ओबरकोचीन तारामंडळाची रेखाकृती

इतिहास : सूर्य विश्वाच्या मध्याशी आहे हा कोपर्निकस यांचा सिद्धांत पुढे आल्यानंतर  ⇨ ग्रहगतिदर्शक, ⇨  कंकणमय गोल यांसारख्या सूर्यकुलाच्या अनेक प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. तारामंडळ हे ग्रहगतिदर्शकाचे सुधारलेले रूप म्हणता येईल. ग्रहगतिदर्शकात सुधारणा करून वॅलेस वॉल्टर ॲटवुड (१८७२–१९४९) यांनी नवीनच उपकरण तयार केले होते. १९१३ साली कार्ल झाइस (त्सिस) यांनी असे एक उपकरण बनविले. त्यामध्ये गोलाकार भिंतीत छोटे छोटे दिवे लावून तारकासमूह बनविले होते व एका फिरत्या पिंजऱ्यातून प्रेक्षकांना पृथ्वीच्या कक्षेशी तुल्य मार्गात फिरवून राशिचक्र दाखविण्यात येत असे. हे उपकरण म्यूनिकच्या संग्रहालयात आहे. पृथ्वीवरून दिसणाऱ्या आकाशाची प्रतिकृती तयार करणे शक्य आहे की काय याचा अभ्यास करावा, अशी विनंती म्युनिकच्या डॉइचस संग्रहालयाच्या संचालकांनी येना (पू. जर्मनी) येथील झाइस ऑप्टिकल कंपनीला केली. तीनुसार या कंपनीतील व्हाल्टर बाउर्सफेल्ट (१८७९–१९५९) यांनी १९१३ च्या सुमारास अशा उपकरणाचा आराखडा तयार केला. त्यानुसार बनविण्यात आलेले पहिले उपकरण म्यूनिकला उभारण्यात आले (१९२३). ते म्यूनिकच्या अक्षांशानुसार बनविलेले आहे. १९२४ साली झाइस कंपनीतील डब्ल्यू. व्हिलिजर यांनी सुधारित म्हणजे आणखी एका अक्षाभोवती फिरू शकणारे उपकरण तयार केले. त्यामुळे कोणत्याही अक्षांशावरील आकाशाचे दर्शन करणे शक्य झाले. १९२६ साली बनविण्यात आलेले उपकरण हेग येथे उभारले. नंतर कार्ल झाइस यांनी उपकरणात आणखी सुधारणा केल्या. नवीन उपकरणाने ९ हजारहून जास्त तारे दाखविता येतात. नवी उपकरणे जुन्यासारखीच असली, तरी नवीन उपकरणांत तेजस्वी तारे मोठ्या प्रतिमांऐवजी तेजस्वी प्रतिमांनी दाखविले जातात. उपकरणाचा तिसरा भ्रमणाक्ष वापरून पृथ्वीबाहेरील ठिकाणाहून आकाश कसे दिसेल, तेही पाहता येते. आधुनिक उपकरणाच्या नियंत्रणाकरिता व इतरही बाबतीत संगणक (गणितकृत्ये करणारे यंत्र) व इलेक्ट्रॉनीय यांची प्रयुक्ती मदत घेण्यात येते. आधुनिक उपकरणासाठी ॲल्युमिनियमाच्या सच्छिद्र पत्र्याचा एक घुमट असून सु. १५ मी. व्यासाच्या घुमटाच्या पत्र्यावर ५ ते ६ कोटी सूक्ष्म छिद्रे असतात. या छिद्रांमुळे तो चित्रपटाच्या पडद्याप्रमाणे कार्य करतो व त्याच्या पाठीमागे ध्वनिक्षेपकांची योजनाही करता येते.

प्रथम ही उपकरणे फक्त जर्मनीतच कार्ल झाइस कंपनी तयार करीत असे. या उपकरणासाठी सु. १५ ते २७ मी. व्यासाचा घुमट लागतो व त्यात सु. ५५० प्रेक्षक बसू शकतात. आता अमेरिकेतील स्पिट्‌झ लॅबोरेटरीही अशी उपकरणे बनविते. ही मध्यम आकारमानाची उपकरणे (घुमटाचा व्यास सु. ६ ते ९ मी.) विशेषतः शाळांतून तसेच संग्रहालये, ग्रंथालये व घरांतूनही वापरली जातात. जपानमध्येही तारामंडळे तयार होऊ लागली आहेत. काही उपकरणे अगदी लहान असून त्यांचा घुमटही त्यांच्याबरोबरच असतो. त्यात थोडे प्रेक्षक बसू शकतात. घरामध्ये छतावर आकाश दाखविणारी तारामंडळेही आता बनू लागली आहेत.

यूरोप अमेरिका व आशिया या खंडांतील पुष्कळ मोठ्या शहरांत तारामंडळे उभारली असून म्यूनिक, हेग, लंडन (स्थापना १९५६), शिकागो (स्थापना १९३७), कलकत्ता इ. ठिकाणची तारामंडळे विशेष प्रसिद्ध आहेत. जगात सु. १६ मी. पेक्षा जास्त व्यासाचा घुमट असलेली ६० हून अधिक मोठी तारामंडळे आहेत.


रचना : झाइस–ओबरकोचीन उपकरणाची सर्वसामान्य रचना सोबतच्या आकृतीत दाखविली आहे. डंबेलच्या आकाराचे हे उपकरण सु. ३·६ मी. लांब असून ते बारीक गजांच्या भक्कम व चाके असलेल्या चौकटीवर बसविलेले आहे. उपकरणाच्या टोकांशी सु. ७५ सेंमी. व्यासाचे दोन पोकळ गोल (१) असून त्यांतून ताऱ्यांच्या प्रतिमा घुमटावर प्रक्षेपित केल्या जातात. प्रत्येक गोलात १,००० वॉटचा एक दिवा (२) व १६ प्रक्षेपक घटक असून या प्रत्येक घटकात धातूची एक सच्छिद्र पट्टी असते. या पट्टीवर निरनिराळ्या आकारांची छिद्रे असतात. दिव्याचा प्रकाश अरीय (त्रिज्येच्या) दिशेत मांडलेल्या १६ संघनित्रांमार्फत एकत्रित केला जाऊन आणि पट्ट्यांवर पडून खास भिंगांच्या (१०) साहाय्याने पट्ट्यांवरील छिद्रांच्या प्रतिमा घुमटावर प्रक्षेपित केल्या जातात. अशा तऱ्हेने ताऱ्यांच्या प्रतिमा घुमटावर उमटतात. पट्ट्यांवरील छिद्रे अचूक ठिकाणी आणि अचूक आकाराची पाडलेली असल्याने या प्रतिमांद्वारे ताऱ्याचा भासमान आकार व प्रत [तेजस्वीपणा, → प्रत] प्रमाणशीरपणे दाखविली जातात. अशा तऱ्हेने एका गोलाने १६ ताराक्षेत्रे एकत्रितपणे घुमटावर प्रक्षेपित होतात व नुसत्या डोळ्यांनी दिसणारे म्हणजे १ ते ६·५ भासमान प्रतीचे ९ हजाराहून जास्त तारे दाखविता येतात. सर्वांत तेजस्वी अशा ४२ ताऱ्यांकरिता स्वतंत्र प्रक्षेपक (५) प्रत्येक गोलाच्या गळपट्टीवर (७, ८) बसविलेले असतात. अलगॉल, मीरा सेटी व डेल्टा सेफी या रूपविकारी (ठराविक काळाने तेजस्विता कमी होत जाणाऱ्या) ताऱ्यांसाठीही स्वतंत्र प्रक्षेपक असून त्यांद्वारेच ताऱ्यांच्या तेजस्वितेत होणारा बदल दाखविला जातो. साहाय्यक प्रक्षेपकांनी (६, १२) तारकासमूहाचे नाव दाखविता येते, तर आकाशगंगा दाखविण्यासाठी दोन दंडगोलाकार प्रक्षेपक (४, ९) असतात आणि त्याकरिता आकाशगंगेच्या छायाचित्रांच्या निगेटिव्ह वापरतात.

कख या उभ्या अक्षाशी उपकरण नेहमी २३/ अंशाचा कोन करून असल्याने उपकरणाचा अक्ष पृथ्वीच्या अक्षाला समांतर होतो व खस्थ पदार्थांच्या गती यथातथ्य दिसतात. या अक्षाभोवती उपकरण फिरवून ताऱ्यांच्या दैनंदिन गती अभ्यासता येतात. गघ या आडव्या अक्षाभोवती उपकरण फिरवून पाहिजे त्या अक्षांशावरील आकाश पाहता येते, तर उपकरणाच्या चछ या दीर्घ अक्षाभोवती ते फिरविल्यास २५,८०० वर्षे आवर्तकाल (एका आवर्तनास लागणारा काळ) असणारे ⇨ संपातचलन दाखविता येते.

ताऱ्यांच्या प्रतिमा आणि तारकासमूहांची नावे घुमटाच्या क्षेत्रातच पडावीत म्हणून प्रत्येक प्रक्षेपक भिंगाला एक उलटी झडप असते व प्रक्षेपक गिंबल कड्यावर (११) नाजूक आधाराने टांगलेला असतो. त्यामुळे उपकरण कसेही फिरविले, तरी प्रक्षेपकाच्या भिंगाची पातळी बदलत नाही. जसजसे तारे क्षितिजाकडे जातात तसतशा या झडपा हळूहळू मिटत जाऊन प्रत्यक्षातल्याप्रमाणे तारे मंद होत जाऊन मावळतात. क्षितिजावरील प्रकाश निर्मिण्यासाठीही प्रक्षेपक (३) असतात.

सूर्य, चंद्र तसेच नुसत्या डोळ्यांनी दिसणारे बुध, शुक्र, मंगळ, गुरू व शनि हे दाखविण्याची यंत्रणा उपकरणाच्या जाळीदार भुजांत असते. जाळीमुळे प्रकाशाला होणारा अडथळा टाळण्यासाठी येथे जुळे प्रक्षेपक असतात, त्यामुळे एकसारख्या दोन प्रतिमा एकमेकींवर पाडल्या जाण्याची सोय होते. दंतचक्रमालिकांनी हे प्रक्षेपक फिरविले जातात आणि ग्रहांच्या मार्गी, वक्री तसेच अयन गती दाखविता येतात. जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा चंद्र व ग्रह यांच्या यथातथ्य हालचाली सुरू होतात. चंद्र व ग्रह यांच्या प्रतिमा स्वतंत्रपणे फिरविता येतात. त्यामुळे त्यांच्या भूत वा भविष्यातील कोणत्याही सापेक्ष स्थिती पाहता येतात. यांशिवाय ग्रहणे, अभ्रिका, कृत्रिम उपग्रह, ⇨ ध्रुवीय प्रकाश, युग्मतारे, तारकासमूहांच्या आकृती, उल्का अथवा उल्कावृष्टी इ. ज्योतिषशास्त्रीय आविष्कार व तारीख दाखविण्याची सोयही काही उपकरणांत असते. तसेच ⇨ ग्रहपथप्रकाश, याम्योत्तर वृत्त, क्रांतिवृत्त (सूर्याचा वार्षिक भासमान गतिमार्ग), खगोलीय विषुववृत्त, क्रांती व विषुवांश या सहनिर्देशक पद्धतीचा [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] काही भाग प्रक्षेपित करणारे प्रक्षेपकही मुख्य उपकरणावर बसविलेले असतात. आधुनिक उपकरणात चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते, हे दाखविणाऱ्या स्वतंत्र प्रक्षेपकासारख्या जादा सोयी असतात.

ग्रह व चंद्र यांच्या गती गुंतागुंतीच्या असल्याने उपकरणाची उभारणी अचूक व्हावी लागते. उपकरण चालविणारा आपल्या टाचणांनुसार उपकरणाचे नियंत्रण करतो. विशिष्ट तारा किंवा तारकासमूह दाखविण्यासाठी तो दर्शकाचा वापर करतो. या दर्शकासाठी स्वतंत्र प्रक्षेपक असून त्याद्वारे घुमटावर योग्य जागी प्रकाशमान बाणाची खूण पाडता येते.

इतर सामग्री : बहुतेक ठिकाणी शाळेतील मुलांसाठी तारामंडळाचे नियमित कार्यक्रम होतात. लहान मुलांना आकाशासंबंधी माहिती व्हावी म्हणूनही काही कार्यक्रम असतात. काही ठिकाणी स्थानिक विद्यापीठाच्या सहकार्याने ठराविक शिक्षणक्रमही घेतले जातात. तारामंडळाला जोडून बहुधा संबंधित वस्तूंचे संग्रहालय असते. त्यामध्ये ज्योतिषशास्त्राशी संबंधित अशा कलात्मक वस्तू, चित्रे, निरनिराळ्या वेधशाळांतील पारदर्शिका, तारे ओळखण्याचे नकाशे वगैरे वस्तू ठेवलेल्या असतात. काही ठिकाणी फूको लंबक (पृथ्वीची स्वतःच्या अक्षाभोवती गती दर्शविणारा, जे. बी. एल्. फूको यांनी शोधून काढलेला लंबक), ग्रहगतिदर्शक, दुर्बिणी यांसारखी उपकरणे आणि तसेच भौतिकी, रसायनशास्त्र, वातावरणविज्ञान, अवकाशविज्ञान व तंत्रविद्या या विषयांतील काही संकल्पना स्पष्ट करणारी उपकरणे व प्रयुक्त्या मांडलेल्या असतात. यांशिवाय तेथे विविध विषयांतील तज्ञांची व्याख्यानेही वेळोवेळी आयोजित केली जातात. कार्यक्रम आकर्षक व परिणामकारक करण्यासाठी केव्हा केव्हा संगीत व ध्वनियोजना यांची साथ कार्यक्रमाला देतात. तसेच कार्यक्रम प्रेक्षणीय होऊन वास्तव वाटावा म्हणून ढग, इंद्रधनुष्य, विजांचा चमचमाट, स्थानिक क्षितिजावर दिसणारा देखावा वगैरे दाखविण्यात येतात.


 फायदे : या उपकरणाने रात्रीचे आकाश अधिक स्वच्छ रूपात पाहता येणे तसेच त्याने दाखविले जाणारे तारे अचूक सापेक्ष गतीने घुमटावर सरकतात. त्यामुळे कोणत्याही स्थळी व वेळी आकाश कसे दिसेल ते पाहता येते. सूर्य व तारे यांच्या प्रतिमा प्रक्षेपित करून सूर्याचे राशिचक्रामधून भ्रमण कसे होते ते दाखविता येते, ही गोष्ट प्रत्यक्षात दिसू शकत नाही. उपकरणाच्या एका गोलाच्या साहाय्याने उत्तर खगोलाचे आणि दुसऱ्या गोलाच्या साहाय्याने दक्षिण खगोलाचे प्रक्षेपण करता येते. यामुळे उत्तर गोलार्धात दक्षिण खगोलातील आकाशही पाहता येते. पृथ्वीचे स्वतःभोवतीचे दैनिक भ्रमण, सूर्याभोवतीची तिची वार्षिक प्रदक्षिणा व अक्षांदोलन या पृथ्वीच्या तीन गतींचा अभ्यास करणे या उपकरणामुळे सोयीचे झाले आहे. आपल्या सोयीनुसार उपकरण जलद अथवा सावकाश चालविता येते. त्यामुळे संपातचलनासारख्या अतिमंद गतीचाही अभ्यास करता येतो. खस्थ पदार्थांचे उदयास्त पहाण्यासाठी प्रत्यक्षातील पूर्ण दिवसाची हालचाल याने अर्ध्या मिनिटाइतक्या अल्प काळात करता येते तसेच दक्षिणायन व उत्तरायण, ग्रहांच्या नाक्षत्रगती वगैरे पाहाण्यासाठी प्रत्यक्षात वर्ष लागते, तर या उपकरणाने तेच काही सेंकदापासून ते अर्ध्या तासापर्यंत इतक्या थोड्या काळात पाहता येते. परिणामी आकाशात प्रत्यक्षात कित्येक वर्षांमध्ये वा शतकांमध्ये घडणाऱ्या घटना या उपकरणाने केवळ तासाभरात पाहता येतात. अशा प्रकारे या उपकरणाने गेल्या किंवा येत्या दहा हजार वर्षांतील कोणत्याही वेळी व पृथ्वीजवळील कोणत्याही बिंदूपासून दिसणारा आकाशाचा देखावा पाहता येतो, म्हणजे या उपकरणाच्या साहाय्याने अवकाश व काळात संचारण करता येते.

तीन प्रकाशरेखा घुमटावर प्रक्षेपित करून ज्योतिषशास्त्रीय त्रिकोण काढता येतो. त्याची स्थिती व त्याच्या बाजूंची लांबी बदलता येते. हा त्रिकोण एखाद्या ताऱ्यावर प्रक्षेपित करून ताऱ्याचे कोणात्मक अंतरासारखे वेध कसे घेतात, ते स्पष्ट करता येते. तारामंडळातील याम्योत्तर वृत्तावरील अंशांच्या खुणांद्वारे  ध्रुवताऱ्याची स्थिती निश्चित करता येते. या उपकरणाने एकाच वेळी निरनिराळ्या ठिकाणची ताऱ्यांची खस्वस्तिक (निरीक्षकाच्या डोक्याच्या वरील उभ्या दिशेतील खगोलावरील) स्थाने काढता येतात. तसेच पृथ्वी वा सूर्य केंद्रस्थानी मानून येणारे दृश्य पाहता येते.

भारतातील तारामंडळे : भारतामध्ये कलकत्ता, मुंबई, लखनौ विद्यापीठ, दिल्लीची राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा, राजस्थानमधील पिलनी येथील बिर्ला शिक्षण समिती, विजयवाडा, पुणे, बडोदे, पोरबंदर, सुरत, सालेम वगैरे ठिकाणी तारामंडळे आहेत.

कलकत्त्याचे तारामंडळ आशिया खंडातील सर्वांत मोठे व जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आहे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास, विकास व प्रसार करणे आणि ज्योतिषशास्त्र व त्याच्याशी संबंधित विषयांतील कित्येक क्षेत्रांमध्ये संशोधन करणे, या उद्देशाने हे तारामंडळ बिर्ला शैक्षणिक केंद्र विश्वस्त निधीमार्फत ३० लाख रु. खर्चून उभारण्यात आले आहे. येथील उपकरण झाइस कंपनीचे युनिव्हर्सल प्रकारचे म्हणजे सर्व खगोलातील तारे दाखवू शकणारे आहे. या नाजूक पण गुंतागुंतीच्या उपकरणाचे वजन २ टनांपेक्षा जास्त असून ते पोलादी चौकटीवर बसविलेले आहे. यामध्ये १०० हून जास्त प्रक्षेपक असून सु. २९,००० वेगवेगळे भाग त्यात आहेत. येथील सभागृह वातानुकूलित असून त्यात एका वेळी ५०० प्रेक्षक बसू शकतात व जरूर लागल्यास आणखी २५० लोकांची सोय करता येते. सभागृहात बाजूला असलेल्या नियंत्रण मेजावरून व्याख्याता विजेच्या साहाय्याने उपकरणाचे नियंत्रण करतो. येथील घुमटाचा व्यास सु. २३ मी. असून तो पत्र्याचा आहे. या घुमटात ५ कोटीपेक्षा जास्त छिद्रे असून त्यामुळे प्रतिध्वनी जवळजवळ निर्माण होत नाही. हा घुमट बाहेरून सच्छिद्र क्राँक्रीटच्या घुमटाने झाकलेला असून दोन्ही घुमटाचे केंद्र एकच आहे. दोन्ही घुमटांमधील पोकळीत तंतुरूप काच व तापरोधक द्रव्याचे पुठ्ठे भरलेले आहेत.

या तारामंडळाने गेल्या व येत्या चार हजार वर्षांतील कोणत्याही वेळेचे व कोणत्याही ठिकाणाहून दिसणारे आकाश पाहता येते तसेच धूमकेतू, उल्का, कृत्रिम उपग्रह आणि अलगॉल व मीरा हे तारकासमूह दाखविण्याची सोयही येथे आहे. येथील कार्यक्रम ४५ मिनिटांचा असून साहाय्यक उपकरणे व पारदर्शिका यांच्या मदतीने तो प्रेक्षणीय करतात. कार्यक्रम हिंदी, बंगाली व इंग्रजी भाषांत आणि प्रसंगविशेषी ओडिया, तमिळ व गुजराती भाषांतूनही होतो. तारामंडळाला जोडूनच घुमटाच्या बाहेरील गोलाकार मार्गात ज्योतिषशास्त्रीय संग्रहालयही येथे उभारले जात आहे. त्यामध्ये खस्थ पदार्थांची छायाचित्रे, ज्योतिषशास्त्रज्ञांचे पुतळे, हिंदू पुराणकथांना अनुसरून काढलेली चित्रे आहेत. कधीकधी अवकाश तंत्रविद्येमधील सध्याच्या प्रगतीचा आढावा घेणारी छायाचित्रेही येथे लावण्यात येतात.

हे तारामंडळ म्हणजे एक शैक्षणिक, शास्त्रीय व संशोधन संस्था असून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास, संशोधन व प्रसार तीद्वारे चालतो. निरीक्षणात्मक ज्योतिषशास्त्र, ⇨खगोलीय यामिकी, खगोल भौतिकी, अवकाश संशोधन आणि तंत्रविद्येचा विकास व प्रगती या विषयांसंबंधीची व्याख्याने अद्ययावत माहितीच्या आधारे देण्याची व्यवस्था येथे केली जाते. त्यासाठी व्याख्यात्यांना खास प्रशिक्षण दिलेले असते. सामान्य माणसांसाठी तारे, ग्रह, दीर्घिका, हिंदू–पुराणकथा इत्यादींशी निगडित असलेल्या विषयांवरील व्याख्यानेही येथे आयोजित करण्यात येतात. तसेच शालेय अभ्यासक्रमाला धरून असणारी खास व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी अधूनमधून येथे ठेवली जातात.


यांशिवाय एक ज्योतिषशास्त्रीय शिक्षणक्रम विनामूल्य शिकविण्याची सोयही येथे आहे. तो एप्रिल ते सप्टेंबर या काळात असतो व प्रत्येकी एक तासाची अशी २४ सत्रे यात घेतात. शिवाय चार वेळा तारामंडळाने आकाश दाखवून निरनिराळ्या ऋतूंतील ताऱ्यांचे आकृतिबंध (मांडणी) वेगवेगळे ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक आणि संपातचलन यांची माहिती त्याद्वारे करून देण्यात येते.

ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाच्या घटना व तारखा साधून खास कार्यक्रमही येथे आयोजित केले जातात. केप्लर यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त येथे आठवडाभराचा खास कार्यक्रम झाला होता. तसेच संशोधकांना उत्तेजन व आर्थिक साहाय्य देण्याचे कामही ही संस्था करते. मध्यम आकाराची तारामंडळे व ज्योतिषशास्त्रीय संग्रहालये उभारण्यासाठीही ही संस्था तांत्रिक मार्गदर्शन करते. विजयवाड्याच्या गांधी हिल सोसायटीला मध्यम तारामंडळ व सर्वसामान्यांना उपयुक्त अशी ज्योतिषशास्त्रीय वेधशाळा उभारण्यासाठी या संस्थेने साहाय्य केले आहे.

मुंबईला नेहरू सेंटरतर्फे वरळी येथे १·६५ कोटी रु. खर्चून एक भव्य वातानुकूलित तारामंडळ उभारण्यात आले असून ते जानेवारी १९७७ मध्ये सुरू करण्यात आले. त्याच्या घुमटाचा व्यास सु. २३ मी. आहे व तेथे ५८३ प्रेक्षक बसण्याची सोय केलेली आहे. येथील उपकरण झाइस कंपनीचे युनिव्हर्सल प्रकारचे असून त्याचे वजन सु. २ टन आहे. उपकरणात १२० पेक्षा अधिक प्रक्षेपक असून त्यांनी ९,००० तारे दाखविता येतात. शिवाय चंद्र, सूर्य, तसेच बुध, शुक्र, मंगळ, गुरू व शनी हे ग्रह व त्यांच्या हालचाल, गुरूचे चार उपग्रह, ध्रुवीय प्रकाश, उल्का, धूमकेतू, दीर्घिका, अभ्रिका दाखविण्याची सोयही या उपकरणात आहे. या उपकरणाने कोणत्याही ठिकाणचे, कोणत्याही दिवसाचे, कोणत्याही वेळी नुसत्या डोळ्यांनी दिसणारे आकाश दाखविता येते. येथील कार्यक्रम ३० ते ४० मिनिटांचा असून तो मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी या चार भाषांतून सादर करण्यात येतो.

या तारामंडळाच्या घुमटाच्या कडेने मुंबईची क्षितिजरेषा दाखविली असून तीमध्ये राजाबाई टॉवर, गेटवे ऑफ इंडिया, दूरचित्रवाणीचा मनोरा, भाभा अणुशक्ती केंद्र इ. मुंबईतील महत्त्वाच्या वास्तूंचा तसेच चौपाटी, राष्ट्रीय उद्यान इ. देखाव्यांचाही अंतर्भाव केलेला आहे. शिवाय तारामंडळाच्या इमारतीत ज्योतिषशास्त्रविषयक चित्रे, छायाचित्रे आणि प्रतिकृती आहेत. अपोलो यानाचे चंद्रावरील अवतरण, चांद्रपृष्ठ व चंद्रावरील पृथ्वीचा उदयास्त हे दाखविण्याची सोय येथे आहे. शिवाय ल्यूनोखोड व अपोलो यानांच्या अवतरणाची स्थाने, अवकाशातील विक्रमी मोहिमा, भारताची अवकाशविज्ञानातील प्रगती इ. गोष्टी छायाचित्रे, चित्रे यांद्वारे दाखविल्या आहेत. ग्रह, तारे, अभ्रिका, धूमकेतू इ. दाखविणाऱ्या कृष्णधवल आणि रंगीत पारदर्शिका भिंतीत बसविलेल्या आहेत. येथे आर्यभट या भारताच्या पहिल्या उपग्रहाची प्रतिकृतीही आहे. तारामंडळाच्या कक्षात जाताना आकाशगंगेची छायाचित्रे लावली आहेत. बाहेर पडताना भारतीय वेधशाळांची चित्रे लावलेली आहेत.

येथे सूर्यकुलाचा एक तक्ता असून त्यात पृथ्वीपासून इतर ग्रहांची अंतरे, तसेच त्यांचे आवर्तकाल व सापेक्ष आकारमाने दिलेली आहेत. तेथे पृथ्वीचे विश्वातील स्थानही दाखविले आहे.

पहिल्या मजल्यावर एक सौर दुर्बिण असून तिने थेट सूर्याकडे न पाहताही त्याची मोठी प्रतिमा (बिंब) पडद्यावर पाहता येते. तिच्या लगतच्या फ्राउनहोफर रेषा (फाउनहोपर यांनी शोधून काढलेल्या काळसर रेषा) दाखविणारा सूर्याचा वर्णपट पाहण्याची प्रयुक्ती आहे. शिवाय जवळच सूर्यचंद्रांची ग्रहणे कशी होतात, हे स्पष्ट करणारी प्रतिकृतीही ठेवलेली आहे. तसेच येथे तळमजल्यावर एक ग्रहगतिदर्शक आहे.

चंद्र, सूर्य, गुरू आणि मंगळ यांवर आपले वजन किती होईल, हे दर्शविणारे काटे येथे असून प्रत्येक काट्याच्या खोलीत त्या ठिकाणचा भास व्हावा अशी सजावट केलेली आहे.

तळघरात ग्रंथालय व व्याख्यानगृहे असून तेथे नामवंत शास्त्रज्ञांची व्याख्याने ठेवण्याची योजना आहे. शिवाय तळघरातच एक छंद विभाग असून तेथे छोट्या मुलांना दुर्बिणी व इतर ज्योतिषशास्त्रीय उपकरणांच्या प्रतिकृती तयार करता येतील, अशी व्यवस्था केलेली आहे.

पुण्यातील तारामंडळ टिळक मार्गावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये असून १५ सप्टेंबर १९५४ रोजी याचे उद्‌घाटन झाले. हे उपकरण स्पिट्झ कंपनीचे ए-१ प्रकारचे आहे. येथील घुमट सिंमेट क्राँक्रीटचे असून त्याचा व्यास सु. ९ मी. आहे व त्याला आतून चुन्याचा पांढरा रंग दिलेला आहे. त्यामध्ये सु. १५० प्रेक्षक बसण्याची सोय होऊ शकते. येथे कितीही वर्षांपूर्वीचे व नंतरचेही आणि पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणावरून दिसणारे आकाश पाहता येते. येथील कार्यक्रम सु. १ तास चालतो व तो बहुतेक शनिवारी संध्याकाळी असतो. तसेच विनंतीनुसार इतर वेळीही याचे कार्यक्रम होतात. सु. दोन लाख लोकांनी येथील कार्यक्रम पाहिला आहे. मागणीप्रमाणे येथे एक शिक्षणक्रमही घेण्यात येतो. याला जोडून संग्रहालय नाही, मात्र येथे खगोलीय त्रिकोण याम्योत्तर वृत्त, भूकेंद्रित गोल (याच्या साहाय्याने निरनिराळ्या ठिकाणी एकाच वेळी असलेली ताऱ्यांची खस्वस्तिक स्थाने कळतात) वगैरे साहाय्यक साधने आणि एक ग्रहगतिदर्शक आहे.

संदर्भ : Letsch, H. Captured Stars, New York, 1961.

ठाकूर, अ. ना.


नेहरू प्लॅनेटेरियममधील झाइस कंपनीचे युनिव्हर्सल प्रकारचे उपकरण व घुमटाच्या आतील भागावर दिसणारी मंबईची क्षितीजरेषा.

 मुंबईच्या नेहरू प्लॅनेटेरियमचे आणखी एक बाह्य दृश्य

पुणे येथील तारामंडळातील स्पिट्झ कंपनीचे ए-१ प्रकारचे उपकरण

कलकत्ता येथील बिर्ला प्लॅनेटेरियमचे बाह्य दृश्य

बिर्ला प्लॅनेटेरियममधिल उपकरण व घुमटाच्या आतील भागावर दिसणारी कलकत्त्याची क्षितीज रेषा

बिर्ला प्लॅनेटेरियममधील झाइस कंपनीचे युनिव्हर्सल प्रकारचे उपकरण

तारामंडल, कृत्रिम