वृक : दक्षिण खगोलातील एक लहान तारकासमूह. याचे पाश्चात्त्य नाव लूपस (म्हणजे लांडगा) आहे. हा तारकासमूह ⇨ नरतुरंगाच्या पूर्वेस व ⇨वृश्चिकाच्या पश्चिमेस दिसतो. होरा १५ तास व क्रांती – ५०० [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पध्दति ]. आसपासच्या खगोलाचा भाग यात येतो. याचे क्षेत्र लहान असले, तरी यात सहाव्या प्रतीपर्यंतचे [→ प्रत] ३८ तारे आहेत. यांपैकी ३ व ४ प्रतींच्या ताऱ्यांनी बनलेली याची धनुष्याकृती मित्र ताऱ्याच्या उत्तरेस व तुलेच्या दक्षिणेस दिसते. यात काही तारकायुग्मही आहेत. यातून आकाशगंगा गेली आहे. आहे. २२ जूनच्या सुमारास रात्री सु. ९ वाजता हा तारकासमूह मध्यमंडलावर येतो. इसवी सन अकराव्या शतकात एक अतिदीप्त नवतारा [ज्याची दीप्ती अचानकपणे कोट्यावधी पट वाढते असा तारा → नवतारा व अतिदीप्त नवतारा] या क्षेत्रात दिसला होता व तो भर दुपारीही दिसत होता. प्रलयवादळात जेव्हा नोव्हाने नौका सोडून दिली व जमिनीवर पाऊल ठेवले, तेव्हा त्याने पहिला बळी वृकाचा दिला, अशी ग्रीक पुराणकथा आहे.    

                                         

ठाकूर, अ. ना.