कोपर्निकस, निकोलेअस : (१९ फेब्रुवारी १४७३–२४ मे १५४३). (मिकोली कॉपेरनीक किंवा निक्लास कोपरनिक या नावाचे लॅटिनीकरण होऊन हे नाव आले आहे.) पोलिश (प्रशियन) ज्योतिषशास्त्रज्ञ, गणिती, धर्मोपदेशक आणि वैद्य. पृथ्वी गोल असून स्वतःभोवती फिरत असते व सर्व ग्रह पृथ्वीभोवती न फिरता स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात, ही कल्पना त्यांनी रूढ केली. त्यामुळे गॅलिलिओ यांची दुर्बिण, केल्पर यांचे गतीविषयीचे नियम व न्यूटन यांचे गुरुत्वाकर्षणाचे नियम यांना चालना मिळाली. म्हणून ते आधुनिक ज्योतिषशास्त्राचे एक संस्थापक मानले जातात.

त्यांचा जन्म व्हिश्चला नदीच्या तीरी असलेल्या टॉर्न (मध्य पोलंड) येथे झाला. त्याचे शिक्षण लॅटिन व ग्रीक भाषांत झाले. फ्रेको विद्यापीठात त्यांनी वैद्यक व धर्मशास्त्र यांचे अध्ययन केले (१४९१–९४) १४९६ साली ते कॅनन लॉच्या (धर्मविषयक कायद्याच्या) अभ्यासासाठी बोलोन्या (इटली) येथे गेले. तेथेच त्यांना ज्योतिषशास्त्राची गोडी लागली व त्याचे त्यांनी अध्ययनही केले (१४९६–१५००). १५०० साली पोप यांच्या निमंत्रणावरून ते रोमला गेले व तेथे त्यांनी ज्योतिषशास्त्र व गणित यांवर व्याख्याने दिली. त्यांची १४९७ सालीच फ्राउएनबुर्ख (फ्रॉमबर्क) येथील कॅथीड्रलचे कॅनन म्हणून नेमणूक झालेली होती. म्हणून १५०१ साली शिक्षण अर्धवट सोडून ते पोलंडला परतले, परंतु ते लगेच इटलीतील पॅड्युआ येथे गेले व तेथे त्यांनी वैद्यक व तत्त्वज्ञान यांचे अध्ययन केले (१५०१–०३). १५०३ साली त्यांनी फेरारा येथे कॅनन लॉ या विषयातील डॉक्टरेटची पदवी संपादन केली. १५०५ साली ते हायड्लबर्ग येथे गेले. तेथे काही काळ वैद्यकीय व्यवसाय केल्यावर १५१२ साली ते फ्राउएनबुर्ख येथे परतले व शेवटपर्यंत ते तेथेच होते. वैद्यकीय व्यवसाय करीत असतानाच त्यांनी ज्योतिषशास्त्र, गणित, त्रिकोणमिती, चित्रकला इ. विषयांचा अभ्यास चालू ठेवला होता.

निकोलेअस कोपर्निकस

टॉलेमी यांच्यापासून चालत आलेली भूकेंद्रीय कल्पना (पृथ्वीविश्वाच्या मध्याशी आहे असे मानणारी कल्पना) कोपर्निकस यांना अपुरी वाटत असे. या कल्पनेनुसार सूर्य, चंद्र व ग्रह यांच्या गतीसंबंधीचे नियम व त्यांची दिलेली स्पष्टीकरणे ही सुसंगत अशी नव्हती. याकरिता दुसरीच कल्पना मांडायला हवी, असे कोपर्निकस यांचे मत होते. इ.स.पू. ३०० मध्ये ग्रीकांनी सूर्यकेंद्रीय कल्पना (सूर्य विश्वाच्या मध्याशी आहे असे मानणारी कल्पना) मांडलेली आढळते. बुध व शुक्र सूर्याभोवती फिरत असल्याचे जुन्या लॅटिन ग्रंथांमधील उल्लेख त्यांच्या वाचनात आले. या कल्पनेला व्यापक रूप देऊन त्यांनी पृथ्वीसह सर्वच ग्रह स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात, ही कल्पना मांडली. मात्र त्यांची कल्पना व हल्लीची सूर्यकुलासंबंधीची कल्पना यांमध्ये खूप फरक आहे. त्यांनी ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार मानून विश्वासंबंधीची (सूर्यकुल) कल्पना मांडली होती. तीनुसार सूर्य हा मध्य असलेल्या निरनिराळ्या एककेंद्रीय वर्तुळांत स्वस्थ गोल फिरत असतात. चंद्रासह पृथ्वी अशा एका वर्तुळात फिरत असते व तिला स्वतःभोवती फिरण्यास चोवीस तास व सूर्याभोवती फिरण्यास एक वर्ष लागते. यामुळे ऋतू व ⇨ संपातचलन यांची संगती लावता आली. सर्वांत बाहेरच्या वर्तुळात नक्षत्रे असून ती एका दिवसात सूर्याभोवती फेरी मारतात, असे ही त्यांचे मत होते. वेधांवरून येणाऱ्या ग्रहांची विकेंद्रता (वर्तुळाकार कक्षेपासून होणारे विचलन) आणि गतीमधील असमानता या बाबींचे स्पष्टीकरण करण्यासाठी मात्र त्यांनी पूर्वीच्या परंपरेनुसार अधिवृत्तांचाच [एका वर्तुळाचा मध्य दुसऱ्या वर्तुळावरून फिरत असता पहिल्या वर्तुळावर फिरणाऱ्या बिंदूच्या मार्गाचाच, → अधिवृत्त] अवलंब केला कारण त्यांची निरीक्षणाची साधने अगदी प्राथमिक स्वरूपाची होती.

वरील कल्पना त्यांना १५०७ च्या सुमारास सुचली असावी .१५१० साली एका लेखाद्वारे त्यांनी ती मांडली होती, परंतु तिची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांनी वेध घेतले. त्यामुळे ती ग्रंथ स्वरूपात लिहून काढण्यास विलंब झाला. १५३० सालीच त्यांच्या पुस्तकाचे हस्तलिखित तयार होते, परंतु धार्मिक व राजकीय कारणांमुळे प्रकाशनास उशीर होत गेला. १५४० साली त्यांचे अनुयायी व एकमेव शिष्य रेटिकुस यांनी या कल्पनेचा गोषवारा प्रसिद्ध केला. त्यांचा मूळ ग्रंथ मात्र १५४३ साली ते मृत्युशय्येवर असताना प्रसिद्ध झाला. तो न्यूरेंबर्ग मुद्रणालयामध्ये छापला होता व पोप यांना अर्पण करण्यात आला होता. परंतु दरम्यानच्या काळात ही कल्पना पत्रकांच्या व व्याख्यानांच्या द्वारे प्रसृत करण्यात आली होती. त्यांच्या या पुस्तकाचे  ⇨ de Revolutionibus Orbium Coelestium हे नाव त्यांच्या पश्चात ठेवण्यात आले. शिवाय त्या पुस्तकाची प्रस्तावना आंद्रेआस ओझिआंडर यांनी लिहून तिच्यात पुस्तकातील विचार पूर्णतया काल्पनिक असल्याचे स्वतःच लिहून टाकले. नंतर यासंबंध वाद निर्माण झाला होता. हे पुस्तक १८३५ सालापर्यंत रोमन कॅथोलिकांना वाचण्यास बंदी करण्यात आलेल्या पुस्तकांच्या सूचीत समाविष्ट होत असे. या पुस्तकाचे सहा खंड असून त्यांच्यात पुढील माहिती आहे. खंड १: पृथ्वी गोल असून ती फिरत असतेताऱ्यांची यादी व त्रिकोणमितीवरील भाष्ये. खंड२: क्रांतिवृत्तासंबंधीचे (सूर्याच्या वार्षिक भासमान गतिमार्गासंबंधीचे) विवरणखंड ३: ⇨ अक्षांदोलनव सूर्याची भासमान गती यांच्याबद्दलचे विवेचन खंड ४ : चंद्र आणि खंड ५ व ६ : ग्रहांसंबंधीची माहिती. थ्री कोपार्निकन ट्रिटायझेस  हे या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर ई. रोझे यांनी १९५९ साली प्रसिध्द केले.

सूर्यकेंद्रीय कल्पना लवकरच विद्वन्मान्य झाली. नंतर तिच्यात सुधारणा होत गेल्या. केल्पर यांनी ग्रहांच्या कक्षा विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) असल्याचे दाखवून दिल्याने स्पष्टीकरणाकरिता अधिवृत्तांची गरज राहिली नाही. नंतर आधुनिक साधनांनी सूक्ष्म वेध घेणे शक्य झाल्याने एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास सूर्य पृथ्वीभोवती न फिरता पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, ही कल्पना प्रयोगांनी सिध्द झाली.

वरील पुस्तकांशिवाय कोपर्निकस यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. उदा.,Commentariolus (१५१४ पूर्वी) ग्रीक इपिसल्सचे लॅटिन रूपांतर (१५०९). चलन सुधारणांसंबंधी त्यांनी १५२५ मध्ये लिहिलेले चोपडे १८१६ साली वॉर्सा येथे प्रकाशित झाले. त्यांनी १४९७–१५२९ दरम्यान केलेल्या ज्योतिषशास्त्रीय निरीक्षणांसंबंधीची माहितीही प्रसिध्द झाली आहे. त्यांच्या बृहमानार्थ चंद्रावरील एका स्थळास (विवरास) कोपर्निकस [→ चंद्र] व माडाच्या एका प्रकारासकोपर्निशिया अशी नावे दिली आहेत. तसेच २१ ऑगस्ट १९७२ रोजी अंतराळात पाठविलेल्या दूरदर्शकालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे. ते फ्राउएनबुर्ख येथे मृत्यू पावले.

मराठे, स. चि. ठाकूर, अ. ना.