ग्रहपंचांग : (इफेमेरिस). दररोज किंवा ठराविक कालांतराने सूर्य, चंद्र, ग्रह, काही महत्त्वाचे तारे व लघुग्रह यांचे विशिष्ट काळाचे निश्चित स्थान ठरविणाऱ्या कोष्टकांच्या पुस्तकरूप संग्रहास ग्रहपंचांग म्हणतात. यात सूर्यचंद्रांचे उदयास्त विषुवांश व क्रांती, ग्रहांचे भोग आणि शर [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] अशी विविध माहिती दिलेली असते. धूमकेतू, लघुग्रह व काही तारकायुग्मे यांची विशिष्ट काळाची माहिती यात असते. अशीच पुढे उपलब्ध होणारी माहिती पडताळून पाहता येते. ग्रहपंचांगे काही वर्षांची सुद्धा, निदान दरवर्षी आगाऊ प्रसिद्ध करण्यात येतात. घड्याळे बिनचूक लावण्यासाठी यांचा उपयोग होतो. म्हणून ही माहिती तयार करताना अचूकपणाविषयी विशेष काळजी घेण्यात येते. तसेच ग्रहणे, युती व प्रतियुती यांच्या गणितासाठी ही कोष्टके उपयुक्त असतात. बहुतेक देश आपापल्या प्रमाण वेळेप्रमाणे आपल्या देशाचे असे ग्रहपंचांग प्रसिद्ध करतात. १९५८ सालापासून इंडियन इफेमेरिस अँड नॉटिकल अल्मॅनॅक  हे भारतीय ग्रहपंचांग प्रसिद्ध होत असते.

मराठे, स. चिं.