देलांद्र, आंरी आलेक्सांद्र : (२४ जुलै १८५३–१५ जानेवारी १९४८). फ्रेंच भौतिकीविज्ञ व खगोलभौतिकीविज्ञ. त्यांनी पट्ट स्वरूपाच्या वर्णपटासंबंधी [रेणूंपासून उद्‌भवणाऱ्‍या वर्णपटातील पट्टासंबंधी→वर्णपटविज्ञान] व सौरभौतिकीमध्ये महत्त्वाचे कार्य केले आणि वर्णपटीय सूर्यच्छायालेखकाचा (एकवर्णी प्रकाशामध्ये सूर्याची छायाचित्रे घेणाऱ्‍या उपकरणाचा) शोध लावला.

त्यांचा जन्म पॅरिसला झाला. १८८६–९१ या काळात त्यांनी रेणूंपासून येणाऱ्‍या प्रारणांच्या वर्णपटांचा अभ्यास केला व त्यासंबंधीचे नियम बसविले. त्यावरून त्यांनी तयार केलेल्या सूत्राला देलांद्र सूत्र (समीकरण) म्हणतात. सूर्यबिंबाच्या वर्णपटातील एच (H)व के (K)रेषांचे प्रत्यावर्तन (उलटापालट) होते,हे त्यांनी व जॉर्ज एलरी हेल यांनी स्वतंत्रपणे शोधून काढले (१८९१). तसेच या दोघांनी स्वतंत्रपणे पण जवळजवळ एकाच वेळी (१८९२) वर्णपटीय सूर्यच्छायालेखकाचा शोध लावला. देलांद्र यांनी वेग अभिलेखनाचाही (वेग नोंदविणाऱ्या उपकरणाचाही) शोध लावला. देलांद्र १९०८ साली म्यूदॉन वेधशाळेचे संचालक झाले. तेथे असताना त्यांनी वर्णपटांच्या साहाय्याने सूर्याचा सविस्तर अभ्यास केला आणि सूर्यावरील डागांच्या चक्रामध्ये विविध पातळ्यांवर द्रव्याचे अभिसरण कसे होते, याचे सर्वसामान्य चित्र रेखाटले. १९२७ साली ते पॅरिस वेधशाळेचे संचालक झाले. शनीच्या कड्यांच्या परिवलनाचे (फिरण्याचे) स्वरूप एकसंध नसून त्यांतील घटकांना स्वतंत्र गती असते, हे त्यांनी १८८५ मध्ये दाखविले. तसेच प्रजापतीला (यूरेनसला) इतर ग्रहांच्या उलट परिवलन गती असते, हेही त्यांनी दाखवून दिले. १९०२ साली त्यांची फ्रेंच ॲकॅडमी ऑफ सायन्सेसवर निवड झाली व १९१३ साली त्यांना रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक देण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ सु. २२५ किमी. व्यासाच्या आणि सभोवताली भिंतीसारखे उंचवटे असलेल्या चंद्रावरील एका मैदानाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.