नारायण रेड्डी, सी. : (२९ जुलै १९३१ – ). आधुनिक तेलुगू कवी व नाटककार. त्यांचा जन्म हनमाजीपेट (जि. करीमनगर) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावी आणि शालेय व महाविद्यालयीन शिक्षण हैदराबाद येथे झाले. १९५४ मध्ये ते एम्. ए. झाले. १९५६ पासून ते उस्मानिया विद्यापीठात तेलुगूचे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. १९६२ साली त्यांच्या आधुनिक तेलुगू कवितेवरील प्रबंधास पीएच्. डी. मिळाली. ‘सि. ना. रे.’ह्या संक्षिप्त नावाने ते तेलुगू साहित्यात ओळखले जातात.

रायप्रोलू सुब्बराव, ‘श्रीश्री’आदी कवींनी तेलुगू काव्यात जे नवयुग निर्माण केले, त्याचाच वारसा नारायणरेड्डींनी पुढे चालविला. त्यांच्या ऋतुचक्रम् (१९६४) या काव्यसंग्रहास १९६४ साली आंध्र प्रदेश साहित्य अकादेमीचा व मंटलू–मानवुडू (१९७०) या संग्रहास १९७० मध्येच केंद्रीय साहित्य अकादेमीचा पुरस्कार लाभला. त्यांनी आतापर्यंत सु. वीस संगीतिका वा संगीत रूपके (गेयनाटके) लिहिली आहेत. अनेक प्रांतीय वा केंद्रीय साहित्य संस्थांचे ते सभासद आहेत. ते एक श्रेष्ठ कवी म्हणूनच नव्हे, तर पट्टीचे वक्ते व कुशल अध्यापक म्हणूनही प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत.

वरील दोन पुरस्कारप्राप्त संग्रहांशिवाय जलपातम् (१९५३), नारायणरेड्डि गेयालु (३ खंड–१९५५, ६०, ७०), दिव्वेल मुव्वलु (१९५९), समदर्शनम् (१९६०), अक्षराल गवाक्षालु (१९६५), मध्यतरगति मंदहासम् (१९६८), मुखामुखी (१९७१), मनिसिचिलक (१९७२) इ. त्यांचे काव्यसंग्रहही विशेष उल्लेखनीय असून ते वाचताना त्यांच्या संवेदनशील मनाची तसेच पदलालित्याची प्रचीती येते. त्यांनी काही संगीतिकाही लिहिल्या आहेत. त्यांत नागार्जुनसागर (१९५५), स्वप्नभंगम् (१९५५), कर्पूरवसंतरायुल (१९५७, १९६४), वेन्नेलवाडा (१९५९), विश्वनाथ नायडु (१९५९), रामप्पा (१९६०), सुगात्री, मीराताई (१९७२) इ. विशेष उल्लेखनीय होत. त्यांनी लिहिलेली उदयम् ना हृदयम् (१९७३), मार्पुना तीर्पु (१९७४), तेजःसु ना तपःसु (१९७५) ही गद्यकाव्ये प्रसाद आणि ओज या दोन्ही गुणांनी नटलेली आहेत.

हैदराबाद येथे १९७५ साली आयोजित केलेल्या विश्व तेलुगु परिषदेत नारायणरेड्डी यांच्या तरतराल तेलुगु वेलुगु या नृत्य-संगीत-रूपकाचे प्रयोग झाले. त्यामध्ये शतकानुशतके प्रदीप्त असलेल्या आंध्र अस्मितेचे प्रभावी दर्शन त्यांनी घडविले. १९७६ साली त्यांना सन्मान्य डॉक्टरेट देऊन मीरत विद्यापीठाने त्यांचा गौरव केला.

स्वतःच्या ललितमधुर शैलीने त्यांनी आबालवृद्धांना आकृष्ट केले. संस्कृत शब्दांचा व समासांचा यथोचित प्रयोग त्यांनी आपल्या रचनेत केला आहे. त्यांनी विपुल चित्रपटगीतेही लिहिली असून त्यांतील अनेक गीते अत्यंत लोकप्रिय झाली. त्यांचा पिंड जरी पुरोगामी आणि क्रांतिवादी असला, तरी ते कोठल्याही विशिष्ट वादाच्या आहारी गेले नाहीत. नव्याजुन्याचा सुंदर समन्वय साधून स्वतःच्या प्रतिभेने आणि भावानुकूल अभिव्यक्तीच्या द्वारे त्यांनी तेलुगू साहित्यात अढळ स्थान प्राप्त करून घेतले आहे.

लाळे, प्र. ग.