विश्वनाथ सत्यनारायण

विश्वनाथ सत्यनारायण : (६ऑक्टोबर १८९५-१८ऑक्टोबर १९७७). श्रेष्ठ तेलुगू साहित्यिक. जन्म कृष्ण जिल्ह्यातील नंदमूरू या गावी. त्यांचे वडील विश्वनाथ शोभनाद्री हे हरिकथाकार वैदिक ब्राह्मण होते.

विश्वनाथ सत्यनारायण यांचे शालेय शिक्षण मच्छलीपटनम् येथे झाले. मद्रास विद्यापीठातून त्यांनी एम्.ए   .ची. पदवी संपादन केली. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षीच त्यांनी काव्यरचनेस प्रारंभ केला. चेल्लपिल्ल वेंकटशास्त्री यांच्यासारख्या गुरूच्या मार्गदर्शनाने त्यांच्या उपजत कवित्वशक्तीचा विकास झाला. राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात त्यांनी सरकारी नोकरी सोडून १९३३पर्यंत पट्टाभींच्या आंध्र राष्ट्रीय कलाशालेत तेलुगूचे प्राध्यापक म्हणून काम केले. नंतर १९५९पर्यंत मच्छलीपटनम्, गुंतूर, विजयवाडा या ठिकाणी तेलुगूचे प्राध्यापक आणि करीमनगर येथील शासकीय महाविद्यालयात प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले.

 संस्कृत, तेलुगू आणि इंग्रजी भाषा-साहित्य यांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. ‘प्रस्थानत्रयी’चा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. देवी त्रिशती (१९५३) काव्य आणि अमृतशर्मिष्ठम् (१९५८) हे त्यांचे संस्कृत ग्रंथ होत. त्यांच्या असामान्य आणि सर्वस्पर्शी प्रतिभाशक्तीला प्रौढ आणि हृदयंगम शैलीची जोड लाभल्यामुळे त्यांची बहुविध व विपुल वाङ्‌मयसंपदा तितकीच गुणसंपन्न व लोकप्रिय ठरली.६०कादंबऱ्या, ७टीकाग्रंथ, १५नाटके व काही ‘शतके’ असे त्यांचे विपुल साहित्य आहे.

त्यांच्या प्रारंभीच्या कविता विश्वेश्वरशतकम् मध्ये (१९१७) व आंध्रपौरूषम् मध्ये (१९१८) प्रकाशित झाल्या. अंतरात्मा ही पहिली कादंबरी व धन्य कैलासम् हे पहिले नाटक १९२०मध्ये प्रकाशित झाले. त्यांनंतर किन्नेरसानि पाटलू हा भावगीतसंग्रह (१९२४), एकवीरा ही पहिली अद्‌भुतरम्य रोमांचक कादंबरी (१९३०), वेयी पडगलु ही भव्य महाकादंबरी (१९३३), अनारकली नाटक (१९३४), माबहू (१९४१) व चेलियली कत्ता (१९४२) या कांदबऱ्या हे साहित्यप्रसिध्द झाले. स्रोयू थुम्मेडा ही त्यांची कादंबरी १९५९-६१दरम्यान प्रसिध्द झाली आणि श्रीमद् रामायण कल्पवृक्षम् ही त्यांची सर्वश्रेष्ठ काव्यकृती १९३३ते १९६२या दीर्घ कालावधीत पूर्ण झाली. त्यांनी काही कथाही लिहिल्या. एमी संबंधम् ही आगळ्यावेगळ्या नाजूक व अपार्थिव स्त्री-पुरूष नातेसंबंधीचे चित्रण करणारी कथा लक्षणीय आहे.

आंध्रप्रशस्ती, आंध्रपौरूष, कुमाराभ्युदय आणि झाशीच्या राणीवरील प्रबंधकाव्य या साहित्यकृतींतून ऐतिहासिक आणि पौराणिक घटनांच्या आधारे पूर्व दिव्य भूतकाळाची आठवण करून देऊन उज्वल भविष्यासाठी बध्दपरिकर होण्याचे आवाहन ते करतात. जाज्वल्य देशाभिमान आणि ओजस्वी भाषा हे त्यांच्या काव्याचे विशेष होत. विश्वनाथ मध्याक्करलु (१९५५), विश्वनाथपंचशती (१९५८) आणि श्रीमद् रामायण कल्पवृक्षम्हे त्यांचे ईशभक्तिपर काव्यग्रंथ फार नावाजले गेले. पहिल्या ग्रंथात ‘मध्याक्कर’ या जुन्या छंदातील एक सहस्त्र पद्यांत पुण्यक्षेत्रे आणि पुण्यश्‍लोक व्यक्ती यांचे गुणगान गाईले आहे. विश्वेश्वरशतकम् हे फारच बहारीचे काव्य आहे. ईश्‍वर आणि कवी यांच्यात राजा आणि कवी, भूमी व किसान इ. नाती कल्पून केलेली आळवणी, सलगी, क्षणिक राग, क्षमायाचना, ईशदर्शनासाठी भक्ताची आर्त प्रार्थना आदींचा हृद्य आविष्कार त्यात आढळतो. श्रीमद् रामायण कल्पवृक्षम्‌संबंधी कवी स्वत:च म्हणतात-‘मी माझे जीवनसर्वस्व यात ओतले आहे. साहजिकच याच्याइतके लोकप्रिय रामायण तेलुगू भाषेत झालेले नाही. ॠतुसंहार (१९३३) या अद्‌भुत प्रतिभाशाली काव्यात कवीने तेलुगू देशाचे रसरशीत चित्र रेखाटले आहे. विश्वनाथपंचशतीत कवीच्या लेखणीचे मर्मभेदक शरसंधान पाहावयास मिळते. समकालीन घटनांवर तीव्र व्यंग्योक्तिपूर्ण टीका त्यात आहे. कवीचा खरा भावनाविलास शृंगारषीथी (१९१९-२२), शशिदूत (१९३४), गिरिकुमारूनि प्रणयगीतालु (१९२४-२८) व वरलक्ष्मी त्रिशती (१९३४) या काव्यांत दिसतो. यांपैकी शेवटच्या काव्यात पत्नीनिधनानंतर लिहिलेली ‘कर्मशतक’, ‘स्मृतिशतक’ आणि ‘नीतिशतक’ ही पद्ये आहेत. कवीची सुखदु:खे पहिल्या दोहोंत भावपूर्ण भाषेत व्यक्त झाली आहेत. नीतिशतकात स्थितप्रज्ञाच्या मन:शांतीचे दर्शन घडते. इतर काव्यांपैकी किन्नेरसानि पाटलू (१९२४) या भावकाव्यात किन्नेरा नदीचे प्रतीकात्मक वर्णन हृद्य वाटते.

विश्वनाथ सत्यनारायणांची वेयिपडुगुलु (१९३३) ही एक हजार पृष्ठांची महाकादंबरी गद्यकाव्यास शैलीचा अप्रतिम नमुना आहे. या कादंबरीला साहित्य अकादेमीचा पुरस्कार लाभला (१९६३). पारंपरिक भारतीय विद्यांचा त्यांत अधिकारवाणीने मागोवा घेतला आहे. समाजेतिहासाचा वाड्मयोन स्वरूपाचा दस्तऐवज म्हणूनही त्याचे महत्व आहे. नर्तनशाळा हे कीचकवधावरील त्यांचे नाटकही कलादृष्ट्या श्रेष्ठ प्रतीचे आहे. नत्रय, पेद्दना आणि नाचन सोमना यांच्या काव्यकृतींचे त्यांनी केलेले रसग्रहणात्मक सविस्तर समीक्षणही रसिकादरास पात्र ठरले. त्यांना अनेक मानसन्मान लाभले : साहित्य अकादेमी पुरस्कार (१९६३) आंध्र विद्यापीठ, वॉल्टेअर यांच्यातर्फे ‘कलाप्रपूर्ण’ हे मानाभिधान (१९६४) ‘कविसम्राट’ (१९३५) व पद्यभूषण हे किताब १९७०मध्ये साहित्य अकादेमी, नवी दिल्लीचे अधिछात्र (फेलो) म्हणून निवड १९७१मध्ये श्रीवेंकटेश्‍वर विद्यापीठ, तिरूपती यांच्यातर्फे ‘डी. लिट्.’ ही सन्मान्य पदवी आंध्र प्रदेश शासनातर्फे ‘राजकवी’ म्हणून नियुक्ती आणि १९७१मध्ये श्रीमद रामायण कल्पवृक्षम् या साहित्यकृतीसाठी सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना लाभला. गुंतूर येथे त्यांचे निधन झाले. मनस्वी लेखक आणि ओजस्वी वक्ता म्हणून त्यांची कीर्ती अजरामर झाली आहे.

टिळक, व्यं. द.