त्रिपुरनेनी

रामस्वामि चौधरी, त्रिपुरनेनि : (१८८६ – १९४३). तेलुगू नाटककार, कवी, समीक्षक, समाजसुधारक आणि बुद्धिवादी विचारवंत. जन्म कृष्णा जिल्ह्यातील अंगलूर या गावी. मच्छलीपटनम् येथील महाविद्यालयात प्रथम वर्षापर्यंत शिक्षण. यांना कविप्रतिभेची देणगी जन्मतःच मिळाली होती. कवित्वाबरोबरच तीव्र आलोचनाशक्ती व जाज्वल्य देशाभिमान ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची भूषणे होती. त्यांनी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टरची परीक्षा पास केली व परत आल्यानंतर मच्छलीपटनम् व विजयवाडा येथे वकिली केली. त्यानंतर ते तेनालीला येऊन राहिले. तेथील वास्तव्यात त्यांच्या द्रविड अस्मितेचा उदय झाला व त्यांचा कल जस्टिस पार्टीच्या सिद्धांताकडे झुकू लागला. त्यांचे बरेचसे लिखाण बंडखोरीचे आहे. प्रस्थापित आर्यसिद्धांतांना त्यांनी कडाडून विरोध केला. प्राचीन साहित्याचे पुनर्मूल्यांकन करून त्यांनी काही नवीन सिद्धांत मांडले. कुरुक्षेत्रसंग्राममु (१९११) या गाजलेल्या नाटकात त्यांनी महाभारतात कौरवांवर फार मोठा अन्याय झाला आहे कारण महाभारताचे लेखक पांडव-पक्षपाती होते, असे प्रतिपादन केले. शंबुकवध (१९२०) या नाटकात त्यांनी रामावर ताशेरे मारलेले आहेत, तर खुनी (१९३५) मध्ये त्यांनी क्रूर समजल्या जाणाऱ्या वेनराजाचे समर्थन केले आहे.

संस्कृत नाटके ही प्रयोगानुकूल नसल्यामुळे त्यांचा आदर्श आधुनिक युगात कुचकामाचा आहे, असे त्यांचे म्हणणे होते. सूतपुराणम् (१९३४) व धूर्तमानव (१९४३) ही त्यांची काव्ये होत. प्रत्येक प्रक्रिया बुद्धिवादाच्या निकषावर कठोरपणे घासली गेली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. त्याच निकषावर त्यांनी रामायण-भारतादी ग्रंथांची तपासणी केली. रामस्वामी चौधरी यांनी बुद्धिवादी युगाचा तेलुगू साहित्यात आरंभ केला, असे मानले जाते.

लाळे, प्र. ग.