रघुनाथ नायक: (सतरावे शतक). तंजावर येथील कलारसिक, विद्वान व कवी राजा. विजयानगर साम्राज्याच्या पतनानंतर तेलुगू भाषा व साहित्यास दक्षिणेत चांगलाच राजाश्रय मिळाला. विशेषतः ⇨तंजावरआणि ⇨मदुराईयेथील नायक राजांनी अनेक कवींना आश्रय दिला, इतकेच नव्हे, तर काही राजांनी तेलुगूमध्ये रचनाही केली आहे. तंजावरचे रघुनाथ नायक (कार. सु. १६१४-सु. १६३३). हे स्वतः मोठे रसिक, तेलुगूचे व संस्कृतचे पंडित व कवी होते. दक्षिणान्ध्र युगाचा प्रारंभ रघुनाथ नायकांपासून झाला. रघुनाथ नायक हे शूर, संगीतज्ञ, कवी आणि कलासाहित्याचे उदार आश्रयदाते होते. त्यांनीच ‘सरस्वती महाल’ या तंजावरच्या ग्रंथालयाची पायाभरणी केली. त्यांच्या ‘इंदिरा-मंदिर’ नावाच्या दरबारात ⇨चेमकूरवेंकटकवी, गोविंद दीक्षित, यज्ञनारायण दीक्षित इ. विख्यात कवी आणि मधुरवाणी व रामभद्रांबा ह्या कवयित्री होत्या. रघुनाथ नायक व त्यांचा तिसरा पुत्र विजयराघव नायक (कार. १६३३-७३) या दोघांनीही संगीत, नृत्य, नाटा, शिल्प, साहित्य इ. कलांना उदार आश्रय दिला व तेव्हाच्या तंजावर प्रांतात तेलुगू साहित्याचा सक्रिय प्रचार व प्रसार केला. याच काळात ‘यक्षगान’ किंवा नृत्यप्रधान नाटकांचा उद्‌भव झाला. दक्षिणेत ⇨कूचिपूडीनावाचा एक नृत्यप्रकार आहे. या नृत्याद्वारा ‘वीथी’ नावाच्या रूपकांची साभिनय अभिव्यक्ती होत असे. त्यातील कथावस्तू पौराणिक घटनांवर आधारलेली असे. ⇨यक्षगानात गद्य व पद्य यांचे मिश्रण असे. ‘देरुवु’ नावाचा ताल, ‘तोहार’ कीर्तन, पद्य, गद्य या सर्वांचा समावेश यक्षगानांत केला जात असे. रघुनाथ नायकांच्या कारकीर्दीत यक्षगानांना विशेष प्रोत्साहन मिळत गेले. नृत्याभिनयाच्या एका विशेष साहित्यिक रीतीचा उद्‌भव रघुनाथ नायकांच्या काळात झाला व पुढे तिचा खूपच विकासही झाला. रघुनाथ नायकांनी स्वतः काही ‘प्रबंध’ म्हणजे महाकाव्ये रचिली होती. त्यांपैकी पारिजातापहरणमु, गजेंद्रमोक्षमु, रुक्मिणीकृष्णविवाहमु (यक्षगान), नलचरित्रमु (द्विपद छंदातील काव्य), जानकीपरिणयमु, शृंगारसावित्री इ. विशेष उल्लेखनीय आहेत. रघुनाथरामायणमु हे त्यांचे चार आश्वासांत रचलेले चंपूकाव्य. चंपूसाहित्यात ते महत्त्वाचे मानले जाते.

याशिवाय त्यांनी आपल्या पित्याचे चरित्र अच्युताभ्युदयम् हे द्विपद छंदात रचले. वाल्मीकिचरित्रमु  हे त्यांचे तीन आश्वासांत रचलेले लघुकाव्य आहे.

पहा : नायक राजे.

लाळे, प्र. ग.