वेटूरि प्रभाकरशास्त्री

प्रभाकरशास्त्री, वेटूरि : (७ फेब्रुवारी १८८८–२९ ऑगस्ट १९५०). प्रसिद्ध तेलुगू कवी, व्यासंगी संशोधक–समीक्षक व लेखक. जन्म कृष्णा जिल्ह्यातील दिवी तालुक्यातील एका खेडेगावात. प्रसिद्ध तेलुगू कवी चेल्लपिळ्ळ वेंकटशास्त्री यांच्याजवळ तेलुगू व संस्कृत भाषांचे अध्ययन. वयाच्या सोळाव्या वर्षीच ते कॅटेल हायस्कूल, मद्रास येथे शिक्षक म्हणून नोकरीस लागले. सु. तीस वर्षे त्यांनी मद्रासच्या हस्तलिखित संग्रहालयातही काम केले. नोकरी करीत असताना त्यांचे स्वतंत्र संशोधनकार्य व काव्यलेखन चालूच होते.

त्यांनी लिहिलेल्या काव्यांत मून्नाळ्ळ मुच्चट (१९२२), कुडुपुतीपु (१९२५), कपोतकथा (१९२६) व विश्वासमु (१९२६) ही विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांमध्ये त्यांची विदग्ध रसवृत्ती स्पष्टपणे दिसून येते. संस्कृत काव्याची समासप्रचुर शैली व तेलुगूचे सहजमाधुर्य यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या काव्यशैलीत झाला आहे.

प्रभाकरशास्त्रींनी अनेक संस्कृत नाटकांचे सुगम तेलुगू अनुवाद प्रसिद्ध केले. कर्णभार (१९१३), भगवद्ज्जुक (१९२४), प्रतिमा (१९२७), मत्तविलासप्रहसन (१९३४), नागानन्द (१९५४) ही त्यांची अनुवादित नाटके प्रसिध्द आहेत. तेलुगू साहित्यातील काही विनोदी पद्यांचा संग्रहही चाटुपद्यमणिमंजरी (१९१४, १९२२) या नावाने त्यांनी संपादून प्रकाशित केला.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आंध्र साहित्यात ग्रांथिक भाषा विरुद्ध व्यावहारिक भाषा असे वादंग माजले होते. त्यात बोलभाषेचा पक्ष उचलून धरणाऱ्या तीन पंडितांपैकी प्रभाकरशास्त्री हे होते. त्यांनी सुबोध व लोकांच्या रोजच्या व्यवहारातील भाषेचा आपल्या लेखनात प्रयोग केला व त्या भाषेतही अनेक गंभीर विषयांचे विवेचन करता येणे शक्य आहे, हे समर्थपणे दाखवून दिले. दिव्यदर्शनमु (१९२४), चिन्ननाटी चेष्टलु (१९२७), तेलुगू मेरुगुलु (१९५०) आदी निबंधसंग्रहांत त्यांनी ‘लिपिसंस्करणा’पासून ‘ताडीच्या झाडा’पर्यंत अनेक विषयांवर सोप्या भाषेत निबंध लिहिले.

त्यांनी बसवपुराण, क्रीडाभिराम, उद्‌भटाराध्यचरित्र आदी काव्यांना विद्वत्तापूर्ण चिकित्सक प्रस्तावना लिहिल्या. त्या सर्वांवरून त्यांच्या सूक्ष्म विवेचक बुद्धीची कल्पना येते. १९५२ साली त्याचे प्रज्ञाप्रभाकरमु नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. परंतु या सर्वांपेक्षा त्यांनी ⇨ ताळ्ळपाक अन्नम्माचार्यांच्या कीर्तनांचे जे परिश्रमपूर्वक संपादन केले, त्यामुळे त्यांचे नाव तेलुगू साहित्यात अजरामर झाले आहे. तिरुपति–मंदिरात अडगळीत पडून असलेल्या ताम्रपटांवरील शेकडे कीर्तनांचा शोध लावून त्यांनी ती कीर्तने विस्तृत प्रस्तावनेसह ग्रंथरूपाने प्रसिद्ध केली व तेलुगू साहित्यातील रसाळ भक्तिसाहित्य उजेडात आणले. त्यांनी उतारवयात योगदर्शनाचा अभ्यास करून ‘योगी’ म्हणूनही ख्याती मिळविली. प्रभाकरशास्त्री यांच्या व्यक्तिमत्त्वात कवी, संशोधक, साहित्यसमीक्षक, गद्यलेखक व योगी या सर्वांचा अभूतपूर्व संगम दिसून येतो. तिरुपती येथे ते निधन पावले.

लाळे, प्र. ग.