पिंगली सूरना : (सु. १५२०-सु. १५८०). मध्ययुगीन तेलगू कवी. पिंगली सूरना हा कृष्णा जिल्ह्यातील पिंगली येथे राहणारा असावा. मातापिता अमरना व अन्बम्मा. त्याच्या कालाविषयीही अभ्यासकांत मतभेद आहेत. तो कृष्णदेवरायाच्या दरबारातील अष्टदिग्गजांपैकी एक होता तो नंद्याल नरेश कृष्णराजूच्या पदरी राजकवी होता अशी विविध मते त्याच्याविषयी अभ्यासकांत प्रचलित आहेत. संस्कृत व तेलुगूचा गाढा व्यासंग व असामान्य प्रतिभा त्याच्या ठिकाणी असल्याबाबत मात्र सर्वच अभ्यासकांत एकमत आढळते.

गरूडपुराण, राघवपांडवीयमु, कलापूर्णोदयमु आणि प्रभाषती प्रद्युम्नमु हे त्याचे चार ग्रंथ आहेत. त्यांपैकी पहिला उपलब्ध नाही. उर्वरित तीन काव्ये उपलब्ध असून ती प्रबंधकाव्ये (महाकाव्ये) म्हणून ओळखली जातात.

राघवपांडवीयमूत श्लेषाच्या आधारे एकाच वेळी रामायण आणि महाभारतकथा त्याने निविदल्या आहेत. तेलुगूत अशा प्रकारची श्लेषात्मक काव्यरचना करणे सोपे नाही, असे स्वत: त्यानेच म्हटले आहे आणि ते खरेही आहे. विशेष म्हणजे असे काव्य सुबोध आणि रमणीय होणे, हे विशेष प्रयासाचे काम आहे. सूरनाने मात्र त्यात यश मिविळले आहे. तेलुगूतील श्लिष्ट काव्याची सुरूवात सर्वप्रथम पिंगली सूरनानेच केली आणि तिचा प्रभाव नंतरच्या कवींवरही पडला.

सूरनाच्या प्रतिभेचा खरा आविष्कार त्याच्या कलापूर्णोदयमूमध्ये (सु. १५५०) दिसतो. हे तेलुगूतील पहिले अदभूत आणि कल्पनारम्य असे महाकाव्य होय. हे वाचताना शेस्कपीअरच्या कॉमेडी ऑफ एरर्सच्या कथानकाची आठवण होते. मनोव्यापारांचे सूक्ष्म चित्रण, शृंगाराच्या विविध छटा, अदभूत रसाची डूब, नाट्यपूर्ण संवाद या सर्वच गोष्टीचा या काव्यात मनोज्ञ संगम झालेला आढळतो. असा संगम सूरनाच्या काळापर्यंत अपूर्वच होता. सूर्यनारायणशास्त्री यांनी कलापूर्णोदयमूचा संस्कृतमध्ये सुंदर पद्यानुवाद केला असून तो आंध्र प्रदेश साहित्य अकादेमीने १९६७ मध्ये प्रकाशितही केला आहे. सूरनाच्या ह्या श्रेष्ठ साहित्यकृतीचा संस्कृत गद्यानुवादही काही वर्षापूर्वीच प्रसिद‌्ध झाला आहे. 

तत्कालीन रसिकांना हा नवा प्रयोग बहुधा आवडला नसावा. म्हणून कविने प्रभाषतिप्रद्युम्नमु या प्रबंधकाव्याची रचना केली. पाच आश्वासांच्या या काव्यात वीर आणि शृंगार या रसांचा उत्तम परिपोष केलेला आहे. यातही कल्पनासौंदर्याने नटलेले कथानक आणि चातुर्यपूर्ण संवाद आढळतात. या काव्यात हंसदूती शूचिमुखी हिची स्वभावरेखा विशेष लक्षणीय आहे. त्याची रचना कित्येक स्थळी अगदी तिक्कन्नासारखीच वाटते. सूरनाचे कलापूर्णोदयमु हे प्रबंधकाव्य त्यातील काव्यगुणांमुळे तेलुगू साहित्यात चिरंतन झाले आहे. 

टिळक,व्यं. द. 

Close Menu
Skip to content