भमिडिपाटि कामेश्वरराव : (१८ एप्रिल १८९७-? १९५७). तेलुगूतील विनोदी कथालेखक. जन्म अकिवीडू (जि. गोदावरी) येथे. एलुरू व नरसापुरम येथे शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण काकिनाडा व राजमहेंद्री येथे घेतले. १९१८ साली गणित विषय घेऊन ते बी.ए. झाले व १९२२ साली एल.टी. परीक्षा मद्रास विद्यापीठातून उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते राजमहेंद्रींच्या वीरेशलिंगम् उन्नत पाठशाळेत गणिताचे अध्यापक म्हणून नियुक्त झाले व तेथूनच १९५२ साली मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. बुद्धी गणिती असली, तरी त्यांची वृत्ती विनोदप्रिय होती. त्यांच्या विनोद कथा वाचत असताना वाचक दिलखुलासपणे हसत राहतो. वीरेशलिंगम् यांचा विनोद प्रक्षोभक, पानुगंटीचा प्रबोधक, तर कामेश्वरराव यांचा प्रमोदक आहे. विनोदाची पखरण करीत असता ते असे एखादे वाक्य घालतील, की वाचक आपले हसे थोडा वेळ आवरून अंतर्मुख बनतो. कचटतपुलू, चिक्केश्वरराव ही त्यांची पात्रे मराठीतील ‘चिमणरावां’ सारखी तेलुगूत सर्वश्रुत आहेत. त्यांची शैली चुरचुरीत आहे व तिला अनेक वाकप्रचारांचे प्रसाधन लाभले आहे. कालक्षेपमु (२ भाग-१९२८, ४८), आषुनु (१९३०), रेंडु रेळ्ळु (१९५१), मायल मालोकम् (१९५१), लोकोमिमरुचि (१९५२), निजम् (१९५६) हे त्यांच्या विनोदी कथांचे प्रसिद्ध संग्रह आहेत. त्यागराजु आत्मविचारमु (१९४१) या ग्रंथात त्यांनी त्यागराजाच्या काही कीर्तनाचे गद्यात स्पष्टीकरण केले आहे. राक्षसग्रहणमु (१९५२), वसन्तसेना (१९५२) ही संस्कृतातील नाटके त्यांनी तेलुगुमध्ये भाषांतरीत केली आहे. मेजुवाणी (१९५२) या ग्रंथात वेश्येच्या जीवनाचे त्यांनी वर्णन केले आहे. टॉलस्टॉय कथलु (१९५७) या पुस्तकात टॉलस्टॉयच्या काही कथांचा तेलुगू अनुवाद आहे. कामेश्वरराव यांच्या भाषेत सर्वांगसुंदर विनोद आहे, तर त्यांच्या भावरेखनात सुचकतेने निर्माण होणारे व विचारांना भावणारे हास्य आहे. विनोदी नाटककार म्हणूनही त्यांना तेलुगूत महत्त्वाचे स्थान असून प्रायोगिक दृष्ट्याही त्यांची नाटके लोकप्रिय आहेत.

लाळे, प्र.ग.