तेलुगु साहित्य : भाषिक संख्येच्या दृष्टीने भारतीय भाषांत हिंदीनंतर तेलुगूचा क्रम लागतो. तिला आंध्रभाषा किंवा ‘तेनुगू’ असेही म्हणतात. ‘तेनुगू’ म्हणजे मधाप्रमाणे मधुर विजयानगरच्या कृष्णदेवरायाने ‘तेलुगू ही सर्व देशभाषांत गोड आहे’, असे म्हटले आहे. ब्राऊनसारख्या पाश्चात्त्य अभ्यासकाने ‘पूर्वेकडील इटालियन’ असे तिचे गौरवाने वर्णन केले आहे. इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून तेलुगू भाषेला स्वतंत्र रूप येऊ लागले असावे तथापि इ. स. सहाव्या शतकापासून तिच्या विकासाला चांगला वाव मिळाल्याचे दिसते.

तेलुगू साहित्याच्या इतिहासाचे स्थूलमानाने पुढीलप्रमाणे कालखंड पाडता येतात : (१) तमोयुग : (इ. स. पू. २५० ते इ. स. १०००), (२) प्रथम कालखंड : (१००१ ते ११५०), (३) द्वितीय कालखंड : (११५१ ते १५००), (४) तृतीय कालखंड : (१५०१ ते १७००), (५) चतुर्थ कालखंड : (१७०१ ते १८५०), (६) अर्वाचीन कालखंड : (१८५१ ते १९४७ आणि (७) स्वातंत्र्योत्तर कालखंड : (१९४७ नंतर).

तमोयुग : बोलभाषा म्हणून काहीसे स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाल्यानंतरही तेलुगूवर संस्कृत भाषेचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम होतच राहिला. इ. स. पू. तिसऱ्या शतकात आंध्रात बौद्ध धर्माचा प्रभाव वाढला. तेव्हा पालीशी साधर्म्य असलेली तेथील प्राकृत ही बौद्धांच्या प्रचाराची भाषा झाली. साहजिकच तेलुगूवर या प्राकृतचाही प्रभाव पडला. इ. स. पू. २०० पासून राज्यकर्त्यांची आज्ञापत्रे, दानपत्रे इ. कोरीव लेखच नव्हे, तर गाहा सत्तसईसारखे ग्रंथही प्राकृतातच लिहिले गेले. त्यांतही काही ठिकाणी व्यक्ती, पदार्थ आणि स्थळे यांची तेलुगू नावे आढळतात. कालांतराने आंध्र प्रदेशात विष्णू कुंडिनांची सत्ता आली, तेव्हा अशा लेखांतून संस्कृत शब्दांची तेलुगू अनेकवचनी प्रत्ययांची रूपे येऊ लागली. रेनाटी चोलकालीन कोरीव लेखांत तेलुगू शब्द आले. याच वंशातील धनंजयाचा ‘कोलमल्ला कोरीव लेख’ हा पहिला तेलुगू कोरीव लेख होय (इ. स. ५७५). नवव्या शतकापूर्वीचे सर्व कोरीव लेख गद्यरूपच आहेत. गुणग विजयादित्याच्या राजवटीतील ‘अद्दंकी कोरीव लेखा’त पहिले तेलुगू पद्य आढळते (इ. स. ८४८). यानंतरच्या अनेक कोरीव लेखांत देशी वृत्तांचा उपयोग केलेला आहे. या सर्व दानासंबंधीच्या लेखांना फारसे साहित्यमूल्य नाही तथापि राजाश्रयामुळे तेलुगूच्या विकासास अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांतून दिसते. या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारची गीते तीत उत्स्फुर्तपणे रचली जात होती तथापि तेलुगूच्या बाल्यावस्थेतील हे लोकसाहित्य काळाच्या उदरात गडप झालेले असल्यामुळे त्या कालखंडाला तमोयुग म्हटले आहे.

प्रथम कालखंड : प्रथम व द्वितिय कालखंडाच्या सु. ४५० वर्षांत पूर्व चालुक्यांचे राज्य होते. शांतता आणि स्थैर्य यांमुळे त्या काळात भरीव सांस्कृतिक प्रगती घडून आली. प्राकृतची जागा तेलुगूने घेतली व तेलुगू अस्मितेने हळूहळू आकार घेतला.

धार्मिक जागृती हीच तेलुगू साहित्याची प्रारंभ काळातील प्रेरणा दिसते. अवैदिक पंथांच्या प्रसारास प्रभावीपणे आळा घालता यावा, म्हणूनच बहुधा वेंगीनरेश राजराज नरेंद्राने नन्नयास आंध्र महाभारताची रचना करावयास सांगितले असावे. त्याच्या आधी सु. २५० वर्षे कन्नड महाभारत रचले गेले होते. त्याच्या सारखी रचना तेलुगूत असावी, असेही राजराज नरेंद्रास वाटले असावे. ⇨ नन्नय हे जरी संस्कृत आणि तेलुगूचे पंडीत होते, तरीही सामान्य जनभाषेत महाभारतासारखी भव्य रचना करण्याचे कामही त्यांनी समर्थपणे केले. त्यांनी तत्कालीन लोकसाहित्याच्या आधारे संस्कृत व देशी शब्दांचा व वाक्प्रचारांचा सहजसुंदर असा उपयोग केला. सकृद्दर्शनी भाषांतररूप वाटणाऱ्या अडीच पर्वांच्या या अपूर्ण ग्रंथातही नन्नयाची अभिजात काव्यप्रतिभा प्रत्ययास येते. त्यात गद्यपद्यमिश्र अशा चंपूशैलीचा प्रसंगोचित उपयोग केलेला असल्यामुळे तेलुगू गद्य वाङ्‌मयाचा आरंभही तेव्हाच झाला, असे म्हणता येईल. काही विद्वानांच्या मते आंध्र शब्दचिंतामणी हे तेलुगूचे पहिले व्याकरण नन्नयानेच रचिले.

आपल्या कुमारसंभवात ⇨नन्नेचोड या नन्नयाच्या समकालीन कवीने देशी शैलीचा अवलंब केला. प्रचलित वाक्प्रचार आणि म्हणी यांचाच त्याने मुख्यत्वे उपयोग केला.

याच कालखंडात बेमुलवाडा भीमकवीने राघवपांडवीय, शतकंठरामायण आणि नृसिंहपुराण या ग्रंथांची रचना केली. त्यांपैकी पहिल्या ग्रंथात श्लेषात्मक रचना करून एकाच वेळी दोन कथा सुचित केल्या आहेत.

द्वितिय कालखंड : राजराज नरेंद्राच्या मृत्यूनंतर चालुक्यांच्या राजवटीचा ऱ्हास होत गेला. वरंगळ येथे काकतीय सत्ता स्थापन झाली. पश्चिमेकडील शेवटचा चालुक्य राजा भुलोकमल्ल याचा वध करून त्याचा सेनापती बिज्जल हा सत्ताधारी झाला. त्याचा मंत्री ⇨ बसवेश्वर याने वीरशैव संप्रदाय वाढवला. हा स्वतः चांगला कन्नड कवी होता. काकतीय राजांनीही या सामाजिक आणि धार्मिक सुधारणावादी संप्रदायाचा पुरस्कार केला.

या काळातील प्रमुख कवी ⇨ पाल्कुरीकी सोमनाथ याने बसवपुराण हे लोकप्रिय काव्य रचले. बहुतांशाने देशी शब्दांचा उपयोग आणि द्विपद या देशी छंदाची योजना त्याने त्यात केली. नन्नयाने पुरस्कारिलेले व्याकरणनियमही त्याने झुगारले. बसवपुराणाने सहस्रावधी तेलुगू शब्द साहित्यात सुप्रतिष्ठित केले. कथाविषयामुळे वीरशैव वाङ्‌मयावर कन्नडचा बराच प्रभाव पडला आहे. सोमनाथाच्या शैलीचे अनुकरण इतर अनेक कवींनी केले.

रंगनाथ कवीने द्विपद छंदात रामायण रचून तेलुगूत रामकथेची परंपरा सुरू केली. सुमतीशतकाचा कर्ता ⇨ बद्देना याने शतकसाहित्याच्या परंपरेचा पाया घातला.


 काकतीयांच्या तीन शतकांच्या राजवटीत आंध्राच्या राष्ट्रीय अस्मितेचा पूर्ण विकास झाला. त्याचे प्रतिबिंब साहित्यात स्पष्टपणे पडले आहे. मल्लना, विन्नकोट पेदन्नाप्रभृतींनी काव्याव्यतिरिक्त साहित्यशास्त्र आणि व्याकरणग्रंथांची रचना केली. नेल्लोरचा महाकवी  ⇨ तिक्कन्न हा या कालखंडाचा खरा प्रतिनिधी होय. हा सर्वच बाबतींत समन्वयवादी होता. मनुमसिद्धी राजाच्या या मंत्र्याने धर्माद्वैत या नव्या संप्रदायाची स्थापना केली व हरिहरऐक्य प्रतिपादिले. नन्नय आणि नन्नेचोड यांच्या भिन्न साहित्यिक परंपरांचा समन्वय करण्याचा त्याने प्रयत्न केला. कित्येक संस्कृत शब्दांना तेलुगूरूप दिले. निर्वचनोत्तर रामायण आणि नन्नयाने अर्धवट सोडलेल्या महाभारताची ४ ते १८ ही पर्वे त्याने रचिली. यात त्याच्या असामान्य प्रतिभेचे दर्शन घडते.

सोळाव्या शतकात ज्या ‘प्रबंध’ रचनेला (महाकाव्यरचनेला) बहर आला, त्याचा प्रारंभ तिक्कन्नाचा शिष्य केतन (१२२०–६०) याच्या दशकुमारचरिताने केला. मूळ संस्कृत ग्रंथातील पदलालित्य साधून त्याने हे महाकाव्य लिहीले आणि विज्ञानेश्वरीय या नावाने याज्ञवल्क्यस्मृतीचा अनुवादही केला. आंध्रभाषाभुषण या व्याकरणाची त्याने रचना केली. ज्याप्रमाणे तेलुगू महाभारताची रचना तिघांनी वेगवेगळ्या काळी केली, त्याप्रमाणे तेलुगू भास्कररामायणाची रचनाही भास्करकवीखेरीज आणखी तिघांनी केली आहे. तेलुगू साहित्याचे हेही एक वैशिष्ट्यच होय.

कवी मारनाने मार्कंडेयपुराण  रचून पुराणपरंपरेचा पाया घातला. कोमल, भावपूर्ण शब्दांची व संवादांची योजना केल्यामुळे मारनाच्या काव्यपरंपरेला ‘वस्तुकविता’ हे नाव आहे. यातील भाषेला ‘जानुतेलुगू’ असे नाव आहे.

तृतीय कालखंड : काकतीयांचा १३२६ मध्ये ऱ्हास झाल्यानंतर आंध्राच्या काही भागावर आधी बहमनी राजांची आणि नंतर कुत्बशाहीची सत्ता होती. कृष्णा व गोदावरी यांमधील प्रदेशात तीन लहान आंध्र राज्ये होती. याव्यतिरिक्त विजयानगराचे वैभवशाली राज्यही होते. त्यामुळे आंध्र प्रदेशाची राजकीय एकात्मता नाहीशी झाली, तरी तेलुगू साहित्याचा विकास खुंटला नाही. कारण बहुतेक राज्यकर्ते विद्या, कला आणि साहित्य यांचे भोक्ते होते.

शैव संप्रदायाचा प्रभाव राजाश्रयाभावी कमी झाला. तेलुगू व संस्कृत साहित्यमूल्यांचा पुन्हा समन्वय झाल्यामुळे तेलुगूचे वैभव वाढले. संस्कृत महाकाव्ये आणि नाटके यांच्याकडे कवी आकृष्ट झाले. साऱ्या भारतात भक्तिआंदोलन चालू होते. आंध्र प्रदेशातही बम्मेर ⇨ पोतनाकृत भागवताचा अवतार झाला. नाचन ⇨ सोमना, ⇨ एर्राप्रेगडा व  ⇨ श्रीनाथ हे नामवंत कवीही या काळात उदयास आले. यांपैकी प्रत्येकाने तेलुगूला स्वतंत्र शैलीचा साज चढविला. ⇨ पेद्दनाच्या मनुचरित्राने प्रबंधासारखा संस्कृत महाकाव्यसदृश्य नवा काव्यप्रकार रूढ केला. नन्नयाने अर्धवट सोडलेले महाभारताचे तिसरे पर्व एर्राप्रेगडाने पूर्ण केले. ⇨ पिल्ललमर्री पिनवीरभद्र याने शकुंतला परिणयमु हा अपुर्व काव्यग्रंथ लिहिला. विजयानगरच्या साम्राज्यात आंध्रचा बराचसा भाग समाविष्ट होता. त्यामुळे सम्राट कृष्णदेवरायाने तेलुगू साहित्याला चांगले प्रोत्साहन दिले. ⇨ कृष्णदेवरायाच्या राजवटीला तेलुगू साहित्याचे सुवर्णयुग मानतात. त्याच्या राजसभेत आठ प्रतिभावान कवी होते. ⇨ मोल्ल वा मोल्लांबाप्रभृती कवयित्री याच काळात झाल्या. ⇨ वेमना आणि ⇨रामदास उर्फ कंचेर्ल गोपनासारख्यांनी विविध विषयांवर शतककाव्ये रचिली.

विजयानगरचा पाडाव १५६५ मध्ये झाला पण तंजावरच्या मराठा राजांनी आणि मदुराई येथील राजघराण्यांनीही तेलुगू साहित्याला चांगले उत्तेजन दिले. शहाजी, विजयराघव नायक, ⇨ चेमकूर वेंकटकवी व रंगाजम्म यांची या काळातील रचना उल्लेखनिय आहे. ⇨ त्यागराजांच्या कृतींनी तेलुगूला तमिळ भाषिक प्रदेशात चिरस्थायी मान्यता मिळवून दिली. गायन आणि अभिनय यांनी युक्त असा ⇨ यक्षगाननामक अभिनव नृत्यनाट्यप्रकार या काळात रूढ झाला.

चतुर्थ कालखंड : तुलनात्मक दृष्टीने पाहता या कालखंडातील तेलुगू साहित्य तितकेसे समृद्ध मानता येणार नाही पण त्यात विविधता मात्र निश्चित होती. कुचीमंची तिम्मकवी (१७०१–५६) याने या काळात शतक, दंडक आणि प्रबंधकाव्याखेरीज प्रमाणभूत लक्षणग्रंथ लिहिले. ‘श’कार आणि ‘प’कार विरहीत ऱ्हस्व ‘ए’कार आणि ‘आ’कार तसेच दंत्य ‘च’कार आणि ‘ज’कार यांनी युक्त अशा मधुरतर ‘अच्च’ (शुद्ध) तेलुगूत त्याने रामायणही लिहिले. कंकंटी पापराजूने लिहिलेले उत्तररामायण वैदर्भी रीतीसाठी प्रसिद्ध आहे. फार्सी, अरबी आणि अन्य भाषांतील अपभ्रष्ट रूपे तेलुगूत शिरल्यामुळे अनेकांनी लक्षणग्रंथ लिहिले. आंध्रभाषापर्वमुनामक निघंटूची रचनाही या काळात झाली. धार्मिक विषयांवरील आणि योगविद्येसंबंधी ग्रंथही रचले गेले. याचबरोबर विलासी राजांना संतुष्ट करण्यासाठी कूचिमंची जग्गकवीप्रभृतींनी बरीच शृंगारिक रचनाही केली. नारायण कवीची बोब्बिली इतिहासकथा, चौडप्पाचे कंद छंदातील आणि रोगिलपाटी कूर्माचे सीस छंदातील शतक, कासुल पुरुषोत्तमाचे व्याजोक्तीपूर्ण आंध्रनायकशतक ही स्वतंत्र प्रवृत्तीची निदर्शक आहेत. आडिदमू सुरकवी आणि पिंडीप्रोलू लक्ष्मणकवी हे प्रमुख चाटुकाव्यरचयिते आणि भक्तीपर पदे रचणारा ⇨ क्षेत्रय्या यांचाही उल्लेख करावयास हवा. या कालखंडात काव्याव्यतिरिक्त गद्यसाहित्यही निर्माण होऊ लागले.

अर्वाचीन कालखंड : इंग्रजी राजवट या देशात स्थीर झाल्यानंतरही काही काळपर्यंत परंपरागत स्वरूपाचे वाङ्‌मय तेलुगूत निर्माण होत राहिले. महाभारत, भागवत, रामायण व संस्कृत नाटके यांचे तेलुगूत पुन्हा अनुवाद झाले. एकट्या श्रीपाद कृष्णमूर्तिशास्त्र्यांनी रामायण, महाभारत, भागवताखेरीज प्रबंध, नाटके आणि गद्यग्रंथ मिळून शंभराहून अधिक ग्रंथ रचिले. ⇨ कंदुकूरी वीरेशलिंगम्‌ पंतुलूंनी कादंबरी, कथा, प्रहसने, नाटक, टीका, चरित्र, आत्मचरित्र या विविध साहित्यप्रकारांचा तेलुगूत पाया घातला. ⇨ तिरुपति–वेंकटकवुलू यांनी अनेक प्रकारच्या ग्रंथरचनेबरोबर आपल्या शीघ्रकवित्वाद्वारे लोकात काव्याभिरुची निर्माण केली.


याउलट नवसुशिक्षित तरुणांनी इंग्रजी कवींच्या अनुकरणाने भावकवितेचा पाया घातला. कथात्मक लघुकाव्य, खंडकाव्य, आत्मनिष्ठ काव्य, निसर्गपर काव्य व गूढकाव्य यांची निर्मिती झाली. आधुनिक तेलुगू काव्याचे जनक ⇨ गुरजाड वेंकट अप्पाराव आणि ⇨ रायप्रोलू सुब्बराव हे होत. समकालिन राजकीय आणि सामाजिक चळवळींचे प्रतिबिंब साहित्यात उमटू लागले. हुंडा, बालविवाह, अस्पृश्यता इत्यादींस विरोध स्वराज्याची चळवळ शेतकरी–कामगारांची सुखदु:खे यांचा अविष्कार तेलुगू कवींनी केला. त्यांच्या कल्पना नवीन असल्या तरी, भाषा आणि वृत्ते यांच्या बाबतीत त्यांचे धोरण बहुतांशी परंपरागतच राहिले. अत्याधुनिक प्रगतिशील कवींत ⇨ श्रीरंगम्‌ श्रीनिवासराव हे अग्रगण्य आहेत.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत तेलुगूत नाटक असे नव्हतेच. १८७५ मध्ये वाविलाल वासुदेवशास्त्री यांनी ज्युलियस सीझरचे तेलुगू रूपांतर केले आणि एक सामाजिक नाटकही लिहिले. यानंतर तेलुगूत संस्कृत, बंगाली, हिंदी आणि शेक्सपिअरची नाटके अनुवादिली गेली. धर्मावरम् रामकृष्णाचार्य व कोलाचलम्‌ श्रीनिवासराव यांनीच प्रथम स्वतंत्र उत्कृष्ट आणि विविध प्रकारची तेलुगू नाटके लिहून त्यांचे प्रयोगही करविले. आंध्र शेक्सपिअर ⇨ पानुगंटी लक्ष्मीनरसिंहराव यांनी तीस नाटके लिहीली. गुरजाड अप्पारावांनी कन्याशुल्कम्‌ हे प्रभावी सामाजिक नाटक लिहिले. ⇨ विश्वनाथ सत्यनारायण यांची नाटकेही दर्जेदार आहेत. आचार्य आत्रेय आणि ⇨ बुच्चिबाबू (शिवराजू वेंकटसुब्बराव) यांच्या नाटकांत मनोविश्लेषणाचा प्रयत्न दिसतो. तेलुगू साहित्यात १९१० पासून एकांकिका लिहिल्या जाऊ लागल्या.तल्लावज्झल शिवशंकरशास्त्री यांनी सांगीतिकांचा प्रयोग केला.

खंडवल्ली रामचंद्रुडू यांची धर्मवतीविलासमु ही पहिली कादंबरी १८७३ मध्ये प्रसिद्ध झाली. वीरेशलिंगम्‌ पंतुलूंची राजशेखरचरित्र ही कादंबरी गोल्डस्मिथच्या व्हिकार ऑफ वेकफिल्डवर आधारलेली आहे. विख्यात बंगाली कादंबऱ्यांचे तेलुगू अनुवादही लोकप्रिय झाले. विश्वनाथ सत्यनारायणांच्या वेयी पडुगुलु या उल्लेखनिय कादंबरीत दीर्घतेबरोबरच गुणवत्ताही असून तीत सामाजिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीचे चित्रण परिणामकारकपणे केले आहे. ⇨ नोरी नरसिंहशास्त्री यांनी उत्कृष्ट ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. राष्ट्रीय चळवळींचे प्रतिबिंब आपणास उन्नव लक्ष्मीनारायणांच्या मालपल्ली कादंबरीत पाहावयास मिळते. जयंती, सुरम्माप्रभृती लेखिकांनीही सुरस कौटुंबिक कथा लिहिल्या आहेत.

लघुकथा हा वाङ्‌मयप्रकारही तेलुगूत पाश्चिमात्य प्रभावाने आलेला आहे. मोपासां, समरसेट मॉम, ओ हेन्री इत्यादींच्या कथांचे अनुवाद तेलुगूत झालेत. स्वतंत्रपणे कथा लेखन करणाऱ्यात गुरजाड अप्पाराव हे अग्रगण्य होत. संस्कृत आणि हिंदी कथांचे अनुवादही प्रारंभीच्या काळात झाले. श्रीपाद सुब्रह्मण्यशास्त्री, विश्वनाथ सत्यनारायण, चलम् आणि चिंता दीक्षितुलू या पहिल्या श्रेणीच्या कथाकारांखेरीज अनेकजणांनी तेलुगू कथावाङ्‌मयात वैशिष्ट्यपूर्ण भर घातली.

येशू ख्रिस्त, व्हिक्टोरिया राणी तसेच काही तेलुगू कवी यांची चरित्रे लिहून वीरेशलिंगम्‌ पंतुलूंनी चरित्रवाङ्‌मयाचा पाया घातला. यानंतर देशीविदेशी महापुरुषांची अनेक चरित्रे तेलुगूत लिहिली गेली. तेलुगूत गुणवत्तेने श्रेष्ठ अशी काही आत्मचरित्रेही लिहिली गेली.

निबंध, साहित्यसमीक्षा आणि संशोधनपर वाङ्‌मयाच्या क्षेत्रांत वीरेशलिंगम्‌ हेच अग्रेसर होत. त्यांचे निबंध मुख्यतः स्त्रीशिक्षण आणि समाजसुधारणा या विषयांवर आहेत. पानुगंटी लक्ष्मीनरसिंहरावांनी साक्षी या आपल्या निबंधसंग्रहात जोसेफ ॲडिसनच्या द स्पेक्टेटर ह्या पत्रातील निबंधाच्या धर्तीवर निबंध लिहून समकालिन सामाजिक दोषांवर आपल्या आकर्षक, ओघवत्या शैलीने विनोदयुक्त टिका केली.

वीरेशलिंगम्‌ यांच्या आंध्र कवुल चरित्रमुने साहित्यसमीक्षा व संशोधनपर साहित्याचे दालन उघडले. टी. अच्युतरावांनी विजयानगर साम्राज्यकालिन तेलुगू साहित्याचा प्रमाणभूत इतिहास लिहिला. आधुनिक साहित्याचे दर्शन के. सितारामय्यांच्या नव्याध्रुवीथुलु या ग्रंथात घडते. पी. हनुमंतरावांचे साहित्यसमालोचनमु, माधुरीमहिमा हे ग्रंथही उल्लेखनिय आहेत. विजयानगरच्या राजसभेतील अष्टदिग्गजाच्या साहित्यकृतींवर उपयुक्त आणि मोलाची रचना झाली आहे. पाश्चिमात्य पद्धतीने साहित्यसमीक्षा करणाऱ्यात डॉ. सी. आर्. रेड्डी हे अग्रेसर आहेत. कवीतत्त्वविचारमु (१९१४) हा त्यांचा ग्रंथ या दृष्टीने उल्लेखनिय आहे. आंध्र सारस्वत परिषद, तेलुगू भाषा समिती, आंध्र प्रदेश साहित्य अकादमी, आंध्र प्रदेशातील विद्यापिठांचे संशोधनविभाग यांनी साहित्येइतिहास, समीक्षा, विशिष्ट कवींचे साहित्य, वेगवेगळे कोश इ. प्रकारांत मोलाची ग्रंथरचना केली आहे.

आधुनिक काळात तेलुगू साहित्याची जी विविध दालने विशेष समृद्ध झालेली दिसतात, त्याला अर्थातच इंग्रजी शिक्षण, मुद्रणालय, वृत्तपत्रे, नियतकालिके, साहित्यसंस्था, नाट्यसंस्था इ. विशेषत्वे कारणीभूत आहेत. चोखंदळ वाचकांच्या आवडी–निवडीबरोबरच देशातील विविध चळवळींची यथोचित दखल घेऊन त्या चित्रणाद्वारा रसिक वाचकांचे मनोरंजन आणि समाजप्रबोधनही केले. रसिकांनी त्यांच्या प्रयत्नांना यथायोग्य प्रतिसाद दिला हेही तितकेच खरे आहे.

वरील कालखंडात्मक ऐतिहासिक विवेचनाच्या पार्श्वभूमीवर पुढे महत्त्वाच्या साहित्यप्रकारांचा आढावा घेतला आहे.


काव्य : नन्नयपूर्व काळातील म्हणजे इ. स. दहाव्या शतकापर्यंतचे तेलुगू काव्यवाङ्‌मय आज तरी अनुपलब्ध आहे. या काळातील तेलुगू बोलीचा तत्कालिन लोकगीतांत आणि नंतर काही शिलालेखात गद्यपद्यरूप उपयोग केल्याचे आढळते. नन्नयाने प्राचीन तेलुगू काव्याचा पाया घातला. प्रारंभीच्या काव्यात अनुवाद आणि अनुकरण यांच्याकडेच प्रवृत्ती असल्याचे दिसते. महाभारत, रामायण, भागवत यावर अनेकांनी रचना केली. संस्कृतातील बहुतेक सर्व पुराणे तेलुगूत अवतरली. धार्मिक प्रबोधन किंवा प्रचार हे या वाङ्‌मयाचे मुख्य उद्दीष्ट होते. त्यामुळे आशयापेक्षा अविष्कारपद्धतीत मात्र काहीशी विविधता आणि प्रयोगशीलता दिसून आली. मार्गी, देशी आणि या दोहोंचा मेळ असलेली मध्यम शैली या तिहींचा प्रारंभीच्या काव्यात आविष्कार झालेला दिसून येतो. शिष्ट्यमान्य व संस्कृतानुसारी शास्त्रशुद्ध शैलीला ‘मार्गी’ असे नाव आहे. शास्त्रनियम डावलणारी, केवळ मनोरंजक आणि व्यावहारिक शैली ‘देशी’ या नावाने ओळखली जाते. संस्कृत अनुवाद रूपांतराच्या काळात मार्गी शैलीच प्रचलित होती. नन्नय संस्कृत पंडीत असल्यामुळे त्याने आपल्या अनुवादित महाभारतात त्याच शैलीचा अवलंब करून संस्कृतप्रचुर भाषा वृत्ते आणि अलंकार यांचाच मुख्यत्वे उपयोग केला. नंतरच्या ग्रंथकारांनी मात्र क्रमाक्रमाने आपले वाङ्‌मय बहुजनसमाजाला सुगम वाटावे या हेतूने व्यावहारिक बोलीतील वाक्प्रचार, अलंकार, सुलभ वृत्ते यांचाच कटाक्षाने उपयोग केला. कुमारसंभवकर्मा व नन्नेचोड हा देशी शैलीचा आद्य पुरस्कर्ता होय . पुष्कळशा शैव कवींनी त्याचे अनुकरण केले. मार्ग पद्धतीची भाषा आणि देशी परंपरेतील छंद व अलंकार यांचा उपयोग करणारी आणखीही एक शैली पुढे प्रचारात आली. महाकवी श्रीनाथ (१३८०–सु. १४५०) हा या मध्यम शैलीकारांचा प्रतिनिधी मानला जातो.

इतर धर्मग्रंथांप्रमाणे मूळ महाभारतही संस्कृत भाषेत असल्यामुळे सामान्यजनास त्याचा उपयोग नव्हता. नन्नयाच्या अनुवादामुळे साऱ्या वेदांचे सार, हिंदू धर्माची मूलतत्त्वे आणि प्राचीन परंपरा यांचे ज्ञान आंध्रजनास सुलभ झाले तथापि आपला ग्रंथ हा केवळ भाषांतररूप आणि धार्मिक महत्त्वाचा ठरू नये, तर साहित्यशास्त्रीय कसोट्यांवर उतरणारे महाकाव्य म्हणूनही त्याला मान्यता मिळावी, अशी मनिषा नन्नयाने सूचकपणे व्यक्त केली आहे. महाभारतातील कथानकात इष्ट बदलही त्याने केला. स्वभावरेखनातही अशीच स्वतंत्र दृष्टी त्यांनी दाखविली. गद्यपद्यमिश्रित चंपूशैलीचा उपयोग हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य होय. सर्वच दृष्टींने अपूर्व अशा या तेलुगू आदिकाव्याची केवळ अडीच पर्वे लिहील्यानंतर कवीचे देहावसान झाले.

पश्चिम चालुक्यांच्या सत्तेचा ११६२ मध्ये अस्त झाला. त्यांचे साम्राज्य त्यांचाच सेनापती बिज्जल याने बळकावले. त्याचा मंत्री बसवेश्वर याने ⇨ वीरशैव पंथाच्या प्रसाराचे प्रयत्न केले आणि कन्नड भाषेत प्रभावी भक्तीगीते रचली. या पंथाला आंध्र प्रदेशात मान्यता मिळवून देणारा प्रमुख कवी काकतीय राजवटीत होऊन गेलेला पल्कुरिकी सोमनाथ (१२८५–१३२३) हा होय. त्याने आपल्या बसवपुराणाद्वारे धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. देशी शब्द, आंध्रांच्या परंपरागत लोकसाहित्याचे आदर्श, द्विपदीसारखा देशी छंद हे त्याच्या रचनेचे विशेष होत. तत्सम आणि समासयुक्त शब्द कटाक्षाने टाळून तेलुगू शब्दांवर त्याने विशेष भर दिला आहे. त्यामुळे सहस्रावधी तेलुगू शब्द साहित्यदृष्ट्या प्रतिष्ठित झाले. बसवपुराणातील शिवभक्तांच्या कथांत सर्वच प्रसंग सुरस आहेत असे नाही पण रसानुकूल भाषेचा आणि मांडणीचा उपयोग आणि इष्ट तेथे संक्षेप, यांमुळे या पुराणातील काही स्थळे काव्यदृष्ट्या विशेष सरस ठरले.

नेल्लोरच्या मनुमसिद्धी राजाचा मंत्री त्रिक्कन्न (१२२०–६०) हा विष्णू व शिव यांचे ऐक्य प्रतिपादन करणारा असून त्याने धर्माद्वैत नावाचा संप्रदाय स्थापला. त्याचा साहित्यिक दृष्टिकोनही पुष्कळसा नवा आणि सुस्पष्ष्ट होता. काव्यात भावाभिव्यक्तीला प्राधान्य असावे अर्थपूर्ण, सुगम, रूढ अशाच शब्दांची योजना करावी अलंकारांचा उपयोग आवश्यक तेथेच करावा आणि रसिकमान्य असेच काव्य लिहावे असे दंडक घालून देऊन स्वतःच्या निर्वाचनोत्तर (गद्यरहीत) रामायणात व महाभारतात त्याने ते कटाक्षाने पाळले. उत्तररामायणात त्याने केवळ वाल्मिकीच्या उत्तरकांडाचा अनुवाद केला नाही, तर त्यातील प्रक्षिप्त व अनुचित घटना गाळून सुखान्त, सुरस व मौलिक काव्याची रचनाही त्याने केली. उदा., रावणाचे इंद्रलोकावरील आक्रमण आणि रामाचे देहावसान यांसारखे भाग त्याने आपल्या काव्यात गाळले आहेत. त्याच्या काव्यातील रामचंद्र हा सुखदुःखादी मनोविकार असलेला एक साधारण मानव आहे. सीतात्यागानंतरचा रामचंद्रविलाप, शंबूककथा आणि रंभारावणसंवाद यांसारख्या प्रसंगांत कवीची मौलिक कल्पनाशक्ती प्रत्ययास येते. नन्नयाने महाभारताची केवळ अडीच पर्वे लिहीली होती. चौथ्या पर्वापासून पुढील संपूर्ण रचना तिकन्नाने केली. संक्षेपविस्ताराच्या बाबतीत नन्नयाच्या आदर्शानुसार त्याने गीता आणि इतर तत्त्वोपदेशाचा संक्षेप करून विराटपर्व सविस्तर वर्णिले आहे. काव्यलक्षणाचे अनुसरण, बव्हंशी शुद्ध तेलुगू शब्दांचा उपयोग, रसपरीपोषावर भर, स्वभावरेखनात विश्लेषणाची दृष्टी इ. वैशिष्ट्यांमुळे तिक्कन्नाची रचना अनुपम ठरली.

केतनाने दंडीकृत दशकुमारचरिताचा चंपूशैलीत अनुवाद केला. शृंगारिक घटनांचा संक्षेप आणि चरित्रवर्णनात स्वतंत्र कल्पकता ही केतनाची वैशिष्ट्ये होत. या ग्रंथाच्या धरतीवर विक्रमांकचरित इ. अनेक रचना पुढे निर्माण झाल्या.

मारनाचे मार्कंडेयपुराण, मंचनाचे केयूरबाहुचरित्र व बद्देनाकृत नीतिशास्त्र–मुक्तावली आणि सुमतिशतक हे ग्रंथ या काळातील वेगळी नीतिप्रवण प्रवृत्ती सूचित करतात.

गोन बुद्धरेड्डी (१२००–५०) याचे रंगनाथरामायण हे रामकथेवरील पहिले स्वतंत्र तेलुगू काव्य होय. चरित्रनायकाची लोकप्रियता, द्विपदीसारख्या सरळ छंदाची योजना व व्याकरणादी नियमांचे पालन यांमुळे या ग्रंथाला सर्वमान्यता लाभली. याच काळातील एका अनुवादित रामायणाचे कर्तृत्व हुलक्की भास्कर, त्याचा पुत्र मल्लिकाजुर्नभट्ट, शिष्य कुमाररुद्रदेव आणि मित्र अय्यालार्य या चौघांकडे दिले जाते.

एर्राप्रेगडाच्या काळात शुद्ध साहित्यिक भावनेने काव्यरचना होऊ लागली. त्याच्या नृसिंहपुराणाने प्रबंधकाव्याचा पाया घातला. नन्नयाने अर्धवट सोडलेले आणि तिक्कन्नाने वगळलेले महाभारताचे वनपर्व एर्राप्रेडाने नन्नयाच्याच शैलीत पूर्ण केले. त्याच्या स्वतंत्र प्रतिभेचे दर्शन हरिवंशात घडते.

यानंतरच्या काळात सोळाव्या शतकातील प्रबंधवाङ्‌मयाची पुरती पायाभरणी झाली. अनुवादाप्रमाणेच स्वतंत्र काव्यरचनाही तेलुगूत होऊ लागली. वीरगीते, अध्यात्मपर कविता, तीर्थवर्णने, संस्कृत नाटकांचा काव्यानुवाद यांबरोबरच विशुद्ध काव्ये, भागवत आणि शृंगारनैषधासारख्या भव्य साहित्यकृतीही निर्माण झाल्या. रचनाचमत्कृतिपूर्ण काव्यांत राविपाटी तिप्पनाच्या त्रिपुरांतकोदाहरणाचा उल्लेख अवश्य केला पाहिजे.


 तेलुगू काव्याला अनेक शतके राजाश्रय लाभला पण अनेक राजांकडून श्रीनाथाला जी मानमान्यता मिळाली, तिला खरोखरच तोड नाही. अगदी लहान वयापासून त्याने क्रमाक्रमाने मरुतराट्‌चरित्र, शालिवाहन सप्तशती, शृंगारनैषध, भीमखंड, काशीखंड याव्यतिरिक्त हरविलासवीथिनाटक, पल्नाटिवीरचरितमु, शिवरात्रिमाहात्म्यमु, पंडिताराध्यचरित अशी बहुविध प्रकारची विपुल आणि सरस रचना केली. यांपैकी शृंगारनैषध अनुवादरूप असून हरविलास सर्वतोपरी स्वतंत्र आहे. भीमखंड हा स्कंदपुराणातील ‘गोदावरीखंडा’चा अनुवाद आहे. पल्नाटिवीरचरितात द्विपद छंदात आंध्रजनजीवनाचे उत्कृष्ट चित्रण आहे. श्रीनाथाच्या स्फुट काव्यांत त्याची विनोदप्रियता व रसिकता दिसते. भाषा, शैली, छंद, अलंकार आणि आशय या दृष्टीने त्याने तेलुगू काव्यात मोलाची भर घातली. संस्कृतची आलंकारिक शैली आणि आंध्रचे लोकसाहित्य यांचा मनोज्ञ समन्वय त्याच्या शैलीत दिसून येतो. ‘सीस’ या छंदप्रकारास श्रीनाथानेच लोकप्रिय बनविले. ⇨ ताळ्ळपाक अन्नमाचार्य (१४२३–१५०२) या संगीतज्ञ कवीने भक्तिगीतकारांची एक मोठीच परंपरा निर्माण केली. ताम्रपत्रांवर लिहिलेली त्याची १३,००० कीर्तनगीते आजही तिरुमलई येथील मंदिरात सुरक्षित आहेत. या गीतांचे शृंगारसंकीर्तने व अध्यात्मसंकीर्तने असे दोन भाग पडतात. द्विपदरामायणमु, वेंकटाचलमाहात्म्यमु, शृंगारमंजरी आणि सर्वेश्वरशतक हे या कवीचे अन्य ग्रंथ होत.

पिल्ललमर्री पिनवीरभद्र (१४२५–९०) याचे शकुंतला परिणयमुजैमिनीभारतमु तसेच नंदी मल्लय्य आणि घंटा सिंगय या कविद्वयाच्या प्रबोधचन्द्रोदयवराहपुराणमु या रचनांवरून तेलुगू काव्याची प्रबंधांच्या दिशेने झालेली वाटचाल दिसून येते.

नीत्युपदेशक कवी वेमना (१४१२–८०) याची पद्ये आजही आंध्र भाषिकांच्या तोंडी आहेत. त्याने आपले अनुभवजन्य ज्ञान आटवेलदी, तेटगीत, कंद यांसारख्या सोप्या सरळ छंदांत शब्दबद्ध केले. धार्मिक आणि सामाजिक रूढींवरील कठोर टीका आणि सदाचारावर भर, हे त्याच्या काव्याचे विशेष होत. वेमनाच्या कित्येक उक्ती आजही आंध्र प्रदेशात म्हणींसारख्या रूढ आहेत. ‘तुका म्हणे’ प्रमाणे ‘विश्वराभिराम विनुर वेमा’ हे त्याचे पालुपद प्रसिद्ध आहे.

तेलुगू संत कवींची परंपरा विशेष समृद्ध नाही पण तीत बम्मेर पोतनाला (१४२०–१५१०) मोठे स्थान आहे. त्याच्या आंध्र भागवतात भक्तिभाव आणि वेदान्तर अनेक आख्याने आहेत. द्वादश स्कंधांच्या या काव्यात ३०,००० पद्ये आहेत. कृष्णजन्म, सुदाम–कृष्ण भेट, गोपीवस्त्रहरण, गजेंद्रमोक्ष इ. अनेक प्रसंगांत कवीची कृष्णभक्ती आणि कलात्मकता यांचे मनोज्ञ दर्शन घडते. वरंगळच्या परिसरात राहणाऱ्या शेतकरी–कवीने आपल्या रचनेत विविध प्रयोग करून एक आगळे माधुर्य निर्माण केले आहे. अनेक ठिकाणी त्याने मूळ भागवतावरही ताण केली आहे.

विजयानगरच्या सम्राटांपैकी कृष्णदेवरायाची राजवट (१५०६–१५३०) सर्वच दृष्टीने वैभवशाली ठरली. साहित्य, विद्या आणि कला यांची या काळात खूपच भरभराट झाली. त्यामुळे या काळाला तेलुगू साहित्याचे सुवर्णयुग म्हटले जाते. स्वतः कृष्णदेवरायाने आमुक्तमाल्यदा या ग्रंथाची रचना केली. त्याच्या राजसभेत ‘अष्टदिग्गज’ या नावाने विख्यात असे आठ कवी होते. अठरा प्रकारची वर्णने, धीरोदात्त नायक, शृंगाररसप्राधान्य आणि पुराणसिद्ध कथानक यांनी युक्त अशा स्वतंत्र व सालंकृत प्रबंधकाव्यांनी हा कालखंड गाजविला. पेद्दनाचे मनुचरित्र, कृष्णदेवरायाचे आमुक्तमाल्यदा, ⇨ रामराजभूषणाचे वसुचरित्र, श्रीनाथाचे शृंगारनैषध आणि ⇨ तेनाली रामकृष्णाचे पांडुरंगमाहात्म्यमु ही तेलुगूतील श्रेष्ठ पंचप्रबंधकाव्ये (पंचमहाकाव्ये) मानली जातात. पेद्दनाच्या सर्वश्रेष्ठ प्रबंधात शृंगार आणि शांत या दोन्ही रसांचा मनोरम संगम साधला आहे. त्यातील पात्रे जिवंत वाटतात. संवादांत पदोपदी चातुर्य प्रत्ययाला येते. असामान्य कल्पनाशक्ती आणि नाट्यमय प्रसंग यांचे दर्शन त्यांत घडते. कृष्णदेवरायाच्या काव्यात गोदा आणि विष्णुचित्त या वैष्णवांची कथा असून आंध्रातील तत्कालीन समाजजीवनाचे उत्कृष्ट चित्रण आहे. रामराजभूषण हा विद्वान व संगीतज्ञ कवी असून त्याचे वसुचरित्र अभिजात आहे. त्याच्या अनुकरणाने जी इतर प्रबंधकाव्ये निर्माण झाली त्यांना ‘पिल्लावसुचरित्रलु’ म्हणजे वसुचरित्राची बाळे असे नाव मिळाले. त्याच्या काव्याची संस्कृत व तमिळ रूपांतरे झाली आहेत. तेनाली रामकृष्णाचे पांडुरंगमाहात्म्युमु हे पुण्यक्षेत्रवर्णनपर असूनही त्याची गणना प्रबंधकाव्यांत झाली आहे. त्यातील भाव गंभीर आणि रमणीय असून भाषा प्रौढ आहे.

   या पंचप्रबंधांखेरीज ⇨ नंदी तिम्मन्नाचे पारिजातापहरण, ⇨ धूर्जटीचे कालहस्तिमाहात्म्य, अय्यल रामभद्रडूचे रामाभ्युदयमु, ⇨ पिंगली सूरनाचे कलापूर्णोदयमु, राघवपांडवीयमुप्रभावती प्रद्युम्नम्‌ हे प्रबंधही विशेष प्रसिद्ध आहेत. कलापूर्णोदयमु हे विशुद्ध कल्पनाप्रधान आणि स्वतंत्र स्वरूपाचे अंतर्द्वंद्वप्रधान प्रणयकाव्य आहे. राघवपांडवीयमु या श्लेषपर काव्यात रामायणमहाभारत या दोन्ही कथा आहेत. याचे अनुकरण एलकूची बालसरस्वतीने आपल्या राघवयादव–पांडवीयात करून रामायण, भागवत आणि महाभारतातील कथा एकाच वेळी श्लेषपर पद्यांतून सांगितल्या आहेत. अर्थात यात शब्दपांडित्याचाच भाग अधिक आहे.

काही प्रबंधांतील दुर्बोधतेची एक प्रतिक्रिया पोन्नगंटी तेलगन्नाच्या ययातिचरित्र या शुद्ध तेलुगूतील प्रबंधरूपात दिसून येते. यात कोठेही तत्सम शब्द नाही. हा ग्रंथ कुत्बशाहीतील एका मुस्लिम अधिकाऱ्याला अर्पण केला आहे.

रामायण रचणारी कुंभार जातीची मोल्ल ही कवयित्री तसेच तंजावर राज्यातील रामभद्रांबा, मधुरवाणी, पसुपुलेटी रंगाजम्म या सोळाव्या आणि सतराव्या शतकातील कवयित्री उल्लेखनीय आहेत.


तंजावरचा राजा ⇨ रघुनाथ नायक (कार. १६००–३१) याच्या पदरी अनेक कवी, नर्तक आणि गायक होते. तो स्वतः तेलुगू आणि संस्कृत पंडित व कवी होता. त्याच्या ग्रंथांपैकी नलचरित्र हा प्रबंध व रघुनाथरामायण हे चंपूकाव्य महत्त्वाचे आहेत. त्याच्या दरबारातील चेमकूर वेंकटकवीने विजयविलासमु आणि सारंगधरचरित्रमु हे शृंगारप्रसाधन काव्यग्रंथ लिहिले. महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या नाथ संप्रदायाशी संबंधित असलेल्या चौरंगी नाथनामक सिद्धाची शृंगार–करुणमिश्र कथा हा सारंगधरचरित्रमु काव्याचा विषय आहे.

विजयराव नायकही विद्या आणि कलांचा भोक्ता होता. त्याच्या ग्रंथांपैकी रघुनाथाभ्युदय इ. नाटके आणि द्विपदीतील तीन काव्ये विशेष उल्लेखनीय आहेत. त्याच्या राजसभेतील क्षेत्रय्यानामक संगीतज्ञ, नृत्यविशारद आणि अभिनयकुशल कवीने सहस्रावधी कोमलकांत–पदावलीयुक्त पदे लिहिली. त्यामुळे आद्य कर्नाटक संगीतज्ञांत त्याची गणना होते.

तंजावरला १६७४ मध्ये मराठा राज्य स्थापन झाल्यावर शहाजी राजाने (कार. १६८४–१७१२) वीस यक्षगाने लिहिली. शहाजीचा नातू तुकोजी यानेही काही यक्षगाने लिहिली. तंजावरखेरीज मदुराई, पदुकोट्टई, पीठापुरम्‌ येथील राजांच्या आणि धनिकांच्या आश्रयाने कित्येक कवींनी वाङ्‌मयनिर्मिती केली. त्यांपैकी बहुतेक प्रबंध विलासवर्णनपर असून काव्यदृष्ट्या हिणकस आहेत. काही संस्कृत काव्यपुराणांचे अनुवादही झाले. आडिदमू सुरकवी (१७२०–८५), पिंडिप्रोलू लक्ष्मणकवी इत्यादींनी उपरोधपर काव्ये लिहिली. वेगवेगळ्या विषयांवरील शतकसाहित्यही निर्माण झाले. क्षेत्रय्याप्रमाणेच संगीतज्ञ भक्तकवी त्यागराजाने अनेक गेय कीर्तने लिहून द. भारतात लोकप्रियता व चिरंतन स्थान प्राप्त करून घेतले. या काळात झालेल्या विविध प्रकारच्या काव्यनिर्मितीमुळे १८५० नंतरच्या नवयुगाचा भक्कम पाया घातला गेला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तेलुगू साहित्य हे बहुतांशी पद्यात्मक होते. नंतर मात्र अनेक अंगांनी या साहित्याची वाढ झाली. काव्याचे दोन मुख्य प्रवाह दिसू लागले. एकात जुनीच परंपरा चालू राहिली. दुसऱ्या काव्यप्रवाहाने जुने साहित्यशास्त्रीय नियम झुगारून दिले आणि भाव, भाषा, मांडणी यांबाबतीत स्वतंत्रता आणि नावीन्य यांचा पुरस्कार केला. काही कवींच्या रचनांत ही दोन्ही वैशिष्ट्ये दिसतात. नवीन प्रवृत्ती, नवे विषय स्वीकारूनही जुन्या परंपरेशी सर्वस्वी विरोधी नसलेली नवीन अभिव्यक्तिपद्धती त्यांनी अंगीकारली.

नवयुगाच्या प्रारंभी काही विद्वान कवी होऊन गेले. त्यांपैकी मतुकुमल्ली नृसिंहकवी विशेष उल्लेखनीय आहे. त्याने आपल्या चेन्नपुरीविलासात ब्रिटिश राजवटीत झपाट्याने विस्तारत चाललेल्या मद्रास नगरीच्या विविध भागांचे विस्मय भावनेने वर्णन केले आहे आणि नवी व्यवस्था आणि नवे शिक्षण यांचे सहर्ष स्वागत केले आहे.

कंदुकूरी वीरेशलिंगम्‌ पंतुलू (१८४८–१९१९) हे सामाजिक आणि साहित्यविषयक सुधारणांचे अग्रदूत होते. त्यांचे नवीन पद्धतीचे काव्य तितकेसे प्रभावी ठरले नाही. नवीन काव्यविषयांचा मात्र त्यांनी यशस्वी पुरस्कार केला. नव्या युगातील सर्व प्रवृत्ती व प्रेरणा गुरजाड वेंकट अप्पाराव (१८६२–१९१५) यांच्याच काव्यात दिसून आल्या. त्यांनी काव्याच्या बहिरंगात आमूलाग्र बदल घडवून आणला. गिडुगू वेंकट राममूर्ती (१८६३–१९४०) यांनी सामान्यजनाच्या भाषेतच काव्यरचना केली.

वीरेशलिंगम्‌ यांच्या प्रारंभीच्या तीन काव्यरचनांत मुख्यतः त्यांच्या विद्वत्तेचे दर्शन घडते. त्यांच्या सरस्वती–नारद विलापमूत प्राचीन युगाचा अंत व नवयुगारंभ यांची स्पष्ट सूचना आहे. त्यांनी वैचारिक क्रांतीविषयी कळकळीचे आवाहन केले आहे. अभाग्योपाख्यानमूत जुन्या चालीरीतींवर त्यांनी व्याजोक्तिपूर्ण टीका केली आहे. आस्तिक्य व एकेश्वरवाद यांविषयी त्यांची दोन काव्ये आहेत. गोल्डस्मिथच्या ट्रॅव्हलर (१७६४) या काव्याचा त्यांनी पथिकविलासमु या नावाने अनुवाद केला आहे. अनेक तरुण कवींवर त्यांचा विशेष प्रभाव पडला.

याच सुमारास रामायणादी महाकाव्यांचे काही अनुवाद झाले. या अनुवादकांत श्रीपाद कृष्णमूर्तिशास्त्री (१८६६–१९६२), दासू श्रीरामकवी (१८४६–१९०८), गोपीनाथ, वाविलीकोलनू सुब्बाराव (१८६३–१९३६)  आणि जनमंची शेषाद्री शर्मा (१८८२–१९५३) हे प्रमुख होत. चिलकमर्ती लक्ष्मीनृसिंहम्‌ (१८६७–१९४६) यांच्या कृपांबानिधी या उत्कट भक्तिपर काव्याचा आणि शेषाद्री शर्मा यांच्या हृदयानंदमु या कल्पनाप्रधान काव्याचा उल्लेख अवश्य करावा लागेल.

आशय आणि आविष्कार यांच्या दृष्टीने स्पष्ट वेगळे वळण दर्शविणारा आणखी एक काव्यप्रवाह लवकरच निर्माण झाला. इंग्रजी काव्यातील मनोव्यापारचित्रण, चिंतनशीलता आणि भावसौंदर्य त्याचप्रमाणे उमर खय्यामच्या फार्सी रुबाया आणि टागोरांची कविता या सर्वांकडे नवशिक्षितवर्ग आकृष्ट झाला. विसाव्या शतकाच्या आरंभी देशात सुरू झालेल्या राजकीय व सामाजिक आंदोलनांचाही काव्यावर प्रभाव पडला. देशजागृतीसाठी आणि अनिष्ट रूढी निवारण्यासाठी प्रभावी काव्ये लिहिली गेली. दिवाकर्ल तिरुपतिशास्त्री व चेळ्‌ळपिळ्‌ळ वेंकटशास्त्री हे दोन प्रतिभाशाली कवी जिवाभावाचे मित्र होते. त्यांनी ‘तिरूपति–वेंकटकवुलू’ या संयुक्त नावाने ध्येयवादी काव्याची रचना केली. विशेष हे, की त्यांच्या शैलीत एकसारखेपणा आहे. त्यांनी प्रारंभी गावोगाव फिरून काव्यगायनाचे प्रयोग केले आणि जनतेत काव्याविषयी गोडी निर्माण केली. त्यांची स्तुतिपर कविता नानाराजसंदर्शन या नावाने प्रकाशित झाली. पाणिगृहीता अवणानंदमु या काव्यात त्यांनी काल्पनिक कथानकाच्या आधारे वेश्यागमनामुळे होणारी समाजहानी प्रभावीपणे वर्णिली आहे. हिंदू पुराणेतर व्यक्तीचे चरित्र या दृष्टीने त्यांच्या बुद्धचरितमुला महत्त्व आहे. जातकचर्या या नावाने आत्मचरित्र, देवीभागवत, मृच्छकटिक मुद्राराक्षस यांचे अनुवाद, लक्ष्मणापरिणय हे प्रबंधकाव्य हे त्यांचे संयुक्त काव्यग्रंथ होत. या दोन कवींमुळे ‘शतावधान’ पद्धती आंध्रामध्ये जिवंत राहिली इतकेच नव्हे, तर ती अधिक लोकप्रियही झाली.


या कविद्वयांच्या संप्रदायातील वेलूरी शिवरामशास्त्री, अव्वारी सुब्रह्मण्यशास्त्री आणि दोमा वेंकटस्वामी गुप्त हे विशेष प्रसिद्धीला आले. वेलूरी शिवरामशास्त्रींची ‘मुक्त्यालता’ ही करुण कथा आणि वेटुरी प्रभाकरशास्त्रींची ‘मून्नाल मूच्चट’ ही कुटुंबकथा विशेष उल्लेखनीय आहे. दुर्माक राजशेखर आणि गडियारम्‌ वेंकटशेषय्याशास्त्री यांची जोडी तिरुपति–वेंकटकवुलुप्रमाणे ‘वेंकटशेष–राजशेखर’ या नावाने प्रसिद्धीस आली. त्यांनी अनुक्रमे राणाप्रतापसिंहचरित्र आणि शिवभारत (शिवचरित्र) हे काव्यग्रंथ रचिले. गुरजाड अप्पारावांनी काव्यातील आशयविषय, रस, अलंकार, छंद इ. सर्वच बाबतींत प्रयोगशीलता दाखविली. पूर्णम्माकथा आणि लमणराजुकथा यांपैकी दुसऱ्या काव्यात त्यांनी हरिजनांबद्दल गौरवपूर्ण विचार व्यक्त केले. देशभक्तिपर गीते आणि भावकविता यांतही तेच अग्रेसर होते. एत्तलंगरि, दिंचुलंगरि या त्यांच्या गीतसंग्रहांत तेलुगू काव्याची नवीन दिशा दिसते.

तेलुगू कवींचा नवा संप्रदाय १९२० च्या सुमारास निर्माण झाला. तो मुख्यतः टागोरांच्या काव्याने प्रभावित झालेला होता. त्याला भावकविता संप्रदाय असे सार्थ नाव मिळाले. रायप्रोलू सुब्बराव (१९०९– ) हे त्याचे आद्य प्रवर्तक होत. काही काळ शांतिनिकेतन येथे राहून त्यांनी बंगाली काव्य आणि टागोरांचे व्यक्तिमत्त्व यांचा जवळून परिचय करून घेतला होता. गोल्डस्मिथच्या हर्मिट या कवितेच्या आधारे ललित हे नितांतमधुर खंडकाव्य त्यांनी लिहिले. निसर्गवर्णनाला प्राधान्य मिळालेले हे पहिले तेलुगू काव्य फारच लोकप्रिय झाले. तृणकंकण या दुसऱ्या संग्रहात त्यांची शैली अधिक भारदस्त झाली असून त्यांनी दिव्य, अशरीरी, उदात्त प्रेमाची कल्पना त्यात मांडली आहे. त्यांच्या मनावर पडलेल्या राष्ट्रीय आंदोलनाच्या प्रभावाची प्रतिक्रिया आंध्रावली या संग्रहात दिसून येते. दास्याचा कलंक धुऊन टाकण्याचे आवाहन त्यांनी या काव्यात केले आहे. जडकुच्चलु आणि तेलुगूतोट या काव्यांत आंध्रप्रशस्ती आहे. कष्टकमला आणि स्नेहलतादेवी या शोकान्त कथाकाव्यांपैकी दुसऱ्यात हुंड्याचे दुष्परिणाम वर्णिलेले आहेत. त्यांच्या काव्यात प्रेम आणि सौंदर्य यांची उदात्त रूपे आढळतात. उमर खय्यामच्या रुबायांचा मधुकलशमु हा अनुवाद तसेच वनमाला, रम्यालोकमु आणि माधुरीदर्शनमु हे त्यांचे इतर काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

ओलेटी पार्वतीशम्‌ आणि बालांत्रम्‌ वेंकटराव हे कविद्वय वेंकट–पार्वतीश्वर या जोडनावाने प्रसिद्ध आहेत. रायप्रोलु–संप्रदायातील या कविद्वयाचे एकांतसेवा हे काव्य गीतांजलीच्या तोडीचे मानले जाते. शांतिनिकेतनात शिकलेल्या अब्बुरी कृष्णरावांची तुलना कीट्‌सशी केली जाते. ⇨ तल्लावज्झल शिवशंकरशास्त्री (१८९२– ) हेही प्रभावशाली कवी होत. भावकवींतील निराशावादी पंथात ⇨ देवुलपल्ली वेंकटकृष्णशास्त्री (१८९७– ) हे प्रमुख होत, त्यांच्या एका काव्यसंग्रहाचे नावच कृष्णपक्षमु असे आहे. ऊर्वशी हे त्यांचे श्रेष्ठ प्रतीचे काव्य होय. वेदुलशास्त्रींच्या काव्यातील वेदना ही विश्वव्यापी आहे. दुव्वुरी रामिरेड्डींच्या कृषिवलुडु या काव्यात दरिद्री शेतकरी–जीवनाचे हृद्य चित्रण आहे.

पूर्वपरंपरेतील इष्ट ते घेऊन स्वतंत्र दिशेने प्रयोग करीत वाटचाल करणाऱ्या कवींत विश्वनाथ सत्यनारायण (१८९५–१९७६) हे अग्रगण्य आहेत. त्यांनी काव्यक्षेत्रात अनेक प्रयोग केले. त्यांच्या काव्यात देशभक्ती, भारतीय संस्कृतीसंबंधीचा जाज्वल्य अभिमान आणि आंध्र प्रदेशातील निसर्गाची गहन रमणीयता यांचा कलात्मक प्रत्यय येतो. देशभक्ती, निसर्गसौंदर्य, ईशभक्ती, प्रेमभावना इ. अनेकविध विषयांवरील त्यांचे काव्य नावीन्यपूर्ण, उत्कट आणि उच्च प्रतीचे आहे. भारतीय ज्ञानपीठाने १९७१ मध्ये त्यांच्या रामायण कल्पवृक्षमु काव्यास पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. पिंगली लक्ष्मीकांतम्‌ (१८९४– ), काटुरी वेंकटेश्वरराव (१८९५–१९६२), गुर्रम्‌ जोषुआ (१८९५– ), अनंतपतुलू रामलिंगस्वामी, माधवपेद्दी बुच्चीसुंदररामशास्त्री (मृ. १९५१),  तुम्मल सीताराममूर्ती चौधरी (१९०१– ) इ. अनेक कवी या संप्रदायात मोडतात.

समाजपरिवर्तनवादी, शोषणविरोधी आणि मानवतावादी कवींचा गट ‘अभ्युदयकवी’ या नावाने ओळखला जातो. या विचारप्रणालीचा उगम गुरजाड अप्पाराव आणि दुव्वुरी रामिरेड्डी यांच्या काव्यातच आढळतो. श्रीरंगम्‌ श्रीनिवासराव ऊर्फ ‘श्री श्री’ हे या संप्रदायाचे अग्रणी आहेत. तेजस्वी भावना आणि ओजस्वी भाषा हे त्यांच्या रचनेचे विशेष होत. ⇨ दाशरथी (१९२७– ) आणि सी. नारायणरेड्डी या क्रांतिवादी कवींचे ब्रीद जीर्णविध्वंस आणि नवनिर्माण हेच आहे.

तेलुगू काव्यपरंपरा याप्रमाणे अखंडित आणि कालानुरूप नवीनवी वळणे घेत समृद्ध बनली आहे. तिच्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार पुढीलप्रमाणे आहेत :

शतकसाहित्य : तेलुगू साहित्यात प्रबंधाखालोखाल शतकसाहित्याला महत्त्व दिले जाते. आशय आणि भाषा यांबाबतीत ही काव्ये अकृत्रिम आणि सुगम असतात. त्यांचे विषय स्वतंत्र असतात. पूर्वी मुलांच्या शिक्षणात यांपैकी काही पद्यांचे पाठांतर आवश्यक असे. वीरेशलिंगम्‌ यांनी आपल्या साहित्येतिहासात याचा उल्लेखही केलेला नाही. वंगूरी सुब्बरावांनी मात्र शतकसाहित्याच्या थोरवीकडे रसिकांचे लक्ष वेधले आहे. याचा उगम भर्तृहरीच्या शतकातच असावा. त्यात १०८ पद्ये असतात. प्रत्येक पद्याच्या शेवटी देवाला किंवा स्वतःला उद्देशून एक चरण असतो. त्याला मकुट (पालुपद) म्हणतात. या मकुटावरूनच शतकाला नाव दिलेले असते. पाल्कुरिकी सोमनाथाच्या आद्य वृषाधिपशतकाचे नंतर अनेकांनी अनुकरण केले. अन्नमय्याचे सर्वेश्वरशतक, बद्येनाकृत समजले जाणारे सुमतिशतक, ब्राऊनलाही आकर्षून घेणारे वेमनाचे शतक वेमनाशतकम्‌, गोवळकोंड्याच्या तानाशाहच्या तुरुंगात कंचेर्ल गोपनाने लिहिलेले दाशरथिशतक ही भावमधुर शतके लोकांच्या आजही नित्यपाठात आहेत. तेलुगूतील शतकपरंपरा एकोणिसाव्या शतकापर्यंत चालू होती.

गीतसाहित्य : सोमनाथाने प्राचीन काळी प्रचलित असलेल्या लोकगीतांचा उल्लेख केला आहे. ही गीते तीन प्रकारची असू शकतात : (१) श्रमिकगीते, (२) वीररस किंवा हास्यरसयुक्त गीते व प्रणयगीते आणि (३) भक्तिगीते. श्रीनाथाचे पल्नाटिवीरचरित आणि अठराव्या शतकातील ‘बोब्बिलिकथा’ ही दुसऱ्या प्रकारात मोडतात. अशा गीतांचे कार्यक्रम अभिनयासह ‘बुर्रकथा’ या नावाने खेडेगावांतून चालतात. मनोरंजन आणि उद्‌बोधन ही दोन्ही त्यामुळे साधतात. म्हणून प्रचारासाठी राजकीय पक्ष त्याचा उपयोग करतात.


कीर्तने : तेराव्या शतकापासून तेलुगूत कीर्तने लिहिली जाऊ लागली. इतर भक्तिगीते आणि कीर्तने ही भिन्न होत. कीर्तनांत शब्द हे केवळ  स्वराशी एकरूप झालेले असतात. तालस्वरांचा समन्वय मात्र आवश्यक असतो. कृष्णकवी हा पहिला कीर्तनकार होय. पंधराव्या शतकातील ताळ्ळपाक अन्नमाचार्यांनी कीर्तनाला शास्त्रशुद्ध रूप दिले. त्यामुळे पुरंदरदासाप्रमाणे कर्नाटक संगीतात त्यांना फार मोठे स्थान आहे. तेलुगूतील स्वरान्त शब्द संगीतपोषक असल्यामुळे तेलुगूतील कीर्तनेच अत्यंत लोकप्रिय आहेत. पंडितराज जगन्नाथाचे समकालीन क्षेत्रय्या यांनी जयदेवाच्या गीतांच्या तोडीची सहस्रावधी पदे लिहिली. ती ४० रागांत आणि १८ दैवतांना उद्देशून आहेत. ती नृत्यास साहाय्यक आहेत. भद्राचलम्‌ रामदास आणि सुब्रह्मण्य हे आणखी दोन महत्त्वाचे कीर्तनकार आहेत. राधाकृष्णाच्या नावाखाली अश्लील शृंगारवर्णन करणाऱ्या पदांना ‘दास कीर्तने’ म्हणतात. भक्तशिरोमणी त्यागराजाच्या कीर्तनांत साहित्य आणि संगीत यांना समान महत्त्व असल्यामुळे त्यांना ‘कृती’ असे नाव आहे. त्यागराजात तानसेनाचे संगीतनैपुण्य आणि तुलसीदासाची अपार भक्ती यांचा समन्वय आढळतो. कर्नाटक संगीताच्या पूर्ण विकासाचे श्रेय त्यालाच आहे. त्याच्या कित्येक सहस्र कृतींपैकी केवळ एक हजार कृतीच आज उपलब्ध आहेत.

उदाहरण आणि दंडक : उदाहरण हा काव्यप्रकार केवळ तेलुगूतच आहे. अकराव्या शतकात तो तेलुगूतूनच संस्कृतात गेला. यात सर्व विभक्तींचा उपयोग केलेला असतो. प्रत्येक विभक्तीबरोबर एक वृत्त किंवा पद्य, कलिका या देशी छंदातील आठ निरनिराळे चरण आणि एक उत्कलिका म्हणजे एकच समासरूप चार चरण असतात. कवी आणि कृती यांची नावे असलेला चरण शेवटी असतो. देव किंवा नायक यांच्या स्तुतिपर ही रचना असते. सोमनाथाचे बसवोदाहरण हे या प्रकारचे पहिले काव्य होय. त्यानंतर तेलुगूत कित्येक उदाहरणकाव्ये आजवर लिहिली गेली आहेत.

 ‘दंडक’ नावाचा काव्यप्रकार संस्कृतातून केवळ तेलुगूतच आलेला आहे. प्रथम नन्नयाच्या रचनेत संदर्भानुसार शिवदंडक आले आहे. कित्येक भक्तिदंडके तेलुगू भाषिकांच्या नित्यपाठात आहेत. शृंगारदंडके आणि प्रकीर्णक (बहुभाषिक) असेही प्रकार पूर्वी होते. ७,००० ओळींचे एक दंडकरामायणही तेलुगूत झाले आहे.

भावकविता : ह्या काव्यप्रवाहाचे जनक गुरजाड वेंकट अप्पाराव आणि रायप्रोलू सुब्बराव हे होत. (१) प्रणयकवित्व, (२) प्रकृतिकवित्व (निसर्गकाव्य), (३) भक्तिकवित्व, (४) देशभक्तिपर काव्य, (५) संघसंस्कारण (समाजसुधारणावादी) कवित्व आणि (६) स्मृतिकाव्य (विलापिका) हे भावकवितेचे उपप्रवाह होत.

 ‘अभ्युदयकवित्वमु’ हा अत्याधुनिक काव्यप्रवाह असून श्रीरंगम्‌ श्रीनिवासराव हे त्याचे अग्रणी होत. त्याचे उपप्रवाह पुढीलप्रमाणे आहेत : (१) अधिवास्तविकता, (२) कामप्रधानकवित्व, (३) प्रतीकवादधोरणी, (४) नगरजीवनचित्रणप्रधान कवित्व, (५) वचनगेय (मुक्तछंद किंवा गद्यगीत) (६) अराजकवाद आणि (७) निराशावाद कवित्व.

यांपैकी वचनगेय वा गद्यगीते हा प्रकार सध्या विशेष प्रचलित आहे. भावप्रधान व माधुर्ययुक्त असा हा काव्यप्रकार मुनिमाणिक्यम्‌ नरसिंहराव, विश्वनाथ सत्यनारायण आणि अडिवी बापिराजू यांनी हाताळला आहे. यति आणि नाद यांच्यावर भर असलेली गद्यगीते शिष्ट्‌ला उमामहेश्वरराव (१८९८–१९३८), श्रीरंगम्‌ श्रीनिवासराव, श्रीरंगम्‌ नारायणबाबू, (१९०६–६२), नारायण रेड्डी (१९३०– ) आणि ‘आरुद्र’ (भागवतुल शंकरशास्त्री, १९२२– ) यांनी लिहिली आहेत.

नाट्य : तेलुगूतील नाट्यवाङ्‌मयसंबंधी लिहिताना यक्षगानांचा उल्लेख अवश्य करावयास हवा. कारण यक्षगानात संगीत, काव्य आणि नृत्याबरोबर नाट्यही समाविष्ट आहे. शिवरात्री महोत्सवात श्रीशैलम्‌ येथे यक्षगानाचा प्रयोग करीत, असा उल्लेख सोमनाथाच्या पंडिताराध्यचरितात आहे. श्रीनाथाच्या भीमखंडातही असा उल्लेख आहे. हे प्रयोग मुख्यतः आदिवासी व खेडेगावातील लोक करीत. त्यांना काही काळाने ‘जक्कुलु’ (यक्ष) असे नाव पडले. ‘जक्कुलपाटलु’ (यक्षगाने) सोळाव्या शतकापासून लिहिली जाऊ लागली. रुद्रय्या कवीचे सुग्रीवविजय हे पहिले लिखित स्वरुपातील उपलब्ध यक्षगान होय. मदुरेच्या नायकांच्या आणि तंजावरच्या मराठा राजांच्या काळात पुष्कळच यक्षगाने लिहिली गेली.

असे असले, तरी यक्षगान आणि नाटक यांचा एकमेकांशी तसा काही संबंध नाही. उत्तर भारतातील रामलीला, केरळमधील कथकळी, तमिळनाडूमधील कुरवंजीप्रमाणे आंध्रात ‘वीथिभागवतुलु’ वा ‘वीथिनाटके’ (रस्त्यावर होणारी) यांचे प्रयोग होत. पंधराव्या शतकातील श्रीनाथाचे समजले जाणारे क्रिडाभिराम हे पहिले तेलुगू नाटक होय. सोळाव्या–सतराव्या शतकांत तंजावर राज्यात मन्नार दासविलास गरुडाचल ही नाटके रचली गेली. पारिजातापहरण हेही त्यावेळचेच होय. हे अपवाद वगळल्यास एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत तेलुगूत नाटक असे नव्हतेच. १८८५ मध्ये वाविलाल वासुदेवशास्त्री यांनी ज्यूलियस सीझरचा अनुवाद केला आणि नंदकराज्यनामक एक सामाजिक नाटकही लिहिले. याच सुमारास धारवाड–सांगलीकडील नाट्यसंस्थांचे आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी नाट्यप्रयोग झाले. त्यामुळे नाट्यलेखन आणि प्रयोग यांना चालना मिळाली. गुंटुर कोटभोट्‌ला सुब्रह्मण्यशास्त्री यांनी अनेक गद्य नाटके लिहिली. वड्डादी सुब्बारायुडूंनी वेणीसंहाराचा अनुवाद केला. पुढे संस्कृत, इंग्रजी, बंगाली व हिंदी नाटकांचे अनुवाद तेलुगूत पुष्कळच झाले. रंटाला वेंकट सुब्बाराव, श्रीपाद कामेश्वरराव, डॉ. बी. गोपालरेड्डी व पुरिपंड अप्पलस्वामी हे प्रमुख अनुवादक होत.


 तेलुगूत अनेक स्वतंत्र नाटके लिहिण्याचे खरे श्रेय बेल्लारीचे धर्मवरम्‌ रामकृष्णाचार्य (१८४३–१९११) आणि कोलाचलम्‌ श्रीनिवासराव (१८५४–१९१९) यांच्याकडेच जाते. त्यांनी नाट्यसंस्था स्थापून नाटकांचे प्रयोगही केले. इंग्रजी नाटकांचे गुणविशेष त्यांनी तेलुगू नाटकांत आणले. वीरेशलिंगम् पंतुलूंची अनुवादित आणि स्वतंत्र नाटके फारशी लोकप्रिय झाली नाहीत. वेदमू वेंकटरायशास्त्रींची (१८५३–१९२९) प्रतापरुद्रीय, उषा आणि बोब्बिली युद्ध ही तिन्ही स्वतंत्र नाटके असून त्यापैकी पहिले विशेष प्रसिद्ध आहे. पानगुंटी लक्ष्मी नरसिंहराव (१८९५–१९४०) यांनी सु. तीन नाटके लिहून ‘आंध्र–शेक्सपिअर’ ही पदवी मिळविली. राधाकृष्ण, पादुका पट्टाभिषेकमु विप्रनारायण आणि कंठाभरणमु ही त्यांची नाटके लोकप्रिय झाली. शेवटचे नाटक विनोदी आहे. कुचिनरसिंहम्‌ पंतुलू (१८७०–१९४०), तिरुपति–वेंकटकवुलू यांचीही नाटके लोकप्रिय ठरली. गुरजाड वेंकट अप्पारावांचे कन्याशुल्कम्‌ हे उत्कृष्ट सामाजिक नाटक त्यातील सोज्वळ आकर्षण विनोद, स्वभावलेखन आणि सुगमसुंदर भाषेसाठी प्रसिद्ध आहे. यातल गिरीशम्‌ हे पात्र तेलुगूत अमर झाले. कन्याविक्रय, बालविवाह यांच्यावर कठोर टीका आणि विधवाविवाहाचा पुरस्कार, हा या नाटकाचा उद्देश आहे. कन्याशुल्कम्‌चे अनुकरण अनेकांनी केले. विश्वनाथ सत्यनारायणांचे नर्तनशाला (१९७४) हे नाटक कलात्मक दृष्टीने श्रेष्ठ मानले जाते. कल्लकुरी नारायणराव, कोप्पल्ली वेंकटरामनराव यांची सामाजिक नाटके त्यांतील विषय, रचना आणि बोलभाषा यामुळे गाजली. यानंतर अनेक मनोविश्लेष्णात्मक नाटकांची रचना झाली. त्यात आचार्य आत्रेय यांची एन्‌.जी. ओ., कप्पलु आणि भयम्‌ व बुच्चिबाबू (१९१६–६७) यांचे आत्मवंचना ही विशेष उल्लेखनीय आहेत. डी. नरसाराजूंनी पी. जी. वुडहाउसच्या प्ले इज द थींगचा अनुवाद केला. त्याला आंध्र नाटक कला परिषदेच्या विद्यमाने झालेल्या नाट्यस्पर्धेत १९४९ मध्ये पहिले पारितोषिकही मिळाले.

पी. व्ही. राजमन्नार (१९०१– ), मुद्‌दुकृष्ण सामिनेनी (१८९४– ) आणि चलम्‌ यांनी तेलुगूतील पहिल्या दर्जेदार एकांकीका लिहील्या. यानंतर तेलुगू एकांकीकांचा वेगाने विकास झाला. मोलिअरचा प्रभाव दर्शविणाऱ्या कामेश्वरराव यांच्या एकांकीका नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह चलम्‌ यांच्या एकांकीका नाट्यगुणसंपन्न आणि मारेमांड रामराव (१९०६– ) यांच्या ऐतिहासिक घटनांवरील एकांकिका विशेष प्रसिद्ध आहेत. १९४३ नंतरच्या एकांकीका अधिक वास्तववादी आहेत. बुच्चीबाबूंच्या दारिनपोये दान्नय, उमर खय्याम आणि शिष्यरक्षिता या एकांकिका फारच लोकप्रिय आहेत. आत्रेयांच्या प्रगतीत शास्त्रीय दृष्टी आणि नार्लांच्या एकांकीकांमधील ग्रामीण जीवनदर्शन लक्षणीय आहे. आंध्र नाटक कला परिषदेचे पारितोषिक गंगाधरांच्या प्रार्थनेला मिळाले.

संगीतिका–लेखकांत तल्लावज्झल शिवशंकरशास्त्री व गेय नाटीकाकर्त्यांत नारायणरेड्डी यांची नावे उल्लेखनीय आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात नभोनाट्ये लोकप्रीय झाली आहेत. गोराशास्त्री (१८१९– ), बुच्चीबाबू, मुनीमाणिक्यम्‌, गिडलूरी सूर्यम्‌ आणि कृष्णमुर्ती हे या क्षेत्रातील नामवंत लेखक होत. संगीतिका आणि नाटिका या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रयत्न होत आहेत.

कादंबरी : पाश्चिमात्य प्रभावानेच तेलुगूत कादंबरी प्रविष्ट झाली. १८७३ मध्ये कडवल्ली रामचंद्रुडू यांनी धर्मवती विलासमु  ही कादंबरी प्रकाशित केली. त्यांच्या धर्मवती विलासमु, मालती माधवमु व लक्ष्मीसुंदर विजयमु या तीनही कादंबऱ्यांना चिंतामणी नियतकालिकाने पारितोषिके दिली. १८७८ मध्ये विरेशलिंगम्‌ पंतुलुंनी राजशेखर ही प्रदिर्घ कादंबरी व्हिकार ऑफ वेकफिल्डच्या आधारे लिहीली. चिलकमर्ती लक्ष्मीनरसिंहम्‌ पंतुलूंनी १८९४ मध्ये रामचंद्र विजयमु आणि नंतर हेमलता, कर्पुरमंजरी, अहल्याबाई, सौंदर्यतिलक गणपती इ. स्वतंत्र आणि ऐतिहासिक कादंबऱ्या लिहील्या. वेधक निवेदन तसेच निर्दोष, प्रामाणिक आणि ओघवती शैली हे त्यांच्या कादंबऱ्यांचे विशेष होत.

याच सुमारास विविध प्रकाशनसंस्था निघाल्या. परिणामतः अनेक इंग्रजी, बंगाली कादंबऱ्यांचे तेलुगूत अनुवाद केले. उत्तम ऐतिहासिक, सामाजिक कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या. त्यात भोगराजू नारायणमूर्तींच्या विमलादेवी (१९१०) आणि अस्तमयमू (१९१६) वेल्लाळ सुब्बरावांची राणी संयुक्ता केतवरापू वेंकटशास्त्रींची रायचूरुयुद्धम्‌ व दुग्गिराल राघवचंद्रय्याकृत विजयनगरसाम्राज्यमु उल्लेखनीय आहेत.

उन्नव लक्ष्मीनारायण पंतुलूंच्या मालपल्ली कादंबरीत हरीजनांच्या दुःखाला वाचा फोडली आहे. वेयीपडगलु  या कादंबरीत विश्वनाथ सत्यनारायणांनी आंध्रांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्यांचे चित्रण करून मानवतावादाचा पुरस्कार केला. एकवीरा ही त्यांची ऐतिहासिक कादंबरी कलात्मक व प्रभावी आहे. त्यांनी इतरही अनेक कादंबऱ्या लिहिल्या.

गुडिपाटी वेंकटाचलम्‌ (१८९४– ) यांच्या सामाजिक कादंबऱ्यांनी वाचकांत मोठीच खळबळ उडवून दिली. चिलकमर्ती लक्ष्मीनरसिंहम्‌‌, मुनिमाणिक्यम्‌ नरसिंहराव (१८९८– ) इत्यादींनी विनोदी कादंबऱ्या लिहिल्या. मनोविश्लेषणात्मक आणि गुप्तहेरकथाही तेलुगूत पुष्कळ आहेत. तंत्रादी दृष्टींनी तेलुगू कादंबरी इतर भरतीय भाषांतील कादंबऱ्यांप्रमाणेच विकसित आहे. तेलुगू साहित्यातील ऐतिहासिक कादंबऱ्यांची परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहे. सातवाहन कालापासून रेड्डी राजवटीपर्यंत निरनिराळ्या कालखंडांचा परामर्श घेणाऱ्या अनेक कादंबऱ्या प्रथितयश लेखकांनी लिहिल्या असून त्या दर्जेदार आहेत. जागतिक साहित्यातील तसेच आधुनिक भारतीय भाषांतील विख्यात कादंबऱ्यांचे तेलुगूत अनुवाद झाले आहेत.

लघुकथा : सर्वांत आधी गुरजाड अप्पारावांनी तेलुगूत लघुकथा लिहिल्या. त्यांच्या प्रारंभीच्या कथा सामाजिक सुधारणाविषयक होत्या. त्यांचा अणिमुत्यालु हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. वेलूरी शिवरामशास्त्री (१८९२–१९६७) यांनी पौराणिक आणि सामाजिक विषयांवर कथा लिहिल्या. रचनासौष्ठव आणि उच्च कोटीचा विनोद या दृष्टीने चिंता दीक्षितुलू (१८९१– ) यांच्या कथा वाचनीय आहेत. गांधीजींच्या चळवळीच्या काळात कविकोंडल वेंकटराव (१८९२– ) यांनी ग्रामीण समस्यांवर कथा लिहिल्या. स्त्रियांबाबतच्या समस्यांचे पडसाद गुडिपाटी वेंकटाचलम्‌ यांच्या कथांत आढळतात. तेलुगू कथेला रचनासौष्ठव आणि भावप्रधानता देणारे प्रमुख लेखक अडिवी बापिराजू (१८९५–१९५३), सुरवरम्‌ प्रतापरेड्डी (१८९६– ) आणि जमदग्नी (१९२०– ) हे होत. व्यक्तिदोष आणि समाजदोष यांवर टीका करणाऱ्या व वाचकांना मनमोकळेपणाने हसावयास लावणाऱ्या कथा मुनिमाणिक्यम्‌ नरसिंहराव आणि मोक्कपाटी नरसिंहशास्त्री (१८९२– ) यांनी लिहिल्या. कोडवटिगंटी कुटुंबराव (१९०९– ) हे रूढीविरोधक आणि दलितांचा कैवार घेणाऱ्या कथालेखकात अग्रगण्य आहेत. मानवी अंतःकरणातील द्वंद्वे मुख्यतः बुच्चिबाबूंनीच रंगविली. पालगुम्मी पद्यराजू (१९१५– ) यांच्या ‘तुफान’ या कथेला जागतिक कथा स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले आहे. अस्सल आंध्र वातावरण आणि आचारविचार यांचे प्रतिबिंब श्रीपाद सुब्रह्मण्यशास्त्री (१८९१–१९६१) आणि मल्लादी रामकृष्णशास्त्री (१९०५–६५) यांच्या कथांत आढळते.


समीक्षा : सी. पी. ब्राऊन, बिशप काल्डवेलप्रभृतींनी प्रारंभीचे तेलुगू समीक्षावाङ्‌मय निर्माण केले पण वीरेशलिंगम्‌ पंतुलूंनीच या क्षेत्रातही खरे भरीव स्वरूपाचे कार्य केले. विवेकवर्धिनी, हास्यसंजीवनी इ. नियतकालिकांतून निरनिराळे कवी आणि काव्य यांच्या गुणदोषांची चर्चा करणारे लेख त्यांनी प्रसिद्ध केले. कोक्कोंड वेंकटरत्नकविकृत विग्रहतंत्रविमर्शनमु हा त्यांचा पहिला समीक्षाग्रंथ होय. त्यांच्यानंतर गोपालराव नायडू इत्यादिकांनी भाषेतिहास, गद्यवाङ्‌मयसमीक्षा आणि काही कवी आणि काव्ये यांच्यासंबंधी ग्रंथ लिहिले. पाश्चिमात्य पद्धतीने पिंगली सूरनाच्या काव्याचे परीक्षण करण्याच्या निमित्ताने कट्टमंची रामलिंगरेड्डी (१८८१–१९५२) यांनी कवित्वतत्त्वविचारमु (१९१४) हा खळबळ उडविणारा ग्रंथ लिहिला. यानंतर विशिष्ट काव्यप्रकार, काव्यग्रंथ किंवा एखाद्या कालखंडातील गद्य वा पद्य साहित्याचे समालोचन करणारे ग्रंथ प्रसिद्ध झाले. चांगटी शेषय्यांचा आंध्र कवितरंगिणी हा ग्रंथ बारा खंडात आहे. केवळ आंध्र कवयित्रींच्या काव्याचा परामर्श श्रीमती ऊटकूरी लक्ष्मीकांतम्मा यांनी घेतला आहे. तेलुगू भाषासमितीने काही संशोधनपर ग्रंथांना पुरस्कार दिले आहेत.

नव्यांध्रसाहित्यवीथुलु, नव्यकवितानीरांजनमु, नेटिकालपुकवित्वमु आणि आधुनिकांध्रविकासवैखरी हे आधुनिक तेलुगू काव्यावरील उल्लेखनीय समीक्षाग्रंथ आहेत. जोन्नलगडू सत्यनारायणमूर्तींचा संहित्यतत्त्वविमर्श हाही ग्रंथ महत्त्वाचा आहे.

इतर गद्यसाहित्य : नन्नयाचे महाभारत चंपूशैलीत आहे. त्यात गद्यपद्य समप्रमाणात आहे. यानंतर चेमकूर वेंकटकवीपर्यंत चंपूकाव्येच जरी लिहिली गेली, तरी त्यातील गद्य उत्तरोत्तर कमी, नीरस आणि दुर्बोधच होत गेले. वेंकटकवीच्या रचनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे.

तिक्कन्नाचा भारतसावित्रीनामक गद्यग्रंथ आंध्र महिलांच्या नित्य पठनात आहे. अठराव्या शतकात रामायणादी काव्ये गद्यरूपात अवतरली. नारायणय्यांचे ‘शांतिपर्व’ स्वतंत्र वाटण्याइतके सुरस आणि सजीव आहे. रायवाचक आणि प्रतापचरित्र हे अनुक्रमे कृष्णदेवराय आणि काकतीय राजवंशांचे इतिहासग्रंथ आहेत. चेमकूर वेंकटकवीचे सारंगधरचरित्रही उल्लेखनीय आहे. याशिवाय गद्यवचनसंग्रह, यात्रावर्णने, सी. पी. ब्राऊनच्या ताताचार्युलकथलुसारखे कथासंग्रह, मॅकेंझीने तयार करवून घेतलेले द. भारतविषयक ६९ ग्रंथ इ. पुस्तके निर्माण झाली. गुरजाड श्रीराममूर्ती (१८५१–९९) आणि वीरेशलिंगम्‌ पंतुलूंनी आंध्रकवींची आणि आदर्श स्त्रियांची चरित्रे लिहिली. त्यानंतर तेलुगूत बरेच चरित्रवाङ्‌मय प्रसिद्ध झाले.

तेलुगूतील पहिले आत्मचरित्र वीरेशलिंगम्‌ यांचेच आहे. सामाजिक आणि साहित्यक्षेत्रांतील आपले यशापयश त्यांनी तटस्थपणे त्यात निवेदिले आहे. आणखी काही साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही आत्मचरित्रे लिहिली आहेत. गुरजाड वेंकट अप्पारावांच्या इंग्रजी दैनंदिनीचा तेलुगू अनुवाद १९५४ मध्ये प्रसिद्ध झाला.

निबंध : एकोणिसाव्या शतकात तेलुगूत वाङ्‌मयसमीक्षापर निबंध लिहिले गेले. हितसूचिनी ही बहुधा पहिली तेलुगू निबंधमाला असावी. स्वामिनेनी मुद्‌दुमुनरसिंह नायडूंच्या व निबंधांचा मुख्य उद्देश नीत्युपदेश आणि समाजसुधारणा हा आहे. वीरेशलिंगम्‌ पंतुलूंनी महिलोन्नतिव्यतिरिक्त अनेक विषयांवर निबंध लिहून या प्रकाराला निश्चित वळण दिले. साहित्यविषयक निबंध वगळले, तर तिरूपति–वेंकटकवुलूंचे आत्मनिष्ठ निबंध महत्त्वाचे आहेत. वृत्तपत्रांनीही अनेक नवे निबंधलेखक पुढे आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

व्याकरण : आंध्रशब्दचिंतामणि हे तेलुगूचे पहिले व्याकरण नन्नयाने लिहिले पण ते संस्कृत भाषेत आहे. १६०० मध्ये बालसरस्वतीनामक पंडिताने यावर तेलुगू टीका लिहिली. केतनाचे आंध्रभाषाभूषण हे तेलुगूत लिहिलेले पहिले व्याकरण होय. अंतरंगाच्या दृष्टीने ही दोन्ही एकमेकांस पूरक आहेत. यानंतरचा उल्लेखनीय अलंकारव्याकरणाविषयक ग्रंथ विन्नकोट पेद्दनाने लिहिला. १६५६ मध्ये काकनूरी अप्पकवीने आंध्रशब्दचितांमणीवर टीका लिहिली. यानंतर अनेक व्याकरणकार झाले. परवस्तू चिन्नय्य सूरीच्या बालव्याकरणानंतर बहुजनपल्ली सीतारामाचार्याने प्रौढव्याकरण लिहिले.

तेलुगू काव्यात छंदाला व्याकरणाहून अधिक महत्त्व असल्याने छंद:शास्त्रावरील ग्रंथ काव्यरचनेबरोबरच निर्माण होऊ लागले. विन्नकोट पेद्दनाचा काव्यालंकारचूडामणि हा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ होय. प्राचीन तेलुगू विद्वानांनी अलंकारशास्त्रावर स्वतंत्र ग्रंथ फारसे लिहिले नाहीत. सात–आठ लेखकांनीच महत्त्वाचे ग्रंथ रचिले आहेत. सोळाव्या शतकातील कवी चौडप्पाचा सीसपद्य निघंटु हा पहिला तेलुगू शब्दकोश होय. नुदुरपाटी वेंकटार्यांच्या आंध्रशब्दार्णवमुमध्ये प्राचीन साहित्यातील शब्दसंग्रह अर्थासह दिला आहे. कॅंप्बेलच्या शब्दकोशापेक्षा ब्राऊनचा कोश अधिक चांगला आहे.

धर्म, गणित, ज्योतिष, आयुर्वेद इ. अनेक विषयांवर प्राचीन काळी कोशरचना झाली. विसाव्या शतकात भाषा, साहित्य, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, विज्ञान इ. विषयांवर अनेक तेलुगू कोश तयार झाले आहेत.


 स्वातंत्र्योत्तर कालखंड : १९४७ ते १९७५ या कालखंडातील तेलुगू साहित्याचा स्थूल आढावा घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची नोंद केली पाहिजे. राष्ट्रपित्याची निर्घृण हत्या, नव्या राज्यघटनेची निश्चिती, जुन्या हैदराबाद संस्थानचे विलीनीकरण, पोट्टी श्रीरामलूंचे आमरण उपोषण, त्यानंतर आंध्र प्रदेश राज्याची स्थापना, आंध्र आणि तेलंगण विभागांतील तीनचार आंदोलने, विश्वनाथ सत्यनारायणांच्या श्रीरामायण कल्पवृक्षमु या ग्रंथास भारतीय ज्ञानपीठपुरस्कारप्राप्ती आणि विश्व तेलुगू संमेलन यांसारख्या घटनांचा या कालखंडातील साहित्यावर प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम झालेला आहे. साऱ्या देशापुढील समस्यांची जाणीव, अनेक वर्षे दबलेल्या आकांक्षांनी आलेली उभारी, अस्मिताजागृती, नवी सुखदुःखे यांचे पडसाद या कालखंडातील साहित्यात दिसून येतात. स्वातंत्र्योत्तर तेलुगू साहित्याचा आढावा पुढील साहित्यप्रकारांनुसार घेणे सोयीचे होईल :

काव्य : या क्षेत्रातील भावकविताप्रकारास स्वातंत्र्योत्तर काळात ओहोटी लागली. याची मीमांसा करण्यापूर्वी दोन प्रसिद्ध महाकाव्यांचा निर्देश केला पाहिजे. तेलुगू साहित्यसृष्टीतील उत्तुंग हिमालय असे ज्यांचे यथार्थपणे वर्णन करता येईल, त्या विश्वनाथ सत्यनारायणांचे श्रीरामायण कल्पवृक्षमु हे महाकाव्य सर्वार्थांनी अनन्यसाधारण आहे. त्याला भारतीय ज्ञानपीठपुरस्कार मिळाल्याने स्वतः कवी, तेलुगू भाषा आणि साहित्य यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला. मधुनापंतुलू सत्यनारायणशास्त्रीकृत आंध्रपुराणम्‌ हा असाच बृहत्‌ काव्यग्रंथ आहे. त्यात इक्ष्वाकू वंशापासूनचा आंध्रजनांचा काव्यरूप इतिहास नियोजिला आहे. त्याचा पहिला भागही प्रसिद्ध झाला आहे.

स्वातंत्र्योत्तर कालखंडात भावकवितेला मागे सारून पुरोगामी विचारसरणीची ‘अभ्युदय कविता’ जोमाने पुढे आली. तिचे मुख्य उद्‌गाते श्रीरंगम्‌ श्रीनिवासराव हे होत. तिला अधिक नवे वळण देण्याचे श्रेय शिष्टला उमामहेश्वरराव आणि रूद्रज्योतिकार श्रीरंगम्‌ नारायणबाबू यांच्याकडे जाते. मुक्तशैलीतील अप्रतिम काव्य पट्टाभी (१९१४– ) या अत्याधुनिक कवीच्या फिडेल रागाल डजन्‌ या संग्रहात आढळते. शंकरशास्त्री भागवतुल ‘आरूद्रा’नी आपल्या त्वमेवाहम्‌मध्ये निजामी राजवटीतील प्रसंगाधारे जीवनाच्या अनेक क्षेत्रांतील अराजकाचे स्वरूप विदारकपणे उघड केले. त्यांनी नवे भाषाप्रयोग आणि विलक्षण प्रतीके वापरली. अनिशेट्टी (१९२८– ), सोमसुंदर, रेंतल, बाल गंगाधर तिलक (१९१९–६६), कुंदर्ती, एल्‌चुरी, अब्बूरी वरदराजेश्वरराव हे या संप्रदायाचे आणखी काही नामवंत कवी होत. या सर्वांनी आपल्या स्वतंत्र शैलीत आर्थिक विषमता, सामाजिक भेद, अन्याय, यांविरुद्ध आवाज उठविला. या अभ्युदय कवींहून अधिक प्रखर वृत्तीचे आणि वाणीचे जे मोजकेच कवी पुढे आले, त्यांच्या समानशील अनुयायांनी ‘विप्लव रचयितुल संघम्‌’ स्थापन केला. जुने जाळून किंवा पुरून टाकण्याचा तारसप्तकातील सूर त्यांनी धरला असला, तरी ते केवळ भावविवश नाहीत. दाशरथी आणि सी. नारायणरेड्डी हे या सर्व प्रवाहांच्या समन्वयाचे पुरस्कर्ते आहेत. दाशरथींची कविता लोकप्रिय असून ती मुख्यत्वे वीररसात्मक आहे. त्यांनीही पीडित आणि दलितांच्या भावभावना मुखरित केल्या. पुनर्नवा, महांध्रोदय ही त्यांची उल्लेखनीय काव्ये. नारायणरेड्डींनी नागार्जुनसागर, कर्पूरवसंतरायलु, ऋतुचक्रम्‌, मंटलोमानवुडु इ. कथात्मक गेय काव्ये लिहिली. विषमता आणि अंधविश्वास यांचे खंडन करून शांती आणि समता यांचा उद्‌घोष त्यांनी केला आहे. मुक्तशैली, जानपद भाषा आणि बुर्रकथांसारख्या लोकगीतांचे माध्यम यांचा कौशल्याने उपयोग करणारे भुवनघोषाकार रमणरेड्डी यांना जनमानसात विशेष स्थान प्राप्त झाले आहे. बोई भीमन्नांचे नावही या क्षेत्रात प्रसिद्ध आहे.

कथा : आधुनिक तेलुगू कथेची परंपरा तशी अडिवी बापिराजू या कवि–कथाकारापासून सुरू होते. निसर्गाच्या पार्श्वभूमीवर मानवी अंतःकरणातील द्वंद्वे प्रसादपूर्ण वाणीने उलगडू पाहणाऱ्या त्यांच्या कथांत चित्रांचे रंग आणि मधुर संगीत यांचा प्रत्यय येतो. ‘भोगीरलोय’, ‘नागलि’, ‘शैलबाला’, ‘हिमालयरश्मि’ या त्यांच्या नावाजलेल्या कथा आहेत.

तेलुगू कथेच्या नव्या पर्वाचे श्रेय प्रामुख्याने पुढील चौघांकडे जाते : कोडवटिगंटी कुटुंबरावांनी रूढीभंग आणि नवसमाजरचनेचा आशय प्राधान्याने आपल्या कथांतून आविष्कृत केला. त्रिपुरनेमी गोपीचंद (१९१०–६२) यांच्या अनेक कथा प्रभावी आहेत. दुष्ट रूढींवर आघात आणि परिवर्तनासाठी उद्‌बोधन हाच त्यांच्याही कथांचा मुख्य आशय आहे. ते स्वतः शेतकरी असल्याने त्यांनी केलेले ग्रामीण जीवनाचे चित्रण जिवंत आणि रसरशीत वाटते. बुच्चिबाबूंनी तेलुगू कथेची पातळी खूपच उंचावली. त्यांच्या कथा मुख्यत्वे समस्याप्रधान असून अनुभूतीचे क्षेत्रही विशाल आहे. एडु कथलु, देशं नाकिच्चिन संदेशम्‌ इ. कथासंग्रह त्यांच्या सामर्थ्याची साक्ष पटवितात. पालगुम्मी पद्‌मराजू (१९१५– ) यांच्या ‘गालिबाना’ या कथेला जागतिक लघुकथा स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले.

आंध्र राज्यस्थापनेनंतर समाजातील नवचैतन्य अधिक स्पष्टपणे दृग्गोचर होऊ लागले. १९६० नंतरच्या कथांत काहीतरी नवे सांगावे, तेही नव्य पद्धतीने सांगावे, नव्या जीवनमूल्यांचा पुरस्कार करावा अशा प्रवृत्ती साहित्यरूप घेऊ लागल्या. या दृष्टीने कथांचे माध्यम स्वीकारणाऱ्यांची नामावली खूपच मोठी आहे. त्यांच्या अग्रभागी राचकोंडा विश्वनाथशास्त्रींचे नाव असून बाल गंगाधर तिलक, बलिवाडा कांताराव, कोम्मूरी वेणुगोपालराव, अवसरम्‌ रामकृष्णराव, मधुरांतकम्‌ राजाराम, मंजुश्री, चलसानी प्रसादराव इ. कथाकार आपापली पृथगात्मता पटविणारे आहेत. राचकोंडा विश्वनाथशास्त्रींच्या ‘मंचि चेडुलो ए कथा’, ‘द स्मोकिंग टायगर अनु पुलिपूजा’ या कथांचे तंत्र अगदीच नवे आहे. त्यांची पात्रे म्हणजेच एक विलक्षण निर्मिती आहे. अन्यायग्रस्त, दारिद्र्यपिडित यांची हृदयस्पशी चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. ‘जरी अंचु तेल्लचीरे’, ‘मूडस्थलाल्लो’, ‘कॉर्नर सीटु’, ‘वर्षम्‌’ या त्यांच्या नावाजलेल्या कथा आहेत. ‘ऊरि चिवरू इल्लु’, ‘दोंगा’ (बा. गं. तिलक), ‘नील्लु’ (पेद्दिभोट्ला सुब्बरामय्या), ‘क्रॉस्वर्ड पजलु = वानलो तुडुस्तुन्न मनिषि’ (मंजुश्री) इ. कथा विशेष प्रसिद्ध आहेत.


तेलुगू कथालेखिकांची संख्याही खूप मोठी आहे. त्यांना नियतकालिके, प्रकाशक यांच्याकडून उत्तेजन मिळत आहे. विशेष उल्लेखनीय कथालेखिकांत वासिरेड्डी सीतादेवी, रंगनायकम्मा, परिमला सोमेश्वर आणि बीनादेवी यांचा अंतर्भाव असून त्यांनी आंध्र स्त्रियांचे जीवन, स्त्री–पुरुषांच्या समस्या, अंतर्द्वंद्वे यांचे कलात्मक चित्रण आपल्या कथांतून केले आहे.

राचकोंडा विश्वनाथशास्त्रींनंतरच्या नव्या दमाच्या अनेक उदयोन्मुख कथाकारांचे होरू, जनम्‌, कथलु १२ इ. संग्रह विशेष गाजले. या संग्रहांतील अत्युत्कृष्ट कथा रामबरपू वेणुगोपालराव यांची ‘होरेत्तिन सप्तसमुद्रालु’ ही होय. या कथेतील पात्रे सामान्य समाजातील असूनही तिला एक प्रकारचे वैश्विक परिमाण लाभले आहे. या नव्या लाटेतील लेखकांनी कथावस्तूंबाबत नवे प्रयोग केले आहेत. राजकीय, सामाजिक परिस्थितीचे वास्तव दर्शन त्यांत घडविले आहे आणि इष्ट त्या परिवर्तनाचा पुरस्कारही केला आहे. कित्येक कथांत प्रामाणिकपणे सत्यशोधन केले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

कादंबरी : तेलुगू कादंबरीचे १९७२ मध्ये एक शतक पूर्ण झाले. सोनाबाई परिणयम्‌ या कादंबरीपासूनच समाजसुधारणा व कलात्मक आविष्कार या दोहांची परंपरा आजही अखंडपणे तेलुगूत चालू आहे. १९२० ते १९४० ही वीस वर्षे अडिवी बापिराजू, विश्वनाथ सत्यनारायण आणि गुडिपाटी वेंकटाचलम्‌ यांनी गाजविली. पुढील दशकांत गोपीचंद, बुच्चिबाबू, जी. व्ही. कृष्णराव आणि राचकोंडा विश्वनाथशास्त्री यांनी संज्ञाप्रवाह, मनोविश्लेषण, अस्तित्ववाद यांसारख्या विशेषांनी तेलुगू कादंबरीस अद्ययावत स्वरूप प्राप्त करून दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कादंबरीला समकालीन संदर्भ, नवे तंत्र, विषयांची विविधता व कलात्मकतेची उच्चतर पातळी प्राप्त होऊन तिच्या लोकप्रियतेला उधाण आले. कोडवटिगंटी कुटुंबराव, महीधर राममोहनराव (१९०९– ), उप्पल लक्ष्मणराव यांची नावे यासंबंधात उल्लेखनीय आहेत. विशेषतः राममोहनरावांच्या ओनमलु, मृत्युवु निडाललो, कट्टल वन्तेना या कादंबऱ्यांत वरील वैशिष्ट्ये प्रकर्षाने आढळतात. नवोदित लेखकांपैकी बलिवाडा कांताराव (१९२७– ), आर्, एस्‌. सुदर्शनम्‌, रंधी सोमराजू (१९२७– ), कोम्मूरी वेणुगोपालराव इत्यादिकांनी मध्यमवर्गीय जीवनाचे सहानुभूतिपूर्वक व कलात्मक चित्रण केले. या कालखंडात कितीतरी कादंबरीलेखिका पुढे आल्या. त्यापैकी पी. श्रीदेवींची कालातीत व्यक्तुलु ही कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे. वासिरेड्डी सीतादेवी, परिमला सोमेश्वर व रंगनायकम्मा या आणखी काही उल्लेखनीय कादंबरीलेखिका आहेत. व्यक्ती आणि समाज यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे रेखाटणाऱ्या कादंबऱ्यांत पोला प्रगडा सत्यनारायणमूर्ती यांच्या संघम्‌ चेसिन मनिपि, कौसल्या, दीपशिखा यांची गणना करावयास हवी. पोतुकुची सांबशिवराव (१९२९– ) यांच्या उदय किरणालु, येडुरोजुला माजिली, अन्वेषण या कादंबऱ्यांत तीव्रतम स्पर्धेच्या या काळात संवेदनाक्षम व्यक्तीची होणारी ओढाताण प्रभावीपणे चित्रित केली आहे. पोरंकी दक्षिणामूर्तीच्या कादंबऱ्या वातावरण आणि प्रादेशिक भाषावैशिष्ट्यांच्या दृष्टीने लक्षणीय आहेत. राचकोंडा विश्वनाथशास्त्री हे भावनाप्रधानता, तंत्रकौशल्य, भाषाशैली आणि सामाजिक बांधीलकीवर ठाम निष्ठा यांमुळे महायुद्धोत्तर काळापासूनचे सर्वश्रेष्ठ कादंबरीकार समजले जातात. प्रयोगशील लेखकांत ‘नवीन’ यांची अंपशय्या आणि वड्डेर चंडीदासांची हिमज्वाला यांचा उल्लेख केला पाहिजे. पूर्वी उन्नव लक्ष्मीनारायण यांनी मालपल्लीत हरिजनांच्या दारूण दुरवस्थेचे चित्रण केले. त्यानंतर याच विषयावरील अधिक तळमळीने लिहिलेली हृदयस्पर्शी कादंबरी म्हणजे एस्‌. आर्‌. नंदी यांची नैमिषारण्य ही होय. पाकुडु राल्लु (रावूरी भारद्वाज), धर्मनिर्णयम्‌ आणि तिक्कन सोमयाजी (तुम्मपल्ली रामलिंगेश्वरराव) या कादंबऱ्याही वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाच्या आहेत. असमर्थुनि जीवनयात्रा, चिवरिकी मिगिलेदि, चदुवु, कीलुबोम्मलु यांतही सामान्य माणसापुढील वैयक्तिक आणि सामाजिक प्रश्न नवनव्या तंत्रांचा अवलंब करून मांडलेले आहेत.

नाटक : अर्वाचीन तेलुगू नाटके लिहिली जाऊ लागली त्यालाही आता शंभर वर्षे झाली आहेत. विषय, रचना, संवाद, प्रयोगक्षमता यांबाबतींत जुन्या नाटकांची १९४५ नंतरच्या नाटकांशी तुलना केल्यास तेलुगू नाटकाचे स्वरूप खूपच बदलल्याचे ध्यानात येते. श्रीमंत आणि उच्चमध्यम वर्गीयांच्या जीवनातील नाट्याला त्यात स्थान उरले नाही. आणखी खालच्या स्तराकडे लक्ष केंद्रित झाले असले, तरी जातवार विचार त्यात झाला नाही. प्रजा नाटक मंडळीने १९४५ मध्ये मुंदडगू आणि नंतर मा भूमी ही नाटके रंगभूमीवर आणली. ती शेतमजुरांत फारच लोकप्रिय झाली. त्यांच्या प्रयोगांवर बंदी घालण्यात आली. याच काळात कुरूक्षेत्रम्‌, रक्तकन्नीर चिंतामणि ही नाटकेही फार गाजली. या नाटकांच्या प्रयोगांना आजही गर्दी होते. नंतरच्या नाटकांत सुशिक्षित मध्यम वर्गीयांचे दारिद्र्य, घरासाठी घरघर यांसारखे प्रश्न आणि दारुबंदी, लाचलुचपत हे नाट्यविषय झाले. आत्रेयांचे एन्‌. जी. ओ. हे नाटक फार लोकप्रिय आहे.

तेलुगू नाटकांवरील पाश्चिमात्य प्रभाव स्वातंत्र्योत्तर काळात कमी झाला. प्रौढ भाषेचे स्थान नित्य  व्यवहारातील सोप्या सरळ भाषेने घेतले. पात्रांच्या तोंडची दीर्घ कंटाळवाणी भाषणे व स्वगते नाहीशी झाली. सुटसुटीत तीन अंकी नाटके आणि एकांकिका लिहिल्या जाऊ लागल्या. अनेक पडद्यांचे काम केवळ एकाच दृश्याने भागविले जाऊ लागले.

डॉक्टरला वृत्तिधर्ममु (पालगुम्मी पद्मराजू), दारिना पोये दानय्या (बुच्चिबाबू), नायकुरालू (वाविलाल सोमयाजुलू), विजयपताका, राजकलक्ष्मी, कलोपासना (विंजमूरी शिवराम), कल्याणी, न्यायम्‌, पेद्दामनुष्युलु, रिहर्सल्स (सोमंची यज्ञन्नाशास्त्री), मल्लम्मादेवा उसुरू (आमनचेर्ल गोपालराव) ही नाटके विशेष यशस्वी ठरली. पण ई देशम्‌, न्यायम्‌, बुद्ध ही नाटके गाजली व कोंडमूडी गोपालरायशर्मा यांचे येदुरिता हे नाटक तर संस्मरणीय ठरले. १९४९ नंतरच्या नाटककारांत डी. व्ही. नरसराजू (नाटकम्‌), अवसरला वेंकटनरसू (ज्योतिर्मयी), प्रख्या श्रीराममूर्ती (कालरात्रि, फणी, मनिषितो मनिषि), कोर्रापाटी गंगाधरम्‌ (गुड्डिलोकम्‌), रेंट्‌ल गोपालकृष्ण (इन्स्पेक्टर जनरल), अवसरला सूर्यराव (पंजरम्‌), के. व्ही. रमणरेड्डी (राजीवम्‌) इ. नाटककार विशेष उल्लेखनीय आहेत. एन्‌. कृष्णम्माचारी (तेलुगू गड्डा), शंकरशास्त्री भागवतुल आरुद्र (शालभंजिका), के. व्ही. नरसिंहम्‌ (उषारागम्‌) हे काही उपहासप्रधान व संगीतप्रधान नाटककार होत. १९४९ नंतरच राजमन्नार, चलम्‌, नार्ल, मुद्‌दुकृष्ण, भमिडिपाटी कामेश्वरराव, गोराशास्त्री इत्यादिकांच्या दर्जेदार एकांकिका प्रसिद्ध झाल्या.


 मारूतीराव, रावी कोंडलराव, नंदी रामस्वामी, इनॉक, जॉन्सन यांच्या प्रायोगिक नाटकांना पारितोषिके मिळाली आहेत. १९६३ नंतर आंध्र विद्यापीठाची प्रायोगिक रंगभमी (रंगमंच) बंद झाली. आंध्र कलापरिषदेचे कार्य खंडित स्वरूपात सुरू आहे. आंध्र प्रदेश संगीत नाटक अकादमीचे कार्यही डोळ्यात भरण्यासारखे नाही. नामवंत नाटककार चित्रपटांसाठी व नभोवाणीसाठीच मुख्यत्वे लिहित आहेत.

इतर गद्यसाहित्य : पानगुंटी लक्ष्मीनरसिंहरावांच्या साक्षी या लोकप्रिय निबंधसंग्रहाचा आणि मुट्‌नुरी कृष्णरावांच्या समीक्षा या निबंधसंग्रहाचा उल्लेख अवश्य करावा लागेल. कोमर्राजू लक्ष्मणराव, मल्लमपल्ली सोमशेखर शर्मा यांचे वैचारिक व संशोधनपर लेखन आणि कोराड रामकृष्णराव यांचे इतिहासविषयक व आलोचनात्मक निबंध तेलुगू साहित्याची भूषणे मानली जातात. समीक्षा क्षेत्रात कट्टमंची रामलिंगरेड्डी आणि विश्वनाथ सत्यनारायण यांचे ग्रंथ श्रेष्ठ प्रतीचे आहेत. खंडवल्ली लक्ष्मीरंजनम्‌, दिवाकर्ल वेंकटावधानी यांचे साहित्येतिहासपर ग्रंथ, वेटुरी प्रभाकरशास्त्री आणि सुरवरम्‌ प्रतापरेड्डींचे संशोधनात्मक प्रबंध, गंटी सोमयाजींचा आंध्रभाषाविकासमु, निडदवोलू वेंकटरावांचा दक्षिणांध्रसाहित्यमु हे ग्रंथ तसेच तेलुगू नाटकांचा विकासक्रम दर्शविणारे ग्रंथ या काळात लिहिले गेले आहेत.

साहित्यसंस्था, पारितोषिके, ग्रंथालये व नियतकालिके : तेलुगू साहित्याच्या विकासास पुढील साहित्यसंस्थांनी विशेष हातभार लावला आहे : आंध्र प्रदेश साहित्य अकादमी, हैदराबाद तेलुगू भाषासमिती, मद्रास आणि हैदराबाद आंध्र सारस्वत परिषद, हैदराबाद लक्ष्मीनारायण परिशोधन मंडली, हैदराबाद आंध्र रायटर्स असोसिएशन, हैदराबाद नव्य साहिती समिती, हैदराबाद विश्वसाहिती, हैदराबाद आंध्र प्रदेश विद्या परिषद, विजयवाडा कल्चरल असोसिएशन, अनकापल्ली साहिती समिती, रेपल्ले इत्यादी. आंध्र प्रदेश साहित्य अकादमीच्या विद्यमाने प्रतिवर्षी दोन विषय नियोजित करून त्यावर ग्रंथ मागविले जातात. त्यांत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या दोन ग्रंथांना प्रत्येक दोन हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाते.

आधुनिक तेलुगू साहित्यात उत्तेजन देण्याच्या हेतूने सर्वोत्कृष्ट कादंबरी, कथासंग्रह आणि काव्यसंग्रह यांना प्रत्येकी रू. १,११६ चे पारितोषिक देण्यात येते. आधीच्या ५ वर्षांच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांतून ही निवड केली जाते. गरजू साहित्यिकांना ग्रंथप्रकाशनार्थ आर्थिक साहाय्यही दिले जाते.

आंध्र सारस्वत परिषद ग्रंथालय, काकिनाडा कृष्णदेवराय आंध्रभाषानिलयम्‌, हैदराबाद वेमनाभाषानिलयम्‌, विजयवाडा आणि हैदराबाद स्टेट लायब्ररी, हैदराबाद श्रीवेंकटेश्वर ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररी, तिरूपती तसेच आंध्र, वेंकटेश्वर, उस्मानिया या विद्यापीठांची ग्रंथालये तेलुगू साहित्याभ्यासाच्या दृष्टीने विशेष समृद्ध व प्रसिद्ध आहेत.

तेलुगू साहित्यास उत्तेजन देऊन त्याच्या विकासास विशेष हातभार लावण्याचे कार्य नियतकालिकांनी नेहमीच चोखपणे बजावले आहे. या दृष्टीने आंध्र साहित्य परिषद पत्रिका, भारती, परिशोधन, आंध्रपत्रिकाउगादिसंचिकलु, शारदा, कृष्णपत्रिका, सुभाषिणी, विद्यार्थी, आंध्रप्रभा, आंध्रपत्रिका, स्रवंती, विशालांध्र इ. नियतकालिके विशेष उल्लेखनीय होत.

संदर्भ : 1. Chenchiah, P. Raja M. Bhujanga Rao Bahadur,  A History of Telugu Literature, Calcutta, 1928.

   2. Raju, P. T. Telugu Literature, Bombay, 1944.

   3. Sitapati, G. V. History of Telugu Literature, Delhi, 1968.

   4. Sitaramaiya, K. A Hand Book of Telugu Literature, Hyderabad, 1941.

   ५. भीमसेन ‘निर्मल’ संपा. तेलुगु का उपन्यास साहित्य, हैदराबाद, १९६७,

   ६. रेड्डी, बालशौरी, तेलुगु साहित्य का इतिहास, लखनौ, १९६४.

टिळक, व्यं. द.